Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
जालीय निदान ( internet diagnosis) काल माझ्याकडे सोनोग्राफीसाठी २५ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी आली होती. तिला पाळीच्या दिवसात फारच जास्त त्रास होत असे म्हणून स्त्रीरोग तज्ञाने माझ्याकडे पाठविले होते. माझ्या सोनोग्राफी च्या खोलीत मी रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा येण्याची परवानगी देतो. त्याप्रमाणे तिची आई सुद्धा आली होती. मी तिचे केस पेपर पाहीले त्यात फारसे काही आढळले नाही. तिची सोनोग्राफी सुरु केल्यावर तिने मला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टर endometriosis अजून आहे का/ माझ्या ओव्हरीज कशा आहेत. त्यावर काही डाग आहे का? आतमध्ये सिस्ट (cyst) आहे का? गर्भाशयाला सूज आहे का? सर्व साधारणपणे मी रुग्णाशी सोनोग्राफी करताना संवाद साधतो. त्यामुळे बर्याच गोष्टी ज्या निदानाला आवश्यक असतात त्या लक्षात येऊ शकतात. काही वेळेस त्यांना पाठवणार्या डॉक्टरांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने कितीही प्रश्न विचारले तरी मी चिडत नाही . मी तिला विचारले कि तुम्हाला endometriosis चा त्रास केंव्हा पासून आहे. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी तिला विचारले कि तुमची laparoscopy झाली आहे का? यावर ती म्हणाली कि नाही. मग मी विचारले कि तुम्हाला endometriosis आहे हे कोणी सांगितले. त्यावर ती म्हणाली कि अगोदरचे स्त्रीरोग तज्ञ पाळीचा इतका त्रास होतो तर असे काहीतरी असण्याची शक्यता आहे असे म्हणाल्याचे आठवते. मी तिला परत विचारले कि हे सिस्ट किंवा ओव्हरीज वर डाग तुम्हाला कोण म्हणाले? त्यावर ती म्हणाली कि ते मी इंटरनेट वर वाचले. हे ती मुलगी बोलत असताना मला थोडेसे हसू आले आणि मी तिला विचारले कि का हो तुमचा टी व्ही बिघडला कि तुम्ही त्याचा आय सी गेला आहे का सर्किट खराब झाले आहे का याचा जीवाला त्रास करून घेता का? किंवा इंटरनेट वर वाचून पाहता का? यावर त्यामुलीची आई सूचक हसली. अर्थात ती मुलगी नाही म्हणाली. मग मी तिला म्हणालो कि केवळ तुमच्या एका डॉक्टर नि हा शब्द उच्चारला म्हणून त्यावर तुम्ही जालावर बरेच वाचन केलेत आणि त्याने आपले डोके पिकवून घेतलेत?. तिला मी व्यवस्थितपणे पाळीचा त्रास का होतो हे समजावून सांगितले. बर्याच मुलींच्या गर्भाशयाचे तोंड लहान असते त्यामुळे पाळीच्या वेळेस झालेल्या रक्ताच्या गाठी बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय जोरात आकुंचन पावते त्यामुळे ओटीपोटात मुरडा झाल्यासारखे( spasm) प्रचंड दुखते. लग्न झाल्यावर जेंव्हा मुलगी प्रथम गरोदर राहते तेंव्हा तिची पाळी बंद होते आणि नंतर जसा जसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो तसे त्याचे तोंड मोठे होते आणि शेवटी प्रसुतीनंतर गर्भाशयाचे तोंड मोठे होते आणि हा प्रश्न कायमचा बंद होतो. मी तिला हसत म्हणालो कि याचा अर्थ तुम्ही लगेच लग्न करा असे मला सुचवायचे नाही. तुम्ही लग्न केंव्हा करावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे होईस्तोवर माझी सोनोग्राफी पूर्ण झाली होती आणि मला असे दिसले कि तिला वजन थोडेसे वाढल्यामुळे PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) हा आजार होता. पण हा काही फार गंभीर आजार नाही. मी तिला पुढे म्हणालो कि जर पाळीचा फारच जास्त त्रास होत असेल तर गर्भाशयाचे तोंड डायलेटर टाकून मोठे करता येते. परंतु लग्न न झालेल्या मुलीची खालून शक्यतो कोणतीही शल्यक्रिया केली जात नाही. हा उपाय अगदी शेवटचा म्हणूनच वापरला जातो. पाळीच्या त्रासावर परिणामकारक वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत ती सहज घेता येतील. नेट वर वाचून कोणतेही निदान करणे हे फारसे चांगले नाही. मी तिचे सर्व जुने कागदपत्र परत पाहायला मागितले.त्यात कुठेही endometriosis असल्याचा उल्लेख दिसला नाही. अगोदर केलेल्या सोनोगाफितही नाही.त्या सोनोग्राफीत तिला mild PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असल्याचे लिहिले होते. गम्मत म्हणजे तिने जालावर वाचून केलेल्या निदानावर एका आयुर्वेदिक वैद्याने तिला endometriosis चे उपचार चालूही केलेले होते. त्यातून तिला अडीच महिने पाळी पण आली नव्हती.( अर्थात हे कदाचित PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मुळे पण असू शकेल) तिच्या भावाच्या आग्रहामुळे ती आता स्त्रीरोग तज्ञाकडे गेली होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला. नक्की निदान नसताना गृहीत गोष्टींवर आजार आहे हे समजणे आणी त्यावर इलाजही करणे. मुळात जालावर वाचून अर्धवट ज्ञान घेऊन लोक येतात हा अनुभव मी गेली बरीच वर्षे घेत आलो आहे. दुर्दैवाने त्या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बहुतांश लोकांना कळत नाही आणि त्यामुळे ते भरपूर टेन्शन घेतात हे मी पाहतो आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही बाहेर आलो. ती मुलगी टॉयलेट मध्ये गेली असताना तिची आई मला म्हणाली डॉक्टर तुम्ही इतके छान समजावून सांगता तर मी तुम्हाला एक विनंती करते कि तिला नीट समजावून सांगा, काही तरी वाचते आणी टेन्शन घेऊन बसते.ती स्वतः इलेक्त्रीकल इंजिनियर आहे. चांगली मोठ्या कंपनीत नोकरी आहे.आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे असे काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहे. तिच्यासाठी चांगले स्थळ आले होते.मुलगा पण मेकानिकल इंजिनियर होता. तिने त्या मुलाला सांगितले कि मला ENDOMETRIOSIS आहे तेंव्हा मला मुल होण्याची शक्यता नाही. झाले ते लोक निघून गेले. असे सांगितल्यावर कोण लग्न करेल हिच्याशी? मला धक्काच बसला तिचा मोठा भाऊ इतका वेळ बाहेर बसला होता तो पण अगदी कळवळून म्हणाला कि डॉक्टर काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसते आणी म्हणते मला कुणाला फसवायचे नाही. तुम्ही तिला समजावा हो.मी त्यांना हसून धीर दिला. ती मुलगी तोवर टॉयलेटमधून बाहेर आली. मी तिला स्पष्टपणे सांगितले तुम्हाला कोणताही आजार नाही. तुम्ही नवीन कार विकत घेता तेंव्हा कारची कंपनी तुम्हाला तीन वर्षे किंवा ३०,००० किमी ची WARRANTY का देते तर नवीन गाडीत काही खराबी येण्याची शक्यता नसतेच म्हणून. तसेच आहे. पंचविसाव्या वर्षी कोणता आजार होईल. फार तर प्रेम जमू शकेल अहो पंचवीस वयाला मी आजार किंवा असल्या काही गोष्टी माझ्या स्वप्नात पण नव्हत्या. उद्या कुठे फिरायला जायचे. कुठल्या सिनेमाला जायचे.कुठे मुली पाहायला जायचे. असले विचारच आमच्या डोक्यात असत. पंचविशीला तुम्ही भलत्याच गोष्टी डोक्यात ठेवल्या आहेत. नेटवर वाचले म्हणजे त्यातील सर्वात वाईट आणी गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला होतील असे तुम्ही जे गृहीत धरता आहात ते चुकीचे आहे. माझ्या कडे भरपूर गरोदर बायका जालावर काही बाही वाचून डोकं पिकवून घेऊन येतात. मुलाची वाढ व्यवस्थित आहे का? माझा आहार बरोबर आहे ना? ई ई . तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात. नसलेला आजार गृहीत धरून तुम्ही तुम्हाला मुल होणार नाही हे मनात धरलेत? तुम्हाला अगदी endometriosis असेल तरीही त्यात मुल होत नाही हे कुणी सांगितले? मी गेली कित्येक वर्षे वंध्यत्व या विषयात काम करत आलो आहे आणी शेकड्यांनी बायका endometriosis च्या पाहील्या आहेत ज्या गरोदर होऊन व्यवस्थित मुलांना जन्म देऊन आनंदात आहेत. तुम्ही गाडीच्या ABS मधून आवाज यायला लागला कि नेटवर तपासता कि सर्व्हिस सेंटरला जाता? तुम्हाला पंचविसाव्या वर्षी काय आजार होणार आहे? उगाच स्वतःवर आणी आपल्या कुटुंबावर टेन्शन कशाला आणता आहात? मी तुमची सोनोग्राफी केलेली आहे त्यात endometriosis मुळीच दिसत नाहीये. त्यातून endometriosis अगदी असेल तरी ते सूक्ष्म स्वरुपात असेल आणी इतक्या कमी प्रमाणात असलेल्या endometriosis मुळे मुल होणार नाही हे समजणे साफ चूक आहे. त्यावर ती मुलगी हसली. तिला ते पटले.काहीवेळा सोनारानेच कान टोचावे लागतात तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भाऊ सुद्धा सद्गदित झाला. मी त्या मुलीला म्हणालो कि मला लग्नाला नाही तरी रिसेप्शनला बोलवा. मला आईस्क्रीम फार आवडते अन फुकट असेल तर अजूनच. ते सर्व जण हसले आणि मला निरोप देउन गेले. जाता जाता --- माहिती आणि शहाणपण यात फरक करायला आपण शिकले पाहिजे. टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

