Welcome to misalpav.com
लेखक: विकास | प्रसिद्ध:
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे. सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली. मात्र हिटलरच्या जर्मनीबरोबर आणि त्याच अंगाने जाणार्‍या जपानबरोबर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणून जरी मैत्री केली असली तरी, "जर-तर" च्या भाषेत चुकून पण जर्मनी-जपान कोणीही तात्पुरते आशियाच्या बाजूने जिंकत आले असते तर भारताचे पण खरे नव्हते असे वाटते. अर्थात हे देखील समजते की त्यावेळेस (१९४१) जर्मनीची सगळी दुष्कृत्ये बाहेर आली नव्हती...असो. आजच्या टाईम्स ऑफ इंडीया मधे पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि सुभाषबाबूंचे पुतणनातू सुर्या बोस यांच्या जर्मनीत झालेल्या भेटीची बातमी आली आहे. सुर्या बोस यांच्या वडीलांवर देखील त्या काळात पाळत ठेवली गेली होती. या सर्व पार्श्वभूमीवर देखील श्री. सुर्या बोस यांचे खालील म्हणणे वाचण्यासारखे आहे...
"I gave the PM a few points in writing, including the issue of surveillance on the family so that the truth comes out," Surya said. He said he impressed on Modi that India as a nation was strong enough to face the truth, even if it was unpalatable. "The declassified information needn't paint a glorious picture of Netaji. It may say something negative. In all probability, it will. We must not shirk from the truth even if it adversely affects Netaji's image. The family is ready to face it," he said.
या बातमीत श्री बोस यांनी इतिहासाकडे अलिप्तपणे बघण्याची दाखवलेली वृत्ती आणि धैर्य हा या चर्चेचा विषय आहे. सुभाषबाबूंवर त्यांच्या हयातीत आणि नंतरच्या (बहुदा) काल्पनिक हयातीत, तसेच त्यांच्या कुटूंबियांवर स्वातंत्र्योत्तर २० वर्षे पाळत ठेवली गेली. त्याला अर्थातच बहुतांशी नेहरू आणि त्यांच्यावेळचे गृहमंत्री सरदार पटेल पासून ते लालबहाद्दूर शास्त्री जबाबदार होते. तसेच नेहरूंच्या नंतरचे पंतप्रधान शास्त्री, नंदा आणि इंदीरा गांधी, त्यांच्या त्या त्या वेळच्या गृहमंत्र्यांसकट सर्वच जबाददार होते. त्यात यशवंतराव चव्हाण देखील आले. तरी देखील अंतिमतः या निर्णयांवर वेळोवेळच्या पंतप्रधानांनी शिक्कामोर्तब केल्या शिवाय हे केले गेले असे म्हणत केवळ गृहमंत्र्यांवर जबाबदारी टाकली जाणार असेल तर ती मोठ्ठी दिशाभूल आहे आणि त्यातून केवळ पंतप्रधान हे स्वतः निर्णय घेत नव्हते इतकेच सिद्ध होऊ शकेल, जबाबदारी टळू शकणार नाही. बरं त्यांनी तसे करणे ही कदाचीत त्या काळातील (फॉरवर्ड ब्लॉक आणि तत्सम अतिरेकी डाव्या संघटनांमुळे) गरज देखील असेल आणि ते त्या त्या नेत्यांनी गोपनिय ठेवले असेल तर त्यातही काही चूक नाही. पण ते आता इतक्या वर्षांनी इतिहास म्हणून प्रसिद्ध झाले तर वास्तव जगासमोर येऊ शकेल. अर्थात या सर्वांचा लसावि असे म्हणता येऊ शकेल तो म्हणजे काँग्रेस....आणि गंमत म्हणजे एकीकडे पाळत ठेवणारे दुसरीकडे त्यांना राष्ट्रभक्त देखील म्हणत होते. याच काळात सावरकरांना (मला वाटते चीन युद्धाच्या वेळेस देखील) अटक/स्थानबध्दता करण्यात आली होती. श्यामाप्रसाद मुखर्जींचा (१९५३) गुढ मृत्यू झाला होता. भगतसिंग बद्दल देखील बोलले गेले आहेच. असे अनेक असेल जे कदाचीत बाहेर येणार नाही अथवा काळाच्या ओघात "गंगार्पण" झाले आहे. सुभाषबाबूंचे दुसरे पुतणनातू आणि सध्या तॄणमूल कडून खासदार असलेले अमेरीकास्थित सुगाता बोस मात्र नेहरूंना जबाबदार ठरवायला तयार नाहीत तर केवळ पटेलांनाच चूक ठरवत आहेत. गंमत म्हणजे ते इतिहास आणि राजकीय विषयातले तज्ञ आणि हार्वर्ड मधे प्राध्यापक आहेत! अर्थात त्यांना प्रत्यक्षात बोलताना ऐकलेले असल्याने, त्यांच्या असल्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही... दुर्दैवी मात्र नक्की वाटते. दुसरे सन्माननीय प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी अजून यासंदर्भात (एरवी मांडतात तशी) मते मांडलेली नाहीत. कम्युनिस्ट पार्टीकडून देखील या संदर्भात बोलले गेलेले दिसले नाही. बाकीचे डावे विचारवंत देखील "सुभाषबाबूंच्या पहारेकर्‍यांबद्दल" गप्पच आहेत आणि कागदपत्रे जाहीर करा असे देखील म्हणलेले वाचले तरी नाही. मात्र हे आणि त्यांचे डावे पूर्वज याच काळापासून ते आजतागायत कुठलाही पुरावा नसताना तत्कालीन संघापासून ते आजच्या बालस्वयंसेवकापर्यंत सर्वांना "गांधीचे मारेकरी" म्हणून समाजाची दिशाभूल करत राहीले. या इतिहासाच्या मारेकर्‍यांनी आणि पहारेकर्‍यांनी स्वतःचे विचार रुजावेत म्हणून बुद्धीवादीपणाने हिंदू आणि हिंदूत्वाचा द्वेष पसरवत, त्यांच्याबद्दल खोटे बोलून, त्यावर खोटे संशोधन करून आजपर्यंत या तथाकथीत विचारवंतांनी देशाचे सामाजिक-आर्थिक-राजकीय नुकसान केले आहे. या मारेकर्‍यांचे आणि पहारेकर्‍यांचे भांडे फोडणे आणि त्यांच्या असल्या (वि)कृतीशील विचारसरणीस दूर करणे ही काळाची गरज आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

