Welcome to misalpav.com
लेखक: जेपी | प्रसिद्ध:
वाचता वाचता वाढे भाग १ सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख. १) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर. एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी. कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर.. कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड.. या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ऊर्फ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र. २) आम्ही भगीरथाचे पुत्र - लेखक - गोनिदा. भाक्रा नांगल धरणाभोवती फिरणारी कादंबरी. १०० वर्षाचा कालखंड व्यापणारी. यातल कुठलच पात्र मुख्य नाही तरीही सर्वच पात्र लक्षात राहतात.. क्रांतीकारी विचारांचा जोगेन्,विधायक मार्गाने जाणारा जिवन,आपल्या गुरुंच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारे महंत. या सगळ्याचे मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच.. प्रत्येक पात्र स्वतः चा ठसा उमटवत राहते.. ३) मनात - लेखक - अच्युत गोडबोले- मानसशास्त्राची सफर घडवणार पुस्तक. ४) चंद्रमुखी - लेखक- विश्वास पाटिल- एका वाक्यात ' वेळ वाया गेला' संकल्पना बहुतेक एका मराठवाड्यातील स्व. नेत्याच्या चोफुला प्रकरणावरुन ढापलीय. *************************************************************************************** धागा सध्या काय वाचतात या प्रकारे पुढे जाईल अशी अपेक्षा ... कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाची ओळख चालेल.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

'आम्ही भगिरथाचे पुत्र' अतिशय सुरेख आहे. गोनीदा म्हणजे प्रश्नच नाही. चंद्रमुखी इतकी ख़ास नसली तरी वेगळ्या विषयावर असल्याने एकदा वाचावयास ठीकच. मध्ये ड्यान ब्राउनचे 'द लॉस्ट सिम्बोल' आणि आर्थर हेलीचे ' ओव्हरलोड' ही जाडजूड पुस्तके वाचुन झाली. द लॉस्ट सिम्बोल बरीच संथ वाटली आणि शेवट इतका जमला नाही. तर ओव्हरलोड टिपिकल हेली स्टाइल. वीजनिर्मिती उद्योगावर बेतलेली. सध्या वालिमिकीरामायण वाचतोय. आता सुंदरकाण्ड चालू आहे.

वपुंच सखी आणी पार्टनर. इरावती कर्वेंच युगांत्,शिवाजी सावंतांच मृत्युंजय्,छावा आणी युंगधर , विश्वास पाटलांच पानिपत, ना.स.इनामदारांच राउ.विणा गवाणकरांच एक होता कार्व्हर, वाचत रहा वेड लावतात ही पुस्तक

'आम्ही भगिरथाचे पुत्र' नाव काढलंत आणि गोनिदांचे सगळे लिखाण डोळ्यासमोर आले... केवळ अप्रतिम. 'पडघावली' कादंबरी वाचून जी सुरुवात झाली, ते 'भगिरथाचे पुत्र', 'कोण्या एकाची भ्रमणगाथा','स्मरणगाथा' (त्यांची केवळ 'शितू' कादंबरी वेगळ्या धाटणीची किंचित संथ / रटाळ वाटली, पण बाकी साहित्य म्हणजे खजिनाच) ते ते प्रसंग तेव्हाच्या काळाप्रमाणे आपल्या डोळ्यांसमोर उभे करण्याची गोनिदांची हातोटी वादातीत आहे.

गोनीदांचं मला न आवडलेलं एकमेव पुस्तक म्हणजे 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'. आवडले का नाही हे निश्चित सांगता येणार नाही पण आवडले नाही हे मात्र खरे. गोनीदांची तांबडफ़ुटी, लक्ष्मीसेतू- गडदेचा बहिरी ही अतिशय दुर्मिळ पुस्तके देखील मजकडे आहेत. पडघवल०, कादंबरीमय शिवकाल आणि त्या तिथे रूखातळी ही त्यांची पुस्तके सर्वोत्तम ठरावीत.

"चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत आहे. च्यायचा वैताग. पुस्तकाचं किमान नीट संपादन तरी केलेलं असावं ही अपेक्षा चूक आहे का? आणि कथावस्तू तर सातवीआठवीतल्या पोराने लिहावी इतकी पोरकट आहे. बरं धड सॉफ्ट पॉर्न म्हणावं तर तेपण नाही नीट. विश्वास पाटील कधी भेटले तर "विश्वास आपने विश्वासघात किया" असं सांगणार आहे त्यांना. ---- राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रकाशित पुस्तकं नुकतीच जालावर उपलब्ध झाली आहेत. त्यातली ही वाचली: - अस्पृश्यांचा लष्करी पेशा - मुलखावेगळा राजा (औंधाच्या राजाच्या आठवणी) - गायनमहर्षी अल्लादियाखां यांचे चरित्र - साद सागराची (नेव्हीमधल्या आठवणी) डॉ. खरे: हे पुस्तक नक्की वाचा.

