Welcome to misalpav.com
लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
रविवार सकाळची गोष्ट आहे. पहाटे पहाटे १०.३० वाजता माझे एक जवळचे मित्रवर्य घरी आले. उजवा हाताचा पंजा आणि कोपराची मागची बाजु बँडेजमधे गुंडाळलेली, चेहेर्याची उजवी बाजु थोडीशी घसपटलेली आणि जराश्या "तैमुरलंग" अवस्थेमधे त्याला पाहुन मी खरं तर दचकायला हवं होतं. त्याऐवजी मला भयानक हसायला आलं. नाही नाही तुम्हाला वाटतयं तश्या माझ्या संवेदना वगैरे मेलेल्या नाहीत पण त्याची ही अवस्था व्हायला तो स्वतःचं जबाबदार आहे. त्याचं म्हणजे "आधीचं उल्हास, त्यातुन फाल्गुनमास" असा प्रकार आहे. गाडी गर्दीच्या रस्त्यांवरुन कट मारत चालवणं, दारु वगैरे प्यायल्यावरचं आपल्याला गाडी कशी जास्तं चांगली चालवता येते ह्याच्या फुशारक्या मारणं, रस्त्याकडे लक्ष नं देता रस्त्याकडेनी चाललेल्या प्रेक्षणिय स्थळांकडे बघणं आणि हेल्मेट घालणं म्हणजे नामर्दपणाचं लक्षणं वाटणं इत्यादी अनेक सद्गुणांनी महाशय नटलेले असल्यानी हे सौख्यं त्याला कधी सामावुन घेतयं ह्याचीचं मी वाट पहात होतो. आत्ता अगदी सहा महिन्यांमधली गोष्ट आहे, मी शक्यतो हेल्मेटशिवाय गाडी चालवतं नाही ह्यावरुन चार मित्रांमधे माझी अक्कल काढत होता. आणि तेही भो...असो..तेही त्याच्याएवढेचं सद्गुणी असल्याने त्याची अगदी बाजु घेउन घेउन मला खोटा पाडतं होते. काय करणार? सुरक्षित गाडी चालवणं हा म्हणे मिडलाईफ क्रायसिस आहे असं वरुन ऐकुन झालं. बहुमत हेचं अंतिम सत्य असं दुर्दैवानी आपल्या समाजात मानलं जात असल्यानी नियम पाळणं हा दुर्गुण आहे हे त्यांनी अगदी सहज सिद्ध करुन दाखवलं. असेचं नियमपळवादी सदगुणी लोकं जगात वाढत राहिले तर माझ्यासारख्या दुर्गुणी नियमपाळवादी लोकांना रोजचं ह्या एका लाजिरवाण्या प्रश्णाला सामोरं जायला लागणार. एखाद्या त्रैलोक्यसुंदरीनी के.आर.के. कडे तुच्छपणे बघावं किंवा एखाद्या मर्सिडिझ वाल्यानी स्कुटरवाल्याकडे ज्या तुच्छतेने बघावं अश्या नजरेनी पाहता पाहता "श्शी. तु रहदारीचे नियम पाळतोस? तुझ्यात कै दमचं नै बाबा!!!" वगैरे ऐकायची वेळ लवकरचं येणार असं दिसतय. चुक ह्या नियमपळवादी लोकांची नाहिये. सरकारची आहे. त्या आर.टी.ओ. मधे आणि ड्रायव्हिंग स्कुलमधे सपशेल खोटं शिकवतात त्याला सामान्य जनता काय करणार? एखादं दुसरी चुक असती तर मानलं असतं बॉ, पण सगळेचं नियम चुकीचे बनवलेत म्हणजे हैट झाली. म्हणे लाल सिग्नलला गाडी थांबवा, अंबर दिव्याला सावधपणे जा आणि हिरवा सिग्नल लागला की काळजीपुर्वक जा. लाल सिग्नल लागला की हिरव्या झालेल्या बाजुच्या लोकांना शिव्या हासडत जायची मजा त्या सरकारी बाबाजींना काय कळायची? सिग्नल हे रहदारीचे नियंत्रण करायला लावलेत अशी लोकांची गैरसमजुन करुन देण्यातही ह्याचं नीचं सरकारचा वाटा आहे. ते टपरीआड उभे राहिलेले पोलिस, त्यांना दिवसभर काय विरंगुळा? बघSssSSत बसतात रंग बदलणार्‍या सिग्नलकडे. त्यातुन अधुन मधुन