> मुळ प्रश्न हाच आहे कि तुमचा कुणावरच विश्वास राहिलेला नाही तर तुम्ही जाणार कुणाकडे? अगदी उचीत प्रश्न. जायला डॉक्टरकडेच हवे. पण कुठल्या डॉक्टरवर विश्वास ठेवणार? आपण दीलेल्या उदाहरणातही तीसर्‍या डॉक्टरने आधीच्या डॉक्टरने दीलेले औषध चुकीचे / न मानवणारे (उश्ण) आहे असा निर्वाळा दीलाच ना? जो तुम्ही चुकीचा आहे असे त्याला समजावले आहे. आता हा माणुस पहील्यांदाच बाकी दोन डॉक्टर्स कडे न जाता थेट त्या तीसर्‍या डॉक्टरकडे गेला असता तर त्याने चुकीचेच औषध दीले असते ना? आणी त्याला तुमच्यासारखा डॉक्टर मित्र नसता, तर चुकीच्या उपचारांमुळे खुप त्रास सहन करुन शेवटी डॉक्टर्सवर विश्वास न ठेवण्या बाबतीत बरोबर ठरला असता. > त्यामुळे केवळ डॉक्टरनी नव्हे तर समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. समा़ज म्हणजे कोण, तर त्यात रहाणारे लोक. त्यातील ९५% लोकांना आत्मपरीक्षण करायचे म्हणजे नक्की काय करायचे हे देखीले ठाउक नसते. बाकी खरोखर आत्मपरीक्षण करुन काही नीष्कर्श काढण्याची क्षमता व त्यावर काही ठोस उपाय करणे हे या संपुर्ण समाजापेक्षा समा़जातील उच्चशिक्षीत डॉक्टर्सनांच जमण्यासारखे आहे. सर्वसामान्य समाजाचा विश्वास शेवटी डॉक्टर्सनिच गमावला आहे, व तो परत मीळवणेही त्यांचाच हातात आहे,अर्थात त्यांना तशी गरज वाटत असेल तर. :: डॉ. खरे, हा प्रतिसाद केवळ चर्चेचा मुद्दा मांडण्यासाठी आहे, तुमचावर वैतक्तीक आरोप वगैरे करण्यासाठी नाही. मला आपल्या वैद्यकीय द्यानाचा व अनुभवाचा पुर्ण आदर आहे, कृपया गैरसमज नसावा. माझा वरचा प्रतिसाद बहुतेक गोपाळ सरांना दुखाउन गेला असे वाटले म्हणुन हे स्पष्टीकरण.

नेत्रेश साहेब हा मित्र पहिल्यांदा के ई एम रुग्णालयातील मेंदू विकार तज्ञा कडे गेला. येथे पैशाचा कोणताही प्रश्न नव्हता. तरीही हा मुलुंड च्या दुसर्या मेंदूविकार तज्ञा कडे गेला तेथेही त्याला तीच औषधे दिली गेली यानंतर हा एका आयुर्वेदाचार्याकडे गेला. हा कोणताही मेंदूचा तज्ञ नाही ज्याने त्याला औषधे उष्ण पडतात हे सांगितले. पंचकर्म वगैरे करून त्याच्या ताळूवरून हात फिरवून घेतला पण त्यामुळे त्याचा आजार परत आला. आणी आता काय करायचे म्हणून तो चौथ्या डॉक्टरकडे( माझ्याकडे) आला जेथे परत पैश्याचा प्रश्न नव्हता. ( ते सुद्धा माझ्या भावाचे वर्गमित्र घेऊन आले म्हणून). मी साधारणपणे ईआटृ पथी वर टीका करत नाही म्हणून मी याचे जास्त विस्तृत वर्णन केले नाही. जेंव्हा तुम्ही तुम्हाला पाहिजे असा सल्ला देणारा डॉक्टर भेटेपर्यंत तुम्ही बाजार फिरता असे लोक काही कमी नाहीत. पण अशा लोकांचे मत हे सर्वसाधारण जनतेचे मत आहे हे आपण गृहीत धरता आहात हे चुकीचे आहे याचे कारण आपण पिवळा चष्मा लावला आहे. अगदी येथेही आपण सांख्यिकी लावली तर ७५ % डॉक्टर बरोबर आहेत ना ? समाज जितका प्रामाणिक असेल तितकेच त्यातील डॉक्टर प्रामाणिक असतील . मग फक्त डॉक्टर नि आत्मपरीक्षण करावे समाजाने नाही हा मानभावीपणा कशाला? वरील उदाहरणात जर ७५ % डॉक्टर प्रामाणिक असतील तर हे प्रमाण समाजाच्या तुलनेत कितीतरी जास्त येईल. असो आपण म्हणता तेच बरोबर मला वितंडवाद घालण्यात फारसा रस नाही.

हा हा हा, एकच नंबर लेख. अगदी सोनाराने कान टोचले ते बेष्ट केलेत. शेवटची ओळ तर एकदमच खतरा. आंजाच्याही मर्यादा असतात हे कैकांच्या गावीच नसते त्यांना असे स्पेशलिस्टनेच सांगावे लागते.

