Welcome to misalpav.com
लेखक: मनिष | प्रसिद्ध:
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो. ९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे. त्यांची मुलगी (उज्ज्वला की उर्मिला ताई, आता नक्की नाव आठवत नाही) खूप छान गायची आणि त्यांच्या घराजवळून गेलो तरी ते सुरेल सूर ऐकू येत्…अर्थातच गाणे कळण्याचे ते वय नव्हते पण जे ऐकायचो ते छान वाटायचे. अर्थातच आमचे main attraction त्या घरामागे मोठ्ठे वाढलेले तुतीचे झाड होते. त्यांच्या घरामागच्या गॅरेजवर चढलो की मग आरामात तुती तोडून खाता यायच्या. पण एक अडचण होती…मला वाटते त्या गॅरेजचे छत पत्र्याचे होते आणि तिथे पालापाचोळाही खूप असायचा, त्यामुळे मग आवाजही बराच व्हायचा…आणि तसे ते लोकं एरवी सुरेल असले तरी रागावायचे आणि ओरडायचे बेसुरच! :P तरीही असा थोडाबहुत आरडाओरडा सहन करून मोठ्या प्रयत्नांनी त्या गॅरेजवर चढून आम्ही त्या तुतींवर ताव मारायचो…अचानकच दुकानात त्या तुती बघितल्यावर ती लहानपणीची झाडावरच्या तुतींची चव तोंडात आली. मग तसेच ते ‘वेड्या आंब्याचे’ झाड आठवले. घरापासून जवळच मला वाटते अभ्यंकरांच्या बंगल्यात ते झाड होते. गम्मत म्हणजे ते झाड अगदीच लहान म्हणजे जेमतेम ४-५ फुटांचे असेल, पण नेहमी मोठ्ठाल्या कैर्‍यांनी लगडलेले असायचे…आम्ही चिल्ले-पिल्ले असलो तरी आमचा हात सहजच पोहोचायचा त्यामुळे आमचे त्या झाडावर विशेष प्रेम होते. त्या बागेला एक तारेचे कुंपण होते, पण तो काही फारसा प्रॉब्लेम नव्हता…खरा प्रॉब्लेम होता की ते घर बाकी बर्‍याच घरांच्या मध्येच असल्यामुळे काहीही करायला गेलो की लगेच सगळ्यांना दिसायचे…अर्थात आम्हीही मांजरांच्या पायांनी काम करायला शिकलो होतो. असेच एका दिवशी मी आणि माझा मित्र केदार आम्ही दोघांनी कैर्‍या तोडायच्या ठरवल्या – पण एक दुसरीच डोकेदुखी होती. केदारचा छोटा भाऊ कपिल हा जाऊन सारखी त्याच्या आईला चुगली करायचा…त्यात केदारची आई माझी टीचर, त्यामुळे ती भीती होतीच. कपिलला गुंगारा द्यायचा बराच प्रयत्न केला, पण तो सावलीसारखा आमच्या मागेच होता..