विरंगुळा म्हणुन एखाद्या गाडीवाल्याला पकडायचा, त्याच्या कागदपत्रांचं वाचन करायचं आणि करमणुक साधायची असला निरुपद्रवी विरंगुळा दुसर्‍या कुठल्या क्षेत्रात सापडायचा हो? त्यातुन परत काही मामांना आकड्यांची कोडी घालायची भारी हौस. "पावतीपुस्तकामधे २०० रुपये घालता का १०० रुपयात बिनपावतीचं सोडु" वगैरे सुप्रसिद्ध कोड्यांचे जनक हेच्चं हो. त्यांची काय चुक? शिवाय गाडीची किल्ली लपवुन ठेवणं आणि मग समोरच्याला ठेंगा दाखवणं वगैरे मैदानी खेळ तर अगदी आवडीचे त्यांच्या. टार्गेट पुर्ण करायचा टारगटपणाही अधुनमधुन करावा लागत असल्यानी नियम पाळणार्‍यांनाही अर्थदानाचं पुण्य मिळवुन देण्यामधे ह्यांचा महत्त्वाचा "वाटा" असतो. त्यातुन हल्ली मायबाप सरकारच्या हेल्मेटमधे नवी आयडियेची कल्पना आलीये म्हणे. डो़कं वापरायचं म्हणे हेल्मेट सुरक्षित रहावं म्हणुन. आयला, टिळक पाहिजे होते राव. नक्की सरकारचं हेल्मेट ठाण्यावर आहे का असा अग्रलेख पाडला असता त्यांनी. हेल्मेट ही काय वापरायची गोष्ट आहे का? मस्तं डो़कं उघडं ठेवायचं, दोन-चार पेग कड्डक दारु लावायची आणि विमानाच्या सफाईनी दुसर्‍या गाड्यांना आडवे-उभे कट मारत चालवायची गाडी. एखाद्याला ढगात पाठवायचा. एखाद्या वेळेला आपण पडायचं. म्हणजे हॉस्पिटलमधल्या सुंदर नर्सेस पहाता वगैरे येतात. पण नाSssSSही बंदी म्हणजे बंदी. आपलं सरकार थेट अश्या गंमतीवरचं बंदी आणायला बघतं. सामान्य लोकांना सुखानी जगुन देण्यात सरकारला आनंद वाटत नाही हेचं खरं. सरकारनी खरं तर साहसी क्रिडाप्रकारांना चालना दिली पाहिजे. फुटपाथवरुन गाडी चालवणं, विरुद्ध बाजुनी येणार्‍या गाडीच्या उजवीकडुन गाडी काढणं, एका चाकावर गाडी चालवणं वगैरे प्रकारांना राष्ट्रीय खेळ म्हणुन मान्यता मिळाली पाहिजे. पुण्यातले ऑलिंपिक साहेब ह्यात लक्ष घालतील तर बरं होईल. हॉर्न वाजवण्यावर बरेचं लोकं उगीचं आक्षेप घेतं असतात. रस्त्यावर उतरलेल्या सुस्त जनतेमधे जागृती निर्माण करणार्‍या ह्या अस्त्राला सरकार दाबुन टाकायचा प्रयत्न करतयं. काय फालतुपणा आहे हा? म्हणे शाळांजवळ- हॉस्पिटलजवळ हॉर्न वाजवायचा नाही. अरे आतमधल्या पेशंटचा काही विचार? बिचारे कंटाळतात हॉस्पिटलातल्या चार भिंतीमधे राहुन राहुन. हॉर्नमधुन गाणी वाजवायची, वेगवेगळ्या प्राण्यांचे, रडणार्‍या बाळाचे आवाज काढायचे ही ६५ वी विद्या (का कला रे?? आँ). आयसीयु मधल्या पेशंटला धक्का देउन त्याचं बंद पडायला आलेलं हृदय चालु करायचं परत. ते नाही. डॉक्टरांचा धंदा बुडेल ना अश्यानी. रस्त्यावर नुकतीचं गाडी शिकलेल्या नव्या घाबरट भिडुला तयार करायची जबाबदारीही हे समाजसेवक अगदी निरिच्छ वृत्तीनी स्वीकारतात. त्यांच्या गाड्यांना कट मारुन त्यांच्या अंगात धैर्य निर्माण करणं ही जबाबदारी अजुन कोण समर्थपणे पेलु शकेल? हे झालं दुचाकीवाल्या समाजसेवकांचं. तीनचाकीवाले समाजसेवक तर अगदी देवाघरचे सेवक हो. नो एंट्रिमधुन गाड्या घालणं, रस्त्यावर