Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते. कुठली भाषा अधिक सामर्थ्यवान, कशात अधिक चांगले व्यक्त होता येते, त्या भाषेची शब्दसंपत्ती किती आहे... आयात शब्दांपेक्षा...स्वतःचे शब्द किती आहेत ? यावर भाषेचे सामर्थ्य ठरते. इंग्रजांनी भारतातून अनेक गोष्टी नेल्या त्यात अनेक भारतीय शब्दही नेले आणि इंग्रजीला चिकटवले.. पण अशा जोडाजोडीमुळे भाषा सामर्थ्यवान झाली नाही. किचकट मात्र झाली. कारण हे शब्द पटकन एका जातकुळीतले वाटत नाहीत आणि त्यामुळे ते लक्षात ठेवायलाही अवघड जातात. कधीकधी अशा शब्दांचा अर्थ समजावून घेताना तो शब्द मुळात कुठल्या भाषेतून उचलला आहे याचा शोध घेणे आवश्यक ठरते. इंग्लिशमधून सायन्स शिकताना काही वेगळे शब्द पहायला मिळतात. शोध घेतल्यानंतर त्याचा खुलासा होतो. तो शब्द लॅटिन असतो किंवा जर्मन असतो. त्याच्या वेगळेपणामुळे इतर शब्दांबरोबर तो लक्षात ठेवणे अवघड जाते. इंग्रजीने कच्चा पक्का हा शब्द हिंदीतून उचलला आहे. गुरु हा शब्दही हिंदीमधून उचलला आहे. जेव्हा मॅनेजमेंट आणि गुरु एकत्र होवून मॅनेजमेंट-गुरु बनतो तेव्हा तो अगदीच आंतरजातीय विवाह वाटतो. अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह - सगळे शब्द 'अर्थ' या एका शब्दाशी नाते सांगतात, त्यामुळे डोक्यात कमी मेमरी खातात. पण MONEY, FINANCE, BANK या शब्दांमधे तसे नाते नाही. आता तुम्ही म्हणाल अर्थगृह कुठून आला ? इंडोनेशियामधे खरोखरच हा शब्द रूढ आहे. पहिल्यांदा ऐकल्यावरसुद्धा अर्थगृहचा 'अर्थ' काय हे विचारायची गरज पडत नाही. एकाच क्षेत्रातले शब्द एकमेकांशी असे नाते सांगणारे असतील तर लक्षात ठेवणे निश्चित सोपे जाते. Song आणि To Sing यामधे असे नाते आहे. पण Music and Song चे काय ? याउलट गीत आणि संगीत लक्षात ठेवायला अत्यंत सोपे. त्यामुळे डोक्यात मेमरीही कमी खातात. VICTORY DEFEAT - या उलट आपल्याकडे जय पराजय अगदी सहज एकमेकांचे हात धरून येतात. संस्कृत ही संगणकासाठी अतिशय योग्य किंवा सोपी भाषा आहे अशी काही काळापूर्वी चर्चा होती. ती योग्यच असणार. ज्यांनी कंप्युटरसाठी प्रॉग्रॅम लिहीण्याचा अनुभव घेतलाय किंवा त्याहीपलिकडे प्रॉग्रॅमिंग लँग्वेज तयार करण्याचा अनुभव घेतलाय. ते ही गोष्ट नक्की मान्य करतील. संस्कृतमधे कर्ता कर्म क्रियापद यांचे क्रम बदलले तरी अर्थ बदलत नाही. मराठीतही क्रम बदलला तर काही प्रमाणात चालते. कंप्युटरच्या भाषेतही अनेकदा हे स्वातंत्र्य नसते, इंग्रजीमधेही ते नसते. (संस्कृतचे उदाहरण हे फक्त तुलनेपुरते दिलेले आहे. त्यामुळे तेवढ्याच खुंटीला लोंबकळून झोके घेत बसू नये. विषय इंग्रजी हाच आहे) राजा, राज्य, राजवाडा, राजप्रासाद, राजपुरोहीत, राजपुत्र आणि इंग्रजीमधे KING, STATE, PALACE, PRIEST, PRINCE मराठीप्रमाणे हे शब्द एकमेकांशी नाते सांगत नाहीत त्यामुळे ते एका परिवारातले आहेत हे कळतच नाही. ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान KNOWLEDGE SCIENCE PHILOSOPHY हेही असेच. विद्यार्थी विद्यालय हे जितके सहज तसे STUDENT SCHOOL वाटत नाही. BIRD WING यामधे काही संबंध आहे का ? TRUNK ELEPHANT यामधे काही संबंध आहे का ? पण पक्ष आणि पक्षी, पंख पाखरू, हस्त हस्तिन, हाथ हाथी, हात हत्ती यामधे तो आहे. एका परिवारातले शब्द एकमेकांशी नाते सांगतात. मराठीमधे समभुज त्रिकोण कळला की समद्विभुज त्रिकोण सहज कळतो. इंग्रजीमधे मात्र Equilateral triangle कळला तरी isosceles triangle लगेच लक्षात राहील असे नाही काही वर्षापूर्वी एका प्रकाशनाने कंप्युटरची पुस्तके मराठीत छापली विद्यार्थ्याना त्याचा प्रचंड फायदा झाला. करीयरच्या दृष्टिनेही त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळाल्या. मराठी त्यांची स्वभाषा होती हे याचे एकमेव कारण नसून इंग्रजीपेक्षा मराठी अधिक सामर्थ्यवान आहे हेही कारण होते. "मराठीत शिकूनही आमचे काही वाइट झाले नाही" असे आमच्याकडचे काही मराठी वैज्ञानिक सांगतात. याउलट "मराठीतून शिकल्यानेच आपले भले झाले" ही शक्यता ते का विचारात घेत नाहीत. जाणकारांनी सांगावे ! इंग्रजीतून मराठीत भाषांतर सोपे की मराठीतून इंग्रजीत... Life - या शब्दाचा नेमका अर्थ काय घ्यायचा ? प्राण की आयुष्य ? तीच तर्‍हा उच्चारांची Cut कट But बट पण Put पूट... हे असे का ? म्हणजे स्पेलिंग एकसारखेच असले तरी उच्चार लक्षात ठेवण्याची भानगड आली. स्पेलिंग तेच पण उच्चार मात्र वेगळे, हे लक्षात ठेवण्यासाठी एक वेगळी शक्ती खर्च होत नाही का ! LIEUTENANT लेफ्टनंट COLONEL कर्नल हे उच्चार लक्षात कसे ठेवायचे ? आणि त्यातच शक्ती खर्च झाली तर पुढे काही मांडणे दूरच. PSYCHOLOGY सायकॉलॉजी. मग हा प सायलेंट का आणि सायलेंट असेल तर मग लिहीण्यात शक्ती का घालवायची आणि हे सगळे अडथळे पार केल्यावर पुढे आम्ही काहीतरी व्यक्त करणार. बाप रे ! सावरकरांनी नवे पारिभाषिक शब्द तयार केले तेव्हा सुरुवातीला त्या शब्दांची टर उडविली गेली. तरी नंतर ते शब्द रूढ झाले, लोकांच्या तोंडी बसले. नवे शब्द स्वीकारायला कुणी इतके वेडे नव्हते पण ते स्वीकारले गेले याचे कारण अर्थाच्या दृष्टिने ते नेमकेपणाचे होते, अर्थवाही होते मुख्य म्हणजे मूळ भाषेशी ते मिळते जुळते होते. एकूण मथितार्थ- इंग्रजी मातृभाषा असो वा नसो ती कुणालाही अगदी इंग्रजालाही समजायला अवघडच जात असणार. अवघडपणा हा तिचा अंगभूत गुण आहे. ashu jog ashujog@gmail.com
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

