Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:
शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती. तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो. तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले. ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी... आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर.. सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली.. परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा ... सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच... ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती. मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन.... दोन वाजताची प्रतीक्षा ! रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती. आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा.. जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता. आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता. आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती. इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते. ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण..... मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ... न्यू बॉर्न फादर तुमचा अभिषेक
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अतिशय सुंदर लेख! छान भावविश्व उभे केले आहे अभ्याने. माता पिता यांना हार्दिक शुभेच्छा! या वाक्यांनी तर 'दिल जीत लिया'
कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
- अभ्या
As you write more & more personal ,it becomes more & more universal.
- पु लं अभ्याचा हा लेख म्हणजे अतिशय चपखल उदाहरण आहे पु लं च्या वाक्याचे

लेकीचे छानसे नाव सुचताच आणि ते ठेवताच, स्वाक्षरी द्वारेच कळवतो नक्की :) बाकी लेक सध्या म्हणत काय नाही, बस्स रडून रडून धिंगाणा. काल रात्री तर मी वैतागून बायकोला म्हणालो, ए चल, हिला सोडून येऊया परत हॉस्पिटललाच.. जोक्स द अपार्टा, पण जेव्हा ती रडून शांत झोपी जाते तेव्हा तिला न्याहाळण्यासारखे सुख नाही :)

मी वैतागून बायकोला म्हणालो, ए चल, हिला सोडून येऊया परत हॉस्पिटललाच..
पहिल्यच दिवशी वैतागला का बाबा? लेख लिहून दमला का? :D

हीहीही ...आताच एक जोक घडला ... कृपया हलके घेणे . मी प्यांटवाल्यांना अभिषेकरावांची गम्मत सांगत होते . कि ते म्हणाले कि हिला हॉस्पिटलात सोडून येऊया . त्याआधी दुसराच विषय चालू होता . ते शांतपणे म्हणाले नक्की कोणाला हॉस्पिटलमध्ये सोडायचं आहे . *lol* मला जे हसायला आल . मी म्हणाले मलाच सोडा हॉस्पिटलात . :D जोक हा अगदी शब्द न शब्द उलगडून सांगण्यात अर्थ नसतो हे त्यांच्या गावी /ध्याणी- मणी पण नसते . *cray2* मग मी १-२ नावे घेऊन म्हणाले यांना सोडायचे आहे हॉस्पिटलात . *boredom* तरीही समजले नाही . *fool* मग सगळ सांगितलच . *wacko* दुखावले गेल्यास क्षमा करावी .

बाप झाल्याच्या खुप शुभेच्छा... सुरेख माडंलेय.. अगदी स्वताचे अनुभव वाचतोय असे वाटले... :)

अभिषेक, सर्वप्रथम तुमचे मनापासून अभिनंदन ! थोडेसे अवांतर... मला अगोदर हे स्पष्ट करु दे कि मी जे काही लिहिणार आहे त्यामुळे मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहियेत. आणि कोणाच्याही आनंदावर विरजणही घालायचे नाहिये. मी फक्त माझे मत मांडणार आहे. एकंदरच मला अपत्यासाठी एवढा आटापिटा लोक का करतात तेच कळत नाही. अपत्य प्राप्ती करुन लोकांच्या आयुश्यात काय वेगळे घडते ते काही समजलेले नाही. अपत्यामुळे आनंदचे क्षण फार थोडे आणि दु:खाचे किंवा कटकटीचे खुप असे मझ्या निरिक्षणास आले आहे. जोपर्यंत त्या मुलाची निरागसता असते तोपर्यंत सर्वकाही छान असते. पण एकदा का त्याला स्वार्थ कळायला लागला की तेच मुल आप्ल्यल उलटुन बोलायला लागते. तेव्हा चा घाव जीव्हारी लागतो. ज्या अपत्यासाथी त्याग वगैरे पालक करतात त्यांचे तर मला कीव येते. थोड्क्यात काय युष्य खर्ची घालायचे आणि एक आयुष्य घदवण्याचा प्रयत्न करायचा. निष्पन्न काय अमचे अपत्य आम्ची आमच्या म्हातार्पाणात काळजी घेतो / घेईल. अशा गोष्टी वर दाव लावायचा कि ज्यामधे नुकसान जास्त आनी नफा कमी. कशासाथी? यातुन काय साधले जाते? स्त्री ने गर्भार्पणाचा , बाळंतपणाचा त्रास कशासाठी भोगायचा? नवर्‍याने तरी मुल जन्माला येण्याअगोदर्चा आणी नंतर चा मानसीक त्रास का म्हणुन भोगायचा? यामधे आर्थिक त्रास तर धरलेलाच नाहेये ... तो वेगळाच. अजून बरेच काही लिहायचे आहे पण हे मराठीत टाईप करताना फार वेळ जातोय. आता थांबतो.

