Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं. a नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’. ‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता. स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली. कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची. हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल. माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे काही नाही. तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक! जवळच्या मैत्रिणींना फक्त करियर, काम, पैसा यामागे धावताना बघून, तीशी पस्तीशीत वेगळाली आजारपणे पाठीशी लावून घेतलेली बघून बरीच ओरडले. वाईट ठरले, सिंगल आउट केली गेले. आता गप्प बसलेय. एकीचा नवरा ३७ व्या वर्षी गेला, दुसरीच्या नवर्‍याला चाळीशीत हृ. वि. झटका आला (त्यावर ती मला म्हणाली" मग काय झालं? आजकाल हे कॉमन आहे."), नवर्‍याचे दोन तीन मित्र चाळीशीत गेले. काही वर्षांपूर्वी एकीचा मुलगा १० व्या वर्षी आईच्या करियरला कंटाळून घरातून निघून गुपचुप माझ्या घरातल्या कोटस, शूजच्या क्लोजेटात लपलेला आढळला (रात्री ते माझ्या लक्षात आले नसते तर? हा विचार करणे आता सोडून दिलेय), नंतर कायदेशीर कारवाईत ओढले जाऊ नये म्हणून त्याच्या आईवडीलांनी हात जोडले, नवर्‍याने (लेक्चर मारून)तक्रार न करायचे कबूल केल्याने १० वर्षाच्या त्या मुलाने आपण होऊनच शाळेत कळवले व जे व्हायचे ते झाले. फार त्रास करून घ्यायचा नाही हे ठरवलेय. मला जे करायचेय ते करते तरी हे बघून मी खरच आनंदी आहे का हा प्रश्न पडलाय. माझा नवराही काही वर्षात हापिसातील काम घरी न आणण्याबाबत शिकला, रात्री बेरात्रीच्या मिटींगा आता घेत नाही तरी एखादी असतेच अठवड्यातून! असो, आम्ही शिकतोय. मी याबाबतीत गप्प बसायचे ठरवलेय तरी एवढे टंकलेच!

तुम्ही यावर काय उपाय काढलाय हे वाचायला उत्सुक!
वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे इतकंच पाळायचं. खरंच जेंव्हा गरज असेल तेंव्हा पुरेपूर झोकून द्यायचं. तिथे मागेपुढे नाही बघायचं. पण फुकट जर कुणी थांबायला वगैरे सांगत असेल तर मग ... हं !

