Welcome to misalpav.com
लेखक: रेवती | प्रसिद्ध:
================================================================== खाऊगल्ली : भाग १ ================================================================== बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा. तर चला एकमेका सहाय्य करू------- वरील मजकूर त्रिवेणीच्या पहिल्या धाग्यातून ढापला आहे याची नोंद घ्यावी. नंतर तक्रार चालणार नाही. पहिल्या धाग्यावर आलेले नवे प्रतिसाद कळत नाहीत ही श्रीश्री पप्पू अदूबाळ यांची रिक्वेष्ट मान्य करून हा धाग्या त्यांच्या चरणी अर्पण करीत आहोत. चार ओळींच्यापुढे लेखन (ढापलेले का असेना) गेल्याने संमं मजवर क्रिपा करून हा धागा टिकू देतील अशा आशा! आज अपर्णाने सांगितलेल्या पाकृनुसार डाळ कांदा नावाची रेशिपी करून बघतिये. मला हरभरे, जे सुकवल्यावर तपकिरी दिसतात, जे भिजवल्यावर हळदीकुंकवाला ओटी भरण्यासाठी वापरतात त्याच्या उसळीची पाकृ हवी आहे. त्यात फोडणी करताना ओवा घालतात ती! सांगण्याची कृपा करावी. सवडीने पाकृ आली तरी चालेल, लगेच हरभरे आणलेले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आज्जेने चुकुन अनाहिता मधली विचारणा खुल्या मंचावर केली की काय ? ;) { चला पळावे आता... } ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

गुर्जी तुम्ही तरी असे म्हनू नये. अहो,गणपा आणि दीपक यांचे सल्ले अनाहितात मिळू शकत नाहीत. ...तुम्ही दिलात तरी आम्ही अनमान करणार नाही हो !

तर अर्धी वाटी मूगडाळ मिक्सरवर रवाळ दळून घ्यायची. मुगडाळीच्या निम्मं (त्याहून जरा जास्त घेतलं तरी चालतं) चितळ्यांच्या गाईचं साजूक तूप कढईत तापत ठेवायचं. ;) तूप नीट तापलं की ही मूगडाळ त्यात ओतून मंद आचेवर खरपूस भाजायची. ते होतंय तोवर शेजारच्या शेगडीवर दूध तापत ठेवायचं. मूगडाळ भाजून होईपर्यंत दूधाला उकळी येते. मग हे उकळतं दूध अंदाजाने, थोडं थोडं ओतून शिरा मऊसर शिजवायचा. पहिल्यावेळेस दूध ओतताना, दूध ओतल्यावर ताबडतोब कढईवर झाकण ठेवायचं. म्हणजे वाफेने शिरा छान फुलून येतो. आता आवडीनुसार साखर, जायफळ्-वेलचीपूड आणि पसंतीप्रमाणे काजू-बदाम वैगरे घालून खायला घ्यायचं. या शिर्‍यात अक्रोड अधिक चांगले लागतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

धन्यवाद. एक प्रश्न. मूगडाळ भिजवून मग मिक्सरवरून काढायची ना?

मग सोपे आहे. मीही तसेच करेन. काहीजण डाळ भिजवून, भरड वाटून मग परततात, त्याला भारी वेळ लागतो म्हणून हा शिरा आवडत असूनही कधी केला नव्हता. आता निमित्त मिळताच करून पाहीन व कळवीन.

हो.. डाळ न भिजवता भाजायला सोपे जाते, पण जेवढी छान चव भिजवलेल्या डाळीची लागते, तेवढी (माझ्या आणि माझ्या आईच्या मते) त्याची लागत नाही. अर्थात, अगदीच न करता येण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.

हेच होते ना, भिजवलेल्या डाळीचा करत बसायला सवड नसते (खरंतर पेशन्स) मग नुसताच हा शिरा करायचाय करायचाय असं होतं. मी न राहवून आत्ताच करायला घेतलाय पण साखरेचं प्रमाण सुडकूनं दिलं नाहीये वाटतं. जेवढ्यास तेवढी साखर घालून अगोड वाटतोय (इथल्या साखरेची गोडी कमी आहे) म्हणून दीडपट घातलीये.

मी पण कायम भिजवून करते. त्या सुमारास एखादा केक बेक करायचा असेल तर मी ओव्हन मध्ये ठेवुन देते ही डाळ भरपूर तुपात मिसळुन. निम्मी भाजते. उरलेली फिरसे चल चल रे नौ जवान!!

ओव्हनमध्ये अशी भाजली जाते हे माहित नव्हते. बरेच लोक मायक्रोवेव्हमध्ये भाजतात, पण मला तरी त्यात फार वेळ अन्न शिजवायला आवडत नाही, म्हणून कधी करुन पहिले नाही.

आमच्याकडे चितळे नसल्याने चितळ्यांच्या गाई नाहीत. म्हशीचे किंवा अमूलचे किंवा लोणकढ़े चालेल का?