१.उदर निर्वाहासाठी - चांगली नोकरी-उच्चशिक्षण यासाठी इंग्रजी २.आणि उदर निर्वाह का करायचा त्यासाठी (मराठी) मातृभाषा. म्हणजे आपली आवड्-सुसवांद्-कलास्वाद्-संगीत-वाचन्-संस्कार आप्ल्या आईच्या भाषेत नीट आकलन् होतील ना! इंग्रजी चे गोडवे गाताना मराठी कशी मागास आणी कूपमंडूक आहे असा अविर्भाव नकोच. मातृभाषा महत्व जाणल्यानेच सर्व भाषीक लेखकांनी (उ.दा.पु.ल्./गिरिश कर्नाड) उत्तमोत्तम साहीत्य आप्लया मातृभाषेत अनुवादित केले आहे.

शिक्षणासाठी कोणते माध्यम असावे हा मुद्दा मी मांडत नाहीये. दुसरी गोष्ट मराठी ही माझी भाषा आहे म्हणून ती श्रेष्ठ हाही माझा आविर्भाव नाही. अगती तटस्थपणे चर्चा व्हावी

काका = Paternal uncle आत्या = Paternal aunty मामा = Maternal uncle मावशी = Maternal aunty असे मूळ इंग्रजी शब्द आहेत. दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं. मराठी माध्यमातल्या बहुसंख्य शिक्षकांचेच इंग्रजी भयाण असल्याने आड्यातलेच लोट्यात येणार ह्या न्यायाने मुलांचेही इंग्रजी भिकार असते. ती त्या भाषेची चूक नाही. तुमचे शिक्षक आणि भाषा मुळातून शिकायचा उत्साह ह्यावर सगळं अवलंबून आहे. प्रत्येच भाषेत उणिवा असतात तसेच प्रत्येक भाषेची बलस्थानेही असतात. शिक्षकांनी भाषेची गोडी लावण्याऐवजी मार्कांपुरती भाषा शिकवली की असंच होणार. इतर राज्यांमधल्या मुलांच्या हिंदीची अशीच अवस्था नसते काय? 'अर्थ, अर्थपुरवठा, अर्थगृह' हे जसं मराठीत आहे तसंच इंग्रजीत bank, banking, banker, bankability, bankrupt, bankroll, bankable आहेच की. त्यामुळे मला जे सोयीचे ते त्या भाषेत नाही म्हणून भाषेला भिकार ठरवू नये. मराठी भाषेच्या कसोट्यांवर पूर्णपणे एकच भाषा उतरू शकते = मराठी. त्यामुळे वडाची साल पिंपळाला लावायचा प्रयत्न करू नये. तुमची मेमरी, आकलनक्षमता, उच्चार लक्षात ठेवायची कुवत ह्यावरून भाषेची ताकद जोखू नये. ज्या लोकांना पेन आणि पेन् ह्यांच्या उच्चारातला फरक कळत नाही त्यांनी तर मुळीच बोलू नये.

दीर आणि जाऊ काय संबंध आहे? पण brother-in-law आणि sister-in-law म्हणाल्यावर कसे पटकन कळतं.
sister-in-law म्हणजे मेहूणी (बायकोची बहीण) की वहिनी (भावाची बायको) हे स्पष्ट होत नाही. काका = Paternal uncle हे खरे असले तरी एका शब्दा ऐवजी दोन शब्द लागलेत. मग तर तसे अनेक शब्दांत काहीही वर्णन होवू शकते. हिंदीमध्ये तर दीर (नवर्‍यापेक्षा) मोठा आहे की लहान आहे त्यावरुन जेठ /देवर असे शब्द वापरले जातात. थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. कोणत्याही भाषेला हलके मानन्याचे कारण नाही. तुम्ही जी भाषा वापराल ती मनापासून वापरा, तिची गोडी लागली की त्यातील अनेक पैलू तुमच्यासमोर येतील. अनेक भाषांवर प्रभुत्व गाजवता येईल.

थोडक्यात काय तर भाषा ही त्या त्या संमाजाची /संस्कृतीची गरज पुर्ण करण्यासाठी विकसित झालेली असते. एका समाजाची /संस्कृतीची गरज दुसर्‍या भाषेतून पुर्ण व्हायलाच हवी असा अट्टहास असू नये. नाहीतर ते जीन्स आणि टॉप घालून "आता डोक्यावरुन पदर कसा घेवू ?" असे म्हणण्यासारखे असेल. १०० लाईक्स

सहमत...भाषा चांगली वाइट म्हणण्यपेक्षा कशात काय चांगले आहे ते घ्यावे आणि आपला फायदा करुन घ्यावा..उच्च शिक्षणासाठी इंग्रजीला पर्याय नाही असे माझे स्पष्ट मत आहे...मग तुम्ही कितीही वाइट म्हणा तस्मात दोन्ही आपापल्या जागी योग्य

भाषे भाषेत तुलना नकोच. फक्त प्रत्येक भाषेचे नियम पाळावे. मारुती गाडी घेतली असे बोलावे , मारुती घेतली असे बोलून ब्रम्हचारी मारूतीचे लिंग बदलू नये.