गाड्यांशी खो-खो खेळणं आणि प्रवाशांना भांडणकला शिकवणं हे ह्यांचे आवडते छंद असतात. त्यातल्या त्यात जर का रसिक रि़क्षावाला असेल तर कलकत्ता ५०५ वगैरे खाउन रस्त्यावर आणि लोकांच्या कपड्यांवर रंगकला करणं असाही छंद ह्या धंद्यामधल्या बर्‍याचं जणांमधे असतो असं निरि़क्षण आहे. पण आमच्या नष्टोळ्या लोकांना कलेला दाद देता येणं हा प्रकार माहिती नाही. केलेल्या कामाला मोजपट्टी लावु नये, त्यानी कामाचं महत्त्वं आणि दर्जा कमी होतो अशी एक समजुन आपल्या समाजात आहे. (म्हणजे एवढं काम केलं तेवढं काम केलं असं म्हणण्यापेक्षा जेवढं जास्तं जमेल तेवढं जास्त काम दर्जेदारपणे करावं अश्या अर्थानी). आमचे प्राधिकरण, पिंपरी-चिंचवडवाले रिक्षावाले ह्या नियमाला अगदी झोपेतही पाळतात. जSSsssSSर्रा काय मीटर टाकतील. असो. सद्गुणी रि़क्षावाले हा एका स्वतंत्र ब्लॉगचा विषय होउ शकेल, त्याविषयी परत कधीतरी सवडीने लिहिनचं. बहुतांश चारचाकीवाले नमोंनी रस्ता आपल्या नावावर करुन दिल्यासारखं वागतात. ओव्हरटेक करणार्‍या गाडीला ओव्हरटेक करुन पुढे जाणं हा ह्यांचा आवडता छंद. ह्या जोडीलाचं हॉर्नवर एक हात आणि अ‍ॅक्सलरेटरवर एक पाय दाबलेला असेल तर दुधात साखरचं ह्यांच्यासाठी. समोरच्या दुचाकीवाल्यानी दचकुन हडबडुन गाडी साईड पट्टीवर उतरवलीचं पाहिजे. बाकी ह्या चारचाकीवाल्यांमधे पण बर्‍याचं पोटजाती आहेत. त्यातली सगळ्यात भारी जमात म्हणजे गुंठामंत्री. बापोपार्जित (होय. कारण वडिलोपार्जित म्हणण्याएवढं सौजन्य ह्यांच्याकडे नसतं) जमिनीला चुना लाउन कॉर्पियो, येंडेवर, फार्चुनर वगैरे गाड्या उडवत फिरणं हा ह्यांचा दिवसभराचा खेळं. ह्या खेळात ते बर्‍याचं रस्त्यावरच्या दुसर्‍या गाड्यांनाही "उधार" मनानी सामील करुन घेतात. ह्यांच्या गाड्यांवर जनरली कुठल्यातरी पक्षाचा वरद हस्त असतो त्यामुळे ह्यांच्या नशिबाच्या घड्याळात शक्यतो बारा वाजत नाहित असं ऐकिवात आहे. असो. मुद्दा हा आहे की नियम पाळण्यासारखा भेकडपणा, मुर्खपणा माझ्यासारखे लोकं कसा करु शकतात? ह्या आमच्या सारख्या नियमपाळ जमातीमुळे देशाच्या प्रगतीला खिळं बसतो म्हणे. ह्याबद्दल आम्हाला मनापासुन खेद वाटतो. ह्या देशविघातक कृत्याबद्दल सा़क्षात ब्रम्हदेवही मला माफ करु शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. माझ्या अनुभवातुन तुम्ही शिका काहितरी. उद्या लाल सिग्नलला हेल्मेट घालुन थांबलात तर तुम्ही माझ्या भेकड जमातीत सामील व्हालं. तुमचं स्वागतं करायला मी तरी तयार आहे. जान है तो जहान है बॉस. Be safe, Drive safe it's hell set free on roads. We don't need casualties. Thank you.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुमच्या मित्राला लौकर बरे वाटो अन तो तुमच्या सारखा नियमपळवादी बनो ही ईश्वरचरणी प्रार्थना. लेखनशैली लैच म्हणजे लैच भारी. यावरून मी आजवर न उघडलेला एक काथ्याकूट आठवला - हेल्मेटसक्ती. एकदा तरी वाचायला हवा.

