Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं. a नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’. ‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता. स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली. कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची. हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल. माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

>>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी "नवाबी" सर्व ठिकाणी चालत नाही. ह्या शेरेबाजीला अकारण नकारात्मक गंध चिकटला आहे. आपल्या तत्वांना जोपासणे म्हणजे "नवाबी" सवयी ठरतात का? त्या हिशोबाने साहेब आपणही, "मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे? आपल्याकडे अमेरिकेप्रमाणे निवृत्तीनंतर सरकार आपली काळजी घेत नाही. आपली आपल्यालाच घ्यावी लागते. काम करायची ताकद शरीरात असतानाच, वार्धक्यात शरीर अक्षम असेल तेंव्हासाठी, जगण्याची सोय करून ठेवावी लागते. वाढती महागाई आणि ढासळते समाजस्वास्थ पाहता ज्याला त्याला आपल्या म्हातारपणाच्या आयुष्यासाठी तजवीज करावीच लागते. फार थोडे असतात जे उर फुटेस्तोवर धावतात. बहुसंख्य हे कांही करीत नाहीत अशीच तक्रार असते. प्रत्येकाच्या गरजा, जगण्याच्या कल्पना, आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कसलाही अतिरेक करू नये हे मान्यच आहे. कित्येक जणांकडे कांही पर्याय नसतो. असही म्हणतात की, 'एखाद्या यंत्रात मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावंच लागतं नाहीतर मोडून - तुटून पडावं लागतं.' ह्या आधुनिकतेच्या यंत्रातील आपण लहान-मोठी चाकं आहोत. 'पैसा म्हणजे सर्वस्व नाही' पण हे विधान करण्यापूर्वी आपण तो भरपूर कमावलेला असणं गरजेचं असतं. मी अतिमेहनत करून वारेमाप पैसा कमवावा अशा मताचा नाही. पण मेहनतीचा शाप अनेकांना परिस्थितीचा रेट्यात न मागता मिळत असतो. >>>>विचारपूर्ण लेखात असे म्हटले होते कि आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. यात आपले घर किंवा कपडे किंवा बँकेत असलेला पैसा किंवा आपली मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी या सर्व गोष्टींचा समावेश आहे. हा लेख मुळापासून वाचावा लागेल. त्या लेखातून सुटे काढलेले वरील विधान पटत नाही. माझ्या घरात मी राहतो, कपडे मी वापरतो, बँकेतला पैसा अडीअडचणीला (आजारपणात, पै-पाहुणा आल्यास, मुलांच्या शिक्षणाची तजवीज म्हणून) मला उपयोगी पडतो, मोटारगाडी आणि भ्रमणध्वनी मी रोजच्या रोज वापरतो.

आपले प्रतिसाद नेहमीच आवडतात हे पहिले नमूद करू इच्छितो. थोडासा असहमत आहे. मुळात इंल्गंद आणि अमेरीकेच उदाहरण देणे चुकीचे आहे. १००-२०० वर्षांपूर्वी तिकडे असेच वातावरण होते. सगळ्या ब्रिटोन मधल्या खाणकामगारांची अवस्था प्रचंड वाईटच होती. हे आत्ता सगळे दिसते की मे ८ तास काम करणार वगैरे. त्यासाठी अनेक लोकांचे प्राण गेलेले आहेत. फक्त आपल्याला ते माहिती नसते. हे नियम तिकडे बनले म्हणून आपल्याकडे पण असेच पाहिजेल तसे होत नाही. कारण त्या मागची भावना त्या मागचा संघर्ष वगैरे माहितीच नाही आणि कधी अनुभवलेले नाही. मुळात गुलाम असलेल्या आपल्याला नाहीतरी राजे वा जमीनदार लोकांची अरेरावी सहन करण्याची शिकवण आपसूक मिळालेली आहे त्यामुळे हे असले नवाबीच म्हण्याला पाहिजेल

पेठकर साहेब आपल्या(वैयक्तिक रित्या आपल्याच नव्हे आपल्या माझ्या सर्वांच्या) सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील. आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. फार काय आपली कर सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. साधारण पणे तुम्ही आम्ही ३०% च्या वर त्या वापरात नाही. फार काय अडी अडचणी साठी म्हणून ठेवला गेलेल्या पैशातील ७० टक्के पैसा सुद्धा वापरला जात नाही. अर्थात त्या पासून मिळणारी मानसिक शांतीची किमत करता येणार नाही हे खरे आहे पण तो वापरला जात नाही आणि पुढच्या पिढीसाठी ठेवला जातो हेही तितकेच खरे आहे.
"मी ८ तासांच्या वर काम करणार नाही " असे ठणकावून सांगता तेंव्हा ती पण ''नवाबी" म्हणायची की तुमचे तत्व म्हणायचे?
माझे तत्व म्हणून मी काम करणार नाही आणि कामावरून काढून टाकले तर उपाशी राहीन असे म्हणणे हि नवाबी होते. पण मला जेंव्हा नक्की माहिती असते कि हि नाही तर त्याच तोलामोलाची दुसरी नोकरी मला नक्की मिळणार आहे तेंव्हा मी असे म्हणू शकतो कि मी तत्ववादी आहे. लष्कराशी सर्वोच्च न्यायालयात लढून(दहा महिन्यांचा पूर्ण पगार वकिलाच्या फि मध्ये देऊन मी १८ वर्षांनी विना निवृत्ती वेतन आणि संतोष फंड(ग्रैच्युइटी) नोकरी सोडली आणि बाहेर पडलो तेंव्हा आपल्याला त्या तोलामोलाची नोकरी नक्की मिळणार आहे हि खात्री होती म्हणूनच. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो भकेल त्याचे परंतु तेथे दिडक्यांचे अधिष्ठान पाहिजे इति पु. ल..

