Welcome to misalpav.com
लेखक: पिंपातला उंदीर | प्रसिद्ध:
"It is not always easy. Your successes are unheralded--your failures are trumpeted." President John F. Kennedy, CIA Headquarters, 28 November 1961 गुप्तहेर खात म्हंटल की मराठी माणसाला थेट बहिर्जी नाईक आठवतो आणि चाणक्याचे कोटस वैगेरे आठवायला लागतात . एरवी गुप्तहेर खात्याची आठवण आपल्याला कुठे बॉम्ब स्फोट झाला की खापर फोडायला आणि शिव्या घालायला कुणीतरी पाहिजे तेंव्हा च होते. वर केनेडी ने म्हणल्याप्रमाणे यांच्या यशोगाथा कुणाला कळत नाहीत मात्र यांच्या अपयशाचा सार्वजनिक पंचनामा होतो. अनेक उदाहरण अशी आहेत की गुप्तहेर खात्याच्या सतर्कतेमुळे अनेक बॉम्बस्फोट आणि अतिरेकी हल्ले टळले आहेत. मात्र सर्व सामान्य जनतेपुढे हि माहिती फारशी येत नाहि. पण कुठे बॉम्बस्फोट झाले की प्रसारमाध्यम लगेच आपल्या गुप्तहेर यंत्रणेतल्या त्रुटिवरुन आरडाओरड सुरु करतात . आणि फुटबॉल क्रमवारी पासून जागतिक आरोग्या निर्देशांकामध्ये पाकिस्तान शी स्पर्धा करण्याच्या भारतीय वृत्तीला, "त्या पाक्ड्यांची ISI बघा कशी हिरीरीने काम करते नाहीतर आपली RAW बघा बसलेत हातावर हात ठेवून " अस म्हणे मानवते. यातल्या बहुतेक लोकाना RAW चा longform पण माहित नसतो मग त्यांनी १९७१ च्या युद्धात बजावलेली जबरदस्त कामगिरी यांचा पत्ता असण्याची सुतराम शक्यता नाहिच. गुप्तहेर खात्याबद्दल चे हे औदासिन्य सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वत्र आढळते . अशा या देशात अजित डोवाल सारख्या खमक्या माजी गुप्तहेर अधिकाऱ्याची मोदींचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाल्याच्या बातमीला माध्यमांमध्ये कुठेतरी कोपरयात किंवा मधल्या पानावर जागां मिळाली यात आश्चर्य ते काय ? त्या बातम्यांमध्ये पण डोवाल हे अडवाणी यांचे निकटवर्तीय असून पण मोदी यांनी त्यांची नेमणूक कशी केली असा आश्चर्यमिश्रीत खोचक सुर होता. पण सुदैवाने अजित डोवाल ला प्रसिध्द होण्यापेक्षा त्याचे काम अचूक करण्यात जास्त रस आहे. त्याची दीर्घ कारकीर्द तरी हेच सांगते . मी डोवाल बद्दल पहिल्यांदा वाचले ते हुसैन झैदी च्या डोंगरी ते दुबई या दाउद इब्राहिम च्या उदयावर लिहिलेल्या अप्रतिम पुस्तकामध्ये . भारतीय गुप्तहेर खात्याने पाकिस्तान मध्ये दडुन बसलेल्या दाउद ला उडवण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत . पण एकदा ते त्याच्या खुप जवळ पोहोंचले होते . जावेद मियांदाद चा मुलगा आणि दाउद च्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस . छोटा राजन या दाउद च्या प्रतिस्पर्धी टोळीशी हातमिळवणी करून हा बेत आखण्यात आला होता . या टोळीचे दोन उत्कृष्ट नेमबाज फरीद तनाशा आणि विकी मल्होत्रा हे दुबई (जिथे विवाह सोहळा पार पडणार होता ) ला पोहोंचले पण होते.