शेवटी बरेच काऊन्सेलिंग करुन त्याला पटवला (काऊन्सेलिंगची खोडही तशी जुनीच!). त्यानेही आईला दादाने कैर्‍या तोडल्या हे सांगणार नाही अशी शपथ घेतली. तेंव्हा आम्ही शपथ वगैरे गोष्टी भयंकर सिरीयसली घ्यायचो…. त्यामुळे आम्ही जरा निर्धास्त झालो. मांजरीच्याच चपळाईने आणि दबल्या पावलांनी आम्ही आम्हाला हव्या तेवढ्या कैर्‍या तोडल्या आणि हळूच तारेच कुंपण ओलांडून आलो. मला वाटते तिथेच जवळच कुठेतरी बसून त्या कैर्‍या खाल्ल्या आणि मग मी, केदार आणि कपिल अगदी साळसूदपणे केदारच्या घरी गेलो. थोडी धाकधूक होतीच…पण काही मिनिटे शांततेत गेल्यावर आम्ही जरा रिलॅक्स झालो. तेवढ्यात कपिलला काय हुक्की आली काय माहीत, अगदी निरागसपणे ‘आई दादानी नै कैर्‍या तोडल्या काई, मनिष दादाने पण नै तोडल्या!’ असे बोलून आमच्याकडे बघू लागला. आता ह्याला हे तरी पचकायची काय गरज होती? पण झाले….त्यांची आई बोलुन-चालून आमची टीचर, तिने व्यवस्थित आमचा ‘क्लास’ घेतला. अर्थातच दुसर्‍या दिवशी आम्हीही सविस्तर कपिल बाळाचा क्लास घेतला. तो लहान असल्यामुळे अर्थातच त्याला जास्त ‘समजावून’ सांगायची गरज होती, त्यामुळे त्याच्याबरोबरचा आमचा ‘क्लास’ जरा लांबलाच….तो कार्टासुद्धा ‘अरे, पण मी दादांनी नाही तोडल्या’ असेच सांगितले ना आईला, असे म्हणत वाद घालत राहिला…असो! तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते… तशीच एक संत्र्याचीही फार जुनी आठवण आली. मला खरंतर अंधुकसेच आठवते आहे…मी चार-एक वर्षाचा असेल. आम्ही तेंव्हा विदर्भात अमरावती जवळच्या एका लहान गावात राहत होतो. बाबा बँकेत मॅनेजर होते आणि गावात बहुतेक लोकं त्यांना आणि पर्यायाने आम्हालाही ओळखायचे. माझ्याबरोबर खेळायला आणि मला सांभाळायला एक थोडा मोठा मुलगा यायचा….तो मला फिरायलाही घेऊन जायचा. एके दिवशी असेच आम्ही खूप लांबवर फिरायला गेलो आणि तिथे संत्र्याच्या बागा होत्या. मला वाटते त्याने मला विचारले की संत्री हवीत का? मी कशाला नाही म्हणतोय? तसेही आपले-दुसर्‍याचे कळायचे नाही मला त्या वयात. शिवाय फळे म्हणजे जीव-की-प्राण…त्यातुन झाडावरची संत्री मिळतात म्हटल्यावर मी एकदम खुषीत. आम्ही बरीच संत्री खाल्ली आणि जवळजवळ एक पिशवी भरून घरी घेऊन आलो….संध्याकाळी तो बागवाला शेतकरी आला बाबांकडे तक्रार घेऊन…तुमच्या मुलानी खूप संत्री तोडली म्हणून. बाबांनी बहुतेक त्याला संत्र्यांचे पैसे दिले असावेत, त्यांनी मला मारल्याचे काही मला आठवत नाही. आई-बाबा रागावले ओरडले असतील बहुतेक….पण तेही काही आठवत नाही. आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात…तुतीपासून संत्र्यांपर्यंत, शेकडो मैल दूर असलेल्या एका गावातून दुसर्‍या गावात एका निमिषार्धात ….