च्योप्य पस्ते करताना गोंधळ झाला. नियमपाळवादी असेच म्हणायचे होते. स्वसंपादनाची सुविधा सुरू झाली होती त्यामुळे निष्काळजीपणा वाढला.

गाडी चालवत असताना थुंकणे हा तर आरटिऒने रिक्षावाल्यांसाठी नियमच बनवलाय!ते ति कसोशीने पाळतात एवढंच.बाकी नियमपाळवाले अल्पसंख्य असल्याने काही सवलती मिळतात का बघायला हवं!!

गाडीत बसून थुंकणे: कॅब-ड्रायवर्स(चालत्या कारचे दार उघडून रस्त्यावर थुंकणे!! आपली तर उभ्या जन्मात हिंमत नाय होणार!!) , पीएमटी-येस्टीचे प्रवाशी, असंख्य दुचाकीस्वार्स, अगणित पादचारी, इत्यादी

खूप छान लेख.वाहन चालवतानाच जर नियमासहित शिकले तरच ४०/५०/टक्के लोक नियमपाळवादी बनतात.आमच्या उत्तरप्रदेशी शिक्षकाने सिग्नलला थांबायचे असे शिकवलेच,पण पुढे पुस्ती जोडली की,"अगर आगेवाला जायेगा तो आपुन बीजानेका.नाहीतो पाछडवाला ठोकेगा."त्यावर मी आक्षेप घेताच त्यादिवशीची शिकवणी संपल्यावर नवऱ्याला सल्ला दिला की,"मॅडमको गाडी चलाने नही देना."

थेट रस्त्यावर आणून सोडणारा वाचणार्यांना "मार्ग" सापडला तर आणखीच चांगभल. कॅप्टन आमची खारीची भरः
  • पिंपरी चिंचवडभागातील वाहतूक नियंत्रण दिवे हे रहदारी नियमनासाठी नसून "शोभेचे दिवे" आहेत असे बहुसंख्य वाहन चालकांचा ठाम समज आहे (दुचाकी व तीचाकी वाले यात स्वयंभू ज्ञानी आहेत)
  • li>तेव्हा आप्ल्यासारखे नियमपाळवादी जर सिग्नल उभे असाल तर तुमच्याकडे मरतुकडा कुत्रा कटा़क्ष नक्की टा़कला जाईल व त्याची पावती म्हणून रस्त्यावर थूंक्-पिचकारीचा शि़क्काही मिळेल
  • जिवंत असतील ते फूट्पाथ हे वाटसरूंसारख्या क्षुल्लक आणी निरोद्यगी प्राण्यांसाठी वाया घालवू नये म्हणून केवळ नाईलाजाने तेथून दुचाकी हा़कणारे (पाठीमागे घट्ट घोरपडी अस्ल्यास जास्त वेगाने दामटणे)हे वाट्सरूंना सतत जागे+सतर्क राहण्यास भाग पाडतात म्हणून तमाम पादचारी यांनी त्यांचे आभारच मानले पाहिजेत
  • पिंचि भागात ग्रेड सेपरेटर ओलांडण्यासाठी जे आकाश्-पादचारी जिने बांधले आहेत त्याचा प्रेमी युगुलांना फारच मोठा उपयुक्त आणि हक्काची जागा म्हणून फायदा झाला आहे (विशेषतः वल्लभनगर येथील पादचारी पूल). .
  • आणि या प्रेमगुजनात बाधा +थोडाही व्यत्यय येऊ नये म्हणून अबलांपासून तबला* पर्यंतचे लोक अडथळा शर्यतीसारखा रस्ता पार करून एकाच वेळी कबड्डी-खोखो व शिवणा-पाणी या देशी खेळाचा आनंद लुटतात.
  • रिक्षावाले हे समस्त समाजावर उपकार करण्यसाठी या भूतला वर आलेले असल्याने चिरीमीरी साहेबांना ते कधीच दिसत नाहीत अगदी डिस्कव्हरी चॅनेलच्या जादूच्या प्रयोगासारखे
  • * तबला म्हण्जे ज्यांच्या डोक्यावर नाममात्र केस शिल्ल्क उरलेत असे महाभाग
आपल्या नम्र नियमपाळवादी भाजीपाला नाखु

