पुलंची अनेक पुस्तके अनेकांनी वाचली असतील आणि त्यातील बरेच उतारे कैकांच्या लक्षात असतील. पण टिपिकल 'पु.ल. कॅनन' मध्ये 'मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास' या छोटेखानी परंतु अप्रतीम पुस्तकाचा समावेश होत नाही. तुलनेने या पुस्तकाचे वाचक कमी आहेत असे चर्चेवरून लक्षात आले. मिपाकरांपैकी बर्याच जणांना हे पुस्तक नक्की माहिती असेल यात शंका नाहीच, पण सामान्यतः या पुस्तकाबद्दल व्हावी तितकी चर्चा होताना दिसत नाही हेही तितकेच खरे. तस्मात हा धागा या पुस्तकाबद्दल चर्चा करण्यासाठी काढलेला आहे. या पुस्तकातील आवडते उतारे, याची प्रेरणास्थाने, इ.इ. सर्व प्रकारची चर्चा होणे इथे अपेक्षित आहे. चर्चाच फक्त नको, आवडते उतारे टंकले तरी चालेल. इन फ्याक्ट, मी सुरुवातही तिथूनच करणार आहे.
थोडी पार्श्वभूमी:
हे पुस्तक म्हणजे कै. वि.ल. भावे यांच्या 'महाराष्ट्र सारस्वत' नामक अप्रतिम ठोकळ्याचे तितकेच जबराट विडंबन आहे. वरिजिनल पुस्तक इथे वाचायला मिळेल. माझे स्मरण बरोबर असेल तर हे पुस्तक अरविंद कोल्हटकर यांनी अपलोड केलेले आहे. याची प्रथमावृत्ती १९१०-१५ च्या आसपासची आहे.
https://archive.org/details/MaharashtraSaraswatBhaveWithSupplementFull
मुकुंदराज-महानुभाव इ. पासून ते पार रामजोश्यांपर्यंत मराठी वाङ्मयाची आठ शतके या पुस्तकात विवेचिली आहेत. जुन्या मराठी वाङ्मयाचा लोकांना अजून उत्तम तर्हेने परिचय होण्यास कारणीभूत ठरलेली पुस्तके दोन- एक म्हणजे उपरोल्लेखित महाराष्ट्र सारस्वत, तर दुसरे म्हणजे परशुरामतात्या गोडबोले यांनी 'मेजर क्यांडी' च्या हुकुमावरून संपादिलेले महाराष्ट्र कवींच्या वेच्यांचे पुस्तक- नवनीत. इंग्रजीत जशी फ्रान्सिस टर्नर पाल्ग्रेव्हची गोल्डन ट्रेजरी आहे तसे मराठीसाठी नवनीत आहे. यद्यपि पाल्ग्रेव्हमध्ये शेक्सपीअरपूर्व कवी फारसे नाहीत, बेवुल्फ तर नाहीच नाही. पण नवनीतात ज्ञानेश्वरपूर्व कवी उदा. मुकुंदराज हेही आहेत.
https://archive.org/details/navanitorselecti025346mbp
नवनीताची प्रथमावृत्ती १८५४ च्या आसपासची आहे. एक नवी आवृत्ती १९९८ साली आली, परंतु त्यानंतर हे पुस्तक पुनरेकवार औटॉफ प्रिंट गेलेले आहे. १९९८ सालच्या आवृत्तीस शांता शेळक्यांची छान प्रस्तावना आहे.
मला स्वत:ला वैयक्तिक ही दोन पुस्तके प्रचंड आवडतात. ब्रिटिशपूर्व आणि खर्या अर्थाने 'जुन्या' मराठी कवितेचा इतका विनासायास आणि तोही साकल्याने परिचय नवनीत करून देते, तर सारस्वतात चरित्रात्मक माहिती, कवीच्या काव्यगुणाची चर्चा, थोडीशी तुलना, काही बाबतींत 'मॉडर्न' कवितांमधील आशय आणि जुन्या कवितांमधील आशय यांची तुलना करून 'आमच्याकडेही मैत्री, इ. सारखे विषय काव्यांत चर्चिले जातात याची एतद्देशीय विद्वानांस खात्री पटून त्यांची लज्जा थोडी तरी रक्षण होईल' अशी टंगिनचीक टिप्पणीही केलेली आहे.
ऐतिहासिक जाणिवेबरोबरच साहित्यिक आत्मभान प्रदान करण्यात या दोन पुस्तकांचे योगदान अतिशय प्रचंड आहे. इतःपर हे वाङ्मय त्या त्या क्षेत्रातील अभ्यासक सोडून कोणी वाचतील याची शक्यता नगण्य आहे. तरी संतवाङ्मय अजूनही जिवंत आहे. पंतकाव्य आणि तंतकाव्य मात्र झपाट्याने विस्मृतीच्या वाटेला लागलेले आहे.
त्यातही तंतकाव्य हे लावणीरूपाने काही अंशी का होईना, तगून आहे-यद्यपि पोवाडे इ.इ. बद्दल नवे प्रयोग फारसे कधी ऐकले नाहीत. पण पंतकाव्य मात्र संपलेच जवळपास. वामन-रघुनाथ-मयूर हे पंतत्रय आज अतिशय मरतझुरत कुठेतरी दिसते. ल.रा. पांगारकरांनी मोरोपंतांचे ६०० पानी चरित्र १९०७ साली लिहिले, तो चरित्रलेखनात साकल्याच्या दृष्टीने पाहिला तर मराठीत तरी वस्तुपाठ ठरावा- विशेषतः बिगरराजकीय आणि ब्रिटिशपूर्व व्यक्तीबद्दल.
