Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
श्री श्री श्री विनायक प्रभूपाद स्वामीना अर्पण. आमची प्रेरणा . http://www.misalpav.com/node/27986 काय चिरंजीव. रीझल्ट कधी आहे? १२ तारखेला. ठीक आहे. तुझा नम्बर पितळे काकाना एस एम एस केलाय. अकरा तारखेला परत एकदा करा. पप्पा काय फरक पडणार आहे एका दिवसानी. तुला नाही मला पडेल. एक दिवस रीझल्ट अगोदर समजेल. सी ओ ई पी , वालचंद नाहीतर कर्‍हाड नक्की. पप्पा ओ आता बारावीच्या मार्कावर अ‍ॅडमिशन मिळत नाही. तेवढ्यासाठीच तर मुद्दाम चिंचवडच्या क्लासमधे अ‍ॅडमिशन घेतली ना. अकरावीला कमी होते पण पण क्लासच्या सरानी सगळी तयारी करून घेतली होती म्हणून सांगितलय. त्यांच्या सुपर स्पेशल बॅचला अ‍ॅडमिशन फुल्ल होती तरी ती विनवणी करुन आपण घेतली ती. पण पप्पा. पण काय? मी ऑफिसात संगून आलोय. सगळ्या कलीग्ज ना फुल्ल पार्टी द्यायची आहे तुझा बारावीची. पप्पा मी सुद्धा देणार मित्राना पार्टी. दे दे ..... बारा तारखेला मस्त मजा करू. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अकरा तारीख........ काही सांगू नकोस. मी मुद्दाम रजा टाकली होती. काय तर म्हणे एकसष्ट टक्के..... अगं कुठे अ‍ॅडमिशन मिळणार आता याला . इतके क्लासेस लावले इतका खर्च केला. खर्चाचं सोड. ते गेल्यातच जमा होते. ऑफिस मधे काय सांगु सगळ्याना. त्या शिरसटची मुलगी सी ई टी मधे ९५ टक्के आले. तिला डेन्टल , आयुर्वेदीक , बी ए एम एस कुठेहे मिळेल अ‍ॅडमिशन. तो बघ खुशीत असेल. अहो असं काय करताय. ६१ टक्के म्हणजे काही कमी आहेत का? तू गप्प बस गं. इकडे कोंपीटीशन किती वाढली आहे माहितै. ६१ टक्क्याला प्रायव्हेट मधे सुद्धा अ‍ॅडमिशन मिळेल की नाही शंका आहे. बरं मग? मग काय? बघु या. चिरंजीवानी कामाला लावलंय. पण तुम्ही त्याला काही बोलु नका? काय बोलु नको. अगं इतके दिवस रात्रंदिवस त्याच्या अभ्यासासाठी खपलोय. घरात टीव्ही बंद केला . बाबा येणार होते त्याना येवू नका म्हणून साम्गितले. त्याला सकाळी उठवायसाठी तू गजर लावून चार वाजता उठायचीस. रात्री त्याला लवकर झोप येवू नये म्हणून मी त्याच्या सोबत जागायचो. खरं आहे हो. काय खरं आहे काय खोटं आहे मला कळेनासं झालंय. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- चौदा तारीख. आई मला माहिती आहे. पप्पा चिडलेत. परवा पासून बोलले सुद्धा नाहीत माझ्याशी. काय बोलावं त्यानी असं तुला वाटतंय? रागावून बोलले तरी चालेल. पण त्याना बोला म्हण ना. तूच बोल त्याम्च्याशी. मी काय बोलू? मला कमी मार्क पडलेत. मला कळतंय. पण मी काय करू मी सगळे प्रश्न सोडवले होते. रीचेकिंगला टाकू का? पण सीईटीचं री चेकिंग होत्म की नाही माहीत नाही. शिरसट काकाना विचार? नको साधनाला ९५ टक्के पडलेत. मला नाही जायचं त्यांच्याकडे. बरं मग क्लासच्या पांडे सराना विचार. नको क्लासमधे सगळ्याना खूप मार्क पडले आहेत. मला नाही जायचं तिथे. अरे पण विचार ना कुणाला तरी. संतोष डीकुन्हा ला विचारू? त्याला किती पडले? एक्कहत्तर . नको त्याला नको. कुणाला तरी चांगले मार्क पडलेल्याला विचार. ठीक आहे. ए आई मला इंजीनिरिंग ला नाही जायचे. हे तू मागची दोन वर्षे म्हणतोयेस. हो ना. पण पप्पा ना पटतच नाही. तु सांगशील? ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तारीख पंधरा. काय रे गेले दोन दिवस ओफिसला दांडी का मारली? अरे काय सांगू अ‍ॅसिडीटीने हैराण होतो. नक्की अ‍ॅसिडीटी? की मग? बरोबर आहे रे तुला जे वाटतं तेच. कसं सांगू चिन्मय ला मार्क कमी पडले हेच ना हो ना पोराने पार लाज काढली. एकसष्ट टक्के घेवून कुठे दिवे लावणार आहे कोण जाणे. एकसश्ट म्हणजे कमी नाही चांगला फर्स्ट क्लास आहे की? कसला डोंबलाचा फर्स्ट क्लास.. कुठेच अ‍ॅडमिशन मिळत नाहिय्ये. आता फक्त हातकलंगणले , वडगाव मावळ , नारायणगाव मंचर असल्या कुठल्यातरी बुद्रूक नाहीतर खुर्द कॉलेजात मिळेल अ‍ॅडमिशन.पुढची चार वर्षे जाणार त्यानंतर पुन्हा कॅम्पस वगैरेच्या नावाने बोंब. पोराने इतके कमी टक्के मिळवलेत तोंड दाखवायला जागा उरली नाही. एक विचारू? विचार तुला किती टक्के होते रे बारावीला. असतील पंचावन्न वगैरे काहितरी. पणते कॉमर्सला. आणि वहिनीना? ती कशीबशी झाली आहे बारावी. पुढे कुठं शिकली आहे. तुला माहितीच आहे की .पण कारे. नाही असंच विचारलं. माझ्या माहीतीप्रमाणे तुमची दोघांची घरची परिस्थिती चांगली होती. हो. अगदी श्रीमंत वगैरे नाही. मध्यम वर्गीय. खाऊनपिउन सुखी. शिक्षणासाठी काही अडचण. फी , जागा वगैरे. कसली अडचण रे. अडचण बीडचण काही नाही. बाबानी चांगले तीन तीन क्लासेस लावले होते माझ्यासाठी. तरीही असे मार्क्स मिळाले? अरे बाबा आमची डोकी तशीच होती. अगदी गणंग नाही थोडे कमी हुशार. सगळे थोडेच अभ्यासात हुशार असतात. काही कमी काही जास्त. चालायचंच. पण त्यामुळे आमचं कुठं बिघडलं? मस्त ब्यांकेत जॉब मिळाला. कमी मार्क म्हणजे जगायला नालायक आसे थोडंच असतं बरं मग? मग काय? तूच माझा मार्कांबद्दल विचारलंस. बरं मग? मग काय? " कमी मार्क म्हणजे जगायला नालायक असं थोडंच असतं? " हाच विचार आपण आज केला तर? म्हणजे मी नाही समजलो? हे तू का सांगतो आहेस? चिन्मय ला कमी मार्क्स मिळाले ........ नाही नाही नाही... चिन्मय ची गोष्ट वेगळी आहे. आमच्यावेळेला इतकी काँपिटीशन नव्हती. काँपिटीशन कित्ती वाढलीये हल्ली. बरं मग? ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ ही परिस्थिती १९९० मधे होती.......ही परीस्थिती २००९ मधे होती.......... हे २०१४ आहे. परिस्थितीत बदल संभवेल असे दिसत नाही. ( दहावी बारावी च्या सर्व क्लासवाल्याना आणि दहावीबारावीतील मुलांच्या पालकाना सर्मपीत)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कंसात लिहिलंत तरी हे विडंबन नाहीच! खरंच असं आहे.

परिस्थिती गंभीर आहे. यावरून एक जोक आठवला. बाबा : बंड्या, फक्त ५५ टक्के ? अरे शिवाजी महाराज तुझ्याएवढे होते तेव्हा त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता !' बंड्या : बाबा, ते तुमच्या एवढे झाले तेव्हा छत्रपती होते !

तर काय आजकाल बाकलिवाल,दिक्षा,प्राईम,पेस,आकाश हे पुण्यातले शिक्षणसम्राट झालेत म्हणे.आणि एवढे करुन I.I.T च्या ६००० सीटपैकी यावर्षी पुण्यातील विद्यार्थ्यान्ना मिळाल्या फक्त ५०० आय आय टी ची तयारी ८ वी पासुन??? एकंदर I.A.C.P. I.I.T. Classes चे दिवस दूर नाहीत. असोच.

मिपावर यायचे सार्थक झाले...
विस्कटुन सांगाल काय ? हा लेख वाचुन मिपावर यायचे का सार्थक झाले ते ?