>>>>सौ च्या कपाटातील ७० टक्के साड्या/ड्रेस हे नाही विकत घेतले तरी चालतील... हीच गोष्ट दागिन्यांबाबत सत्य आहे. खरे साहेब, अहो आपल्या 'स्वास्था'साठी ह्या गोष्टी घेणे अत्यंत गरजेचे असते. जन्मभर बायकोची कुरकुर सहन करीत आनंदात जगणे कोणाला शक्य आहे का? आपल्या स्वास्थात त्या सर्व गोष्टींची १०० ट्क्के गरज असते. शिवाय पुरुषांच्या कपडेविषयक गरजा आणि स्त्रियांच्या कपडेविषयक गरजा ह्या वेगळ्या असतात. लहानपणापासून स्त्रीचे नाते सौंदर्याशी आणि पुरुषाचे कर्तृत्वाशी जोडले आहे. स्त्रीने सुंदरच दिसले पाहीजे. आता सुंदर दिसायचे म्हणजे कपड्यातला तो अन तोच पणा चालेल का? त्यात वैविध्य पाहिजेच. आणि आपले मनःस्वास्थ्य जोपासण्यासाठी नवर्‍याला आपल्या बायकोसाठी ही सर्व खरेदी केलीच पाहिजे. तोच त्या कपाटातल्या 'कधीतरी' वापरल्या जाणार्‍या साड्यांचा १००% उपयोग असतो. >>>>आपल्या घरातील ७० टक्के भांडी आणि क्रोकरी वर्षातून फार तर एकदा दोनदा वापरली जातात. पाहुणेराऊळे रोज रोज येत नाहीत कधीतरी येतात. तेंव्हा कानतुटक्या कपात चहा, टवका उडालेल्या बशीत कांदेपोहे आणि मस्तं सुप केलं तर ते काय स्टीलच्या वाटीत देणार? त्या साठी राखीव संच लागतोच. मित्रांसोबत रम-व्हिस्की-बिअर स्टीलच्या पेल्यात आणि चखणा जेवणाच्या ताटात कसा दिसेल? १५-२० जणांचा ग्रूप आला (समजा मिसळपावचा कट्टा मला घरीच करावयाचा आहे, नुसतं समजा हं!) तर भांडीकुंडी काय भाड्याने आणायची? कधी मिसळपावचा ग्रूप येईल, कधी माझे नातेवाईक येतात, कधी बायकोचे माहेरचे नातेवाईक येतात, कधी मुलाचे कॉलेजचे मित्र-मैत्रीणी येतात, कधी सोसायटीची मिटिंग असते, कधी नाटकाची तालीम असते तर कधी गाण्याची बैठक असते. माणसं जमतात, वस्तु लागतातच. >>>>फार काय आपली कार सुद्धा २५० किमी वेगाने जाऊ शकते पण आपण १०० किम चा वेग किती वेळा पार करता? म्हणजे त्याच्या इंजिनाची क्षमता ७० टक्के वेळा वापरली जात नाही.आपल्या भ्रमण ध्वनिमध्ये असलेल्या सुविधापैकी १०० टक्के सुविधा मी पैजेवर सांगतो कि मिपावरील एकही सदस्याने वापरलेल्या नाहीत. खरे साहेब आपल्या मूळ प्रतिसादात आपण म्हंटले होते की त्या लेखात असे म्हंटले आहे की आपल्याकडे असलेल्या गोष्टींपैकी ७० % गोष्टीचा आपण वापर करीत नाही. आता आपण म्हणताय की त्या वस्तु आपण १०० % क्षमतेने वापरत नाही. वस्तूंचा वापर न करणं आणि वस्तूंचा पूर्ण क्षमतेने वापर न करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी जर १०० किमी पेक्षा जास्त वेगाने गाडी पळवत नसेन तर मला १०० किमी हा उच्चतम वेग असलेली गाडी घेतली पाहीजे. ती मिळत नाही. मग जी उपलब्ध आहे तीच घेतली पाहीजे. म्हणजे तो माझा मूर्खपणा नसून ती माझी असहाय्यता आहे. बरं, आज मी १०० किमीच्या वेगाने गाडी चालवतो आहे म्हणजे उद्या १२० किंवा १३०च्या वेगाने पळविणारच नाही असेही नाही. गरज भासली तर? (कोणी आजारी आहे, कोणाला हॉस्पिटलला न्यायचे आहे) मग त्यावेळी काय करायचे? नविन गाडी घ्यायची? भ्रमणध्वनीतील सगळ्या सोयी वापरल्या जात नसतीलही कदाचीत, पण मला हव्या असलेल्या, वापरत असलेल्या सगळ्या सोयी त्यात असणं गरजेचं असतं. त्या बरोबर उत्पादक मला नको असलेल्या इतर कांही सोयी त्यात पुरवत असेल तर मी काय करायचं? माझ्या काटेकोर गरजे इतका भ्रमणध्वनी कुठून मिळवायचा? मी माझ्या भ्रमणध्वनीचा उपयोग कॉल्स करणे आणि रिसिव्ह करणे, ह्या बरोबर, छोटे मेसेजेस, व्हॉट्स अप, जीपीएस, रेडीओ, मिडिया प्लेअर, गुगल, मिसळपाव, याहू ईमेल, बॅटरी, घड्याळ, कॅलेंडर, लोकेशन, तापमान, हवामानखात्याचा अंदाज, अलार्म, रिमाईंडर्स, कॅमेरा, कॅलक्यूलेटर, फेसबुक, नोंदी, आवाज रेकॉर्डींग, व्हिडिओ प्लेअर, फोटो अल्बम, बार कोड स्कॅनर, डॉक्यूमेन्ट स्कॅनर, गाण्यांचा संग्रह, डिक्शनरी, रन किपर, कालनिर्णय कॅलेंडर, बँक व्यवहार, माझ्या ३ गाड्यांचे पोलीस फाईन, व्हिसा स्टेटस चेकअप्स, ड्रॉपबॉक्स ऑपरेशन्स, डाऊन लोड्स, नकाशे साठवणे वगैरे वगैरे अनंत कामांसाठी करतो. त्यामुळे ७०% वस्तूंचा वापर न करणं माझ्या तरी कल्पनेबाहेर आहे. वास्तवात ९०% वस्तूंचा वापर होतो. १० टक्के वस्तु खूप वेळा कुठून कुठून भेट म्हणून आलेल्या असतात. वापरताही येत नाहीत फेकताही येत नाहीत.