" ब्रिटीशांपेक्षाही अधिक भयंकर मालकाची गुलामगिरी " म्हणजे साहेबांपुढे भारताची जी(काहि उरली सुरली) पत होती त्यापेक्षाही डिग्रेड झालेली आपली कंडीशन याअर्थाने हे वाक्य वापरलं आहे. जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि. तत्कालीन जीव-रासायनीक युद्धाची तयारी करणारं , चीनला ताब्यात ठेवणारं जपान खरच मनुष्यराज्य म्हणुन घ्यायच्या लायकीचं आहे का हा प्रश्न पडावा. अफ्रीका, आशीया, अमेरीकेत ब्रीटनचे प्रताप ऐकुन त्यांच्यात काळीज नावाचा अवयव मिसींग आहे का असं वाटावं. एकदाका माणसाचं माणुस म्हणुन मुल्य नाकारलं कि गोर्‍या युरोपीयनांना आणि काळ्या आशीयायी सत्तांना मनुष्य हाडामासाची केवळ व्यापारी दृष्टीने किंमत उरते. असो. राहिला मुद्दा जनता जनार्दनाच्या गांधीवादी-गांधीविरोधी, हिंसा-अहिंसा, हिंदुत्ववादी-सेक्युलर वगैरे घोळाचा. या तमाशाला थोडंफार करमणुक मुल्य असण्यापलिकडे फार काहि बघायची गरज नाहि. यांना नेहरुंनी आधुनीक भारताची केलेली पायाभरणी पण दिसत नाहि आणि जनसंघापासुन तो आतापावेतो उजव्या आघाडीत एकही कर्तुत्ववान नेता दिसत नाहि. गांधीचा चरखा आणि सावरकरांची पिस्तुल हे केवळ दृष्य परिमाणं होती. ते का धारण केलं गेलं, त्यामागचं मनगट, मन आणि मेंदु काय होता याचा विचार करण्याची गरज फारशी कोणाला वाटत नाहि. स्वतःला हिंदुत्ववादी वा गांधीवादी म्हणणे म्हणजे नेमकं काय याचाच जिथे पत्ता नाहि तिथे बाकी तपशील काय कामाचा.

नेहरुंचे मूल्यमापन कोणत्या गोष्टीवर करायचे याचीही किमान माहिती पब्लिकला नसते. नेहरुंबाबत लेडी माऊँटबॅटनला सिगरेट ऑफर करणारा स्त्रीलंपट ही इतकीच माहिती शाखेतल्या बौद्धिकात मिळत असल्याने त्यात पब्लिकचाही फारसा दोष नाही.

जास्त अत्याचारी कोण? इंग्रज कि जपान? अगदी खरं सांगायचं तर मला माहित नाहि. दोन्ही बाजुंच्या इतक्या गोष्टी वाचुन, ऐकुन आहे कि डावं-उजवं करणं मला शक्य वाटत नाहि.
मला वाटते की जपानी अधिक भयंकर होते. इंग्रज हे संत अजिबात नव्हते पण जपानी त्याहून कितीतरी पटींनी अधिक खुनशी होते. जपानने मांचुरियावर हल्ला केला १९३२-३३ मध्ये.त्यानंतर १९४५ पर्यंत म्हणजे १२-१३ वर्षात जपानने जो काही धुमाकूळ घातला त्याला तोड नाही. चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली. ब्रिटिशांचे म्हणाल तर ते क्रूर होतेच यात शंका नाही.पण जपानी क्रौर्याच्या बाबतीत ब्रिटिशांच्या चार नाही शंभर पावले पुढे होते. जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे बंगालमध्ये लाखो लोक मारले गेले यात शंकाच नाही.१८५७ नंतरही उत्तर भारतात इंग्रजांनी प्रचंड क्रौर्य दाखविले. तरीही जपान्यांपेक्षा इंग्रज कमी होते याची काही उदाहरणे-- भारतीयांच्या मनातील असंतोषाला वाट करून दिली नाही तर परत १८५७ सारखा उठाव होईल या स्वार्थी हेतूने का होईना त्यामानाने सुसंस्कृत विचार करून काँग्रेसची स्थापना करणारा इंग्रजच होता. राणीच्या जाहिरनाम्यानंतर आलेल्या व्हाईसरॉय कॅनिंगला दयाळू कॅनिंग म्हणायचे असेही वाचले आहे.रिपनही असा एक अत्याचार न करणारा व्हाईसरॉय होता. मुंबई प्रांतालाही रे, एलफिस्टन सारखे गव्हर्नर होते. लोकमान्य टिळकांवर रितसर खटला चालवून, कायद्याप्रमाणे शिक्षा दिली गेली होती. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या खटल्यात त्यांना ६ वर्षाची शिक्षा झाली तसाच खटला इंग्रज सरकारने त्यांच्याविरूध्द १९१६ मध्ये आणला होता त्यात त्यांची निर्दोष मुक्तताही झाली होती. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे असे लोकमान्य उघडपणे लिहू शकत होते. स्वराज्य पक्ष निवडणुका लढवून विधीमंडळात जाऊन इंग्रजांची तिथे अडवणुक करायचा प्रयत्न करत होता.त्याला फार महत्व दिले गेले असे नाही पण विधीमंडळात जाऊन भारतीयांची बाजू मांडायला परवानगी होती. सुभाषचंद्र कलकत्याचे आणि सरदार पटेल अहमदाबादचे महापौर होऊ शकले.त्यांना तिथे मर्यादित का होईना अधिकार होते. १९३५ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया कायद्यानुसार १९३७ मध्ये निवडणुका होऊन अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची राज्य सरकारे सत्तेत आली.त्यांनाही राज्य पातळीवर मर्यादित का होईना अधिकार होते. यापैकी पाव टक्काही गोष्टी जपानी राज्यात होणे शक्य नव्हते. म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.

अजून एक. फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते. अशा काही घटना ऐकल्या, वाचल्या की नेमकी स्वातंत्र्यपूर्व भारतातली परिस्थिती कशी होती याचे कुतूहल अजून वाढत जाते. इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यलढा आणि त्याचवेळी सामान्य पद्धतीने चाललेले समाजजीवन यांचा परस्परविरोधी सूर शालेय इतिहासात कधीच समोर येत नाही. त्याकाळाचे चित्र आजच्या सामान्य पब्लिकच्या मनात जे आहे त्यापेक्षा वेगळे निश्चित असले पाहिजे हे इतिहासाचा स्नातक असतांना समग्र पद्धतीने अभ्यास करतांना जाणवायचे. अर्थात उपलब्ध करून दिलेल्या मोजक्या साधनांवर आपण केवळ तर्क लावू शकतो. तो तर्कही तसाच लागावा अशी उपलब्ध झालेल्या पुराव्यांची इच्छा असेल तर?

