Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
चोरी चोरी चित्रपटातील सगळीच गाणी गाजली. त्यातले कोणते एक निवडायचे ठरवणे हे खूप अवघड आहे. चोरीचोरीतील प्रत्यक गाण्याचे स्वतःचे असे एक वैशिष्ठ्य आहे. अर्थात लता मंगेशकर हा प्रत्येक गान्यातील कॉमन फॅक्टर आहे. रसिक बलमा.... हे गाणं अजब आहे. स्वरांवरचा ठहराव आणि आंदोलने यांची एक मजेदार जुगलबंदी बघायला मिळते. गाण्याच्या सुरवातीला " रसिक बलमा ........ मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे. गाण्याच्या नंतररच्या ओळींत मात्र हे स्वर थोडे बदललेले आहेत. "नेहा लगा के हारी.." म्हणताना लताबांईंच्या स्वरातून सतारीची आठवण होते. अर्थात तेच स्वर त्यानंतर रसीक बलमा...... ओळींनंतर सतारीतुन उमटतात. शंकर जयकिशनच्या पोतडीतुन निघालेल्या या हिर्‍याला तितक्या ताकदीचे जबरदस्त कोंदण लताबाईच्या आवाजे दिलेले आहे. " आजा सनम मधूर चांदनी मे हम" या गाण्याची वेगळीच गम्मत आहे. या गाण्यात अ‍ॅकॉर्डीयन या एका वाद्याने जी जादू साधली आहे ते अर्थात एखाद्या गाण्यात एका ठरावीक वाद्याने बाजी मारुन जाणे हे फार कमी वेळा घडते. शंकरजयकिशनच्या वाद्यमेळ असणार्‍या संगीतात तर फारच कमी वेळा. गाण्यात अ‍ॅकॉर्डीयनसोबत बासरी , मेंडोलीन आणि व्हॉयलीन वापरले गेले आहे . मात्र लक्षात रहाते ते अ‍ॅकॉर्डीयन. लताबाईंचा स्वच्छ सूर आणि मन्नाडें ची तितकीच भन्नाट साथ. एकोणीसशे छप्पन सालातली ही गाणी . जवळजवळ साठ वर्षे होत आली. पण या गाण्यांतली जादू अजून काही ओसरत नाही.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हे गीत शुद्ध कल्याण रागावर आधारित. मराठी नाट्यपद " सुजन कसा मन चोरी" हे ही असेच. रसिक बलमा मधील बलमा मधील 'मा' वरील लांब केलेला ठहराव आपल्याला 'सुजन मधे चोरी या शब्दातील 'चो" वर आढळेल.तीच गोष्ट सचिनदेव बर्मन यांच्या 'चांद फिर निकला " मधी ला या शब्दाची. माझ्या अंदाजाने ही गीत शंकर-जय मधील जयकिशन यानी चालीत बांधले असावे कारण शुद्ध कल्याण , भूप, बिलावल हे त्यांचे आवडते राग होते.

मधल्या "मा" अक्षरावरच्या स्वरावरील ठहराव तसेच हाये मधल्या " ये" वरचा निश्चल सूर...विरतो न विरतो तोच " दिल क्युं लगाया " या शब्दातील लगाया मधील " या " शब्दा वर स्वर ज्या पद्धतीने आंदोलीत होतो तो एक चमत्कारच आहे.
सुंदर पकडले आहे शब्दात. माझे आवडते गाणे - हृदयनाथ मंगेश्करांनी संगीत दिलेले, कुसुमाग्रजांनी लिहीलेले, लताबाईंचे - "घन तमी शुक्र बघ राज्य करी" ....... फक्त निश्चल होऊन ऐकत रहावे, असे हे गाणे. समाधीच लागते या गाण्याच्या सौंदर्याने. शब्द किती सुंदर अन इतक्या सुंदर शब्दांना पं. हृदयनाथांचे संगीत ...... और क्या चाहिये?

पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे. रसिक बलमा, हे गाणं आधीच वरच्या पट्टीत रेकॉर्ड झाल्यामुळे चित्रफितीत ऐकताना लताचा आवाज अनैसर्गिकरीत्या वरच्या पट्टीत गेला आहे. परिणामी, 'नेहा लगाके हारी' या ओळीत त्या फ्रिक्वेन्सीज कानाला त्रास देतात. असे, लताबाईंच्या बर्‍याच गाण्यांत झाले आहे. दुसरे उदाहरण म्हणजे, एहेसान तेरा होगा मुझपर यातील कडवी. कदाचित माझे कानच फार सेंसिटिव्ह असतील.

पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे.
गाणी 'फोल्डबॅक' मध्ये चित्रीत केली जातात. ह्यामधे गाणे सुरूवातीस स्टुडियोत टेप केले जाते, व चित्रीकरणाच्या वेळी एका विशीष्ट ('नागरा') उच्च दर्जाच्या टेपरेकॉर्डरवर प्ले केले जाते. ह्यावेळी ३५ मि. मि. फिल्म कॅमेरा ह्या नागरास 'पल्सेस' ने लॉक केला जातो, ज्यामुळे फिल्मवरील चित्रीकरण मूळच्या रेकॉर्डींगशी सिंकमधे रहाते. तेव्हा आपण लिहीता तशा प्रकारचे 'वरच्या पट्टीत' जाणे मला पटत नाही. [वरील परिच्छेदातील टेपरेकॉर्डर, ३५ एम. एम. फिल्म इ. उल्लेख तत्कालीन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहेत. आता टेप नसून डिस्क रेकॉर्डर आहे, 'नागरा' डिस्क प्ले करतो, आणि चित्रीकरण ३५ एम. एम. फिल्मवर न होता डिजीटल व्हिडीयोमधे होते इ. सर्व खरे असले, तरीही तत्संबंधीच्या 'लॉकींग'च्या तंत्रात काही फरक नसावा]. लताला अनेक संगीतकार अतिशय वरच्या पट्टीत गायला लावत. शंकर- जयकिशनच्या संदर्भात बोलतांना तिनेच एके ठिकाणी 'ते मला खूप चढ्या सुरात गावयास लावायचे, माझे त्यांच्याबरोबर ह्यावरून वादही व्हायचे' असे नमूद केले आहे. विशेषतः पुरूष व स्त्री अशा दोघांनी स्वतंत्रपणे गायिलेल्या एकाच गीतातही, तिला पुरूषाचा सूर लावावा लागायचा. तुम्ही दिलेले 'एहसान तेरा' हे असेच एक उदाहरण.

तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. एका एक्स्पर्टशी चर्चा केल्यावर हे कळले की मूळ चित्रफितीचे 'पीएएल' व्हर्जन करताना, पट्टी १०४% होते. हा फरक अमेरिकन एनटीएससी' मधे होत नाही. त्यामुळे टी. व्ही. वरच्या चित्र फितीत पट्टी वाढलेली जाणवते.तुम्ही कुठलेही जुने गाणे ओरिजिनल ७८ आरपीएम च्या रेकॉर्डवर ऐका आणि त्याची 'पाल' व्हिडिओ चित्रफीतही त्याचवेळी बघा. तुम्हाला पट्टीतला फरक नक्कीच जाणवेल. याबाबत ह्या साईटवर लिहिले आहे. http://www.michaeldvd.com.au/articles/PALSpeedUp/PALSpeedUp.asp

पूर्वी गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर ते चित्रफितीवर चढवताना त्याची पट्टी वर जात असे
असे आपण लिहीलेत. त्यात 'चित्रफीत' म्हणजे फिल्मची ऑप्टिकल असे आपणांस म्हणायचे आहे, असा माझा गैरसमज झाला. 'चित्रफीत' म्हणजे 'व्हिडीयो" असे आपणास अभिप्रेत आहे असे दिसते. (म्हणजे तेच बरोबर असावे, चूक माझी आहे). फिल्म २४ frames per sec. ने चालते. ती ५० Hz. च्या (PAL अथवा, आताच्या संदर्भात, 625i25) व्हिडीयोत ट्रान्सफर करतांना,25 frames per sec. ने टेलिसिनेमध्ये चालवली जाते. २५/२४ = १.०४. म्हणून ह्यावेळी ट्रान्स्फर केलेल्या व्हिडीयोत चित्र (व ध्वनि) मूळपेक्षा ४ % अधिक वेगाने चालतात. त्यामुळे आपण म्हणता तसा पिच थोडा वरचा होतो. NTSC अथवा आताच्या संदर्भात 525i29.97 मधे ट्रान्स्फर करतांना मात्र फिल्म टेलिसिनेमधे मूळ वेगानेच चालवली जाते. तेव्हा तिथे हा परिणाम जाणवत नाही.

"ये जिंदगी उसी की है " या तील शेवटच्या " अलविदा अलविदा " हे शब्द गाताना ची पट्टी किती उंच आहे ते बघा. ही अर्थातच गाण्यातील जागेची गरज होती.

'ये जिंदगी उसीकी हैं' हे सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गाणे मूळ शारदा नाटकातील ' मूर्तीमंत भीती उभी मज समोर राहिली', या गाण्याची कॉपी वाट्ते. दोन्ही गाणी एका नंतर एक गुणगुणून बघा.

मूर्तीमंत चा धागा मूळ बालगंधर्व यांनी गायलेले हे गाणे 'जिंदगी उसिकी' गाणाऱ्या लता बाईंनी हीं गायलेले आहे. त्याचा धागा : http://www.saavn.com/s/song/marathi/Lata-Mangeshkar---Chitrapat-Geete---Samagra---Vol-8/Murtimant-Bhiti-Ubhi/BxJaQzpeAHc

या गाण्याबद्दलची सी. रामचंद्र यांची मुलाखत मी वाचलेली आहे. त्यांनी स्वतःच, 'ये जिंदगी' हे गाणे, 'मूर्तिमंत भीति उभी' या गाण्यावरुन घेतल्याचे सांगितले होते.

ये जिंदगी उसीकी हे ची फक्त पाहिली ओळ शारदा तील पदावरून घेतली आहे ,बाकी प्रतिभा अण्णांची व अप्रतिम गायन लताबाईंचे !

आणि " लग जा गले " गाण्याची पट्टीच वरची आहे. त्यातील चढे सूर हा वेगळा विषय आहे. अशी गाणी ही लतां मंगेशकरांची खासीयतच झाली होती.

विजुभौ आम्हाला गाण्यातल्या जागा बिगा कळत नै पण जीवाला घोर लावणा-या गाण्यांची आठ्वण नका करुन देत जाऊ राव. 'दिल क्यु लगाया, जैसा रोग लगाया' असे ऐकले की कोणाला तरी जीव लावणारा माणुस मुळापसून हलतो ना राव... -दिलीप बिरुटे

हेच काय लतादीदींची असंख्य गाणी आहेत आवडीची. हम प्यारमें जलनेवालोंको चैन कहां...जेलर सैया झूठोन्का बडा सरताज ...दो आंखे बारा हाथ जा रे उड जा रे पंछी तेरा जाना दिलके अरमानोंका लुट जाना...अनाडी अन खूप काही.. !

आणखी सुरेख गाणी, ज्यांची स्वररचना खास आहे आणि लताच्या ताकदीचा पुरेपूर उपयोग केला आहे, ती म्हणजे श्रीनिवास खळेसाहेबांची लताने म्हटलेली कोणतीही गाणी आठवा.