रेवाक्का, ते तपकिरी हरभरे छान भिजवुन घ्यायचे. मोहरी हिंग हळद कढीपत्ता आणि ओवा ची छान फोडणी करायची. हरभरी घालून चिंच गुळ, मीठ घालायचा. चिंच गुळाचे प्रमाण फार महत्त्वाचे. मस्त वाफेवर शिजवायचे. पाणी असाय्ला हवं नीट अगदीच कोरडं नको. आई दर वर्षी उसळ देते द्रोणात हळदी कुंकवाला नुसत्या हरभर्‍या ऐवजी. ती ही रेसिपी आहे.

तिखट नाही? रेवाक्का मी हरभरे भिजवुन मग कुकरला शिजायला घालताना त्यात मिठ,हळद,तिखट आणि एखादा टोमॅटो घालते. टोमॅटो नको असेल तर आमचूर पावडर वापरते. मग हे शिजलेले हरभरे नंतर मोहरी जिर्‍यावर हिंग कडीपत्ता आणि हवा असेल तर कांदा घालून परतायचे. शिजताना मिठ तिखट असल्याने हरभरे मुरतात त्या मसाल्यात.

तिखट घालायचं ना .. मी तिखट लिहायचे विसरले :( आणी काळा मसाला पण. हापिसातून असं अधून मधून गुपचुप प्रतिक्रिया दिल्या की असं होतं.

सुडकू, मुगाचा शिरा केला. पहिल्यांदाच करताना जितपत बरोबर/ चूक असेल तितपत झाला. सुधारणा करणे आवश्यक! मूग एकसारख्या प्रकारे दळणे आवश्यक. मी जे केले त्यात काही जाड तर काही वस्त्रगाळ झाले. साखर दीडपट नको, सव्वापट. आणि सगळ्यात महत्वाचे, नवर्‍याला कामात लुडबुडू देऊ नये.

मटण साहीत्य - दोन कीलो मट्ण, पाच मोठे कांदे, दोन चमचे आले लसूण पेस्ट, एक सपाट चमचा हळद, आठ लसणाच्या पाकळ्या, दोन टोमॅटो, तीन चमचे पांढरे तीळ (नसले तरी चालतील), एक छोटी वाटी सुके खोबरे, पाच लवंगा, आठ काळेमीरी, एक ईंच दालचीनी, एक्/दोन तमालपत्र, पाच टेबलस्पून तेल, मीरची पावडर किंवा मिक्स मसाला दोन चमचे (घरी बनवलेला मसाला - मीरची + हळद + बाकीचा गरम मसाला घालुन केलेला) जीरे पावडर एक चमचा, धणे पावडर एक चमचा, मीठ, बाजारातला मट्ण मसाला एक चमचा ईतर तयारी - एक कांदा बारीक चिरावा. बाकीचे कांदे लांब कापुन घ्यावेत. टोमॅटोची पेस्ट करुन घ्यावी. लसूण बारीक कापुन घ्यावा. क्रुती - मटण स्वच्छ धुवुन पाच ते सहा मिनिटे निथळत ठेवावे. कुकरमधे तीन टेबलस्पून तेल तापवावे, त्यात बारीक चीरलेला कांदा टाकून परता, कांदा लालसर होताच त्यात आले लसणाची पेस्ट टाकावी, त्यात हळद टाका. यात मटण परतून घ्या. पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका. एक चमचा मिठ टाका. कुकरचे झाकण लावून सात ते आठ शीट्या होउ द्या. (मटण जून असेल तर जास्त शीट्या द्याव्या लागतील.) सुके खोबरे ब्राउन होई पर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात दोन टेबलस्पून तेल टाका. त्यात चिरलेला लसुण लाल होई पर्यंत परता, त्यात तीळ, लवंग, दालचीनी, काळीमीरी हे टाकून खरपूस भाजून घ्या. आता यात लांब चीरलेला कांदा परता. कांदा ब्राउन होईपर्यंत परता. आता टोपातील मिश्रण आणि भाजलेले खोबरे मिक्सर मधे बारीक वाटून घ्या. गरजेपुरते पाणी टाका. आता ज्या टोपात खडा मसाला आणि कांदा परतला त्याच टोपात दोन चमचे तेल टाका. तेल गरम होताच त्यात मिक्सर मधील मिश्रण ओता आणी सात ते आठ मिनीटे परता. यात एकेक चमचा धणे पावडर आणी जीरा पावडर टाकुन पुन्हा पाच मिनिटे परता. आता यात टोमॅटोची पेस्ट ओता. दोन मीनीटे परतुन त्यात मीरची पावडर कींवा मिक्स मसाला टाका. एक चमचा बाजारातील मटण मसाला टाका. आता टोपातल्या मीश्रणाला तेल सुटायला सुरवात होईल. कुकर उघडून मटण व्यवस्थीत शीजले आहे याची खात्री करुन घ्या. आता कुकरमधील मटण टोपातील मिश्रणात टाकून परता. आता कुकरमधील पाणी/सूप आहे ते सुद्धा टोपात ओता. एक चमचा मीठ (कींवा चवीनुसार) टाकून एक उकळी येउद्या. मटण तयार.