फाळकेसाहेब चित्रपट निर्मिती करून व्यवस्थित व्यवसाय करू शकत होते.
सर्व मुस्लिम शासकांत औरंगजेबाच्या दरबारात सर्वाधिक हिंदू मंत्री, अधिकारी होते असे ऐकून आहे.

या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ? आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि? स्लो पोइजन देऊन जगाला बटीक बनवणाराव जास्त क्रुर कि सरळ शीर कापणारा? माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता. पण या सर्व जर-तर च्या बाबी झाल्या. असो.

या मागे इंग्रजांची दयाबुद्धी होती कि जगावर राज्य करण्याच्या अनुभवातुन आलेलं मॅनेजमेण्ट स्कील ?
याला व्हाईट मॅन्स बर्डन असं म्हणतात. http://en.wikipedia.org/wiki/The_White_Man%27s_Burden
आरमाराच्या जोरावर अत्यंत कमि काळात इंग्रज जगभर पसरला पण महान आरमार परंपरा आणि साम्राज्य असणारा जपान भारतात त्यापुर्वीच शस्त्र घेऊन का आला नाहि?
दोन कारणं. १. जपान हा व्यापारी देश नव्हता. ब्रिटीश सुरवातीला व्यापारी म्हणून आले आणि भारतीय राजांचा मूर्खपणा त्यांनी पाहिला नसता (आणि वर उल्लेखिल्याप्रमाणे व्हाईट मॅन्स बर्डन चा पगडा त्यांच्यावर नसता) तर ते व्यापारीच राहिले असते. २. जपान हा पारंपारिक रित्या साम्राज्यवादी देश नव्हता. त्याचं चरित्र दुसर्‍या महायुद्धामध्ये बदललं ते टोजो सारख्या नेत्यांमुळं. मुळात जपानी राजा या युद्धाबद्दल तितकासा उत्साही नव्हता.
माझ्या मते जपान विरुद्धचा लढा भारताला जास्त सोपा आणि निर्णायक असता.
अजिबात नाही. जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.

जपानी नि:संशय क्रूर होते आणि आहेत. ते अतिशय रेसिस्ट सुद्धा आहेत. ब्रिटिशांच्या अंमलाखाली असणं हे भारताला बर्‍याच बाबतीत फायद्याचं होतं.
म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं. इंग्रजांबाबत भारतात नाहि म्हणायला सॉफ्ट कॉर्नर होता व स्वतंत्र भारताचे इंग्रजांशी मैत्रीपूर्ण संबंध असावे अशीही आपली मनसीकता होती. महायुद्धानंतर जपानने जर भारताला अंकीत करायचा प्रयत्न केला असता तर भारताचा प्रतिकार फार जास्त तिखट असता.

म्हणुनच जपान विरुद्ध भारतीय लोकमत लवकर पेटुन उठलं असतं व त्यांना सरळ अंगावर घ्यायला देखील तयार झालं असतं.
यात अनेक गृहितके आहेत. पूर्वीही राजपुत, शीख, मराठे, विजयनगर साम्राज्य इत्यादींनी मोंगल आक्रमणांचा मुकाबला केलाच होता.तेव्हा जास्त खुनशी शत्रू असेल तर प्रतिकारही जास्त तिखट होईल असे म्हणणे वरकरणी ठिक आहे. पण पूर्वीची परिस्थिती १९४५ मध्ये राहिली नव्हती. मोंगल असू देत किंवा राजपूत-मराठे, दोघेही पारंपारिक शस्त्रांनीच (तलवारी, भाले इत्यादी) लढाई करायचे. तेव्हा त्यात आपली बाजू फार पडती होती अशी परिस्थिती नव्हती.पण १९४५ मध्ये शत्रूकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, रणगाडे वगैरे होते. आपली तयारी कितपत होती? क्रांतिकारकही गावठी पिस्तुलातून दोन-चार गोळ्या झाडून जुलमी इंग्रज अधिकार्‍यांचा वध करू शकत होते.पण आपल्याकडे अशी शस्त्रास्त्रे, विमाने वगैरे होती का? त्यांच्या मशीनगनला आपली गावठी पिस्तुले कशी पुरी पडणार होती? औरंगजेबाच्या काळापासून १९४५ पर्यंत युध्दतंत्रात मोठे बदल झाले होते आणि वैयक्तिक शौर्याच्या जोरावर जिंकायचे दिवस बरेच मागे पडले होते. सुरवातीला अगदी अशीच पडती बाजू अफगाणिस्तानातील लोकांची रशियनांबरोबर होती.पण अमेरिकेने त्यांना शस्त्रपुरवठा केलाच होता आणि अफगाणिस्तान डोंगराळ आणि दुर्गम असल्यामुळे त्याचा फायदा अफगाणांना झाला. तसा फायदा आपल्याला फार तर मणीपूर, नागालँड अशा ठिकाणी झाला असता पण बंगालसारख्या सपाटीच्या प्रदेशामध्ये आपण काय करणार होतो? आणि ब्रिटिशांविरूध्दचा आपला लढाही ०.००१% क्रांतिकारक सोडले तर 'अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला' अशा स्वरूपाचाच होता. अर्थात असे ठराव करूनच लोकांना स्वातंत्र्य हवे याची जाणीव अधिकाधिक होत होती आणि अशाच वातावरणातून क्रांतिकारक निर्माण होऊ शकतात.पण मुळात स्वातंत्र्य कशाकरता हेच माहित नसेल अशा समाजातून क्रांतिकारक निर्माण कुठून होणार? हे विविध काँग्रेसमधले ठराव ही जाणीव करायचे काम करत होते हे नक्कीच. तेव्हा आपला समाज फारसा लढवय्या नव्हता निदान १८५७ नंतर तरी.अशा समाजातले लोक खुनशी जपान्यांना कसा प्रतिकार करणार आणि त्यातूनही हातात शस्त्रे पुरेशी नसताना? टी.एन.कौल म्हणून आपले अगदी सुरवातीचे आय.एफ.एस ऑफिसर होते.ते १९५०-५१ मध्ये चीनमध्ये भारतीय दुतावासात होते.तिथे त्यांना अफगाणिस्तानचा राजदूत म्हणाला होता-- ३० कोटींच्या तुमच्या देशावर लाख-दीड लाख इंग्रज १५० वर्षे राज्य करूच कसे शकले? आमच्या देशात आम्ही अशा मूठभर इंग्रजांची चटणी उडवली असती आणि पळता भुई थोडी केली असती. याविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचले आहे (पुस्तकाचे नाव विसरलो). तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे प्रचंड खुनशी जपान्यांना प्रतिकार करायची लाख इच्छा आपल्याला असूनही ते शक्य होणे कितपत शक्य होते? विशेषतः आपली बाजू अशी पडती असताना?