सर्व तपशील ठरवला होता . अगदी बारीक सारीक गोष्टी पण पक्क्या झाल्या होत्या . म्हणजे अगदी हे नेमबाज कुठे उभे राहणार आणि गोळ्या कधी झाडणार इथ्पर्यन्त. पण ……। कुठेतरी माशी शिंकली आणि अंतर्गत गडबडीमुळे हे योजना ऐन वेळेस बारगळली . हातातोंडाशी आलेला घास गेला. हुसैन झैदी च्या पुस्तकातले हे प्रकरणच (प्रकरण २२- हेरांचे संमेलन ) मुळातुन वाचण्यासारखे आहे. तर हे सगळे operation अजित डोवाल पार पाडत होता . ह्यानंतर अजित डोवाल या नावाबद्दल कुतूहल तयार झाले नसते तरच नवल , कळस म्हणजे हा अजित डोवाल चक्क पाकिस्तानात ७ वर्ष राहून हेरगिरी करून राहून आला आहे . ते पण काहुटा (पाकिस्तान ची पहिली आण्विक भट्टी जिथे आहे ) अशा ठिकाणी . त्यामुळेच अजित डोवाल ला पाकिस्तान आणि ISI याबद्दलचा तज्ञ म्हणून ओळखले जाते. operation Blustar च्या काही वेळ अगोदर हा पठ्ठ्या वेश बदलुन सुवर्ण मंदिरात जाऊन राहिला होता . कारकीर्दीच्या सुरुवातीलाच याने २० वर्ष खदखदणारा मिझोराम प्रश्न सोडवण्यात सक्रिय वाटा उचलला होता . अशा असंख्य देशाच्या इतिहासाला वळण देणारया कामगिऱ्या पार पाडणारा हा लढवय्या कायमच पडद्याआड राहिला . गुप्तहेर खात्याबद्दल प्रचंड औदासिन्य असणार्या देशात या योद्ध्याला भारत रत्न किंवा गेला बाजार पद्मश्री मिळणे तर शक्य नाही . पण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नेमणूक झाल्याने त्या पदाचा नक्कीच सन्मान झाला आहे . अजित डोवाल चि या पदावर नेमणूक झाल्याने दाउद , सलाउद्दीन आदी लोकांमध्ये नक्कीच धडकी भरली असेल . बाकीचे माहित नाही पण राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तहेर खाते या आघाडीवर नक्कीच अच्छे दिन येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चांगली माहिती पुरवल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः झैदी यांची डोंगरी ते दुबई हे पुस्तक उत्तम आहे यात वादच नाही. पण झैदींनी पुस्तकाचे फिल्मीकरण केल्यासारखे वाटते त्यामुळे बर्‍याच ठिकाणी दाऊद हिरो असल्यासारखे वाटते आणि बर्‍याच ठिकाणी दाऊद निर्दोष असुन त्याला उगाच फसवले आहे असे झैदींना म्हणायचे आहे असे दिसते. अर्थात त्या (मुंबै बॉंबस्फोट) गोष्टींच्या संदर्भात तो दोषी असल्याचे संदर्भ सुद्धा पुस्तकात आढळतात. एकुणात पुस्तक वाचताना दाऊद गुन्हेगार आणि देशद्रोही आहे हे पक्के लक्षात ठेवुन वाचले तर उत्तम पुस्तक आहे. दाऊद मुसलमान असल्याने त्याला अडकवले गेले असे वाटत असणार्‍या लोकांना तो हिरो वाटायला लागु शकतो.