पाच मिनिटात मट्ण संपूर्ण बुडेल एवढे पाणी टाका.
पाणी टाकतानाच ते उकळते पाणी असेल याची काळजी घ्या, ( कांदा परतत असताना बाजूला दुसर्या भांड्यात पाणी उकळत ठेवा, मटन परतताना रूम टेम्प चे पाणी टाकले तर मटन वातट होण्याची शक्यता .....

मला crabs ची पाकृ हवी आहे. (crabs म्हणजेच चिंबोरी का?) crabs अजून आणले नाहीत पण आणणार आहे. धन्यवाद! स्रुजाने पुण्यातलं चांगले मासे मिळण्याचं दुकान सांगून माझी कामे वाढवली आहेत. :)

क्रॅब बाबत ही घ्या रेशीपी, ४ खेकडे (क्रॅब)- २ जणांना १ ओलं नारळ (कोवळं असल्यास उत्तम) २ मध्यम कांदे १/२ टी स्पुन जिरे १/२ टी स्पुन मोहरी १/२ टी स्पुन हळद ५/६ लसुण पाकळ्या कोकणी मसाला २ चमचे मीठ चवीपुरते. सर्वप्रथम खेकडे स्वच्छ धुवुन घ्या, त्याच्या सर्व नांग्या धडापासुन वेगळ्या करुन घ्या. मोठ्या नांग्या तश्याच ठेवुन इतर सर्व नांग्या मिक्सर मधे थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने तो रस गाळुन जमा करुन ठेवा. आता ओलं खोबरं बारीक तुकडे करुन तेही मिक्सरला थोडे थोडे पाणी टाकुन वाटुन घेवुन चहाच्या गाळणीने गाळुन ते दुध जमा करुन घ्या. आता लोखंडी (हो लोखंडीच) कढईत पुरेसे तेल गरम करुन त्यात चेचलेला लसुण, जिरे, मोहरी टाकुन ते तळले गेले की त्यात बारीक चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परतुन घ्या. त्यात हळद, कोकणी मसाला टाका तो तळला गेला की त्यात हळु हळु तो नांग्यांचा काढलेला रस मिसळा तो मसाल्याबरोबर पुरेसा एकजीव झाला असे वाटले की त्यात नारळाचे दुध हळुहळु टाकत ढवळत रहा. हे मिश्रण एकजीव झाले की त्यात धुवुन ठेवलेले चार खे़कडे नी त्यांच्या मोठया नांग्या टाका चवीपुरते मीठ टाकुन एकदा ढवळुन झाकण ठेवुन खेकडे/ चिंबोर्‍या लाल झाल्या की गॅस मंद करुन ३/४ मिनीटांनी बंद करा. भात, तांदळाची भाकरी, चपाती कसे ही चालेल.

मला बटाटावड्याबरोबर ज्या मिरच्या तळतात आणि त्याला मीठ लावतात त्याची जरा पद्धत हवी आहे. वडा पाव च्या गाडीवर मिळतात तशा मिरच्या करायची पायरी पायरी ने कृती द्या ना कुणी तरी. नक्की कधी मीठ लावायचं ? मध्ये काप द्यायचा का तळायच्या आधी वगैरे बेसिक मधे असलेले वांधे दुर करा प्लीझ.

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कचोरी समोस्यांबरोबर ज्या मवाळ मिरच्या दिल्या जातात त्यांना मवाळ करण्याची प्रक्रिया कोणती?

मिरच्यांना तळायच्या आधी मधे काप घ्यावा लागतो. अगदी छोटा छेद दिला तरी चालेल. मिरच्या तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत तापायला हवं. तेल कमी तापलं असेल तर मिरच्या थेट वडापाव वाल्याच्या मिरच्यांसारख्या होत नाहीत. हव्या तशा तळुन झाल्या की झारीने बाहेर काढाव्यात आणि टिशुपेपर वर पसराव्या. आणि बाहेर काढल्या गरमा-गरम असतानाच मिठ भुरभुरावे.

हि हि हि ! तुझा असा सुगरण सल्ला आल्यावर मला तुझ्या ताई हेच संबोधन योग्य वाटलं गं. नेहेमीच्या नावाने कसं बाई धन्यवाद देणार? :P ये तू पण वडापाव खायला.

सोपी वाटत आहे पद्धत. परंतु कृती वाचल्यावर जाणवत आहे की, कचोरी समोस्यांबरोबर दिल्या जाणार्‍या मिरच्या या वेगळ्या (वाण) असाव्यात अन बनवण्याची कृती वेगळी असावी.