महायुद्ध जर ब्रिटेशांच्या पराभवाने संपते तर जपानशी भारताचा सामना तसाहि झालाच असता. प्रश्न केवळ इतका उरतो कि भारत जपानला गुलाम वसाहत म्हणुन हस्तांतरीत होतो कि उपकृत राष्ट्र म्हणुन.

जपान्यांनी जेते म्हणून इतर देशांत नुसता नरसंहारच केलेला नाही, तर त्यांनी त्याचबरोबर जिवंत माणसांना, त्यांच्या अत्यंत क्रूर व पाशवी धोरणांमुळे, पराकोटीच्या यातना दिलेल्या आहेत. चीन, फिलीनीन्स ('फिलीपाईन्स' नव्हे), कोरीया, हाँगकाँग ह्या सर्व ठिकाणी त्यांनी स्त्रीयंवर बलात्कार व त्यांना जबरदस्तीने वेश्या बनविणे, जीवंत पकडलेल्या शत्रूसैनिकांच्या शरीरांवर, निरनिराळे पाशवी, यमयातना देणारे प्रयोग करणे असे अनेक प्रकार केलेले आहेत. म्हणूनच ह्या सर्व ठिकाणी जपानद्वेषाचे पडसाद अजूनही नेहमी उमटत असतात. कुठलाही परका देश एकाद्या, white knight प्रमाणे आपल्या 'मदतीस' येऊन, आपणांस सोडवेल व नंतर शांतपणे आपला प्रांत आपल्याकडे सोपवून आनंदानेमाघारी जाईल,ह्यासारखी खुळचट कल्पना ज्यांनी केली, त्यांना मी तरी थोर, प्रगल्भ नेते वगैरे मानण्यास तयार नाही. ब्रिटीश मुळात व्यापारी अधिक आणि, धर्म अथवा सत्तेची इर्षा असलेले, कमी. त्यामुळे त्यांनी अनेक वसाहती विषेश क्रौर्य न करता वसवल्या व आर्थिक आणि/किंवा राजकीय अपरिहार्यता येईस्तोंवर त्या तशाच चालवल्या. अर्थात एकदा एखाद्या देशात सत्ताग्रहण केल्यानंतर ते जेते म्हणूनच वावरले, तेव्हा त्यांचे व स्थानिक जनतेचे हितसंबंध समान राहिले नाहीत. तरीही, जगभरच्या वसाहतींचा विचार करता ब्रिट्सांच्या कॉलनीज खूपच 'प्रेम़ळ', स्वतःबरोबरच स्थानिक जनतेचाही थोड्याफार प्रमाणात उद्धार करणार्‍या वाटतात. ते व डच सोडता, इतर कुठल्याही युरोपियन, अमेरिकन जपानी वसाहतींच्या बाबतीत असे म्हणणे कठीण आहे.

जपानला कुणाही भारतीय नेत्याने आपला भाग्यविधाता समजण्याची चूक केली नव्हती. जपानी पाहुणा आपला नवा मालक बनुन येतो कि उपकारकर्‍ता हाच प्रश्न होता. बाकी ब्रिटीश वीट जपानी दगडापेक्षा मऊ असेलही. अमेरीकेची सगळी दादागिरी उघड दिसत असुन देखील जगाचा पोलीस म्हणुन इतर महासत्तांपेक्षा तेच परवडतात. ( भारताला आपण महासत्ता मानतच नाहि :) ).

जपानचे सहाय्य घेतले असते तर त्यांनी तसेच अत्याचार भारतात केले असते जसे चीन वा अन्य भागात केले ह्यात अनेक गृहितके आहेत. एक म्हणजे भौगोलिक अंतर. जपान हा काही महाकाय देश नाही. त्यामुळे त्यांचे सैन्य भारतापर्यंत पोचले असते तर ते तितकेसे प्रबळ राहू शकले नसते. रसद, दारूगोळा पुरवणे दुरापास्त होत गेले असते. भारतानेही प्रतिकार केलाच असता. तिकडे पॅसिफिकमधे पर्ल हार्बर वगैरे अमेरिकेच्या कुरापती काढून त्या देशाला अंगावर घेणे हेही चालूच होते ह्यामुळे इतक्या विविध आघाडीवर जपान लढत असते तर नक्कीच हरले असते. कदाचित हे सुभाषचंद्रांनाही जाणवले असेल. आणि म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असेल. ब्रिटिश जपान्यांपेक्षा सुसंस्कृत होते ह्यात दुमत नाही. पण शेवटी तो शत्रूच. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जपानचे सहाय्य घेतले म्हणजे लगेच जपान्यांच्या अत्याचाराला खुले द्वार असे मला वाटत नाही. तसेही अणुबॉम्ब प्रकरण झाल्यामुळे ते दाती तृण घेऊन शरण आलेच त्यामुळे जर तर प्रकरण ताणायचे असेल तर अगदी जपान शिरजोर होऊ लागला असता तरी तो फार काळ तसा टिकला नसता. दुसरे असे की सुभाषचंद्रांची विचारसारणी ही नेहरु गांधींपेक्षा वेगळी होती. ते राजकीय विरोधक होते त्यामुळे काँग्रेस व इंग्रज ह्यांच्या बाजूने नेताजींची डाळ शिजण्यासारखी नव्हती. राजकीय महत्त्वाकांक्षा ही निव्वळ गांधी नेहरूंच्या हक्काची गोष्ट असली पाहिजे असे मानणेही खुळचटपणाचेच आहे.

बरोबर आहे ना. पण जपान्यांनी अगदी पापुआ न्यू गिनीमध्येही जाऊन अत्याचार केलेच होते.ते पण जपानला फार जवळ होते असे नाही. आणि जपान्यांनी अंदमानात घुसूनही त्याच गोष्टी केल्याच होत्या.तेव्हा जपान्यांशी संग म्हणजे विषाची परिक्षा होती. तसे जपान्यांना करता आले नसते तर एक भारतीय म्हणून मला आनंदच झाला असता पण जपान्यांना मुद्दामून बरोबर घ्यायला नको होते असे वाटते.

