Welcome to misalpav.com
लेखक: पुस्तकमित्र | प्रसिद्ध:
एखाद्या पुस्तकाबद्दल छान छान परिक्षणं लिहून येतात, चर्चा घडलेल्याही आपण ऐकतो, कुणीतरी खूप कौतुक करतं, 'एकदा तरी हे पुस्तक वाचाच', असा आग्रह करतं, आणि आपण मोठ्या उत्सुकतेनी पुस्तक वाचायला घेतो तो काय? काही मोजक्या पानातच भलामोठ्ठा अपेक्षाभंग पदरी पडतो! हा असा अनुभव अगदी प्रत्येक वाचनवेड्याला आलेला असतो. ही अशी निराशा येण्याचं कारण काहीही असू शकतं, आपल्या पुस्तकाकडून निर्माण झालेल्या अपेक्षा किंवा मूळ कथेपासून/सत्य परिस्थितीपासून फारकत किंवा असंच इतर काहीही..... पण हे अनुभवही नक्कीच एकमेकांना सांगण्यासारखे असतात. इथेही पुस्तकवेड्यांनी आपले असे गमतीदार अपेक्षाभंग लिहावेत ही विनंती.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नेमाड्यांचे 'हिंदू' अतिशय आवडले आणि अलिकडे दुसर्‍यांदा पुन्हा वाचले. (सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो).

सुरुवातीची पन्नास-साठ पाने जरा कंटाळवाणी वाटतात, पण त्याचा संदर्भ नंतर लागतो
+१ - (अडगळ आवडणारा) सोकाजी

गौरी देशपांडेचं विंचुर्णीचे धडे वाचलं. ते प्रचंड आवडलं. नंतर एकेक पान गळावया वाचलं. तेही आवडलं. म्हणून गौरी देशपांडेची इन्फिबीमवर जेवढी पुस्तकं होती ती सगळी घेतली. त्यातलं पहिलंच वाचलं ते उत्खनन. अरारारारा! हिंदी सिनेमात शोभून दिसतील असे योगायोग, सगळी माणसं अजीर्ण व्हावं इतकी गोड. मुलीची जबाबदारी टाकून पळालेला प्रियकरही चांगला असणे, त्याने मरण्यापूर्वी ऑपरेशनसाठी नायिकेकडेच परत येणे, नायिकेची मुलगी आणि नवरा यांनी त्याचे ऑपरेशन आणि नंतर शुश्रूषा करणे इ. इ. वाचून डॉकं ऑऊट झालं. शिकलेला धडा, निव्वळ लेखकाच्या नावावरून पुस्तके विकत घेऊ नका. लायब्ररीतून आणलं असेल तर निदान २ दिवसांत परत करता येतं. पण न आवडलेली आणि विकत घेतलेली पुस्तके घरात बरीच जागा अडवून बसतात आणि त्यावरची धूळ पण साफ करत रहावी लागते.

१००% पटलं. एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक लोकांना आवडतं. बरे पैसे मिळतात. मग दुसरं पुस्तक आणखी सफाईदार येतं. तेही खपतं. त्यानंतर लेखकाच्या प्रतिभेपेक्षा बहुधा प्रकाशकाची धंद्याची गणितं लेखकाला लिहिण्यासाठी ढकलायला लागतात!

युगंधर आणि छावा. बाकी विश्वास पाटलांच्या जनरलच ऐतिहासिक कादंबर्‍या आत्यंतिक शब्दबंबाळ वाटतात. तर झाडाझडती सारखी कादंबरी बेक्कार डिप्रेस करते. :( चेत्याचं 'टु स्टेट्स' आणि अमिशची 'शिवा-ट्रायोलॉजी' मधली पहिलं दुसरं नि तिसरं चढत्या क्रमानं नावडतात! आता वपु काळे काका नावडते झाल्यानं त्यांची बरीचशी पुस्तकं.

चांगलं लिहीतात नि त्यामुळंच भिडतं रे! उगाच्च डिप्रेस नाही वाटत कुणाच्याही लेखनामुळं. पानिपत पूर्ण केली होती एवढंच आठवतंय. फार डिटेल्स आहेत. प्रचंड अभ्यास आहे हे जाणवतं मात्र.