मग ह्या संत्र्यांच्या आठवणींबरोबरच त्या गावातल्या आणखी कितीतरी आठवणी आल्या…माझे वय तेंव्हा ३-४ किंवा फार-फार तर ५ वर्षे असेल. आणि ह्या सगळ्या माझ्याच आठवणी आहेत…आई-वडिलांनी सांगितलेल्या नाहीत. असो! त्या गावाचे किस्से पुन्हा कधीतरी…. सध्या एका उपनगरातल्या छोट्या प्लॅटमधे राहतो…हपापलेल्या बिल्डर्सनी पोसलेल्या ह्या सिमेंट्च्या जंगलात फळांची झाडे फारशी दिसतही नाही. माझ्या पिल्लाकडे अशा झाडांच्या, फळांच्या रसदार आठवणी असतील का हा प्रश्न अधून-मधून सतावत राहतो. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी महोत्सवात त्या झुडुपांतुन स्ट्रॉबेरी तोडतांना फुललेला त्याचा चेहरा कधी विसरता येणार नाही. पण परवाच एक गंमत झाली. आमच्या ह्या प्लॅटस पासून जवळच काही बंगल्यांची सोसायटी आहे, मिश्तू हिच्याबरोबर तिथे फिरायला गेला होता आणि हा तिथल्याच एका बंगल्यातील कैरीच्या झाडाकडे भान हरपून पाहत होता…त्या बंगल्यातल्या आज्जी भलत्याच प्रेमळ निघाल्या, त्यांनी ह्या दोघांनाही घरात बोलावले आणि आमच्या पिल्लाने गच्चीवरून मनसोक्त कैर्‍या तोडल्या. निदान ३-४ किलो तरी कैर्‍या घरी घेऊन आला….आणि त्याचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा हाऽऽऽऽऽ असा फुललेला! आणि अर्थातच त्याला बघून आमचाही! फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की! :) (पुर्वप्रकाशित)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मस्त लेख. मलबेरीला तुती म्हणतात माहीत नव्ह्तं. अप्रतिम चव असते त्याची, आम्हीदेखिल महाबळेश्वरलाच खाल्ल्या होत्या. तुम्हाला कुठे मिळाल्या? पुण्यात कुठे मिळतील ते जाणुन घेण्यास उत्सुक. शेवटच्या परिच्छेदाबाबत: जरी एखाद्याने सोसायटीत फळांची झाडे लावली तरी फळे आली की जी हमरीतुमरी होते त्यापेक्षा नको ते फळझाड असे वाटते. २० वर्षापुर्वी माझ्या काकांनी आंब्याचे झाड लावले, पाणी वगैरे घालुन वाढवले आणि काही वर्षांनी थोडा मोहर आला तेव्हा अचानक शेजारचा माणुस येऊन रेग्यलर पाणी घालु लागला, आजुबाजुला झाडु वगैरे मारु लागला आणि काका जेव्हा कैर्‍या, आंबे काढायला गेले तेव्हा माझे झाड आहे, माझ्या हद्दीत आहे अशी भाषा बोलु लागला. ३ वर्षापुर्वी रस्ता रुंदीकरणात झाड गेले. (असे कीस्से इतर सोसायट्यांमधुन पण ऐकले आहेत) बाकी थेट झाडावरुन तोडुन एखादे फळ खाताना अवर्णनीय आनंद मिळतो हे मात्र खरे.