नाही नाही - माझं लिहायला चुकलं. लेखक आहेत पु. गो. गोखले. मी डॉ. खर्‍यांना सांगत होतो की हे पुस्तक वाचा. लिंक इथे: https://msblc.maharashtra.gov.in/download1.html

हजार आभार! धन्यवाद :-) अशी पुस्तके उपलब्ध आहेत हे माहिती नव्हते!

सध्या पुण्याची अपुर्वाई हे अनिल अवचटांचं पुस्तक वाचतेय.मध्यमवर्गीय पुण्याच्या बाहेरचं पुणं,रविवार पेठ,स्टेशनचा परिसर इ.अनिल अवचटांच्या रिपोर्ताज शैलीतलं पुस्तक आहे.आवडतंय वाचायला. त्याबरोबरच अनाहितावर रेकमेंड झालेलं डॅडी लाॅन्ग लेग्ज डालो करुन वाचायला सुरुवात केलीये. विंदांच्या स्त्रीविषयक कवितांचा विजया राजाध्यक्षांनी संपादित केलेला संग्रह, 'आदिमाया' मिळालाय.तो पुरवुन पुरवुन वाचतेय.

लॉर्ड ऑफ द रिंग्स दुसऱ्यांदा वाचतो आहे. पूर्वी वाचली तेव्हा इंग्रजी जास्ती कळत नव्हते. प्रत्येक पानाला शब्दकोश हातात घ्यावा लागायचा. आता तसे करावे लागत नाही. टॉल्कीन यांच्या लेखनामधील काही जुने शब्द मी पहिल्यांदाच वाचले होते. आता हे शब्द शक्यतो ऐकायला वाचायला मिळत नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर hither, tither, whither आणि अजून बरेचसे. Because हा शब्द न येता for हा शब्द बऱ्याच ठिकाणी येतो. Except च्या जागी save हेही मी पहिल्यांदा याच पुस्तकात वाचले. पुस्तकातील वर्णने अतिशय सुंदर आहेत. तपशीलवार आहेत. वाचताना चित्र डोळ्यासमोर उभे राहायला नक्कीच मदत करतात. या पुस्तकातील कविता तर अतिशय उत्तम. त्या कवितांना स्वतःची एक चाल आहे. वाचताना आपोआप आपणही लय पकडतो.

जब्राट आहे लॉर्ड ऑफ द रिंग ची कादंबरी. अश्या गोष्टी आवडत असतील तर तुम्हाला अजुन दोन्-तीन कादंबर्‍या सुचवतो. १. गेम ऑफ थ्रोन्स (आत्ता ५ पुस्तक उपलब्ध आहेत) २. द हॉबिट्स सिरिज ३. द एल्डर स्क्रॉल्स स्कायरिम (ह्याची गेमही आहे...हे पुस्तक आता बाजारामधे येईल.)

धन्यवाद! गेम ऑफ थ्रोन्स नक्कीच वाचायला आवडेल. हॉबिट चित्रपट पाहिले आहेत पण पुस्तक अजून तरी वाचले नाही. तिसऱ्या पुस्तकाबद्दल पहिल्यांदाच ऐकतो आहे. बाकी गेम बद्दल म्हणाल तर रोडरॅश, solitaire, spider solitaire आणि सुडोकू च्या पुढे माझी मजल कधीही गेली नाही. :)

काॅनोलीची पुस्तकं मस्तच. Police Procedural या प्रकारातली ही पुस्तकं आणि त्याचा हॅरिस बाॅश हा नायक - दोघेही जबरदस्त! विशेष करुन - The Last Coyote, Angel's Flight, The Overlook आणि Nine Dragons.

खेकडा निजधाम कबंध गहिरे पाणी अफलातून प्लॉट, वाचकाला गुंतवुन ठेवण्याचे कसब आणि धक्कातंत्र ह्यामध्ये रत्नाकर मतकरी ह्यांची मक्तेदारी आहे. त्यांची सगळी पुस्तक उत्तम पण मला त्यांच्या विशेष आवडलेल्या कथा म्हणजे दोन मुलं वारस छोटा विल्कु मोठा विल्कु मला विक्रम दिसतो एक टोले पडताहेत

क्या बात है अमोलराव. मतकरींचा मी पण मोठा फ्यान. रंगांधळा, हेडस्टडी, जंगल, टोक टोक पक्षी, ड्राक्युला, फाशी बखळ, मंदा पाटणकरची गोष्ट ह्या अजून त्यांच्या काही जबराट कथा. बाकी वर तुम्ही उल्लेख केलेल्या ' छोटा विल्कु मोठा विल्कु' ह्या कथेचं नाव 'लपाछपी' आहे. एमपीडीवरची ती एक अफ़लातून गूढकथा आहे.

