Welcome to misalpav.com
लेखक: चिन्मय श्री जोशी | प्रसिद्ध:
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी . टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही . तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक.. तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू . मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची .. तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं . तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले .. तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले .. (वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे ) खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) . पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो . (एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय) मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं . सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे . १. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे (चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे ) मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . २. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. ३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात . यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो. ४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो . ५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत) ६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात . ७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात .. ८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो . ९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ). असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात. (हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी) १०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात. (पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .) ११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) १२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही .. सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मजा आली वाचुन आणि मला माझे लोकलचे दिवस आठवले. कधीहि, कोणत्याहि वेळि जा एखाद्या नदिसारखी ती माणसांचे लोंढे वाहुन नेतच असते. एक वेळ चक्रव्युह भेदणं सोपं जाईल पण एका दारातुन आत शीरुन दुसर्‍या दारापर्यंत जायला जी कसरत करावी लागते ती हाडाचा मुबैकरंच जाणे. मुंबईच्या लोकल, त्यात येणारे अनुभव हा एक व्यापक विषय आहे. अजुन बरचं काहि लिहिता आलं असतं. असो. (पार्ट टाईम मुंबईकर) दिपक

मस्त खुसखुशीत लिहिलंय! मला आधी वाटलं शिणेम्याची श्टुरी आहे का काय! बघितलं ते वेगळंच. मारा दोघांनाही. आमचा फुल्ल सपोर्ट हाये. - कोकणी.

धागा पुर्ण वाचला नाय .तळटिप वाचल्यावर आंची ची आटवण आली.तिला बी सवय अशिच सवय हाय.आधि एक लेख लिआयचा आन नंतर त्याची दुसरी बाजु मांडायची.पुणे मुंबेकरानी धाग फाट्यावर न मारल्यास 100वा प्र.द्यायला येण.

छान लिहिलय. आपल्या दृष्तीने मुंबैकर गडबडीत असतात, धावपळ वगैरे करतात पण एका वेगळ्या गावातून (राज्यातून)आलेल्या ललनेने "तुम्ही पुणेकर नेहमी इतकी धावाधाव का करत असता?" असे विचारले. तिला मुंबैला पाठवायला हवे.

शब्दाशब्दाशी सहमत. आताशा उन्हाळ्याच्या दिवसात अगदीच अपरिहार्य कारण असल्याशिवाय घाट उतरुन खाली जायचं म्हणजे जीवावर येतं. -वीकांती मुंबैकर ;)

छान लिहिले आहे. (आमचे डोंबोली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने, पुणे आणि मुंबई, ह्यांच्यातले सगळे गूण आमच्या गावातच एकवटले आहेत.हेवेसांनल.)

निरिक्षण वाढवा. लेखात नोंदवलेली निरिक्षणे अगदी बाळबोध आणि वरवरची आहेत. पुण्याला शहर म्हणण्याचे धाडस आवडले. तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. लेखनाबद्दल सूचना - कंसातली वाक्य कमी करा. दर २ वाक्यांनंतर अडखळून वाचनाची मजा निघून जाते. जे लिहायचंय (स्वगत / प्रकट) ते शक्यतो एकाच स्वरूपात लिहा. लिखाण आणि वाचन दोन्हीही ओघवते झाले तर मजा वाढते.

शब्दाशब्दाशी सहमत! सूचनेमध्ये जे लिहीलेय तेच लिहणार होतो, श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद! -(एकेकाळी विरारला राहून मुंबईत राहतो असे खुशाल ठोकणारा) सोकाजी

तुम्ही मुंबईत कुठे राहता हे कळलं असतं तर अजून बरं झालं असतं. आज काल ठाणे, कल्याण, मिरा रोड, वसई, विरार, पनवेल, पालघर इथली लोकं आम्ही मुंबईत राहतो असे खुशाल ठोकून देतात. >>>>>>> +७८६ माहीमच्या पुढे मुंबई संपली. कुर्ल्यालाही उपनगर बोलले जाते. ते नक्कीच मुंबई उपनगरात राहायला असतील. कारण जे मुंबईत राहतात ते आरामात गर्दीच्या विरुद्ध दिशेने वार्‍याची खिडकी पकडून प्रवास करतात. जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. *music2*

