Welcome to misalpav.com
लेखक: मालविका | प्रसिद्ध:
रेडीओशी माझ नात तस म्हटल तर लहानपणापासून.अगदी लहान असताना मी जेव्हा आजोळी सुट्टीत रहायला जायचे तेव्हा सकाळी आजीचा रेडीओ चालू असायचा.आमच्याकडे का कोण जाणे पण जवळच रत्नागिरी स्टेशन कधी लागल नाही.नेहमी मुंबईच लागायच.आजीची सकाळी काम चालू असताना बरोबरीने रेडीओ चालू असायचा.मी कधी त्याच्याकडे लक्ष नाही दिल तेव्हा.पण तेव्हा रेडीओ कानावर पडलेला आठवतोय.शिवाय आमच्या घरी तर मोठे काका सकाळी उठत तेव्हापासूनच ते रेडीओ चालू करत.थोड्या वेळाने रेडीओ चा आवाज सहन न होऊन आम्ही पण उठायचो.आम्ही किती तरी वेळा काकाना संगयाचो की निदान सुट्टीच्या दिवसात तरी आम्हाला झोपू दे.पण त्यानी ते कधीच ऐकल नाही.बर तेव्हाच्या घराला आता सारख्या वेगळवेगळ्या स्वतःच्या अशा खोल्या नव्हत्या .घर जरी १२/१४ खोल्यांच असल तरी बेडरूम म्हणावी अशा २ ते ३ च.पण एकदा उठल्यानंतर परत बेडरूम मधे जाउन झोपन काकांच्या आणि एकूणच घरच्या शिस्तीत बसत नसे.त्यामुळे जबरदस्तीने उठावाच लागे.लहानपणी रेडीओशी संबंध आला तो एवढाच. नंतर शाळेच्या वयात देखील वर्गातील एखाद्या मैत्रिणीच गाण रेकॉर्ड झालाय किंवा सराच भाषण झालाय एवढाच . तसा आमच्याकडे टी वी लवकर आला त्यामुळे तेव्हा कधी रेडीओ ची गरजच नाही वाटली. मी जेव्हा मुंबई ला पेयिंग गेस्ट म्हणून रहायला आले,तेव्हा रेडीओशी माझा अगदी जवळचा संबंध आला.मी मुंबईत दाखल झाले तेव्हा एफ एम च प्रस्थ फार वाढल होत.मी आले तेव्हाच ४/५ हिंदी गाण्याचे चॅनेल्स सुरु होते.मी तेव्हा एका बीपीओ मधे कमाला लागले होते .त्यामुळे तिथे शिफ्ट ड्यूटीज होत्या.मी जेव्हा सकाळच्या शिफ्ट ला जायचे तेव्हा ६.१५ ची ठाण्याहून बस असायची.मी ६लाच घर सोडायचे.तेव्हा (आता नाव लक्षात नाही)पण कुठल्यातरी मराठी चॅनेल वर सुंदर मराठी गाणी लागायची. बस ६.५० ला कंपनी च्या दारात उभी रहायची तोपर्यंत मी पुर्ण वेळ ती सगळी मराठी गाणी ऐकायचे.एरवी दिवसभर जाता येता एफ एम वर हिंदी गाण्यांचा रतीब चालूच असायचा.या सकाळच्या गाण्यांप्रमाणे माझा आणखी अगदी आवडता कार्यक्रम म्हणजे रात्री ९ वाजता लागणारा "पुरानी जिन्स ".रेडीओ मिर्ची किंवा रेडीओ सिटी किंवा अशाच कुठेतरी तो कार्यक्रम लागायचा.तो मात्र मला खूप आवडायचा.दुपारची शिफ्ट रात्री १० ला संपायची .तेव्हा परत येताना जो एफ एम चालू व्ह्यायचा तो अगदी घरी येऊन झोपेपर्यंत.मला मनापासून जुनी गाणी खूप आवडतात.त्यात किशोर कुमार माझा जास्त आवडीचा.त्यामुळे हा पुरानी जिन्स कार्यक्रम मला विशेष आवडे.कितीतरी जुनी पण खूप सुंदर गाणी त्यात लागत.अगदी उशिरा बरेच रेडीओ चॅनेल मग अशीच जुनी गाणी लावत.आणि मुख्य म्हणजे यात त्या आर जे ची बडबड नसे.बर्याच वेळा अस व्ह्यायच की तो आर जे बडबड करायला लागला की लगेच दुसरीकडे नवीन गाण सुरु करायच.त्यामुळे दर थोड्या वेळाने मोबाइल वरून बोट चॅनेल बदलत असायची. बर्याच वेळा रात्री फोन चार्जिंग ला लावायचा आणि हेडफोन्स कानात घालून गाणी ऐकत झोपायच हा माझा आवडता प्रकार होता. २वर्ष मुंबईत घालवल्यावर मी पुण्याला शिफ्ट झाले.इथेही तोच प्रकार.पण इथले एफ एम चॅनेल्स हिंदी मिश्रित मराठी बोलायचे.गाणी सगळी हिंदीच.पण सोबत लागणारी बडबड मात्र हिंदी इंग्रजी आणि मराठी अशी एकत्र.पुण्यात आल्यावर हातात गाडी आली आणि मग टिपिकल पुणेकर मुलामुलींप्रमाणे मी कानाला हेडफोन्स लावून गाडी चालवायची सवय लवकरच करून घेतली.इथे सुध्हा मी पीजी म्हणूनच रहात होते.पण मुंबईत अनोळखी मुली सोबत राहून अगदी मस्त मैत्री जमली तर पुण्यात माझ्या चिपळूणकर मैत्रिणीच साथीला मग काय मजाच.इथे आम्ही मोठ्याने एफ एम वर गाणी लावून ठेवायचो.कोणताही काम करताना बरोबर गाणी हवीच.मग बाहेर जायच तर तयारी करताना गाणी.अगदी घराबाहेर पाउल टाकेपर्यंत मोबाइल मोठ्याने वाजत असायचा.आणि दराबाहेर पडल की लगेच हेडफोन कानाला चिकतायचे.पुण्याचा ऑफीस मधे फोन डेस्क वर न्यायला परवानगी होती . त्यामुळे इथे सकाळची शिफ्ट असेल तर सकाळी ७ वाजता शिफ्ट सुरु होई तेव्हापासून ९ वाजता मॅनेजर येईपर्यंत फोन वर गाणी चालू असत.आणि जर दुपारची शिफ्ट असेल तर ६ वाजता मॅनेजर घरी गेला की मग रात्री १०ला शिफ्ट संपेपर्यंत एफ एम वर गाणी चालू असायची .शिवाय मी पुण्याहून चिपळूणला रात्रीच्या एस टी ने जायचे.तेव्हा अगदी सातार्यपर्यंत एफ एम चालायचा.त्यामुळे मला रेडीओ त्या प्रवासात सोबती वाटायचा. आता परदेशी आले आणि रेडीओची साथच सुटली.आजकालचे फोन पण भरपूर मेमरी असलेले.शिवाय इथे हाय स्पीड इंटरनेट असल्याने हवी तेवढी गाणी हवी तेव्हा ऐकता येतात. पण आजही रेडीओ म्हटल की मला माझे मुंबई पुण्याचे दिवस आठवतात.तेव्हाची गाणी आता जुनी झाली.ती काही जुन्या काळातल्या लता,किशोर,रफी,आशा यांच्या गाण्यांसारखी अजरामर गाणी नाहीत.पिक्चर नवीन असताना ती गाणी सारखी ऐकून ऐकून आवडायला लागली होती.पण त्या सगळ्या गाण्यांबरोबर माझ्या काही आठवणी गुन्फल्या गेल्या आहेत इतकाच.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मिपा वरील सर्व मंडळींचे प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद . मला सरावाच प्रतिसाद आवडले , प्रत्येकाने आपल्या वेगळ्या वेगळ्या आठवणी सांगितल्या . खास करून लक्षात राहिलेल्या जाहिराती . खूपच मस्त वाटल वाचून . मजा आली .

