Welcome to misalpav.com
लेखक: कहर | प्रसिद्ध:
"का कुणास ठाऊक पण ऑफिसमधून आज दुपारी ३ लाच बाहेर पडलो. कोणालाच न सांगता . खाली पार्किंग मध्ये पहातो तर काय बाइक गायब. अरे बाप रे ! डायरेक्ट पोलिस स्टेशनला जायला हवे म्हणून निघालो तर गेटवरच बस हजर. अगदी पोलिस स्टेशन च्या पाटीसहीत. याआधी अशा पाटीची बस कधी पाहिली नव्हती . बर बस मध्ये बसलो तर मी सोडून कोणीच नव्हते. अगदी कंडक्टरसुद्धा . बस सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली कि खिडकीबाहेरचे काहीच दिसत नव्हते. ती थांबल्यावर उतरलो नि पहातो तर समोर आफ्रिकेचे जंगल . तसाच जंगलातून चालू लागलो. समोर कॅलेंडरवर दिवसामागून दिवस उलटत होते . शेवटी जंगल संपले नि पुढे सहारा वाळवंट पसरले होते. तिथे बिल गेट्स उभा होता हातात पुष्पगुच्छ घेऊन. त्याने मला मिठी मारली आणि जंगल पार केल्याच्या कष्टाचे फळ म्हणून कंपनीचे पार्टनरशिप ऑफर केली. आणि अचानक तिथे शाहरुख खान प्रकट होऊन बॅंडबाजा वाजू लागला. पण हा बॅंडचा आवाज वेगळा का आहे? टिंग टिंग टिंग … टिंग टिंग टिंग … टिंग टिंग टिंग” काही कळले काय झाले ? अहो याला म्हणतात - "द सक्सेशन्स ऑफ इमेजेस, आइडियाज्, इमोशन्स अँड सेन्सेशन्स दॅट ऑकर इनवोलुन्टरीली इन द माइंड ड्युरिंग सर्टन स्टेजेस ऑफ स्लीप, द कंटेंट अँड पर्पज ऑफ विच आर नॉट डेफिनिटीवली अंडरस्टूड दो दे हॅव बीन अ टॉपिक ऑफ साइंटीफिक स्पेक्यूलेशन, एज वेल एज अ सब्जेक्ट ऑफ फिलोसोफिकल अँड रिलिजिअस इंटरेस्ट, थ्रूआउट रेकोर्डेड हिस्टरी " (बाबा रान्चोदास छांचड प्रसन्न ) सीधी भाषामे बोले तो - दिमागका केमिकल लोचा (इति श्री मुन्नाभाई उवाच ) , इंग्लिशमे ड्रिम, हिंदीमे ख्वाब, ग्रामीण भाषेत सपान आणि शुद्ध मराठीत स्वप्न. स्वप्न म्हणजे मनाचा आरसा असतो, मनी वसे ते स्वप्नी दिसे वगैरे आपण नेहमीच ऐकत आलोय. पण यात कितपत तथ्य आहे याबद्दल शंकाच आहे. म्हणजे बऱ्याचवेळा आपल्या मनातील गोष्टींचा आणि स्वप्नाचा काडीमात्र संबंध लागत नाहि. स्वप्न का पडते? कसे पडते? कोणत्या विषयी कोणते स्वप्न कधी पडेल? वगैरे प्रश्नांची उत्तरे त्या क्षेत्रातील जाणकार शोधत आहेतच. पुराणापासून आधुनिक विज्ञानापर्यंत आजपावतो अनेक सिद्धांत मांडले गेले आहेत. स्वप्नांना नियंत्रित करून आपल्याला हवे तेव्हा हवे ते दाखवणारे यंत्र शोधण्याच्या मागे काही शास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात आहे. पण आपल्याला त्यात रस वाटत नाही. अचानक पडणाऱ्या चित्रविचित्र स्वप्नांनी होणारे मनोरंजन अनुभवण्यात जी मजा आहे ती ज्याची त्यानेच घ्यावी. लहानपणी कधीतरी कुठेतरी दोन शब्द ऐकले ‘स्वप्नाळू डोळे’, तेव्हा आरशात कितीतरी वेळ डोळे पहात बसायचो. आदल्या रात्री पडलेले नि अर्धवट आठवणारे स्वप्न डोळ्यात आत कुठे दिसते का ते. नंतर कळले कि अर्धवट बाहुल्या दिसणाऱ्या पेंगुळल्या डोळ्यांचेच गोड नाव स्वप्नाळू डोळे असे आहे. पण स्वतःच्या स्वप्नाच्या पलीकडच्या स्वप्नाच्या जगाशी पहिला परिचय करून दिला तो जंजीर मध्ये (स्वप्नाळू डोळ्यांच्या) अमिताभला पडत असलेल्या घोडा आणि साखळीच्या स्वप्नाने. आणि तेव्हापासूनच असा स्वप्नातल्या गोष्टींचा भूतकाळाशी संबंध लाऊन आमच्या भूतकाळातील एखादा खलनायकाची शोधमोहीम चालू झाली (त्याकाळी आम्हाला आमच्या शिक्षकांशिवाय दुसरे कोणी दिसले नाही हि गोष्ट निराळी). अमिताभच्या 'देखा एक ख्वाब तो' म्हणत रेखासोबत चालू झालेल्या सिल्सिल्यानेही त्याकाळी सगळ्यांना फार हलवले होते म्हणे. पण तो एकदमच बच्चन होता राव. थोडे 'समजायला' लागल्यावर चोरून पाहिलेले 'लाइन ' चे स्माईल आणि त्यापुढे होणाऱ्या सिल्सिल्यांचा, स्वप्नातही लवकरात लवकर भूतकाळ कसा होईल हि खबरदारी मात्र आईने अंगावरचे पांघरून ओढून नक्कीच घेतली. स्वप्नाबद्दलच्या इतर अनेक गोष्टींमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पहाटेची स्वप्न खरी होणे. खरेच हो! म्हणजे बघा माधुरीचे लग्न झाले, ऐश्वर्याचे लग्न झाले, करीना पण गेली आणि आता तर कॅट आणि दीपिकाची पण चर्चा आहे. नायिका बदलल्या पण त्यांच्याशी लग्नाचे आमचे पहाटेचे गुलाबी स्वप्न खरे होण्याची वाट (आमचे स्वताचे लग्न झाले तरी) आम्ही खूप आशेने अजूनही पहातो. पहाटे स्वप्न पडत नसले तरी बहुतेकांची ‘ही’ मनोकामना माझ्याहून निराळी नसावी बहुतेक. "स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा" असे म्हणत समस्त स्त्री वर्गाला यावर हरकत असेलही. पण मग अपूर्ण इच्छांचे ताण जर असेच स्वप्नात विरून हलके