>>जन्मापासून करतोय, आणि म्हणूनच नोकरीधंद्यासाठी असो वा कशासाठीही मुंबई सोडवत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जिला मुंबई म्हणतात अशा मुंबईतले दिसता. उपनगरातले नाही. आम्हा बदलापूरकरांसारखा अडीच तास वन वे ट्रॅव्हल करुन हापिसात गेला असतात मग कळलं असतं पुणं किती सुसह्य आहे ते. एक गाडी चुकली की पुढची वीस-पंचवीस मिनटं ताटकळत राहणं ज्यानं अनुभवलंय त्याला आणि फक्त त्यालाच हे कळू शकतं. खुद्द मुंबईत असाल तर त्यासारखं सुख नाही हे ही तितकंच खरं!! :) बाकी चालू देत.

बदलापूर मुंबईचे उपनगर नाही. ते ठाण्यापलिकडे येतं. मुंबईची उपनगरं दहिसर आणि मुलुंडला संपतात.

बदलापूर हे मुंबैचं उपनगर आहे असं मी कुठेतरी म्हटलंय का? आपल्यासारख्या सुज्ञ आणि ज्येष्ठ मिपाकराकडून असा प्रतिसाद वाचून मिपाकर असल्याची शरम वाटली. ;)

तुम्ही इथल्या बर्‍याच जणांच्या अस्मितांवर वार करताय.. आम्ही डोंबिवलीवाले एक दिवस घरी बसलो तर मुंबईतले अर्धे हापीसं बंद पडतात. (आम्ही तसे घरी बसत नाही हा भाग वेगळा, गाड्या बंद आहेत हे घरातच समजूनही ठेसणावर जाउन दोन घटका मजा बघणारी जमात आमची.)

साधारण १८ वर्षांपूर्वी आमचा एक मित्र कल्याणहून पुण्यात आला होता. सदशिवात एकाच ठिकाणी २ भाऊ वेगवेगळे लॉज चालवतात. पहिला मुंबईत फारसा राहिला नव्हता पण दुसरा मुंबईमध्ये १० वर्ष इन्स्पेक्टर होता. पहिल्याकडे त्याला घेवून गेलो, प्रथम प्रश्न तुम्ही कुठले. हा प्रामाणिकपणे उत्तरला कल्याण. समोरून अच्छा म्हणजे मुंबई म्हणा की. कसले बकाल शहर ह्या. नकोच तिथली लोक. दुसऱ्याकडे गेलो. परत पहिला प्रश्न तुम्ही कुठले ह्याचे उत्तर मुंबई. इन्स्पेक्टरसाहेब गरजले अहो हो पण मुंबई म्हणजे नक्की कुठले. मित्राचे उत्तर कल्याण. त्यावर पुढे इन्स्पेक्टरसाहेबानी अर्धातास झोडला कल्याण कसली आली मुंबईत वगैरे. फायनली दोन्ही ठिकाणी न राहता मित्र शेवटी एका ठिकाणी पेईंगगेस्ट बनून राहिला. पण हल्ली हाच प्रकार पुण्यात पण होती. काय पिंपळे सौदागर आणि कुठलेही बुद्रुक बिद्रूकला लोक पुणे म्हणतात. तस्मात असे सगळीकडेच असते.

कल्याण मुंबैत येतच नाही. मुंबैच्या आधीपासून कल्याणला स्वतंत्र अस्तित्त्व आहे. कल्याण बंदर प्राचीन व्यापारी मार्गावरचं महत्त्वाचं ठाणं होतं. मुंबै-पुणे प्रवासात खिडकीबाहेरच्या देखाव्यात कल्याण-आधी आणि कल्याण-नंतर असा सरळ फरक आहे. बकालियत कमी कमी होत जाते. अंबरनाथ ते घाटमाथा हा सर्वात बेष्ट प्याच आहे.

