Welcome to misalpav.com
लेखक: आकाश खोत | प्रसिद्ध:
नुकतीच अमिताभ बच्चन यांची एक सुंदर मुलाखत पाहण्यात आली. चक्क अर्णब गोस्वामीने अमिताभना या मुलाखतीत बोलू दिलं. :D या मुलाखतीत अमिताभ यांनी त्यांचे वडील (महान साहित्यिक) हरिवंशराय बच्चन यांचा एक किस्सा सांगितला. एकदा अमिताभ काही समस्यांमुळे त्रस्त होऊन वडिलांकडे गेले. आणि त्यांना तक्रारीच्या सुरात म्हणाले, "बाबूजी, जीवनमे बडा संघर्ष है" त्यावर हरिवंशराय यांनी उत्तर दिले "जब तक जीवन है, तब तक संघर्ष है". अगदी सहज त्यांनी एवढं समर्पक उत्तर दिलं. संघर्ष हा जीवनातला एक त्रासदायक टप्पा नसून आयुष्यभर असणार याची जाणीव करून दिली. आपल्याला नेहमी भरपूर अडचणी येत राहतात. कधी घरात, कधी बाहेर, मनाच्या, शरीराच्या, माणसांच्या, तंत्रज्ञानाच्या अशा कितीतरी प्रकारच्या अडचणी. अडचणी आल्या नाहीत असा माणूस मिळणे अशक्य आहे. आपल्याला काही श्रीमंत, प्रसिद्ध लोकांकडे पाहून वाटतं, यांचं आयुष्य किती सोपं आहे. कसलीहि अडचण नसेल. पण श्रीमंतीची आणि प्रसिद्धीचीसुद्धा एक किंमत असते. श्रीमंत माणूस अनेकांच्या डोळ्यात खुपतो. त्यांना खंडणीसाठी धमक्या येतात. व्यवसायात अडचणी असतात. आपलं वर्चस्व, धन टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांनासुद्धा झगडावंच लागतं. किंबहुना बराच संघर्ष करूनच ते त्या पदी पोचलेले असतात. हा संघर्ष आपल्या नजरेआड होतो. Amitabh Bachchan with his father स्वतः अमिताभ यांचच आयुष्य बघा. त्यांनी सुरुवातीला अभिनेता म्हणून स्थान निर्माण करण्यासाठी तर संघर्ष केलाच. तो तर प्रत्येक अभिनेत्याने केलेला असेल. तरुण वयात असे संघर्ष करण्याची ताकद आणि धमक माणसात असतेच. पण शिखरावर असताना आपल्या काही व्यावसायिक चुकांमुळे ज्या माणसावर दिवाळे निघण्याची वेळ येते. त्यातुन जिद्दीने आणि मेहनतीने पुन्हा बाहेर येउन शिखराकडे जाण्याचा जो संघर्ष अमिताभ बच्चन यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात करून दाखवला त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि त्याला फिनिक्स पक्ष्याचीच उपमा द्यावी लागते. आपण सामान्य माणसांच्या संघर्षाची यादी करायलाच नको. ती कोणीही देऊ शकतो. संघर्ष हा शब्द ऐकला कि लगेच मनात एक त्रासदायक भावना येते. त्या शब्दाशी आपण त्रास, अडचणी अशा गोष्टी जोडल्या आहेत. आपण जोडल्या म्हणण्यापेक्षा त्या संघर्षाच्या व्याख्येतच आहेत. पण जर आपण या संघर्षाशी जोडलेल्या काही छान गोष्टींचा विचार केला, तर संघर्षाची किंमत कळेल. उदा.. शिकवण, आठवण, मजा, आनंद. काही चुकलं का? या गोष्टींचा संघर्षाशी काय संबंध असं वाटतंय? प्रत्येक संघर्ष आपल्याला काहीतरी शिकवूनच जातो. आपल्या अनुभवात आणि ज्ञानात भर घालतो. काही संघर्ष न करताच सगळं काही मिळायला लागलं तर कसली मजा? जी गोष्ट संघर्ष करून आपल्याला मिळते तिचाच आपल्याला जास्त आनंद होतो. तीच गोष्ट आपल्या जास्त लक्षात राहते. तुम्ही आतापर्यंत चित्रपटगृहात जाउन कितीतरी चित्रपट पाहिले असतील. पण जो चित्रपट पाहताना सगळ्यांसाठी तिकिटे मिळवण्यापासून ते वेळेवर तिथे पोहचेपर्यंत तुमची धांदल उडाली असेल, तीच मजेदार आठवण जास्त लक्षात राहते. बाकी कितीतरी वेळेस अगदी सहज तिकीट मिळून जातं. जाताना येताना काही घडत नाही. चित्रपटात काही विशेष असेल तरच त्या गोष्टी डोक्यात रेंगाळतात, पण बाकी खास आठवण म्हणून काही राहत नाही. आपल्या कामातसुद्धा काही अडथळे न येता काम चालु राहिलं तर ते आपल्याला हवंच असतं. पण खूप दिवस तसं झालं तर त्या कामातसुद्धा काही आव्हान राहत नाही. तोचतोचपणा येतो. काही लोक तर पैशापेक्षाही आव्हानासाठी नोकऱ्या बदलतात. जेवणाच्या ताटात गोड पदार्थ बहुतेक सर्वांनाच आवडतो. पण म्हणून आपण फक्त गोडाचं जेवण करायला गेलो तर त्रास होतो. आपल्याला काहीतरी चमचमीत, तिखट हवंच असतं. संघर्ष हा आपल्या आयुष्यातला मसाला आहे. तो नसला तर अगदी सपक अळणी असं आपलं आयुष्य राहील. संघर्ष हि आपल्याला खूप काही मिळवण्याची संधी आहे. एखादी गोष्ट सहजगत्या मिळेल त्यापेक्षा संघर्ष करून मिळवताना आपल्याला बराच फायदा होऊ शकतो. एखादी समस्या सोडवण्याचे नवे मार्ग समजू शकतात. आपला कणखरपणा वाढू शकतो. काही नवी कौशल्ये आपल्या अंगी येऊ शकतात. आपण एखादी गोष्ट करू शकू असं वाटत नसतानाही त्या संघर्षापायी आपल्या हातून आपल्यालाच अशक्य वाटणारी गोष्ट घडू शकते. आपण जाणूनबुजून संघर्ष करावाच असं नाही. पण कधी संघर्ष वाट्याला आला तर त्याचा ह्या दृष्टीने विचार करावा. त्याने आपल्याला काय काय मिळतंय हे डोळसपणे पाहावं. त्याची चव चाखावी आणि लक्षात ठेवावी. कारण… जब तक जीवन है, तब तक संघर्ष है…
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लेख आवडला. माझ्या कठीण काळात शिवाजी महाराज आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या जिवनाकडे बघून खूप प्रेरणा मिळाली. भयंकर चढ-उतार असलेले त्यांच्या आयुष्य, त्यांची हार न मानण्याची वृत्ती बरंच काही शिकवून गेली. त्याबद्दल आयुष्यभर त्यांचा ऋणी राहीन.

