Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
भाग (नोंद: स्थानिक लोकांशी झालेल्या चर्चा, विकिपीडिया आणि तत्कालीन वृत्तपत्रातील बातम्या आणि लेख यांच्या आधारे हा लेख लिहिला आहे.) मी काबूलमध्ये शनिवारी पोचले होते. रविवार निवांत असायला हवा आजवरच्या अनुभवानुसार. पण नाही! रविवार हा कामाचा दिवस. ‘साप्ताहिक सुट्टीचा दिवस शुक्रवार’ ही इस्लामिक राजवटीची प्रमुख खूण. ज्यांना आठवड्यात पाच दिवस काम असतं त्यांना गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टीचे. सरकारी कार्यालयं गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस बंद असतात. पण हे केवळ केंद्रीय कार्यालयांसाठी. प्रादेशिक कार्यालयं आठवड्यातले सहा दिवस काम करतात. एकूण केंद्र स्तरावरच्या लोकांचे जास्त लाड होण्याची पद्धत इथंही दिसतेय. युएन कार्यालयं मात्र शुक्रवार आणि शनिवारी बंद. कामासाठी National Action Plan for the Women of Afghanistan (2007 to 2017) पाहत होते; तेव्हा त्यात सुरुवातीच्या पानांवर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’ आणि ‘In the name of Allah, the Merciful, the Compassionate’ हे स्पष्ट दिसलं. ‘इस्लामिक रिपब्लिक’ बद्दल कुतूहल आणखी जागं झालं. अफगाणिस्तान ‘रिपब्लिक’ नेमकं कधी झालं? आणि ‘इस्लामिक रिपब्लिक’ हा शब्दप्रयोग नक्की काय सांगतो आहे? ज्या देशातले ९९% लोक इस्लाम धर्माचे अनुयायी आहेत तो देश ‘इस्लामिक रिपब्लिक’ असणं ही काही फार आश्चर्याची बाब नाही खरं तर. पण या देशाचा भूगोल आणि इतिहास हे दोन्ही लक्षात घेतलं, तर आजची गुंतागुंत नेमकी काय आहे याची काही अंशी उकल होते. पुढचं विवेचन करण्यापूर्वी मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छिते. एक, मी इस्लाम धर्माची अभ्यासक नाही. दुसरं म्हणजे ‘एक धर्म दुस-या धर्मापेक्षा श्रेष्ठ की कनिष्ठ’ या वादात मला रस नाही. मी हिंदू घरात जन्माला आले आणि वाढले ही एक वस्तुस्थिती आहे - त्याचा मला ना न्यूनगंड आहे ना त्यामुळे माझ्यात श्रेष्ठत्वाची भावना आहे! लोक वेगवेगळ्या धर्मांच्या घरांत जन्म घेतात आणि वाढतात. तिसरा मुद्दा असा, की कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था, शिक्षण... अशा अनेक मानवनिर्मित व्यवस्थांसारखी धर्म हीदेखील एक मानवनिर्मित व्यवस्था आहे असं मी(ही) मानते. कुठल्याही व्यवस्थेची असतात तशी प्रत्येक धर्माची बलस्थानं आहेत आणि त्यात सुधारणेला वाव आहे – तो कमी-जास्त असेल; पण सर्वांत आहे. ज्ञानाच्या कक्षा आणि मानवी हक्कांच्या जाणिवा विस्तारताना ‘धर्माची’ आपली समज आणि अभिव्यक्ती या दोन्हीत बदल होणं अपरिहार्य आहे. धर्मात मला रस आहे तो सामाजिक दृष्ट्या! धर्म मानवी समूहांच्या आचार-विचारांना आकार देतो. काही चांगले पर्याय त्यातून पुढे येतात आणि अनेक सामाजिक प्रश्नांचे मूळही त्यातच असते; म्हणून ‘धर्म’ मी पाहते, आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम समजून घ्यायचा प्रयत्न करते. अफगाणिस्तानमधल्या इस्लामचा विचारही मी याच मर्यादित अर्थाने करते आहे. पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, तजिकीस्तान, चीन (आणि सातवा भारत) हे देश सध्याचा अफगाणिस्तानच्या सीमांना स्पर्श करतात. afgan (मूळ नकाशा आंतरजालावरून साभार) (‘पाकव्याप्त काश्मीर ही वास्तवात भारतीय भूमी आहे’ या भूमिकेतून भारत सरकार अफगाणिस्तानला सीमा-शेजारी मानते, पण बाकी जग तसं मानत नाही.) ६४७,५०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आणि सुमारे अडीच ते तीन कोटी लोक असलेला हा देश ३४ प्रांतांत विभागला आहे. काबूल ही देशाची राजधानी आहे आणि तो एक प्रांतही आहे. काबूलमधली वेगवेगळी ठिकाणं वेगवेगळ्या जिल्ह्यांत आहेत हे कळल्यावर गंमत वाटली होती. भौगोलिकदृष्ट्या अफगाणिस्तानची संपर्क आणि दळणवळणाची स्थिती आजही बिकट आहे. त्यात भर पडते तिथल्या हवामानाची. स्वाभाविकरीत्या इतिहासात अफगाणिस्तान टोळ्यांमध्ये – पारंपरिक/स्थानिक समूह हा शब्दप्रयोग जास्त योग्य आहे - विभागला गेला आणि आजही आपापल्या पारंपरिक समूहाशी निष्ठा फार महत्त्वाची आहे. सरकार नागरिकांना जे ओळखपत्र देते, त्यावर त्याच्या/तिच्या पारंपरिक समूहाची नोंद असावी की नसावी हा २०१३ च्या डिसेंबरमध्ये मोठा वादाचा विषय झाला होता. यावर काय निर्णय झाला ते अदयाप माझ्या नजरेस आलं नाही, पुढे हा विषय पुन्हा येईल तेव्हा सांगते. पश्तुन (Pashtun) हा सगळयात मोठा गट – सुमारे ४५% ते ६०% लोक. हे ‘पाश्तो’ भाषा बोलतात. भारतरत्न खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी हे आपल्या माहितीत असलेले उत्तुंग पश्तुन व्यक्तिमत्व! ‘हमीद करझाई’ जे २००४ ते २०१४ अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते, तेही पश्तुन आहेत. एक अपवाद वगळता इथले सर्व राजे पश्तुन होते. २०१४ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सर्वच्या सर्व ११ उमेदवार पश्तुन होते, असं वाचल्याचं आठवतं. दुसरा गट आहे ताजिक (Tajik). हे ‘दरी’ (अफगाणिस्तानी पर्शियन) भाषा बोलतात. तालिबानला यशस्वी विरोध करणा-या Northern Alliance मध्ये मुख्यत्वे ताजिक होते. ताजिक आणि पश्तुन यांचे संबंध म्हणजे ‘तुझं नि माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ असे आहेत. कटटर विरोधी राजकीय भूमिका – पण भागीदारीत व्यवसाय करतात आणि विवाहाद्वारा एकमेकांशी नातेसंबंधही जोडतात. हझारा (Hazara) किंवा हजारा हा ‘दरी’ बोलणारा आणखी एक समूह. बहुतांश अफगाण ‘सुन्नी’ आहेत तर हझारा ‘शिया’ – इतकं पुरेसं आहे त्यांची स्थिती समजायला! उझबेक (Uzbek), ऐमाक (Aimaq), तुर्कमेन (Turkmen), बलोच (Baloch), नूरिस्तानी (Nuristani) हे तुलनेने कमी लोकसंख्येचे पण आपापल्या परिसरात प्रभाव असणारे गट. शिवाय आणखीही अधिक छोटे गट आहेत. अफगाणिस्तानच्या राष्ट्रगीतात १४ पारंपरिक समूहांचा उल्लेख आहे. एखादा देश अथवा समाज लोकशाही मूल्यांकडे वळतावळता धर्माचा अंकित कसा होऊ शकतो, हे समजून घ्यायचं असेल तर अफगाणिस्तानचा इतिहास उद्बोधक आहे. बौद्ध, हिंदू, पारसी अशा विविध धर्मांचा प्रसार या प्रदेशात इस्लामच्या आगमनापूर्वी आठ-नऊ शतकं इतका आधी झाला होता. शिवाय समूहांच्या पारंपरिक समजूती होत्या. त्याबद्दल एक वेगळा लेख लिहावा लागेल इतका मोठा विषय आहे तो हे धर्म सत्ता परिवर्तनातून आले हे खरं; पण या धर्मांचे स्वरूप पाहता त्यांचा प्रसार शांततामय असावा असा. कयास करता येतो. सातव्या शतकात अरब इथे आले आणि ‘इस्लाम’ही. नवव्या शतकात ‘कुराणा’चा पर्शियन अनुवाद उपलब्ध झाला. बाराव्या शतकात हेरात (Herat) इथं अफगाणिस्तानमधली पहिली मशीद बांधण्यात आली. पण इस्लामचा प्रभाव वाढत असला तरी ‘पश्तुनवाली’ ही गावपातळीवरची न्यायव्यवस्थाच दैनंदिन जीवनातले निर्णय करत होती. ही व्यवस्था १९ व्या शतकाच्या अखेरपर्यंत चांगली कार्यरत होती. १७४७ मध्ये अहमदशाह दुराणी याने ‘अफगाण राज्य’ स्थापन केले तेव्हाही म्हणजे इस्लाम येऊन हजार वर्ष झाल्यावरही ‘फतवा’ आणि ‘जिहाद’ फारसे प्रचलित नव्हते. अब्दुर रहमान खान (१८८० ते १८९१) याने सत्तेच्या केंद्रीकरणासाठी ‘शरिया’ कायदे स्वीकारुन त्यांच्या अंमलबजावणीसाठी उलेमांची नेमणूक केली. यामुळे एका बाजूने इस्लामचं, धार्मिक नेत्यांचं स्थान बळकट झालं हे खरं! पण या लोकांना प्रशासकीय रचनेत सामावून घेतल्याने, व्यवस्थेची पुनर्रचना केल्याने राजसत्तेचा वरचष्मा कायम राहिला. इस्लाम नैतिक अधिष्ठान होते पण राजकीय अधिष्ठान नव्हते. जेव्हा जेव्हा अस्तित्व धोक्यात आले त्या त्या वेळी उठाव करून राजसत्ता बदलण्याचे प्रयत्न झाले, पण धार्मिक नेतृत्वाने सत्ताग्रहण मात्र केले नाही. या काळात राज्यकर्त्यांनी इस्लाम आणि आधुनिकता यांची सांगड घालण्याचे प्रयत्न केले. या देशाचा इतिहास दुर्दैवाने आक्रमणांचा म्हणून युद्धाचा आहे आणि आपापसातील यादवीचाही आहे . लोकशाहीचा इथला प्रवास साधासरळ नाही तर वळणा वळणाचा आणि खाचखळग्यांचा आहे – अगदी एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही! १८३७ मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले. रशिया आणि ग्रेट ब्रिटनच्या ‘ग्रेट गेम’ च्या डावपेचात अफगाणिस्तानचं प्यादं होऊन बसलं. स्थानिक समूहांमधल्या विश्वासाला आणखी तडे गेले ते याच कालावधीत. Peter Hopkirk याचं Great Game हे पुस्तक अफगाणिस्तान समजून घेण्यात मोलाची मदत करतं. अखेर १९१९ मध्ये अफगाणिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. अमानुल्ला खान (१९१९ ते १९२९) यांची दशकभराची कारकीर्द हा अफगाणिस्तानमधला महत्वाचा सुधारणावादी कालखंड म्हणावा लागेल. ‘लोया जिरगा’ (याबद्दल अधिक माहिती नंतर घेऊ.) या महासभेने १९२१ मध्ये पहिली राज्यघटना मंजूर केली होती (१९२३ मध्ये दुसरा मसुदा आला); त्यानुसार अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे (आणि मोफत) झाले; मुलांच्या आणि मुलींच्या एकत्र शिक्षणाचा - सहशिक्षणाचा कार्यक्रम आखण्यात आला; स्त्रियांनी बुरखा किंवा हिजाब वापरायचा की नाही हा त्या स्त्रीचा व्यक्तिगत निर्णय