ह्म्म.. पंचतंत्रातली साप आणि पक्ष्यांची गोष्ट आठवली. ( अजून कोणी उल्लेख कसा केला नाही बरं?) झाडाच्या मुळाशी असलेल्या बिळातून एक साप पक्षी घरट्यात नसताना येई आणि त्यांची अंडी पळवायचा प्रयत्न करी. त्याला उपाय म्हणून ते पक्षी त्या बिळापर्यंत मासे विखरुन एका मुंगुसाला बोलावतात. तो सापाला तर मारतो पण आता त्याला नव्या खाद्याचा शोध लागलेला असतो. ते मुंगुस अंड्यांबरोबरच पक्ष्यांवरपण हल्ला करु लागते. आता मुंगसाने हल्ला केला असता की नाही हाच तो प्रश्न आणि त्याबद्दल ही चर्चा. :)

:) अहो मुंगुस म्हटल्यावर ते हल्ला करणारच. आणि मुंगुस आपल्यावर हल्ला करणार नाही आणि सापाला मारून गपगुमान निघून जाईल अशी कल्पना करून घेणे हा पण घातक स्वप्नाळूपणा नाही का?

कुठली बोधकथा वास्तवात वापरत येईल याबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का? जपानी लोकांच्या अत्याचारामुळे त्यांची खाद्याची, पगाराची, दारुगोळ्याची गरज भागत होती का? की त्याकरता त्यांना त्यांच्या रसदीची सोय करावी लागत होती? गोष्टीतले मुंगुस हे एकाच वेळी जंगलाच्या अनेक मैल दूर असणार्‍या दोन तीन टोकाशी असणार्‍या प्राण्यांशी लढत होते का? वगैरे मुद्देही यात आणता येतील. काही वेळा राजकीय तडजोड म्हणून दुष्ट वृत्तीच्या लोकांशी हातमिळवणी केली गेली आहे. ती प्रत्येक वेळेस अपयशीच ठरली आहे असे नाही. उदा. मित्रराष्ट्रांनी स्टालिनशी केलेले सहकार्य. जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.

मुंगुस आणि त्याचे पक्षी खाणे ह्याची तुलना जपानी सैन्याशी करता येईल का?
अहो, बाळबोध बोधकथेचे तात्पर्य घ्यायचे असते (म्हणींसारखेच). अशी कथेची पिसे काढत बसला तर कसे हो.. थोडक्यात या कथेचे तात्पर्य आहे "असंगाशी संग प्राणाशी गाठ". मग तुम्हाला मुंगसाची मानसिकता, धार्मिकता, विचारसरणी इ.इ. अभ्यासायची असेल तर माझी काही हरकत नाही. ;)
जी गोष्ट इतिहासात घडलेलीच नाही ती घडली असती तर काय काय होऊ शकले असते ह्याविषयीचा वाद हा काही मर्यादेपर्यंतच केलेला बरा. कारण त्याची सत्यासत्यता पडताळून पहाणे अशक्य असते. तेव्हा निव्वळ एकेकाचे वैयक्तिक मत आणि त्यामागची कारणमीमांसा इतकेच ह्या उहापोहाचे मर्यादित स्वरूप असू शकते.
हे अगदी मान्य.. :)

.. (प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने हा काढून टाकत आहे).

चीनसारख्या मोठ्या देशातही ३% पर्यंत लोकसंख्या १२-१३ वर्षात ठार मारणे म्हणजे किती भयानक प्रकार होता हे दिसतेच. फिलीपाईन्ससारख्या देशात जपानी घुसले १९४२-४३ मध्ये म्हणजे त्यांना वेळ मिळाला २-३ वर्षेच. तरीही विविध अंदाजांप्रमाणे फिलीपाईन्सची ४% लोकसंख्या जपान्यांनी या २-३ वर्षात स्वाहा केली.
३% आणि ४% च फक्त? ब्रिटिशांनी १००% उत्तर अमेरिका नष्ट केली. १००% ऑस्ट्रेलिया. १००% न्यू झी लँड. आफ्रिका ....?? असोच. ---------------------------------------------------------------- युरोपीय सोडून कॉलनी नसण्याचे भाग्य नेपाळ आणि जपान या दोनच देशांना लाभलेले आहे असे ऐकून आहे. जपानी लोक थोडेसे सैल पडले तेव्हा त्यांच्यावर नको ते राजकीय आणि व्यापारी कायदे लादायचा प्रयत्न झाला. (आमचे ऐकत असाल तर तुम्हाला स्वतंत्र म्हणू.) यातून शिकला म्हणून जपान 'मर्सिलेस' बनला. तो तसा नसता तर स्वतंत्र नसता आणि आज एक टुच्चड बिनकामी भूभाग असूनही जगातली दुसरी आर्थिक महासत्ता नसता.

हो बरोबर आहे ना. फक्त जपानने जे काही केले ते ७०-८० वर्षांपूर्वीच्या काळात आणि अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलियातील मुळातील संस्कृती पूर्ण नष्ट केली गेली ४०० वर्षांपूर्वी. म्हणजे या दोन घटनांमध्ये किमान तीन शतकांचे अंतर होते.आणि १९४० च्या दशकात आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.अशावेळी ब्रिटिश वीट असतील तर जपानी दगड होते. तेव्हा उत्तर अमेरिकेत युरोपिअनांनीच उच्छेद केला या उल्लेखाचा संदर्भ समजला नाही.

आपली गाठ १९४० च्या दशकातल्याच जपानबरोबर होती ३००-४०० वर्षांपूर्वीच्या युरोपिअनांबरोबर नव्हती.
जपान शरणच आले नसते तर अमेरिकेने एकूण किती अणुबाँब टाकले असते असे वाटते? अमेरिका देखिल १९४० च्या दशकातली होती. आणि युरोपीय देशांपेक्षा कमी क्रूर इ इ मानली जायची. ----------------------------------------------- १९४० असो नैतर १६४०. युरोपीय ते युरोपीय. युद्ध ते युद्ध. आपण श्रेष्ठ , कॉलनी कनिष्ठ, आणि कॉलनीतल्या लोकांशी नीच वागायचे ही विचारधारा युरोपीय आहे. पूर्वेकडे युद्ध संपले, मॅटर क्लोज.

जपान्यांनी या स्पीडने एखाद्या देशावर १५० वर्षे राज्य केले असते तर मला वाटते एतद्देशिय १००% लोकसंख्येचा खातमा केला असता.
चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय? ------------------------------------------------------------------------ आणि हो, भारतीय लोक संपवले असते असं इतक्या सहजासहजी म्हणता येत नाही. मंजे रेड इंडीयन्स संपवणे आणि भारतीय संपवणे यांत बराच फरक आहे. इथे नुसते जालियनवाला झाले तर लोकांचे डोके फिरायचे. बंदुकीला गाईची चरबी लावलेली महाग पडायची. ऑनेस्टली स्पिकिंग, कधीकधी मला भारतात ब्रिटिशांचे राज्य होते कि ती काही एतत्द्देशीयांचीच कुटील अरेंजमेंट होती असा प्रश्न पडतो.