ट्राफिक पोलिसांना तर तेच पाहिजे, कोणी तरी सिगनल तोडावे,आणि यांनी त्याला जाऊन पकडावे.त्याच्या बद्दल आणखी सांगायचे झाल्यास हे नियम त्यांना लागू होत नाही किंवा ते पाळत नाही.

खरच रस्त्यावर सर्व नियम पाळत गाडीचालवणार्‍या सर्वांची मला भयंकर कीव येते. या भेकड लोकांसाठी एक वेगळी लेन बनवली पाहिजे. उगाच सिग्नल लाल झाला म्हणुन अख्खा रस्ता अडवून बसतात. उगाच टाइमपास करतात साले. मी पण मग त्यांना सोडत नाही. त्यांच्या मागे गाडी उभी करुन जोर जोरात हॉर्न वाजवत रहातो. सिग्नल सूटे पर्यंत. नोएन्ट्री मधून जरा गाडी घातली तर यांच्या बापाचे काय जाते कुणास ठाउक. उगाच हातवारे करुन शिव्या द्यायला लागतात. मग मी जोरात त्यांच्या अंगावर गाडी घालतो. निमूट पणे बाजूला होतात. मग ऐटीत त्यांच्या समोरुन निघुन जातो. साला नो एक्न्ट्री आहे म्हणुन लाँगकट मारुन उगाच पेट्रोल जाळायला पेट्रोल काय फुकट येते का? मी तर नेहमी शॉर्टकटनेच जातो आणि वेळ आणि पैसे दोन्ही वाचवतो. तेवढीच आपली राष्ट्रसेवा पण होते. नो पार्कींग चा बोर्ड दिसला की तर माझे डोकेच सटकते. पोलिसांनी पण मुद्दाम माझ्या नेहमीच्या पानाच्या ठेल्या समोर नो पार्कींगचा बोर्ड लावला आहे. रोज मग त्या बोर्डा खालीच मी माझी गाडी उभी करतो. दोन मिनिट गाडी उभी केली तर कोणाला काय प्रॉब्लेम होणार? उगाच गाडी लांब उभी करुन पान घ्यायला उन्हातान्हाचे कोण चालत येणार? त्यापेक्षा जर कोणी गाडी उचलायला लागला तर जागेवर तोडपाणी करायचे. तसापण गाडीचा नंबर आणि माझे पांढरेशुभ्र लिननचे कपडे पाहिले की माझ्या कोणी फारसे नादाला लागत नाही. तुम्हीपण लक्षात ठेवा आपला गाडी नंबर आहे ४१४१. या नियमपाळे लोकांना खरतर शहरातून हकलूनच द्यायला पाहिजे. नितिन गडकरी साहेबांनी स्कीम आणली आहे ना पॉईंटची. ती थोडीशी बदलायची. झीरो पॉईंट वाल्यांना रस्त्यावर गाडी आणूनच द्यायची नाही. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम कायमचा सुटेल. ता.क. :- सलमान सारख्या जंटलमन माणसाला उगाचच त्रास देणारे हे नियमपाळे लोकच आहेत. त्यांचा या प्रसंगी साहेबांच्या आशिर्वादाने कडाडुन निषेध. जय हिंद जय महाराष्ट्र. पैजारबुवा,

