Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली. मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता. गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले. १) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?. २) आता मुलाचे कसे होणार? ३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका ४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या. ५) त्याला परत बारावीला बसावा गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते. जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही. आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला. मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते. मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले. मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे. माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत. एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती. या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले. हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार? अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते? आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे. मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे. जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सहमत. माझा एक मित्र आहे. कमर्शियल आर्टीस्ट आहे. हे करीयर निवडण्याआधी त्याला फाईन आर्ट्सची ओढ होती. व्यक्तिचित्र रंगविणं (Portraits), देखावे रंगविणं ही त्याची आवड होती. पण त्याला त्याच्या प्रोफेसरने सांगितले. फाईन आर्ट्सने तुला 'टाळ्या' मिळतील पण घर संसार चालवायला तू 'कमर्शियल आर्ट्स'लाच जा. आता तो व्यवसायाने कमर्शियल आर्टीस्ट आहे आणि हौशीखातीर व्यक्तिचित्र, देखावे वगैरे करतो. त्याच्या मते (कारण मला त्यातलं कांही कळत नाही) त्याला करियरच्या सुरुवातीला हा एक चांगला सल्ला मिळाला होता.

उगाच त्यांच्या कलाने घ्या वगैरे गोश्टी नापास होण्या इतपत मुलांसाठी असतात. त्याचे सरसकटीकरण का केले जाते ? आता इथे पोराची आय आय टी हुकली, नक्किच वाइट गोष्ट आहे. आता तो पैसा, प्रतिष्ठा (व काही प्रमाणात ज्ञान) मिळवायला हातपाय जास्त मारावे लागतील हे खरयं पण तो जगाचा/पोराचा शेवट नाही, म्हणुन फरक पडत नाही इतकचं. इथे उगाच घाउक प्रमाणात तुमचा मुलगा भाग्यवान आहे वगैरे दुतोंडे प्रतिसाद वाचुन मी स्वप्नात तर नाहीना वाटु लागले होते आता ठीक आहे. ही अमेरीका आहे का ? जीथे बहुतांश बिलेनिअर फर्स्ट जनरेशनचे असतात, शिक्षणापेक्षा कौशल्यातुन लोक तग धरतात, ज॑ग बदलतात ? इंग्राजांनी गुलाम बनवुन इंग्रजाळवले/कारकुनी शिकवली म्हणून आज जगात कोठेही सर्व्हायव व प्रभाव करायची थोडी क्षमता विकसीत झालेले लोक आपण पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा कशा हाणू शकतात ? रोमेल जाणे. हां तुमचा मुलगा भाग्यवान आहे कारण त्याला स्वकमाइ करायची आवश्यकता फार नाही (वा मनगुटीवर अजिबात नाही) हे एकमेव वास्तववादी कारण आहे आणी त्याबद्दल मी डॉक अन त्यांचे चिरंजीव यांचे भरघोस अभिनंदन करतो. त्याने या लेवरेजचा कसा फायदा घ्यायचा याची स्ट्रेटेजी तयार न करता कलाकलांच्या अनाकलनीय चर्च्या कशा झोडल्या जातात बुवा ?

आत्मशून्य साहेब, आज मी मुलासाठी( आणि मुलीसाठी) थोडा फार पैसा जमवून ठेवला आहे ज्यामुळे त्यांना आपले शिक्षण कर्ज न काढता करता येऊ शकेल असे वाटते. या गोष्टी मी गेल्या आठ वर्षात जाणीवपूर्वक केल्या आहेत( आठ वर्षपूर्वी मी लष्करात होतो आणि जो काही थोडा फार पैसा जमविला आहे तो त्यानंतर काटकसरीने राहून ). हि वस्तुस्थिती असली तरी अशी परिस्थिती प्रत्येकाची असेल असे नाही त्यामुळे मी माझ्या परिस्थितीचे लिव्हरेज कसे करतो याचा इतर जणांना फारसा फायदा होईल असे वाटत नाही. पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे. मुलाच्या कलाने का जायचे ते मी खाली एका प्रतिसादात लिहिले आहेच कि एकतर सुंदर मुलीशी लग्न करा किंवा बायकोला सुंदर माना. माझ्या मुलाला संगणक किंवा आय ती मध्ये मुळीच रस नाही. केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल. त्यापेक्षा त्याला आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेऊन त्यात व्यवसाय सुरु करण्यात मी जर भांडवल पुरवले तर तो उत्साहाने आनंदी आयुष्य जगेल असे वाटते. यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही. अर्थात प्रत्यक्ष प्रारब्ध काय आहे हे कुणास ठाऊक? बाकी प्रतीसादानबद्दल म्हणाल तर छान छान आणि चान चान असे दोन्ही प्रतिसाद तितकेच चांगले किंवा वाईट असतात. एखादा मुद्दा एखाद्याला आवडला किंवा भावला तर त्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आणि नाही आवडला तर एक तर लोक गप्प बसतात किंवा चान चान म्हणून मोकळे होतात. यात दुतोंडे पण कुठे आला ते समजले नाही.

पण तरी माझ्या प्रतिसादानुशंगाने आपण प्रश्न करत आहात तर काही गोश्टी स्पश्ट कराव्या वाटतात.
केवळ पैसे मिळतात म्हणून मी त्याला तेथे जबरदस्तीने पाठविले तर तो कदाचित आयुष्यभर निरुत्साहाने काम करेल
फार मोठी चुकीची विचारसरणी आहे. म्हणतात ना सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर हळुहळु सगळं व्यवस्थीत होते ग. आपल्या पाल्यास हेच अनुभवाला आले असते. पण मुळात पोराला व्यवसाय करायचा आहे तर त्याचे IIT भेटले नाही म्हणून असे हिरमुसणे पटले नाही. IIT केवळ एक ओप्शन असणे अपेक्षीत होते प्रायोराय्टी न्हवे ? म्हणुन सकृतदर्शनी त्याला व्यवसायात रस नाही, पदवी घेतल्या नंतर किमान ५ वर्षे तरी हे वास्तव आहे. पुरेशी नोकरी करुन तो यात उडी घेइलही. जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
यात "पोराच्या कलाने घ्यायच्या गफ्फा" कशा येतात ते समजले नाही
सहमत. म्हणजे मी नेमके कोणाला व काय बोललो आहे ते आपण नक्किच समजलेले नाहीय.
पण मी आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती मी विशद केली तसे आपल्या मित्रांपैकी कोणाचे होत असेल तर ते टाळता यावे यासाठी हा लेख होता. मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे.
खरे साहेब कसे ? नक्कि कसे ? तुमचा लेख हे टाळायला मदत करतोय यावर थोडे भाष्य कराल काय ?

जसे अमिशने १५(?) वर्षे बँकींग करुन ब्लॉकबस्टर शिवा ट्रिलो़जी लिहली व त्यात प्रस्तावनेत पुन्हा त्याने १५वर्षे कंटाळवाणे बँकींग केल्यावर वैतागुन लेखक बनलो (I was boring banker)असे तोंड वर करुन लिहले आहे. गाढवा दुतोंडेपणा टाळुन सुरुवातिला पैसा कमावुन सेफ झालो नंतर लेखनात उतरलो लिहल्याने त्याचे नक्कि काय खड्यात जाणार होते त्यालाच माहीत. असो.... पदोपदी दुतोंडीपणा भरला आहे भारतियांच्यात.
हा हा हा, एकदम चाबूक प्रतिसाद!!!!