तरीही पानिपत समजावून घ्यायचं असेल तर शेजवलकरांच्या ''पानिपत १७६१' या पुस्तकापेक्षा इतर चांगले पुस्तक पाहण्यात नाही.

सहमत, मात्र अशा कादंबर्‍यांचे एक महत्त्व असते हे नाकारून चालणार नाही. लहानपणी इतिहास इ. ची गोडी लावण्यात राजा शिवछत्रपती, मृत्युंजय, पानिपत, छावा, स्वामी, पावनखिंड, कादंबरीमय शिवकाल, इ. कादंबर्‍यांचे स्थान अनन्यसाधारण आहे. एकदा गोडी लागली अन त्या विषयाचं वाचन जरा औरसचौरस झालं, की मग माणूस तिकडे तटस्थपणे बघू शकतो. पण सुरुवातीलाच शेजवलकर, राजवाडे, इ.इ. वाचले तर इंट्रेस पैदा होणेच शक्य नाही. त्यामुळे नंतर या कादंबर्‍या कितीही हास्यास्पद वाटल्या तरी इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण करण्यात त्यांचा फाआआआर मोठा वाटा असतो. कारण भूतकाळ सर्वतोपरी जिवंत करायचा प्रयत्न त्या कादंबर्‍याच करतात. त्यामुळे पोरवयाइतके नंतर भारावून जायला होत नसले तरी त्या प्रतिमा, ती शब्दसृष्टी कायम मनात राहते. मला आठवतंय, दीडेक वर्षापूर्वी पानपतास गेलो होतो तेव्हा जागोजागी मनात पानिपत कादंबरीतलेच तपशील येत होतो. सुवाखेडी, उगराखेडी, पटपरगंज, इ. नावे ऐकून जो ज्याम नॉस्टॅल्जिक झालो त्याला तोड नाही. दिल्लीच्या जवळच रस्त्यावरून बुराडी गावचा बोर्ड दिसला तेव्हाही तीच अवस्था झाली होती. प्रत्यक्ष पानिपत शहरापासून ५ किमी दूरवर ते लढाईचं मोठं स्मारक उभारलंय तिथे काला आमच्या स्मरणार्थ आंब्याचे दुसरे झाडही लावलेय. ते सर्व बघत असताना जे काही वाटतं त्या भावना जागवण्याचे महत्कार्य या कादंबर्‍यांनी केले असे मी मानतो. शेवटी कारणमीमांसा एकीकडं आणि फ्यांटसी दुसरीकडं हे आवश्यक आहेच, पण हरितात्यांचं काम करणार्‍या या कादंबर्‍यांना खरेच पर्याय नाही.

वपु आणि पुलंचा वाचकवर्ग एक ठरावीक उत्पन्नगटातला आणि ठरावीक सामाजिक पार्श्र्वभूमीचाही आहे .इतरांना त्यांचे लेखन डोक्यावरून जाते अथवा निरर्थक वाटते .ग्रामीण बाजाचे कथानकही शहरी लोकांना वाचवत नाही .गाजलेले लेखक सतत झुलवत ठेवतीलच असे नाही ,गाजलेले खेळाडू वल्ड कपात गोल करतीलच असे नाही .निराशही करतात .

वपु, दवणे रटाळशी सहमत, पण पुलंचे लिखाण मात्र बाळबोध नक्कीच नाही. कधीही कोणतेही पुस्तक घ्यावे आणि कोणत्याही पानावरुन पुढे वाचावे. सहजगत्या जमून आलेला असा पुलंचा विनोद आहे. पुलंनी फक्त विनोदी लिखाण केलेले नाही तर त्यांचे ललित लिखाणही तितकेच समृद्ध आहे. त्यातल्यात्यात कान्होजी आंग्रे हा अनुवाद तितकासा जमलेला नाही, असं वाटलं होतं पुस्तक वाचून, पण मूळ पुस्तक मी वाचलेलं नाही, तेव्हा त्याबाबत मतप्रदर्शन करणे बरोबर नाही. त्यांची नंदा, अंतू बर्वा, हरीतात्या, बटाट्याच्या चाळीतल्या एकेक वल्ली, रावसाहेब इत्यादि व्यक्तीचित्रणे कोण विसरेल? वंगचित्रे हे असेच एक सुरेखसे पुस्तक.