लेख आवडला रे आकाश्या.बाकी बॉलीवूडवाल्यांचे 'संघर्ष' काय असतात ह्याची कल्पना आहे.पण एकदा जोरदार यश मिळाले की त्या 'संघर्षाचे' भांडवल करणे ओघाने आलेच.मग अमिताभ हा राजीव गांधींचा मित्र,त्याची आई ही खुद्द इंदिरा गांधींच्या खास वर्तुळातील मैत्रीण...ह्या कशाचाही उपयोग झाला नसेल असे आपण समजून चालुया.मग 'मुंबईत वडापाव खाऊन दिवस काढलेत' ह्या त्याच्या विधानावर मग आमचे लोक टाळ्या वाजवतात.

हो ना माईसाहेब! काय हो "आकाश्या???" त्या बच्चनची मुलाखत बघण्याऐवजी इकडे सरळ माईसाहेबांच्या कडे यायच ना? सगळ आखों देखा सांगितल असत तुम्हाला. कुठल्या त्या अर्णब का फर्णब्च्या नादाला लागला राव. आता इथुन पुढे लक्षात ठेवा काय बी लागलं आन कदीबी माईसाहेब गाठायच्या सगळ्याच्या आधी काय?

माईसाहेब, गांधी परिवार किंवा अशा राजकारण्यांच्या वर्तुळात अनेक चमचे असतील. त्यातले सगळेच अमिताभ बच्चन होत नाहीत. माणसात स्वतःच कर्तुत्व असावंच लागतं. आणि अमिताभच्या दुसऱ्या इनिंगमधल्या ज्या संघर्षाबद्दल मी बोलतोय तेव्हा इंदिरा गांधी, राजीव गांधी दोघेही निवर्तले होते. त्यांची कंपनी कर्जबाजारी झाली होती. कौन बनेगा करोडपती आणि अशी मिळतील ती कामे करून त्याने पुन्हा उभारी घेतली. कोणाच्या कहाणीतून आपण काय घ्यावे हे आपल्यावर आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

धीरुबाई अंबानी सुरवातीला पेट्रोल पंपावर कामाला होते.. पुण्यातले एक प्रसिद्ध बिल्डर आविनाश भोसले आधी रिक्षा चालवत होते... या स्टो-या पण येऊ द्यात मग ....

ज्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी माणसे असंख्य आहेत. त्या सगळ्यांकडून जे शिकण्यासारखं आहे, ते शिकण्याचा प्रयत्न आपण करावा. नाही का?