आशू चा प्रतिसाद आवडला. माणसाच्या मेंदूची 'बॅण्डविड्थ' ;) मोठ्ठी असल्यानं जे आवडेल तेच करु शकतो असं नाही. जे आवडत नाही ते आधी करुन जर जास्त पैसा मिळत असेल तर ते करा. आर्थिक स्थैर्य घ्या नि नंतर आयुष्यभर आवडतंय ते करत बसा की! माझ्या मते बर्‍याच जणांना वीस वर्षानंतर विचारलं की बाबा रे तुझा तेव्हाचा कल तोच आहे का जो तेव्हा होता तर तो निश्चित गोंधळलेला असेल. बारावीच्या वयात माणसाला खूप काही करावंसं वाटत असतं. त्यानुसार सगळ्यांनी करायचं ठरवलं तर झालंच्च्च! वय जातं, वेळ जातो, पैसा जातो, एनर्जी जाते... सगळं गणित फसतं आयुष्याचं. (एक 'चिगो' आयएएस होतो, शेकडो/ हजारो 'चिगो' लटकतात ही वस्तुस्थिती आहे. 'चिगो' हे फक्त एक उदाहरण आहे.) स्वतःचं कॅलिबर ओळखून पावलं उचलावीत. ठामपणं करु शकण्याची जिद्द, महत्त्वाकांक्षा नि सगळ्यात महत्त्वाचं त्यानुसार 'सातत्यानं प्रयत्न' असं असेल तर भिडावंच मग! पण स्वतःला अक्कल कमी असली तर गपगुमान पालकांनी कान पकडले तर पकडून घ्यावेत.

गाढवा दुतोंडेपणा टाळुन हा तुमचा एकांगी दृष्टीकोन आहे. ह्या संधर्भात एक अनुभव असा ऐकला की सलिल कुलकर्णी हे म्युनिक मध्ये दिवाळी पहाट च्या निमित्ताने आले होते , त्यांनी स्वतः संधर्भात किस्सा सांगितला , डॉक्टर म्हणून पुण्यात टेल्को मध्ये काम करत असतांना काही वर्षात आपण पूर्णवेळ कलाकार व्हावे असे त्यांना वाटले व त्यांनी आपली नोकरी सोडली तेव्हा त्यांना आर्थिक स्थिरता लाभली नव्हती व त्यावेळी त्यांच्या घरच्या लोकांनी साथ दिली , माझे अनेक परिचित उमेदीच्या काळात नोकरी सोडून आपल्या आवडत्या शेत्रात करियर करत आहेत. एक उदाहरण द्यायचे तर हर्षा भोगले ह्याने व्यवस्थापनात शिक्षण घेतल्यावर सुद्धा उमेदीच्या काळात समालोचन करण्याचा निर्णय घेतला. त्याकाळात क्रिकेटर नसतांना हा पूर्णवेळ पेशा त्यांनी निवडणे हा धाडसी निर्णय होता , पेशाने अभियांत्रिक असलेले संझीगिरी हे क्रीडा पत्रकार व्हायचे ठरवतात ते उमेदीच्या काळात पेशाने डॉक्टर असलेले अनेक मराठी नटश्रेष्ठ आर्थिक स्थिरता सोडून कलाकार झाले.

अमिश त्रिपाठीचं ते वाक्य माझ्या आठवणीप्रमाणे "I am a boring banker turned happy author" असं आहे. आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.

आर्थिक आघाडी सेफ करून मग हवं ते करण्यात - आणि ते कबूल करण्यात काय दुतोंडीपणा आहे ते कळलं नाही.
नाही, त्यात दुतोंडीपणा नाहीच-फक्त इतकी वर्षे जणू बोअर मारल्यागत इंप्रेषण होते तो दुतोंडीपणा इतकेच.

कारण त्यात दुतोंडी नसलेल्यांचा भरणा आहे. असे लोक फार कमी आहेत.प्रत्यक्षात प्रथम आर्थीक नियोजन मग स्वप्नांच्या मागे धावणे हेच केले जाते पण सांगताना ही गोष्ट मुद्दाम लपवली जाते याला मी दुतोंडीपणा मानतो. अगदी इथेसुध्दा मुलांच्या कलाकलांच्या अनाकलनीय चर्चा करणारे त्यांच्या मुलांना काय सल्ला देतात ? आणी महत्वाचे म्हणजे त्यांचा आर्थीक स्तर काय आहे ? भारतात विवीध आर्थीक गटातील मुले अभ्यास करतात, शिक्षण घेतात त्यापैकी अनेकांच्या प्रमुख गरजा या आर्थीक बाबी आहेत हे वास्तव असताना उगाच प्रत्येकाने हवे ते करावेचा अट्टहास का धरला जातोय ? असो, पुन्हा सांगतो १) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. ३) आणि ज्यांना जगाची न्हवे कोणाचीच परवा नसते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आपण वरील प्रकारात कुठे बसतो का हे ज्या व्यक्तीला प्रांजळपणे माहीत आहे त्यानेच कलाकलांच्या आकलनीय चर्चा झोडाव्यात...

१) ज्यांच्या खिषात पैसा असतो फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. सहमत. माझ्या ओळखीतले अनेक जण असे आहेत जे उत्कृष्ठ अभिनय, गायन करू शकतात तरीही बँकेत नोकरी करून मग नाटक, गाणं वगैरे करतात. आर्थिक स्थैर्य नसलेला कलाकार कदाचित नैराश्यातून नाहीसा होण्याचीच शक्यता जास्त असते. २) ज्यांच्यामधे जन्मजात धमक असते फक्त तेच लोक हवे ते करायला मोकळे असतात. आणी हे त्यांना नक्किच सांगावे लागत नाही कारण अशा कार्ट्यांना न्हवे त्यांच्या पालकांना कौन्सेलींगची गरज भासु शकते. पुन्हा सहमत. आणि अशी कार्टी त्यांच्या मार्गावरून स्वतःच चालत जातात. उदा. भीमसेन घर सोडून पळून गेले, गाणं शिकायचं म्हणून.

हि गोष्ट मान्य नाही. मी डॉक्टर आहे माझी पत्नी डॉक्टर आहे आमचे दोघांचे दवाखाने आहेत. आम्ही त्याला भरल्या ताटावर आणून बसवू शकलो असतो. म्हणून मी मुलाला (ज्याला जीवशास्त्रात बिलकुल रस नाही) डॉक्टर हो म्हणून भरीस घातले असते तर तो आयुष्य भर दुःखी राहिला असता. बरेचसे अभियंते याला दुजोरा देतील अशी मला खात्री आहें माझा भाऊ विद्युत अभियंता आहे आणी मेहुणा मेकानिकल. त्या दोघांना जीवशास्त्र म्हणजे कार्ल्याच्या भाजीसारखे वाटते( त्याचे नाव घेतले तरी तोंड कडू होईल) माझी मुलगी शास्त्र शाखे कडेच जायचे नाही म्हणाली मग तिला तर डॉक्टर बनवणे म्हणजे मूर्खपणाच झाला असता. ती आनंदाने कॉमर्स ला गेली आहे. आय आय टी मध्ये त्याने केलेल्या अभ्यासावर त्याला प्रवेश मिळालाच नसता. जे ई ई मेन परीक्षेचे गुण हे इतर सर्व अभियांत्रिकी विद्यालयांसाठी धरले जातात तेथे त्याला कमी गुण मिळाले म्हणून तो हिरमुसला झाला हे आपणाला पटले नाही. मग त्याने काय आनंदी असायला हवे होते? "मुलाला मृगजलापाठी उरी फुटेस्तोवर धावायला लागू नये इतके जरी झाले तरी बरे." माझ्या वर्गातील एक मुलगा अतिशय हुशार होता. त्याच्या आईवडिलांनी ठरविले कि त्याने डॉक्टर होऊन सर्जन व्हायचे. (त्याच्या बहिणीसाठी त्यांनी ठरविले होते कि तिने डॉक्टर होऊन स्त्रीरोग तज्ञ व्हायचे तशी ती झाली सुद्धा). मुलाला इंजीनियर व्हायचे होते. पण घरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. यातून हाय खाऊन मुलाने बारावीला एक वर्ष " ग्याप" घेतली. दुसर्या वर्षी त्याने उत्तम गुण मिळवले आणी त्याला व्ही जे टी आय ला सुद्धा प्रवेश मिळत असताना त्याच्या आई वडिलांनी त्याला शीवच्या लो.टिळक रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायला लावला.मुलाने एम बी बी एस पूर्ण केले पण मनाविरुद्ध असल्याने त्याला शेवटच्या वर्षी चांगले गुण मिळाले नाहीत त्यामुळे त्याला सर्जरीला प्रवेश मिळाला नाही त्याने भूलशास्त्र( ANAESTHESIA ) मध्ये प्रवेश घेतला. हे त्याच्या आईनेच ठरविले होते. एक वर्ष झाल्यावर हा मुलगा कल्याण जवळ एका झाडाखाली स्वतःला बेशुद्ध करण्याचे औषध (PENTOTHAL) शिरेत घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला. आजही त्याचा हसरा चेहरा माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट पणे उभा राहतो. हे टोकाचे उदाहरण आहे परंतु अशी अनेक उदाहरणे मी जवळून पाहिली आहेत. विस्तारभयास्तव इतकेच पुरे.

