Welcome to misalpav.com
लेखक: चिनार | प्रसिद्ध:
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा." हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?" मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?” बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!" मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!" त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही ! ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे. "आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं. मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या" यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते." उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !" थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल" पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल. काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आमच्याकडे मेक्सिकोवाडीचे टम्म फुगलेले रुचकर पॉपकॉर्न्स मिळतील (तसेच शेवया, उदबत्त्या, सागरगोटे आणि बारीक दातांच्या फण्या ऑर्डरनुसार रास्त दरात मिळतील) अशी पाटी लिहुन मी स्वतःच कारखाना टाकेन (आणि चालवेन) म्हणतो.

लावाच!! पाचेक महिन्यातनं एकदा तरी हा विषय उचल खातोच. वाया म्हणून जायचं नाही काही. अगदीच नाही तर शाकाहारी-मांसाहारी, लग्नाळू-बिनलग्नाळू, स्त्रीसमानतावादी-द्वेष्टे, मध्यवर्ती-विनामध्यवर्ती ठिकाणे, काटाकिर्र बरी की मामलेदार, ब्राह्मण-ब्राह्मणेतर , सकच्छ-विकच्छ वस्त्रे यासारख्या कुठल्याही विषयावर सहज खप होईल.

पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा टब शोधणे आले.
मागच्या वेळेचा संपला का ? अवांतर : आणि ती टबवाली आहे ना, नै तर तिलाही शोधणे आले.. ;) (तुम्ही विवाहीत असाल तर हे अवांतर तुमच्या भावना दुखावणारे ठरु शकते तेव्हा त्या केसमध्ये अवांतरास इग्नोरणे)

मागच्या वेळचा मागच्या वेळच्या धाग्यावर. आता या धाग्यावर नवीन!! ;) टबवाली पण नवीन आली तरी चालेल. तुम्ही भारीच काळजी करताय ब्वॉ!!

अरेरे.. मला वाटलं गावच्या मातीचा संस्कार विसरला नसाल. जाउद्या पुण्यातल्या प्रदुषणाचा फारच वाईट परीणाम झालेला दिसतोय तुमच्यावर.

मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही ! असोच!!
हेच विदर्भातल्या शेतकर्‍यांना पण सांगा. थोड्यातरी आत्महत्या कमी होतील.
मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं
पाऊस पडल्यावर पाणी पडले विदर्भातच म्हणतात ना, अहो प्रत्येक भागाची एक बोलीभाषा असते त्याची टर उडवण्यापेक्षा ती आत्मसात केलेली बरी बाकी कोथरुड्मधे इतके विदर्भ मराठवाडा पब्लिक राहतय की पुढे-मागे विदर्भ वेगळा झालाच तर त्याला कोथरुडपण जोडुन टाका असा प्रस्ताव या धाग्याच्या निमित्ताने मी मांडतो

बरोबर! या शब्दांचा खरा अर्थ विदर्भ -मराठवाड्यात राहिल्यावारच कळेल आणि नळातून पाणी येत असते यावरून विश्वास उडेल !

हेच विदर्भातल्या शेतकर्‍यांना पण सांगा. थोड्यातरी आत्महत्या कमी होतील. लेख वास्तववादी आहे हे यावरून सिद्ध झाले !

कढीला ऊत.. असो... शुभेच्छा. पिंचिंकर आम्चे येथे कशाचाही कशासही कसाही कोणताही बिनबुडाचा संबध लावून मिळेल. स्वरक्तवर्ण्सुशेभीत्भडास्विमोचन्रेचक्संग्रीहीत्कुठीत्ल्प्विचारस्वप्रेदश्दुराभिमानीइतरेजन्चाय्कम्पानीस्वप्नरंजन्रेचक केंद्र तर्फे.. आतून साफ तर बाहेरून साफ या योजनेअंतर्गत "ब्लाईंड फ्लु" निवारणार्थ प्रसारीत.

४ तास आणी फक्त ५२ प्रतिसाद. ३ तासात ३९ आले होते. बघितले ना मी तासाभरापुर्वी. तासाला १३ हा आकडा तसा वाईट नाही पण पुणे या विषयाचा आवाका लक्षात घेता फारच कमी. कमॉन लोक्स धागाकर्त्याला असे निराश नका करु. हुकुमाचा एक्का वापरुनही जर त्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया नाही पडल्या तर त्यांचा किती मोठा हिरमोड होइल याचातरी जरा विचार करा.