अगदी सोनाराने कान टोचले ते बेष्ट केलेत. आपल्या इथल्या सोनाराला कान टोचण्यातले काय कळतेय ? आंजावर कित्ती कित्ती बॉडी पियरसिंगचे प्रकार आहेत, बघा. ;)

हे कोणी पंजाबातले गृहस्थ नाहीत ;) तसे तिकडे पश्चिमेत जास्त करून अस्ते +D . आता पश्चिम दिशेने आल्यामुळे ते जास्त अपमार्केट * असणारच :) * अपमार्केट मधला 'अप' मराठीत्ला नाय, विंग्रजीतला हाय +D .

लेख आवडला. नेटच्या आहारी जाऊन सर्वज्ञतेचा आव आणणारे लोक (या लेखातून) काही धडा शिकतील तो सुदिन!

माझ्याकडे काही दिवसापूर्वीपासून नेट कॅन्सर पेशंट येते एक.तिला काहीही रोग नाही तोंडाचा.पण तिने नेटवर ओरल कॅन्सरच्या लक्षणांमध्ये गालाच्या आतल्या त्वचेचे व्रण कॅन्सरचे असतात असं वाचलंय.हिला जे दिसतं ते साधी चिक बाईट आहे.तेही नाॅर्मल.हिला ते सांगुन पटत नाही.तिच्या दोन बायप्सी पण झाल्या आहेत.तिनेच त्या करा असे नेटवर वाचुन डाॅक्टरना सांगीतले.रिपोर्ट नाॅर्मल आल्याच्या दुःखाने आता ती माझ्याकडे आली!मी कुठे कॅन्सर शोधुन देते का बघायला!! तिच्या घरच्याना बोलावुन सायकियाट्रिस्टकडे पाठवलं तर त्या उपचाराबद्दल वाचुन आता त्याना भंडावतेय!!

तुम्ही अगदी सेकंड ओपिनियनसाठी आला असलात, तरी डॉक्टरला क्लियर तक्रार सांगा. सेकंड ओपिनियनसाठी आला असलात तर कृपया तसे आधीच सांगा. आधीच्या डॉक्टरांनी काय उपचार्/निदान केले, त्याचे कागद दाखवा. तसेच इंटरनेटवर तुम्ही काय शोधले तेही सांगा. तुमचा वेळ, पैसा, अन डॉक्टरांच्या मेंदूचा घसारा वाचेल. ***

कार खराब झाली तर मेकॅनिककडे जातात अन तब्येत खराब झाली तर नेटकडे धावतात, कारण डॉक्टरांची विश्वासार्हता घटली आहे, असे वर श्रीमान नेत्रेश यांचे प्रतिपादन आहे. कार खराब झाल्यावर कंपनीत सर्विसिंगला नेणे, अन रस्त्यावरच्या मेक्यानिकला दाखवणे यात काय फरक असतो, अन त्यानंतर कंपनीत गाडी नेली की कसा बांबू लागतो ते समजत नाही का? मग त्या अनुभवानंतर सगळ्याच कंपन्या अन ऑफिशिअल सर्विस सेंटर्स कशा लुबाडतात, असे "आत्मपरिक्षण" प्रसिद्धीस येते. आता याला काय करावे? अनेकदा पेशंट माझ्याकडे येऊन, 'काय डॉक्टर, दोऽन दिवस झाले, अजून बरं कसं काय वाटत नाही?' असं दटावून विचारतात. मग नीट इतिहास विचारला, की सगळ्या गोळ्या/औषधे घेतलेल्या नसतात. कारण 'घरी कार्यक्रम होता.' 'मी गावाला गेलेलो होतो.' 'मला अँटीबायोटिक 'गरम' पडतात.' वगैरे थापा. टोटल रेस्ट सांगितलेली असते, पण दुकानातला गल्ला खुणावतो. हापिसातून रजा घ्यायची नसते. म्हणून दुखणं अंगावर काढलेलं असतं. दारू पिऊ नको. सिग्रेटी फुंकू नको. तंबाखू खाऊ नको. तिखट मसाले खाशील तर पोटात जळजळ होईल. अशा सल्ल्यांकडे टोटल काणाडोळा असतो. व्यायाम, वाफ घेणे, डाएट कंट्रोल, विश्रांती घेणे इ. खरं तर फुकट मिळणार्‍या बाबी तर करायच्याच नसतात. एक 'भारी' गोळी द्या, ज्यायोगे मी इथून आत्ताच टोटल बरा होऊन घरी जाईन, अशी काहीतरी आयडिया डोक्यात असते. सगळ्यात महत्वाचं, तुमचा आजार तुम्हाला डॉक्टरने दिलेला नाही, हेच विसरतात. :( असो. धागाविषयाशी फारच अवांतर होतंय इथे. लेखनसीमा.

> 'कार खराब झाली तर मेकॅनिककडे जातात अन तब्येत खराब झाली तर नेटकडे धावतात' : हे डॉ.खरे यांच्या मुळ लेखातले वाक्य आहे. > 'कारण डॉक्टरांची विश्वासार्हता घटली आहे, असे वर श्रीमान नेत्रेश यांचे प्रतिपादन आहे' : हा वरील वाक्यावरुन निघणारा निष्कर्श आहे.

'कार खराब झाली तर मेकॅनिककडे जातात अन तब्येत खराब झाली तर नेटकडे धावतात' : हे डॉ.खरे यांच्या मुळ लेखातले वाक्य आहे
. -- यावरून लोक स्वतःच्या तब्येतीबाबत जे करताहेत ते चुकीचे करत आहेत, हे डॉ. खरे सांगताहेत. तेच इथल्या बहुसंख्य प्रतिसाददात्यांना वाटल्याचे दिसतेही आहे. पण,
'कारण डॉक्टरांची विश्वासार्हता घटली आहे, असे वर श्रीमान नेत्रेश यांचे प्रतिपादन आहे' : हा वरील वाक्यावरुन निघणारा निष्कर्श आहे.
हा निष्कर्ष श्री नेत्रेश यांनी वैयक्तिक आकसातून काढलेला आहे. त्यापाठी कोणताही विदा वा अभ्यास नाही. केवळ डॉक्टर जमातीबद्दल एकंदरित दूषीत पूर्वग्रह असल्याने ते तसे टंकत आहेत, असा माझा निष्कर्ष आहे. गो ऑन, या माझ्या वरील वाक्याला डिस्प्रूव्ह करा :)

डॉ. खरे यांनी एक समस्या / अनुभव सांगीतला आहे. व लोक असे का वागु लागले आहेत याचा विचार मी माझ्यापरीने करत आहे.

तुम्ही विन्गीनेर झालात का? प्रत्येक अभ्यास क्रमात पहिल्या सत्रात सिविल चा विषय असतो. असे का असावे असे मी एकदा मास्तारास विचरले. ते म्हणाले कि घर हि एका सार्वजनिक जरुरत आहे. आणि ते प्रत्येकालाच घ्यावे लगते. स्वतःचे किंवा भाड्याचे . वेळी प्रसंगी ते दुरुस्त पण करावे लगते. मग जर का विन्गीनेर लोकांना त्याचे डोके नसेल तर कसे हो? तस्मात, शरीर हे सगळ्यांनाच अहे. आणि आजारी प्रत्येकच पडत असतो. मग कमीत कमी शरीर ज्ञान तरी प्रत्येकालाच असले पहिजे. भले तुम्हाला औषधोपचार येईल का नाही ते सांगता येत नाही . पण नक्की काय त्रास आहे हे तरी कळलेच पहिजे. मला त्या मुलीचे अजिबात काही गैर वाटत नाही . तिने प्रयत्न प्रामाणिक केलेला अहे. भले माहिती अपुरी वाचली असेल. आणी तसे असेल तर मग वैद्यबुवांनी समजवायला नको का? का समजावून सांगितले तर बाभळ बुडते? विदेशी वाचाळ