असेल –तिच्यावर याबाबतीत कोणीही सक्ती करू शकणार नाही – असे अतिशय मूलगामी निर्णय अमानुल्ला खान याने घेतले. अमानुल्ला खान आणि राणी सरय्या यांच्या नेतृत्वाखाली. स्त्रियांना माणूस या नात्याने जगता येईल असे वातावरण तयार झाले. धर्मसत्तेला पडती बाजू घ्यावी लागली - पण थोडासाच काळ. धार्मिक लोकांना या सा-या सुधारणा म्हणजे स्वधर्मावर आघात आणि परधर्माचे आक्रमण वाटू लागले (तसे ते आजही वाटते हे विशेष!) १९२९ मध्ये अमानुल्ला खानला देश सोडून जावे लागले आणि परक्या भूमीत तो मृत्यूला सामोरा गेला. (श्रीमती प्रतिभा रानडे लिखित ‘अफगाण डायरी’ मध्ये याबाबतीत सविस्तर माहिती आहे.) मोहम्मद नदिर खान याने १९२९ मध्ये सत्ता हाती घेतल्यावर सगळ्यात आधी सुधारणांची गती कमी केली. १९३१ मध्ये त्याने नवी राज्यघटना (तिसरी) आणली. हनाफी शरिया (सुन्नीपंथीय) अधिकृतरीत्या धर्म म्हणून स्वीकारला गेला. १९३३ मध्ये काबूलमधल्या एका विद्यार्थ्याने मोहम्मद नदिर खान याची हत्या केली. खानचा मुलगा झहीर शाह वयाच्या १९ व्या वर्षी सत्तेवर आला. १९४६ मध्ये पंतप्रधान शाह महमूद याने मुक्त निवडणूक, मुक्त प्रसारमाध्यम, संसद या सुधारणा जाहीर केल्या. १९६४ मध्ये आणखी एकदा नवी राज्यघटना (चौथी) जाहीर झाली. झहीर शाहने त्या अनुषंगाने राज्यव्यवस्थेत काही बदल केले. संसद द्विस्तरिय केली; त्यात १/३ प्रतिनिधी लोक थेट निवडून देणार; १/३ प्रतिनिधी प्रांतीय मंडळे पाठवणार आणि बाकी १/३ प्रतिनिधी राजा नियुक्त करणार अशी व्यवस्था होती. हे बदल एका अर्थी ‘प्रायोगिक लोकशाहीच्या’ दिशेने टाकलेले पाऊल होते. या प्रक्रियेतून उदयास आलेल्या राजकीय पक्षांनी पुढे अफगाणिस्तानच्या भवितव्याला बरा-वाईट आकार दिला. १७ जुलै १९७३ रोजी तत्कालीन पंतप्रधान मोहम्मद सरदार दाऊद खान यांनी झहीर शाहविरुद्ध उठाव करून सत्ता हस्तगत केली. हा सत्तापालट रक्तपाताविना झाला. पण आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही स्तरांवर ही राजवट पूर्ण अपयशी ठरली. १९७७ ची नवी राज्यघटना (पाचवी) राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासाला चालना देण्यास कुचकामी ठरल्या. यावेळी राजेशाही संपली होती आणि हा देश आता होता ‘रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’. २७ एप्रिल १९७८ रोजी नूर मोहम्मद तराकी, बब्रक करमल आणि अमीन ताहा यांनी संगनमताने दाऊद खानची हत्या केली. यांच्या पक्षाचं नाव: People's Democratic Party of Afghanistan (PDPA). १ मे रोजी तराकी राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि पक्षाचा महासचिव झाला. यावेळी हा देश झाला ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान’. हे टिकलं एप्रिल १९९२ पर्यंत. दरम्यान सप्टेंबर १९७९ मध्ये तराकीला मारून हफीझुल्ला अमीन राष्ट्राध्यक्ष झाला. १९७८ ते १९९२ या काळात रशियाशी आणि पर्यायाने कम्युनिस्ट विचारांशी जवळीक राखणा-या PDPA ने अनेक ‘सुधारणा’ केल्या. स्त्रियांना मतदानाचा अधिकार; त्याचा राजकारणात सहभाग वाढावा यासाठी योग्य ते वातावरण; बळजबरीने केल्या जाणा-या लग्नावर बंदी असे अनेक स्त्री-हिताचे निर्णय कम्युनिस्ट विचारसरणीच्या प्रभावातून घेण्यात आले. पण स्त्री-पुरुष समतेचा हा ‘डोस’ धर्मसत्तेच्या पचनी पडणार नव्हताच. कोणत्याही समाजात फार कमी लोक सुधारणेस उत्सुक असतात; कुणालातरी सुधारणेचे मुद्दे रेटून न्यावे लागतातच. सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते. PDPA ने रशियाकडून अनेक क्षेत्रांत मदत घेतली. राजकीय आणि सामाजिक स्थैर्य तर नव्हतेच. विरोधकांना, विचारवंताना, धार्मिक नेत्यांना, पारंपारिक टोळी प्रमुखांना (ज्यांचा मान मोठा असतो) कारण नसताना तुरुंगात टाकणे; मारून टाकणे नित्याचे होते. किती लोक त्या काळात उध्वस्त झाले त्याची गणती नाही. आणि हे सारे घडत होते ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक’ च्या नावे! रशियन तिथं असल्याने बाकी जग निवांत होत! उत्साहाच्या भरात PDPA ने मुस्लिम पुरुषांनी दाढी वाढवायची नाही, स्त्रियांनी ‘चादोर’ घ्यायची नाही अशाही सुधारणांची सक्ती केली. विखुरलेल्या अफगाण समाजाला हजारो वर्ष बांधून ठेवणारी एक गोष्ट होती ती म्हणजे ‘इस्लाम’. अफगाण मातीत आणि परंपरेत रुजलेला आणि फुललेला इस्लाम. कम्युनिस्ट त्याच्यावर आघात करायला लागले. स्वत;च्या प्रजेवर परकीयांच्या मदतीने अनन्वित अत्याचार करणारी राजवट एक ना एक दिवस संपणं अपरिहार्य होत! कम्युनिस्ट विद्यार्थी संघटनेला पर्याय म्हणून काबूल