ज्यांनी प्रोफाईलमधेच असं म्हटलंय...
मी इथे मिसळपाववर लीहलेल्या व्यक्त केलेल्या माझ्या वैयक्तीक लेखनाशी/प्रतीसादांशी/मतांशी/माहीतीशी मी स्वतः सहमत असेनच असे नाही.
त्यांचे प्रतिसाद विचारात घ्यावे किंवा कसं ते तुम्ही ठरवा.

चरचा चालु असताना लूजर्स ना विरोधी बोलायला एक तरी भासमय पण ठाम मुद्दा लिहावा मिळावा म्हणुन जन्मो जन्मी प्रोफाइल ला जपून ठेवलेले ते वाक्य आहे इतकेच. मुळात संजय सरां परमाने मला लोकांना चर्चेतून काहीच शिकवायचे नाहिये म्हणुन मी मांडलेल्या मुद्यांशी मी सहमत असेन अथवा नसेन(कारण मी हेकट वा ब्रम्हज्ञानी असल्याचा दावा करू शकत नाही) तुम्ही त्या मुद्यांशी सहमत आहात की नाही हे प्हाने महत्वाचे आहे असे ते वाक्य सुचवते!

. मूवी (मुक्त विहारी )समजत असतील इतका मी गवि( गहन विचारी) नाही. म्हणून आपणास माझ्या कोणत्या मुद्यावर नक्की आक्षेप आहे हे उमजत नाहिये. अन सुर मात्र विरोधी चर्चात्मक झाला आहे. आपण जर काही मुद्दे ओब्जेकटीवली सामोरे आणले तर मी नक्कीच ठोस मत प्रदर्शित करू शकेन. यातून राहून राहून एकच गोष्ट फक्त स्पष्ट होतेय... सुख कशाला म्हणतात हे मुलाने शिक्णे फार आवश्यक आहे. कल कोणता का असेना....

याच्याशी मी सहमत नाही. जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे. सौंदर्य च्या ऐवजी कोणताही गुण गृहीत धरता येईल. माझ्या स्वतःच्या बाबतीत मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश २ गुणांनी (टक्क्यांनी नव्हे) चुकला होता म्हणून मी फार्मसी ला प्रवेश घेतला होता. (दंत वैद्यकाला प्रवेश मिळाला होता सेन्त जॉर्ज मध्ये) फार्मसीच्या पहिल्या वर्षाला पहिला वर्ग मिळवला होता.तेथील पुढचा मार्ग स्पष्ट दिसत होता मी कमीत कमी पी एच डी केले असते (हि आत्मस्तुती नाही वस्तुस्थिती होती) पण एकही दिवस असा गेला नव्हता कि आपल्याला डॉक्टर व्हायचे आहे हे माझ्या डोक्यातून गेले नव्हते. तेंव्हा पहिल्या वर्षाच्या परीक्षेबरोबर मी वैद्यकीय प्रवेश परीक्षा दिली आणी सुदैवाने त्यात पास झालो आणी ए एफ एम सी मध्ये प्रवेश मिळाला आणी डॉक्टर झालो. आजपर्यंत एकदाहि असे वाटले नाही कि आपण डॉक्टर का झालो?

जीवनात सुखी राहण्याचे दोन मार्ग आहेत १)सुंदर मुलीशी/मुलाशी लग्न करा २) बायकोला/ नवर्याला सुंदर मानून घ्या. पहिला पर्याय नक्कीच चांगला आहे.
हम्म! १) एक तर सदाशीव पेठेत मिसळपावकट्टा करा. विषय संपला... बावन्नकशी सोने. नथिंग अनोफिशीअल अबॉट इट. २) अथवा नांदत आहात त्या डबक्याला ब्रम्हांडाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणत समवाक्यी टोणगे जमा करुन त्यात कत्टा करा. यात सदाशीव पेठेचा कट्टा योग्य(अधिकृत) पर्याय आहे यात दुमत नाही. पहिला पर्यायच मस्त आहे म्हणूनच मी कुठेही सुखी होण्याचा मार्ग म्हणून कॉम्प्रोमाइज करायला शिका हे अगदी आडुनही सुचवत नाही. पण... समजा सुदैवा ऐवजी दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेश परीक्षा नापास झाहला असता तर काय केले असते ? न्हवे वरील उदाहरणात सध्या दुधाची तहान ताकावरच भागवताना ? भलेही "ताक कीती आरोग्यदाही", "पिल्याने ताक जत्री" वगैरे लिखाण जरी छापुन आणले तरी.... आपला कमीत कमी पी एच डी हा ओप्शन नक्किच वाइट न्हवता... हे लक्षात सहज येइल ना ? किम्बहुना... कदाचीत पुढे मागे त्यातही तितकाच उत्साह निर्माण झाला असता (मान्य हे वाक्य सर्वसामान्य वादासाठी आहे आपल्याला वैयक्तीक हिशेबात ते बहुदा लागु पडत नाही) पण मुद्दा हा आहे की कलाच्या चर्चा आणी हवे तेच करण्याचा ठामपणा या दोन मुलभौत विलग संकल्पना आहेत. आणी कल न्हवे आणी ठामपणाही न्हवे तर नक्कि काय हवय.. हे ओळखणे जरी सुखाची किल्ली आहे तरी कलापेक्षा जे करु ते व्यवस्थीतच हा ठामपणा व्यक्तीमत्वात विकसीत होणे फार आवश्यक आहे. आयुश्याची सगळी दाने आपल्या कलाच्या बाजुने पडतिल असे अजिबात नाही. जे जगतो तेच लिहतो हा भंपकपणा असतो, खरे तर लिहायचे आहे त्यासाठी जगतो हा दांभिकपणा लपवायचा तो भास असतो.तरीही रॉक करायचे असेल तर कल न्हवे व्यक्तीमत्वामधे ठामपणा महत्वाचा. मग हवा तो कलकलाट हव्यात्या कलेने हवा तसा कलवता येतो... वाटले तर गहन बनता येते अथवा मुक्तपणे विहारसुधा जमुन जाते खरे साहेबः- मला जे नेमके मुद्दे बोलायचे आहेत ते मी आधिच या धाग्यावर सुस्प्श्टपणे नमुद केलेले आहेत. मी अतिशय सहज सुलभपणे त्यातील गाभा किती दाट व यथोचीत आहे हे समोर आणू शकतो. पण मुळातच त्याची आवश्यकता नाहीये हे वैयक्तीक मत आहे. आणी मुख्य म्हणजे इथे उजेड टाकायला जाणकार उपलब्ध्द आहेतच. हा प्रतिसाद म्या मुददाम मला निव्वळ वेळ जात नाही व महणून खरडला आहे. क्षमस्व.

अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का? :-)) आत्मशून्यसाहेब, आपला मुद्दा बरोबर आहे. अगदी पहिल्यापासूनच मान्य होता. पण हा धागा इतका वैयक्तिक स्वरूपाचा आहे, की यावर थोडंही विरोधी लिहिलं की त्याला वैयक्तिक वादाचे स्वरूप येतंय. मिपावर अनेक लोक बिनदिक्कीत वैयक्तिक अनुभव मांडतात याचे तर मला कायमच अप्रूप वाटत आलेले आहे. त्यावर जे लोक प्रतिसाद देतात, त्यांचे स्वरूपही ठरलेले आहे. " फारच छान! यापेक्षा अधिक योग्य असे कुणी काही करूच शकले नसते. तुम्ही जे केलेत ते सगळ्यात परीपूर्ण." आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.

अहो असे प्रस्थापितांना शिंगावर का घेत आहात? वेळ अगदीच जात नाहिये का?
प्रस्थापित म्हणजे काय ?
आपण त्याला छेद दिला आहे खरा, पण असे करणे योग्य आहे अशी आपली स्वतःची तरी खात्री आहे ना! शेवटी हे नुसते विचार नाहीत. कुणाच्या तरी आयुष्याशी निगडीत गोष्टी आहेत.
सुदैवदुर्दैवयोगायोगाने जो पुरेसा अनुभव गाठी आहे त्यावरुन मत मांडतो. माज्या समोर काही चुकिचे घडतय वाटत असेल तर स्पश्टपणे सांगतो. माझ्या पाठी जे घडते त्या घटनांवर जरी माझे नियंत्रण नसते तरीही अशांना एक शुभेछ्चा मी फार मनापासुन देतो... ती म्हणजे Hope your knife won't get hurt, while stabbing me in the ब्याक! *new_russian*

खरेसाहेब, शैक्षणिक यश अगदीच कामाचे नसते असे नाही पण आयुष्याच्या एवढ्या मोठ्या पसार्‍यात शैक्षणिक यश क्षणिक सुख देणारे वाटायला लागते. मुलाचा खरा कल कशात आहे हे ओळखणे महत्वाचे. दहावीला ८०-९०% मिळाल्यानंतर मुलाने डॉक्टर किंवा इंजिनीअरच व्हायला पाहिजे हा अट्टहास चुकीचा आहे. माझ्या एका नात्यातल्या हुशार मुलाने दहावीला उत्तम गुण मिळवून देखील कॉमर्सला जाऊन पुढे सीए पूर्ण केल्याचे उदाहरण मला माहित आहे. मुलांचे कौशल्य जास्त कशात आहे हे तपासून मगच निर्णय घेणे योग्य. पुढे कुठली दिशा कुणाला कुठे घेऊन जाईल हे आपला वकूब ओळखणे, त्यानुसार ध्येय ठरवणे, परिश्रम करणे, आणि प्रयत्नांमध्ये कठोर सातत्य ठेवणे यावरच अवलंबून असते. आजकाल करीअरच्या असंख्य वाटा उपलब्ध आहेत. मुलांची सुप्त कौशल्ये ओळखणे आणि त्यानुसार एखादे क्षेत्र निवडणे मुलांना आयुष्यात चांगले आणि समाधानकारक यश मिळवून देते असे वाटते. शेवटी यश म्हणजे तरी काय? आपल्याला आवडते ते काम मनापासून करण्याची जिद्द असणे आणि त्यायोगे सनदशीर मार्गाने चरितार्थासाठी आवश्यक असणार्‍या साधनांची आणि भौतिक सुखासाठी आवश्यक असणार्‍या समृद्धीची भक्कम तजवीज करणे आणि त्यासाठी सक्षम असणे. पुढे एखाद्या क्षेत्रात नाव कमवणे, प्रसिद्ध होणे, लोकप्रिय होणे ही यशाची आणखी वरची पायरी म्हणता येईल. आजच्या युगात हे सगळं करण्यासाठी असंख्य संधी आहेत. एका आयआयटीच्या पूर्वपरीक्षेतील अपयशाने एवढ्या मोठ्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही. एक संधी हुकते कारण इतर अधिक चांगल्या संधी पायघड्या टाकून आपलं स्वागत करायला सज्ज असतात यावर माझा जबरदस्त विश्वास आहे कारण मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे काहीही काळजी करू नका. सगळं एकदम झकास होणार आहे यावर विश्वास ठेवा आणि आपल्या मुलाला तो विश्वास अवश्य द्या. मग बघा चमत्कार. :-) मला दहावीला ८८.७१% गुण होते. आणि मी अकरावीमध्ये चक्क नापास झालो होतो आणि माझे एक वर्ष व्यर्थ गेले होते. अभिमान वाटण्यासारखी गोष्ट नाही. चूक माझीच होती. आणि आता मी काही फार प्रकाशमान दिवे लावलेले आहेत असंही नाही. पण आता ते अपयश माझ्या लक्षात नाही हे खरे. :-) आणि त्या अपयशाने मला खूप काही शिकवले हे ही खरे. सो, डोण्ट वरी! इट्स ऑल पार्ट ऑफ लाईफ. योग्य धडे शिकणं मात्र महत्वाचं आहे एवढं नक्की सांगा आपल्या मुलाला. म्हणजे मग सगळं नीट होईल. त्याला अनेक शुभेच्छा! :-) --समीर

छान लेख. सध्या आम्ही उभयता साधारणतः याच अनुभवातून जात आहोत. लेक दहावीत आहे आणि तिने पुढे विज्ञान संशोधन करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ती बारावीनंतर कोणत्याच प्रवेश परीक्षेला बसणार नाहीये. हे ऐकल्यावर, डॉ.खरेंना जशा प्रतिक्रिया/सल्ले मिळाले, अगदी तशाच प्रतिक्रिया मित्रमंडळी, नातेवाईक व्यक्त करतात. आता लवकरच दहावीचा निकाल लागेल, नंतर बघू. खरेसाहेब, तुमच्या मुलाला आणि तुम्हाला शुभेच्छा.

वाचतीये आणि हळूहळू मनाची तयारी करतीये. एकवेळ आपण आपल्यात (मूल व आईवडील, खरे हितचिंतक) काहीही म्यानेज करू पण या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या, शेजार्‍यापाजर्‍यांच्या टीका टिप्पण्यांना, शेरेबाजीला आवर कसा घालावा कळत नाही. अजून आम्ही सुपात आहोत पण वर्षे पटापट संपतायत. आपली ही वेळ नीट पार पडो व मुलास योग्य त्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळो या शुभेच्छा!

