Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ? "अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्‍याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्‍याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित. अहल्या : (१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता. (२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती. (३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्‍या नवर्‍याला, काही मुले झाल्यावर, अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते. (४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही. (५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास मिळतो कां ? (६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे. प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली. रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले असेल तर श्री. वल्ली सांगतीलच. आता शूर्पणखेचा विचार करूं शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले. रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ, तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे. राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख, मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?" सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने चालले होते. यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी, शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग , माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली " माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?" मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. शरद
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

म्हणजे , लोकांच्या घरात काय काय चालले आहे ? -- हे जाणून घेण्याची निरागस की काय ती उत्सुकता असतेच ना सर्वान्ना? म्हणून तर ...

कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :) वाचली ना ... म्हणुन तर .. पण असो ! तुम्ही थांबता आहात तर मी सुद्धा तसच करते. नाहीतर स्टेडीयमवर पब्लीक बसलेले आहेच. पॉपकॉर्न घेऊन ..:)

मनिषाताई,(मागे श्री. लावावयास भीती वाटते, काहींना जीव गेल्यासारखे वाटते म्हणून हो!) आपण ठळक शब्दात कथा वाचली असे लिहले पण तसे दिसत नाही. ब्रह्मदेवाने अहल्येला गौतमाच्या आश्रमात ठेवले तेव्हा दोघेही अविवहित होते. एक अविवाहित त्रिभुवन सुंदरी आश्रमात असतांना अविवाहित गौतमाने संयम पाळला म्हणून तो इंद्रियदमन करणारा व त्या गुणामुळे त्याला अहल्या मिळाली.दोघांचा विवाह झाल्यावर इंद्रियदमनाचा प्रश्नच नव्हता व त्यांना अनेक मुले झाली. त्यातील शतानंद हा ज्येष्ठ. अनेक मुले असलेली म्हणून मी (तितकेसे बरोबर नसलेले) ’लेकुरवाळी" हे विषेशण वापरले. खरे म्हणजे मी "बहुप्रसवा" असेच लिहणार होतो. आता हे सर्व परत वाचूनही आपणास अहल्येला गौतमापासून इंद्रियसुख मिळत नव्हते असा नित्कर्ष काढता येतो कां ? लग्न झाल्यावर परपुरुषाचे आकर्षण वाटणे व त्याप्रमाणे वागणे यांत कांहीच फरक नाही कां ? मला रस्त्यात पडलेले पाकिट पाहून ते उचालावे असे वाटणे व मी ते उचलून खिशात टाकणे या दोनही गोष्टी तुमच्या मते एकाच मापाच्या समजाव्यात कां ? आता गौतमाने अहल्येच्या चुकीची काय शिक्षा द्यावी या बद्दल एखाद्याचे मत निराळे असू शकते. अपराध व त्यावरील शिक्षा स्थळकाळावर अवलंबून असते. हजारो वर्षांपूर्वी भारतील शिक्षा व आजची शिक्षा निराळी असणारच व आजही भारतात मान्य असलेली फाशी अमेरिकेत अमान्य आहेच. आपण गौतमाचे चुकले असे म्हणणे गौतमावर नव्हे तर वाल्मीकींवर अन्याय करणे आहे. त्यांनी कथा लिहली; तुम्हाला निराळे म्हणावयाचे असेल तर "मला असे वाटते कारण .... " असे लिहणे योग्य; उत्तर देण्यास असमर्थ असलेल्या वाल्मीकि यांना चूक म्हणणे मला बरोबर वाटत नाही. तीच गोष्ट शूर्पणखेबाबत. जर एखादी अनोळखी बाई अनाहूतपणे तुमच्या घरी येऊन तुमच्या बायकोला खाऊन टाकते असे म्हणाली तर तुम्ही तिची थोडी थट्टा करावयास काय हरकत आहे ? आणि शूर्पणखेचा थट्टेबद्दल राग नाहीच आहे. आता ती फक्त सीतेला खाण्या ऐवजी तिच्या बरोबर लक्ष्मणाला खाणार आहे व मग सवत न राहिल्यामुळे सुखाने रामाबरोबर विहार करणार आहे ! नाक-कान कापावयाच्या ऐवजी तिला ठार मारणे कसे योग्य ठरणार ? रामायणात तिचा रोल पुढे तिने लंकेत जाऊन रावणाला सीतेला पळवून आणावयास प्रेरित करणे असा आहे. ठार मारणे यांत बसत नाही हो. तिला ठार मारणे म्हणजे पटकथेत हिरोने बदल सुचवणे झाले; काय ? मनिषाताई, प्रतिसाद तुम्हाला दिला असला तरी बर्‍याच वाचकांचे असे गैरसमज झाले असावेत असे वाटते. सर्वांना निरनिराळे लिहणे म्हणजे परत सर्वश्री लिहणे आले; नकोच ते. शरद

आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल .. तुमचं म्हणणे अगदीच योग्यं आहे. पण मी पैसा ताईंनी उपस्थित केलेल्या फसवणुकीच्या मुद्द्याला उत्तर दिले होते. तिला झालेल्या क्षणिक मोहाची तिला शि क्षा झाली , ती तिने भोगली. (तुमचे रस्त्यात पडलेल्या पाकीटाचे उदाहरण अंमळ अस्थानी वाटते आहे (सॉरी बर्का आगाऊपणाबद्दल) रस्त्यातले पाकीट बेवारस असते,म्हणजे त्याक्षणी तरी त्याच्या मालकाचा पत्ता नसतो. ते पोलीस कडे जमा करणे हे सज्जन पणाचे लक्षण , पण खिशात टाकले तर चोरी ठरत नाही. तुमच्या कथेत कुणीच अनाथ किंवा बेवारस नाही. ) पैसा ताईंच्या मते ती असमाधानी होती, तिला परपुरूषाचा मोह होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती, ही फसवाफसवी आहे. तर तिने संसार सोडून निघून जायला हवे होते. या अक्षेपाला माझे उत्तर होते. तसही, अहिल्येच्या चुकीला गुन्हा समजून तिला इतकी मोठी शिक्षा देणे हा तिच्यावर झालेला अन्यायच आहे. त्या मुळे तिच्या बाबतीत जे झाले ते सर्वश्री योग्यच होते या तुमच्या मताशी मी सहमत नाहीच.

पैसा ताईंच्या मते ती असमाधानी होती, तिला परपुरूषाचा मोह होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती,
हे माझे मत नव्हे. तुमच्याच एका विधानाबद्दल
अहिल्ये बरोबर विवाह करून , तिच्याकडून सर्वं सांसारीक कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा करायची. आणि स्वतः विवाहीत असूनही स्त्री सुखाचा त्याग करून , पुण्य संपादन केले म्हणून महर्षी पदास पोहोचल्याचा अभिमान मिरवायचा
माझे मत आहे.
ती असमाधानी असेल तर
असे मी म्हटले. ते एका अहल्येसाठी नव्हे तर कोणाही व्यक्तीच्या बाबत खरे आहे.
तिला परपुरूषाचा मोह तिला होता तरीही ती गौतमाची पत्नी म्हणून वावरत होती
हेही पुन्हा अर्धवट वाचून लिहिले आहे. क्षणिक मोह झाला तर कोणीही तसे कबूल करावे. अन्यथा ती दुसर्‍याची फसवणूकच होते. प्लीज मी किंवा शरद यांनी काय लिहिले ते संपूर्ण वाचून मगच लिहीत जावा ही विनंती. या धाग्यात काही लिहिणार नव्हते, पण मी न लिहिलेल्या गोष्टी माझ्या नावावर कृपया टाकू नयेत ही विनंती. अजून एक, ते नाव 'अहिल्या' नाही तर 'अहल्या' असे आहे. त्याचा अर्थ 'न नांगरलेली (भूमी)'.

पैसा ताई अर्धवट वाचन माझं की तुमचं ? असा "मी नाही, मी नाही " चा विश्वामित्री पवित्रा का घेता आहातं ? फवणुकीचा मुद्दा तुम्हीच उपस्थित केला ना? मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. एवढेच माझे म्हणणे. हे तुम्हीच लिहीलं आहे ना? यातुन काय अर्थं काढायचा ते सांगा. आणि हो , अहल्या चा अर्थ माहीत आहे पण परत सांगीतल्या बद्दल धन्यवाद! पण मला अहिल्याच सवयीच असल्याने मी तसाच उल्लेख करणार.

अर्थ स्पष्ट आहे. तुम्ही उगीच वाकड्यात शिरत आहात. आणि आपल्याला पाहिजे तसे अर्थ लावत आहात. क्षणिक मोह, चूक आणि वर्षानुवर्षाम्चे असमाधान, राग यात फरक असतो आणि मी त्याबद्दल माझे मत पुरेसे स्पष्ट लिहिले आहे. केवळ सवय आहे म्हणून चुकीचेच लिहिणार या तुमच्या पवित्र्यावरून काय समजायचे ते समजले. धन्यवाद! झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करण्यासाठी खर्च करायला मला आणखी वेळ नाही.