विद्यापीठात ‘मुस्लीम युथ ऑर्गनायझेशन’ उदयाला आली. (भविष्यातले मुजाहिद्दीन इथलेच!) इस्लाम आता अफगाणला जोडणारा एकमात्र दुवा राहिला होता. १९७९ मध्ये रशिया मदतीच्या नावाखाली देश गिळंकृत करून बसला. उंटाच्या मानेवरचा तो शेवटचा खडा ठरला. मग मुजाहिद्दीन आले; ‘इस्लाम खतरे मे है’ ही भावना आली; ‘जिहाद’ ची हाक आली. पाठोपाठ परक्या भूमितून मुस्लीम मदतीला आले आणि अफगाणेतर कडव्या मुस्लिमांच्या हाती नेतृत्व गेलं. १९८९ मध्ये रशियाने सैन्य माघारी घेतलं पण तोवर या भूमीत शस्त्रात्र ओतली गेली होती. मुजाहिद्दीनना अमेरिकन समर्थन होतं, पण रशियन माघारीनंतर अमेरिकेनेही दुर्लक्ष केलं. पर्यायी राजकीय व्यवस्था निर्माण करण्यात मुजाहिद्दीन पूर्ण अपयशी ठरले. १९९२ मध्ये निर्माण झालं ‘इस्लामिक स्टेट ऑफ अफगाणिस्तान’. पैसा आणि शस्त्र हे नेतृत्वाचे मुख्य निकष ठरू लागले. परकीय मदतीचा ओघ आटला. मग अपहरण, खंडणी, दरोडे, स्त्रियांवर अत्याचार हे रोजचे झाले. अफू उत्पादन वाढलं; रस्तेही असुरक्षित झाले. वारलॉर्ड आपापसात लढायला लागले. देशाला पोखरून टाकणारी वारलॉर्ड नावाची कीड समूळ उखडून टाकण्याची घोषणा करत ‘तालिबान’ समोर आले ते ११९४ मध्ये. ‘शरिया’नुसार ‘पवित्र इस्लामिक राज्य’ स्थापन करण्याच्या त्यांच्या घोषणेला पाकिस्तानमधून समर्थन मिळाले. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेले अफगाणी निर्वासित नव्या दमाने सीमारेषा पार करू लागले. हे युवक आणि प्रौढ मुख्यत्वे पश्तुन होते. १९९६ मध्ये तालिबानने काबूल ताब्यात घेतले. यादवी युद्ध संपवून ‘तालिबान’ सत्ताधीश झाले. सुरुवातीला शांतता प्रस्थापित झाल्यासारखं वाटलं. मग इस्लामिक कायदे लागू झाले. अफू लागवड बंद केली. संगीत बंद, चोरी केल्यास हात छाटणार, रेडीओवर स्त्रियांच्या आवाजावर बंदी, त्यांनी शिकायचं नाही, अर्थार्जन करायचं नाही ..... अफगाणी जनतेला इस्लामचं हे भयंकर रूप नवं होतं. व्यक्ती, कुटुंब आणि टोळी यांचा सन्मान त्यांनी आजवर महत्त्वाचा मानला होता. आजवर त्यांचे मुल्ला-मौलवी त्यांच्यातलेच होते आणि ते मुख्यत्वे नैतिक शिक्षणाला जबाबदार होते. राजकीय सत्ता धार्मिक नेत्यांच्या हाती जाऊन काही शतकं मागे जावं लागणं क्लेशदायक होत. तालिबानसोबत ‘अल-कायदा’ आले. मग अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर हल्ला झाला. अमेरिका लादेनच्या मागे लागली. नोव्हेंबर २००१ मध्ये अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी अफगाणिस्तानवर हल्ला केला. तालिबानचा पराभव झाला. २००१ मध्ये ‘प्रासंगिक सरकार’ अस्तित्वात आलं. २००४ मध्ये नवी राज्यघटना. आता अफगाणिस्तान आहे ‘इस्लामिक रिपब्लिक’. रशिया-ब्रिटन ग्रेट गेम; रशिया-अमेरिका शीतयुद्ध; रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाची बाकी जगाने घेतलेली “दखल”; आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकट झालेला अरब जगातील इस्लाम; भूक आणि गरीबीला न जुमानणारी यादवी; धर्माला अफू समजून त्याला संपवू पाहणारा कम्युनिस्ट धर्म; सर्वमान्य अशा स्थानिक नेतृत्वाचा अभाव; स्थानिकांमध्ये दूरदृष्टीचा अभाव, किडे-मुंग्यांच्या जीवनापेक्षा स्वस्त झालेलं मानवी जीवन... आता नवं सरकार इस्लाम विरोधी आहे अशी शंकाही निर्माण होता कामा नये. ...... . अफगाणिस्तान ‘इस्लामिक रिपब्लिक’ च्या अपरिहार्य टोकावर (point of no return) येऊन पोचला. क्रमशः भीतीच्या भिंती:४: खिडकीतून पाहताना..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अफगाणिस्तानात काबूल व झाबूल या नावाची दोन राज्ये मध्ययुगात फेमस होती. या राज्यांच्या राजांना 'हिंदू शाही' असे अजूनही नाव आहे. वैदिक काळच कशाला, नंतरही अफगाणिस्तानात हिंदू प्रभाव लै होता. अशोकाच्या शिलालेखांपैकी त्या साईडच्या शिलालेखांतली भाषा संस्कृतशी सर्वांत जास्त साम्य असलेली आहे. पाणिनी हाही त्याच भागातला होता. तक्षशिला विद्यापीठही तिथलेच. महाभारत काळात मध्यदेशाचे सांस्कृतिक महत्त्व वाढले म्हणून हा इतिहास नजरेआड कसा काय करता येईल बरे? काबूल व झाबूलच्या राजांनी अरब व तुर्कांशी जवळपास २०० वर्षे लढा दिला आणि तोही यशस्वीरीत्या. त्यांचा पाडाव करून झाल्यावर मगच भारतावर मुसलमान आक्रमणे एकसाथ सुरू झाली. अफगाण हिंदू नामक लोक आजही अल्पसंख्य का होईना, आहेत. त्यामुळे हा भाग हळू हळू 'भारता'पासून तुटत गेला असला तरी चंद्रगुप्त मौर्यापासून ते सर्वांनीच अफगाणिस्तानचे महत्त्व जाणले होते. वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे.

@ वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे.>>> मस्स्त माहिती रे ब्याटुक!

उम्म. माझे दोन शब्द. झाबूलविषयी पहिल्यांदाच ऐकतोय. हिंदू शाही हे नाव पर्शियनांनी दिलेले असू शकते का? माझ्या माहितीप्रमाणे पर्शियनांनी पहिल्यांदा हिंदू हा शब्द वापरला. ('स' चा फारसी भाषेत 'ह' होतो). अशोकाचे शिलालेख खरोष्टीत आहेत. आणि संस्कृतचा प्रभाव नैसर्गिकरित्या असणारच. ढोबळ मानाने तो इंडो इराणियन गटच होता की. बाकी पाणिनी हा अफगाणिस्तानातला ही माहिती नवीन आहे. तक्षशिला अफगाणिस्तानात नसून पाकिस्तानात रावळपिंडीनजीक होते अर्थात अफगाणिस्थानला जास्त जवळ ते आहेच. काबूल झाबूलच्या राजांनी अरब आणि तुर्कांशी लढा देणे साहजिकच वाटते कारण अशोकाच्या अफगाणिस्थानातल्या धर्मप्रसारानंतर तिथे इकडील संस्कृती बर्‍यापैकी झिरपली असावी. पण केवळ इतक्यामुळे तो भाग हिंदूबहुल होता असे म्हणणे जरा धार्ष्ट्याचे ठरावे.