ह्यासाठीच माझी मुलगी जर्मनी मध्ये लहानशी मोठी होईल तेव्हा युरोपियन युनियन मधील कोणत्याही युनि मध्ये ती वाट्टेल त्या शेत्रात शिक्षण घेऊ शकते , तेही वाजवी दरात ,कारण शिक्षणाचा अर्धा खर्च सरकार करते, पण ती काय व किती शिकणार ह्याचा सर्वस्वी निर्णय ती स्वतः घेईल , आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत असू . अंतिम निर्णय तिचा , उद्या तिला उच्च शिक्षण घ्यायचे नसेल तर नोकरी मिळण्याच्या अनुषंगाने ती कोर्स करून आरामात जगू शकेल . काय करायचे हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे मी आता एकच करू शकतो , तिला लहान वयात ती ज्या शहरात राहते ते म्युनिक शहर , विज्ञानाचे शहर म्हणून ओळखले जाते , तेथील युनि व जगातील सर्वात मोठे विज्ञान संग्रहालयाचा वार्षिक पास काढून महिन्यातून एकदा तेथे तिला घेऊन जाईल . ह्याचा कुठेतरी तिचे आपले करियर निवडतांना उपयोग झाला तर सोन्याहून पिवळे नाहीतर किमान विज्ञान व वैज्ञानिक दृष्टीकोन तिच्या आयुष्यात एक महत्वाचे स्थान राखेल , हे देखील माझ्यालेखी खूप महत्वाचे आहे.

डॉक्टरसाहेबांचा लेख आवडला आणि कौतुकही वाटले.कमी मार्क पडले म्हणुन आइवडीलांनी नावे ठेवण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. कारण जिथे आइवडीलच बोलु लागतात तिथे इतर लोक २ पावले पुढे जाउन मुलावर टीका करतात, भले त्यांची त्या विषयातली अक्कल शून्य असो.आणि मग मुले अजुनच खचतात,जणु काय त्यांनी एखादा खुनच केलाय. मला हे ही पटते कि सर्वच मुलांन १०वी /१२वी च्या वयात आपल्याला काय करायचे आहे ही द्रुष्टी नसते.त्यामुळे निदान ३-४ मार्ग डोळ्यासमोर असणे आवश्यक आहे. जसे की जे इ इ ची तयारी करतानाच सी इ टी, बिट्स आणि तत्सम परीक्षासुद्धा देणे. किवा नाहीच जमले तर बी.एस्सी,एमेस्सी हा मार्गही आहेच. कॉमर्स असेल तर सी.ए फाउंडेशन्,सी एस ची तयारी किवा इतर कोर्स आहेत्,बँकेच्या स्पर्धा परीक्षा आहेत्,किंवा सर्वांसाठी एम पी एस सी /यु पी एस सी आहेत्.अजुन थोडा स्पार्क असेल तर आय ए एस /आय पी एस आहेत. थोड्क्यात काय २१व्या वर्षी नोकरी, २५ व्या वर्षी २ बी एच के फ्लॅट २७ व्या वर्षी लग्न असा मध्यमवर्गीय बाणा ठेवण्यात काही पॉईंट नाही. त्याला जरा वेळ द्या, २-३ लाईन ट्राय करु द्या.कुठे ना कुठे स्थिरावेल तो. पहीले ३-४ वर्षे एका फिल्ड्मध्ये राहुन नंतर आयुष्यभर वेगळाच मार्ग पत्करणारे लोकही पाहीलेत.आणि यशस्वी झालेलेही पाहीलेत. सो डॉक्टर...मुलाला शुभेच्छा आणि तुम्हालापण

लेख आणि बहुतेक सर्व प्रतिसादही आवडले. विशेषतः प्र.पे., पैसा, समीरसूर, शेखर काळे, प्रसाद१९७१ यांचे. मुलाने स्वतःचा कल ओळखून मार्ग ठरवावा हे थोड्या प्रमाणातच व्यवहार्य आहे. कारण सतरा-अठराव्या वर्षी आयुष्यभरासाठीचा निर्णय घेण्याइतकी परिपक्वता मुलामध्ये असतेच असे नाही. अमेरिकेमध्ये मुले उच्चशिक्षणासाठीच्या पैशांची जुळवाजुळव स्वतःच करतात. यामध्ये काही वर्षे निघून जातात. नंतर हव्या त्या अभ्यासक्रमाला जातात. पण तेथे वाढलेल्या वयातही प्रवेश मिळू शकतो आणि स्थिरस्थावर होण्याचे वय एकूणच मोठे असल्याने समाजाच्या दृष्टीने फरक पडत नाही. एरवीही कोणी खाजगी गोष्टीत दखल देत नाही म्हणा. आपल्याकडे तसे नाही. त्यामुळे तणाव येतो. लहान वयात घेतलेले निर्णय बरोबरच ठरतील असे नाही. तेव्हा जो काही आयुष्यक्रम वाट्याला आला आहे त्यात सर्वोत्तम ठरण्याची आस धरावी हे उत्तम. आमच्या एका मामेभावाने दहावीपर्यंतची वर्षे ट्रेकिंग, फुट्बॉल, क्रिकेट यात (लोकांच्या मते उंडारण्यात) घालवली. दहावीनंतर अगदी कमी मार्कांमुळे कुठेही प्रवेश मिळेना. शेवटी एका आय्टीआय मधून ऑटोमोबाइल रिपेअरिंगची पदविका घेऊन चक्क एका गॅरेजमध्ये कामाला लागला. पण त्या कळकट वातावरणात राहूनही जबरदस्त मेहनतीच्या जोरावर आज मुंबईत त्याने स्वतःचे वर्क-शॉप उभे केले आहे. कुठल्याही मेकच्या गाडीसंबंधी लोक आज त्याचा सल्ला घेतात. डॉ.खरे यांनी लो.टिळकांचे चांभाराचे उदाहरण दिले आहे ते अगदी समर्पक आणि दिशादर्शक आहे.

मला १० वीला ८४ साली ६६% मिळाले. वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो सायंसला जातो.गेलोही. पण त्या कॉलेजला लेक्चर पध्दती. मेडीयम इंग्रजी असल्याने सगळे डोक्यावरुन जायचे. मग सहामाहीत नापास झालो. चंबुगबाळ आवरुन सरळ गावी गेलो.म्हणलो बास झाले शिक्षण. वडील म्हणाले परत जा , तसेही वर्ष जाणारच आहे , जमेल तसा अभ्यास कर मी काहीही बोलणार नाही. मग परत गेलो , मन लावुन पाठांतर केले अनी कसाबसा ११ वी पास झालो.मग १२ वी ला परीक्षेआधी गॅप घ्यायची साथ आली, मीही बळी पडलो, परीक्षा दिलीच नाही. निकालाच्या दिवशी वडीलांना सांगितले. मग परत रेग्युलर १२ वीला प्रवेश घेतला. पुन्हा परीक्षा आली , अभ्यास केलाच नव्ह्ता. मग ईज्जत वाचवायला कॉपी केली. पकडलाही गेलो. रिझल्ट आलाच नाही तेंव्हा कळले कॉपी केस झालीय. मग वडीलांनी कोणतरी माणुस शोधला, बोर्डात गेलो चौकशी झाली पण वर्ष गेलेच. परत ३ र्या वर्शी १२ वी ला रेग्युलर प्रवेश. आता तर असा ग्रुप होता की पहील्या दोन्ही वर्शापेक्षा अभ्यास कमी झाला. आमच्या ८ जणांच्या ग्रुपमधे बाकी सगळ्यांनी गॅप घेतला आनी मी एकटा परीक्षा देणार होतो. पण परीक्षा दिली.गणीत सुटणे शक्य नव्ह्ते मग पुनः पुढच्या मुलाला दम देउन कॉपी केली.यावेळी पास झालो पण गणीतात ३५ आले.पास झालो यातच खुश झालो. घरी गेलो वडील म्हणाले आता काय करतोस. मी म्हणालो इंजिनिअरींग ला पैसे भरा आता चांगला अभ्यास करेल. परिस्थिती नसताना त्यांनी पैसे भरले, मित्र म्हनायचे १२ वी ला गणितात ३५ आहेत तर कशाला इकडे आलास बाबा?कशाला बापाला बुडवतोस. गप्प बसावे लागायचे. मग पहिले वर्श पीऑल झालो. दुसर्या वर्शीही ९ सुट्ले. मॅथ्स-३ दिला नव्हता. मग टीई ला मॅथ्स ४ आला. बारावीला गणित काहीच न केल्याने हे मॅथ्स सुटणे अशक्यच वाटायचे. पण खुप लढलो आनी शेवटी बीई झालो. मुंबईला आलो. पहीली नोकरी ९३ ला १२०० रुपये पगार. वदीलांच्या जागी पंचायत समीतीमधे क्लार्क व्हॉयचा चान्स होता पण मी नाही म्हणालो. वडीलांच्या आजारत पुढे २००३ पर्यंत कर्जबाजारी झालो. मग काहीच पर्याय नसल्याने धंदा चालु केला. २००५ ला कर्जमुक्ती आनी कामकाजातुन मुक्ती दोन्हीही एकदमच. पुढे भारतभर फिरलो, काही परदेशवार्याही झाल्या. पण हे सगळे शक्य झाले ते माझ्या वडीलांमुळेच कारण एवढा त्रास होउनही त्यांनी मला कधीच दुखावले नाही. मग २००३ ला माझ्या चुलत्याचा मुलगा आला तो ८ वी पास. आज तो सर्व बिजीनेस संभाळतोय. भरपुर पैसे कमावतोय. आनी मी पून्हा भारतभर विपश्यना करत फिरतोय. चुलत्याला तर आपला मुलगा नक्की काय करतोय तेही माहीत नाही. असो.