मग हाच नियम गौतम ॠषींनाही लागू होत नाही का ? म्हणजे अहिल्ये बरोबर विवाह करून , तिच्याकडून सर्वं सांसारीक कर्तव्ये पूर्ण करण्याची अपेक्षा करायची. आणि स्वतः विवाहीत असूनही स्त्री सुखाचा त्याग करून , पुण्य संपादन केले म्हणून महर्षी पदास पोहोचल्याचा अभिमान मिरवायचा . यात तुम्हाला कुठे दुट्टप्पीपणा अढळला नाही? ही अहिल्येची फसवणूक वाटली नाही ? याचा अर्थं मी अहिल्येला योग्यं ठरवत नाहीये . फक्तं इतकच म्हणायचय चूक दोघांची असताना शिक्षा फक्तं अहिल्येला भोगायला लागली. आणि आश्चर्यं हे की ज्याने पहिल्यांदा चूक केली, तोच शिक्षा देतो आहे . भारतीय संस्कृती महान आहे.

भारतीय संस्कृती महान आहे.
भारतीय संस्कृतीचा काय संबंध यात? ही एक कथा किंवा सत्य घटना आहे. अहिल्या किंवा गौतम यांना भारतीय संस्कृती राखायला ठेक्यानं दिली होती का?

भारतीय संस्कृतीचा काय संबंध यात? ही एक कथा किंवा सत्य घटना आहे. अहिल्या किंवा गौतम यांना भारतीय संस्कृती राखायला ठेक्यानं दिली होती का? मी कुठे असं म्हणलं ?

मग "भारतीय संस्कृती" नावाची गोष्ट यात कशी फिट बसते? भारतीय संस्कृतीनं सांगितलं का गौतमानं शिक्षा भोगायची नाही असं? की हा त्या काळचा मानदंड होता? संस्कृती ही गोष्ट कुणीही सोम्या गोम्यानं यावं टपली मारून जावं अशी असते का? एखादी घटनेवरून एखाद्या संस्कृती कशा प्रकारची आहे किंवा होती हे ठरवता येतं का? एलिझाबेथ टेलरनं आठ (की नऊ?) लग्नं केली म्हणून आठ लग्नं करणं हे अमेरिकनांच्या संस्कृतीचं व्यव्च्छेदीक लक्षण झालं का? शिवाजी महाराजांनी आठ लग्नं केली तर ते हिंदू संस्कृतीत तसं सांगितलंय म्हणून का?

ओह, असं सगळं झालं म्हणता.... आता काय करायचे मग आपण, गहण प्रश्णच पडलाय माझ्यासमोर विचार करुन करुन डोके फुटायची वेळ आलिये. अहील्या, शुर्पणका दोषी होत्या की नाही या विचाराने जेवणच गेले नाही दिवसभर, रात्री आता झोपही येत नाही, आयुष्याला अर्थच उरला नाही काही आता. पण प्रतिसादही जणु ग्यानसागरातील रत्नेच. भारतीय संस्कृती चा काय सुरेख अभ्यास झाला. पण अहिल्येचा फोलपणा जगासमोर यायलाच हवा होता हीच काळाची गरज आहे धन्यवाद शरद सर आणि इतर प्रतिसादक हा ज्वलंत विषय मनात धगधगल्या बद्दल

या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर
इसवी सनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकात रामायण आणि महाभारत या ग्रंथांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रक्षिप्त श्लोक घुसवण्यात आले हे सत्य आता सामोरे आलेले आहे. त्यातील मूळ कथा कोणती आणि प्रक्षिप्त कथा कोणत्या हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. माझा मूळ प्रश्न अनुत्तरीतच आहे. जर शूर्पणखा राक्षसी नसून अप्सरा असती (आणि तिने सीतेवर हल्ला केला असता) तर तिला विद्रूप करण्यात आले असते काय? आणखी काही प्रश्न अहिल्येला शुद्ध होण्यासाठी रामाचीच वाट का पहावी लागते? सीता का चालत नाही? रामराज्य ह्याऐवजी सीताराज्य हा शब्दप्रयोग कसा वाटतो? ओठांवर जिजाऊ, झाशीची राणी आणि पोटात मात्र "राम"राज्य, हे वागनं बरं न्हवं !!

रामायणाची feminist आवृत्ती म्हणजे Sita Sings the Blues हा नितांतसुंदर Animationपट. सर्वांनी जरूर पहावा अशी शिफारस करतो. हा आंतरजालावर मोफत उपलब्ध आहे. अमेरिकेतील काही हिंदू संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देत याला विरोध केला होता हे आधीच सांगून ठेवतो. संवेदनशील हिंदूनी पहाणे टाळावे.

प्रतिसाद वाचून बरेच मनोरंजन झाले. लेख नेहमीप्रमाणेच मूळ संहितेशी प्रामाणिक असलेला. अहल्येची कथा बालकाण्डात असली तरी ती मला प्रक्षिप्तच वाटत आलेली आहे.