पुस्तकाच्या फ़िल्मिकरणाच्या मुद्द्यावर सहमत . पण दाउद चे कुठे समर्थन केले आहे असे मला तरी वाटले नाही . लेखकाने दाउद चा घेतलेला interview वाचण्यासारखा आहे. पाकीस्तान्धार्जीन्या अमेरिकी राजकीय अधिकार्याला लेखकाने पत्रकार परिषदेत दाउद आणि पाकिस्तान च्या मुद्द्यावर कसे धारेवर धरले हे त्या पुस्तकात दिले आहे . दाउद हा देशद्रोहीच आहे हे पण लेखकाने ठासून सांगितले आहे .

स्वतहाचा जीव देशासाठी धोक्यात घालणाऱ्या या unsung hero ला बहिर्जी नाईकांच्या महाराष्ट्रातुन एक मानाचा मुजरा हेच म्हणतो ! अनसंग हिरो राहणे हा हेर आणि हेरखात्याचा जितका "ऑक्युपेशनल हॅझार्ड" आहे त्यापेक्षा अनेक पटींनी ती "प्रत्येक हेराच्या वैयक्तीक आणि एकूण सर्वच देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेली खबरदारी" असते, हे अनिवार्य सत्य आहे. मात्र अजित डोवाल यांची खुद्द पंतप्रधानांचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्याने मोदींचा मानसीक कणखरपणा आणि तो प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी ठाम राजकीय इच्छाशक्ती अधोरेखीत झाली आहे. काही दिवसांच्याच कालावधीतच मोदींनी उचलेल्या या आणि इतर काही राजकीय पावलांमुळे जगातल्या आपल्या (मोजकेच किंवा नावाखातर असलेल्या) मित्रांना, कुंपणावर बसलेल्यांना आणि शत्रूंना योग्य ते संदेश जात आहेत. भारतीय नागरिकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे.

सहमत आहे. वाचाळता न करावी, माणसे ऐशी जोडावी| हृदया धडकी भरावी, शत्रूच्याही||

अशी काही मोजकी माणसे योग्य जागी असतील तर ती नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे.

अमोल साहेब, हा लेख लिहून अशा काळोखातील वीराबद्दल लिहिल्या बद्दल धन्यवाद. माझे अनुभव अशा गुप्तहेर खात्यातील माणसांबद्दल अतिशय चांगले आहेत आहेत. एकतर हि माणसे निवडताना अतिशय कणखर मनाची आणि अफाट जिद्दीची असतील तरच निवडली जातात. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिले जाणारे प्रशिक्षण अतिशय कठीण असते. यामुळे हि माणसे सर्वसामान्यांपेक्षा वेगळीच असतात. दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होते. शिवाय असा माणूस हेरगिरी करणारा आहे हे लक्षात आल्यावर आय एस आय सारख्या संस्था भारतात सुद्धा त्यांचा कट काढण्याचे कट रचित असतातच.( जर हा माणूस दाउद ला उडवण्याचा प्रयत्न करतो तर आय एस आय IM( इंडियन मुजाहिद्दीन) ला हाताशी धरून त्यांना उडवण्याचा प्रयत्न करणारच) असे असूनही हि माणसे देशासाठी छायेत वावरत असतात. म्हणूनच अशा अनाम वीरांना सलाम.

@सुबोध खरे साहेब दुर्दैवाने त्यांना सुद्धा त्यांच्या राजकारणी वरिष्ठांच्या तालावर नाचावे लागते. त्यामुळे एखादे कार्य पूर्ण करत आणले असताना सुद्धा मंत्री बदलला कि धोरण बदलल्याने त्यांना आहे त्या कामावर पाणी सोडावे लागू शकते. एकदम सह्मत. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना पाकिस्तान शी संबंध सुधारण्याच्या नादात त्यांनी पाकिस्तान मधील आपल्या गुप्तहेर जाळ्याची माहिती पाकिस्तानी अधिकार्याना पुरवली होती असे वाचल्याचे स्मरते . या नादान आत्मघाती पणाने झालेलं नुकसान अजून पण भरून नाही निघाले असे म्हन्तात.

ग्रेट ! बस्स नाम ही काफी नही था खरे तर .. हि ओळख होणे गरजेचे होते .. हि माहिती आणखी चार जणांना सांगायचे काम आता कर्तव्य म्हणून बजावण्यात येईल.

आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

आता तर मोदी पंतप्रधान आहे म्हटल्यावर एकुणच रोक शो चा द्ण्क्यात प्रारंभ होणार होता यात शंका न्हवती. परवाच जालावर बुध्दीबळ खेळ्ताना प्ल्याढुन प्रश्न आला , So u r exited abt ur new PM ? मी उडालोच म्हटलं कंच्या भागचा रं तू ? उत्तर आले Colorado. मी खूषित उत्तर दिले Yes. we , entire country is Very excited about our new PM named as "MODI SARKAR" unofficially but widely.