कधी कधी काम वेळेत करणार्‍याच्या अंगावर बदाबदा जास्त काम येऊन पडतं. उपहारगृहाच्या व्यवसायात उतरण्याआधी मी एका खाजगी कंपनीत लेखा विभागात (अकाउंट्स) काम करीत होतो. मी नविन नोकरीला लागलो तेंव्हा ज्या माणसाने त्याचे काम माझ्यावर सोपविले त्याने दर महिन्याचे किरकोळ खर्चाचे (पेटी कॅशचे) हिशोब, आणि बँकांचे ताळमेळ (रिकन्सिलिएशन्स) पुढच्या महिन्याच्या २० तारखेपर्यंत साहेबांकडे सहीसाठी पाठवायचे असे बजावले. मी त्या प्रमाणे करीत होतो. आमच्या कचेरीची वेळ संध्याकाळी ५.३० पर्यंत होती. पण बाकी सर्व कर्मचारी रोज तासभर जास्त वेळ कचेरीत बसत आणि जास्तीच्या वेळेचा मोबदला (ओव्हर टाईम) कमावित. माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. (कारण त्यांच्या खात्याचे कर्मचारी जास्तवेळ बसून काम करतात म्हणजे ते (साहेब) जास्त कार्यक्षम अशी त्यांची धारणा होती.) मी कचेरीच्या वेळेनंतर जास्त वेळ थांबून, जास्तीच्या वेळेचा मोबदला का कमावित नाही असे त्यांनी मला विचारले. त्यावर जर, 'माझे काम कचेरीच्या वेळेत मी संपवू शकत असेन तर उगीच कचेरीच्या वेळेत, वेळेचा अपव्यय करून (इथे तिथे भटकून), संध्याकाळी जास्तीचा मोबदला कमवायला बसणे माझ्या तत्वात बसत नाही. ज्या वेळेची मर्यादा मला घालूना दिली आहे (पुढच्या महिन्याची २० तारीख), त्या वेळेत मी माझे कागदपत्रं, कचेरीच्या वेळेतच पूरी करू शकत असल्याने उगीचच उशीरापर्यंत बसून कंपनीस लुटणे मला पटत नाही.' असे (बाणेदार) उत्तर दिले. दूसर्‍या महिन्यात माझी २० तारखेची मर्यादा १५ करण्यात आली. तरीही वेळेत कागदपत्रं सहीला पाठवून मी ५.३०लाच ऑफिस बाहेर पडायचो. पुढे ती तारीख १० त्यानंतर ५ आणि शेवटी १ करण्यात आली. पण मी वेळेची नवनविन बंधनं पाळूनही ५.३०ला ऑफिस बाहेर पडायचो. साहेब चक्रावले. त्यांनी मला बोलावून घेतले आणि विचारले 'हे कसे?', मी त्यांना सांगितले, 'मी रोजचे काम रोज करून ठेवतो. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या दिवशी माझ्याजवळ १ दिवसाचेच काम बाकी असते. माझ्या आधीचा कर्मचारी रोज बँकेत जाण्याच्या नांवावर २ तास बाहेर भटकायचा. मी बँकेची कामे फोन वर करतो. क्वचीत व्यक्तिशः बँकेत जावे लागते. दिवसभर टंगळमंगळ करीत ह्याच्या टेबलावर त्याच्या टेबलावर मी फिरत नाही. शिवाय फुकटची जास्तीची कमाई मला रुचत नाही. सर्वात शेवटी, मी इथे नोकरी करायला आलो आहे, कंपनीचा कैदी म्हणून नाही.' माझ्या आधीच्या कामचोर कर्मचार्‍याला प्रमोशन आणि पगारवाढ मिळाली होती. (त्याची कारणं वेगळी होती). माझ्यावर॑ कुठल्याच दबावाचा परिणाम होत नाही हे पाहून साहेबांनी मला अतिरिक्त जबाबदार्‍या दिल्या. शेवटी मी त्या साहेबांच्या वरच्या साहेबांजवळ बोलून माझे खाते बदलून घेतले. इथे माझा साहेब गोरा होता. तो एकच सांगायचा 'Go home at 5.30.' जुना साहेब हात चोळत बसला.

माझे काम ५.३० पर्यंत करून ही मी वेळच्यावेळेत कागदपत्रं साहेबांच्या सहीसाठी पाठवत होतो. साहेब खुश होते पण मी उशीरापर्यंत न बसता ५.३०ला जातो हे त्यांना खटकत होते. पेठकर काका तुम्ही आमच्याच कंपनीच्या कोणत्या तरी सिस्टर मधे काम करीत होता काय? एकाने साहेबाना प्रशन केला होता एम एन सी चे उदाहरण कशाला देता ? तेथील शिपायाला तुमच्यापेक्षा जास्त पगार आहे.

वेल! कंपनीस वाईट सवयी न लावणे, आपली वेळ झाली की निघणे, केवळ कामाशी ईमान राखणे, वेल्ला म्हणे
वेल्ला जरी ठिक म्हणत असला तर असे विचार करणार्‍याला दुर्दैवाने हल्ली वेडा म्हटले जाते. खूप मोठे दुष्टचक्र आहे हे ज्यात सारेच फसलेत. जे घडतेय त्याची कारणे पुन्हा पुन्हा उगाळण्यात अर्थ नाही, पण सद्यस्थितीत तुम्हाला या मुर्खांच्या स्पर्धेत धावायचे नसेल तर जिथे असे वर्क कल्चर नाही अश्याच ठिकाणी नोकरी करणे उत्तम. कारण एकट्याने बदल घडवायला गेलात तर तुमचीच कंपनीतून हकालपट्टी होईल जे साहजिकच आहे. बाकी आहे त्या नोकरीवर लाथ मारायची ताकद अंगी बाळगण्यासाठी पैसे हातात खु़ळखुळायला लागल्याक्षणीच ज्या अनावश्यक गरजा अंगी बाणवल्या आहेत त्यांना पहिला दूर सारायला हवे. मग ते पिझ्झासाठी २०० आणि कोकाकोलासाठी ५० रुपये मोजणे असो किंवा आपल्या पोरांना ६०-७० हजार वर्षाकाठी फी देऊन बालवाडीच्या शाळेत घालणे असो. मी आजवर अशी नोकरी केली नाही, पण सध्या अचानक आमच्याही कंपनीचे वर्क कल्चर बदलल्यासारखे वाटतेय, जर ते तसेच कायम राहीले तर नक्की सोडचिठ्ठी देणार .. अर्थात, जाताना गूडबाय मेल मध्ये हे कारण टाकून इतर गाढवांचे डोळे उघडायचा नक्की प्रयत्न राहील.