बरीचशी वाचलीयत. पण आवडली कधीच नाहीत. विनोदी लेखन दमा, शंकर पाटील यांचे जास्त चांगले नव्हे उत्कृष्ट वाटते. कान्होजी आंग्रे चा अनुवाद आवडला होता. बाकी व्यक्तीचित्रणं वाचण्यातच मला फारसा रस नाही. त्यामुळे ते लेखन भिडतही नाही.

वल्लीकाका कान्होजी आम्ग्रे चा अनुवाद पुलंनी उत्तमच केलेला आहे. उत्तम अनुवाद म्हणून पुलंच्या " एका कोळीयाने" या पुस्तकाचा उल्लेख होतो. पण त्या पेक्षाही सर्वोत्तम अनुवाद म्हणून" काय वट्टेल ते होईल" या पुस्तकाला नावाजायला हवे. पुलंची खोगीरभरती , गोळाबेरीज ही पुस्तके वाचा.

विजुभाऊ सहमत आहे. एका कोळीयाने आधी खूप छान वाटले होते म्हणून द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड सी मुळात वाचून पाहिले. मग कळाले की अनुवाद चांगला असला तरी तितका ताकदीने मराठीत नाही उतरला. पण माळगांवकरांच्या कान्होजी आंग्रे चा मराठी अनुवाद खरोखर सुंदर केलेला आहे पुलंनी. दुसरे पुस्तक 'काय वाट्टेल ते होईल' हे मात्र मी वाचलेले नाहिये ते आता जरुर वाचेन.

मला तरी पुलंचं कोणतही लिखाण आवडलं नाही असं झालेलं नाही.. पण दमा मिराजदार / व.पु / शंकर पाटील ह्यांचे लेखन मात्र फार क्वचित आवडलय... (वपुंच लिखाण समजा ठिक आहे.. पण कथाकथन एकसुरी वाटलं फार... एकाच टोन मध्ये.. पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र..) हे माझं वैयक्तिक मत आहे..

म्हणजे अगदी सुस्पष्ट..व्यवस्थित मराठी..ठाशीव बोलणं..सगळ्यांचा एकच टोन.. ह्या पेक्षा जास्त मी नाही सांगु शकत की नक्की मला काय म्हणायचय.. फक्त मला ते विषेश आवडत नाही..

>>>>पुणेरी आणि समजुतदार बोलणारी पात्र. असं नाही. वपुंनी भाषेत आणि कथेत कितीही सहजता आणायचा प्रयत्न केला तरी त्यांची भाषा अनेकदा, सहजता सोडून, 'साहित्यिक' होते. विशेषतः जेंव्हा त्यांची दोन पात्रे संवाद, वाद, चर्चा करतात तेंव्हा.

थोडक्यात कुठल्याही चित्रपटात 'शारुक खान' शारुक खानच असतो तसं वपुंचं कॅरॅक्टर कुठलंही असलं तरी वपुच बोलतात असं वाटतं. सखी , पार्टनर , अचपुकबाश्रीबुंजिकमोघी (ही कथा आहे), रंगपंचमी, काही खरं काही खोटं , वन फॉर द रोड, मी माणूस शोधतोय, कर्मचारी.... लई लई लई आहेत.

नातिचरामी - मेघना पेठे...चक्क आवडलं, दुसर्‍यांदा-तिसर्‍यांदा तर आणखिनच पटत गेलं. पण मला प्रचंड आवडलेलं आणखीन एक पुस्तक म्हणजे किरण नगरकर यांच अनुवादीत 'प्रतिस्पर्धी', हे ही खूप जणांना आवडलेलं नहिये.

नातिचरामीबद्दल असहमत. मी सहा प्रयत्न करुन थकलो. माझी सहनशक्ती भरपूर असूनही या पुस्तकाने माझी केलेली अवस्था खरोखर विसरणार नाही. पण किरण नगरकरांच्या प्रतिस्पर्धी बद्दल पूर्ण सहमत. अफलातून पुस्तक आहे. मराठी अनुवादांच्या गर्दीत अतिशय दुर्लक्षित असे हे पुस्तक आहे.