इतिहास, वारसा, इ. बद्दल आपली व्यवछेदक अनास्था पाहिली तर काव्येतिहासकार, इ. बाकी लोकांचे ऋण मान्य करूनही मी म्हणेन की सारस्वतकार आणि नवनीतकारांचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत. वि.ल. भाव्यांचा मिठागराचा व्यवसाय होता, त्यानिमित्ताने ते जिथे जात तिथे जुनी हस्तलिखिते, इ. चा संग्रह करीत, दंतकथा इ. टिपून ठेवत. महानुभाव पंथीयांची शिक्रेट लिपी उलगडून दाखवण्यासाठी तत्रस्थ मठाधिपती महंतांना कन्व्हिन्स करणे गरजेचे होते. भाव्यांचे महानुभाव महंतांशी चांगले संबंध असल्याने महानुभाव ग्रंथ प्रकाशित करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतलेला होता.
या लोकांनी जितके टिपून ठेवले त्यापलीकडे 'कच्चा माल' मिळण्याची शक्यता आज तरी खूपच कमी आहे. हस्तलिखिते मिळतील, परंतु त्या जुन्या परंपरेतली काही नवी मौखिक माहिती मिळणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे 'प्राचीन मराठी साहित्येतिहासकार कॅनन' मधली ही दोन अत्यावश्यक पुस्तके आहेत. झाडून सगळे कवी इथे भेटतात, टेक्स्टबुकांमधील लेखकपरिचयाच्या प्यारेग्राफभर माहितीपलीकडची माहिती मिळते आणि पुनःप्रत्ययाचा आनंद होतो. रघुनाथपंडितांच्या नलदमयंतीस्वयंवराख्यानामधील चूर्णिका असो, किंवा नरहरीच्या गंगारत्नमालेतील तो कटाव म्हटल्यावर पहिल्यांदा डोळ्यांसमोर येणारा कटाव असो (ईव्हन अॅट द कॉस्ट ऑफ अमृतराय कटाव) नैतर पंतांची समासाने लगडलेली आर्या असो, शेवटी सगळे तिकडेच मिळते. दासोपंतांबद्दलच्या विविध आख्यायिका, वामनपंडितांच्या पोथ्यापुस्तकांचे ओझे वाहणारा उंट आणि त्यांचे खरोखरीच 'स्वयं'पाक करवणारे कट्टर वैष्णव सोवळे, रामजोश्यांचे प्रत्युत्पन्नमतित्व, पंतांची ऋजुता, रामदासांच्या काव्यातले ओज, सगळे तिथे चवीपुरते मिळते अन मूळ ग्रंथ वाचायची तात्पुरती का होईना, प्रेरणा मिळते.
================================================================================
इतका समृद्ध कच्चा माल, आणि त्यातून पुलंसारखे विनोदसम्राट! मग गाळीव इतिहासाला बहर येणार हे काय वेगळे सांगायला पाहिजे? तस्मात उतार्यांना सुरुवात करतो. खरेतर अख्खे पुस्तकच टंकावे लागेल, पण ठीके.
"ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो त्या देशात ज्याला आपण मराठी म्हणतो ती भाषा बोलतात. आता इथली भाषा मराठी असण्याचे कारण म्हणजे इथल्या लोकांना ही एकच भाषा येते हे होय! मुसलमानांनी उर्दू शिकवायचा प्रयत्न केला व तोबा तोबा म्हणत परत गेले. विशेषतः मिरज आणि सावंतवाडी येथील मुसलमानांचे उर्दू ऐकून औरंगजेबाने हाय खाल्ली आणि बर्हाणपुरी प्राण सोडला. पुढे पेशवाई आल्यावर वकीलसाहेब दरबारात, आणि वकिलीणबाई करोलबागेत उर्दू बोलावयाला लागल्यावर 'हल्ला चालेल, पण उर्दू आवरा' अशा मागण्या आल्या. शिवकालीन मराठ्यांनीही तत्कालीन शिव्यांची मराठी-उर्दू अपशब्दकोशातील उर्दू रूपे उच्चारून यवनांस हैराण केले. तात्पर्य, येथील लोकांस अन्य भाषा येत नसल्यामुळे इथली भाषा मराठी आहे. पुढे इंग्रजाने एक आपली भाषा शिकवायचा निकराने प्रयत्न केला. पण दीडशे वर्षांच्या अव्याहत परिश्रमांनंतरही ब्याट, ब्यांक, ब्याडमिंटन, गूड ह्याबिट्स यांड ब्याड ह्याबिट्स वगैरे ऐकून स्वतःचे इंग्रजी सुधारावयाला तो मायदेशी परतला."
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जग्गात भारी!
'हगल्या-मुतल्या' गोष्टींनी
बोलीभाषा...
दर बारा कोसांवर बदलते
तात्कालीन लोक
वाचायलाच हवे...
ररागुर्जी- धन्स!
@ तर बर्राच मोठ्ठा पू वाहून
पाभे आणि आदिजोशी- पूर्ण सहमत!
फीस्ट.
सुरेख पुस्तक आहे ...
झक्कास!
Pagination