हे चित्र औद्योगिक क्रांति झाल्यावर लगेचच आले का ? नक्कीच नाही. देश म्हणजे कंपन्यांचे जाळे ही कल्पना पाश्च्यात्य देशात रूजली.माणसाच्या सहा गरजा आहेत. तीन भौतिक व तीन मानसिक अन्न, वस्त्र, निवारा ,प्रेम, करमणूक, कौतुक या त्या होत. त्या भागण्यासाठी खरे तर फार मोठे काही करावे लागत नाही. अमोरिकेच्या धर्तीची अर्थव्यवस्था ही आवश्यक नसलेल्या गरजा निर्माण करते व आम्ही त्यातून रोजगार निर्माण करतो हा समाजावर एक मोठा उपकार करतो असे राज्यकर्त्याना , विचारवंताना पटवून देते. पुल देशपांडे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले होते." जगात समाजवादाचा झालेला पराभव ही माझ्या नजरेत २० व्या शतकातील सर्वात दु:खद घटना आहे" . आपल्या आजच्या संपन्नतेतील दुखण्याचे खरे कारण पुलना कळले होते. समाजवाद म्हणजे गळचेपी असे चित्र रशिया व चीन यांच्या सारख्या देशातील राज्यकरर्यानी निर्माण केल्याने समाजवाद भांडवलशाही पेक्षा कितीतरी मुल्याधिष्ठीत असूनही बदनाम ठरला. " शराब बुरी नही होती शराबी उसे बदनाम करते है!" असेच झाले. देशाचे धीरण आज त्या त्य देशातील उद्योग ठरवतात कारण उद्योग मोठा करण्यासाठी सहन कराव्या लागणार्‍या प्रसूतिवेदना राजकारण्याना नको असतात. १९९१ मधे अशा वेदना नरसिंह रावाना नको झाल्या होत्या. वाईट परिस्थीती आणून देशातील सरकारी उद्योग राजकारणी व नोकरशहा यानी मिली भगत करून बुडवायला सुरूवात केली शराब को शराबी लोगोने बदनाम किया. आज ठराविक समाजाला दोन दोन फ्लॅट्स गाड्या ई मिळत असले तरी आयटी मधील अभियंत्यामधे आत्महत्येचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. आजही आठ ते दहा मोठे उद्योग सरकारी बॅकांचे करोडो रुपये बुडवायला टपले आहेत. हे भांडवल शाही व समाजाच्या मालकीच्या बँका यांचे विचित्र साटोलोटे असल्याचे उत्तम उदाहरण आहे.

थोडासा याच धर्तीचा Self-inflected त्रास म्हणजे कार्यालयीन इ-मेल्स.. त्यासंदर्भात खूप विचारांती मी माझी सोडवणूक स्वतःलाच नियम घालून केली आहे; माझा नियम माझ्या इ-मेल सिग्नेचर मध्ये असा आहे: Let us use e-mails wisely and stay away from the "electronic leash". Technology is supposed to give us free time, not make us digital slaves! My Rule: Outside of a work-day, access e-mails only at defined times and respond quickly only if urgent. All other time is 'my time' :-) Try it, it keeps you stress-free! सुरूवातीला काही वरिष्ठांनी/ सहकार्‍यांनी कुरकुर केली, पण 'तुम्हाला capable मी हवा असेन तर हे असंच असेल' हे ठणकावून सांगितल्यावर इतरही सहकारी थोड्याफार याच मार्गाने चालू लागले. मी स्वतः कार्यालयीन वेळेनंतर कोणाला 'केवळ आठवलं म्हणून' इ-मेल / फोन करत नाही, (असे tasks फोनवर दुसर्‍या दिवसासाठी नोंदवून ठेवतो), इतरांकडूनही तशीच अपेक्षा आहे हेही स्पष्ट केलंय, त्यामुळे बराच कमी उद्वेग होतो.