होणार असतील तर त्या स्वप्नांना ‘दोष’ का द्या? साधू-संतांना पहाटेच्या स्वप्नात प्रत्यक्ष भगवंतांनी दर्शन देऊन तळ्यात बुडालेली किंवा जमिनीत पुरलेली मूर्ती दाखवल्याची स्वप्ने सकाळी उठल्यावर पूर्ण झाली आहेत मग आम्हा बापडांनी “आमच्या देव्यांचे आम्हाला स्वप्नातही दर्शन होऊ नये” असा शाप मिळण्याएवढे काय पाप केले जरा कोणी सांगेल का? भयावह स्वप्न हा तर एक वेगळाच विषय आहे. काही लोकांना म्हणे स्वप्नात भूत दिसते. आणि दिसते ते दिसते वर प्रत्येकाला वेगळे वेगळे दिसते. लोक हे पाहून दचकून जागे होतात, दरदरून घाम सुटतो वगैरे प्रकार होतात म्हणतात. दिवसभर असे भूताखेतांचे सिनेमे पहायचे, आम्ही किती धाडसी आम्हाला भीती वाटत नाही असे म्हणत मिरवायचे नि रात्री असे झोपेचे खोब्रे करून घ्यायचे. पण आपला तो पिंडच नाही ना. तसले भयावह काही पहायला आवडतच नाही आणि त्यामुळे तसले ना विचार मनात येतात ना स्वप्ने. एकदा स्वप्नात विक्रमराजा बनलो होतो. तेव्हा वेताळाचे प्रेत झाडावरून काढताच त्याची (आमच्या वजन उचलण्याच्या क्षमतेनुसार) आलिया भट झाली आणि तिने २ स्टेट्स ची स्टोरी सांगून "हे राजा विक्रमा आता जर माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या डोक्याची हजार शकले होतील" म्हणल्यानंतर कोणाला जाग याविशी वाटेल हो. स्वप्नाचे मुख्य शत्रू गजराचे घड्याळ (गाजराचे किंवा गजऱ्याचे वाचू नये हि विनंती). बरोब्बर स्वप्न मोडण्याची वेळ त्याला कशी कळते कुणास ठाऊक? किंवा ६ चा गजर लावला तर ३ तासाचे स्वप्न ३ वाजता चालू व्हायला हवे पण झोपेतही १०-१५ मिनिट उशिरा पोहोचायची आमची वाईट खोड काही जात नाही बहुतेक. बरोब्बर "तो नादान भवरा त्या कळीच्या आजूबाजूस फिरताफिरता तिच्यावर बसणार” … इतक्यात कानाजवळ “ओम गं गणपतये नमो नमः” चालू होते नि कोणीतरी अचानक कीटकनाशक फवारल्यागत तो बिचारा उडत्या जागीच मरून पडतो. बरं अलार्म न लावावा किंवा गुपचूप ‘कोणाच्या’तरी नकळत दोन तास पुढे करावा तर या अलार्म क्लॉक च्या खांद्याला खांदा लावून अंगावरून खस्सकन ओढलेली चादर, सर्रकन उघडलेला पूर्वेकडच्या खिडकीचा पडदा, आणि कधी कधी अगदीच अटीतटीच्या प्रसंगात पाण्याचा तांब्या सुद्धा आपापली कामगिरी नेहमीच चोख बजावताना दिसतात. त्यामुळे अशा कितीतरी आघाड्यांवरती लढता लढता आता हल्ली स्वप्ने सुद्धा डेलीसोप सिरियल सारखी रोज एपिसोड मध्ये ‘टू बी कंटीन्यूड’ ठेऊन मोडण्याचा सराव आम्ही लवकरच चालू करणार आहोत. आता तुम्ही किंवा काही लोक म्हणतात कि स्वप्ने पडणे म्हणजे झोप शांत न लागण्याची लक्षणे आहेत. पण आम्हाला हे काही पटत नाहि. आईच्या गर्भातच मनुष्याचा स्वप्नप्रवास चालू होते असे आम्ही वाचले आहे (कोठे विचारू नये). आणि स्वप्ने पडतातच त्यावेळी जेव्हा मनुष्य त्याच्या झोपेच्या अत्त्युच्च क्षणात असतो. (हेही वाचलेलेच आहे). पण तुम्ही म्हणता तसे हे सारे इथेच थांबते तर कदाचित आम्ही स्वप्न पहाणे सोडले असतेही पण. (हा ‘पण’च नेहमी आमच्या बऱ्याच संकल्पांची सुरु होण्याआधीच काशी करतो) पण नाही ना. जरा कोणत्या यशस्वी मनुष्याचे चरित्र उघडा आणि प्रस्तावना वाचा Reality Is Wrong, Dreams Are Real – Tupac Shakur Great Dreams of Great Dreamers Always Come True – Dr A P J Abdul Kalam Yesterday Is But Today’s Memory And Tomorrow Is Today’s Dream – Khalil Gibran To Accomplish Great Things We Must Not Only Act, But Also Dream – Antole France (जालाहून साभार) हे असले वाचले कि घोडे अडते. कोणत्याही मध्यमवर्गीय सामान्य मराठी माणसासारखी आम्हालाही सुवर्ण भविष्यकाळ घडवून इतिहासात नाव लिहिण्याची हौस आहेच कि. आमच्यातहि एखादा रतन टाटा किंवा धीरूभाई लपलेला असून अशाच एखाद्या स्वप्नातून तो बाहेर येण्याची शक्यता आम्ही नाकारूच शकत नाही. मग असे थोरामोठ्यांचे म्हणणे टाळून स्वप्न पहाणे सोडून द्यायची आमची काय बिशाद. बरोबर ना. ***The End*** काय म्हणालात ? माझ्या या लेखाला साहित्याचे नोबेल भेटले ? खरेच? पेपर मध्ये फोटो आलाय ? बघू ...खरेचकि ? संध्याकाळी नोबेल द्यायला ते घरी येणार आहेत ? पोहे तयार आहेत ? बाहेर गल्लीत स्टेज बांधले आहे ? बराक ओबामांच्या हस्ते मी नोबेल घेतोय? नोबेल पुरस्कारात गणपतीची मूर्ती कधीपासून द्यायला लागले? असो प्रचंड टाळ्या … बॅंड …फटाके … डॉल्बी … डी जे चालू… नाचो … कोणते गाणे आहे ? ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नमः …
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