धन्यवाद अजित डोवाल ह्यांची ओळख करुन दिल्याबद्दल. नविन माहीती मिळाली. आजच्या सामना मधील बातमी: Ajit Dowal डोवाल नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अजित डोवाल हे देशाचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील. पोलीस खात्यातून कीर्तिचक्र मिळवणारे ते एकमेव अधिकारी आहेत. डोभाल हे मानाच्या पोलीस पदकाचेही मानकरी आहेत. डोभाल हे १९६८ च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मिझोरम, पंजाब व कश्मीरमधील अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता.

बाकी D-Day चित्रपटात आशा धर्तीचा प्रसंग सिनेमेटिक लिबर्टी घेउन चित्रीत केलाय. अर्थात चित्रपट नंतर बराच भरकट्तो हां भाग अलहिदा.

मी तटरक्षक दलातील वज्र हा जहाजावर होतो त्या जहाजावर घडलेली हि खरी हकीकत. १९९०-९१ सालची असेल. तेंव्हा माझा वर्गमित्र तेथे डॉक्टर म्हणून होता. त्या काळात तस्करीचा जितका माल पकडलं त्याच्या १० % रक्कम हि जहाजावरील सर्व कर्मचार्यांना मिळत असे त्यामुळे तस्करीचे जहाज सापडले कि सर्व लोकांच्या अंगात उत्साहाचा संचार होत असे. असेच एकदा हेन्जाहाज मुंबईच्या दक्षिणेला गस्त घालत असताना एक बोट विचित्र रित्या फिरत असताना त्यांना आढळली. यांनी त्या बोटीचा पाठ्लाद केला तेंव्हा ती बोट पळून जाण्याच्या तयारीत होती म्हणून वज्र ने त्या जहाजाच्या पुढे दोन तोफ गोळे डागले. ते पाहून त्या जहाजाची घाबरगुंडी उडालीआणि ते थांबले. जेंव्हा वज्रचे जवान त्या जहाजाची तपासणी करायला उतरले तेंव्हा त्यांना तेथे २७ लाख रुपयाची चांदी असलेली आढळली. यावर त्यासर्व लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि वज्रचे जवान त्या बोटीला मागे बांधून परत घेऊन येऊ लागले. काही वेळाने उपग्रह फोन वर दाउद इब्राहीम स्वतः आला आणि वज्राच्या कॅप्टन शी बोलू लागला. माझा मित्र त्यावेळी स्वतः हजर होता. दाउद ने सांगितले कि कॅप्टन साहब अपने हमारा जहाज पकडा है उसे छोड दिजीये. उसमे सिर्फ २७ लाख का माल है उसमे आपको क्या मिलेगा सिर्फ २.७ लाख वो भी सब लोगोंको मिलके. मै अभी एक पचास लाख का माल लेके जहाज आपके लिये भेजता हुं आप उस जहाज को छोड दिजीये. क्योंकी मैने किसीको जुबान दि हुई है कि आपको माल पहूनच जायेगा. कॅप्टनने अर्थात नकार दिला यावर दौड परत त्यांची मनधरणी करू लागला मै अभी आपके खाते मी तीन लाख रुपये पाहुणचा देता हुं. मी किसीकि ऐसे मिन्नते नही करता. लेकिन मैने किसीको जुबान दि हुई है. कॅप्टनने अर्थात परत नकार दिला. यावर त्याने अप बेवकूफ हो म्हणून फोन ठेवून दिला. यावर माझ्या मित्राने कॅप्टनला विचारले सर तो दाउदच होता कशावरून. त्यावर कैप्टन साहेब म्हणाले डॉक्टर आपली बिनतारी यंत्रणेची फ्रेक्वेंसी रोज बदलते आणि हि बदलेली फ्रिक्वेन्सी फक्त आठवड्याला कोडीफाय होते आणि याचे कोड फक्त कोस्ट गार्ड कमांडर आणि गृह मंत्रालयात माहित असते. ज्याअर्थी हे कोड गृह मंत्रालयातून मिळवून तो फोन वर आला या अर्थीच तो दाउद होता आणि चिंतेची बाब अशी आहे कि आपल्या गृह मंत्रालयात त्याचे लागे बांधे आहेत. अर्थात या प्रकारामुले आणि मुंबई बॉम्ब स्फोटामुळे नंतर तटरक्षक दलाचे गृह मंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात स्थानांतरण झाले.( यामुळेच नंतर फार मोठ्या प्रमाणावर तस्करी पकडली गेली. लष्कराचा असा कयास होता कि तटरक्षक दलाची जहाजे कुठे असतील याचा अंदाज गृह मंत्रालयाकडून तस्करांना तोपर्यंत मिळत असावा). पुढे आर्थिक उदारीकरणामुळे अमली पदार्थ सोडून इतर सर्व गोष्टींची तस्करी बर्याच प्रमाणावर थांबली हीही वस्तुस्थिती आहे.