बाबौ!! बादवे हे "गॅप घेणे" प्रकर्ण काय असायचं? म्हणजे परीक्षा द्यायचीच नाही का? हा संदर्भ जुन्या पुस्तकांत / आत्मचरित्रांत वगैरे वाचलाय, पण नक्की काय याबद्दल उत्सुकता आहे.

आयुष्यभर उत्कृष्ट नोकरी करणारे व त्यासोबत भरघोस पैसा, प्रतिष्ठा व मुबलक अशिक्शीतपणा असणारे कोणी बहाद्दर असतील तर त्यांचेही डोळे उघडणारे अनुभव ऐकायला आवडेल.

आपलेच एक मिपावरील मित्र श्री विनायक प्रभू हे मी लेख लिहिल्याच्या दुसर्या दिवशी स्वतः ठाण्याहून मला आणि माझ्या मुलाला भेटायला आले आणि त्यांनी आमच्या झालेल्या चुका अतिशय मृदू शब्दात समजावून दिल्या आणि आमच्या मुलाच्या काय चुका झाल्या ते दाखवून दिल्या आणि पुढच्या प्रवासासाठी मुलाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. प्रभू सरांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता आम्हाला केलेल्या मार्गदर्शनासाठी मी आणि माझा मुलगा त्यांचा आजन्म ऋणी राहीन. माझी मिपाकरांना एक विनंती आहे कि आपली मुले दहावी झाल्यावर त्यांना प्रभू सरांकडून मार्गदर्शन घावे म्हणजे आमच्या झालेल्या चुका टाळता येतील. अर्थात हा आगाऊपणा मी प्रभू सराना न विचारता करीत आहे. ते मला क्षमा करतील अशी अपेक्षा आहे. ते आल्यानंतर मिपा काही काळ बंद होते म्हणून हा ऋण निर्देश करण्यास उशीर होत आहे.

डॉक्टरसाहेब, अतीशय उत्तम लेख आणी अत्यंत महत्वाच्या विशयावर लिहील्यापद्दल अनेक धन्यवाद. प्रभुसरांचा सल्ला सर्वांनाच घेता येईल असे नाही. पण बहुतेक पालक आणी मुले जवळ जवळ सारख्याच चुका करतात. तेव्हा जर प्रभुसरांनी दाखविलेल्या चुका व त्या टाळण्यासाठी केलेले मार्गदर्शन इथे लिहीले तर आमच्या सारख्या बहुसंख्य पालकांना त्या चुका टाळण्यासाठी उपयोगी पडेल.

विनायक प्रभू यांनी बरेच लेख मिसळपाव वर लिहिलेले आहेत आपण त्यांना track केलत तर ते आपल्याला वाचता येतील. कालपासून मी ते वाचायला सुरुवात केली आहे. त्यांच्या लेखांचा दुवा बनवून धाग्यावर तक्ता आला तर बरे होईल असे मला संपादक मंडळाला नम्रपणे सुचवावेसे वाटते.

त्याला आता फक्त योग्य ट्रॅक हवायं. प्रभू सरांच्या निस्पृहापणाला प्रथम दाद देतो. त्यांनी कोणता मार्ग सांगितला याची कल्पना नाही पण माझ्या भाच्यानं पॉलिटेक्निकमधून (GPP) मेकॅनिकल डिप्लोमाकरुन नंतर डिग्री घेतली. त्याला कॅम्पसमधेच L & T त नोकरी मिळाली. स्पर्धा परीक्ष्यांची जीवघेणी अनिश्चितता टाळून अ लिटील लेट बट थेट असा तो मार्ग आहे. भाच्यानं आधीच ठरवल्यानं दहावीनंतरच डिप्लोमा केला त्यामुळे बारावी आणि स्पर्धापरीक्षा या दोन्ही गोष्टींना फाटा मिळाला. तुमच्या मुलाची बारावी झाली असली तरी एकीकडे डिप्लोमाला प्रवेश घेऊन त्या बरोबर स्पर्धापरीक्षा देणं योग्य होईल. त्यानं त्याच्या आवडीप्रमाणं मेकॅनीकल इंजीनिअरींग करणं हेच श्रेयस आहे. पुढचा स्कोप वगैरे विचार आता करण्यात अर्थ नाही त्यामुळे निष्कारण दिशा भरकटेल आणि ज्यात त्याचा रस आहे त्यात तो निश्चित प्रगती करेल यात वाद नाही.