ख.फ. ? हे काय आहे ? मी कोणाचाही सल्ला मागितलेला नाही. त्यामुळे तुमच्या सल्ल्या ला मझ्या दृष्टी ने काहीही किंमत नाही

आनंदराव, कदाचित अपत्य जन्मामुळे आणि नंतर त्याला वाढवण्यात होणारे सुख आपल्या अनुभवास कमी आले असावे म्हणून आपले असे मत बनले असावे. मुळात मुल हि आपली गुंतवणूक आहे आणि आपल्या म्हातारपणी त्यातून आपल्याला परतावा मिळेल असा विचारच बरोबर नाही त्यामुळे मुलांच्या जन्मापासून आजतागायत मला किती सुख( मिळाले आणि मिळेल) याचा हिशेब ठेवणे मला पटणारे नाही. आपण आपले आयुष्य खर्ची घालावे. जसे जायचे ठिकाण हे आपले इतिकर्तव्य नाही तर प्रवास हाच आनंदाचा असावा( “Focus on the journey, not the destination. Joy is found not in finishing an activity but in doing it. प्राचीन ग्रीक विचारवंत कॉनस्टनतिनोपास) या विचाराचा मी आहे तसेच मुल मोठे झाल्यावर काय करेल याचा विचार करण्यापेक्षा आज आपले मुल आपल्याजवळ आहे आणि आपल्यावर प्रेम करीत आहे याचा आनंद उपभोगावा. मुलाला वाढवण्यात काय सुख आहे हे बर्याच जणांना कळत नाही. म्हणून ते मुल मोठे होण्याकडे डोळे लावून बसतात. नफा कमी आणि नुकसान जास्त हा विचार केलात तर मिसळपाव वर वेळ घालवून आपल्याला काय नफा मिळतो असा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. कारण या काळात दुसरा काही उद्योग करून आपण चार पैसे जास्त मिळवू शकाल. एक पुरातन म्हण आहे. आपल्याकडे एक रुपया असेल तर त्याची भाकरी विकत घ्या,. भाकरी तुम्हाला जगवेल. आणि आपल्याकडे दुसरा रुपया असेल तर त्याचे फुल विकत घ्या. फुल आपण का जगायचे ते शिकवेल. मी माझ्या लग्न अगोदरपासून वंध्यत्व विभागात काम करीत आलो आणि मी अक्षरशः हजारो निपुत्रिक जोडपी पाहिली आहेत/ पाहतो आहे. त्यामुळे जर आपल्याला मुल झाले नाही तर आपले आयुष्य अपूर्ण राहील अशी भीती मला वाटत असे. अर्थात माझी पत्नी जेंव्हा प्रथम गरोदर राहिली तेंव्हा पासून मी मुलांच्या सर्व वाढीच्या अवस्थेत मिळणारा आनंद पूर्णत्वाने उपभोगतो आहे. मुल आपल्याला उलटून बोलेल किंवा आपले ऐकणार नाही हे मुळात आपण गृहीत धरणे आवश्यक आहे कारण ते आपली काही आपलिया आज्ञा पाळणारे यंत्र नाही ते एक स्वतंत्र विचार करणारे व्यक्तिमत्त्व आहे हे आपण बहुधा गृहीत धरले नसावे. अपत्यासाठी त्याग करावा लागतो तो काही सर्वसंग परित्याग नाही (किंवा नसावा). आणि आपण आपल्या मुलासाठी थोडासा त्याग केला तर त्यात काय विशेष आहे? आपल्या स्वतःच्या माता पित्यांनी तो केला असणारच. मग त्यांनी यात काय साधले किंवा यात त्यांचा नफा काय आणि नुकसान काय हा प्रश्न कोणी त्यांना विचारला तर त्यावर आपले काय म्हणणे आहे. येथे प्रतिसाद देणार्यांची मनोवृत्ती ( मंगेश पाडगावकरांच्या शब्दात) अशी आहे कि "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. आणि त्यांच्याच (मंगेश पाडगावकरांच्या) भाषेत "तुमचं आणि आमचं सेम नसतं" असंच म्हणावं लागेल.