मला त्या मुलीचे अजिबात काही गैर वाटत नाही . तिने प्रयत्न प्रामाणिक केलेला अहे. भले माहिती अपुरी वाचली असेल. आणी तसे असेल तर मग वैद्यबुवांनी समजवायला नको का? का समजावून सांगितले तर बाभळ बुडते? वाचाळ साहेब मुलीचा प्रयत्न प्रामाणिक नाही असे मी म्हणालेलो नाही फक्त चुकीच्या दिशेने होता. अजून भरपूर माहिती जालावर उपलब्ध आहे कि तिने जरूर वाचावी. पण मग आपल्याला मूल होणारच नाही हा तिने काढलेला निष्कर्ष बरोबर आहे हे आपण कसे ठरवले? त्यामुळे मानसिक तणाव घेऊन तिचे वजन कमी झाले तर हे धुणे वैद्यबुवांनी का धुवावे ? आपण ४९८ अ या कायद्याबद्दल( घरगुती हिंसाचार) जालावर भरपूर वाचन करून शंका निरसनासाठी एखाद्या वकिलाकडे गेलात आणि त्याने जर आपल्याला पाच हजार रुपये फी सांगितली तर आपले काय म्हणणे आहे? अशीच फी एखाद्या डॉक्टरने घेतली तर ती द्यायची किती लोकांची तयारी असेल? जर लोकांची अशा सल्ल्यासाठी पाच हजार रुपये द्यायची तयारी असेल तर मी माझे सोनोग्राफी मशीन बंद करून असा सल्लागार म्हणून दुकान टाकायला एका पायावर तयार आहे. बोला कुठे यायचं ? आजचा सुविचार --क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

डॉक्टरांची विश्वासर्हता खरोखरच घटली आहे का? अशीक्षीत व उच्चशिक्षीत असे सर्वच लोक वाईट अनुभव आल्यावर डॉक्टरवर हात का उचलत आहेत? तेही हा गुन्हा आहे हे माहीत असुन? डॉक्टरांच्या उपचार करण्याच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या उपचार करण्याच्या ईच्छेपद्दल लोकांना संशय येत असेल का? डॉक्टर्स पैसे उकळण्यासठी चुकीचे/अपुरे उपचार करत असतील असे त्यांना वाटत असेल का? अशा घटना वारंवार का व्हाव्यात? या मध्ये डॉक्टर लोकांचेही काही चुकते का यावर त्यांनी तटस्थपणे विचार करावा (आत्मपरीक्षण करावे) हे सुचवणे कोणत्या मर्यादे बाहेर आहे का? आणी केवळ अशी सुचना करणार्‍यावर कुणी डॉक्टर वैयक्तीक पातळीवर जाउन शाब्दीक हल्ले करत असेल, तर प्रत्यक्षात त्याच्या पेशंटवर त्याने केलेल्या उपचारा बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो कीती शांतपणे देत असेल? तसेही आपण लिहुन दिलेल्या औषधांची संपुर्ण माहीती, प्रत्येक औषधाचे सर्व साईड ईफेक्टस कीती डॉक्टर रुग्णांना समजाउन सांगतात? आणी संभाव्य साईड ईफेक्टच्या माहीती आभावी तसा अनुभव आल्यावर रुग्णाला डॉक्टर विषयी अविश्वास वाटला, व त्याने आयुर्वेद, ईंटरनेट ईत्यादीचा आधार शोधला तर तोच एकटा दोषी आहे का? आत्मपरीक्षणाचा सल्ला दीला म्हणजे दोषी ठरवले असे समजणार्‍या उच्चशीक्षीतांना काय म्हणावे? असा सल्ला देणार्‍यावर वैयक्तीक पातळी वर जाउन शाब्दीक हल्ले करणारी मनोवृत्ती ही वाईट अनुभव आल्यावर डॉक्टरना मारहाण करणार्‍या मनोवृत्ती पेक्षा वेगळी कशी? डीस्क्लेमरः *** हे प्रश्न कुणा एका डॉक्टर बाबत केलेले नाहीत. (गोपाळसरांनी उत्तर दीले नाही तरी चालेल) *** ** खुप चांगले, सेवाभावी, प्रोफेशनल, कुशल, रोग्यांविषयी कळकळ असणारे, प्रसंगी स्व-खर्चाने उपचार करणारे डॉक्टर भारतात आहेत (व त्यातले काही मिपा वर ही आहेत) याची पुर्ण कल्पना आहे. त्यांचा अपमान करायचा किंवा त्यांना कसलाही दोष द्यायचा उद्द्येश नाही. * समा़जात दुसर्‍यांना बेअक्कल समजणारे महाभाग असतातच. डॉक्टरला काय कळते, असे समजुन स्वतःच उपचार बदलणे हे कदापी समर्थनिय नाही. मी माझ्या कुठल्याही प्रतीसादात पात्रता नसताना स्व-उपचार करणार्‍यांचे समर्थन केलेले नाही.

असे जालीय आजाराने ग्रस्त लोक हल्ली खूपजण आजूबाजूला दिसतात. लेख आवडला तसेच इतर डॉक्टर मंडळींचे प्रतिसादही आवडले.

माझे आजे सासरे वय वर्ष ८४ . ठार बहिरे असून त्यांना जो आजार आहे तो आम्ही सांगितलेला नाहीये आणि फमिली वैद्य हि सांगत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांचा आजाराबद्दल काय बोलतोय हे समजत त्यांना नाही , तर आजोबा काय करतात तर त्यांच्या औषधाच्या वरील माहिती वाचून इंग्लिश शब्द कोश मध्ये शोधतात आणि स्वतःच्या आजाराचे निदान करतात त्यामुळे आम्ही शब्द कोश लपवून ठेवले आहे.

