Welcome to misalpav.com
लेखक: शिव कन्या | प्रसिद्ध:
एका कुरणात एक कोकरू आपल्या आईबरोबर चरत होते. त्याचवेळी एक गरुड, उंच आकाशातून वखवखलेल्या नजरेने त्या कोकराभोवती घिरट्या घालू लागला. गरुड खाली झेपावून कोकरावर झडप घालणार, इतक्यात आकाशात दुसरा एक गरुड हावरट पणे गिरक्या घेऊ लागला. त्याचीही नजर त्या कोकरावर अन त्याच्या आईवर! ते पाहून पहिला गरुड खवळला. त्या दोन पक्षीराजांमध्ये जमिनीवरील कोकरासाठी आकाशातच युद्ध सुरु झाले. त्यांच्या कर्कश आवाजाने आसमंत भरून गेला. कोकराच्या आईने वर पाहिले. त्यांच्यातले भयाण भांडण पाहून ती आपल्या कोकराजवळ आली, म्हणाली, 'मुला, या दोन महान पक्षीराजांनी एकमेकांवर आक्रमण करावे, हे किती विचित्र आहे! हे अमर्याद आकाश याना पुरेसे नसेल काय! माझ्या पिल्ला, मनातल्या मनात तू देवाला प्रार्थना कर की, देवदूतासारखे पंख लाभलेल्या तुझ्या आकाशातील भावंडांमध्ये शांतता निर्माण होऊ दे. त्यांच्यातील भांडण मिटू दे!' ....... आणि त्या निष्पाप कोकराने पटकन डोळे मिटून परमेश्वरापाशी प्रार्थना करायला सुरुवात केली! - 'War and the Small Nations' या खलील जिब्रानच्या रूपक कथेचा भावानुवाद.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

त्या कोकराला हे ठाऊक नाही की काहीही झाले कोणीही जिंकले किंवा आकाशातील भावंडांमध्ये सलोख झाल्यानंतर कोकराचाच बळी जाणार आहे. आकाशातील दोन्ही भावंडे जर दोघेही हरली ( जखमी झाली ) तरच कोकरु वाचू शकेल. त्या दोघात सत्ता संघर्ष चालू असेल तोवर कोकराला भय नाही. ही वस्तुस्थिती आहे.

+१ पण... त्या दोघात सत्ता संघर्ष चालू असेल तोवर कोकराला भय नाही. हे पण तेव्हाच खरे आहे जेव्हा तुम्ही दोन हत्तींच्या मारामारीच्या ठिकाणापासून सुरक्षित अंतरावर असाल !

छान अनुवाद! या रुपकाला युद्धांमध्ये वेळोवेळी होरपळून निघालेल्या जिब्रानचा देश, लेबनॉनचा संदर्भही असावा, असे शिर्षकावरून वाटते.

कथेवरुन समजते की कोकरु आणि त्याची आई हे दोघेही संभाव्य धोक्यापासुन अनभिज्ञ आहेत . त्यामुळे कोकराला सावध करु शकेल असेही तेथे कोणी नाही .

रूपक अतिशय चपखल आहे. अवांतर : युद्धे फक्त छोट्या राष्ट्रांनाच परवडतात असे युद्धशास्त्रात म्हटले जाते.

अवांतर : युद्धे फक्त छोट्या राष्ट्रांनाच परवडतात असे युद्धशास्त्रात म्हटले जाते.
असहमत. नेपोलियनच्या क्यांपेन्स पाहत ते तितकेसे खरे वाटत नाही. विशेषतः रशियन कँपेनमध्ये नेपोलियनला सुरुवातीला यश मिळाले पण रशियनांनी मोठ्या भूभागाचा फायदा उठवत नेपोलियनच्या सैन्याला उपाशी मारले. त्या धक्क्यातून फ्रान्सला सावरायला लै उशीर झाला. तिथून पुढे नेपोलियनला कधीच निर्भेळ यश मिळाले नाही. 'ग्रँड आर्मी' ४-५ लाखांवरून १-१.५ लाखांवर आली होती. तीच गत पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाचीही. ज्यांची औद्योगिक व मनुष्यबळक्षमता जास्त असेल अशा राष्ट्रांनाच युद्ध परवडू शकते- दॅट इज़, सस्टेन्ड बेसिसवर. महायुद्धांत युरोपीय देश लढू शकले कारण तंत्रज्ञान व वसाहतींद्वारे मनुष्यबळ आणि इतर सोयी मिळू शकल्या म्हणूनच. मराठा-मुघल केस याला अपवाद आहे असे एखादवेळेस म्हणता येईलही. पण तिथेही मुघली छावण्यांमधला ढिसाळ कारभार, मराठ्यांनी केलेली लूटमार वगैरे अनेक गोष्टी त्यामागे आहेत. शिवाय तेव्हा मराठे फक्त महाराष्ट्रात नसून कर्नाटक व तमिळनाडूतही पसरले होते आणि तिथून अ‍ॅडिषनल रिसोर्सेस त्यांना मिळत होते. शेवटी रिसोर्स मोबिलायझेशन ज्यांना पटकन मोठ्या प्रमाणावर जमू शकते ते जिंकतात. मोठी राष्ट्रे कैकदा छोट्या राष्ट्रांकडून हरतात, पण झालेले नुकसान भरून काढणे हे मोठ्या राष्ट्रांना तुलनेने सहज जमते. एक उदा. म्हणजे स्पेनने १५७१ साली तुर्कांचा बॅटल ऑफ लेपांटो मध्ये पराभव केला पण तुर्कांनी लगेचच काही वर्षांत त्याची भरपाई केली. http://en.wikipedia.org/wiki/Battle_of_Lepanto#Aftermath