आपल्या मनात "बाईच्या जातीने" कसं वागावं याची एक प्रतिमा तयार असते. या कादंबरीची नायिका आपल्या मनातील प्रतिमेला तडा जाईल असं पावलोपावली वागते. कादंबरी न आव्डण्याचं हे एक कारण असावं. :)

मला नातिचरामि न आवडण्याचं कारण स्त्रीची पारंपारिक प्रतिमा आणि तिचे प्रतिमेला तडा जाणारे वागणेही नाहिये. उलट या मांडणीने कादंबरी फसली आहे. नातिचरामि चा विषय चांगला होता पण मांडणी चुकली आहे असे माझे मत आहे. मला सुदैवाने कोणतेही धक्के पचवता येतात. पण मी वाचन वेगवेगळ्या बाजूंनी व भूमिकांतून करतो. तरीही ही कादंबरी कोणत्याच बाजूने मनांत उतरली नाही. म्हणून माझे नातिचरामि बद्दल अतिशय टोकाचे मत झाले आहे. शक्यता कमीच आहे. पण पुढेमागे कदाचित वाचेनही. कादंबरी म्हणून मला ती पटली नाही.

पुलंचं पुष्कळ्सं लेखन आवडलय. व्यक्तिचित्रात्मक आणि प्रवासवर्ननं सुद्धा. पण पुन्हा पुन्हा वाचेन असं नाही. त्यांची राजकारणावरची काही विडंबनात्मक पुस्तकं मात्र न वाचताच अर्धीच ठेवली. अजिबात मजा आली नाही. एखाद्या लेखाकचं एक आवडलं म्हणून पुढचं आवडेलच अस्म नाही हे मात्र अगदी हल्लीच पुन्हा अनुभवलं. जेम्स रेड्फिल्ड्चं 'सेलेस्टाइइन प्रोफेसी' वाचलं. सुरुवातीला कशाचेच रेफरन्स लागत नव्हते पण हळूहळू पुस्तक पकड घेत गेलं. शेवट तर फार आवडला. म्हटलं तर सायन्स फिक्शन, म्हटलं तर फिलॉसॉफिकल, थोडा 'मेटाफिजिक्स' चा भाग, पण अगदी खरी वाटणारी माणसं आणि माणसांच्या वागणूकीचा व्यवस्थित आढावा, त्यातल्या त्रुटी, हे सगळं अतिशय सुंदर पद्धतीनी मांडलं आहे. म्हणून उत्साहानी त्याचा सिक्वेल 'टेन्थ इन्साईट' वाचायला घेतला. फार बोजड लिहिलय या पुस्तकात. उगीचच फिलॉसॉफी भरलीये आणि 'एनर्जी' या कन्सेप्टबद्दल त्याला खरोखरच जितकं चांगलं लिहिता आलं असतं तितकी महनत घेतली नाही असं वाटलं. कुठल्यातरी वेगळ्याच एनर्जी सोर्सचा वापर करुन तयार करत असलेला जनरेटर आणि त्याचे धोके अशी थीम असताना त्याला पुस्तक सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनी रंगवता आलं असतं असं वाटतय. निदान त्यानी आधी निकोला टेसलाच्या संशोधनाबद्दल वाचलं असतं तरी पुस्तक जास्त चांगल्या उन्चीवर गेलं असतं. मी कसेबसे सम्पवले. ४-४ दिवसनी ५-५ पाने वाचत सम्पवले.

अरविंद अडिगा. बुकर मिळालं म्हणून सोसासोसाने "द व्हाईट टायगर" वाचायला घेतलं. निव्वळ थुकराट पुस्तक आहे. एक तर भारताविषयीच्या पाश्चात्य गैरसमजांना पद्धतशीर खतपाणी घालायचं सत्कृत्य हे पुस्तक करतं. उदा. अपघात करवून एखाद्या गरीबाला बळीचा बकरा बनवून सुटून जाता येतं, भारतात व्यवसाय करायचा असेल तर गैरमार्ग वापरल्याशिवाय गत्यंतर नाही वगैरे. दुसरं म्हणजे अडिगाचा टोन. प्रचंड डोक्यात जातो. "थांबा, माझ्या गोर्‍या मित्रांनो, आता तुम्हाला उकिरडा दाखवतोच. किळस वाटून घेऊ नका बर्का, आमच्या भारतात हे असंच असतं" असा काहीसा. तिसरं म्हणजे अडिगाची शब्दकळा. डोक्यात कळा येण्याइतपत भिकार आहे. "द व्हाईट टायगर" वाचून पाचेक वर्षं झाली. अडिगावरचा संताप जरा बोथट झाला होता म्हणून "बिटवीन द असॅसिनेशन्स" उचललं, आणि जुन्या आठवणी करपट ढेकरेसारख्या वर आल्या आणि दहा पानांतच पुस्तक भिरकावून दिलं.

