Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय; कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये. स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय? त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही. प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय. प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी. प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका. इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग. मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे. भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय. माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही! * शतशब्दकथा
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छान मनोगत ! आवडले. फक्त कादंबरी लिहीणेच नाही तर खरं आयुष्यही असंच असतं... धमक असलेला/ली आपल्या मर्जीनुसार आपलं साम्राज्य स्थापतो/ते.

कथेपेक्षाही तुम्ही करत असलेल्या कामासंदर्भातले तुमचे मनोगत अधिक वाटले.

"कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. " गुंतुनी गुंत्यात या, गाठ गहन छेडली, आज मी म्रूगजळाची, सावली का खोडली?

माझीही झोप उडालीय. अंधारलेल्या रणाक्रंदनातून चालतोय. कशाचाच आनंद नाही. ना कशाची खंत. ही वस्तुस्थिती आहे? की स्वप्न? मला जाणून घ्यायचे नाही. त्यांच्या कोलाहलातही मी शांत आहे. त्यांचे घाव सोसूनही जिवंत आहे. मीही परतवतोय त्यांचे जीवघेणे हल्ले. नि:शब्दपणे भोवतालचे हलाहल रिचवतोय. जगण्याच्या दुर्दम्य आशेने माझी पावले चालत राहतात. मी अजिंक्य. अजेय. सामदामदंडभेद. त्यांचीच शस्त्रे मलाही अवगत झालीयेत. त्यांच्या डोळ्यांत रोखून पाहतो. भीती आणि आश्चर्य. त्यांच्या न संपणार्‍या भाऊगर्दीतून पुढे जात राहतोय. स्थितप्रज्ञाच्या अविचलतेने. असं किती काळ चालेल? कधीतरी हे पर्व संपेल. मग माझ्या नियमांनुसार मी या सगळ्यांना झुंजायला लावेन. तत्त्ववेत्ते कुठे लढतात युद्धे? मी लढतोय. माझ्या तत्त्वांनी लढेन. त्यांच्या तत्त्वशून्यतेने नाही. * शतशब्दप्रतिसाद

दोन्हीही ताकदवान आहेत. (बाकी मूळ शतशब्दकथा ही कथेपेक्षा आत्मप्रकटन वाटलं हेही खरंच.)

कधीतरी हे पान उलटेल. मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन. आमेन!

""मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन!"" मिळेल मग सुटका या कोलाहलातून ..?? मिळेल मग हवी ती मन:शांती ?? कथा आवडली हेवेसांनल.. -पहाटवारा

नाही. कोलाहलातून सुटका होणं ही फार अवघड गोष्ट आहे. कारण आपल्या मनाला काय पाहिजे ते वारंवार बदलत असतं - ते स्थिर नसतं. त्यामुळे पूर्ण मनःशांती हे सर्वसाधारणपणे (याला अपवाद होते, आहेत, असतील) एक मृगजळ आहे!