नेहमीप्रमाणे डोक्टर साहेबांचा प्रतिसाद अप्रतिम !
मुळात आपल्याला किती पैसा हवा आहे याचे कोणतेही मानक बहुसंख्य लोकांकडे नाही.
हाच मुख्य प्रश्न आहे . उसकी सारी मेरे सारी से सफेद क्यू? इथेच सगळी गोची आहे. जेव्हा चैनीच्या गोष्टी गरज होतात तेव्हा ७० % नवे तर ९० % सरप्लस होते . आप ल्या धर्माने मानांकन दिले आहे .. त्येन तक्थेन भुंजिता.. ( शुद्ध्लेखनाची चूक द्यावी घ्यावी ) पण हे कितीजणांना मानवेल ? ज्याचे हे माना़ंकन खाली , तो सर्वात अधिक सुखी !

जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत. मनुष्य म्हटल्यावर त्यातील बाकीचे गुण, त्याचे छंद, आवडी निवडी, काही निवांतपणे करायच्या गोष्टी, नातेवाईकांना वेळ देणे हे सर्व आले. पण त्याकडे बघतो कोण? पैसे भरपूर कमावणेपेक्षा कमावतानाचा भास निर्माण करणे हेही लोकांना साध्य होत चाललेय. चकाचक दिसले पाहिजे हेच असते. मग परदेशातून भारत्भेटीला गेलेल्या मनुष्याला "अरे काय रे हे? असे साधेच का राहता तुम्ही?, अरे, अमूक एका देशात राहता ना? हे काय? इकडे यायचे तर साध्या आयब्रोज नीट कुरतडून नाही का येता आले?, वजन का वाढले?/कमी झाले?" वगैरे प्रश्नांचे काय करावे कळत नाही. तुम्ही सतत बिझी दिसणे महत्वाचे! कश्यात? ते काय माहित नाही. वेळ नसण्यात/रजा नसण्यात अभिमान वाटतो. "आम्हाला वेळ आहे" असे म्हटलेले फार दिवसात ऐकले नाही. अनेक वर्षांपूर्वी भारतभेटीच्यावेळी माझ्या मामेनणंदेनं फोन करून "वहिनी तुमच्यासाठी वेळ आहे बरं का. नक्की या" असे म्हटले. तिने सांगितले की वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते असे म्हणाली. विनोदी वाटते पण असे झालेय.

वेळ आहे म्हटल्यावर तिचा व्यवसाय बरा चालत नाही वाटते अशा चर्चा व्हायच्या त्यामुळे लग्नाला, कार्यक्रमाला येणे जमले नाही असे मधून मधून म्हणावे लागते
... हे फारच खास.

डॉक्टरने २४ तास उपलब्ध असले पाहिजे,पोलिस सतत आपल्यासाठी हवा,इतर कुठल्याही सार्वजनिक सेवा कुठल्याही क्षणी हजरच हव्या मग स्वतःच्याच ऑफिसमध्ये जरा जास्त काम केल तर काय बिघडत्,जर स्वतःचाच धंदा असता तर.... आमच्या कडे म्हण आनो, दुसर्‍याकडची नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणी स्वतःचा धंदा म्हणजे २४ तासाची नोकरी. या सगळ्या व्यापातुन स्वतःसाठी नक्की वेळ काढता येतो.फक्त जरा भिकारचोट धंदे बंद केले की घरच्यांसाठी,स्वतःसाठी व ऑफिससाठीही योग्य तो वेळ नक्की देता येतो.

एक फरक आहे पाटील आणि तो असा की डॉक्टर २४ हजर असायला हवा पण तो कधी जर तो इस्पितळात असेल तर किंवा कामावर असेल तर. फोन न लागल्यास दूसरा कोणीतरी येतो. हापिसात काम करणार्‍या मजूरांचा मुख्य पिराब्लेम हा असतो की घरी गेल्यानंतरही आलेल्या मेल्स ला उत्तरे दिली जावीत ही अपेक्षा असते, फोन न उचलल्यास दुसर्‍या दिवशी १० गोष्टी ऐकायला लागु शकतात. आपले काम संपल्यानंतरही आपण उपल्ब्ध असावे अशी अपेक्षा असते. डॉ़टरांकडुन तशी अपेक्षा नसते. डॉक्टर सुट्टीवर गेल्यावर तो सुट्टीवरच असतो कारण फोनवर कोणी सर्जरी कशी करायची किंवा लिव्हर कुठे ठेवले आहे असले प्रश्न विचारत नाही. डॉक्टर सुट्टीवर असताना त्याने दुसर्‍या इस्पितळातल्या डॉक्टरशी किंवा फार्मा कंपनीच्या सायंटिस्टशी लिंपो सिडिक ल्युकेमिया वर गहन चर्चा करणे अपेक्षित नसते. मुख्य म्हणजे डॉक्टर स्वतःच्या मर्जीचा मालक असतो. तो काही आयटी कंपनीतल्या टीम लीडर सारखा किंवा बँकेतल्या फायनांस अ‍ॅनालिस्ट सारखा किंवा रिलेशनशिप मॅनेजर सारखा किंवा कंपनीतल्या फायनांस म्यानेजरसारखा समोरच्याला दिवसरात्र उपल्ब्ध असण्याची गरजही नसते आणि अपेक्षाही नसते आणि तो असा कुणाच्या मर्जीचा नौकरही नसतो. सार्वजनिक सेवांप्रमाणे कंपनीही २४ तास चालू ठेवण्यात कोणालाही प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम तेव्हा असतो जेव्हा १२ महिने २४ तास एकाच माणसाने ड्ञुटी करण्याची अपेक्षा केली जाते. बाकी डॉक्टरकी करता करता इतर हापिसात काम करणारे लोक भिकारचोट धंदेच करतात अशी कल्पना करायला खुपच छान वाटते पण तसे अजिबात नसते. आणि मुख्य म्हणजे धाग्याचा आशय पाहिल्यास तुमच्या लक्षात येइल की स्वतःचे काम संपल्यावरही जे कायमस्वरुपी अव्हेलेबल रहायला लागते त्यावर लोकांचा आक्षेप आहे. गरजेनुसार अधिक उणे काम करण्याला नाही.

