Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
माझ्या एका मित्राने सांगितलेली खरी घटना). माझी लेक आपल्या ४ वर्षाचा लेकी सहा जवळपास दीड-एक वर्षांनी परदेसाहून परतली होती. म्हणतात न दुधा पेक्षा साय केन्हाही प्रिय. उन्हाळ्याचे दिवस आणि सुट्ट्या. गोंडस नाती बरोबर दिवस भर दंगा मस्ती करत वेळ कसा निघत होता कळतंच नव्हत. दिवस भर अविरत चालणारी तिची बडबड ऐकून मी तिचे नाव टाकिंग बर्ड ठेवले. लेकीने इशारा दिला, आजोबा फार डोक्यावर घेता आहात तिला, पण सावधान राहा, वेळ मिळताच ‘बिन पाण्याची हजामत करेल, तेंव्हा तुम्हाला कळेल, ‘टाकिंग बर्ड’ काय चीज आहे ते. पण मी लक्ष दिले नाही, मला वाटले पोरीच्या मनात असूया निर्माण झाली असेल, अखेर तिच्या हक्काच्या वडलांचा ताबा आता तिच्या पोरीने जो घेतला आहे. पण एकमात्र खरं, तिचे निरीक्षण कमालीचे होते, तिने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देता देता नाकी नऊ यायचे. रविवारचा दिवस होता, सौ. म्हणाली लेकीला ‘गुलाब जाम’ आवडतात. हिमालय सागर (हलवाईचे दुकान) जाऊन गुलाब जाम घेऊन या. कुर्ता-पाजामा घालून, ‘टाकिंग बर्डला’ सोबत घेऊन गुलाब जाम आणावयास निघालो. पहिल्या माल्या वर घर असल्या मुळे, जिने उतरणे भाग होते. टाकिंग बर्ड हात पकडून जिने उतरू लागलो. अचानक एखाद्या वेगवान गोलंदाज प्रमाणे, तिने पहिला चेंडू फेकला, आजोबा, तुम्ही जीन्स का नाही घालत? जीन्स नाही का तुमच्या कडे? मॅाम-डैड बाहेर जाताना नेहमीच जीन्स घालतात. मी म्हणालो, जीन्स नाही आपल्या कडे बुआ. तिने लगेच दुसरा चेंडू फेकला, तुमच्या बिल्डिंगला लिफ्ट का नाही? आता काय म्हणणार, तरी ही उत्तर दिले, बिल्डिंग छोटी आहे म्हणून लिफ्ट नाही. ‘म्हणजे तुम्ही छोट्या बिल्डिंग मध्ये राहतात’ आमचा न 17th फ्लोरवर फ्लेट आहे. आजपर्यंत कधी जिना चढला नाही. मनात म्हंटले, च्यायला, या बायका बालपणा पासून दुसर्याला तुच्छ लेखण्याचा मौका सोडत नाही. खाली उतरल्या वर स्कूटर काढली. लगेच तिने लगेच गुगली टाकली, आजोबा,तुमच्या कडे कार नाही का? मी म्हणालो, स्कूटर आहे ना! कारपेक्षा जास्त मजा येते चालवायला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून असे वाटले ‘तिला काही माझे उत्तर पटलेले दिसत नाही’. खैर, हलवाईच्या दुकाना जवळ पोहचलो. स्कूटर थांबतच, तिने मलिंगा सारखा यार्कर आपटला, आजोबा इथे मॅाल नाही आहे का? आम्ही तर भाजी सुद्धा मॅाल मधून आणतो, आजोबा, मॅाल म्हणजे मोठ्ठे दुकान असते, आपले चिमुकले हात मोठ्ठे करत तिने म्हंटले. (जसे काही आजोबाना मॅाल म्हणजे काय, माहित नसावे). मी म्हणालो, या दुकानात, मॅाल पेक्षा मस्त ‘गुलाब जाम’ मिळतात, तुला आवडतात न. तिने मान हलवत होय म्हंटले. मला ही हायसं वाटले. ‘गुलाब जाम’ घेतले, आणि हलवाईला देण्यासाठी खिशातून पर्स काढताना तिने विचित्र नजरेने माझ्या कडे बघितले होते. अखेर दुकानातून बाहेर पडलो, स्कूटर जवळ येताच तिने शोएब अख्तर पेक्षा ही वेगवान बाउन्सर टाकला, आजोबा, तुमच्याकडे क्रेडीट कार्ड नाही आहे का? आता काय म्हणणार, आज पर्यंत कधी क्रेडीट कार्डची गरज भासली नव्हती. मुकाट्याने म्हणालो, नाही. या वेळी तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव उमटलेले दिसत नव्हते. पण तिची बडबड मात्र थांबली. घरी येत पर्यंत ती एकदम शांत होती. घरी आल्या-आल्या, ती हळूच कानात पुटपुटली , जिव्हारी लागणारा बीमर त्रिफळा उडवून गेला, आजोबा तुम्ही पुअर आहात का?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