गावात वाटसरू येतो, तिथे मेजवानी असते, वाटसरूला पानावर बसवतात, आणि... ही कथाही मतकरींची आहे ना? नाव सांगता येईल का वल्लीदा?

धन्यवाद मी नेमक त्या कथेच नाव विसरलेलो. पण ती कथा सॉल्लिडच होती. खासकरून त्या कथेचा शेवट.

सध्या Wings of Fire वाचत आहे, पण त्याची ओळख मी काय वेगळी करुन देणार? या धाग्याच्या निमित्ताने चटकन आठवलं "गारांचा पाउस". शोभा भागवतांचं हे पुस्तक एकदा अचानक हाती लागलं आणि थोडंसं चाळून आवडलं म्हणून वाचायला घरी आणलं. आता वाचून काही वर्षे झाली त्यामुळे खूप आठवत नाही. पण थोडक्यात ओळख करुन द्यायची तर लहान मुलं आणि ती वाढत असताना त्यांचं विकसित होत जाणं याबद्दल आहे. पण यात उपदेश वगैरे काही केलेला नाही तर मुलांचं तर्कशास्त्र कसं चालतं याबद्दल लिहिलं आहे आणि रोजच्या जीवनातल्या उदाहरणांसकट. मुलं अचानकपणे कशी काहीतरी बोलून जातात अशी उदहरणे आहेत. शीर्षक असं का त्याचंही कारण पुस्तकात आहेच. ज्यांची मुलं सध्या बोलायला शिकत आहेत किंवा त्यातून पुढे गेली आहेत अशांना तर ते आवडेलंच पण बाकीच्यांनाही वाचताना मजा येईल. इथे याची झलक आहे.

गेलयाच आठवाडयत '' काली '' वाचल.पर्ल बक यांच्या 'द गुड अर्थ ' या कादंबरीचा अनुवाद.हे पुस्तक मी हाइस्कूल मधे अस्ताना गवच्या नगर वाचनालयात वाचलेल एका चीनी शेतकर्यची कहानी आहे.सुन्दर अनुवद.एका दिवसात अधाशासरख वाचून काढ़ल .bookganga वर मिलाल.सुदर वर्णन आहे एका चीनी कुटुंबच्या स्थित्यन्तरचि. भारती पांडे यानी अनुवाद केला आहें..मी सर्वाना शिफरस करेंन या पुस्त्कचि.जरूर वाचा.

मिराज -ले-बंडुला चंद्ररत्ने. अनु-मकरंद अमरापुरकर. -- कादंबरी 150 पानाची आहे.आखाती देशातील सर्वसामान्य लोकांच जगण.पेट्रोडॉलरच्या चकचकाटापलीकडील पलिकडची भिषण परिस्थिती.लेखक श्रिलंकन आहे. आवडल.

नारायण धारपांची बहुतेक सगळी जुनी पुस्तके जबराट. समर्थ सेरीज मधील पुस्तके कुठे मिळतील? समर्थांचा प्रहार, समर्थांचा विजय्,पुन्हा समर्थ इ.