शेतकरी २४ तास राबतोच ना. दगडफोड्या उन्हातानात दगड फोडतोच ना.कामाचे योग्य नियोजन करा,आजच काम उद्यावर टाकु नका,वेळच्या वेळी आपल्या कामात १००% द्या.बरोबर वेळ काढता येतो.

मला वाटते की हव्यास हे एक मुख्य कारण आहे या गोंधळामागे. अधिक चांगल्या आयुष्याची मनीषा बाळगणे गैर नाही पण त्या हव्यासापोटी अधिक मोलाचे काही आपण गमावतो आहोत का हे पाहणे गरजेचे आहे असे वाटते. शेवटी भौतिक सुखाला मर्यादा नाही. निरनिराळी भौतिक सुखे निर्माण करणे, ती किती उपयुक्त आहेत हे ग्राहकांच्या गळी उतरवणे, आणि त्या भौतिक सुखांचा संबंध माणसाच्या प्रतिष्ठेशी जोडणे या तत्वावर मार्केट चालते. आपण याला किती बळी पडायचं हे ठरवलं तर बर्‍याच गोष्टी सुकर होतील असे वाटते. माझ्याकडे क्रेडीट कार्ड नाही. मला कधी गरज वाटली नाही. हे माझ्यापुरते मी ठरवल्यानंतर बाकी सगळे मुद्दे गौण ठरतात. क्रेडीट कार्डाचे फायदे असतीलही पण मला त्या फायद्यांसाठी खर्चाचे अजून एक दार सताड उघडे ठेवण्यात रस नव्हता. म्हणून क्रेडीट कार्ड कधी वापरलेच नाही. हे चूक की बरोबर हे माहित नाही पण त्यामुळे माझ्या मनाला बर्‍याच त्रासदायक विचारांपासून मी वाचवू शकलो आहे. :-)

याचं कारण रत्नांग्रीत गेलेल बालपण .इथे सगळेच पंचेवाले पाहिलेले असल्याने. समाधानाची कला त्या भूमीत वास करून आहे.

‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’
सध्यातरी हे मला पटते ... गच्चम काम करा , एक्ष्पीरीयन्स वाढवा , पैसा कमवा ....पैसा उडवा... पार्ट्या करा ...सेव्हिंग्सही करा ! कित्येकदा रात्र रात्र काम करतो काम नसेल तेव्हा अभ्यास करुन स्किल सेट वाढवतो :) एकदा पोराला नोकरी लागली की बस्स .... मग तेव्हा करोडोंचे पॅकेज का असेना की एमडीसीईओ का असेना .... सगळं सोडुन देणार ... सगळी इस्टेट बायकापोरांच्या नावावर करणार ... एक पैसाही स्वतःच्या नावावर नको....मग आपण मोकळे !! जीवनमुक्त !! लोकाम्णाआ काय म्हणायचे ते म्हणु द्या ...सो चुहे खाके बिल्ली चली हज को..... करुन सवरुन भागला अन देव पुजेला लागला ...काहीही पण आपल्याला काय फरक पडतो तेव्हा .... आपण तर जीवनमुक्त :) चलो... बॅक टु वर्क ! वर्क इस वर्शिप !

ऑफिस हे मला कधी कधी नाटकाच्या रंगमंचाप्रमाणे वाटते.म्हणजे शो मस्ट गो ऑन...तुम्ही काम केले नाहीत किंवा टाळले तर दुसरा ते करायला उभाच असतो..फक्त टाळायची कला जमली पाहीजे. मात्र मग लोक आपल्याबद्दल पाठीमागे काय बोलतात, प्रमोशन,पगारवाढ वगैरेच्या फालतु चिंता करु नयेत. ठेविले अनंते तैसेची रहावे.. पण मी म्हणतो की ऑफिसमध्ये माणुस साधारण ११-१२ तास घालवतोच (येण्याजाण्याचा वेळ धरुन) शिवाय त्या त्या प्रोजेक्ट्च्या शिफ्ट पाळाव्याच लागतात म्हणजे ऑस्ट्रेलियन क्लायंट असेल तर पहाटे ५ ते दुपारी २, युके असेल तर १२ ते ९,युएस किंवा कॅनडा असेल तर रात्री ९ ते सकाळी ६...मग एवढा वेळ नुसते बसुन माश्या मारण्यापेक्षा अंग मोडुन काम केलेले काय वाईट? आणि एखादा शनिवार/रविवार टेलिफोनिक मीटिंग वगैरे असतील आणि त्यातुन तुमची ईमेज कंपनीत चांगली राहात असेल (आणि उरलेला दिवस फॅमिलीला किंवा तुमच्या छंदाला देता येत असेल) तरी हरकत नसावी.

आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. लोक साडेदहा अकरा शिवाय ऑफिस ला येत नाहीत. दिवसात ३ वेळा तरी कँटीन ला जातात. बाकी नेट वर टाइमपास आहेच ( मी आत्ता करतोय तसा ). Right first Time चा अभाव. केलेल्या कामात भरपुर चुका असल्यामुळे त्या दुरुस्त करण्यातच जास्त वेळ जातो. जर वेळेत येउन आपले काम नीट केले तर ८ तासाचे काम खुप होउ शकते.

अतिशय आकसपुर्ण आणि अज्ञानमुलक प्रतिसाद. बाहेरच्यांना आयटी म्हणजे एसीची गार हवा आणि अमेरिका वार्‍या एव्हढंच माहिती असतं. ज्याची जळते त्यालाच कळते. :)

अहो मी १४ वर्ष आय्टी मधे आहे. पण तुमच्या सारखा आयटी मधेच जन्म झालेला नाही. आधी ९ वर्ष आयटीच्या बाहेरचे जग बघितले आहे. आयटी सारखा Money/Efforts आणि Money/Stress रेशो कुठेच नाही. आयटी सोडुन बाहेर ३-४ वर्ष काढा अगदी सरकारी नोकरीत काढलीत तरी चालेल. मग वास्तव लक्षात येइल.