नेत्रेश साहेब आपले मूळ गृहीतच चुकीचे आहे म्हणून आपले येणारे निष्कर्ष चुकीचे येतील यात काही विशेष नाही. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराने मानवी शरीर बनवले आहे ( आपला विश्वास असेल तर) आणि मोटार मानवाने बनविली आहे. त्यामुळे स्वताहून बरे होणे हि प्रक्रिया मानवी शरीरात असतेच तशी गोष्ट मोटारीत नाही. उदा. आपले डोके दुखत असेल तर ते काही काळाने स्वतःहून थांबते. पण आपल्या मोटारीच्या मागच्या मडगार्ड मधून आवाज येत असेल तर तो स्वतःहून क्वचितच थांबेल (मड गार्ड पडून गेले कि आवाज थांबेल). तेंव्हा फालतू कारणासाठी डॉक्टरकडे जाऊ नये असेच ( आणि बरोबर असे ) आपल्याला लहानपणीच शिकवले जाते. दुसरी गोष्ट आपल्याला होणारे लहान सहान आजारात आपण घरगुती औषधे घेऊन बरे होऊ शकतो हा अनुभव सर्वाना आहेच. तेंव्हा आपल्या शरीराच्या कामातील बिघाड कमी आहे कि जास्त आहे याची संवेदना आपल्या मेंदूला मिळतच असते. एक साधे उदाहरण मी आपल्याला देतो -- घराच्या रजिस्ट्रेशन साठी मी सरकारी कार्यालयात गेलो होतो वेळ सकाळी ११. यासाठी मी घरून १०.३० ला जेवून निघालो होतो. काम आटोपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते. आपण किती क्षुद्र आहोत हे समजण्यासाठी एक तर हिमालयात जावे किंवा सरकारी कार्यालयात. तेथून मी परत घरी आलो तो कावलेला होतो डोकं दुखत होतं. आईने विचारले काय झालं. मी सर्व सांगितलं तिने मला एक रव्याचा लाडू खायला दिला एक ग्लास भरून बोर्न्व्हिता टाकून गरम दुध दिलं आणि थोडासा डोकं चेपलं. आणि लगेच माझं डोकं दुखणं थांबलं. यावर आई म्हणाली अरे तुला भूक लागली होती. भूकेनेही डोकं दुखतं. हि साध गोष्ट मी डॉक्टर असूनही मी विसरलो होतो. ती हसत म्हणाली तू डॉक्टर असलास तरी मी डॉक्टरची आई आहे. तात्पर्य काय? आज आपल्याला काही होतंय हे सांगण्यासाठी आपल्या घरात अनुभवी अशी आपली माणसा नाहीत यामुळेहि बरेच लोक नेट चा आधार घेतात. पूर्वी लहान सहान गोष्टीन्साठी किंवा मानसिक तणावाने होणारे आजार घरच्या अनुभवी माणसांच्या आधार देणाऱ्या शब्दांमुळे आणि घरगुती औषधामुळे बरे होत असत. आता विभक्त कुटुंबात हि आधार देणारी प्रणाली नाहीशी झाल्यामुळे नेटचा आधार घ्यावासा वाटतो. पण हा आधार कुठपर्यंत घ्यावा याची मर्यादा समजता आली पाहिजे. यंत्रणेत बिघाड झाला आहे हे समजावे अशी कोणतीही गोष्ट बहुसंख्य मोटार गाड्या मध्ये नसते. त्यातून ९५ % लोकांना गाडीमधले काहीच कळत नाही त्यामुळे मेक्यानिकने कसा आणि कधी थुका लावला आहे हे आपल्याला समजत नाही.( आपण धागा काढून पहा २०० पार होतात कि नाही?) आणि जरी आपण मोटार गाडीचे इंजीनियर असलात तरी त्याला लागणारे स्पेअर पार्टस साठी आपल्याला मेक्यानिक कडे जावेच लागते. त्यामुळे गाडी बाबत माणूस मेक्यानिक कडे जातो पण स्वतः बाबत नेट वर जातो याच्या मागील मूळ कारण हे आहे कि मानवी निर्मिती बद्दल त्याला खात्री नाही पण परमेश्वरी निर्मिती बद्दल त्याला जास्त खात्री आहे. ( याच कारणासाठी तो गाडीचे सर्व्हिसिंग नियमित ३-६ महिन्यांनी करतो.परंतु स्वतःच्या शरीराचे सर्व्हिसिंग वर्षानुवर्षे ( पन्नाशी साठी पर्यंत) सुद्धा करत नाही. दुर्दैवाने असा मौलिक विचार न करता तुम्ही आत्म परीक्षण आणि मेकांनीकची विश्वासार्हता डॉक्टर पेक्षा जास्त आहे अशा वितंडवादात पडलात. आपण पिवळा चष्मा लावलात कि जगाला कावीळ झाली आहे असे आपल्याला दिसते. जर आपण नीट पाहिलेत तर आपल्याला लक्षात येईल कि मी कुठेही नेट वर जाऊ नका असे म्हणालेलो नाही. माझे म्हणणे एवढेच आहे कि नेट वर वाचून जसे आपण वकिली करू शकत नाही तसेच आपण डॉक्टर होऊ शकत नाही. जे असा प्रयत्न करतात त्यांचे स्वतःचे नुकसान होते. नेट वर केंव्हा जावे हे हि मी लिहिले आहे आपल्या साठी परत उद्धृत करतो. (अर्थात अजूनही असे काही फायदे असू शकतात जे मला आत्ता आठवत /जाणवलेले नसतील.) अंतर्जाला वरील माहिती हि नक्कीच उपयुक्त आहे परंतु त्या माहितीच्या आधारावर आपण रोगनिदान करायला जाऊ नये. पण आपल्याला रोग निदान नक्की झाल्यावर कोणता आजार आहे त्यावर कोणते पथ्य पाळावे काय आहार विहार उपयुक्त ठरेल इ माहितीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. उदा.आपल्याला सोरीयासीस किंवा दमा हा आजार असेल तर तो आजार कोणत्या गोष्टीने वाढू शकतो किंवा कोणती पथ्ये पाळली असता तो कमी होऊ शकतो. आपण घेत असलेलीं औषधे त्यांचा प्रभाव आणि त्याचा साईड इफेक्ट या सर्व गोष्टींचे ज्ञान आपण मिळवू शकतो. आणि यांनतर येणाऱ्या शंकांचे निरसन आपण आपल्या डॉक्टरांकडून करून घेऊ शकतो.

बरेच डॉक्टर रुग्णांच्या चुकीच्या वागण्याविषई तक्रार करत आहेत. तक्रार रास्त आहे. पात्रता नसताना नेटवरचि अर्धवट माहीती वाचुन उपचार करणे, औषधांची मात्रा बदलणे, औषधे घेणे थांबवणे आणी हे सर्व डॉक्टरपासुन लपवणे हे चुकीचे आहे यात वादच नाही. पण आपला जीव जाणुनबुजुन धोक्यात टाकायला हे सर्व सुशिक्षीत लोक मुर्ख आहेत का? काही असतील पण सर्वच नक्कीच नसावेत. मग लोक स्वतःच्या जीवाशी असे खेळ का करतात? त्यांना डॉक्टरवर पुर्ण भरवसा वाटत नाही का? डॉक्टर संवाद साधण्यात कुठे कमी तर पडत नाहीत? रोगाची, त्यावरच्या उपचाराची, लिहुन दिलेल्या औषधांची व त्यांच्या साईड ईफेक्टसची संपुर्ण माहीती रोग्याला पुर्ण समजेपर्यंत दीली जाते का? डॉक्टर व रोगी हे एक टीम बनुन रोगाशी लढत आहेत, की डॉक्टरांचे वर्तन हे रींगमास्टर/ड्रीलमास्टर प्रमाणे आहे - "मी सांगीतलेली औषधे मी सांगीतलेल्या वेळेला एकही प्रश्न न करता गपचुप वेळच्या वेळी घे, बरा होशिल. बाहेर बरेच पेशंट आहेत तेव्हा आता काही शंकानिरसनाला वेळ नाही." या सारखी वाक्ये कायमच रुग्णांना ऐकावी लागत आहेत का? या सारख्या गोष्टींमुळे तर लोक असे वागत नसतील? एक डॉक्टर म्हणुन रुग्णाचा पुर्ण विश्वास संपादन करायला मी आणखी काय करु शकतो? या, व अशा अनेक गोष्टींचा डॉक्टर म्हणुन तुम्ही विचार करत असाल, पण सर्वच डॉक्टर्सनी तो केला तर मला वाटले आपण मांडलेली समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होउ शकेल. तुम्हाला या अपेक्षा वावग्या किंवा अवास्तव वाटतात का? आत्मपरीक्षण म्हणजे याच गोष्टींचा विचार करावा असे सुचवले होते. यात काही कावीळ झाल्यासारखे विचार आहेत असे मला तरी वाटत नाही. अवांतर : "काविळ झालेल्याला जग पिवळे दीसते" ही म्हण माहीत होती. पण आपल्या प्रतीसादातले "आपण पिवळा चष्मा लावलात कि जगाला कावीळ झाली आहे असे आपल्याला दिसते." हे वाक्य मात्र समजले नाही.