खुप छान लिहिलय. स्वप्नात/झोपेत बोलण्याबद्दल नाही लिहिलत. मी स्वप्नात नेहमी बोलतो आणि मला ह्या गोष्टीची नेहमी काळजी असते कि मी झोपेत काही मुलींबद्दल तर नाही ना बोलत.! उगाच लोचा व्हायचा. कारण मम्मी झोपली तरी तिचे कान जागेच असतात! त्यासाठी मी mobile चा sound recorder सुद्धा ट्राय करून पाहिला. पण प्रयोग success नाही झाला.

चांगला विषय निवडलात लिहायला. माझ्या स्वप्नांबाबत माझे निरिक्षण. अमेरिकेत स्थायिक होऊन पाच वर्षे होत आली तरी मला एकदाही अमेरिकेत असल्याचे स्वप्न पडले नव्हते. शेवटी एक दोनदा पडले. अजुनही माझ्या बहुतांश स्वप्नात भारतच असतो. त्याखेरीज बरेचदा मला बस, ट्रेन, विमान पकडताना उशीर झाला आहे अशा आशयाचे स्वप्न पडते. शिकत असताना जवळजवळ दर वर्षी परीक्षा झाल्यानंतर पेपरची वेळ संपली तरी माझा पेपर निम्माही सोडवून झालेला नाही अशी स्वप्ने पडत असत. नोकरी सुरू झाल्यावरही कधी कधी अशी स्वप्ने पडत.