तटरक्षक दलाच्या सैनिकांनी दाखवलेल्या अभिमानास्पद कामगिरीचे अभिनंदन आणि कौतूक आहेच ! स्वार्थापुढे देशाचा विश्वासघात करणार्‍यांची भारतात कमी नाही याचे मुख्य कारण देश चालवण्याची जबाबदारी घेतलेल्या बहुतेकांची फितुरी आणि बेफिकिरी हेच आहे. म्हणुनच दुर्दैवाने असे म्हटले जाते की, "India has progressed so far, not because of Government, but in spite of it !" नव्या नेत्रुत्वाने ही परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा आहे. या एका गोष्टीनेही देश बराच पुढे जाईल.

एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटत आहे. कठीण आहे. एकंदरीतच देश जे काय चाललाय तो नक्की कोणामुळे आणि कशामुळे? असा विचार केला तर भीतीची सुक्ष्म लहर मेंदूतून गेल्याशिवाय रहात नाही.

गेल्या १० वर्षांत सी आय ए ने सगली दिल्ली पोखरली आहे असं कुठेसं वाचलेलं. त्यांना पण वेसण घातली पाहिजे.

अजित दोवेल ह्यांचे नक्कीच अभिनंदन पण झैदी ह्यांनी त्यांच्या पुस्तकात ब्लफ केले आहे.विकी मल्होत्रा व फरीद तानाशा ह्यांनी दाउद ला मारण्याचा प्रयत्न पाकिस्तानात जाऊन केला होता. मात्र दाउद च्या मुलीचे वेडिंग दुबई मध्ये होते तेव्हा तो जर तेथे आला तर त्याला मारण्याचे मनसुबे मल्होत्रा , तानाशा ह्यांनी आखले होते. पण ते तेव्हा दिल्ली मध्ये होते व मल्होत्रा सोबत होते आपले अजित डावल पण नाट्यमय घडामोडी अंतर्गत मुंबई पोलिस अधिकारी हे खूद दिल्लीत येउन त्यांनी मल्होत्रा ह्याला पकडले मात्र अजित ह्यांना जाऊ दिले , ह्या प्रकारचा गोषवारा विकीलीक्स मध्ये सापडेल , त्यावेळी भारतीय मीडियात त्यांचे नाव न छापता आय बी चा अधिकारी असा उल्लेख केला होता , आता त्यांना अश्या मोक्याच्या जागेवर नियुक्ती देऊन मोदी सरकार ने जणू पाकिस्तान ला इशारा दिला आहे , तुम्ही आमच्या देशात छुपे युद्ध तर आम्ही सुद्धा तसेच करू शकतो गडकरी म्हणालेच आहे हे मनमोहन चे नाही आमचे सरकार आहे , आम्ही गप्प बसणार

लेख आणि प्रतिक्रीया दोन्ही वाचनीय! बरीच नवीन माहिती समजली. धन्यवाद! फक्त डोवाल यांच्याबद्दल इतकी जाहीर माहिती कशी हे समजत नाही. तो तुमच्यावरचा अविश्वास नाही अथवा डोवाल अथवा इतर गुप्तहेरांवर शंका घेण्याचा उद्देश नाही. पण शक्यतोवर गुप्तहेरांचे नाव देखील समजू नये अशी पाश्चात्य देश काळजी घेतात. त्या संदर्भात वाटले इतकेच.