डेक्कनला मिळतील, चितळेंच्या दुकानापाशी जे फळांचे दुकान आहे तिथे असतील, किंवा मागच्या जिमखान्याच्या रस्त्याने चालत गेलात पुढे जी छोटीशी मंडई आहे तिथेही असू शकतील. भांडारकर रस्त्याच्या सुरुवतीला बेकर्स बास्केट आहे तिथे फळांच्या २ गाड्या असतात - अलिकडील पलीकडील रस्त्यांवर तिथेही मिळतील. अर्थात दर वेळी असतीलच असे नाही.

तशा बर्‍याच ठिकाणी मिळतात...जसे कँपात दोराबजीच्या बाहेर. मेन स्ट्रीटवर, बाणेर, औंध मधल्या फळवाल्यांकडे. पण क्वचितच मिळतात आणि शोधाव्या लागतात. अगदी स्ट्राबेरीसारख्या सहज मिळत नाहीत. हे झाड खाजगी मालकिच्या बंगल्यात असल्यामुळे त्या आज्जींचेच होते. बिल्डींगमध्ये तुम्ही म्हणता तसे होऊ शकते.

मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात .खुप छान . आम्ही बालपणी मामाच्या गावी तासगावी उनहाळ्याच्या सुटीत जायचो .कवठे ,कैऱ्या ,आणि बोरे खायचो .ओढ्यातल्या मोरांमागे धावायचो .मोर उडून केकाटत आंब्यावर बसले की उसातले शेतकरी कावायचे (=रागवायचे) ."का रं मागं लागलाहात म्वोरांच्या ?".कवठाची झाडे तुरळकच होती .त्याच्या खाली जाऊन देत नसत ,कवठे डोक्यात पडतात ना !तिकडे त्यावेळी बरीच घरे (कमीतकमी पडवी तरी ) शेणाने सारवली जायची .त्यासाठी लागणारे शेण काही मुली ,म्हाताऱ्या आणायच्या .त्याबदल्यात त्यांना भाकरी आमटी मिळायची .आम्ही सुटीत गेल्यावर ती एक म्हातारी शेणाऐवजी सकाळी झाडाखाली पडलेली पिकलेली कवठे आणून द्यायची .तिला आम्ही कवठाची आजी नाव ठेवले होते .विटे या गावी आमच्या एका नातेवाईकाकडे भोकराचे झाड होते .आणखी एक गोंदणी चे ही झाड होते .अर्धा इंची लांब तांबूस चिकट गोडसर गोंदण्या आणि चिकट भोकरे पण खायचो .या झाडांवर तांबडे मुंगळे फार असायचे . मनिष पुन्हा धन्यवाद .

मनिष अगदी मनापासून आवडल्या आठवणी .तुमच्या पिलांनाही झाडावरची फळे तोडण्याचा आनंद मिळवून देताहात. खुप छान . -१११ हेच म्हणते. कपिल बाळाचा क्लास - हे वाचुन तर खुप हसले. आमच्याही कॉलनीत होतं एक तुतीच झाड पण एक तुती काढायला ८-१० मुलामुलींची धांदल व्हायची त्यामुळे ति कोणालाच धड पूर्ण मिळायची नाही. मी इथल्या सुपरमार्केटात प्रथम तुतीचे बॉक्स पाहीले तेव्हा अशीच हरखुन १-२ मिनिटं पहातच राहीले, सारख वाटत होतं ती लहानपणीची टोळधाड लगेच इथं येईल....आता कोण कुठं आहे ते माहीतीही नाही, पण या लेखाने त्या आठवणी आल्या. - आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात - +१

मज्जा आहे तुमची!!! :) हे कुंडितले छोटे झुडुप असेल तर मग बहुतेक ब्लॅकबेरी आहे. तुतीची झाडे बरीच उंच वाढतात. म्हणून तर गॅरेजवर चढून तोडावी लागायची. ;)

मनिष तुतीच आहे ती. नर्सरीतून कलम आणून मोठ्या कुंडीत लावल होत. आता जमिनीत लावल आहे. यशोधरा अग नर्सरीत मिळत कलम. मी पनवेल-नेरा च्या गो-ग्रिन नर्सरीतून घेतल होत.

आयला तुती बघुन तोंडाला पाणी सुटले कि. मी महाबळॅश्वरलाच १५ वर्षापुर्वी फिरायला गेलो होतो तेव्हा खाल्या होत्या. तेव्हा पासुन "ठाण्यात दर हंगामाला जसं बोरं, जांभुळ ही फळं मिळतात तसे तुती का नाही?" असे मी आईला नेहमी विचारायचो. दुसरे एक फळ माहिती आहे का कोणाला "रामाचं कंदमुळ" म्हणतात त्याला. एक्दम मोठे असते आणि आकाराला पखवाजा /ढोलकीसारखे पण दोन्ही बाजुंनी निमुळते असते. तो विकणारा सायकल वर घेवुन शाळेजवळ यायचा. १० पैशाला , कलिंगडासारखी १/४ गोल चकती कापुन द्यायचा. आतातर त्याचे नामोनिशाणच नाहीये. धन्सरे मनिष!

स्मरणरंजन आवडलं!! "तुतीकोरिन अल्कली केमिकल्स विरुद्ध सीआयटी" हे नाव फक्त तुतीशी संबंध असल्यानेच लक्षात राहिलं आहे.

तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…
=)) सॉलीड
फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की!
टाळ्या!!