रेडियोच्या या आठवणी खरोखरच शाळकरी वयात घेऊन जातात. सकाळी आईने रेडियो लाऊन ठेवलेला असायचा, त्यात लता मंगेशकर, भीमसेन यांच्या अभंगाने जाग यायची. 'जे का रंजले गांजले', 'रंगा येई वो रे' .. प्रत्येक गाणं जवळ जवळ पाच मिनीटाचं त्याप्रमाणे सकाळची कामं आवरायची सवय लागलेली. त्या कार्यक्रमात शेवटी एक समूह-गीत असायचं (संगीतकार बहुधा 'कानू-घोष' असायचे), त्यांच 'राही अगर तुझे है अपने पंखो पर विश्वास' किंवा 'हम होंगे कामयाब' सुरू झालं की चपला घालून शाळेत जायची वेळ व्हायची. संध्याकाळी खेळून घरी आलं की शेजार्‍यांच्या रेडियोवर नाट्य-संगीत लागलेलं असायचं. रात्री थोडे हिंदी कार्यक्रम. झोपायच्या वेळी जुनी हिंदी गाणी याचं समीकरणही पक्कं डोक्यात बसलेलं. आपली आवड किंवा इतर श्रुतिका ऐकत खिडकीत उगाचच कोणाची तरी वाट बघत बसलेली आई आत्ता या क्षणीसुद्धा दिसतेय. असो, http://eprasaran.com/ ह्या संकेत स्थळावर सुभाष केळकरांनी त्या जुन्या रेडियोच्या धर्तीवर कार्यक्रम सुरू केले आहेत. जरूर ऐका.