मी लौकिक धर्माबद्दल बोलतोय, तेव्हा आसेतुहिमालय सर्वत्र हिंदुधर्म किंवा हिंदुसंस्क्रुती म्हणुन ज्याला आज ओळखतो त्याचा समाजावर प्रभाव होता अशा अर्थाने. कदाचित तिथल्या रानटी टोळ्या वेगळ्या परंपरेच्या असू शकतील, जसे आपल्याकडचे आदिवासी हे थोड्या वेगळ्या परंपरेचे असतात.
पण केवळ इतक्यामुळे तो भाग हिंदूबहुल होता असे म्हणणे जरा धार्ष्ट्याचे ठरावे.
मग त्यावेळचा तो 'गंधारी / अफगाणी' समाज कोणत्या धर्मतत्वाच्या प्रभावाखाली होता वा अनुयायी होता. ?? याबद्दल काही लिहा.

मग त्यावेळचा तो 'गंधारी / अफगाणी' समाज कोणत्या धर्मतत्वाच्या प्रभावाखाली होता वा अनुयायी होता. ?? याबद्दल काही लिहा.
अफगाणी समाज इस्लामच्या उदयापूर्वी ढोबळमानाने कुठल्याच धर्माचा अनुयायी नव्हता असे म्हणता यावे. इथल्या भूभागावर पर्शियन, मेसेडोनीयन, तदनंतर अशोक अशा मोठ्या राजवटी नांदून गेल्या. त्याच अनुशंगाने इथे झोराष्ट्रीयन, हेलेनिस्टिक, बौद्ध, हिंदू प्रभावाखाली हा भाग राहिला असे म्हणता यावे. इथल्या टोळ्या मात्र बहुतांशी धर्मविहिन राज्यविहिन अशा भटक्या होत्या. परकीय राजवटी स्थानिक टोळीप्रमुखांना (वॉरलॉर्ड्स) हाताशी धरुन आपला कार्यभाग साधून घेत. थोडाफार धर्मप्रसार झालाही असेल पण संपूर्ण अफगाणी समाज कुठल्याच एका धर्माचा संपूर्ण अनुयायी झालाय असे इस्लामपूर्वकाळात कधीच झाले नाही. मधे अधे सेलुसिद, शक, हूण, कुशाण अशा राजवटीसुद्धा येथे राज्य करुन गेल्या. इथल्या कठीण भौगोलिक प्रदेशामुळे कुठल्याही एका धर्माला इथे सार्वभौम राजवट स्थापणे शक्य झाले नाही. जो काही बदल झाला तो इस्लामच्या उदयानंतरच.