P1 माझ्या मोबल्यातुन या "दादा" ला टिपले ! एकला चलो रे :- ही मंडळी त्यांची गाडी- दुचाकी पहिल्या लेन मधुन ४०-५० च्या स्पीड ने चालवणार,बाकीच्या लेन मोकळ्या असल्या तरी त्याची यांना काही पर्वा नसते. डावीकडे-उजवीकडे :- सरळ गाडी चालवणे यांना कधीच जमत नाही, त्यामुळे संपूर्ण रस्ता डाविकडे-उजवीकडे असे करत करत गाडी चालवणे हेच यांचे काम. अचानक वळकर :- कुठल्याही ठिकाणी गाडी अचानक थांबवुन अचानक वळण्याचा निर्णय आयत्या क्षणी घेणारी मंडळी ! शक्यतो उड्डाणपुलाच्या सुरवातीला यांच्या लक्षात येते की या उड्डानपुलावरुन आपल्याला जायचे नाही.रिक्षावाल्यांचा तर अचानक वळणे हा जन्मसिद्ध अधिकार आहे,आणि मागुन येणार्‍याला अश्या अचानक वळण्याने काही फरक पडत नाही अशी यांची दॄढ धारणा असते. हॉर्नमारे :- माझ्या डो़क्यात जाणारी मंडळी ! जगात फक्त आपल्यालाच हॉर्न वाजवता येतो अशी धारणा अशा मंडळींची असते ! नुकताच समोर सिग्नल लागलेला आहे,टायमर काउंटडाउन दाखवत आहे या सर्व गोष्टींशी यांचे काही एक देणे घेणे नसते ! शाळा, हॉस्पिटल इं ठिकाणे आजुबाजुला आहेत हे यांना ठावुक देखील नसते... फक्त हॉर्न वाजवत बसायचे ! ओव्हरटेकर :- तुम्ही यांना ओव्हरटेक केल्यास यांचा कमालिचा अपमान होतो आणि तुम्हाला परत ओव्हरटेक केल्याशिवाय यांना मन:शांती मिळत नाही ! तुम्हाला मागे टाकण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जाउ शकतात... ठाण्यात अचानक झालेल्या कट्ट्यावर सगळ्यांनी या सर्व बाबतीत मला "थंडा" राहण्याचे सांगितले आहे, थोडक्यात...शांत गदाधारी भीम शांत असे स्वतःच स्वतःला बजावायचे ! ;) {रोजच्या प्रवासाला मौत का कुआ समजणारा २चाकी स्वार} मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

ठाणे-विक्रोळी प्रवास २चाकीवर जीव मुठीत घेउनच करावा लागतो. यात सर्वात जास्त त्रास डावीकडे-उजवीकडे, अचानक वळकर आणि ओव्हरटेकर यांचा होतो.

बाब्बो.. ह्या असल्या पाट्या अजूनही चालतात का? आम्ही निमुटपणे त्या 'हाय सिक्युरीटी' ( IND आणि Hologram वाल्या) वापरतो बुवा आमच्या गाडीवर.. आम्ही तसेही थोडे येडचापच आहोत म्हणा..

ह्या असल्या पाट्या अजूनही चालतात का? यात काय संशय ? मध्यंतरी असाच क "तात्या" सुद्धा पाहिला होता ! ;) गाडीला काळी फिल्म लावण्यास मनाई आहे असा काहीसा कोर्टाचा आदेश आहे वाटत, मध्यंतरी पोलिसांनी या विरोधात मोहिम आखली होती...पण अजुनही अश्या गाड्या सर्रास दिसतात. गाडी अंगावर घालण्याचे प्रकार देखील होतात, मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

काळू मामा... मला कोणत्याही एका पक्षा बद्धल ममत्व नाही ! माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही ! ज्या ज्या गोष्टींबद्धल मला मत व्यक्त करावेसे वाटते, ते तसेच मी व्यक्त करतो... मग फूड पार्कच्या नावाने गळा काढणारे रागा असोत अथवा आपले सध्याचे पंतप्रधान ! तेव्हा पुन्हा प्रतिसाद देताना हे लक्षात असु ध्या. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

मदमस्त हिरवट आजोबा, तुम्ही सांगितलं तरी ते तसंच असेल असं नाही ना? तुम्ही भले तसा डिस्क्लेमर टाकून खोट्या गोष्टी पसरवत रहाल. म्हणून प्रतिसाद देताना आम्ही मूळ पोस्ट आणि पोस्ट टाकणार्‍याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट, दोन्ही पाहून रिप्लाय देतो. काळजी नसावी.