डोवाल यांच्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे हे खर . पण त्याला वेगवेगळी कारण असावीत . लेखात उल्लेख केलेलं दाउद हत्येच्या प्रयत्न करण्याच्या प्रकरणाच श्रेय झैदी सारख्या पत्रकार कम लेखकाला द्याव लागत . पण या अनुषंगानेच हा मुद्दा पुढे न्यावासा वाटतो . अमेरिकेने अनेक 'Celebrated' गुप्तहेर दिले . आणि त्यांचा बिनदिक्कत गाजावाजा केला . त्यांची कामगिरी आणि कारकीर्द संपुष्टात आल्यावर त्यांनी त्यांचा उघडपणे गौरव केला . केनेडी सारखे (संदर्भ लेखातले केनेडी चे अवतरण ) त्यांना समजून घेणारे नेते मिळाले . नुकताच माजी CIA Chief असणाऱ्या जे , एडगर हुवर वरचा आणि लेओनार्डो ने आपल्या अभिनयाने जिवंत केलेला hollywood bio -pic बघितला आणि हि गोष्ट अजूनच जाणवली . आपल्याकडे अजित डोवाल आणि त्याच्यासारखे अजून इतर अनेक जण आहेत . आता एका अजित डोवल ला सन्मान मिळाला पण दुर्लक्षित असणाऱ्या त्याचासारख्या इतरानच contribution हा देश कधी acknowledge करणार हा प्रश्न उरतोच

विकास ते नुसते गुप्तचर नव्हते तर आय बी चे प्रमुख होते ते २००५ च्या सुमारास निवृत्त झाल्यावर सुद्धा ते देशातआंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. देशी विदेशी प्रसार माध्यमांच्या मध्ये ते मुलाखती ,व्याख्याने देतात. व हिंदुत्वाबाबत व संघाबाबत त्यांना आपुलकी आहे.. ए बी पी न्यूज ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी गुप्तचर विभागातून मिळणाऱ्या सूचना व राज्य सरकार चा दृष्टीकोन ह्यावर विस्तृत चर्चा केली आहे.

उत्तम माहिती. दाउदला नाही पकडले तरी त्याचे खापर व्यवस्थेवर फोडायला मोदी व डोवल मोकळे आहेतच.दाऊदला पकडता येत नाही पण त्याच्या भारतातल्या पाठिराख्यांना,त्याच्या गडगंज संपत्तीवर कब्जा करायला डोवल व त्यांच्या संघटनेला-रॉ ला कोणी अडवलेय म्हणते मी? की पुन्हा तिकडे राजकारण्यांचा दबाव वगैरे? (स्पष्ट) माई

लै भारी माईकाकू, इतका विनोदी प्रतिसाद फार दिवसांनी वाचला ! =)) याला अज्ञान म्हणावे की कांगावा की उपहास... पण यापैकी एक किंवा अनेक नक्कीच आहे/त !

http://www.thelivepost.com/ipl-spot-fixing-court-orders-to-attach-dawood-ibrahim-property-16140101/ मुळात बरीच संपत्ती दुसर्याच्या नावावर असते किंवा हवाला मार्फत प्रवास करते. लोकशाही राज्याला कोणालाही शिक्षा देण्यासाठी पुरावे गोळा करून न्यायालयापुढे ठेवावे लागतात. कसाब रंगेहात पकडला गेल्यावरही पूर्ण साक्षी पुरावे का करावे लागले? गुंड पुंण्डाना कोणताही कायदा लागत नाही. आपल्या गळ्याला सुरा टेकवून आपली संपत्ती हडप केल्यावर आपण न्यायालयापुढे पुरावा देण्यासाठी हजर राहणार काय? हा कायद्याचे राज्य आणी बेकायदेशीर लोकांमधील फरक( दोष म्हणा) आहे