हिंदू शाही हे नाव अरब सोर्सेसमध्ये दिल्याचे वाचले आहे. ते पहिल्यांदा पर्शियनांनी दिले असावे. बाकी संस्कृतचा प्रभाव सगळीकडे होता हे आहेच, पण मेन मुद्दा हा आहे की तत्रस्थ शिलालेख हे ज्या भाषेत आहेत ती भाषा अन्य भागातील शिलालेखांच्या भाषेपेक्षा संस्कृतच्या अतिशय जवळ आहे. इरफान हबीबने प्राचीन भारताचा एक अ‍ॅटलास बनवलाय त्यात हे मस्त दाखवलेले आहे. एक साधे उदा. सांगतो, "ष" हे अक्षरचिन्ह केवळ तिथल्या शिलालेखांत दर्शवलेले आहे. पाणिनी हा शालातुर नामक गावातला होता. हे गाव गांधार भागात असल्याचे प्रसिद्ध आहे. बाकी अशोकानंतर तिथे बौद्ध धर्म गेला ही वस्तुस्थिती आहे, परंतु हिंदू धर्माचा प्रभाव मात्र तिथे लै अगोदरपासून आहे.

वैदिक संस्कृतीचे आद्यस्थान इतकीच त्याची ओळख नाही, तर भारताची किल्ली म्हणूनही त्याचे महत्त्व अपरंपार आहे. सहमत. मध्या आशिया आणि दक्षिण आशिया यांना विभागणार्‍या हिंदुकुश या हिमालयाच्या पर्वतशाखेचे नावाचा अर्थ पर्शियन भाषेत हिंदूंचे रक्त / शिरकाण केलेली जागा असा आहे. याचाच अर्थ असा की या पर्वतशाखेने इराण आणि मध्य आशिया पासून हिंदू समजला जाणारा दक्षिण आशिया विभागला गेला होता. हे दोन भूभाग अगदी मुस्लीम आक्रमणापर्यंत सांस्कृतिकरित्या एकमेकापासून वेगळे ठेवण्यात तेथिल कडव्या राज्ये / टोळ्या यांच्याइतका हिंदुकुश पर्वतरांगांतील अवघड भौगिलिक परिस्थिती आणि हवामान यांचाही निर्विवाद वाटा होता.

लेखमालेतले सारेच लेख आवडले - विशेषतः वैयक्तिक अनुभवांतून आले असल्याने पहिले दोन काकणभर अधिकच. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

तालिबानसोबत ‘अल-कायदा’ आले.
तालिबान ही अफगाणिस्तानपुरती मर्यादित संघटना होती. मी वाचल्या प्रमाणे मुल्ला ओमर नं ओसामा बिन लादेन ल आश्रय दिला होता. पण अल-कायदा नं आपल्या कारवाया अफगाणी भूमीवरून पण चालू ठेवल्या. तालिबान ला सुरवातीला ते सगळं अभिमानास्पद वाटलं. पण जेव्हा अल-कायदाच्या कारवाया अमेरिकेविरूद्ध चालू झाल्या (१९९८ मध्ये अमिरिकेच्या सुदानिज एम्बसी वर हल्ला झाला) तेव्हा राष्ट्रपती क्लिंटन यांनी तालिबानवर अफगाणिस्तान मध्ये मिसाईल हल्ला केला. मुल्ला ओमर यातून वाचला पण तालिबान च्या मनातून लादेन आणि अल-कायदा उतरायला सुरवात झाली. पण त्यांना काही करता सुद्धा येत नव्हतं कारण त्यांनी लादेनला सहकार्याचं वचन दिलं होतं. तालिबाननं लादेनला अमेरिकेच्या ताब्यात द्यायचं नाकारलं आणि मग ट्विन टॉवर आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे. ओसामा बिन लादेनच्या पत्नीनं एक पुस्तक लिहिलय ज्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर मिळवून वाचावं. बाकी अल-कायदा आणि तालिबान मधला फरक म्हणजे अल-कायदा ही अरब संघटना आहे. अरब हे मुळातच भडक डोक्याचे (खरं तर बिनडोक्याचे) असतात. बाकीच्या जगातही अरबांशी व्यवहार करणं म्हणजे डोकेदुखी असंच मानलं जातं. इराण हा आशियन असल्यानं त्याचं अरबांशी जमत नाही. इराणियन स्वतःला अरबांपेक्षा वेगळे आणि हुशार मानतात आणि ते बहुधा आहेतही.

इराणियन स्वतःला अरबांपेक्षा वेगळे आणि हुशार मानतात आणि ते बहुधा आहेतही.
खरंय, माझं नासामधे काम करणार्‍या एका ईराणी माणसाबरोबर बोलणेही झाले. याउलट पाकीस्तानी लोक मात्र स्वतःची मुळं अरबांमधे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अजुनही काही पाकीस्तानी मुस्लीम हे मान्य करतात की ते कधीतरी हींदू होते. खालील लिंक पहा https://www.youtube.com/watch?v=d8Xqy_sHVWE

>>> ओसामा बिन लादेनच्या पत्नीनं एक पुस्तक लिहिलय ज्याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते जरूर मिळवून वाचावं. त्या पुस्तकाचे नाव "ग्रोइंग अप बिन लादेन". लादेनची पहिली बायको नज्वा बिन लादेन, त्याचा मुलगा व इंग्लंडमधील एका महिला पत्रकार यांनी एकत्रितपणे हे पुस्तक लिहिले. याचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त लादेनच्या भावजयीने लिहिलेले देखील एक पुस्तक आहे. तेदेखील मराठीत अनुवादीत झालेले आहे.