जीत आणि जेते या २ शब्दांचा अर्थ काय ? जीत म्हणजे हरणारा / LOSER ? आणि जेते म्हणजे जिंकणारे / winner ? रावणाचा मुलगा इंद्रजीत . म्हणजे इंद्राला जीत करणारा ? थोडक्यात इंद्राला हरवणारा .. पण मग हार जीत हे विरुद्ध अर्थी शब्द आहे ना ? जसे कि खेळात हार जीत हि होणारच. म्हणजे कधी जिंकणार / कधी हरणार .. इथे हार = loser आणि जीत = winner. कोणी याच्यावर प्रकाश टाकेल काय ? या जीत चा मोठ्ठा लोचा आहे !!

अहो त्याहून मोठा लोचा त्या हाराचा आहे.हारांचे असंख्य प्रकार आहेत- मोत्याचा हार, चपलाहार, पोहेहार, झेंडूच्या फुलांचा हार इ. इंद्रजिताने नक्की कुठला हार दिला म्हणे इंद्राला?

मराठीतली अजून एक गंमत ती डबी ...मग ती हळू हळू मोठी होत गेली की तिचा होतो डबा. पण नेमकी किती मोठी झाली की डबी चा डबा व्हावा हे स्पष्ट नाही.

जुन्या कंपनीतील एका मुलीला (अत्यंत कमी जेवण आणणार्‍या) आम्ही जेवणाचा डबा आणतेस की डबी, असे चिडवीत असू!

हा भाषेपेक्षा संस्कृतीचा प्रश्न आहे
संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले. जी गोष्ट आहे ती आहे असे म्हणून आपण उगीच डीफेंड करीत बसतो. ही अडचण इंग्रजांनाही जाणवत असणार... विचारा त्यांना

संस्कृती बदलली तरी काका, मामा आत्या काकू ही नाती कशी बदलू शकतील नाही कळले
अहो नाती बदलत नसली तरी नात्यात भेद करण्याची गरज इंग्रजांना पडत नसणार इतकच. म्हणजे अंकल हा अंकल मग तो काका आहे, मामा आहे, मावशीचा नवरा की आत्येचा नवरा याने इंग्रज माणसाला फरक पडत नाही (म्हणजे नसावा) . साधारण बापाच्या वयाचा नात्यातला माणूस हा अंकल आणि आईच्या वयाची नात्यातली स्त्री ही आंटी इतकं त्यांना पुरेसं असेल. आपलं तसं नसतं आपले काकाशी असलेले भावबंध, मामाशी असलेले भावबंध यात फरक असतो. तसेच आधी म्हंटल्याप्रमाणे मराठी स्त्री करिता दीर हा दीर असतो, तो लहान की मोठा याने तिला फार फरक पडत नसावा. तेच उत्तर भारतातील स्त्रीकरिता दीर हा नवर्‍यापेक्षा मोठा (जेठ) आहे की लहान (देवर) त्याप्रमाणे नात्यात दिला जाणारा आदर, काही औपचारिकता यात फरक पडतो. उदा: नवर्‍यापेक्षा लहान दीर हा वहिनीला (मोठ्या भावाच्या बायकोला) वाकून नमस्कार करतो, अगदी ती वहिनी त्याच्यापेक्षा वयाने लहान असली तरी. थोडक्यात काय प्रत्येक संस्कृतीच्या गरजा वेगळ्या. अजून एक , हिंदी घुंघटला मराठी प्रतिशब्द काय ? कुणी म्हणेल "डोईवरचा पदर"..पण पदर आणि घुंघट यात काहीसा फरक आहेच. पदर हा घुंघटला चपखल प्रतिशब्द होवूच शकत नाही.

इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय... एखादी आई आपल्या बाळ्याला "अंकलला फोन लाव" सांगत असेल तेव्हा कोणते अंकल हा प्रश्न येणारच. म्हणूनच अंकल आंटीबद्दल कुणीतरी लिहीलय...