बाकी हा मुद्दा वाद घालण्यायोग्य वाटत नसल्याने माझ्यातर्फे लेखनसीमा! पण आनंदरावांना एवढेच म्हणेन की प्रत्येक नाण्याची दुसरी बाजू शोधली पाहिजे असे नसते, आयुष्य असेही सुखकर आहेच :)

)कदाचित अपत्य जन्मामुळे आणि नंतर त्याला वाढवण्यात होणारे सुख आपल्या अनुभवास कमी आले असावे म्हणून आपले असे मत बनले असावे

. अपत्य जन्मल्यानंतर होणारे क्षणिक सुख/आनंद, आणि लगेच बिल भरायला लागताना झालेली वास्तवाची जाणीव तसेच अपत्य वाढविताना होणारी सर्वाथाचा त्रास , हे सगळे दुसर्‍याचे बघून माझे असे मत झाले आहे. २)

मुळात मुल हि आपली गुंतवणूक आहे आणि आपल्या म्हातारपणी त्यातून आपल्याला परतावा मिळेल असा विचारच बरोबर नाही त्यामुळे मुलांच्या जन्मापासून आजतागायत मला किती सुख( मिळाले आणि मिळेल) याचा हिशेब ठेवणे मला पटणारे नाही. आपण आपले आयुष्य खर्ची घालावे.

हिशेब तर ठेवावाच लागणार.... कारण पैसा तर लाग्तोच सगळी कदे. आणि मुलांवर चिडताना हा हिशेब दाखवतोच की ! आणि आयुष्यच जर खर्ची घालायचे असेल अगदी निरपेक्ष भावनेने तर अहो समाजसेवा करा की . ३)

नफा कमी आणि नुकसान जास्त हा विचार केलात तर मिसळपाव वर वेळ घालवून आपल्याला काय नफा मिळतो असा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. कारण या काळात दुसरा काही उद्योग करून आपण चार पैसे जास्त मिळवू शकाल खरे साहेब , तुमच्या माहिती साथी सांगतो की मी मिपा वरचे काही लोकांचेच लेख वाचतो तेही अगदी फावल्या वेळात ! त्यामुळे मी मिपा वर वेळ घालवतो हे तुमचे विधान पतत नाही. असो.

बाकी नन्तर लिहिन.. मरठीत लिहितान फार वेळ जातिओ

सुंदर लेख अभिषेक…. जुन्या आठवणी तरळुन गेल्या. मी पण एक आई म्हणुन माझ्या या भावना शब्दात पकडण्याचा प्रयत्न केला होता. हि भावनाच काही वेगळी असते. एक बाबा म्हणुन तुम्ही खूप सुंदर आणि तरल शब्दात प्रकट केल्या आहेत भावना. नव्या परीला आणि तिच्या आई-बाबांना मनापासुन शुभेच्छ्या.

