Welcome to misalpav.com
लेखक: सौन्दर्य | प्रसिद्ध:
आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सकाळी ९.३० वाजता पोहोचायचे होते. हॉस्पिटल घरापासून अंदाजे सहा मैलावर असून ड्राईव्ह टाईम अंदाजे ३० मिनिटांचा होता. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी जरा लौकरच म्हणजे साडेआठच्या सुमारास घरून कारने निघालो. वाटेत एका सिग्नलजवळ अपघात झाला होता, फार काही झाले नव्हते, फक्त एका कारने पुढील कारला मागून ठोकले होते. इथल्या प्रथेनुसार दोन्ही गाड्या रस्त्यावरच उभ्या होत्या, पोलिसांनी बाजूची लेन देखील अडवून ठेवली होती. पोलिसांच्या हजेरीतच दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हर्स आपापले ड्रायव्हर लायसन्स, इन्शुरन्स पेपर्स, टेलिफोन नंबर एकमेकांना देण्याचे सोपस्कार पार पाडत होते. पण ह्या सर्व गोष्टी जेथे अपघात झाला तेथेच चालल्यामुळे चार लेन्स पैकी, दोन लेन्स बंद पडल्या होत्या आणि त्यामुळे, ट्राफिक बऱ्यापैकी जाम झाले होते. माझ्याकडे अर्धा तास जास्तीचा असल्याने मला फारशी घाई नव्हती, तरी देखील ह्या जाम मधून लवकर बाहेर पडावे असे मनोमन वाटत होतेच. अपघाताची जागा ओलांडून हळूहळू मी मोकळ्या रस्त्यावर आलो, पुढची गाडी अगदीच हळू चालत असल्यामुळे लेन बदलण्याचा सिग्नल देऊन मी लेन बदलणार होतोच, इतक्यात मागील गाडी, माझ्या सिग्नलला न जुमानता बाजूच्या लेनमध्ये आली. मी जर अलर्ट नसतो तर मी ज्या लेनमध्ये गाडी घेणार होतो त्याच लेनमधून मागून येणार्या गाडीने माझ्या गाडीला मागून धडक दिली असती. सहसा येथे असे होत नाही. एकदा का पुढील गाडीने सिग्नल दिला की मागून येणार्या गाड्या त्या सिग्नलचा मान राखून, पुढील गाडीस अपेक्षित लेन अथवा टर्न घेऊ देतात. मी ह्या अनपेक्षित आलेल्या गाडीमुळे एकदम दचकलो, मनोमन त्या गाडीच्या ड्रायव्हरला शिव्या हासडल्या आणि लेन न बदलता गाडी स्लो केली. ती गाडी थोडी पुढे आल्यावर जाणवले की त्या गाडीची ड्रायव्हर एक आफ्रिकन अमेरिकन स्त्री होती. ह्या आफ्रिकन अमेरिकन लोकांची वर्तणूक पाहता तिच्याकडून ह्याहून वेगळ्या वागण्याची अपेक्षा नव्हतीच. ‘आफ्रिकन अमेरिकन’ म्हणजे ‘निग्रो’ वंशाची लोकं, परंतु येथे ‘निग्रो' शब्द अपमानकारक (शिवी सदृश्य) असल्याने त्यांना ‘काळे’ म्हणण्याची प्रथा आहे. ‘आफ्रिकन अमेरिकन’ हा त्यातल्या त्यात संसदीय शब्द, तरी देखील त्यांना ‘काळे' (Black) म्हटलेलं चालतं. हे आफ्रिकन अमेरिकन, अमेरिकेत आफ्रिका खंडातून गुलाम म्हणून आणले गेले. कित्येक शतके ते गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडले होते. अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्या अथक प्रयत्नाने, गुलामगिरीचे जोखड त्यांच्या खांद्यावरून दूर झाले आणि त्यांना सामान्य जनांसारखे अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले. जरी ते अमेरिकेचे सामान्य नागरिक म्हणून ओळखले जाऊ लागले तरी सन्मान त्यांच्या वाट्याला फारसा आला नाही. आजही अमेरिकेतील तुरुंग पंच्याहत्तर टक्क्याहून जास्त काळ्यांनीच भरले आहेत. अत्याचार त्यांच्यावरच जास्त होताहेत. शिक्षण, नोकरी, सामाजिक समानता त्यांच्या वाट्याला फारशी येत नाही. अजूनही ह्या लोकांत शिक्षणाचा प्रसार, आरोग्य, व्यसनांपासून मुक्ती फारशी झाली नाही, आजही ते दारिद्र्याच्या,अज्ञानाच्या खाईत खितपत पडले आहेत. आता त्यांना ‘मायनॉरिटी’ म्हणून सरकारकडून अनेक सुविधा, मदती देखील मिळतात त्यामुळे त्यांच्या ह्या मागासलेपणाला ते स्व:ता देखील तितकेच जबाबदार आहेत. हे सर्व जरी असले तरी देखील पूर्वग्रहदूषित विचारसरणीचा फटका त्यांना जास्त बसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्या काळ्या बाईने मला ओव्हरटेक करताना दाखवलेल्या उद्दयामपणाची, उर्मटपणाची चीड तर मला आलीच होती, तरी राग आणि अपमान गिळून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यात ती बाई थोडे पुढे जाऊन, आपल्याकडे ड्रायव्हर मंडळी गुटखा, तंबाखू वगैरे खाऊन थुंकण्यासाठी, गाडीचा दरवाजा उघडून जमिनीवर पिचकारी मारतात, त्याप्रमाणे सिग्नलला दरवाजा उघडून जमिनीवर पचकन थुंकली. ते बघून तर आणखीनच राग आणि किळस आली, पण करणार तरी काय ? हे लोक कधीच सुधारणार नाहीत असा मनाशी विचार करून पुढे निघालो. घरून लवकर निघाल्यामुळे वेळेआधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ब्लड सँपल वगैरे दिल्यावर पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमधून मेन रिसेप्शन एरियात, तिथल्याच एका लॅब टेक्निशियन बरोबर चालत येत होतो. वाटेत रेडीओलॉजी डिपार्टमेंट लागले. तेथील कॉरीडॉरमध्ये, नुकतीच ट्रीटमेंट घेऊन एका व्हील चेअरवर एक साधारण पन्नाशीची काळी बाई बसली होती. डोक्यावर हॉस्पिटलची हिरवी कॅप, अंगावर हिरवा गाऊन, दोन्ही नाकात ऑक्सिजनसाठी नळ्या होत्या, तसेच हाताच्या पंजावर आयव्हीज लावून व्हील चेअरलाच टांगलेल्या बाटलीतून सलाईन चालू होते. तिला दुरून पाहतानाच तिच्या चेहऱ्यावरचे थकलेले, अशक्त भाव स्पष्ट दिसत होते. बहुतेक ‘किमो’ ट्रीटमेंट घेऊन ती निघाली होती. आम्ही चालत चालत तिच्या बाजूने पुढे गेलो आणि अचानक, “गुड मॉर्निंग, जंटलमेन" हे शब्द ऐकू आले. आम्ही चपापून थांबलो, त्या व्हील चेअरवरील स्त्रीने आम्हाला गुड मॉर्निंग म्हंटले होते. थोडेसे ओशाळं होऊन, मागे वळून त्या स्त्रीला, चेहऱ्यावर हास्य आणून “गुड मॉर्निंग” केले आणि खाली मान घालून परत पुढे चालू लागलो. माझ्या बरोबर असलेल्या टेक्निशियनच्या मनात काय भाव उमटले असतील हे सांगता येणं कठीण आहे, पण मला मात्र माझी स्व:ताची अतोनात लाज वाटली. तिच्या ‘जंटलमेन’ ह्या संबोधनाला आपण किती नालायक आहोत हेच सारखं मनात येत राहिले. एका असाध्य आजाराने स्व:ता ग्रासली आणि त्रासली असताना देखील, चेहऱ्यावर स्मित हास्य आणून आम्हाला ‘गुड मॉर्निंग’ करणाऱ्या त्या स्त्रीच्या मानसिकतेला सलाम करावासा वाटू लागला. असं म्हणतात की स्मशानात येतं ते ‘स्मशान वैराग्य', परंतु खरे वैराग्य माझ्या मते हॉस्पिटलमध्येच येतं. आपण जर प्रकृतीने ठीक असू आणि आसपास टर्मिनली आजारी लोकांना पाहिले की मनात जे विचार येतात ते खरे वैराग्याचे विचार. हॉस्पिटलमधील पेशंट्सना पाहिले की देवाने आपल्याला धडधाकट शरीर देऊन किती उपकार केले आहेत हे ध्यानात येतं आणि देवाचे उपकार मानावेसे वाटू लागतात. जीला शुभेच्छा, शुभ चिंतनाची खरी गरज आहे अश्या त्या आजारी स्त्रीने स्व:ताच्या आजारपणात आमच्या सारख्या धडधाकट पुरुषांना शुभ चिंतन करावे आणि आम्हाला ते साधे सुचू देखील नये, ह्याची जाणीव होऊन मन एकदम खजील झालं. “सर्वच काळे वाईट, त्यांना मॅनर्स नसतात, सामाजिक जाणीवांच्या बाबतीत ते शून्य असतात,” हा एक गैरसमज मनात घर करून राहिला होता त्याला ह्या “गुड मॉर्निंग, जंटलमन” ने एकदम तडा गेला. विनयशील वागणं हे वंशावर आधारित नसून स्वभावावर अवलंबून असते हेच खरं. स्व:ता धडधाकट असताना, एका व्हील चेअरवर बसलेल्या आजारी स्त्रीला साधे ‘गुड मॉर्निंग’ करण्याचे सौजन्य मी दाखवू शकलो नाही ह्याची खंत अजूनही उरात आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रांजळ आत्मकथन आवडलं. ज्यांच्यापासून काहीच लाभ होणार नसतो त्यांच्याशी एखादा माणूस कसा वागतो त्यावरून त्याचा मोठेपणा कळतो असं काहीसं वाक्य पूर्वी वाचलं होतं. तुमचा लेख वाचून ते आज पुन्हा आठवलं.

मिपा (फक्त) कन्फेशनसाठी नक्कीच नाही. तरीदेखील कित्येक वेळा, एखाद्या प्रसंगात मनात उमटलेल्या भावना शेअर करण्याचे स्थान नक्कीच आहे असे मला वाटते.

लेखन आवडले. माझ्याकडूनही अशा चुका झालेल्या आहेत. आपण आपल्या विचारात गढलेले असताना एकदम समोर आलेल्याला हॅलो म्हणणे अवघड जाते.

“सर्वच काळे वाईट, त्यांना मॅनर्स नसतात, सामाजिक जाणीवांच्या बाबतीत ते शून्य असतात, हा एक गैरसमज मनात घर करून राहिला होता त्याला ह्या “गुड मॉर्निंग, जंटलमन” ने एकदम तडा गेला. विनयशील वागणं हे वंशावर आधारित नसून स्वभावावर अवलंबून असते हेच खरं.
सर्वच @वेरिऐबल वाईट, सामाजिक जाणीवांच्या बाबतीत ते शून्य असतात. फॉर (@वेरिऐबल इंडेक्स = १, इंफीनीटी, १++) कृपया वाक्यात आपल्या मनातील @वेरिऐबल टाकून वाक्य परत वाचा, मग लेख परत वाचा: उपलब्ध @वेरिऐबल वाल्यु ( जात, ब्राम्हण, मराठा, ओबीसी, दलित … धर्म, हिंदू मुस्लिम, बौद्ध, जैन, क्रिश्चन …. भाषा मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ… लिंग स्त्री, पुरुष … शाकाहारी मांसाहारी …. पुण्यातले पुण्याबाहेरचे विधार्भातले कोकणातले मराठवाड्यातले …… इंफीनीटी)

मागच्या गाडीने चूक केल्यावर पहिला विचार मनात आला, तो हा की १००% भारतीय व्यक्ती असणार. पुढे आफ्रो-अमेरिकन उल्लेख आल्यावर लगेच मनात तुलना निर्माण झाली. जर मला भारतात हा अनुभव आला असता तर मागचा "कोण" आहे, असे माझ्या मनात लगेच आले असते? लेखातील पहिल्या भागातील जे कृष्णवर्णीयांविषयी लिहिलं आहे, त्या ठि़काणी भारतातील कोणते समुह रिप्लेस केले तरी काही फरक पडणार नाही? उदा मुस्लीम, दलित, इत्यादि. अमेरिकेत कृष्णवर्णीय, भारतात मुस्लीम, (माझ्या पाहण्यात फक्त पुण्यातील अनुभव आहेत, ते वैश्विक म्हणता नाही आले, तरी वैश्विक/भारतीय/महाराष्ट्रातील इतर शहरे इथले अनुभव वेगळे असतील असे वाटत नाही) पुण्यात ब्राह्मणांच्या नजरेत मराठे (बी-ग्रेडी म्हणून प्रत्येकाला हिणवणे इथेच वाचले आहे), आणि मराठ्यांच्या नजरेत "उर्वरित" हेच अनुभव येत राहतात. पुण्यात अत्यंत निर्लज्ज पणे चुका करत गाडी चालवणे, चालत्या गाडीतून किंवा चालत असताना रस्त्यावर थुंकणे, तुरुंगातील प्रमाण, आर्थिक/शैक्षणिक/वैचारिक मागासलेपण, सरकार देत असलेल्या सोई-सुविधा या सर्व गोष्टी लेखातील गोष्टींशी तुलना करून पाहिल्या तर.... असो, आता ठराविक वाक्ये तोंडावर फेकत काही प्रतिसाद येतील. (सगळेच वाईट नसतात, "त्यांच्यात" पण वाईट असतातच की, इत्यादी इत्यादी)

पुण्यात ब्राह्मणांच्या नजरेत मराठे (बी-ग्रेडी म्हणून प्रत्येकाला हिणवणे इथेच वाचले आहे) आपण आधी अभ्यास वाढवावा असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. कोणीही ब्राह्मण सरसकट मराठ्यांना बी ग्रेडी म्हणत नाही. बी ग्रेडी ही एक वृत्ती आहे. ती एक जात नाही. दुर्दैवाने ज्यांना बी ग्रेडी संबोधिले जाते (ते बी ग्रेडीच आहेत) त्यात एकाच जातीचा भरणा आहे. पण म्हणुन हे बी ग्रेडीकरण एका जातीचे नसून एका प्रवृत्तीचे केले गेले आहे हे लक्षात घ्या. इथे एखादा माणूस मराठा आहे म्हणुन त्याला बी ग्रेडी म्हटले जात नाही. (दुर्दैवाने ब्राह्मणांच्या बाबतीत उगाच झोडपण्याचे प्रकार जास्त घडतात). आणि इथे प्रत्येकाला बी ग्रेडी म्हणुन हिणवले जात नाही. सगळ्यात महत्वाचे ज्यांना बी ग्रेडी म्हटले जाते त्यांनाही ते हिणवल्यासारखे नसतेच मुळी. मुळात झेड ग्रेडी म्हटले पाहिजे. धन्यवाद.

पहिली गोष्ट म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट उगा पुण्याच्या माथी मारण्याचा प्रकार का होतो हे कळत नाही. ते खुप वैतागवाणे आहे.
अगदी!

पहिली गोष्ट म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट उगा पुण्याच्या माथी मारण्याचा प्रकार का होतो हे कळत नाही. ते खुप वैतागवाणे आहे.
हे मला कुठे दिसले नाही. वरच्या प्रतिसादातून संपादित झाले असेल, तर मी म्हणालो होतो की,
(माझ्या पाहण्यात फक्त पुण्यातील अनुभव आहेत, ते वैश्विक म्हणता नाही आले, तरी वैश्विक/भारतीय/महाराष्ट्रातील इतर शहरे इथले अनुभव वेगळे असतील असे वाटत नाही)

बी ग्रेडी ही एक वृत्ती आहे. ती एक जात नाही. दुर्दैवाने ज्यांना बी ग्रेडी संबोधिले जाते (ते बी ग्रेडीच आहेत) त्यात एकाच जातीचा भरणा आहे.
याच्याशी सहमत आहे. शिवाय,
सगळ्यात महत्वाचे ज्यांना बी ग्रेडी म्हटले जाते त्यांनाही ते हिणवल्यासारखे नसतेच मुळी. मुळात झेड ग्रेडी म्हटले पाहिजे.
याच्याशी सुद्धा. (अवांतरः संयमित प्रतिसादासाठी धन्यवाद)

फरक कळाल्याबद्दल. अभाजातपात्स्थल्शहरदेशपरदेशनिवासीअनिवासीधार्मीकाधार्मीकसवर्ण अपचन निर्मूलन सघांतर्फे "जीवदया नेत्रप्रभा" नेत्रांजन भेट.

आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये
इथल्या म्हणजे कुठल्या असा प्रश्न मनात आला. उर्वरीत लेख वाचल्यावर अंदाज आला , पण सुरवातीलाच स्पष्ट केले असते तर बरे झाले असते.
ह्या आफ्रिकन अमेरिकन लोकांची वर्तणूक पाहता तिच्याकडून ह्याहून वेगळ्या वागण्याची अपेक्षा नव्हतीच.
ह्या पुर्वग्रहदुषीत दृष्टीकोनाचे कारण कळले नाही. गोर्‍या कातडीचे लोक अशा चुका करत नाहीत असे म्हणायचे आहे का ?

कोणतीही कम्युनिटी शंभर टक्के चांगली किंवा वाईट असू शकत नाही. त्यात चांगले वाईट दोन्ही प्रकार बघायला अनुभवायला मिळतात. परंतु जर एखाद्या कम्युनिटीच्या वेगवेगळ्या सदस्यांकडून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगात जर अप्रियच अनुभव आले, तर त्यामुळे त्या कम्युनिटीच्या विरोधात एक मत तयार होते. कोणतेही मत बनण्यासाठी, आधी आलेले अनुभव कारणीभूत असतात असे मला वाटते. आपले 'अनुभव' म्हणजे तरी वेगळे काय असतात ? एखाद्या घटनेत जर अप्रिय अनुभव आले आणि जर तशीच घटना पुन्हा उद्भवली तर आपले मन आधीच्या अनुभवाची उजळणी करून, त्यावेळी आलेल्या अनुभवावरून, ह्या नवीन प्रसंगात आपली कृती ठरवते. लेखाच्या सुरवातीलाच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, ठिकाणाचे (शहराचे) नाव द्यायला पाहिजे होते, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

होणे हे निसर्गदत्त आणि चुकीची खंत वाटणे ही संवेदना जिवंत असल्याचे लक्षण. पु भा प्र. चुकांचा पालक नाखु

"चूक होणे हे निसर्गदत्त आणि चुकीची खंत वाटणे ही संवेदना जिवंत असल्याचे लक्षण" - एकदम बरोबर.