धन्यवाद. मलाही पडतात अशी परीक्षेची स्वप्ने पण त्यात बऱ्याचवेळा मी कॉपी करून पास झालेले दिसते *lol* *LOL*

मला पास ऑट होऊन ८ वर्षे झाली आता, पण अजूनही सब्मिशनची स्वप्ने पडतात.. आपल्या जर्नलचा अजून पत्ताच नाही आणि सब्मिशन अणि ओरल तर तिकडे सुरू झालेय अशी.. त्याची इंटेन्सिटी देखील हळू हळू वाढत जात आहे :)

मला पण ही परिक्षांची स्वप्ने पडतात नेहमी. भलत्याच विषयाचा अभ्यास करुन जाणे, काहीही न येणे, लिहायला वेळ न पुरणे. असली स्वप्न असतात जनरली. एकदा तर स्वप्नात पाच वर्षापुर्वी झालेल्या परिक्षेचे पेपर तेव्हा फुटले होते हे आत्ता सरकारच्या लक्षात आल्याने त्यांनी मिळालेली डिग्री रद्दबातल केलेल्याचे आणि आठ दिवसात परत परिक्षा घ्यायचे पत्र पाठवले होते. आता आठ दिवसात तो पाच वर्षापुर्वीचा अभ्यास कसा करणार म्हणत मी रडत उठले होते. आत्ता कालच्याच स्वप्नात, मला प्रश्नपत्रिका म्हणुन ,न्युजपेपर मधे छोट्या जाहीराती असतात तसला गिचमिड पेपर दिला होता. त्या गिचमिडीतुन मला प्रश्न च सापडेना तर उत्तर काय लिहिणार ?? अन वेळ पण संपत आली होती.. काय घाम फुटला होता दचकुन उठल्यावर.!!!