ह्या लेखात स्वानुभवाएवजी विवेचन जास्त आले तरीही तुम्ही स्वतः परिस्थिती जवऴून बघितली असल्याने हे विवेचन नुसतेच पुस्तकी नाही हे पटते.
कोणत्याही समाजात फार कमी लोक सुधारणेस उत्सुक असतात; कुणालातरी सुधारणेचे मुद्दे रेटून न्यावे लागतातच. सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते.
हे पटले. हे सर्वदूर लागू होत मग ते कुटुंबात असो, समाजात कींवा कॉर्पोरेट जगतात.

लेखमाला आवडली. अतिउत्साहाने लिहितांना धर्म, इतिहास, समाजजीवन, अर्थकारण, भौगोलिक रूपरेखा हे सर्व एकदम एकाचवेळी येतंय. इतर संस्थळांवरही लेखाची भलामण होत आहे.

सुरेख लेखमाला.. अन् नेहमीप्रमाणेच त्रयस्थ्-पणे केलेले विवेचन आवडले, त्यातही स्वत: अशा परिस्थीतीत असताना ! अफगाणी लोकांविषयी नेहमीच कुतुहल वाटत आलेले आहे..शूर, धाडसी, देखण्या अशा लोकांच्या ह्या प्रदेशाची झालेली धूळधाण कायम मनात प्रश्न ऊभा करते की कदाचीत हे लोक मनस्वी अन कुणावरही विश्वास ठेवून त्यासाठी काहिहि किंमत द्यायला तयार असावेत, म्हणूनच वेळोवेळी त्यांचा वापर अनेकांनी करुन घेतला पण त्यांच्या वाट्याला काहिच आले नाहि. या लेख्-मालेत खुद्द अफगाणी लोकांच्या स्वभावा-बाबत वाचायला मिळेल अशी आशा करतो. प्.भा.प्र. -पहाटवारा

अफगाणिस्तानविषयी फर्स्ट हँड अनुभव असलेल्या व्यक्तीकडून येणारं लिखाण आणि ते ही अत्यंत संयत असं लिखाण वाचायला मिळतंय म्हणजे पर्वणीच. अर्थातच, वाचतोय... :)

तीनही भाग एकत्र वाचले. लेखमाला माहितीपूर्ण आणि उत्कंटावर्धक आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे. काही वाक्य खूप आवडली.
आपल्या प्रतिक्रिया फार “क्षणिक” असतात, त्या बदलतात हे मला माहिती होतं आजवरच्या अनुभवाने.
सुधारणा म्हणजे प्रस्थापित हितसंबंधांना धक्का. आपल्या समाजातल्याही कित्येक महनीय व्यक्तींचं जीवन आणि कार्य आपल्याला हेच सांगते. शिवाय कालपरत्वे कोणत्याही समाजाचा सुधारणांचा प्राधान्यक्रम आणि त्या पचवायची ताकद लक्षात घ्यावी लागते.

एक मोठ्ठा मुद्दा इथे दुर्लक्षिला गेला आहे तो म्हणजे इस्लाम. १४०० वर्षे जुन्या ह्या धर्माचे मूळ रुप पुन्हा पुनरुज्जिवित करावे म्हणून अरबी पैसा (विशेषतः सौदी अरेबिया) बाकी देशात खर्च केला गेला. कुठलेही कर्तृत्व नसताना दैवयोगाने खाली तेल सापडले आणि ते विकून अमाप पैस मिळवला त्याचा "सदुपयोग" हा बाकी देशातील सौम्य होत जाणारा इस्लाम बदलून त्याला त्याच्या मूळ रानटी, कडव्या, असहिष्णू रुपात आणायचा चंग गेल्या ५० वर्षात बांधला गेला आणि सगळे इस्लामी जग ह्या विषात आकंठ बुडत आहे. अफगाणिस्तानचे बेचिराख होण्यामागे इस्लामचे कडवेपण हे एक मुख्य कारण आहे. मुळात इस्लाम हा सुधारणांना विरोध करतो. आपले धर्मग्रंथ हे देवाचा अखेरचा शब्द आहे आणि त्यात काडीचाही बदल होणे नाही, त्याला कालबाह्य ठरवता येणार नाही अशी ताठर भूमिका असल्यामुळे हा धर्म अशा वहाबीकरणाला सहज बळी पडतो. म्ह्णून धर्मनिंदा वगैरे केल्यास मृत्यूदंड दिला जातो. धर्म बदलल्यास मृत्यू दिला जातो. हा मुद्दाही चर्चिला गेला पाहिजे.