१००% सहमत खरे साहेब ! याबाबतीत नरेंद्र मोदींचे वाक्य मला फार आवडते," इण्टरनेटसे जानकारी मिलती है पर ज्ञान नाही मिलता" डॉक्टरकाकांनी दिलेले औषध गुगलकाकांकडून तपासून घेण्याचे खूळ सध्या पसरले आहे. माझ्यासमोर घडलेला किस्सा सांगतो. एका ज्येष्ठ डॉक्टरकाकांनी कुठल्याशा समस्येवर एका तरुण रुग्णाला औषध दिले. त्यावर तरुण म्हणाला," या औषधा विषयी नेट वर खूप वाईट वाचलेले आहे. तरीसुद्धा तुम्ही मला का देताय ?" डॉक्टर काका म्हणाले ," माझा औषधाचा गुण आला नाही तर त्यावर उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुझ्या नेट वरच्या माहितीसाठी मी बांधील नाही. पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको. नेट ला विचार !"

एका ज्येष्ठ डॉक्टरकाकांनी कुठल्याशा समस्येवर एका तरुण रुग्णाला औषध दिले. त्यावर तरुण म्हणाला," या औषधा विषयी नेट वर खूप वाईट वाचलेले आहे. तरीसुद्धा तुम्ही मला का देताय ?" डॉक्टर काका म्हणाले ," माझा औषधाचा गुण आला नाही तर त्यावर उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुझ्या नेट वरच्या माहितीसाठी मी बांधील नाही. पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको. नेट ला विचार !"
हे कुठे तरी पटत नाही का ? म्हणजे असे की प्रश्नच विचारायचे नाहीत का ? आपल्या शाळांमध्ये बरेच मास्तर असेच उत्तर देऊन शंका मारुन टाकतात आणि ते नक्कीच बरोबर नाही असं वाटतंय. समोरचा अगदी मुद्दाम शंका काढायच्या (अथवा स्वतःचे अक्कल-प्रदर्शन करायचे) म्हणून विचारत असेल तर ते उत्तर देणार्‍याच्या लक्षात येतेच की. जाणकार अशा डॉक्टरांनी (किंवा इतर क्षेत्रात असेल तर त्यातल्या तज्ञांनी) उलट नीट उत्तरे द्यावीत असे वाटते. उदा. एक अनुभव सांगतो. एका डॉक्टरांनी एक क्रीम लावायला दिले त्यात स्टेरोईडस होते. आता साईड-इफेक्टसमध्ये त्याचे "दीर्घकालीन वापरानंतर परिणाम" वाचायला मिळाले. पुढच्या वेळेस त्या डॉक्टरांनी तीच क्रीम अजून ३ महिने वापरायला सांगितल्यावर त्याबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी "good question" असं म्हणून अगदी व्यवस्थित समजावले. गरज पडल्यास कोणती लक्षणे पहायची तेही सांगितले. आता हे दोघांसाठीही योग्यच झाले ना ? माहीती हाताशी असणे योग्यच म्हणून कोणी नेट-डॉक्टर बनायला जाऊ नये हे ही तितकेच खरे. पण डॉक्टरांना पण आता अशा प्रश्नांना उत्तर द्यायला तयार रहावे लागणार तेव्हा अगदीच "पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको" असली उत्तरे तितकीशी योग्य वाटत नाहीत.

डॉक्टर हाहि एक माणूस आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना परत प्रश्न विचारले कि राग येतो किंवा त्यांचा इगो दुखावतो. ( आपण आपल्या बॉस ला "उलट" प्रश्न विचारले तर किती वरिष्ठ त्याला सरळ उत्तर देतील). असेच प्रश्न वरिष्ठ डॉक्टरांच्या बाबतीत होताना आढळतात. जास्त प्रश्न विचारणाऱ्या माणसाला तुमची फी परत घेऊन जा आणि परत माझ्याकडे येऊ नका असे सांगणारे एक वरिष्ठ डॉक्टर मी पाहिलेले आहेत. स्वभावो दुरतीक्रमः . दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही.अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जेथली वैद्यकीय सेवा आदर्श आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील. कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. तुम्ही आपले काम करायला सरकारी कार्यालयात जाऊन पहा यापेक्षा सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील.

आपण आपल्या बॉस ला "उलट" प्रश्न विचारले तर किती वरिष्ठ त्याला सरळ उत्तर देतील
हे उदाहरण येथे गैरलागू आहे हो डॉक. कारण डोक्टर-पेशंट नाते आणि वरिष्ठ(बॉस)-कनिष्ठ नाते अगदीच वेगळे (अ‍ॅप्पल न ऑरेन्ज हो). लोक त्यांच्या तब्येतीच्या काळजीने तुमच्यासमोर येतात तेव्हा जर कोणी वरिष्ठ आहे म्हणून उद्धट वागणार असेल तर ते स्वभाव म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. चौकशी कक्ष असो वा कॉल-सेन्टर अथवा ज्यांचा पेशंटशी प्राथमिक संपर्क येतो ते डॉक्टर (सर्जन, रेडिओलोजी अथवा स्पेशालिस्टना हे कदाचित लागू होणार नाही.) त्यांनी ते तुमच्या व्यवसायाचा भाग म्हणून समजून घ्यायलाच हवे.
दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही.अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जेथली वैद्यकीय सेवा आदर्श आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील.
नम्र तर सगळ्यांनी सगळ्यांशीच असावे असे मत आहे, मग तरिसेप्शनिस्ट, पेशंट वा रिसेप्शनिस्ट अथवा ट्रेनमधला दुसरा प्रवासी. बादवे वरचा अनुभव इंग्लंडमधला आहे आणि सहनशीलतेच्या, नम्रतेच्या (आणि नीट उत्तर देण्याच्या) बाबतीत जरी पैकीच्या पैकी गुण देता येणार असतील तरी इतर बाबतीत फार आदर्श वगैरे मला तरी वाटत नाही.
तुम्ही आपले काम करायला सरकारी कार्यालयात जाऊन पहा यापेक्षा सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील.
हे तर आहेच पण कोणी चूक वागले म्हणून तो बेंचमार्क म्हणून वापरता कामा नये. तुमचेच एक वाक्य वापरतोय इथे "दुसर्‍याची रेघ लहान करुन आपली रेघ मोठी दाखवता येत नाही." सरकारी कार्यालये जर आदर्श नसावा (अनुभव आहेच). पण इतरांनी (सर्वच खाजगी सेवा) पण तेच करायचे ठरवले तर मात्र खूपच अवघड आहे. :)

आपण चुकीचा अर्थ लावलात. मी बॉसं चे उदाहरण इगो साठी दिले आहे. कुठेही समर्थनासाठी नाही. यात डॉक्टरांच्या वर्तनाचे समर्थन नसून विश्लेषण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा अहंगंड ( इगो) किती मोठा असतो यासाठी हे उदाहरण दिले आहे. आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही आणि आम्हाला कुणाची गरज नाही आणि लोकांचे आमच्या वाचून अडते या वृत्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठी ते उदाहरण दिले

१. सल्ला विचारायला कुणी आले होते का? २. आपली सल्ले देण्याची लायकी आहे का? :पुन्हा एकदा शेवटचा प्रतिसाद देऊन नाचणारा भावला:

सल्ला तुमच्या घरी येउन दीलेला नाही, तुमच्या लेखावरही दीलेला नाही, तेव्हा व्यक्तीशःह घ्यायचे कारण नाही. आंतरजालावरचे लेखन, पटले तर घ्यायचे, नाहीतर पुढे व्हायचे. प्रतीसाद देताना माझ्याकडुन कधीही खालच्या लेवलचे, वक्तीगत पातळीचे प्रतीसाद गेलेले नाहीत. आपण मात्र प्रत्येक प्रतीसादागणीक एक एक पायरी खाली जाउन, व्यक्तीगत पातळीवर चिखलफेक करणारे प्रतिसाद लिहुन आपली लायकी जगाला दाखवत आहात.