आयटी विरुद्ध आयटेतर हा तुमचा सूर वारंवार ऐकायला मिळतो. एकदा आपल्या अनुभवांवर विस्तृत लेख लिहून बालके दिनूंस उपकृत करावे ही नम्र विनंती.

मी आयटी मधे Stress नाही किंवा खुप काम करावे लागत नाही असे म्हणत नाही. फक्त मी वर म्हणल्या प्रमाणे Money/Efforts आणि Money/Stress ह्या दोन गोष्टी आजुबाजुला पडताळुन पहा. मग वाईट वाटणार नाही.

प्रसादकाका, तुम्ही आयटेतर क्षेत्रात नऊ वर्शे अधिक आयटीत १४ वर्षे अशी २३ वर्शे काम केलंय. त्यामुळे तुम्ही मुकादमाच्याही खुप खुप वर असाल हो. आम्ही जे आयटीचे वर्णन करतो ते आयटी हमालाच्या दु:खाचं वर्णन असतं. तुमच्या हाताखालची लोकं ते तुमच्यापर्यंत पोहचूही देत नसतील. तुमच्यापर्यंत हेच पोहचत असेल, "काही नाही **ना नुसता पैसा हवा आहे. कामं करायला नकोत". त्यामुळे तुम्हाला सगळे आलबेल वाटते.

प्रसाद काकांशी 100% सहमत आहे. मुकादम असो किंवा हमाल, आयटी वाले उगाच आपले कष्ट ग्लोरीफाय करत असतात. मी दहा वर्षांचे निरिक्षण सांगतो आहे. ता.क. :- मी म्यानेजर नाही. डेव्हेलपर आहे. आता बोल :-)

मी तर ऐकलं होतं ऐटीत चार वर्षात लीड अन सात-आठ वर्षात म्यानेजर वगैरे बनायला बघतं पब्लिक? बाकी ते ग्लोरीफिकेशन वगैरे बाबतीत अंशतः सहमत. काही ठराविक कंपन्यांमधे बरंच पब्लिक चकाट्या पिटत असतं मात्र सगळ्याच कंपन्यांमधे हे खरं नाही. माझ्या काही मित्रांचे गेल्या दोन-चार वर्षातले अनुभव वाईट आहेत. बहुदा प्रमाणाबाहेर अ‍ॅग्रेसिव एस्टीमेट देऊन बसतात आणि मग दिवस-रात्र राबतात. खरी चुक कुणाची माहिती नाही. पण घरी फक्त ५-६ तासासाठी येणं आणि बाकी वेळ कंपनी, मग त्याचे कौटूंबिक जीवनावरचे परीणाम पाहिल्यामुळे माझे तरी असे मत बनले आहे.

ज्यांना कोडिंग येत नाही/आवडत नाही ते लवकरात लवकर या रोल च्या बाहेर जाऊ पहातात. मी बाय चोईस या रोल मध्ये आहे. त्या साठी काही गोष्टींवर पाणी सोडले आहे. दूसरा मुद्दा अग्रेसिव्ह एस्टीमेटचा. का देतात/घेतात अशी एस्टीमेटस लोकं ? 1) योग्य एस्टीमेटस देण्याचे स्किल नसणे 2) एस्टीमेटस अयोग्य आहेत हे सांगण्याची, पटवून देण्याची कुवत/धमक नसणे 80% वेळा हिच कारणे असतात. दोष कुणाचा ?

थांबल्याने जशी कुंपनी वर येत न्हाई तशीच वेळेवर घरी गेल्याने खड्ड्यात जात नाही. खड्ड्यात घालायला वेगळी मानस अस्तात आणि ते आपल काम (मिटींगामधून) ईमान्दारीनं करीत असतात त्यामुळे.बिंधास्त.. नेमस्त (ना.खु.) वक्तपे आना वक्तपे जाना फिर क्युं रोना

Mail sent by Narayan Murthy to all Infosys staff: It's half past 8 in the office but the lights are still on... PCs still running, coffee machines still buzzing.... And who's at work? Most of them ??? Take a closer look... All or most specimens are ?? Something male species of the human race... Look closer... again all or most of them are bachelors... And why are they sitting late? Working hard? No way!!! Any guesses??? Let's ask one of them... Here's what he says... "What's there 2 do after going home...Here we get to surf, AC, phone, food, coffee that is why I am working late...Importantly no bossssssss!!!!!!!!!!!" This is the scene in most research centers and software companies and other off-shore offices. Bachelors "Time-passing" during late hours in the office just bcoz they say they've nothing else to do... Now what r the consequences... "Working" (for the record only) late hours soon becomes part of the institute or company culture. With bosses more than eager to provide support to those "working" late in the form of taxi vouchers, food vouchers and of course good feedback, (oh, he's a hard worker... goes home only to change..!!). They aren't helping things too... To hell with bosses who don't understand the difference between "sitting" late and "working" late!!! Very soon, the boss start expecting all employees to put in extra working hours. So, My dear Bachelors let me tell you, life changes when u get married and start having a family... office is no longer a priority, family is... and That's when the problem starts... b'coz u start having commitments at home too. For your boss, the earlier "hardworking" guy suddenly seems to become a "early leaver" even if u leave an hour after regular time... after doing the same amount of work. People leaving on time after doing their tasks for the day are labelled as work-shirkers... Girls who thankfully always (its changing nowadays... though) leave on time are labelled as "not up to it". All the while, the bachelors pat their own backs and carry on "working" not realizing that they r spoiling the work culture at their own place and never realize that they would have to regret at one point of time. So what's the moral of the story?? * Very clear, LEAVE ON TIME!!! * Never put in extra time " unless really needed " * Don't stay back unnecessarily and spoil your company work culture which will in turn cause inconvenience to you and your colleagues. There are hundred other things to do in the evening.. Learn music... Learn a foreign language... Try a sport... TT, cricket......... Importantly,get a girl friend or boy friend, take him/her around town... * And for heaven's sake, net cafe rates have dropped to an all-time low (plus, no fire-walls) and try cooking for a change. Take a tip from the Smirnoff ad: *"Life's calling, where are you??"* Please pass on this message to all those colleagues and please do it before leaving time, don't stay back till midnight to forward this!!! IT'S A TYPICAL INDIAN MENTALITY THAT WORKING FOR LONG HOURS MEANS VERY HARD WORKING & 100% COMMITMENT ETC. PEOPLE WHO REGULARLY SIT LATE IN THE OFFICE DON'T KNOW TO MANAGE THEIR TIME. SIMPLE ! Regards, NARAYAN MURTHY. attribution http://www.citehr.com/181796-email-mr-narayan-murthy-worth-reading.html#ixzz36794TVK9