@ खरे सर, वर आपण प्रतिसादामध्ये लिहीलंय की मुलाला मेकॅनिकल अथवा सिव्हील इंजिनिअरींगमध्ये जायचंय. त्याला त्या क्षेत्रांबद्दल नेमकी किती माहिती आहे? नेमकंपणा नं काय करायचं आहे ? रंगांमधल्या बेसिक कलर्स प्रमाणं सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल ही बेसिक इंजिनिअरींग फील्ड्स आहेत. (सगळ्यात जुन्या कॉलेजेसमधल्या सगळ्यात जुन्या ह्याच ब्रँचेस आहेत आणि ते साहजिक देखील आहे.) आज सिव्हील अथवा कन्स्ट्रक्शन फील्ड मधल्या पगारांबाबत विचार करता हे पगार आयटी अथवा संगणक अभियांत्रिकी च्या समान पातळीवर अथवा क्वचित वरचढ देखील आहेत. (करेक्ट मी इफ आय एम राँग) मी स्वतः ह्या क्षेत्रात असल्यानं सिव्हील इंजिनिअरींग नंतरच्या अनेक उपशाखांबाबत माहिती आहे. बिल्डींग -रेसिडेन्शियल, कमर्शियल, मॉल्स, थिएटर इन्फ्रास्ट्रक्चर- रोड, ब्रिजेस, डॅम, कॅनल्स, पाईपलाईन्स, टनेल्स, एअरपोर्ट, रेल्वे लाईन्स, पोर्ट नि त्यासोबतची असंख्य कामे, इन्डस्ट्रीयल- फॅक्टरी, वेअर हाऊस इ.इ.इ. सरकारी महत्त्वाची कामं- अणुभट्ट्या नि त्यासंबंधी ची विविध कामे ह्याबरोबरीनं आणखीही असंख्य कामे सिव्हील इंजिनिअरींगचा भाग आहेत. फक्त बिल्डींग कन्स्ट्रक्शन मध्येचः आर्किटेक्ट चं काम सिव्हील इंजिनिअर करु शकतो. डिझाईन करणं हे वेगळं नि आव्हानात्मक फिल्ड आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट हे एक वेगळं प्रोजेक्टचं क्वालिटी कंट्रोल हे एक वेगळं नि प्रोजेक्टचं क्वान्टिटी सर्व्हेइंग (सगळ्या क्वान्टीटी वर्क ऑट करणं नि त्यांचं बिलिंग) हा वेगळा भाग आहे. प्रोजेक्ट प्लानिंग, प्रोजेक्ट एक्जेक्युशन हे आणखी महत्त्वाचे रोल्स. ह्यात मुख्य लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याकडं आवश्यक असतो तो पैसा नि त्याचं देखील वर्गीकरण महत्त्वाचं करायचं ते मटेरियल्स मॅनेजमेण्ट, मॅनपॉवर मॅनेजमेण्ट आणि टाईम मॅनेजमेण्ट ह्या द्वारे. ह्यातल्या 'मॅनपॉवर' बाबत विचार करता सिव्हील लाईन ही सगळ्यात अनसिव्हीलाईज्ड लाईन आहे. पण हेच गरीब, न शिकलेले, अंगुठा छाप कामगारच हातात आवश्यक हत्यारं घेऊन काम करत असतात. त्यांच्याकडून काम करुन घेणं हीच एक मोठी कला आहे. असो! खूप विषयांतर झालं. कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी काम 'नीट' केलं की पैसा नंतर येईलच म्हणावं मुलाला. पैसा हे प्रॉडक्ट आहे आपलं काम व्यवस्थित केल्याचं. तो येतो. मला मिळालेला गुरुमंत्र 'आत्ता आराम कर नंतर आयुष्यभर कष्ट कर किंवा आत्ता कष्ट कर नंतर आयुष्यभर आराम कर. चॉईस इज युअर्स'

आज अनेक महिन्यांनी (कि वर्षांनी?) मिपावर आलो आणि सर्वप्रथम तुमचा हा लेख वाचला. विषय अत्यंत महत्त्वाचा तसंच नाजूक, संवेदनशील आहे. माझा मुलगा आता दहावीत गेलाय, आणि तो ऑलरेडी लोकांच्या "काय, यंदा दहावी ना? ..." वगैरे टिपीकल प्रश्नांना कंटाळून गेलाय! दहावीत असण्याचा माझा अनुभव पस्तीस वर्षे जुना असल्याने त्याचा उपयोग पालक म्हणून फारसा होत नसला तरी समाजमन फारसं बदललं नाही हे ही अनुभवतोय!

खरेसाहेब, अभिनंदन.. तुम्ही समजूतदारपणे मुलाच्या पाठीशी उभे आहात, आर्थिकरित्या आणि मानसिकरित्याही ह्यासाठी.. आयुष्यात आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे आहेच, ह्याविषयी शंकाच नाही. "कल असलेल्या" क्षेत्रात जर पुरेसे पैसे मिळत नसतील, तर गोडी कमी होण्याचीही शक्यता असते. मी जनरलायजेशन करु इच्छित नाही, पण आजकाल मुलांना मिळणार्‍या माहिती आणि एक्स्पोजर मुळे आज आवडणारे क्षेत्र उद्या बोरींग वाटण्याची शक्यता असते. वर बर्‍याच जणांनी सांगितल्याप्रमाणे आज एक तर उद्या दुसरंच काहीतरी करावंसं वाटू शकतं. अर्थात तुम्हाला तुमच्या मुलाच्या स्वभावाची आणि इच्छांची माहिती असेलच, त्यामुळे ह्या विषयावर मी अक्कल पाजळण्यात अर्थ नाही.. तसंही, तुम्हाला प्रभूसरांनी मार्गदर्शन केलेले आहेच.. वर प्यारेने माझा उल्लेख केलाय, म्हणून हे अवांतर : माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास, आय हॅड नथिंग टू लुज. त्यामुळे मी "ब्लाईंड गेम" खेळू शकलो स्वतःबद्दल.. ती परीस्थिती प्रत्येकाचीच असेल, असे नाही. खरं सांगायचं, आयुष्यभर हुशार म्हणून नावाजल्या गेलेल्या मुलांना कॉम्पीटिशनमध्ये आलेले अपयश पचत नाही, हा अनुभव आहे. दे गेट शॅटर्ड.. माझ्यातर्फे तुमच्या मुलाला शुभेच्छा आणि एकच सल्ला द्या : त्याचा फक्त आणि फक्त त्याच्या मेहनतीवर अधिकार आणि ताबा आहे. आपल्याशी कॉम्पिटीशनमध्ये असलेल्या लोकांची ताकत, तयारी ह्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो, आणि त्याचा विचार करुन वेळ वाया घालण्यात अर्थ नसतो. त्यामुळे, त्याला जे काही करायचंय त्यासाठी झोकून प्रयत्न करणे, आणि आशावादी राहणे एवढंच त्याचा हातात आहे.. वर्क फॉर द बेस्ट अँड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट.. आणखी काय.. (इंग्रजाळलेल्या प्रतिसादासाठी क्षमस्व..)

नोकरीत यशस्वी होण्याचा आणि शिक्षणाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. माझ्या टीम मध्ये अनेक जण असे आहेत जे एम् टेक आणि तत्सम परिक्षा पास होवून आले आहेत, आणि साध्या साध्या गोष्टी त्यांना करता येत नाहीत. असेही आहेत जे नवीन आहेत पण त्यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. नोकरी मध्ये फक्त चार गोष्टी बघितल्या जातात. १. तुम्ही किती जबाबदारी चे (रिस्पोन्सिबिलिटी) काम घेवू शकता २. तुम्ही किती लवकर एखाद्या गोष्टीला आत्मसात करू शकता (अ‍ॅडाप्टीबिलिटी) ३. तुम्ही किती चांगल्या प्रकारे आव्हानांचा (चॅलेंजेस) सामना करू शकता ४. तुमचा द्रूष्टीकोन (अ‍ॅटीट्यूड) बाकी स्वतःला बाजीराव समजणारे व एक पैशाचे पण काम न करता फुकट पगार खाणारेच जास्त.

बाकी स्वतःला बाजीराव समजणारे व एक पैशाचे पण काम न करता फुकट पगार खाणारेच जास्त. आमच्या दुर्दैवाने आम्हाला असे शिकवणारे भेटलेच नाहीत. इंटर्नशिपमध्ये स्त्रीरोग शास्त्र हा विषयात काम करीत असताना आमचे एक सर आम्हाला रोज काम संपताना हे विचारायचे डॉक्टर आज आपण आपला पगार कमावला काय?( पगारा इतके काम केलेत काय?) इतर डॉक्टरांसारखे आम्हाला विद्या वेतन नव्हते तर लेफ्तनंट म्हणून पूर्ण पगार होता. या एका वाक्याचा इतका खोलवर परिणाम झाला कि त्यानंतर जर दिवसभर काही काम केले नाही तर फार मानसिक त्रास होत असे. पण त्याचा एक मोठा फायदा सुद्धा झाला. पुण्याला असताना आमचे दोन वरिष्ठ दिवसभरात प्रत्येकी एक किंवा दोन रुग्ण बघत असत आणी मी आणी आमच्या वरिष्ठ मैडम दोघे मिळून १०० रुग्ण पाहत होतो त्याचा मला कधीही मानसिक त्रास झाला नाही. आणी या अनुभवाचा निवृत्त झाल्यावर आम्हाला फार फायदा झाला. मैडम आणी मी आमची निवृत्ती नंतर भरभराट झाली आणी त्या दोन वरिष्ठांची मात्र ससेहोलपट झाली.( पंधरा वर्षे काम न करता बसून खायची सवय सरकारी नोकरीत चालून जाते.