पत्रकार आणि हेरगिरी विश्लेषक गाॅर्डन थाॅमस यांचं हे पुस्तक म्हणजे मोसाद या संघटनेवरचं अप्रतिम पुस्तक. १९४८ साली इझराईलची निर्मिती झाली. त्याच वेळेला इराक, लिबिया, इजिप्त,जाॅर्डन आणि सीरिया या अरब राष्ट्रांनी इझराईलला नष्ट करण्यासाठी हल्ला चढवला. त्यामुळे एका गुप्तहेर संघटनेची गरज होती. तेव्हा इझराईलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियान यांच्या कल्पनेतून मोसादची निर्मिती झाली. इथून ही कथा सुरु होते आणि मग आईकमन अपहरण, १९६७चं अरब-इझराईल युद्ध, म्युनिक हत्याकांड, योम किप्पूर युद्ध, एन्टेबी, इराणमधली इस्लामी क्रांती, लेबेनाॅन, ९/११ अशा सगळ्या मुद्द्यांचा उहापोह करत मोसादच्या आजच्या परिस्थितीपर्यंत असा अत्यंत विस्तृत पट या पुस्तकात मांडलेला आहे. मोसादच्या चुका आणि मूर्खपणा, अमेरिकन सी.आय.ए.आणि ब्रिटिश एम.आय.६ यांच्याबरोबर मोसादचे संबंध, इजिप्तबरोबरचा तह झाल्यानंतरची मोसादची भूमिका, मोसादचे आजवरचे प्रमुख, इझराईलचे पंतप्रधान, त्यांच्या राजकीय भूमिका आणि त्यामुळे मोसादवर झालेले परिणाम - अशा अनेक गोष्टी या पुस्तकात येतात. आंतरराष्ट्रीय राजकारण, तेलामुळे अरब राष्ट्रांचं वाढलेलं महत्व, त्यातून अपरिहार्यपणे आलेला बाथ पार्टीचा अरब राष्ट्रवाद, दहशतवाद, ज्यू लाॅबी - अशा अनेक प्रश्नांकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन हे पुस्तक देतं. मोसादमध्येच गाॅर्डन थाॅमसबद्दल असं म्हटलं जातं की What Gordon Thomas knows about Mossad, Mossad itself doesn't know. त्यात तथ्य असावं असं वाटायला लावणारं हे पुस्तक आहे.

उत्तम कांबळेंचं श्राद्ध वाचतोय. ओघवती भाषा आहे. प्रसंग, घटना, संदेश काही नवीन नाहीत, पण मांडणी आणि लेखन चांगले असल्याने वाचावेसे वाटते. त्यांचं स्मशानासंबंधीचं 'कावळे आणि माणसे' हे पुस्तक जबराट होतं....

त्रिंबक नारायण आत्रे लिखित. प्रकाशन वर्ष आहे १९१५. १९५९ च्या आवृत्तीस धनंजय गाडगीळ यांची प्रस्तावना आहे. मराठी खेडे - (त्याकाळचे) - याविषयी अतिशय रोचक माहिती आहे.

सारे चिमणराव संपवतोय. गॉड ब्लेस यू मि. रोझवॉटर वाचतोय. कथानक रटाळ आहे पण मधे मधे लेखक तिरसकस शैलीत जे काही सांगतो ते जबरी आहे एकदम. कॅच ट्वेंटी टू संपविले. आधी पन्नास पाने वाचून सोडून दिले होते. मिपावरच्या अशा चर्चेतच कुणीतरी सांगितले म्हणून पूर्ण वाचले. जबरदस्त पुस्तक आहे. विनोदाने मानवी स्वभावावर, एकंदरीत व्यवस्थेवर आसूड ओढण्याची पद्धत जबरदस्त. शेवटी शेवटी पुस्तक भयंकर गंभीर होत. उद्धवस्त झालेल्या रोमचे वर्णन तर अंगावर काटे उभे करनारे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुणी सटायर लिहू शकतो ही कल्पनाच भयंकर आहे. एकापेक्षा एक वाक्ये आणि प्रसंग. 'They were asked to enjoy the show' 'He was jeopardizing his traditional rights of freedom and independence by daring to exercise them' हे पुस्तक माझे निव्वळ मॅडनेस आहे. मला ज्या प्रकारची पुस्तके आवडतात त्यातले हे सर्वाेत्तम.

भन्नाट कांदबरी, प्रत्येकाने वाचावी अशी , मला तर माझेच शालेय जीवन आठवले. पैपिलोन. सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या एका फ्रेंच गुन्हेगारची गोष्ट . स्टार्ट तो एंड एका दमात वाचाविशी वाटते . प्रवासवर्णनासाठी मीना प्रभुची पुस्तकमाला , असे वाटते की आपण त्यांच्या बाजूला उभे राहून प्रवास करत आहे. शिवाय पुलंचा मी डायहार्ड पंखा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे मी पारायण केले आहे. त्यांचा विनोद वाचला की बाकीचे विनोदी लेखक पुचाट वाटू लागतात.

पॅापिलॅान आवडली असेल, तर शांताराम नक्कीच वाचा..

सध्या scion of ishvakus चे वाचन चालू आहे. पण शिवा ट्रिलोजी ची सर नाही. बहुतेक पुढ्च्या भागात हनुमानाची एंट्री झाल्यावर मजा येईल

त्रिबंध हे महेश एलकुंचवारांचे ललित लेखांचे पुस्तक नुकतेच वाचून झाले.वाचनिय पुस्तक आहे. आता आपल्या मिपाकर विशाखा पाटील यांचे कल्चर शाॅक सिरिजमधले आखाती देश वाचतेय.