शनिवारी सकाळी अकरा वाजता कामगार सभेत 'लोकगीतं' लागायची. त्यात बाजीप्रभूंचा ७ मिनिटांचा पोवाडा, त्यातील 'लाख गेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, महाराज कूच करावं' हे बाजीप्रभूंचे विरश्रीयुक्त आर्जव, मोजक्या मावळ्यांनीशी लढविलेल्या पावनखिंडीच्या लढाईचे वर्णन, अंगावर तलवारींचे अनंत घाव सोसूनही खिंडीत पाय रोवून उभे राहिलेले बाजीप्रभू शेवटी अगतिक पणे विचारतात, ' झाले कारे तोफांचे बार? पोहोचले कारे महाराज सुखरुपपणे गडावर? महाराज गडावर पोहोचत नाहीत तो पर्यंत बाजीचे प्राण ह्या देहास सोडून जाणार नाहीत, हर हर महादेव!' शेवटी तोफांचे बार कानी येतात आणि बाजीप्रभू म्हणतात, 'जा! महाराजांना सांगा, तोफांचे बार ऐकू येत नाहीत तोपर्यंत बाजीचे प्राण त्याच्या देहाला सोडून गेले नाही. येतो महाराज, मुजरा स्विकारावा!' हा ७ मिनिटांचा, दोन भागात ऐकवला जाणारा पोवाडा ऐकताना (हज्जारदा ऐकला तरीही) बाजी प्रभूं इतकाच मीही कानात प्राण आणून गडावरच्या तोफांचे आवाज ऐकायला उत्सुक असायचो. बाजी प्रभू प्राण सोडायचे तेंव्हा मलाही गलबलून यायचं, वाटायचं 'बाSSSSजीSSSS' अशी जोरदार हाक द्यावी त्या वीराला आणि सांगावं 'महाराज गडावर पोहोचले आहेत स्वतःला वाचवावं, देह ठेवू नये!' आज, हे लिहीतानाही डोळे पाण्याने भरून आले आहेत.

आमच्याकडे आज्जी रेडिओवरचं मंडळ की काहीतरी लावून बसायची. मराठी गाणी वगैरे नेहमी चालू असायचं पण सुरुवात मात्र संस्कृत बातम्यांनी! दुसरी आज्जी रात्रीची श्रुतिका चुकवायची नाही. त्यातल्या कथेतील पात्रांमध्ये गुंतायची. मग ऐकता ऐकता "हे वागणं शोभलं का तुला?" किंवा " देवानं मदतीचा हात दिला/ देव पावला" टाईप म्हणायची. मालविका, लेखन आवडले. आठवणी जाग्या झाल्या.

अजूनही 'ते' रेडिओ चांगले चालतात. पुण्यात पण आहेत. त्याहीपेक्षा आश्चर्य वाटतं या बल्ब चं! १९८५ मध्ये मी हे रेडीओ टीव्ही दुरुस्ती क्लासला जाऊन शिकलो होतो. ट्रान्झीस्टरचे टी व्ही शिकवण्या आधी व्होल्वचे पण शिकवले होते. इंजिनियरिंग करतांना पैसे घेऊन दुरुस्त पण करत असे. पुण्यात रेडिओला पंधरा रुपये आणि टीव्हीला पन्नास रुपये दुरुस्तीला द्यायला पण लोक खुश नसत. मग म्हणलं ''मना-सज्जना त्यापेक्षा इंजिनियर व्हा लवकर!'' आणि हा धंदा बंद केला!