गणिताचा घासून अभ्यास करून परीक्षाहाॅलमधे गेल्यावर सन्नाटा असून परीक्षा कालच संपली असे समजल्याचे दरदरून घाम फोडणारे स्वप्न अजूनही पडते +))

मला अगदी वाईट एम्बॅरस्ड झाल्याची स्वप्न पडतात!!परीक्षा केंद्र नेहेमी विल्सन काॅलेजच असते!मी दारात पोचते आणि लक्षात येतं आपण घरातल्या कपड्यावर आलोय =)) टेंशनने जाम रडु येतं आणि आत जायची लाज वाटते!! बर्याचदा स्वप्नात कुठुनतरी धपकन् खाली पडते आणि जाग येते!!

माझे दोन्ही नात व नातु ( वय वर्षे पाच ) अधुन मधुन मला सांगत असतात की पोगो च्यानेलवर मोन्स्टर चे सीन नका दा़खवू, कारण आमच्या " ड्रिम " मध्ये तेच येते आणि आम्ही घाबरतो. त्यावर नात " पण हातात कडे ( सरदार जी घालतात तसले ) घातले की असे ड्रिम नही येत " असे म्हणते.

दोन ठराविक स्वप्नं नेहेमी पडतात. एक म्हणजे कुठेतरी उंचावरुन आपण जोरात पडतोय असं आणि मग एकदम दचकुन जागं व्हायला होत असं. तर दुसरं म्हणजे युद्धामधल्या स्पेशल टास्क फोर्स मधल्या एका सैनिकाचं. सिनारियो बदलत रहातात पण सैनिक मात्र तोचं.

इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या स्वप्नाची आठवण करून द्यावी लागेल. परम भक्ताने देवपूजा करावी त्यांनी शिवचरित्राचे पूजन केले आहे. आणि एकदा त्यांच्या आणि अखंड महाराष्ट्राच्या देवाने त्यांना स्वप्नात दर्शन दिले. त्यांना महाराजांच्या शायीस्तेखानावर स्वारीचे स्वप्न पडले होते ज्यात ते एक मावळे होते. मुद्पाकखान्याच्या भिंतीला भगदाड पडल्यानंतर राजांनी त्यांना खुणावले "आत" … आणि बाबासाहेब त्याचवेळी दचकून झाले होते. त्यांना स्वप्नात झालेले हे एकमेव शिवदर्शन असे ते सांगतात.

आज पहाटेचे स्वप्न: आमच्या स्थानिक मराठी मंडळाचा काहीतरी कार्यक्रम होता. भारतातूनही काही मराठी कलाकार आले होते. त्यांच्या कार्यक्रमापूर्वी कलाकारांची काहीतरी एकांकीका होती ज्यामध्ये मलाही भूमिका होती. प्रेक्षकांत त्या पाहुण्या मराठी कलाकरांमध्ये केस पांढरे झालेला अन जाडा जॅकी श्रॉफही शाल पांघरून बसला होता =)) . स्टेजवर असताना मी काही बोलणार तेवढ्यात बायकोने झोपेतून उठवले सेमी फायनल मॅचचे काय झाले बघण्यासाठी. पुढचा अर्धा तास (तेव्हा काहीतरी ३२ बॉल्समध्ये ४५ रन हवे होते किवीजला) थरारक क्रिकेट पाहायला मिळाले.

भाऊ … भाऊ मानले तुम्हाला … आम्ही मिपावर फक्त ९ महिन्यापासून नवागत… तुमचा महिमा आज जाणला… *GOOD* *THUMBS UP* नमस्काराची स्माईलि नाही … तवा हाच नमस्कार मानून घ्या *clapping* *BRAVO*