हे स्वतःवरच अवलंबून असते. एकूण अनुभव असा आहे की ठराविक वेळेनंतर काम करायला नकार दिला तर जबरदस्तीने तुमच्यावर कोणी काम थोपू शकत नाही. ऑफिसचे काम, इमेल्स घरी घेऊन जाणे, न जाणे हा निर्णय सर्वस्वी व्यक्तीचा असतो.

मी फ्रेशरची असतानाची गोष्ट. मुंबईत एका अतिशय लहान कंपनीत कामाला होतो. जेमतेम वीस बावीस सॉफ्टवेअर डेव्हलपर होते कंपनीत. पैसा वाचवण्यासाठी यातले बहूतांश फ्रेशर. कंपनीचा मालक मँनेजर आणि तीन सिनीयर डेव्हलपर्स टीम लीड. फ्रेशर्सना बरेच वेळा काम न उरकल्यामुळे उशिरा थांबावे लागे. मालकांची अपेक्षा फ्रेशर्सबरोबर लीडनीही थांबावे. दोन लीड थांबतही. तिसरा हुषार होता. मेहनती होता. त्याचे म्हणणे माझे काम नसताना मी का थांबू ? शेवटी व्हायचे तेच झाले. परफॉर्मन्सचे कारण पुढे करुन त्या लीडला कामावरुन कमी केले.

त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे प्रूफ नव्हते का? कंपनी कोणती होती? बरेच फॅक्टर्स असावेत ह्यासाठी पण आजवर मी पाहिले आहे त्याप्रमाणे असे कोणाला कामावऱन कमी करता येत नाही.

तू नाही तर तुझ्या बापाने मला शिव्या दिल्या असतील हे सांगणाऱ्या लांडग्याची गोष्ट आहे ना. तसेच एकदा खाजगी कंपनीने ठरविले कि एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.

डॉ.साहेब, आजवर मी देशी, विदेशी कंपन्यांमधून नोकर्‍या केल्या आहेत, पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही, अगदी एखाद्या व्यक्तीला काम योग्य नाही असे तोंददेखले कारण जरी देऊन काढायचे ठरवले असले तरीही त्याच्या/ तिच्या विरुद्ध केस उभी करावी लागते.

माझ्या मते असा कायदा भारतात तरी नाही.. माझ्याच कंपनीने फक्त तीन महिण्याचा पगार देऊन एका दिवसात ३५ लोक्स गायब केले होते..अगदी त्यादिवशी कंपनीने स्वखर्चाने डॉक्टर, अम्बुलंस, व घरी सोडायला गाडी ठेवली होती.. :) २००८ - २००९ मध्ये तर हे खुप जागी बघितलेत्य...

+१ जर खरच काही कारण सापडले नाही तर कंपन्या रेजिग्नेशन लेटर टाइप करुन ठेवतात. ज्या माणसाला काढायचे आहे त्याला बोलवुन त्यावर सही करायला सांगतात. जर नकार दिला तर पुढील ३/६ महीन्याचा पगार देणार नाही (सही केली तर मात्र तो मिळेल), एक्स्पिरिअन्स सर्टीफिकेट, रिलीविंग लेटर वगैरे देणार नाहीत असे सांगतात. म्हणजे आर्थिक नुकसान प्लस पुढची नोकरी मिळणे अवघड :( काय करेल माणुस? तो सही करुन मोकळा होतो आणि नव्या नोकरीचा शोध चालु करतो. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यानी २००८ च्या मंदीच्या तडाख्यात हेच केले होते. यावर काही उपाय मला तरी माहीती नाही.