केवळ कल्याणचा उल्लेख आल्याने वादात उडी घेणे भाग आहे १.माझे कल्याण किमान ४०० वर्षांपासुन म्हणजे जेव्हा मुंबैचा शोध फिरंग्याना लागला नव्हता तेव्हापसुन अस्तित्वात आहे. २. शिवाजीमहाराजांनी सुरतेवर स्वारी केली तेव्हा कल्याण आणि भिवंडी हा त्यातला महत्वाचा टप्पा होता. ३.शुर्पारक (नालासोपारा) आणि श्रीस्थानक (ठाणे) या बंदरातुन जो व्यापर चालत असे त्याची वाहतुक कल्याण/माळशेज घाट मार्गेच होत असे अशी माहीती आहे. ४.काळु आणि उल्हास नदीच्या संगमावरचे हे शहर फार प्राचीन आहे.माझे स्वतःचे घर किमान २०० वर्षंपासुन पारनाक्याला आहे. डोंबिवलि/कोपर वगैरे दलदलीत भराव घालुन आगर्यांनी चाळी बांधलेल्या शहरांशी कल्याणची तुलना होणे नाही. बाकी चालु द्या

किंबहूना आहेच. पुढे मग ह्याच गोष्टीतून धडा घेवून, नरीमन पॉइंट आणि इतर भाग बनवल्या गेले असतील. आणि बादवे, केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत.

केवळ भराव हाच निकष असेल तर, आमच्या द्रुष्टीने खरी मुंबई ही फक्त फोर्ट भागापुरतीच मर्यादीत. का? म्हणजे मुंबई सात बेटांची बनलेली आहे मलाही इतपतच इतिहास भूगोल माहीत आहे, ती सात बेटे काय फोर्ट परीसरातच होती का सारी? गूगाळायला हवे, मात्र आमच्या माझगावला डोंगर आहे, तसेच एकंदरीतच हिल एरीया आहे तर तो नक्कीच भर टाकून बनवलेला भाग नाही.

मुंबईचा परीसर फार कमी होता.गिरणगांव परीसर मुंबईत गणल्या जात न्हवता. गेल्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत दादरला पण मुंबईत गणले जात न्हवते. पुढे मुलुंड आणि बोरीवली पर्यंत ब्रुहन्-मुंबई झाली. तस्मात सध्या तरी जिथ पर्यंत लोकल तिथपर्यंत मुंबई आणि जिथपर्यंत पी.एम.टी. तिथपर्यंत पुणे, असा साधा हिशेब आहे. आणि शेवटी काय हो. तुम्ही कुठेही राहा.... मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली....

मध्यवर्ती ठिकाण एकच, डोंबिवली.... >>>>> हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र.... फोर्ट परीसर हेड ऑफ मुंबई - तर - माझगाव हार्ट ऑफ मुंबई !!

हे कश्याचे मध्यवर्ती ठिकाण माहीत नही मात्र....
आँ? असं काय करता? डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिम-उत्तर्-दक्षिण दिशांना प्रत्येकी दोन किलोमिटरला स्पर्श करून जाणारे एखादे काल्पनिक वर्तुळ काढा. त्याच्या मध्यभागी डोंबोली!!! हाकानाका!!!! ;)

८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
तुम्हाला कसं हो माहित? व्हिडिओ कोचने जाता वाट्टं? *mosking*

मुंबई देशात अव्वल राहण्यायोग्य शहर. दुसरे चेन्नई, तिसरे हैदराबाद, चौथे बेंगळूरू. महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ नागपूरने क्रमांक पटकावला. नागपूर हे देशात तेरावे. पुणे चौदावे आहे. कोणाला शक असेल तर लिंक शोधून देईन या सर्व्हेची / बातमीची. :)

मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते . >>>>>>>> पुरुष सुद्धा जर मुंबईकर असतील तर नाही लाजत. बाहेरच्यांना मुंबई कल्चर झेपायला थोडा वेळ लागणारच. शेवटी बॉलीवूड सिटी आहे मुंबई, मायानगरी उगाच नाही म्हणत :)

मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे ) एकत हे चुकीचे विधान आहे किंवा मी त्याला अपवाद आहे. यातले नक्की काय ते ठरवत बसायला मात्र मला वेळ नाही ;)

. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात .. मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? मुंबईमध्ये रिक्षा ???????? आहो मुंबईत टॅक्सी चालते

व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो. हे मात्र खरे, भेलपुरी खावी ती समुद्राच्या खार्‍या वार्‍यांच्या सोबतीनेच .. यासाठी +७८६ :)

मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत . ( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .) >>>>>> मुंबईच्या पावसावर तर स्पेशल लेख बनेल. किंबहुना मी माझ्या बरेच सुखाच्या लेखांमध्ये उल्लेख केला आहे त्याचा. पण असो, इथे त्याची जाहीरात नको :)

याबद्दलही हा लेख बरेच गैरसमज पसरवतोय, खरे तर मुंबईची हवा-पाणी देशभरातल्या सर्वांनाच सूट होते. म्हणून देशाच्या कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती येऊन इथे राहू शकते, कायमची स्थायिक होऊ शकते.

तुमचा अभिषेक ह्यांच्या प्रत्येक प्रतिसादाशी सहमत +११११११११११११११११
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
बरे. मग कधी जाताय? :P

जोरदार लढवताय किल्ला. लढा तुम्ही. आम्ही आहोतच सपोर्ट द्यायला. बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. म्हणूनच कदाचित पुणेकरांचा झणझणीत मिसळ हा (अभि)मानबिंदू असावा.

बाकी मुंबईसमोर पुणं एकदम मिळमिळीत वाटतं. मुंबई हे एक जागतिक दर्जाचे शहर आहे, त्याला सिद्ध करायला ईतर कुठल्या शहराला कमी लेखायची गरज नाही. मुंबई-पुणे हे भांडण फक्त मराठी लोकांमध्येच चालते, तसेच काही ठराविक निकष लाऊनच. अन्यथा मुंबईची तुलना इतर कुठल्याही शहराशी करणे चूकच. तसेच मी पुण्याविरुद्ध किंवा पुणेकरांविरुद्ध किल्ला लढवत नसून जन्मापासून आजपर्यंत मुंबईकर म्हणून मुंबईच्या प्रेमापोटी लिहितोय. असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे

असो, मी विचारात पडलोय की लेखकाच्या खालील वाक्यावर अजूनपर्यंत कुठल्याही पुणेकर महिलांनी आवाज कसा नाही उठवला ? पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
अज्ञानी लेखकाशी वाद घालायला पुणेकर भगिनी आणि मैत्रीण वर्गाला इन्ट्रेष्ट नाय. थोडक्यात लेखकूंचा अनुल्लेख. पुणेरी ष्टायल. ;)

खरे तर अगदीच बालिश लेख. असले लेख १९८० च्या आसपास विनोदी समजले गेले असते. तुमचे निरिक्षण वाढवायची गरज आहे. सर्व च चुक आहे.

सहमत. अन्यथा पुणेरी लोक झेंडे गाडायला कधीपासून लागले? पुण्याच्या राघोबांनी अटकेपार झेंडे फडकवले/लावले. गाडले नाही. कदाचित हिंदाळलेल्या मराठीत झेंडे गाडत असतील पण मराठीत झेंडा रोवतात्/फडकवतात/लावतात आणि मुडदे गाडतात (किंवा उकरतात).

मस्त रे चिन्मया. ७०च्या दश्कात गेल्यासारखे वाटले. धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळाला तर काजुवाडी,भाऊचा धक्का,आंबेवाडी,पणशीकर्,आयडियल बूक डेपो येथे जावून ये हो. (माजी मुंबईकर्)माई

आता तो पुण्याचा लेख लवकर येऊ द्या. मुंबई-पुणे हा मिपावरचा ऑल टाइम फेवरेट विषय आहे. कितीही वेळा चघळला तरी मज्जा येते. :)