मस्त लिखाण, मनिष! फळझाडांवर आणि त्यांच्या आसपास केलेल्या शाळकरी वयातल्या खूप उचापती आठवल्या. विहिरीच्या मध्यावर लोंबणार्‍या विलायती चिंचा तोडण्यासाठी केलेला जीवाचा आटापिटा आठवला. सूरपारंब्या खेळतांना धाकट्या भावाने जांभळाच्या झाडावरून १० फूटांवरून थेट रिंगणातल्या सूरावर उडी मारतांना मध्ये अनपेक्षितपणे आडव्या आलेल्या फांदीला धडकून त्याचा दात तुटला ते आठवलं. मित्रांच्या संगतीने (कारखान्याच्या हद्दीतील झाडांवरील!) आंबे तोडलेले आठवले. (मी वजनाने हलका आणि तुडतुडीत असल्याने वयाने मोठ्या मित्रांनी मला झाडावर चढण्यासाठी depute केलं होतं, तोडून झाल्यावर रखवालदार आल्याचं दिसल्यावर सगळे मित्र पळाले, आणि मग मी पलायन करतांना कुंपणाच्या काटेरी तारांत अडकून पँट फाटली आणि रक्ताच्या धारांनी भरलेले पाय घेऊन भर रस्त्यातून पळत निघालो होतो, ते पाहून कारखान्यातून घरी निघालेल्या कितीतरी कामगारांनी दुसर्‍या दिवशी वडिलांना 'अहो डॉक्टर, तुमचा मुलगा.....' असं सांगून आणखी पंचाईत करून ठेवली होती, तेही आठवलं!)

तुतुची पाने रेशीम उद्योगासाठी वापरतात. या झाडांवर रेशीम किडे पोसुन मग त्यांच रेशीम कोषात रुपांतर होतं.पहाता पहाता लिखाण कोठच्या कोठे घेउन गेलं सार्‍यांनाच तुमच्याबरोबर भाऊ! तुती आवडतात खायला.

बिचाऱ्या तुती . मागच्या वर्षी याच दिवसांत लोणावळयाला सहकुटुंब गेलो होतो .डेपोतून बाहेरपडून मेन रोडला आलो आणि नांगरगावाकडे (अक्कलकोट मठाकरता) चालत निघालो .फळवाल्याकडे द्राक्षे घेतांना मागे लक्ष गेलं .तुतींनी भरलेलं झाड मुलांची वाट पाहात झुकलेलं होतं बिचारं .कोण्णीकोण्णी तुती ओरबाडल्या नव्हत्या .गारेगार आणि पेप्सिकोला खाणाऱ्या नवीन पिढीला काय कळणार यांची आंबटगोड मजा ?मग मीच लहान होऊन काढल्या सर्व तुती .

खूप सुरेख लिहिलंत. हल्लीच गावाला गेले होते तेव्हा दगड मारून कैर्‍या पाडता येतात का हे पाहिले होते! येतात अजून!!

वाहव्वा, छान लेख. दादरची शाळा आठवली. हिंदू कॉलनीत आवळ्याची आणि बदामाची झाडे होती त्यांना दगडे मारून ते पाडून खायचो. त्यानंतर त्या दगडांनी काचा फुटल्या म्हणून रहिवाश्यांची शाळेत तक्रार आली तरी अगदीच काही बंद नाही केला आम्ही तो प्रकार. :) त्या बदामाची तर सर्वांना एवढी क्रेझ होती विचारू नका. मित्र त्या फुकटात पाडलेल्या बदामऐवजी आपल्या डब्यातील त्यापेक्षा किंमती खाऊ द्यायचे आणि तो बदाम खाण्यात धन्यता मानायचे. :) एकदा माझ्या एका मित्राच्या डोक्याला आमच्यातल्याच एकाने मारलेला दगड लागून खोक पडून घळाघळा रक्त आल्याचीही एक आठवण आहे. :( तर एकदा माझा तोच अवली मित्र आणि मी आम्ही दोघांनी मिळून मोठ्या हुशारीत झाडावरचा हाताला लागेल इतक्या उंचीवर असलेला कच्चा फणस तोडला होता. त्यानंतर तो स्कूलबसने कसा न्यायचा म्हणून बसच्या तिकिटाचा खर्चा करून घरी गेलो, पण त्यानंतरही घरी काय सांगायचे आणि अर्धा अर्धा कसा करायचा या टेंशनमध्ये शेवटी तो बिल्डींगच्या खालीच टाकून पसार झालो होतो ;)