हा फारच अभ्यासपूर्वक बोलण्याचा विषय आहे. काही दिवसांत सविस्तर प्रतिसाद देतो. सध्या फक्त मोबाइलवरून मिपा-मिपा सुरू आहे.

इतक्या सगळ्या इतिहासातून तावून सुलाखून निघालेला व्हिएतनाम सद्या उत्तर्पूर्वेतील चीनला भिक न घालणारी एक ताकद म्ह्णून उदयाला आली आहे आणि अमेरिका त्याच्याशी मित्रत्वाचे संबंध स्थापित व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. किंबहुना व्हिएतनाम सर्व जगात असा एकुलता चिमुकला आशियाई एक देश आहे की ज्याने दोन प्रबळ आधुनिक सामरीक सत्तांना युद्धात घूळ चारली आहे... अमेरिकेला व्हिएतनाम युद्धात आणि चीनला कंबोडियन युद्धात !

राष्ट्र छोटे वा मोठे कसेही असो..... युद्ध कुणालाच कुठल्याही अर्थाने परवडत नसते . तरी ती होत राहतात, होऊ दिली जातात, घडवून आणली जातात.... रूपकाचा उलगडा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार.

व्हिएतनाम युद्धात सर्वात अधीक हानी झाली ती अमेरीकेचीच. धरले तर चावते सोडले तर पळते अशी अवस्था होती त्यांची. केनेडी च्या कर्माची फळे तो आणि त्याच्या नंतरच्या तीन राष्ट्राध्यक्षानी भोगली

केनेडींच्या काळात अमेरिकन्स दक्षिण व्हिएटनाममध्ये सल्लागार या भूमिकेत होते. व्हिएटनाममध्ये अमेरिकन सैन्य घुसवलं लिंडन जाॅन्सन यांनी. त्यांचे सेक्रेटरी आॅफ स्टेट डीन रस्क आणि सेक्रेटरी आॅफ डिफेन्स राॅबर्ट मॅकनामारा यांनी त्यांना भरीस पाडलं. टोन्किन आखातात उत्तर व्हिएटनामी नौदलाने एक अमेरिकन बोट बुडवल्याच्या निमित्ताने जाॅन्सननी थायलंड हा बेस ठेवून अमेरिकन सैन्य घुसवलं. तोपर्यंत सीआयएचा फिनिक्स प्रोग्राम तिथे चालू होता, ज्याअंतर्गत दक्षिण व्हिएटनाममधल्या कम्युनिस्ट सहानुभूतीदारांविरुद्ध गुप्त कारवाया होत होत्या. अमेरिकन सैन्याने तिथे येऊन सरळ हल्ला चालू केला. त्याविरूद्ध उत्तर व्हिएटनामी सैन्याने केलेलं आक्रमण म्हणजे टेट आॅफेन्सिव्ह (Tet Offensive) ज्यात अमेरिकन सैन्याची खूप हानी झाली आणि अमेरिकेतील जनमत युद्धविरोधी झालं. त्यात मी लाई हत्याकांडासारख्या घटनांची भर पडली. जाॅन्सन यांनी फेरनिवडणूक न लढवता निवृत्ती स्वीकारली. मग अध्यक्ष निक्सन आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी अमेरिकन सैन्याची माघार घडवून आणली. अमेरिकेचा आधार गेल्यावर दोन वर्षांत दक्षिण व्हिएटनामचा पाडाव झाला आणि दोन्ही व्हिएटनाम देश एकत्र आले. ही बहुधा १९७५ ची गोष्ट आहे. त्यामुळे जाॅन्सननाच तुम्ही म्हणता तसं फळं भोगायला लागली. निक्सन उलट युद्ध संपवलं म्हणून लोकप्रिय होते. त्यांना वाॅटरगेट प्रकरणामुळे जावं लागलं. नंतरच्या जेराल्ड फोर्ड आणि जिमी कार्टर यांचा युद्धाशी काहीच संबंध नव्हता.