टोकाचा अहंकारी दर्प आणि उन्मत्त वक्तव्य हि कित्येक वेळा मनाच्या असुरक्षित अवस्थेतून आलेली स्थिती असते .. सुभाषितकरांनी "विद्या विनयेन शोभते" हे उगीच म्हटलेले नाही ... मी किती ज्ञानी ...माझी कशी बुद्धीमत्ता ...मी कसा खोऱ्याने पैसा कमावला .. माझ्या कडे ग्राहक कसे अगतिकपणे आलेले असतात ..मी कशी त्यांची निकड भागवतो .. मी इतरांना तुच्छ लेखतो पण कुणी माझे काही करू शकत नाही ... काय अन काय ... पुलंनी म्हटलंय (त्यात थोडा बदल करून) कि अपयशा पेक्षा यशानेच माणसे जास्त सैरभैर होतात ... असो ...गेट वेल सून म्हणायचे आणि पुढे जायचे ....

respect is to be commanded ...not demanded ... उठ सुठ इतरांची लायकी काढणे ...स्वत:च्या अक्कल हुशारीची स्वत:च तारीफ करणे ... आपण जणूकाही जगात एकच डॉक्टर आहोत आणि काहीतरी अचाट gift to mankind आहोत ह्या अविर्भावात सतत दर्पयुक्त वक्तव्ये करणे ... माफ करा पण इतक्या गुर्मीत विचार करणारे पहिलेच डॉक्टर बघितले / वाचले ... ...रिस्पेक्ट म्हणे

डॉक प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेच पाहिजे असे काही नाही. सदर उदाहरणात डॉक्टर नक्कीच चुकीचा वागलेला आहे. अवास्तव शंका विचारल्या तर त्यातही समजु शकतो पण पेशंटला त्या विषयातली माहिती नाही म्हणुनच तो डॉक्टरकडे येतो तेव्हा त्याच्या योग्य त्या शंकांचे योग्य ते निरसन करणे हे कुठल्याही डॉक्टरचे कर्तव्य आहे. मानवी स्वभाव म्हणून तुम्ही आम्ही इतर व्यावसायिकांचे वर्तन दुर्लक्षित नाही. पुणेरी दुकानदाराचा नमूनेदारपणा आपल्याला खटकतो, विकत घ्यायचे नव्हते तर आलात कशाला असे म्हणणारा कापड दुकानदार खटकतो, तासभर ताटकळत ठेवुन पदार्थ संपले म्हणुन सांगणार हॉटेलवाला खटकतो तर मग असली दुरुत्तरे करणारा डॉक्टरही खटकणारच. लोक पदरचे पैसे खर्च करुन डॉक्टरकडे येतात तर योग्य त्या सेवेची अपेक्षा करणारच. पैसे घेताना कोणी कमी घेत नाही. ते वाजवुनच घेतात ना सगळे डॉक्टर्स. मी व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी आहे. माझ्याकडे एखादा क्लायंट आला आणि मी त्याला एखादा सल्ला दिला की त्याने झापडे लावुन तो ऐकावा आणी काही प्रश्न विचारुच नयेत (खासकरुन आंजावर कुठेतरी वाचुन) अशी अपेक्षा मी ठेवु शकत नाही. ठेवणे योग्यही नाही. मग डॉक्टरांनाच केवळ वेगळा न्याय का म्हणे? तुम्ही "कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही." असे म्हणता आणि लगेच सरकारी बाबुंचा उर्मटपणा दाखवुन देता. हेच इतर व्यावसायिकांनी उर्मटपणा केला तर कराल का? या न्यायाने सगळ्याच व्यावसायिकांचा उर्मटपणा आपण चालवुन घ्यावा काय? दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते दुर्दैवाने? ?????? ही कुठल्याही पेशंटची अथवा त्यांच्या नातेवाईकांची बेसिक अपेक्षा असु नये? लोक मोल देउन डॉक्टरांच्या सेवा खरेदी करतात तेव्हा त्यांना सेवा मिळत असताना देणार्‍याने ती नम्रपणे देउ नये? डॉक्टरने खाजगी जीवनात कितीही उर्मटपणा करावा पण ग्राहकांशी त्याने नीट संवाद साधला पाहिजे जशी इतर व्यावसायिकांकडुन अपेक्षा असते. माणूस सोने किंवा कापड खरेदी करायला जातो तेव्हा तो आनंदात असतो. माणूस डॉक्टरकडे जातो तेव्हा आधीच तो व्याधींनी किंवा दुखण्यांनी गांजलेला असतो. त्याची मनःस्थिती आधीच वाईट असते. अश्यावेळेस डॉक्टरने नक्कीच त्याच्याशी जास्त मार्दवतेने आणि सहिष्णुपण वागले पाहिजे. तशी अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही. ग्राहकांनी अशी अपेक्षा करणे हे दुर्दैवी आहे हे तुमचे मतच मुळात अतिशय दुर्दैवी आहे. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. त्यातही काहिच गैर नाही. आणि दुर्दैवी तर नाहिच नाही.

यात डॉक्टरांच्या वर्तनाचे समर्थन नसून विश्लेषण आहे या वाक्याच्या खालीच आपण "डॉक प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेच पाहिजे असे काही नाही" असे लिहिले आहे. एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते. दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ? तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही. या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार? तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का? असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात. हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे. ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो. आणि हे मी भावनेच्या आहारी जाऊन लिहिलेले नाही. धन्यवाद

यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो.
डॉक्टर , तुम्ही मिपावरचे जुने जाणते .. तुम्हीबी असा म्हणला तर कसा व्हायचा

ह्या चर्चेचा निष्कर्ष काय निघेल ते माहित नाही पण ह्या धाग्यावर डॉक्टरांनाच टारगेट करुन अवांतर केलं जात आहे हे मलाही खेदजनक वाटलं. शिवाय ही सगळी चर्चा आत्ताच काही दिवसांपुर्वी फारच डीटेल मध्ये झाली आहे. तो धागा वापरा हवं तर..

:( डॉ. साहेब, ज्या संयमाने आपण इथे उत्तरे देत आहात - गेले कित्येक दिवस- त्यातून खूप काही शिकायला मिळाले आहे. पण हे कधी तरी थांबणार्/थांबावं असं मला वाटत होतं हे खरं. कारण अत्यंत चीड येइल अशा पद्धतीने प्रतिसाद येत होते... विनंती आहे की लिहित रहा. इथे अनेक वाचक आहेत जे आपल्या लेखांची वाट बघतात. हे उलट प्रतिसाद देणारे त्यांच्यासमोर नगण्य संख्येने आहेत.

डॉक्टर साहेब, कदाचित अशा लेखनाला योग्य ती पोचपावती देण्यास आम्ही कमी पडत आहोत. परंतु कृपया वैद्यकीय माहितीवर धागा काढणे थांबवू नका. मी २०१२ मध्ये मिपावर सक्रीय झालो. तेव्हापेक्षा २०१५ मधले मिपाचे वातावरण खूपच सकारात्मक वाटते. एकतर असा गुणात्मक बदल प्रत्यक्षातच घडला असेल. किंवा संवेदनशील मनाला त्रास देणार्‍या (ट्रोलछाप) विचारांकडे दुर्लक्ष करायला मी शिकलो असेन. काही लोकांना बाहेरच्या जगात जे काही खटकते त्याचे स्पष्टीकरण मिपावरच्या त्या क्षेत्रातील प्रतिनिधींकडून हवे असते. हे पूर्णपणे अव्यावहारिक आहे. आशा करूया की त्या लोकांना आज ना उद्या अशा आचरणाच्या नकारात्मक परिणामांची जाणिव होईल. बाकी सार्वजनिक आयुष्यात फार संवेदनशील राहून चालत नाही हे तर त्रिकालबाधित सत्य आहे.