फार सुरेख. लेख वाचून द. भा. धामणस्करांची 'आजीचा नातू' ही कविता आठवली. निसर्गाची, झाडा-पक्ष्यांची आवड आपल्या तान्ह्या मुलातही आजीच्या समजूत घालण्यातून उतरताना पाहून कवी म्हणतो -
तिचे सांगून संपलेले, माझे ऐकून. आकाश, झाड, पक्ष्यांचा उमाळा यापुढेही घरात असणार आहे, ही केवढी महत्त्वाची गोष्ट!
अवांतर - 'तुती' आणि 'कैरी' शीर्षकात वाचून हा लेख प्रथम निराळ्याच साहित्यिकाबद्दल आहे की काय, असं वाटलं होतं :)

माझ्याही डोक्यात धामणस्करांची हीच कविता होती हे लिहितांना. जी. ए. प्रेमींना 'कैरी' आणि 'तुती' म्हटले की त्या कथांची आठवण होणे अपरिहार्यच...फेसबुकवर जी. ए. प्रेमींनी हीच चर्चा केली ह्या पोस्टवर! :-)

तुतीला रास्पबेरी असंही नाव आहे का ? आम्ही लहानपणी तुत्तू म्हणत असू. कालच तुत्तूंनी लगडलेले झाड पाहिले. अगदी लटकून तोडायचा मोह झाला! पण हापिसातले लोक्स बरोबर असल्याने गप्प बसले...

नाही रासबेरी वेगळी. तुतीला 'मलबेरी' म्हणतात. इथे फरक पाहता येईल - http://www.examiner.com/slideshow/how-to-distinguish-blackberries-raspberries-and-mulberries तुतीला तुत्तू म्हणत असतील, मला माहित नाही. :)

इथे आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचेच मनापासून आभार! बर्‍याच जणांना आपापल्या लहानपणाच्या आठवणी आल्या. तशा झाडांच्या आणि फळांच्या आठवणी चिकार आहेत. सिंहगडावर लहानपणी सायकलने जायचो. तेंव्हा विठ्ठलवाडी सोडली की पेरूच्या, आंब्याच्या बागा लागायच्या. त्यावेळी खूप पेरु खाल्लेत झाडांवरून तोडून. सिंहगडावर करवंदाच्या (सध्या क्वचितच मिळणारी काळी मैना) जाळ्या होत्या. त्यामुळे वरती पोहोचण्यापेक्षा त्या करवंदावर ताव मारणे हीच मोठी गंमत होती. वाघजाई ते तळजाईच्या रस्त्यावर खूप सारी पळसाची आणि जांभळाची झाडे होती. पळसाच्या त्या नाजूक कळ्यांचे वरचे टोक उडवले आणि त्या दाबल्या की आतून गार पाण्याचे कारंजे उडायचे ते उडवत आणि जांभळे खात अगदी दिवस उतरेपर्यंत त्या डोंगरांवर मनसोक्त हुंदडायचो. तेंव्हा आई-वडीलही बिनधास्त होते. दिवसभर मुलं कुठे तडमडलीत ह्याची फारशी फिकीर न करता निर्धास्त असायचे. आपल्याला पालक म्हणून आज असे जमेल का ह्याची मला तरी शंका वाटते! (खुद के साथ बातां: काळी मैनाच्या आठवणींनी जीभ खवळलीये...कुठे मिळतात का शोधायला पहिजे. कुणाला माहित आहे का कुठे मिळतील?)

मस्त लेख. आवडला. तुत्या, कैर्‍या, करवंदं, पाडाचे आंबे, चिकू, पेरु झाडावरुन तोडून भरपूर खाल्लेत. - पाचगणीत (वयानं) लहानाचा मोठा झालेला ;)