चीन, रशिया, कोरिया, फिलिपिन्स, हाँग काँग, इंडोनेशिया, इ इ ठिकाणी जपानचे राज्य होते. तिथे जो खातमा झाला आहे / नाही ते पाहता वरील विधान सयुक्तिक आहे काय?
यापैकी कोणत्या ठिकाणी जपान्यांचा १५० वर्षे ताबा होता ते सांगा.

'जो खातमा झाला आहे' मंजे जितके टक्के झाला, जितक्या वर्षांत आहे. वॉर टाइम परिस्थिती आणि अदरवाईज परिस्थिती यांची तुलना होऊ शकत नाही.

म्हणूनच म्हणतो की जपानी आपल्या डोक्यावर बसले असते तर ते आपल्यासाठी आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे झाले असते.
http://en.wikipedia.org/wiki/Taiwan_under_Japanese_rule इथे असे लिहिले आहे कि तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.

तैवान १८९५ ते १९४५ असे चांगले ५० वर्षे जपानची कॉलनी होते. तिथे फार कै आग फुकाटा दिसत नाही.
आणि दक्षिण-पूर्व आशियात कित्येक ठिकाणी १९४० च्या दशकात २-४ वर्षातच फुफाटा तुम्हाला दिसत नाही. कारण काय तर १८९० च्या दशकात तैवानमध्ये तसे झाले नाही. उत्तम. जपानने १८७० च्या सुमारास आपले अलगतावाद धोरण संपवले आणि नंतर २५ वर्षातच तैवान गिळंकृत केला. कदाचित त्यांची रक्तपिपासा सुरवातीच्या काळात तितकी नसेलही आणि नंतरच्या काळात ती वाढली. १९४० च्या दशकात तर अगदी निंसंशयपणे जपान्यांनी रक्तपिपासा जोरदार होती. म्हणजे कसे झाले सुरवातीला एखादा वाघ माणसांवर नुसताच गुरगुरत असेल पण मारत नसेल पण नंतर माणसाच्या रक्ताची त्याला चटक लागली. आणि तुमच्यासारखे लोक म्हणणार अरे सुरवातीला तो नुसताच गुरगुरत होता.त्याने कोणाला मारले होते? म्हणजे तो रक्तपिपासू नाहीच. इतर ठिकाणी त्या वाघाने काय केले वगैरे गोष्टींना फाट्यावरच मारायचे. असा वाघ तुम्हाला तुमच्या घरात ठेऊन घ्यावासा वाटत असेल तर तो तुम्हालाच लखलाभ असो. अशा वाघापासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. हा मुद्दा मी कित्येकवेळा मांडला आहे.तो तुम्हाला मान्य नसल्यास किंवा समजला नसल्यास किंवा समजावून घ्यायचा नसल्यास माझा नाइलाज आहे. सारखी तीच तीच गोष्ट लिहायचा कंटाळा आला आहे. तेव्हा माझ्यातर्फे या चर्चेत पूर्णविराम देत आहे. नवीन मुद्दा आल्यास परत येईनच.पण काळरेषेची गल्लत करून विचित्र मुद्दे कोणी मांडत असेल तर त्याकडे पूर्ण दुर्लक्ष.

कोणत्याही क्षणी चर्चा संपवण्याच्या आपल्या अधिकाराचा मला पूर्ण आदर आहे. पण तरीही ... १. युद्धकालातील देशांचे जिंकलेल्या प्रदेशातील वर्तन हे तत्समान परिस्थितींशीच तोलावे. शांतिकालाशी नाही. त्यांची सरमिसळ करू नये. म्हणजे ब्रिटिशांनी भारतीयांना आय सी एस बनू दिले वा जालियनवालाबाग हे जपानच्या तैवानमधील तत्समान परिस्थितींशी तोलावे. दुसर्‍या महायुद्धाशी नाही. अँड सो ऑन. ---------------------------------------------------------------------- २. युद्धकालात किंवा यादवी कालात, स्वकीयांशी किंवा परकीयांशी आपण जनरली कोण किती क्रूर आणि सौम्य याचा रिव्ह्यू करू- अ. अमेरिका - दोन अणुबाँब, व्हिएटनाम ब. जर्मनी - ज्यूंची कत्तल क. जपान - पूर्वेकडचे अन्याय ड. रशिया - लेनिन, स्टेलिन चे 'कर्तृत्व' इ. चीन - माओ चे काम ब्रिटीशांकडे, फ्रान्सकडे या महायुद्धांत कत्तल करायचा कोणता मोठा मौका आलेला जो त्यांनी सोडला? बिचारे जिथे जिंकले ती त्यांचीच भूमी होती. रशिया आणि अमेरिकेने त्यांना जिंकून दिले. यात जपानचाच असा बाऊ करण्यात अर्थ नाही. उलट बुद्धाची जन्मभूमी म्हणून जपान्यांत भारताबद्दल नेहमी आदर राहिला आहे.

पण जपानी हे ब्रिटिशांपेक्षा भयंकर होते हेच मान्य करायला अनेक लोक तयार नसतात
असा विचार लोकांना करायला ब्रिटिश भाग पाडू शकतात मंजे नक्कीच फार हुशार असावेत. जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?

जपानी जर असे ब्रिटिशांपेक्षा भयंकर असते तर जगात जपानचे राज्य नसते का? ज्यांना थांबवायला शेवटी अणुबाँब लागला त्यांच्यासाठी जग खुलेच होते ना अणुबाँबचा शोध लागला नव्हता तेव्हा जिंकायला?
का हो तुम्ही प्रत्येक वेळी काळरेषेची गल्लत का करत आहात? जपानचा खुनशीपणा १८७० च्या सुमारास जपानी साम्राज्य ज्याला म्हणतात त्या काळापासून सुरू झाला. टोजोच्या काळात विशेषतः वाढला. सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.

सतराव्या आणि अठराव्या शतकात जपान इतर जगापासून पूर्णपणे अलग पडल्यासारखे होते आणि जपानी लोकांना जपान सोडायला आणि बाहेरच्यांना जपानमध्ये प्रवेश करायलाही परवानगी नव्हती.
हे मी थोड्या वेगळ्या शब्दांत मांडतो. अमेरिकेला जपानने आपले वाणिज्यिक नियम, बंधने स्वीकारावी असे वाटायचे. म्हणून अमेरिकेने/युरोपने पुश (मंजे काय ते समजून घ्या) केल्यावर जपानने "परवानगी" बंद केली (व्यापारासाठी किंवा कसेही कोणी आले कि थेट वर. आणि हा प्रकार प्रत्येक शतकात होता. म्हणून जपान आज इतका तगडा नॉन्-युरोपीय देश आहे. नैतर बाकी प्रत्येक देश किती दोहित आहे याचा बराच हिशेब निघतो. ------------------------------------------- भारतात ब्रिटिश किंवा मुस्लिम आक्रमक आले तेव्हा जे घडलं नाही (चोख उत्तर इ इ )याचं जे आपल्याला नेहमी वैफल्य वाटत असतं ते जपानमधे घडलं, अगदी पूर्वीपासून. आणि म्हणून त्यांना एका पातळीवर 'ब्रिटिशांपेक्षा क्रूर' जज करण्याचा प्रयत्न केला जातो.