रिसेशनच्या काळात कंपनी कामावरुन कमी करते त्यासंबंधी कदाचित आपण बोलताय. तेह्वा नक्कीच शक्य असते. परंतु धन्या रिसेशनबद्दल बोलत नसावा वरच्या प्रतिसादात. ती केस वेगळी असावी. रिसेशनच्या काळात जेह्वा कंपनी कामावरुन कमी करते तेह्वाही तिला जो काही नोटीस पिरियड असेल तितके आगाऊ काँपेसेशन द्यावे लागते. न देता कामावरुन काढता येत नाही.

छे छे. एका महिन्याची नोटिस किंवा एका महिन्याचा पगार यापैकी काहिही देउन कंपनी बाहेरचा रस्ता दाखवु शकते. अपेक्षेनुसार काम करण्याची क्षमता नाही हा ठप्पा मारणेही खुप सोप्पे आहे. आणि तुम्हाला ठेवुन घ्यायचे नसेल तर तुमचे आयुष्य खडतर करणे कंपनीसाठी खुप सोप्पे असते,

'In reshuffling process your services are found excess, hence, hereby 30 days notice is being given....' हे आमच्या कंपनीतलं, एखाद्याला काढून टाकण्यासाठीचं, व्यवस्थापनाला सोयीचं असं वाक्य होतं.

बजरबट्टु, त्यातही मन मानेल तसे करता येत नाही. जी सर्व्हीस रिडंडट ठरलेली असते, त्या लोकांना जावे लागते, किंवा समजा भारतात एखादी प्रोसेस आहे, तीच जर कंपनीला इतरत्र अजूनही स्वस्तात मिळेल, तर ती प्रोसेस तिथे जाईल. कंपनी आपला फायदा पाहणार. भारतात आयटी जॉब्स असेच आले ना?

यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या तुम्ही म्हणताय ते आदर्श समोर ठेऊन नोकरांना नाही वागवत हो. तसे असते तर लोकांनी कामावरुन कसे कमी केले जाते यावर ईतके स्पष्ट आणि सविस्तर प्रतिसाद नसते दिले. :)

यशोधरा तै.. बहुतेक आयटी कम्पन्यांत नारळ देणे ही एक सामान्य प्रथा आहे. त्यासाठी एच आर नामक डिपार्ट मेंट असते. ते त्याला परफॉर्मन्स चे कारण किंवा कोणतेही कारण न देता एखाद्यावर अन्य प्रकारे दबाव आणून ( उदा तुला रेफरन्स चेक वाईट होईल , किंवा रीलीव्हिंग लेटर मधे "काढून टाकले आहे" असा शेरा देऊ ) एखाद्याला राजिनामा द्यायला भाग पाडतात. यात हे लोक क्षणाचाही विलम्ब लावत नाहीत. नोटीस पीरिअयड भले मग दोन / तीन महिन्यांचा असो एका दिवसात रीलीज देतात. एका कंपनीने निवडक लोकाना संध्याकाळी पार्टीला बोलावून त्याना तुम्हाला उद्या सकाळी राजिनामा द्यावयाचा आहे अशी प्रथा पाडली होती. या प्रकाराना सामान्य माणून कायद्याने आव्हान देऊ शकतो पण त्यामुळे होणारा मनस्ताप आणि वेळेचा अपव्यय आणि महत्वाचे म्हणजे पुढच्या जॉबवर होणारा परीणाम याचा विचार करून कोणीही तसे करत नाही. माझी इथल्या सर्वानाच एक विनंती आहे की तुम्हाला कंपनीने दिलेले ऑफर लेटर पुन्हा एकदा वाचा म्हणजे ते किती एकतर्फी आहे ते कळून येईल.

पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही -१. अगदी क्षुल्लक कारणांवरुन हाकलले जाते. विदेशी बद्दल माहित नाही. पण देशी (पुण्यातल्या) कंपनीत घडलेली गोष्ट- माझ्या कंपनीची पार्टी चालू होती. कॉंट्रॅक्टवरचे सगळे इंजीनीयर पण होते. त्यातल्या एकाने, माझ्या बॉसच्या खांद्यावर हात ठेवत त्याला अजुन थोडी 'घ्यायचा' आग्रह केला. ब्बास. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या कंपनीने काढून टाकले. तो कॉंट्रॅक्टवर असल्याने माझ्या कंपनीचा काहीच रोल नव्हता.

तेच तर. काहीही कारणं चालतात कंपनीला. सगळीकडे असं होत नाही, पण प्रोप्रा. कंपन्यात सर्रास चालतो हा प्रकार. एका MNC च्या मॅनेजर (MG3) ग्रेड बॉसच्या खांद्यावर हात ठेवणे, (तेसुद्दा पिल्यावर टाईट होउन) हे त्याच्या कंपनीतल्यांना आवडलं नाही बहुतेक. (व्हॅल्यूज्-एथीक्स?) अवांतर- अजुन एका कंपनीत तर ३ वर्षांसाठी ओरीजनल मार्क्सकार्ड ठेउन घेतलेले पाहतोय. आणी कंपनी कधीही, काहीही कॉम्पेन्सेशन न देता काढून टाकू शकते. लिगल आहे का हे? नसले तरी काय करणार पोरं? जॉब मिळाला हेच नशीब म्हणतात.

अशा २ कंपन्या माहीती आहेत. याहून बेक्कार म्हणजे बाँड मधल्या अटी, तीन वर्ष सोडायची नाही. तो पर्यंत बाँड मधले पैसे पगारातून कापत रहाणार. जर का भारताबाहेर पाठवलं तर बाँडचा कालावधी वाढणार. या दोन्ही प्लेसमेंटला आल्या होत्या. पोरं बसलीच नाहीत,

हे तर काहीच नाही .... माझ्या भावला २ वर्षांच्या बॉन्ड सोबत १५०,००० रुपयांची बॅन्क ग्यॅरंटी मागितलीये ....

यशोधरा ताई माझे वडील पर्सोनेल मैनेजर होते.(जमनालाल बजाज मधून व्यवस्थापनाची पदविका घेतलेले) आणि एल एल बी होते. ते एका कंपनीत असताना (१९७३ मध्ये जेंव्हा समाजवाद आपल्या शिखरावर होता) त्या कंपनीच्या मालकाला एका कामगाराचे वर्तन आक्षेपार्ह वाटले म्हणून त्याने त्याला कामावरून कमी केले. कायदे सल्लागार म्हणून वडिलांनी त्यांना सांगितले कि तुम्ही असे( विना चोकशी) काढून टाकलेत तर न्यायालय त्यांना परत पूर्ण पगारासहित कामावर घ्यायला सांगेल. त्यावर मालक म्हणाले मिस्टर खरे मला त्याचे तोंड बघायचे नाही. सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ . वडील म्हणाले पैसा उगाच तिप्पट खर्च होईल. त्यावर ते म्हणाले Mr khare money is not a problem I don’t want to see his face again. वडिलांनी शांतपणे त्या कामगाराला सांगितले कि न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात तू धुतला जाशील त्या ऐवजी मिळतात ते सर्व पैसे घे आणि दुसरी नोकरी शोध. अंती सत्याचा जय होतो हे जरी सत्य असेल तरी जय होई पर्यंत बर्याच वेळेस सत्याचा अंत सुद्धा होतो. मी स्वतः दोन कॉर्पोरेट रुग्णालयात काम केले आहे पहिल्या ठिकाणी एक नर्स रुग्णाशी हिंदीत बोलली म्हणून तिला नारळ दिला गेला आणि दुसर्या ठिकाणी लैब तंत्रज्ञ रात्री दोन वाजता रिपोर्ट टंकन करताना मोबाईल वर गाणी ऐकत होता या कारणास्तव त्याला नारळ दिला गेला. तेंव्हा काहीही न करता नारळ दिला जातो न्यायालयात जायचे असेल तर कर्मचार्याला जाऊ द्या आपण बघून घेऊ हा साधा विचार असतो. आपण म्हणता ते फक्त सरकारी नोकरीत असते.