अहो मावशीला फोन लाव म्हंटलं तरी तो प्रश्न येणारच ना ? (एका पेक्षा जास्त मावशी असतील तर)
इंग्रजांना गरज पडत नसेल. हे कशाच्या आधारावर सांगताय...
साधी गोष्ट आहे त्यांना गरज पडत असती तर त्यानी त्याकरिता शब्द शोधले असतेच ना. आणि तुम्ही English बोलायचे ठरवले तरी तुम्ही आपल्या मामा, मावशी ला मामा,मावशीच म्हणाना (जसे चपातीला इंग्रजीतपण आपण chapati म्हणतो). इंग्रज येवून तुम्हाला काळ्यापाण्यावर नाही पाठवणार. तुमची गरज इंग्रजीत भागत नसेल तर तुम्ही तुमचे शब्द न्या की खुशाल इंग्रजीत. (MS Word ने spelling error दाखवली तर dictionary मध्ये add करा) बाकी इंग्रजांचं राहू द्या, तुम्ही मावशीचा नवरा आणि आत्येचा नवरा यात फरक कसा करता ते मला सांगा.

अंकल टॉमला नायतर अंकल सॅमला फोन लाव असे सांगत असेल! तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच!

तसा प्रश्न आपल्याकडेही, एकापेक्षा जास्त काका-मामा असतील, तर येणारच! ती पुढची गोष्ट आहे. पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय.

पण यातून आपणच नेमकेपणाची गरज प्रकट करताय
अजिबात नाही. प्रत्येक समाजाच्या नेमकेपणाच्या गरजा वेगळ्या. त्यांना अंकल+नाव पुरेसे वाटत असेल तर चोंबडेपणा करणारे आपण कोण? मागे मीच एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे, मराठी जनांना आजी-आजोबा म्हणणे पुरेसे वाटते. ते आईच्या बाजूचे की वडिलांच्या याच्यात फरक करण्याची गरज वाटत नाही. परंतु उत्तर भारतीयांना बहुधा ती वाटते म्हणून ते दादा-दादी आणि नाना-नानी अशी संबोधने वापरतात!

सहमत, भाषेतले असले विचित्र प्रकार डोक्यातील जास्त मेमरी आणि शक्ती खातात. तसेच मराठीत शिकूनही आमचे काही अडले नाही असे म्हणणार्‍यांनी मातृभाषेतच शिकल्याने आमचा फायदा झाला असा विचार (जो योग्यच आहे) केला पाहिजे, पसरवला पाहिजे. स्वतासाठी म्हणून आधी मातृभाषा शिकावी आणि मग इतरांशी संवाद साधायला परकीय भाषा. त्यातही मातृभाषा मराठी असेल (जी संस्कृतवरून आली आहे) तर नक्कीच ती आधी शिकावी. खास करून बुद्धीवंतानी मातृभाषेतच (मराठीतच) शिकावे आणि ज्यांची बुद्धीमत्ता जेमतेम आहे ज्यावर ते आयुष्यात कारकूनीच करू शकतात अश्यांनी ईंग्लिशचा रस्ता धरावे. प्रॉब्लेम त्यांचा होतो जे मराठीत शिकतात पण ईंग्लिश शिकत नाहीत किंवा शिकायचा आळस करतात. त्यामुळे जिथेतिथे त्यांचे घोडे अडते आणि मग अश्यांमुळे मराठीत शिकणे हानीकारक असा चुकीचा समज प्रचलित होतो. !

आत्ताच एक धागा पाहीला माध्यमासंबंधी इंग्रजीची बरीच भलामण करणारा "फक्त इंग्रजीने भागेल..? भविष्यवेध २०३०" असो पण ज्ञान मिळवताना माध्यम महत्त्वाचे असतेच. C for Cat ज्या लहान मुलांना अक्षर ओळखही नसते त्यांना सी फॉर सॅट हे समजावून घ्यायला सोपं आहे नाहीतर मग सी ला की तरी म्हणा म्हणजे मग की फॉर कॅट असं तरी म्हणता येइल इथे एखादी भाषा माझी आहे असा विचार न करता तटस्थपणे विचार करण्याचा प्रयत्न केला आहे

विनोद तावडे यांनी मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम याविषयी काही विचार मांडले आहेत ! https://www.youtube.com/watch?v=9MUEp1vGOpo आपण अवश्य ऐका !