तुम्ही परत काळरेषेची गल्लत का करत आहात? अमेरिका आणि जपानमधले वाणिज्यिक युध्द १९३० च्या दशकातील. जपान २०० वर्षे जगापासून अलग होते तो कालावधी सतराव्या शतकापासून (१६**) ते सुमारे १८७० पर्यंत. या काळात पहिले १०० वर्षे अमेरिका हा देशच ब्रिटिशांची वसाहत होता. अमेरिकेचे जागतिक घडामोडींमध्ये सगळीकडे नाक खुपसायचे प्रमाणे वाढले पहिल्या महायुध्दाच्या सुमारास.त्यापूर्वीच जपानने अलगतावाद संपविला होता. या काळरेषेच्या गल्लतीविषयीचा मुद्दा मी तीनवेळा मांडला आहे.तो यापुढे परत मांडायचा नाही. आणि जपान्यांनी युरोपिअन आला की ठार मारायचे हा प्रकार केला कारण ते ख्रिस्ती धर्माचा प्रचार करतील, आपल्या संस्कृतीवर घाला घालतील म्हणून. ते केले ते अगदी उत्तम केले.तरीही १६-१७ व्या शतकात युरोपिअनांनी उत्तर अमेरिकेत आणि आफ्रिकेत प्रचंड क्रौर्य दाखविले म्हणून १९४० च्या दशकात जपान्यांनी दक्षिण-पूर्व आशियात जे क्रौर्य दाखवले त्यात काय विशेष असे तुम्ही म्हणत असाल आणि असे खुनशी लोक भारतात आलेले चांगले असे तुम्हाला वाटत असेल तर असे वागणे तुम्हालाच लखलाभ असो.

श्री. क्लिंटन यांचे सर्व प्रतिसाद वाचले. त्यांनी वस्तुनिष्ठ प्रतिपादन केले आहे असे मला वाटते. क्रूर आणि अत्याचारी जपानी भारतात आल्यावर भारतीयांशी सरळ वागले असते ह्याची सुतराम शक्यता दिसत नाही. अमेरिकेने अणुबाँब टाकला नसता तर जपान्यांनी अजून हाहाकार माजवला असता. जपानी राज्यकर्ते आणि सैनिकांनी केलेल्या अत्याचाराची फळे अणुबाँबच्या रुपाने जपानच्या निरपराध जनतेला भोगायला लागली. ब्रिटीशांना घालविण्यासाठी त्यांच्याहून भयंकर सैतानांना घरात घेणे म्हणजे आत्मघात होता असे माझेही मत आहे. गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.

गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.
मी आजवर जे काहि गांधीजींबद्दल वाचलं वा ऐकलं आहे त्यात हा संदर्भ कुठेच आला नाहि. जमल्यास आठवुन नक्की संदर्भ द्या. गांधीजींच्या राजकीय आणि सामाजीक लढ्याचा बराच काथ्याकुट केला जातो. त्यांची आंतरराष्ट्रीय राजकारणातील समज फार कुणी प्रकाशात आणत नाहि.

नक्की कुठे वाचले ते आठ्वत नाही. कदाचीत वर्तमानपत्रात देखील वाचलेले असू शकेल. पण त्या लेखातील "ब्रिटीशांचे राज्य जाऊन जपान्यांचे राज्य येणार असेल तर मी ब्रिटीश राज्यास प्राधान्य देईन " असे गांधीजींचे (किंवा त्यांच्या तोंडी घातलेले) वाक्य नक्की आठवते.

गांधीजींचा देखील याच कारणासाठी सुभाष् बाबूंना विरोध होता असे वाचल्याचे आठवते.
भारतीयांचा जपान्यांकडून छळ होऊ नये अशी दूरदृष्टी गांधीजींना असू शकते. पण असं ठामपणे म्हणता न यावं. भगतसिंगाला पण गांधीजींचा विरोध होता आणि त्या केसमधे कोणत्याही देशाकडून भारतीयांचा छळ होणार नव्हता. सबब सशस्त्र म्हटले कि ते सरसकट विरोध करत असेच मानणे सयुक्तिक वाटते.

माझ्या परीने उत्तरे. सुभाषचंद्र बोसांचे विचार वा त्यांच्या आयुष्यातील घटना ह्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत नसाव्यात. एकंदरीतच गांधी नेहरू घराण्याच्या उदात्तीकरणात बाकी सगऴ्या लोकांच्या अस्तित्त्वाला दुय्यम स्थान दिले गेले आहे त्यामुळे सुभाषचंद्रांचा मुस्लिम अनुनय दुर्लक्षिला गेला असेल. आझाद हिंद सेना, तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा अशी चमकदार वाक्ये हीच जास्त स्मरणात राहिली असावीत. सामान्य जनमानस इतिहासाचा बारकाईने अभ्यास करण्याकरता प्रसिद्ध नसते. त्यात राज्यकर्त्या लोकांचा ह्याला हातभार लागला तर त्यात भरच पडणार. असो. तर सुभाषचंद्र बोस जिहादी वा खिलाफतींना डोक्यावर घेत असतील तर साफ चूक होते. अडाणीपणा किंवा मूर्खपणा होता असे माझे वैयक्तिक मत. कदाचित राजकीय स्वार्थापोटीही असे त्यांनी म्हटले असेल आणि तरीही ते चूकच. अमेरिकेने रशियाविरुद्ध लढताना मुजाहदीन लोकांना नको इतके डोक्यावर बसवून भस्मासूर बनवले ते असेच. परंतु कुणी १०० टक्के आदर्श नसतोच. गांधींचे विचार मला बहुतांश पटत नाहीत पण त्यांचे काटकसर, स्वच्छता, अस्पृश्यमुक्ती ह्याबाबतचे विचार स्वीकारण्यात मला काही अडचण नाही.

त्यामुळे सुभाषचंद्रांचा मुस्लिम अनुनय दुर्लक्षिला गेला असेल.
सुभाषबाबू मुस्लिम अनुनय करत मंजे काही चूक करत का? एका पातळीपर्यंत मुस्लिम अनुनय करणे आपल्या देशात योग्य वाटते. आणि एका पातळीच्या वर अनुनय करत असं म्हणता येत नाही. त्यांच्या सेनेत इस्लामी असं काही नव्हतं म्हणून 'आझाद मुस्लिम सेना' इ इ फूट पडली असं इथंच कोणीतरी म्हटलं आहे.