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत. १. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. - हे एकदम मान्य आहे. २. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे - सहमत. ३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. - सहमत. (आता माझा फुकटचा सल्ला) डॉक्टरसाहेब म्हणतात
त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे?
हे तर कुठल्याही क्षेत्रात खरं आहे. अभियांत्रिकी झालो तर दहावीमध्ये शिकलेल्या इतिहासाचा काय उपयोग? डॉक्टर झालो तर बारावीत शिकलेल्या इंटिग्रेशनचा काय उपयोग? बी.एस.सी. करून मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह झालो, तर शिकलेल्या भौतिकशास्त्राचा काय उपयोग?
शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.
तसं जर असेल, तर मग IAS च्या परीक्षेची तयारी करणारा अभियांत्रिकी व्हायची काय गरज आहे, बी.ए. पण चालेल की? याचे कारण म्हणजे रिस्क मॅनॅजमेंट. IAS परीक्षा पास नाही झाला तर अभियांत्रिकी होऊन कुठेतरी नोकरी तरी मिळू शकेल, बी.ए. होण्यापेक्षा बरे, असा त्यामागचा विचार असतो. शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता. साधी गोष्ट आहे, कॉलेजने १७ लाख मागितले, तर तुम्ही विचारलंत ना की सुरुवातीचे पॅकेज ४ लाख(च) आहे का? तेच जर आय.आय.एम. मध्ये १० लाख फी भरून २५ लाखाचे पॅकेज मिळाले असते, तर कसे वाटले असते?
मुलाचा शिक्षणाचा कल महत्त्वाचा आहे.
पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कॅमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल.
हे असे डायलॉग ३ एडियट सारख्या सिनेमात टाळ्या वाजवायला छान वाटतात. हातात कॅमेरा द्यायचा असेल तर मग आत्ताच का नको, पदवी मिळायची तरी का वाट बघायची? आज भारतासारख्या देशात, जिथे स्पर्धा इतकी बिकट आहे, तिथे अशी चैन बहुतेकांना परवडत नाही.
पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे.
चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात.
सर्वच जण कौशल्य असूनही यशस्वी होत नाहीत. त्याला नशीबपण लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणारा एम.एफ.हुसेन हजारात एखादाच होतो. बाकीचे त्याच गॅलरीसमोर फुटपाथवर प्रदर्शन लावून बसलेले असतात. म्हणून मी माझ्या भाच्याला तो दहावीत असताना सांगितले होते की तू आता ७ वर्ष नीट अभ्यास करून यश मिळवलेस तर पुढची ७० वर्ष आरामात जगशील. पण त्याऐवजी आता ७ वर्ष आराम केलास तर पुढे ७० वर्ष भोगशील. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव. (त्याची क्षमता काय आहे, ते ओळखून तितपतच अपेक्षा ठेवणे, इतपतच पालकांनी करावे.) माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. (जसं वर पेठकरकाकांनी म्हटले आहे). आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात. साधारणपणे यश, पैसा, कीर्ती, self-confidence, समाजातली पत हे एकत्रीत असतात. स्वतःच्या कर्तबगारीवर/आत्मविश्वासावर पैसा मिळू शकतो आणि खूप पैसा मिळाला की आत्मविश्वासपण वाढू शकतो. मग सोपा मार्ग का घेऊ नये? शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.

साहेब, त्या कॉलेजने टेबलाखालून १७ लाख मागितले का तर मी आणि माझी बायको डॉक्टर आहे म्हणून. ( अगोदर ते तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतात). कोलेजची फी वेगळी. जर कोलेजची फी चार लाख रुपये वर्षाला असेल आणि तसे स्पष्टपणे अगोदरच म्हटले असेल तर वेगळे. हे म्हणजे शिवनेरीचे भाडे सव्वा चारशे आहे ते आपणा सर्वाना माहित आहे. पण आज गाड्यांचा गोंधळ आहे म्हणून ट्याक्सी वाला दोन हजार रुपये सीटला घेतो तेंव्हा कसे वाटेल तसे आहे. आय आय एम ची फी दहा लाख आहे हे जगजाहीर आहे. त्यात लपवा छपवी नाही. अर्थात या संस्थेबद्दल सुद्धा एकाने मला हेच सुनावले कि अरे तुझ्याकडे टेबलाखालून द्यायला पैसे नाहीत म्हणजे इतरांकडे( इतर डॉक्टरांकडे) नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांचे हिशेब किंवा धंद्यातील गणित तुझ्यापेक्षा जास्त पक्के आहे. ( हि वस्तुस्थिती मी खरं तर गृहीत धरायला हवी होती) "शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते." आयुष्यातील यश म्हणजे फक्त पैसे मिळवणे हे नाही हे मला अधोरेखित करायचे आहे. नाहीतर माझ्या मुलाला त्याच्या इच्छेविरुद्ध मी मरीन इंजिनियरिंग ला पाठविले तर पास झाल्यावर त्याला एक हजार डॉलर महिनाची सुरुवातीची नोकरी पक्की आहे. (नौदलात काम करून मी तेवढी पुण्याई कमावलेली आहे कि माझ्या मुलाला त्या क्षेत्रात चिकटवून घेतील एवढे संबंध आहेत). पण मग आयुष्यभर जर तो नको असलेले काम करणार असेल तर काय उपयोग? लष्करात असताना माझे एक वाक्य बरेच लोकप्रिय झाले होते. " आपला कमांडिंग ऑफिसर चांगला नसेल तर आपले एक ते दीड वर्ष कष्टात जाते, पण आपली बायको चांगली नसेल तर आयुष्य कष्टात जाते" चांगले कॉलेज का हवे ? यात फक्त ब्रान्ड हा एकच मुद्दा नाही. चांगल्या संस्थेत शिक्षक चांगले असतात, तेथील विद्यार्थी हुशार असतात आणि अभियांत्रिकी मध्ये ज्या प्रचंड प्रयोगशाळा लागतात त्या पायाभूत सुविधा जास्त चांगल्या असतात. त्यामुळे जर सरासरी पातळीने अशा संस्थेतून ज्ञान ( केवळ पदवी नव्हे) घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी अधिक वरच्या पातळीचा असतो. हातात क्यामेरा धरून एक वर्ष भर नुसता फिरलं तरी चालेल. "आता नको" एवढ्यासाठी कि त्याला अजून( वय वर्षे १७) परिपक्वता आली नाही.ती आली असती तर मला चालले असते. मी माझ्या CNBC TV १८ च्या शो वर सॉमरसेट मॉम चे वाक्य म्हणून दाखविले होते “Money is like a sixth sense without which you cannot make a complete use of the other five.”तेंव्हा आपल्या मुलभूत गरजा आरामात भागविण्यासाठी किमान संपत्ती हि पाहिजेच. इतर बाबतीत सहमत