एखाद्याला काढून टाकायचे तर ते सरळ काढून टाकतात. मग कोर्टात जा किंवा काहीही करा काहीही होत नाही.
अमेरिकन सरकारच्या भारतातल्या नोकरीतही असेच करतात. संध्याकाळी सव्वापाचला सांगतात, की आपले चंबूगबाळे आवरून आता घरी जा, उद्यापासून येण्याची गरज नाही.

बरेचजण यावर एवढा विचार न करता प्रवाहपतितासारखे वहात जातात. माझा यावरचा उपाय म्हणजे आमचे ऑफिशियल टाइमिंग १० ते ५ असल्याने ५ वाजेपर्यंत १००% काम करून बरोबर ५ वाजता बाहेर पडायचे. आमच्या एका सीएमडीने सर्क्युलर काढले होते की ऑफिसच्या वेळेबाहेर काम करणार्‍यांना मी अकार्यक्षम समजतो आणि त्या वेळेत ऑफिसमधे बसून तुम्ही ऑफिसची वीज, एसी, इंटरनेट यांचा गैरवापर करत आहात. अर्थात त्या सर्क्युलरकडे कोणीही लक्ष दिले नाही हे अपेक्षितच होते. मात्र गोष्ट विचार करण्यासारखी आहे खरी. मी स्वतःपुरता या रॅटरेसमधे न सापडण्याचा निर्णय घेतला. केवळ तेवढ्याचसाठी प्रमोशन्स घेतली नाहीत. आणि २५ वर्षे नोकरी करून नंतर स्वतःसाठी जगायचं हे आधीच ठरवलं होतं. त्यामुळे त्यादृष्टीने आवश्यक तेवढे पैसे साठवले आणि ठरल्याप्रमाणे नोकरी सोडून दिली. गेल्या एक दीड वर्षात त्याचा अजिबात पश्चात्ताप झालेला नाही. उलट हे अनुभव वाचले की मी स्वतःला सुदैवीच समजते.

पण फार डेरिंगची गरज नाही. कॅल्क्युलेटड रिस्क असते. मला डी ए लिंक्ड पेन्शन असल्याने हा निर्णय सोपा होता. ज्यांना पेन्शन नसते त्यांना मात्र पैशांचे व्यवस्थित नियोजन करावे लागेल. आपले आताचे उत्पन्न, राहणीमान आणि भविष्यातील गरजा यांच्याबद्दल स्पष्ट कल्पना डोक्यात असतील तर हा निर्णय फार कठीण नसावा!

प्रतिसादांबद्दल आभार्स. आहेत अशा काही कंपन्या जिथे वेळा पाळल्या पाहिजेत असं ठासवण्याची 'वेळ' येत नाही. बाकी अशा अनेक्क्क्क कंपन्या आहेत जिथे ही वेळ रोजच येते. असो.

तरुण, लग्न न झालेल्या लोकांमध्ये रात्री उशीरापर्यंत बसायची हौस फार असते असे निरीक्षण आहे. आजकाल मुलांना वाढवतानाच 'गो-गेटर्स', स्मार्ट, हाय-परफॉर्मर वगैरे (साध्या भाषेत हावरट) करण्याचा प्रयत्न असतो. अशा मुलांना नोकरीला लागताच सरसर शिडी चढून जायची घाई असते. शिवाय करिअरशिवाय दुसरे काय करायचे हे माहितच नसल्याने संध्याकाळी घरी जाऊन छंद किंवा खेळ वगैरे खेळावेत हे डोक्यातच येत नाही. कंपन्याही याला उत्तेजन म्हणून रात्री उशीरा बसणार्‍यांसाठी फुकट जेवण व येण्या-जाण्याची सोय करुन ठेवतात. ही प्रवृत्ती आतातर खूप खोलवर रुजली आहे कारण उंदीर शर्यत आता आणखी तीव्र झाली आहे. नोकरी काय कॉलेज जॉईन करतानाच आपल्याला कायकाय घ्यायचंय याची यादी तयार असते. त्यात आता परिस्थिती बदलती आहे. ऊर्जा व इतर संसाधनांच्या टंचाईने जग एका अतिदीर्घ अशा आर्थिक संकटातून जात आहे. त्यामुळे विकसित देशांमध्येही नवीन बेरोजगार तरुणांची संख्या वाढत चालली आहे आणि तिथलीही कार्यसंस्कृती हळूहळू खराब होत चालली आहे. मध्यंतरी बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच या प्रख्यात कंपनीत काम करणार्‍या एका अमेरिकन तरुणाचा अतिकामाने मृत्यु झाला. त्यानंतर कंपनीने किमान रविवारीतरी सुट्टी घ्या असा आदेश काढला. ही घटना पुरेशी बोलकी आहे. अर्थात लोभाचे उदात्तीकरण इतके झाले आहे की त्यावरुन कोणी काही शिकेल अशी आशा करणे वेडेपणा आहे. याला विरोध करणे एकट्यादुकट्याचे काम नाही. विरोध करणार्‍याची अवस्था जीएंच्या हंस आणि कावळ्यांच्या गोष्टीतल्या हंसासारखी होते. जिथे लक्षावधी लोक वेडे आहेत तिथे वेडेपणालाच शहाणपणा म्हणतात.