नेहेमीपेक्षा वेगळे मुद्दे आहेत हे पाहून बरं वाटलं! तेच तेच कौतुक नको वाटतं एरवी. (अट्टल पुणेकर) जे.पी.

मराठीचा जाज्ज्वल्य अभिमान बाळगणार्‍या पुण्यात अर्धवट इंग्रजी व अर्धवट मराठी व अन्य सरमिसळ असणारी जागांची नावे इतकी लोकप्रिय का हे मला न उलगडलेले कोडे आहे. पेरूगेट, स्वारगेट, फूलगेट, म्हसोबा गेट. झालेच तर जिमखाना. लकडी पूल.

+१ बिबवेवाडी, हिंजवडी, धनकवडी, वाकडेवाडी, खडकी, दापोडी, बोपोडी..... मुंबईत नावांचे वैविध्य मस्तच एक नाव दुसर्‍यासारखे नाही दादर, परळ, बोरीवली, मुलंड, भांडुप, घाटकोपर, जुहु, वांद्रा, सायन, अंधेरी, भायखळा...

बोरीवली कांदीवली डोंबीवली चांदीवली आजच्यापुरते एवढे सामान्यज्ञान पुरे !

आणि वर निव्वळ यमक साधण्यासाठी यडचाप मुंबैकर माऊंटमेरीचेही मोतमावली करतात

यमकंच जुळवायची असतील तर धारावीचं 'धारावली' करा. म्हणजे एक वेगळंच चित्र उभं राहील. आम्ही मुंबईकर असल्यामुळे 'सात भिकार' म्हणायला तयारच आहोत. बाकी, पुणेकरांना डिवचणं पण एवढं सोपं नाही, हे लक्षांत आलंच असेल.

आत्ता खरी गरज आहे ती विदर्भ /ग्रामिण भागातील आत्महत्याग्रस्त/ प्रवुत्त शेतकरयांच्या मदतीला धावून जाण्याची . त्यासाठी शहरांचा /पुण्या/मुंबइचा मोह तात्पुरता बाजुला ठेवला पाहिजे .

ती विदर्भ /ग्रामिण भागातील आत्महत्याग्रस्त/ प्रवुत्त शेतकरयांच्या मदतीला धावून जाण्याची
म्हणजे नक्की काय करायचं ओक काका?

अहो तुमचे IT पार्क रिते होतील घरवापसी झाली तर. बरं ते जाऊ द्या ..तुमचे सदाशिवपेठी घर भाड्याने घ्यायला कोणी उरणार नाही त्याचं काय ?

पहिली गोष्ट ते सिरुसेरींना सांङा दुसरी गोष्ट आम्ही घरे भाड्याने द्यायचे उद्योग करत नाही. एखादा गरजु असेलच तर आम्ही उदार मनाने त्याला हो म्हणतो. तिसरी गोष्ट बाहेरच्यांनी पुणेकरांच्या घरापेक्षा स्वतःच्या पोटाची काळजी घ्यावी. चौथी गोष्ट गरज पडल्यास पुणेकर आयटीची गरज शमवण्यास समर्थ आहेत. पाचवी गोष्ट ती बदनाम झालेली सदाशिव पेठ बाहेरच्या लोकांमुळे आहे तर? बाहेरचे उद्दाम लोक आले, सदाशिव पेठेत भाडेकरु म्हणुन घुसले (इअत्के की ते नसतील तर घरे भाड्याने घ्यायला कोणी उरणारच नाही आणि घरे ओस पडतील) आणि पुणे बदनाम झाले.

ते पाणीही पुण्याचेच असेल. तुमच्याकडे नाही म्हणुन तर तुम्ही इकडे आलात ना? किती जळजळ झाली ना तुमची बाकी तुमचा पुण्याला उपयोग नाही हे ऐकुन.

पाणी तुमच्यावर टाका असं म्हणायचं होता जाउद्या टायपो झाली .. बाकी आमच्यावर टाकणार असाल तर अजित दादांच्या धरणातला नका टाकू हो !