पण आजकाल सरकारी नभोवाणीवर जाहिरांतीचा रतीब असतो. कोण कुठलेतरी प्रायोजक दर १० मिनीटांनी बदलतात अन त्यांच्या ओंगळवाण्या जाहिराती जुन्या आकाशवाणीच्या जरतारी साडीला ठिगळ लावलेल्यासारख्या वाजतात. त्यातले फोन नंबर, मोबाईल क्रमांक ऐकतांना ते पाठ होवू नये म्हणून मी मनातल्या मनात किंवा थोडे मोठ्याने 'आआआआअ' असा अर्थहीन घोकतो. जुनी आकाशवाणी खरोखर चांगली होती. महाराष्ट्राला (किंबहूना भारत आणि पाकिस्थानलासुद्धा) आकाशवाणीने पु.ल. वपू. यांसारखी अनेक साहित्तिक मिळवून दिलेत. (ही यादी वाढवा. ज्ञानात भर पडेल.) दोन पिढ्यांच्या बुद्धीवाढीसाठी आकाशवाणीने साहित्तिक खतपाणी दिले. शेतकर्‍याच्या शेतीविषयक ज्ञानात भर टाकली. पुर्वी वेगवेगळ्या राज्यातील रेडीओ केंद्रांच्या कार्यक्रमाची देवाणघेवाण, अनुवादही व्हायचे. कोणतीही रेकॉर्ड तयार झाली की ती रेडीओ लायब्ररीला पाठवण्याचा देखील परिपाठ होता. शॉर्टवेव्ह बँडवर रशियन केंद्र, मध्य आशियातील काही देश आदींमधून हिंदी कार्यक्रमही लागायचे. आता असे रेडीओ सिग्नल्स इतर सिग्नल्सच्या गजबजाटात मिळणे मुश्किल आहे. एक खरा किस्सा फोटोसकट कुठेतरी वाचलेला आहे. आकाशवाणी (पुर्वीची AIR म्हणजेच All India Radio) ही भारतीय नभोवाणीची वाहीनी १९३० साली सुरू झाली. त्यावेळी पाकिस्तानचे नामोनिशाण नव्हते. १९४७ साली फाळणी झाल्यानंतर AIR चे पाकिस्तानातील रेडीओकेंद्रे सहाजिकच पाकिस्तानात राहीली. त्यानंतर कित्तेक वर्षे त्या रेडीओ केंद्रांच्यावर AIR असलीची पाटी असायची. नंतर कोणतेतरी भारतिय शिष्टमंडळ तेथील रेडीओ केंद्रांवर भेटी देतांना त्या शिष्टमंडळातील कुणीतरी व्यक्तीने ही जाणीव तेथील अधिकार्‍यांना करून दिली व त्यानंतर बदल झाला. जुन्यात काळानुरूप समयोचीत बदल हवाच पण प्रत्येक जुने म्हणजे उणे असे नव्हे हे आकाशवाणीच्या बाबतीत म्हणावे लागते की काय अशी भिती आता वाटतेय.

मी आख्खा बोक्या सातबंडे रेडिओ वर ऐकला आहे. लहान मुलांसाठी "गम्मत जम्मत" हा कार्यक्रम यायचा. बरीचशी जुनी गाणी फक्त रेडिओ वर ऐकली आहेत म्हणून अजून स्मरणात आहेत. एकदम जुने दिवस आठवले. मराठी अ आणि ब वाहिनी चालू आहे कि माहिती नाही

मी तसा रेडिओच्या जमान्यातला नसलो तरी ट्रांझिस्टरवर क्रिकेट काँमेंटरी ऐकण्याचे नाते आहे आमचे. अगदी डिप्लोमालाही जेव्हा पेजरचा अस्त होऊन नुकतेच मोबाईल येऊ लागले होते तेव्हाही मी कॉलेजला न लाजता वय वर्षे बारा पासून वापरत असलेलो एक जुना ट्रांझिस्टर घेऊन जायचो. (खरे तर जेव्हा विकत घेतला होता तेव्हा मामाने दुबईवरून आणला असल्याने त्याचे कौतुकच होते.) असो, जुना का असेना तो मॅचचा स्कोअर सांगत असल्याने, आणि सर्वांना तो जाणून घ्यायची उत्सुकता असल्याने माझा भाव वधारायचाच. पुढे डिग्रीसाठी मी जेव्हा वालचंद सांगलीला गेलो तेव्हाही तिथे आपल्या मुंबईसारखी मॅचची कॉमेंट्री नाही बघून रुखरुख लागलेली. त्यानंतर पुढे मग मोबाईलमध्ये एफएम आले, ईंटरनेट आले, आणि हे सारे दर दुसर्‍याच्या हातात आले, मॅचचा स्कोर समजायचे सतराशे साठ पर्याय उपलब्ध झाले आणि ट्रांझिस्टरची मजा गेली.. तरीही आजही मोबाईल मधील १६-३२ जीबी मेमरीकार्डातील शेकडो-हजारो गाण्यातले एखादे निवडून ते ऐकण्यापेक्षा एफएम वर रॅन्डम लागणारी गाणी, एखादे न आवडल्यास स्टेशन चेंज करत दुसरे तिसरे शोधत ऐकण्यात जास्त मजा येते.