एक तर पहिल्यापासुनच आपला प्राधान्य क्रम ठरलेला हवा. आणि तो आपल्या बॉसला पण माहिती हवा. माझे प्राधान्य नेहमीच माझ्या मुलाला असल्याने मी जास्त काम अंगावर घेत नाही, ८ तासाच्या वर १ मिनिट थांबत नाही, माझ्या सोयीसाठी मी टिम पासुन दुर एका वेगळ्याच लोकेशन वरुन काम करते, त्याचे अनेक तोटे आहेत, पण मी ते मान्य केले आहेत. मी उगाच A / 1 रेटिंगची अपेक्षा करत नाही. बाकीचे टिममेट्स बॅचलर आहेत, १०-१० पर्यंत बसुन कामं करतात, इतर सांस्क्रुतिक वगैरे कार्य्क्रमात सुद्धा आघाडीवर असतात. मी फारतर एखाद्या कामात सहभाग घेते, तो ही मर्यादित.. पण मग अशा मुलांना अर्थातच जास्त चांगले रेटिंग्स मिळतात, मी अजिबात दु:ख मानत नाही.. किंवा स्वतःही त्या शर्यतीत सहभागी होत नाही. पण अर्थातच, जे मला अगदी छान जमतं आणि ज्यात उशीरा पर्यंत थांबण्याची गरज नाही अशा गोष्टी खुप करते.. जसं की काम वेळेत करते, कस्ट्मर सोबत अगदी गोड गोड बोलुन, वक्तशीर राहुन त्यात नेहमी हायेस्ट पाँईंट मिळवते, टीम मध्ये काही मॅनेजरीयल काम असतील जसं की टिम बिल्डिंग वगैरे.. ती स्वतःहुन करते.. टिम प्लेयर म्हणुन लांब बसुनही मेल्स मधुन लोकांशी सतत संपर्क ठेवते.. (टिप्स वगैरे शेअर करुन..) individual contributor म्हणुन मुख्यतः काम करते.. अशा development मध्ये जास्त असते जिथे बाकी लोकांशी कमी कामं असतात.. आपण आपल्या पद्धतीनी काम करुन सुद्धा उत्तम रिझल्ट्स देऊ शकतोच.. मी कधीही ८ तासावर न थांबता, वेगळ्याच लोकेशनला बसुनही, अबीरमुळे अनेक अटी मॅनेजरलाच घालुन काम करत असुनही सगळ्यांच्या छान संपर्कात असते आणि अगदी बेस्ट रेटिंग्स नसले तरी किमान चांगले रेटिंग्स मिळवते.. तेच माझं टारगेट आहे.. पुष्कळ झालं.. कारण १ रेटिंग मिळवायला सगळ्यातच चमकावं लागतं जे मला शक्य नाही.. पुढे जाउन "पार्ट टाईम" (५०% पेक्षा जास्त कितीही वेळ आणि कोणतेही वार तुम्ही काम करु शकता) किंवा "फिक्सड टाईम" मध्ये जाता येईल, अशी आम्च्या कंपनीत सोय आहे.. अशा सोयीचा वापर अगदी मोठ्या पदांवरचे लोक करताना मी पाहिलं आहे.. लोकांमध्ये स्विच मारण्याची सुद्धा क्रेझ असते.. त्यात पैसा जास्त मिळतो हे मान्य.. पण सध्या जिथे मी काम करते तिथे माझे सगळे प्रॉब्लेम्स (आणि नखरे) सांभाळुन घेतात. मुख्य म्हणजे कंपनीमधील वातावरण आणि मॅनेजर उत्तम आहे. स्विच करुन मी जास्त पैसे मिळवेन पण मी त्या नादात स्वतःला अजुन ताणात ढकलेन.. ज्याची गरज नाही.. खाऊन पिऊन खुष असु तर कशाला नसती यातायात करायची?

पिरा ताई, बर्याच वेळेस स्त्रियांचे उत्पन्न हे दुसरे उत्पन्न(second income) असते. त्यामुळे ते थोडेसे कमी असले (किंवा झाले) तर कुटुंबाला तेवढा फरक पडत नाही. आणि मुलांकडे लक्ष देणे हि तितकीच आवश्यक गोष्ट असल्याने बर्याच वेळेस स्त्रिया या वेळेबद्दल जास्त काटेकोर असल्याचे दिसते.(यात माझी बायको हि येते) बर्याच वेळेस बँक किंवा विमा क्षेत्रात स्त्रिया बदली नको म्हणून बढती नाकारताना दिसतात. हि जरी तडजोड असली किंवा दोन तारांवरची कसरत असली तरी स्त्रिया पुरुषांपेक्षा वेळेबाबत जास्त दक्ष असल्याचे दिसते. शिवाय वेळी अवेळी प्रवास करणे हे काही शहरांमध्ये तेवढे सुरक्षित नसल्यामुळे कंपन्यासुद्धा स्त्रियांबाबत तेवढी सुत देताना आढळतात