डॉक्टर साहेब, कदाचित अशा लेखनाला योग्य ती पोचपावती देण्यास आम्ही कमी पडत आहोत. परंतु कृपया वैद्यकीय माहितीवर धागा काढणे थांबवू नका.
असेच म्हणतो. जालावर काय किंवा छापील लेखनात काय, जितक्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचं अनुभवविश्व येईल; तितकंच ते संकेतस्थळ/पुस्तकव्यवहार अधिक समृद्ध, अधिक वाचनीय होत राहील.

एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते. गंमतच आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीला स्कोर सेटलिंग म्हणायची फ्याशन आली आहे, तुमचे सगळे धागे काढुन बघा. त्यात आवडला म्हणुन तरी प्रतिसाद असेल किंवा द्यायचा राहुन गेला असेल. ते कुठल्या प्रकारचे स्कोर सेटलिंग होते कुणास ठाउक. कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद केला की तो स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? डॉक्टरांच्या इतक्या ढीगभर धाग्यांवर मी कधी फार निगेटिव्ह प्रतिसाद दिलेला आठवत नाही. याआधी तुमच्याशी कधी माझा वाद झाल्याचे आठवत नाही. तरी हा स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? मी काय लिहिले आहे ते आपण नीट वाचले आहे की नाही हा मलाच पडलेला प्रश्न आहे आता. दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ? नाही. मी तुमच्या अपेक्षा पुर्ण करतो आहे खरे सांगायचे तर. डॉक्टर हा सुद्धा इतर सर्वांप्रमाणे एक व्यावसायिक आहे आणि त्यामुळेच त्याने इतर व्यावसायिकांसारखे सौजन्यशील असायला हवे हे सांगण्यासाठीच मी ४-५ पॅरा खर्ची घातले आहेत. इतर व्यावसायिकांप्रमाणे त्यांनाही त्यांचे पैसे चोख वाजवुन घेण्याचा अधिकार आहे असेही लिहिले आहे. मी आधी लिहिलेले परत लिहितो " जर डॉक्टर इतर व्यावसायिकांप्रमाणे असेल तर इतर व्यावसायिकांप्रमाणे त्याने सौजन्यपुर्ण सेवा द्यावी". (आणी तो तसाच असावा असे मला वाटते). इतर दुकानदार जर तर्‍हेवाईकपणे वागत असतील तर आपण त्यांच्यावर टीका करतो पण डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्यावर टीका म्हणजे अब्राह्मण्यम असे का म्हणे? डॉक्टर चुकीचा वागला की "तो पण माणूसच आहे, सरकारी कार्यालयात अजुन सुरस अनुभव येतील, इंग्लंड अमेरिकेत वगैरे सुद्धा असेच अनुभव येतील, मानवी स्वभावाला औषध नाही" वगैरे गोष्टी का लिहाव्याशा वाटतात? तिथे त्याच्या चुकीच्या वागण्यावर टीका का होत नाही? वर "डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही" असेही आपण लिहिता. मी जर पैसे देत असेन तर सेवाकर्त्याने सौजन्यपुर्ण सेवा देणे हा माझा एक ग्राहक म्हणुन अधिकार आहे. मग डॉक्टरने "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असण्यात गैर ते काय? परंतु उलट तुम्हीच अतिशय ठामपणे असे होणारच नाही असे लिहिता. मग ग्राहकाकडुन तरी योग्य वर्तणुकीची अपेक्षा कशी काय धरता? म्हणजे डॉक्टरने मुजोरी करावी, उर्मटपणे वागावे, पैसा वाजवुन घ्यावा (तो त्याचा हक्कच आहे), ग्राहकांच्या प्रश्नांची नीट उत्तरे देउ नयेत पण तरीही ग्राहकाने मात्र न कुरकुरता, न कटकट करता, डॉक्टर जे म्हणेल त्याला होयबा म्हणुन मान डोलावुन, एकही अधिक उणा प्रश्न न विचारुन निमुटपणे पैसे द्यावेत आणि मिळालेल्या सेवेत काहिही कमतरता असेल तरीही कुठेही तक्रार करु नये असेच ना? तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही. अवास्तव अपेक्षा नाहित पण योग्य ती सेवा द्यावी, सौजन्यपुर्ण वागावे आणि शंकांचे निरसन करावे, ग्राहक आधीच व्याधीग्रस्त आणि पीडाग्रस्त आहे, काळजीत आहे हे समजुन घेउन थोडे मार्दवाने थोडे सहिष्णु वृत्तीने वागावे अशी माफक अपेक्षा आहे. चूक आहे काय? या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार? उच्च विचारसरणी असण्यात काही चूकही नाही. उच्च विचारसरणी म्हणजे पदरचे पैसे खर्च करुन समाजोद्धार करावा असे नाही. सेवाभाव म्हणजे मनापासून सेवा करण्याची वृत्ती. त्याबदल्यात मोबदल्याची अपेक्षा धरु नये असे काही नाही. डॉक्टरांनी चोख मोबदला घ्यावा पण योग्य ती सेवा द्यावी हे मी आधीपण लिहिले आहे. तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का? गिर्‍हाइकाला काही चॉइस आहे? असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मला डॉक्टरांचे एक दोन अनुभव वाईट आहेत. पण त्यात काही फार राग नाही. एक डॉक्टर ज्यांचा एक अनुभव वाईट आला त्यांच्याबद्दल इतर कारणांनी आदरच आहे. या डॉक्टरांनी शेवटपर्यंत आपली चूक मान्य केली नाही. इतर ४-५ डॉक्टरांनी अगदी ठामपणे चूक कुठे आणि कोणाकडुन (म्हणजे पहिल्या डॉक्टरकडुन) झाली आहे हे ठामपणे सांगितले. हा अनुभव येउनही परत आम्ही त्याच डॉक्टरकडे जातो. ती गोष्ट वन ऑफ चूक म्हणुन दुर्लक्ष केली (त्याचा त्रास अजुनही होतो ही गोष्ट वेगळी). त्यामुळे यात डॉक्टरी पेशाबद्दल वैयक्तिक आकस कुठेही नाही. तुमच्याबद्दल असण्याचा तर प्रश्नच नाही. तरीही तुम्ही असे लिहिले हे बघुन खेद झाला. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. कुठला वैयक्तिक स्कोर सेटल करतो आहे मी ते सांगाच आता. माझा प्रतिसाद केवळ श्री चिनार यांचा अनुभवाच्या अनुषंगाने होता. मी त्यांचा किंवा ते माझा डु आयडी नाही. नेत्रेश या आयडीशीही माझा काही संबंध नाही, मग हे स्कोर सेटलिंग नक्की कसे? नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात. मी अजुनतरी असे काही म्हटलेले नाही. हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे. मान्य ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो. मी यावर प्रतिक्रिया देत नाही. तुमच्याशी भांडण करण्याची माझी कुठलीही इच्छा नसल्याने याला पास देतो. माझ्यावर झालेल्या स्कोर सेटलिंगच्या आणी वैयक्तिक आकसाच्या निरर्थक आरोपांमुळे व्यथित झालो आहे असे मात्र खेदपुर्वक नमूद करु इच्छितो.

डॉकना या धाग्यावर कुणी असं रोखठोक आणि मुद्देसुद विचारणं अपेक्षित नसेल त्यामुळे डॉक भांबावून गेले असतील आणि त्यांना तुझे प्रतिसाद स्कोअर सेटलिंगचा प्रकार वाटला असेल.