रेडीओचे जुने आवडते कलाकार आणि लेखक :शंना नवरे ,रविंद्र पिंगे ,बाळ कुडतरकर ,जयवंत दळवी ,प्रपंच आणि पुन्हा प्रपंचचे आवाज देणारे ,तबस्सुम ,अमिन सयानी ,क्रिकेटचे धावते समालेचक (मराठी),हिंदी आणि इंग्रजीचे कॉमेंटेटर .शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे ,कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे .उदा०कल्याणी ,कोणार्क .कधीकधी कॉफिहॉऊस कट्टा आवडायचा . नवीन एफेमवरचे घंटासिंग आणि अॅँग्रीगणेशन चे जोकस आणि सचिन तेँ०च्या आवाजातली बडबड मस्त असते .रात्रीच्यावेळी टैक्सी चालवणारे वगैरे एफेमवर खुश आहेत .

यस्टरडे वन्स मोर मधून खूप जुने नंबर्स आठवले. हमीद सयानींच्या आठवणीने कळ आली. ते खरंच ध्यानीमनी नसतांना अकाली गेले. अमीन सयानींना त्यांची बोर्नव्हीटा क्वीझ कॉन्टेस्टमधली जागा नक्कीच नीटशी घेता आली नाही. इन्सपेक्तर ईगल पण आनंद देऊन गेला. आकाशवाणीच्या हिंदी रेडिओ जाहिरातसृष्टीतली ये ढेरसे कपडे मैं कैसे धोऊं..... ही पहिली सांगितिक जिंगल अशोक पत्कींची होती. अनेक आठवणींना उजाळा देणार्^या लेखाबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

हा धागा वाचायला सुरवात केली आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या घरी रेडीओ नव्हता. शेजार्यान्कडे जाउन कधी कधी ऐकावयास मिळायचा पण वडलाना ते आवडत नसे. एकदा वडील गावी गेले असताना, तो रेडीओ रात्रीपुरता मागुन आणला - मस्तपैकी गाणी ऐकत झोपलो आणि झोपेत धक्का लागुन तो पडला. वडलाना कळले असते तर माझी धडगत नव्हती! शेवटी आईला शरण गेलो - सदाशिव पेठेत दुरुस्ती करणारे एक जण होते- त्यानी हा भाग मिळत नाही, नन्तर तो भाग मिळत नाही असे करुन चीकार वेळ घेतला- शेजारी समजुन घेणारे होते व वडलानाही चान्गले ओळखत होते म्हणुन त्यानी काही त्रास दीला नाही. शेवटी आईने कसे तरी पैसे भरुन तो परत आणला. आमच्या घरासमोरच एक उडपी रेस्टौरन्ट होते त्याचा रेडीओ क्रिकेट्चा सामना असला की मोठ्याने लागत असे आणी मग तेथे प्रचड गर्दी जमत असे. त्यातुन सामना परदेशात असेल तर रात्री पर्यन्त!! नन्तर मी परदेशात आलो- १९५२- पहिली नोकरी- पगार अगदी तुट्पुन्जा. एक बेड्सीटर खोली- मनोरजनाची साधने अगदी कमी -TV पुर्वीचा काळ-. ५३ साली पहिली मोठी खरेदी- रेडीओ - pilot कम्पनीचा- valve वाला. मग रात्री गाणी ऐकत झोप. रेडिओ सीलोन सारखे radio luxenburgh होते. रेडीओच्या मागच्या जाळीतुन valves चा प्रकाश खोली उजळुन काढायचा. आजही त्याची आठवण आली की भरुन येते. नेहमीप्रमाणे आयुष्यात चढ-उतार आले. शेवटी एकदा तो विकायला काढला पण २६ पौडाला घेतलेल्या त्या रेडीओला ५ पौड पण येईनात म्हणुन विकला नाही. पुढे परत चान्गले दिवस आले. आज तो रेडीओ माझ्या घरात. बसायच्या खोलीत मानाच्या जागेवर विराजत आहे- माझ्या आयुष्याचा साक्षीदार! मला वाटते की त्याची त्यावेळची पावती देखील माळ्यावर कोठेतरि आहे. शेवटी, all India radio चा signature tune - कायम डोक्यात होता. भारतात आलो की तो ऐकावासा वाटे- आज बहुगुणी मुळे ऐकावयास मिळाला. ध्न्यवाद