खुप छान मांडल्या आहेत भवना. ७० ते ८०% माझा सुद्धा हाच अनुभव आहे (अगदी हुबेहुब म्हणायला हरकत नाही). १८ तास वाट पहावी लगली होती माझ्या परीच्य येण्याची. पण १८ तासात माझ्या बायकोची जी अवस्था होती ती तुमचा लेख वाचताना आठवली आणि डोळे भरुन आले. हा लेख मी साठऊन ठेवनार आहे.

अर्रे वा मस्त लेख. अभिनंदन अभिषेक . ३ महिन्यापुर्वीच हा अनुभव घेतला असल्याने खुप ताजाताजा रिलेट करु शकलो. अजुन २-३ महिन्यांनी लेक जेव्हा मुठीत बोट घट्ट पकडुन ठेवेल तेव्हाची भावना तर शब्दातही व्यक्त करता येणार नाही

अजुन २-३ महिन्यांनी लेक जेव्हा मुठीत बोट घट्ट पकडुन ठेवेल तेव्हाची भावना तर शब्दातही व्यक्त करता येणार नाही अगदी अगदी, दोन तीन महिने नाही तर चारपाच दिवसांनीच मी तिच्या चिमुकल्या हातात माझे बोट सरकावून बसू लागलोय. अजून ती समोर दिसणारी व्यक्ती आपला बाप आहे हे ओळखत नाही मात्र मध्येच अलगद माझे बोट दाबले जाते, चार ते पाच मिनिटांनी एकदा. आणि असे पाचसहा अनुभव घेता यावे म्हणून मी वीस-पंचवीस मिनिटे याच अवस्थेत तिच्या जोडीने बसून असतो.. सध्या ती आजोळी असल्याने रोजची भेट नाही ना..

सध्या आमची कन्या ४ महिन्यांची झालीये, तिला तसे थोडे फार समजते असा मला वाटता, वा मी तसा माझा समाज करून घेतलाय, हे मला माहिती नाही. ती मला पाहते, माझा आवाज एकला कि माझ्या दिशेन वळून पाहते, मला पाहताच छानशी हसते, तिच्याशी खेळताना माझी बोटं पकडते, तिच्या तो कोमल नाजूक हातांचा स्पर्श, ती भावना, तो आनंद काही वेगळाच आहे मित्रा. तू पण आता तोच आनंद घ्यायला लवकरच सुरुवात करशील मित्रा.

हवालदार साहेब, मुल चार महिने ते २ वर्षे या काळात सर्वात मनोवेधक किवा रोचक (interesting) असते. खरतर मुलाच्या मेंदूची वाढ एक वर्ष पर्यंत होते यामुळे चार महिने ते एक वर्ष आणि त्यानंतर पुढे एक वर्ष मूल बोलायला चालायला शिकणे इ कृती शिकत असते. म्हणून माझी एक नम्र सूचना आहे कि या कालावधीत जितका जास्त वेळ मुलीला देता येईल तितका द्यायचा प्रयत्न करा म्हणजे आयुष्यभर पुरेल असा सुखाचा ठेवा आपल्याला लाभेल अशी मला खात्री आहे. प्रत्येक कृतीचा एक छोटासा व्हिडियो( किंवा भरपूर फोटो) काढून ठेवा त्याची गोडी आपल्याला आयुष्यभर आनंद देत राहील. हीच सूचना इतर नवीन आय आणि बापानं सुद्धा देऊ इच्छ्हितो

"कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ..." ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन.

मित्र तुझे खूप खूप अभिनंदन, तुला जसा हा अनुभव आला, तसाच तो मला पण ३ महिन्यान पूर्वी आला आहे. माझ्या स्वीट little princess च्या जन्माच्या वेळी मी याच सगळ्या विचारन मधून गेलो होतो. आज तुझा हा लेख वाचताना माझ्या डोळ्या समोर ते दृश्य जसे च्या तसे परत आले. मला माझे हे लहानसे गिफ्ट २४ डिसेंबर ला मिळाले होते, माझी मुलगी हि माझ्या साठी नवीन वर्षाची एक छानशी सुरुवात आहे, देवाने पाठवलेली एक देणगी आहे, मी एका मुलीचा वडील आहे, हे सांगताना मला खूप अभिमान होतो. तुझे मनपुर्वक अभिनंदन.