पण हे कुणी 'दुसरे' असतात ज्यांच्या नावावर संपत्तीअसते त्यांना गुप्तहेर खाते काहीच करू शकत नाही का? म्हणजे दुसर्‍या देशात जावून तिकडे बॉम्ब लावू शकतात(डोवल ह्यांचे नाही म्हणत आहे मी.इन जनरल!) तर मग ह्याच देशातल्या दावूदच्या लोकांना काही करता नाही का येणार? त्याचे हस्तक खुद्द राजकारणीच आहेत्,गृहमंत्रालयातले बाबू लोक आहेत. जर हे एवढे ढलागता?सत्य माहित आहे तर मग हातचे सोडून पळत्याच्या मागे का लागता?

माईसाहेब, आदर्श आणि कॅम्पा जर इतकी वर्षे होऊनहि उभ्या आहेत ज्यातील घोटाळा धडधडीत पणे समोर आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवीत एस आय टी स्थापन न करण्यासाठी कांग्रेस ने तीन वर्षे लावली आणि सत्ता सोडायच्या एक आठवडा अगोदर न्यायालयात फेरविचारासाठी अर्ज दाखल केला. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने तो कचर्यात टाकला ते अलाहिदा. http://www.vakilno1.com/supreme-court/sc-instructs-upa-set-sit-investigations-black-money-cases.html तेथे गुप्तहेर खाते फार तर पुरावे गोळा करतील. पण त्यावर खटला भरण्यासाठी सरकारचीच तयारी नसेल तर ते तरी काय करणार?जर आपल्या कल्याणकारी राज्यात भ्रष्ट बाबुंवर खटला भरण्यासाठी २००३ पासून आजतागायत सरकारची परवानगी मिळत नाही http://www.corruptioninmaharashtra.com/?p=385 http://ibnlive.in.com/news/adarsh-scam-maharashtra-governor-says-no-to-prosecute-ashok-chavan/440255-37-64.html http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Maharashtra-okays-prosecution-of-42-officials-for-corruption/articleshow/18842643.cms आणि चव्हाण साहेबाना कांग्रेसने तिकीट देऊन निवडून सुद्धा आणले तर संदिग्ध गोष्टींबद्दल गुप्तहेर खात्याला दोषी धरणे कितपत योग्य आहे? एक तर आपण झोपेचे सोंग घेतले आहे किंवा आपली मते पुर्वग्रहदुषित असावीत. असो आपली मते आपल्यापाशी

तुम्ही पुन्हा भाजपा विरुद्ध कॉन्रेस असे रूप आणता असे दिस्तेय. मला त्यात रस नाही.मुंबई हल्ला असो वा त्यानंतर विविध ठिकाणिइ झालेले स्फोट असोत, गुप्तहेर खात्याला दोषी धरायचे नाहीतर कोणाला दोषी धरायचे? असो आता सुराज्य आले आहे!.बघुया काय होते. (संपादित)

माई तुम्हाला अजित ह्यांनी ए बी पी ह्या वाहिनीला दिलेल्या विस्तृत मुलाखतीची लिंक मी आधीच्या प्रतिसादात उपलब्ध केली आहे , त्यात गुप्तचर खाते कसे कार्य करते व त्यांच्या मर्यादा काय व त्यावर उपाय काय व राजकारण मग ते कोणत्याही पक्षाचे असो कसे आडवे येते ह्या बाबत सविस्तर माहिती दिली आहे , ती पहिली तर तुमचे खरडायचे श्रम वाचतील.

अहो.... ट्रोलिंग करणार्‍यांकडे वाचनासाठी वेळ नसतो. आमच्या प्रश्र्नांची उत्तरे देता देता "ग्रेट थिंकर" लुप्त झाले. तस्मात, अशा आय.डींच्या प्रतिसादाला प्रतिसाद देण्यापेक्षा अन आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा, मस्त बियर पित कट्टा एंजॉय करावा.