आज परिस्थिती अशी आहे कि तुम्ही जास्त काम करीत नसाल तर तुमची जागा घेण्यास भरपूर लोक तयार असतात. त्यामुळे मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. हि परिस्थिती बहुसंख्य क्षेत्रात आहे. दुर्दैवाने आजची पिढी आपल्या मुलांना वाढवताना "HE IS DOING WELL" म्हणजे भरपूर पैसे कमावतो या व्याख्येच्या आधाराने वाढवतात. मग जर मी हुशार आहे, जास्त पैसा कमावतो किंवा माझी आर्थिक सुस्थिती आहे तर माझ्या मुलाने पण भरपूर पैसा कमावला पाहिजे हिच अपेक्षा आहे या अपेक्षावर असलेली विचारांची बैठक घेऊन जर एखादे मुल आपल्या आयुष्याला सुरुवात करत असेल तर भरपूर पैसे कमावण्यासाठी वाटेल ते करायची तयारी त्याची आपसूक होते. मग दिवसाचे १५-१६ तास काम करणे हे त्याचा भागच झालेला आहे. माझ्यासारखे वेडे पीर फार कमी आहेत. १८ वर्षे सरकारी नोकरी करून विना निवृत्ती वेतन किंवा संतोष फंड(ग्रात्युइटी) बाहेर पडणारा माणूस किंवा मी ८ तासांच्या वर काम करणार नाही असे दोन कोर्पोरेट रुग्णालयांच्या मुलाखतीत सांगणारा माणूस एखादाच असतो. पण याचे मुळ कारण असे कि मला मोटार सायकल वर कोर्पोरेट रुग्णालयात विभाग प्रमुख म्हणूनहि जायला लाज वाटत नसे.किंवा मी माझ्या दवाखान्यात मोटार सायकलनेच जातो. आजही माझ्याकडे ८ वर्षे जुनी पेट्रोल इंडिका आहे. आपण आपल्या गरज वाढवून ठेवल्या कि त्या पूर्ण करण्यासाठी उरी फुटेस्तोवर धावतो आणि मग समाजाला दोष देतो. मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही. एका विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे.माझी गरज जरी मारुती स्वीफ्ट ने पुरी होत असेल तरी मी दुप्पट पैसे टाकून होंडा सिटी घेतो. कारण लोकांना दिसले पाहिजे कि I AM DOING WELL. मग या दुप्पट पैश्यांसाठी मला दुप्पट मेहनत करावी लागेल ते चालेल कारण "जमाने को दिखाना है". मी मुलुंड मधील डॉक्टराना २०१२ च्या नववर्षी एक संदेश पाठविला होता कि मरतेवेळी आपल्या बँक खात्यामध्ये असलेला पैसा हा आपण केलेल्या अनावश्यक मेहेनतीचे फळ आहे. (The amount of money in your bank account at the time of your death is the extra work you should not have done.). मूळ हि दुप्पट मेहनत एखाद्या शैक्षणिक पदवी किंवा कौशल्यासाठी वापरली तर आपण म्हणू त्या अटींवर आपल्याला नोकरी मिळवता येईल किंवा धंदा करता येईल. पण लक्षात कोण घेतो.