हिंदुत्ववादी विचारांचे लोक सुभाषचंद्रांना पाठिंबा देतात याचे नवल वाटते.विशेषतः ज्या कारणांसाठी गांधीजी दाढ्या कुरवाळणारे ठरतात नेमके तेच सुभाषचंद्रांनी केले तरी त्यांना पाठिंबा हे कोडे मला उलगडलेले नाही.
इथे कोट केलेलं सुभाषबाबूंचं भाषण १००% हिंदूत्ववादी आहे असं मला वाटतं. ते सिडोसिक्यूलर नाही म्हणून ते हिंदूत्ववादी नाही असं म्हणणं उचित नसावं.

ते सिडोसिक्यूलर नाही म्हणून ते हिंदूत्ववादी नाही असं म्हणणं उचित नसावं.
याचा अर्थ ते हिंदुत्ववादी आहे असं म्हणणं उचित असावं ? काय म्हणताय त्याचा तुम्हाला तरी अर्थ लागत असावा अशी आशा. इथे खरंच काय लिहावं कळत नाही, म्हणजे साधे दाखले पण उगी स्वतःच्या मताच्या विरुद्ध जातायत म्हणून काई पण वाक्य टंकायची ? याने हिंदुत्ववादाचेच जास्त नुकसान होतेय असे नै का वाटत.
परंतु कुणी १०० टक्के आदर्श नसतोच.
आणि
असो. तर सुभाषचंद्र बोस जिहादी वा खिलाफतींना डोक्यावर घेत असतील तर साफ चूक होते. अडाणीपणा किंवा मूर्खपणा होता असे माझे वैयक्तिक मत. कदाचित राजकीय स्वार्थापोटीही असे त्यांनी म्हटले असेल आणि तरीही ते चूकच. अमेरिकेने रशियाविरुद्ध लढताना मुजाहदीन लोकांना नको इतके डोक्यावर बसवून भस्मासूर बनवले ते असेच.
ही हुप्प्या यांची मते विचार करण्यायोग्य आहेत असे नमूद करतो.

काय म्हणताय त्याचा तुम्हाला तरी अर्थ लागत असावा अशी आशा.
ते विधान दुर्बोध झालं आहे त्याबद्दल क्षमस्व. पण सगळी ओरियंटेशन्स बाजूला ठेऊन वाचले तर त्यात अर्थ दिसू शकतो.

महात्मा गांधी यांना देशासह जगभरात अत्यंत आदराचं व मानाचं स्थान आहे. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावावर त्यांच्याबद्दल वापरल्या जाणाऱ्या अपशब्दांची पाठराखण करता येणार नाही,' असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. याप्रकरणी सर्व पक्षकारांची म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. मराठी कवी वसंत गुर्जर यांची 'गांधी मला भेटला' ही कविता १९९४मध्ये ऑल इंडिया बँक असोसिएशनच्या द्वैमासिकात प्रसिद्ध झाली होती. पुण्यातील 'पतित पावन' संघटनेने द्वैमासिकाच्या प्रकाशकाविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीचे खटल्यात रूपांतर होऊन प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत आले. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि प्रफुल्ल पंत यांच्या खंडपीठापुढं सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं आपलं मत व्यक्त केलं. 'विचारांचं स्वातंत्र्य आणि शब्दांचं स्वातंत्र्य यात बरंच अंतर आहे. विचार स्वातंत्र्याच्या नावावर एखाद्याच्या तोंडी काहीही शब्द घालून सनसनाटी निर्माण करणं अयोग्य आहे. राणी व्हिक्टोरियाच्या तोंडी एखाद्यानं असे शब्द घातले असते तर ब्रिटिशांनी काय प्रतिक्रिया दिली असती, असा सवालही खंडपीठानं केला. इथं प्रश्न केवळ भाषेच्या स्वातंत्र्याचा नाही, तर महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरण्याचा आहे, असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. महात्मा गांधी यांचा सन्मान राखणं ही देशाची सामूहिक जबाबदारी नाही का? आपण एखाद्या आदर्श व्यक्तीचा सन्मान राखू शकत नाही, पण त्याला अश्लील शब्दांत संबोधू शकतो, हा काय प्रकार आहे? असा संतापही न्यायालयानं व्यक्त केला. तूर्त खंडपीठानं या प्रकरणावरील निर्णय राखून ठेवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली एखाद्या इतिहासपुरुषाबद्दल अश्लील, अभद्र भाषेचा वापर करण्याचे स्वातंत्र्य देता येईल का, यावर न्यायालय निकालाच्या माध्यमातून भाष्य करणार आहे. त्यामुळं या निकालाबद्दल उत्सुकता आहे

खरे आहे.
विचार स्वातंत्र्याच्या नावावर एखाद्याच्या तोंडी काहीही शब्द घालून सनसनाटी निर्माण करणं अयोग्य आहे.
खरे आहे.मिडियाच्या माध्यमातून कंड्या पिकवणे,थिंक टॅन्कच्या नावाखाली न आवडणार्या लोकांची बदनामी करणे,प्रकरण अगदीच अंगाशी आले की 'नतमस्तक'झाल्याची नाटके करणे.. हे आधी बंद झाले पाहिजे.

हे बंद झालं पाहिजे, ते बंद झालं पाहिजे. माई, काँग्रेसचं राज्य आता गेलेलं आहे. मुस्कटदाबी करायचे दिवस आता गेलेले आहेत. आणिबाणी केव्हाच संपली. आता नवीन प्रकरणं उजेडात येतायत आणि येत जातील. मौनी पंतप्रधानांना समन्स गेलेलं आहे. उगीच कंड्या पिकवणे, बदनामी करणे वगैरे ६० वर्ष घासून पुसून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग बंद कर. नेहरूं महाराजांनी बोस यांच्या नातेवाईकांवर पाळत ठेवली होती हे सत्य कागदपत्रांमधून उघडकीस आलेलं आहे. आणि तेवढंच महत्वाचं आहे. हा धागा फक्त त्याच्याशी संबंधित आहे. नेताजींच्या कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा हा भंग आहे आणि असं करणारा माणूस अमर्याद सत्ता हातात असणारा पंतप्रधान होता. नेहरूंनी जे केलं त्याचं काही जस्टीफिकेशन नाही. तेव्हा उगीच दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दाखवण्याचा धंदा बंद केला तर बरं होईल.