आज ह्यो लेख पघितला म्हणून शेयर करायला आलो इंग्रजी या मातृभाषांसाठी परकी भाषा आहे. या भाषांचे इंग्रजीशी साम्य नाही. भाषिक रचनेच्या दृष्टीनेही ती परकी आहे. शिवाय नित्य ऐकण्या-बोलण्यातील नाही. त्यामुळे इंग्रजी 'येणे' किंवा 'शिकणे' हे वेळखाऊ व अवघड होते. या पार्श्वभूमीवर, इंग्रजी माध्यमातून शिकताना मुलांना प्रथम ही परकी असलेली इंग्रजी भाषा शिकावी लागते आणि मग अनेक विषयांमधील संकल्पना शिकाव्या लागतात. या दोन टप्प्यांमुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. पाया पक्का होत नाही मराठवाडी, नागपुरी, अहिराणी या प्रादेशिक बोलींच्या, तसेच कोरकू गोंडी, पारधी, कैकाडी, या आदिवासी व भटक्या बोलींच्या समूहासाठी मराठी ही संपर्क भाषा आहे. म्हणजे संवाद करण्यासाठी मराठी या सामायिक भाषेचा उपयोग होतो. संपर्काची सरकारी भाषाही मराठी आहे. म्हणजे निवेदने, अर्ज, तक्रारी हे सर्व मराठीत करणे सोयीचे जाते. शिक्षण घेण्यासाठीही मराठी ही एक सामायिक भाषा सरकारला सोयीचे जाते. ५६ मातृभाषांमधून शिक्षण देणे अवघड आहे असं ही लेखिका म्हणते आहे

संस्कृत हि संगणकासाठी सुयोग्य भाषा आहे - अजून या फेकावंर विश्वास आहे ? या संस्कृतच्या फेका चाळीस वर्ष पूर्वी ऐकल्या होत्या , मी शाळेत असताना . अजून त्यात काहीही झाले नाही , तरी लोकांचा विश्वास बसतो अजून ? चाळीस वर्ष आणि आता किणी सांगेल का संस्कृत कशासाठी वापरली गेली ? मी प्रोग्रामिंग किंवा कोडिंग मध्ये नाही पण इतके ओळखीचे आहेत त्यांच्याकडून कधी संस्कृत कोठे वापरली गेली असे ऐकले नाही . नक्की काय करण्यासाठी हि वापरली गेली जर वापरत असतील तर ? शास्त्र आणि तांत्रिक क्षेत्रात उपयोग असेल तर संशोधन होते आणि आर्थिक उपयोग असेल तर बरेच होते . यातही काही अंदाज होते ते चुकले आहेत . शाळेत असताना २००० नंतर माणूस अनेक ग्रहांवर जाईल आणि अवकाश गमन हे अनेकांचे करिअर असेल असा शास्त्रद्न्य अंदाज करायचे , आता आहे असे कि १९७२ नंतर माणूस चंद्रावर गेला नाही . पण ऐकणं कल्पना नव्हती असल्या तांत्रिक क्षेत्रात लोक काम करत आहेत . स्पेस हे मोठ्या प्रमाणात करिअर यावर कोणी बोलत नाही - संस्कृत वरच्या फेका मात्र काहीही सिद्ध झाले नाही तरी चालू दिसतात संगणक क्षेत्रात संस्कृत कोठे वापरली जाते ? कोणत्या प्रकारच्या प्रोग्रामिंग मध्ये . हि निरुपयोगी भाषा शिकलेले फक्त हे स्किल येते / हे अजून एक स्किल येते म्हणून कोणत्या प्रोग्रामिंग कंपनीने रिक्रूट केले आहेत . त्यांनी कोणत्या प्रोग्रॅम वर काम केले ? असल्याचं फेका अजून हि ऐकल्या होत्या कि मराठी माध्यमातून शिकले कि शास्त्र विषय अधिक चांगले समजायला मदत होते . मराठी माध्यमातून शिकले तरी इंग्लिश संबंधी कोर्स करायला काहीही अडचण येत नाही . ( इकडे मराठी च्या जागी मातृभाषा टाका ) हे मराठी माध्यमातून शास्त्र समजलेले लोक जिकडे समजुतीचा कास लागतो असल्या IIT मध्ये अतिशय कमी दिसायचे - बॅच मध्ये किती मुले असतात आणि त्यात मराठी माध्यमाची किती हे पहिले कि प्रमाण कळेल .