हे मला मान्य आहे.. कंपनीपण स्त्रीयांना बराच सपोर्ट करते आणि एकंदरीत जे टेन्शन माझा नवरा घेतो, तेवढं मी घेत नाही.. पण मुळात पुरुष घरातल्या जबाबदार्ञा घेत नाहीत किंवा "माझा मुलगा आजारी आहे, काहिही झालं तरी मी रजा घेणारच" असा स्टॅण्ड पण घेताना दिसत नाहीत. बर्‍याचदा ही जबाबदारी स्त्रीवर येते.. म्हणुन ह्याच पारंपारिक विचारांच प्रतिक ही स्त्रियांना कंपनी मध्येही सवलती असणे हे आहे.. बाकी उशीराचं काम असुरक्षित असल्याने तसंही थांबणे शक्य नसते ह्याच्याशी सहमत.. अर्थात हे ही तेवढंच खरय की स्त्रियांचं उत्पन्न नाही मिळालं तरी चालेल अशी परिस्थिती नसते. तो पगारही पुरुषां एवढाच महत्वाचा असतो. त्यामुळे पर्फॉर्मन्स प्रेशर आजकाल स्त्रियांमध्येही वाढत चालले आहे.

फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर घरीही सगळ्या परिस्थितीशी जास्त जुळवून घ्यायचे प्रेशर असते. लहान मुलांची काळजी घ्यावीच लागते, नवर्‍याचे नातेवाईक, घरातले इतर लोक यांच्या जास्तीच्या मागण्या असतात. स्त्रियांना तर घरातही भरपूर ताण असतो.

अमिताभ बच्चन बॉलीवुडचा बेताज बादशहा होता, पण अभिषेक बच्चनकडे ती कुवत नाही. पण म्हणुन अमिताभनेही त्याला उगाच प्रमोट केले नाही,त्याला त्याच्या जीवावर काय

>>अमिताभ बच्चन बॉलीवुडचा बेताज बादशहा होता, पण अभिषेक बच्चनकडे ती कुवत नाही. पण म्हणुन अमिताभनेही त्याला उगाच प्रमोट केले नाही,त्याला त्याच्या जीवावर काय>> करायचे ते करु दिले...उगाच माझा मुलगा आहे म्हणुन घ्या चालवुन असे नाही केले...ईथेतर पूर्ण कंपनी गोत्यात आलेय ********************************************************** हा प्रतिसाद आयुर्हीत यांना आहे

ह्म्म... माझा आयटी आणि नॉन आयटी क्षेत्रातला आजवरचा अनुभव घेतला असता, काकाश्रींच्या खालील विधानास सहमती दर्शवतो. मी अतिमेहनत करून वारेमाप पैसा कमवावा अशा मताचा नाही. पण मेहनतीचा शाप अनेकांना परिस्थितीचा रेट्यात न मागता मिळत असतो. हे अगदी खरे आहे, टाईमपास करणारे, कामचोरपणा करणारे आणि राजकारण करणारे व्यक्ती जास्त काम न-करता वरच्या पदांवर जाताना पाहिले आहेत. माझ्या माहितीनुसार तरी आयटीवाल्यांसाठी निदान भारतात तरी युनियन नाही, त्यामुळे पिंक स्प्लीपची भिती अनेकांच्या मनात असते...२००७ ते २०१० हा काळ आयटीवाल्यांसाठी हालाकीचा होता, माझ्या टिम मधल्या एकाला एका झटक्यात कामा वरुन कमी करुन टाकले होते.त्याच्या बरोबर गप्पा मारत फ्लोअर वरुन खाली आलो आणि घरी गेलो, दुसर्‍या दिवशी ऑफिसात आलो तेव्हा कळाले की त्याला नारळ दिला ! काही काळ विश्वासच बसला नव्हता... सर्वात महत्वाचे म्हणजे प्रचंड वाढलेली लोकसंख्या आणि बोकाळलेला भ्रष्टाचार हे देखील या सर्वां मधे असणारे मुख्य कारण आहे.आपल्या देशात माणसांना किंमत आहे ? एक गेला सोडुन तर हजोर आहेत बाहेर नोकरीसाठी तयार. माझ्या पहिल्या प्रोजेक्टसाठी मी घेतलेला अनुभव अतिशय रोचक ठरला, कंपनीसाठी नॉलेट ट्रान्सफर करुन आणलेल्या या प्रोजेकट मधे मी धरुन ३ जण होतो,ग्लोबल सपोर्ट असल्याने ऑड शिफ्ट मधे काम करावे लागे, शिफ्टच्या वेळा होत्या ३:३० ते १२ :३०, १२:३० ते ८:३०, ८:३० ते ३:३० दर ५ दिवसांनी शिफ्ट बदले त्यामुळे प्रकॄतीची वाट लागली.एका शिफ्ट मधे १ माणुस असा २४*७ चा सपोर्ट होता, २ दिवस सुट्टी ती सुद्धा आपपासात अ‍ॅडजेस्ट करुन घ्यायची.आमच्यातल्या एकाचे लग्न ठरले आणि त्याला लग्नासाठी सुट्टी हवी म्हणुन मी आणि माझ्या सहकार्‍यांनी रोज १२ तास अशी ड्युटी केली,कारण कंपीनीने कोणताही शॅडो रिसोर्स दिला नाही.टेलिफोनिक सपोर्ट सुद्धा होता, ज्यात कुठल्याही वेळ-काळाचे बंधन नव्हते, मला अजुन आठवते...माझ्या मावस बहिणीच्या मुलाच्या मुंजीत सुद्धा मोबाइलवर ऑस्ट्रेलियात असलेल्या एका प्रिंट सर्व्हरचे एस्कलेशन आणि त्या बद्धलच्या प्रोसेस बद्धल जाब-जबाब देत बसलो होतो... पर्सनल लाईफ तर शुन्य ! एक वेळ अशी आली होती तो मोबाईल कुठेतरी गाडुन टाकावा असे वाटायचे. नंतर मग ४ था माणुस आमच्या टिम मधे देण्यात आला...ज्याला वरती नंतर कंपनीने काढुन टाकले आहे असे नमुद केले आहे तो... या नंतर मग वेगळा प्रकार सुरु झाला माझे आधीचे २ सहकर्‍यांनी टायअप केला म्हणजे काय ? तर ज्या दिवशी एका शिफ्ट मधे २ माणसे असतील त्या दिवशी एकाने यायचे नाही,स्वाईप कार्ड आदल्याच दिवशी ड्रॉव्हर मधे ठेवु न द्यायचे म्हणुजे शिफ्ट मधल्या दुसर्‍या माणसाला यांचा अटेंडन्स लावता यावा.माझे तत्व असे की कंपनी मला काम करण्याचे पैसे देते आणि त्यात मी कुठलाही काम चुकारपणा करणार नाही, मी शिफ्ट मधे २ माणसे असली तरी त्या शिफ्टला येणारच ! त्या दोघांचे सुट्ट्या घेणे सुरु राहिले आणि माझे काम करणे... आता कंपनीची कथा... ऑफिसमधला फोन एकदम नल्ला कॉलेटी, घरचा फोन सुद्धा बरा म्हणावा... ट्रबलशुटिंगसाठी आधी प्रोब्लेम नक्की काय ते समजले पाहिजे, आणि तो समजण्यासाठी फोनवर समोरचा काय बोलतोय ते नीट ऐकु आले पाहिजे ! पण डब्बा ! मग काय करणार ? कंपनीला सांगितले तर चांगला फोन देण्या ऐवजी कन्मुनिकेशक स्कील चे ट्रेनिंग दिले ! शेवटी क्लायंटनेच वैतागुन आयपी फोन बसवुन दिला. सतत ताण,विचित्र वेळेची शिफ्ट याचा परिणाम प्रकॄतीवर होत गेला... शेवटी प्रोजेक्ट मधुन बाहेरपडण्यासाठी धडपड सुरु केली...मॅनेजरने गाजर दाखवले. अरे क्लायंट साईडने शेअर पॉइंट ट्रेनिंग दिले जात आहे... जा १ आठवडा परत डेन्मारकला.मी नकार दिला ! परिणाम या काळात माझ्या आधीच्या २न्ही सहकार्‍यांची बढती आणि मला ठेंगा. साडेतीन वर्षाच्या मेहनीचे फळ म्हणजे बेस्ट टिम पर्फॉमन्सचा ट्रॉफी नावाचा लाकडी ठोकळा आणि तुम्ही ऑड शिफ्ट असुन सुद्धा उत्तम करता याचे कागदी प्रशस्ती पत्रक... असो... इथेच थांबतो. लिहणार्‍या सारखे बरेच काही आहे...पण लेखा पेक्षा प्रतिसाद मोठा व्हायचा ! या बद्धल नंतर कधी तरी... मी घेतलेला धडा :--- कितीही मेहनत घेउन तुम्ही प्रोजेकट आणला असेल आणि क्लायंटशी तुमचे कितीही घट्ट संबंध असतील तरी प्रोजेक्टवर प्रेम करु नका... वेळीच प्रोजेक्टच्या बाहेर पडा. आजची स्वाक्षरी :-'फोर जी' तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक

३:३० ते १२ :३०, १२:३० ते ८:३०, ८:३० ते ३:३० दर ५ दिवसांनी शिफ्ट बदले त्यामुळे प्रकॄतीची वाट लागली >>>>>>>> तुम्हाला कधी पोलिस, रेल्वेचे , ST चे नोकर ह्यांच्या बद्दल कणव वाटली का हो? त्यांना पण रात्री अपरात्रीच्या शिफ्ट असतात. गपचुप करतात बिचारे.

तुम्हाला कधी पोलिस, रेल्वेचे , ST चे नोकर ह्यांच्या बद्दल कणव वाटली का हो? त्यांना पण रात्री अपरात्रीच्या शिफ्ट असतात. गपचुप करतात बिचारे. हो का ? हे माहितीच नव्हतो बॉ आपल्याला ! आता माझ्या प्रतिसादात इतका रस दाखवलाच आहे तर एक काम करा... प्रदिर्घ काळ सातत्याने ऑड शिफ्ट केल्याचे शरीरावर काय परिणाम होतात ते जरा गुगलबाबाला विचारा... बघा काय उत्तर मिळते ते. आजची स्वाक्षरी :- 'फोर जी' तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक

अहो जरा बाहेर नजर टाकलीत तर तुमचे प्रोब्लेम फारच साधे आहेत हे लक्षात येइल हे सांगण्यासाठी मी ते लिहिले होते. माझे काही म्हणणे नाही तुम्ही बसा तुमचे छॉटेसे खरचटणे गोंजारत. जितके गोंजाराल तितके जास्त दुख तुम्हालाच होइल.

अहो जरा बाहेर नजर टाकलीत तर तुमचे प्रोब्लेम फारच साधे आहेत हे लक्षात येइल हे सांगण्यासाठी मी ते लिहिले होते. माझे काही म्हणणे नाही तुम्ही बसा तुमचे छॉटेसे खरचटणे गोंजारत. जितके गोंजाराल तितके जास्त दुख तुम्हालाच होइल. हॅहॅहॅ... अनुभव लिहणे म्हणजे गोंजारणे ?असो... एक जरासा चावट विनोद लिहतो. कळला तर बघा ! एकदा विमान, हॅलिकॉप्टर आणि रॉकट गप्पा मारत बसलेले असतात... हॅलिकॉप्टर म्हणत... अरे माझा पंखा इतक्या जोरात फिरत असतो ना की माझे डोके फार गरगरते.डोकेदुखी तर ५वीला पुजली आहे. विमान म्हणत... अरे हे तर काहीच नाही ! मला तर हे लोक धाव धाव धावडवतात... आकाशात उडण्यासाठी धावा-धाव आणि आकाशातुन खाली उतरताना सुद्धा धावा धाव... जरा पाय चेपुन देशील काय ? ;) रॉकेट गप्प असते... ते काहीच बोलत नाही. विमान आणि हॅलिकॉप्टर रॉकेटला विचारतात... अरे बोल ना ! सांग तुझी व्यथा... रॉकेट म्हणाला... काय सांगु बाबा... ज्याची खालुन जळते त्यालाच कळते ! आजची स्वाक्षरी :- 'फोर जी' तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक