Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन. ग्राहक म्हणून तुमचा अधिक संबंध येतो तो या 'सेल्समन' नावाच्या प्रजातीतील व्यक्तींशी. कुणाचीही हेटाळणी करायचा उद्देश नाही, त्यामुळे हलकेच घ्या (take it easy). तर या सेल्समन व्यक्ती बहुतेकदा डोक्क्यात जातात. कशा, ते काही प्रकारांतून, सवयींतून सांगतो. मागे लागणं - मॉल मधे जाऊन खरेदी सुरु झाल्यावर मुख्य फायदा झाला तो म्हणजे तुम्हाला 'विचार' करून चार गोष्टी बघून तुमच्या स्वतंत्र निर्णयातून खरेदी करता येऊ लागली. नाहीतर दुकानात गेलं की तो दाखवेल तेच दिसतं आणि नाही आवडून आपण चालायला लागावं तर और देखो ये देखो वो देखो करत आग्रह सुरू होतो. बरं मोठं दुकान असेल तर आपण निघाल्यावर तुच्छ नजरेने आपल्याकडे बघितलं जातं ते वेगळंच. हे दुकानातल्या सेल्समन चं मागे लागणं डोक्क्यात जातं. आता मॉलमधेही फिरते सेल्समन असतात म्हणा. त्यांच्याकडे आहे तेच बेस्ट - मला विंडोज फोन हवा होता. एका दुकानात शिरलो. त्याने 'रेंज' विचारली 'रेंज'. म्हटलं लुमिया दाखव. "ये देखो सेमसंग गेलेक्सी अमूक" "हा नको लुमिया दाखव" "उससे बेस्ट ये है. १३ मेगापिक्सेल...." .... "अरे ते मेगापिक्सेल गेलं ......त. मी काय मागतोय?"... मग म्हणाला शेवटी की नही है वो. म्हणजे, आलेल्या पाहुण्याला रिकाम्या हाताने पाठवू नये ची पद्धत फार मनावर घेतल्यासारखं आलेल्या ग्राहकाच्या गळ्यात काहीतरी मारूनच त्याला पाठवायचं असा प्रकार झाला. डोक्क्यात ! आजकाल हेच चालतं - 'ट्रॅडिशनल वेअर' चं दुकान. मी कॉटन चा झब्बा मागितला. त्याने झगरमगर एम्ब्रॉयडरी वाला स्टारप्लस छाप झब्बा दाखवला. "हे नाही. सोबर दाखवा", मी. "हे बघा तर, नवीन कलेक्शन आहे" "अरे नको बाबा साधे दाखव ना जरा डिसेंट प्रिंट वाले" त्यापुढच्या उत्तरानंतर मी बाहेर पडलो. "आजकाल ते नाही चालत. आजकाल हाच ट्रेंड आहे" "हो का? ठेव मग तो तुझ्याकडे", मी. मला आजवर असंख्य वेळा हा डैलॉग सहन करावा लागलाय. सगळ्यांनाच असेल. पण माझ्या तो डोक्क्यात जातो. 'तू कोण ठरवणार कसला ट्रेंड आहे आणि मी तो फॉलो करावा का नाही?' दाखले देणे - मोबाईलचंच उदाहरण. बिलबुक काढून दाखवलं होतं एकदा बघा... गेले चार मोबाईल अमके अमके विकले. म्हणून सांगतो हा बेस्ट आहे. किंवा मग 'आज के दिन मे चार प्रॉडक्ट्स गये साब इसके!' (म्हणजे, तू मूर्ख आहेस जे दुसर काहीतरी मागतोयस) असे डैलॉग. तुम्हाला झाडावर चढवणं - या ट्रिकला बायका हमखास भुलतात. (ओह... जेंडर स्पेसिफिक स्टेटमेंट) कधी कधी मुलं/पुरुषही भुलतातच. म्हणजे उदहारणार्थ बघा; साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. मग नवरा असेल सोबत तर तो म्हणतो की "ही नाहीये इतकी चांगली". त्या औषधाचा परिणाम झाला तर ठीक, नाहीतर त्यालाही "तुम्हाला त्यातलं कळंत नाही" वगैरे म्हटलं जाऊ शकतं. असो. कपड्यांच्या दुकानात हे समजू शकतो पण एकदा एका रंगा-याला जेंव्हा मी म्हटलं की ही शेड जी तू केली आहेस ती परफेक्ट नाही झाली आहे, तेंव्हा तो मला म्हणाला "अरे उससे ज्यादा ये अच्छा दिखेगा!" सटकलीच माझी तेंव्हा म्हणजे. घर कोणाचं? रंग कोण ठरवणार? असो. पण एकंदरित सेल्समनची ही पकपक सुद्धा डोक्यात जाते. अवांतर प्रश्न - यात आता हेतू वेगवेगळे असू शकतात. काही वेळा खरंच तुमचा विचार समजून घ्यायला प्रश्न विचारले जात असतील. पण काहीवेळा हे इंट्रूडिंग होतं फार. शर्ट घेताना, 'पार्टीत घालणार आहात?' 'शादी घरका है के बाहरका?' असे प्रश्न ऐकून प्रतिप्रश्न येतोच मनात. "तुला का.....य फरक पडतोय?' फास्ट आणि खूप जास्त बोलणे - हे कॉमन आहे खूप. भरभर तोंडातल्या तोंडात काहीतरी बोलायचं आणि असं सगळंच म्हणजे खूप जोराची लागली आहे आणि ग्राहक गेला की धावलोच अशा घाईत उत्पादनं दाखवायची. डोक्क्यात. मागे मागे फिरणं - मॉल मधे होतं हे आजकाल. तुम्ही एका रॅक जवळ ३० सेकंदापेक्षा जास्त थांबलात, की एक मुलगा/मुलगी मागे येऊन उभी राहते तुमच्या. आणि मग 'सांग ना, काय झालं?' च्या सुरात 'क्या लेना है?', 'ट्राउजर लेना है?', 'ऑफिस के लिये?' असे हळूच हळूच प्रश्न पुटपुटत राहते. दुस-या रॅकशी जा, तिथेही तुम्हाला फॉलो करते. एकदम चोर बिर असल्याची भावना येते मनात. समबडी इज फालोविंग मी.... डोक्क्यात. एकूण काय; नो ऑफेन्स बट हे अ‍ॅग्रेसिव मार्केटिंग किंवा कंपेलिंग सेल्समनशिप या फार वैताग देणा-या गोष्टी आहेत. त्यामुळे मी मॉल मधे गेलो तर सरळ 'मी बघतो आणि गरज लागली तर तुम्हाला सांगतो' असं नम्रपणे सांगून दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. दुकानात गेलो तर थंड रहायचा प्रयत्न करतो. :) हे सगळं असूनही जेंव्हा मी मला त्यांच्या जागी ठेवतो, एका मोबाईल शॉपी मधल्या सेल्समनने मला सांगितलेलं त्यांच्या कामाचं स्वरूप व मालकाचा जाच आठवतो, जेंव्हा त्यांना मिळणा-या कमी पैशांची आणि असणा-या अवास्तव टार्गेट्सची कल्पना करतो, तेंव्हा त्यांच्याबद्दल कणव वाटल्यावाचून रहात नाही. त्यांच्या कामाबद्दल त्यांचं कौतुकच वाटतं. पण तरीही जेंव्हा मी ग्राहकाच्या जागी असतो तेंव्हा....
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मुंबईतल्या कित्येक दुकानात पूर्वी कपडे खरेदी करायला गेलं की "बजेट कितना है ?" हा पहिला प्रश्न विचारायचे. त्यांच्या दृष्टीने तो महत्त्वाचा प्रश्न असला तरी आपला अपमान होतोय असं (उगीच ?) वाटायचं आणि दुकानातून काढता पाय घ्यायचो.

पुण्यात सुद्धा विचारतात , मी आणि सौ साडी खरेदीसाठी गेल्यावर हस्तकलामधे पहिल्या पावलाला हाच प्रश्न विचारला होता. " २ लाखाची" साधी दाखवा असे नम्र उत्तर दिले :)

एक असाच सोसायटीतला भेटला होता. अम्वेसाठी मागे लागला. तुम्हाला फावल्या वेळात आधिक पैसा कमावता येइल वगैरे सान्गू लागला. त्याला एकदम सिरियस चेहरा करून म्हणालो "अहो घरी खूप पैसे पडले आहेत. सोन वगैरे तर बेडमधे कपाटात ठेवयलाहि जागा नाही. पैश्याच काय कराव ते कळत नाही. कालच दोन मर्क्स बुक केल्या." हा सटक आहे समजून हे हे करत निघुन गेला. परत समोरून आला तरी तोन्ड चुकवतो.

मागे एकदा माझ्या एका मामेभावानी अ‍ॅमवेच्या अश्या डोकेदुखीला आर.एम.पी. नावाच्या दुसर्‍या चेन मार्केटिंग वाल्याकडे पाठवलेलं. दोघांनी एकमेकांची यथेच्च डोकी खाल्ली आणि माझा मामेभाउ अलगद बाजुला झाला ;)

माझ्या मते सेल्समन हे खरेच कठीण काम आहे किंबहुना सर्वात कठीण काम आहे. कुठलीही वस्तू विकणे एवढे सोपे नाही. प्रत्येकाने तरुण वयात काही वर्षे सेल्समधे घालवावी त्याचा कदाचित पुढे जाउन बराच फायदा होत असेल. कुठली वस्तू कशी विकायची हा स्वतंत्र विषय आहे. मी घर घ्यायच्या वेळेला त्या सेल्समनने तीन तास देउन शांतपणे प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. जो प्रॉब्लेम आहे तो आहे, उगाच त्याचा बचाव केला नाही. कमी नाही पण नेमके बोलनारा सेल्समन होता. बऱ्याचदा योग्य ट्रेेंनीगच्या अभावामुळे काही सेल्समन अंगावर धावून आल्यासारखे वाटतात. सेल्स हा कठीण प्रकार आहे आणि माणसाच्या सहनशीलतेची परीक्षा आहे. पुलंनी म्हटलेले आहे की डोके शांत कसे ठेवावे यासाठी साडीच्या सेल्समनची नोकरी करावी.

>>> तुम्हाला झाडावर चढवणं - या ट्रिकला बायका हमखास भुलतात. (ओह... जेंडर स्पेसिफिक स्टेटमेंट) कधी कधी मुलं/पुरुषही भुलतातच. म्हणजे उदहारणार्थ बघा; साडीचं दुकान. "ये आपको बहुत अच्छा दिखेगा" (सेल्समनचे उद्गार नाईलाजाने हिंदीत लिहावे लागत आहेत कारण बहुतांश ते हिंदीतच असतात) असं म्हटलं की म्याडमचा फोकस त्या साडीवर येण्याची पुरेपूर शक्यता. हा मुद्दा सोडून पटला लेख. असो. मॉलमधे वस्तू निवडता येते हे ठिके पण हल्ली तिथेही हे सेल्समन प्रकरण त्रासदायक होऊ लागलेय. एखाद्या सेक्शनमधे गेल्यावर 'तुम्हाला काही मदत हवीये का?' इथपर्यंत विचारणं ठिके पण एखाद्या वस्तूला आपण हात लावला किंवा २ सेकंदापेक्षा जास्त बघितलं त्या वस्तूकडे की लगेच इसमे ये कलर्स भी है, और आयटेम्सभी वहापे मिलेंगे करून सांगायला लागले की डोक्यात जातात. किंवा मग आपण वस्तू बघत फिरत असलो की आपल्या मागे मागे करत रहातात ते ही डोक्यात जातात. एकदा मी शॉपर्स स्टॉपमधे एका सेल्समनला सुनावलं होतं. आम्ही पर्सेसच्या सेक्शनमधे फिरत होतो. सेल्समन आमच्या मागेमागे फिरत होता. एक पर्स दिसली. मी उलटे वळून ती परत बघितली. आणि मग बरोबरच्या मैत्रिणीला त्या ठराविक प्रकारच्या पर्सेसच्या स्टाइलबद्दल काही सांगायचं होतं म्हणून मैत्रिणीला बोलावून त्या रॅकपुढे उभं राहून, त्या पर्सकडे बोट दाखवत मी तिला काही सांगायला जाणार इतक्यात सेल्समन मधे येऊन ये अमुक ब्रॅण्डका है. ऐसेही स्टाइलमे वो बाजूमे औरभी है पर्सेस. वगैरे सांगू लागला. मग असला झाडला त्याला. म्हणलं मला गरज वाटली तर मी तुला प्रश्न विचारेन. उगाच मधे मधे येऊन बोलू नकोस. गेले १० मिनिटे तू आमच्या मागे मागे फिरतोयस. कशासाठी? काय प्रॉब्लेम आहे तुझा? तर म्हणे मै सेल्समन हूं यहा का. शेवटी मॅनेजरकडे तक्रार केली.

सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे; जे सगळ्यांना जमत नाही. एखादी गोष्ट विकत घेण्यासाठी समोरच्या माणसाला प्रवृत्त करणं, हे मला तरी महाकठीण काम वाटतं. नॉट माय चहाचा कप. आज बाजारात तुम्हाला कुठलीही गोष्ट घ्यायची असेल तरी तुमच्यापुढे अनेक पर्याय असतात. बरं, स्पर्धा इतकी आहे की कंपन्याही आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) हा एककलमी कार्यक्रम घेऊन शर्यतीत उतरलेल्या असतात. त्यांचे मोहरे असतात ते म्हणजे सेल्समन.
या विषयाची एक बाजू आपण "सगळेच सेल्समन" या सर्वसाक्षींच्या प्रतिसादात वर आली आहे. सेलिंग आणि मार्केटिंगचा रोल फॅसिलीटेशनचा आहे तो तिथेच मर्यादीत न राहता ओसंडतो, मालक आणि ग्राहक या दोहोंची सेल्समनने उतूनये मातू नये ही अपेक्षा रास्तच असते. आपली वस्तू विकली जावी (मग ती कशीही असो काहीही असो) याचा पडद्या मागचा एक कर्ता करवीता फायनान्स हा घटकही असतो, जो काहीही झालेतरी रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मागत असतो, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा दबाब मालकां/व्यवस्थापनावर येतो. सेल्समन स्वतःसाठी स्वतःच्या कुटूंबासाठीच्या स्पर्धेत झटतो हे समोरून दिसणारे सत्य आहे, व्यवस्थापन त्याच्या गरजेला मोहरा बनवते ते प्रत्येक स्टेकहोल्डरचे किंवा त्यांच्या कुटूंबाचे पोट भरण्यासाठी. सेलिंग किंवा मार्केटिंग हे एक स्किल आहे हे बरोबर आहे इतर कलांप्रमाणे काही गुण जन्मजात असतात, काही कौशल्ये आत्मसात कारवी लागतात, कौशल्ये आत्मसात करताना प्रशिक्षणाचे महत्व असू शकते, कोणत्याही क्षेत्रात सर्वांना चांगले प्रशिक्षण आणि प्रशिक्षक लाभतातच असे नाही ते याही क्षेत्रात होते, गुण नाही पण वाण लागला असेही बर्‍याचदा होऊन व्यावसायीकतेस मारक असलेल्या अत्यंत चुकीच्या प्रॅक्टीसेस मालक व्यवस्थापन ते सेल्स मार्केटींग अमलात आणताना दिसते. स्पर्धेचा अभाव अथवा अती स्पर्धा हे दोन्हीही ग्राहक अनुभवाच्यादृष्टीने अहीतकारक असतात. जेव्हा एखादा सेल्समन ग्राहकाला बुद्धू बनवून काम करतो त्यात सेल्समन आणि आस्थापनेच्या नैतीकतेचा प्रश्न असतोच पण या नाण्याची दुसरी बाजू ग्राहकाची सतर्कतेपेक्षा स्वभावनेला अधिक मह्त्व देणे हे सुद्धा तेवढेच कारणीभूत असू शकेल का असा प्रश्न पडत राहतो.

माझी रोजच्या सामानाची खरेदी को ऑपरेटिव्ह स्टोअरमधे. पुस्तके, भाजी, दूध इ. मधे हा प्रश्नच येत नाही. आणि इतर बहुतेक सगळे (हो, कपडे सुद्धा) ऑनलाईन. कसलाच ताप नाय. एखादेवेळी पुण्याला हस्तकला मधे किंवा अशाच स्थानिक काहीतरी घ्यायच्यासाठी एखाद्या दुकानात गेले, तर तोंड उघडत नाही. सगळ्याला लेबलं लावलेली असतात. आवडलं ते उचललं. पैसे देऊन १० मिनिटांत बाहेर. कुठेही गेलं तर इतर कोणाच्यातरी मागून मख्खपणे जावे. म्हणजे आपण स्वतंत्रपणे आलोय अशी शंकासुद्धा दुकानातल्या सेल्समनना येऊ द्यायची नाही.