माझं आवडतं पुस्तक :-) कधीतरी लिहीन त्याच्यावर - जमेल तेव्हा. आणि पुन्हा वाचताना तुमच्या टीकात्मक मुद्द्यांना ध्यानात ठेवेन - बघू जमतंय का ते! "बिटवीन द असॅसिनेशन्स" हे अद्याप वाचलं नाहीये!

ऐला!!!! नक्की लिहा. कोणती सौंदर्यस्थळं आहेत हे जाणून घ्यायची जब्बरदस्त उत्सुकता आहे.

व्हाईट टायगर निव्वळ थुकराट पुस्तक आहे. अतिशय बकवास. व्हीआयपी लोक बिअर पिऊन कारमध्ये बसून कसे पादतात आणि ड्रायव्हरच्या नाकातले केस कसे जळतात इ.इ. वाचून किळस आली होती साली. ब्ळ्यॉक्क्क थूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऽऽऽ!!!

माझी साहित्यविषयक अभिरुची अत्यंत हीन दर्जाची आहे याची जाणीव मला संयत शब्दांत करून दिल्याबद्दल मी आपली आभारी आहे ;-)

च्यायला..कसलं काय ओ. :( मला व्हाईट टायगर आज्याबात आवडलं नव्हतं इतकंच खरं. तुम्हांला आवडलं असेल तर असेलही त्यात तसं काहीतरी. त्याबद्दल वाचायला आवडेल. हीनाभिरुचीचा संबंध नै ओ लावत मी.

प्रचंड सहमत.. मला "रुखवत" म्हणुन पुस्तकं दिली होती.. त्यात अनेक उत्तम पुस्तकं होती..पण कही कही अशी उगाच हाईप झालेली पण माहेरच्यांनी कौतुकानी दिली.. त्यामुळे हे फेकुन / दान पण करता येत नाहीये कुणाला...!!

कादंबरी म्हणुन नाहि तर नाटक, आणि नावडतं म्हणुन नाहि तर अतिरीक्त कौतुक म्हणुन... सखाराम बाईण्डारला एव्हढं ग्लॅमर का मिळालं अजुनही कळलं नाहि. कदाचीत त्याकाळाच्या मानाने ते नाटक फार बोल्ड होतं... अभिनेत्यांनी फार उंचावर नेऊन ठेवलं असावं म्हणुन देखील... पण चार दु:खी मनांचं नियतीपुढे हतबल आक्रोश करण्यापलिकडे नाटकात काहि नाहि. त्याला बंडखोरीचा बाज तर अजीबात नाहि. मग त्या नाटकाच्या नावाने एव्ह्ढी आदळआपट का झाली कोण जाणे.

एकुणात मिपावरची मंडळी 'व्यक्तिगत मत' या सदराखाली पुलं वगैरे सुमार लेखकांवर समीक्षा करण्याइतपत समृद्ध झाली म्हणायची ;)

पुलंची व्यक्तिचित्रणे अतिशय खास आहेत त्याबद्दल दुमतच नाही. बाकी त्याचं मैत्र तेवढं खास वाटलं नाही. गोनिदांचे कादंबरीमय शिवकाल वाचल्यानंतर पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती वाचायला हातात घेतले, पण तेव्हा त्यातली एकुण भाषा बाळबोध वाटली वाचायला. मग एक खंड कसाबसा वाचल्यावर दूसरा खंड वाचायला घेतलाच नाही हातात. पुढे मागे दोन तीन वर्षांनी वाचेनही कदाचित.

विक्रम सेठ यांच्या सूटेबल बॉय मुळे अपेक्षा वाढल्याने हे पुस्तक प्रीऑर्डर करून ठेवले होते तेव्हा. अक्षरशः कसेबसे अर्धेमुर्धे संपवले. तीच गोष्ट माइन काम्फ ची. हिटलरची आत्मप्रौढी इतकी डोक्यात जाते की हे पुस्तक वाचवतच नाही. दोन्ही कादंबर्‍या नाहीत. पण माझ्या सहनशीलतेचा अंत पाहिलेली पुस्तके. म्हणून नमूद केली.