अभिनंदन अभिषेक राव तुमचे ,तुमच्या पत्नीचे आणि कुटुंबियांचे! तुमच्या 'परी'ला आशीर्वाद! take care

अतिशय सुंदर मांडलय. बाळाला (परीला) अनेकानेक आशीर्वाद. आपले अभिनंदन. बाळ जन्मलं की काही दिवस्-महीने, सकाळी उठल्याउठल्या आपल्याला बाळ झालय हेच आठवतं अन आपण हसत हसत ताडकन उठून त्या इवल्याशा मुटकुळ्याकडे धाव घेतो. किती अपूर्व पहाट असतात त्या. रात्री जाग आली तरी बाळाचे स्मरण- सकाळी बाळाचे स्मरण. सारखं तेच आठवतं. अन नास्तिकांना काय आठवतं माहीत नाही मला मात्र सारखी बाळासाठी प्रार्थना करावीशी वाटे. आपला हा जीव नीट वाढू दे-फुलू दे -शहाणा होऊ दे :)

बाळ जन्मलं की काही दिवस्-महीने, सकाळी उठल्याउठल्या आपल्याला बाळ झालय हेच आठवतं अन आपण हसत हसत ताडकन उठून त्या इवल्याशा मुटकुळ्याकडे धाव घेतो. किती अपूर्व पहाट असतात त्या. रात्री जाग आली तरी बाळाचे स्मरण- सकाळी बाळाचे स्मरण. सारखं तेच आठवतं. >>>>>>>>>> अगदी अगदी... लहान असताना आमच्या जुन्या चाळीतल्या घरी गणपती यायचा.. रात्री झोपतानाही बाप्पांना बघून झोपा आणि सकाळी उठल्याउठल्याही पहिला धावतपळत त्यांचेच दर्शन.. आघोळ न करता कश्यालाही हात लाऊ नको रे हा आईचा ओरडा आठवतो अजूनही.. आताही तेच तसेच, पण हि परी मात्र पाच दिवसांची पाहुणी नाही हि सुखावणारी गोष्ट.. बस्स आता तिने हळूहळू मोठे व्हावे आणि हे सुखाचे दिवस वाढवावेत हिच बाप्पांकडे प्रार्थना !

सर्वप्रथम "बाबा" झाल्याबद्द्ल हार्दिक अभिनंदन. फारच ओघवतं लिहिलं आहेस. हे असेच क्षण थोड्याफार फरकाने अनुभवले आहेत. म्हणुन वर म्हटल्याप्रमाणे परीचे सगळे क्षण साठवुन ठेव. तीला दिर्घायुष्य लाभुदे हिच त्या परमेश्वराकडे प्राथर्ना.

आयुष्यातला सर्वात सुंदर आनि सर्वात दमणारा काळ आहे हा..! आता दुपट्यात गुंडाळुन ठेवलेलं उद्या जेव्हा घर भर धावत असेल तेव्हा खरी मजा येणारे!! सगळ्ळं सगळ्ळं रेकॉर्ड करुन ठेवा.. हातांचे, पायांचे ठसे घेऊन ठेवा.. आवाज रेकॉर्ड करा.. फोटो काढा.. व्हिडिओ काढा.. नंतर हेच पाहुन फार मजा येते..!! जमल्यास डायरीच लिहा ना.. किंवा किमान स्पेशल दिवस तरी लिहुन काढा!! अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक..

मी काही वाचले नाही. मला दोन वर्षांपूर्वीचे असेच काहीसे काहीच आठवले नाही. आणि माझ्या डोळ्यांतून पाणीही आले नाही.