माझा आईची स्मरणशक्ती अफाट होती. वयाच्या ८० व्या वर्षी पण अगदी लहानपणीच्या कविता (वाहवा वाहवा चेंडू हा..सुरेख कितितरी खचीत हा.... मिस मेरी भोर...) पासून शिवाजी, महाभारत, पेशवाईचा संपूर्ण इतिहास, अनेक मजेदार चित्रविचित्र कथा (उंदरलीची उंदरली खिरीत पडाली...टाईप) अश्या शेकडो गोष्टी तोंडपाठ होत्या. माझ्या आग्रहामुळे तिने आत्मचरित्रात्मक आठवणी लिहिल्या, त्यात सर्व अगदी तपशीलाने लिहिले होते. हल्लीसारखे पोरांचे कवतिक तेंव्हा केले जात नसे, आणि हल्ली तर पोरांना जरा थोडे काही येत असेल, तर त्यांना एकदम 'शेलेब्रिटी'च बनवण्याची घाई आईबापांना लागलेली असते.

नात निरागस, चुणचुणीत असली तरी लेख आवडला असे म्हणवत नाही. अमेरिकनच कशाला, अगदी भारतातल्याच जन्मापासून सगळं मिळालेल्या या नातवंडांना, जिने चढणे,जमिनीवर बसून जेवणे, भारतीय पद्धतीच्या संडासात बसता येणे, मातीत खेळणे, पतंग उडवता येणे, पायी चालणे वगैरे माहितीच नसेल तर, आपत्कालीन परिस्थितीला ते कसे सामोरे जातील, असा विचार मनांत येतो.

हे खरे तर खूप सोप्पे आहे! उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत एकदा तरी गावी राहणाऱ्या आजी-आजोबांकडे किंवा कोकणात एखाद्या गावी किंवा ग्राम-कृषी पर्यटनाला घेवून जायचे! हाकानाका!

प्रतिसादाबाबत सर्वाना धन्यवाद. तिमा ताई 'निखळ आनंद देणारा म्हणुन हा लेख' वाचा. जो पर्यंत लहान आणि निरागस असतात तो पर्यंतच त्यांच्या बोलण्यातून आपल्याला आनंद मिळतो. लहान मुलांचे जेवढे ज्ञान असते त्या आधारावर ते निष्कर्ष काढतात आणि अधिकांश निष्कर्ष गमतीदार असतात. म्हणूनच लहान पोरांबरोबर वेळ घालविण्यात मजा येते. मग मुले अमेरिकेतले असो, दिल्ली-मुंबईचे असो किंवा खेडे गावातले. सर्वच सारखी असतात.

पोहोणार्‍या बाळांचे व्हिडो केवळ अद्भुत. वरील व्हिडो संपल्यावर आणखीन येणारे सुद्धा अवश्य बघावेत. धन्यवाद मदनबाणहो.

मुलं गोड असतात पण ती काय बोलतात त्यावरून त्यांचे आईबाप एकमेकांशी काय बोलत असावेत त्याचा अंदाज येतो. आमच्या एका मित्रयुगुलाच्या मुलाने एक-दोनदा त्यांच्या कारने गेल्यावर एकदा "काका, तू कार का घेत नाहीस?" असे विचारले होते.