मदमस्त हिरवट आजोबा, हिरवट ? हॅहॅहॅ... व्हॉट इज धीस काळू ? असो... डोक्यावर पडलं की वेगवेगळे रंग दिसायला लागत असतील ! तुम्हाला रागाने सल्लागार पदावरुन इतक्यात काढले की काय ? ;) तुम्ही सांगितलं तरी ते तसंच असेल असं नाही ना? तुम्ही भले तसा डिस्क्लेमर टाकून खोट्या गोष्टी पसरवत रहाल. म्हणून प्रतिसाद देताना आम्ही मूळ पोस्ट आणि पोस्ट टाकणार्‍याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट, दोन्ही पाहून रिप्लाय देतो. काळजी नसावी. डोक्यावर पडलेल्यांनी आधी स्वत:ची काळजी घ्यावी ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कोमात कोण?

वाचतेय रे कॅप्टना. विकासाच्या नावाखाली झालेले शहरीकरण ह्याला कारणीभूत आहे असे ह्यांचे मत.३० वर्षापूर्वी तुझ्या त्या कोथरूडमध्ये वर्दळ अतिशय कमी असायची.उडुपी हॉटेल्स १ किंवा दोन्,लोकसंख्या कमी व प्रत्येक घरात साधारण्पणे एक लुना किंवा बजाज.ह्यामुळे गाडी(पुण्यात दुचाकीही गाडीच हो!) कोठेही पार्क करता यायची.आता लोकसंख्या वाढली,गाड्यांची संख्या वाढली,इमारतींची संख्या तिप्पट्,चौपट झाली.. भल्या मोठ्ठ्या शॉपिंग मॉलच्या आजूबाजुला 'नो पार्किंग' लिहिलेले असते.म्हणजे शॉपिंग मॉलला राहत्या वस्तीत पर्वानगी दिलीत व्यवहार करायची..,कपडे विकायची,चित्रपट दाखवायची पण येणार्यानी पार्किंग मात्र करायचे नाही...चालत या,रि़क्षाने या किंवा गाडी खूप लांब पार्क करून चालत या किंवा शॉपिंग मॉलला ३०/४० रुपये द्या.

पहिले आम्हीसुद्धा नियमपाळवादी होतो, पण, क्या करे … जमाना बडा जालीम था… मग जमान्यासारखे झालो…. नंतर भारताबाहेर ड्रायविंग करताना, त्या अनियमपाळवादीपणाच्या सवाईचा खूपच मनस्ताप व्हायला लागला होता… दोन कारमधे ४-५ मीटर अंतर काय… अन यील्ड स्टोप साइन पाशी चक्क मौसम तोडून गाडी थांबवायची काय …. सगळेच अतर्क्य…

व्हेन इन पुणे डू व्हाट पुणेकर्स डू
ही निव्वळ पळवाट आहे. नियम पाळण्यातला कमीपणा टाळण्याचा हा एक चलाखीने काढलेला मार्ग आहे. do what punekars do! it does not justify what punekars do, in any way.

धाग्यामागाचा तुमच्या चांगल्या हेतूला पाठींबा पण …. नियम पाळण्यातला कमीपणा नाही वाटत … रेफ :
पहिले आम्हीसुद्धा नियमपाळवादी होतो
पण होणार भयंकर मनस्ताप टाळण्यासाठी … रेफ :
जमाना बडा जालीम था… मग जमान्यासारखे झालो नंतर
टू गेट आक्प्सेटेड बाय सरौन्डींग फॉना …

लेखातील कळकळ पोचली. कॅप्टन असे विषयही हाताळतात ठाऊक नव्हतं. ते; पाळवादीच रहा बरं का. पळवादींची गत जी व्हायची ती होतेच त्यांच्या दुर्दैवाने. आज ना उद्या. We belong to the same club.

यात थोडी आणखी भर हॉर्नसुध्धा न देता डावीकडून ओव्हरटेक करणारे कारवाले डावीकडून ओव्हरटेक करून मग उजवीकडे जाणारे कारवाले हॉर्नसुध्धा न देता उजवीकडून ओव्हरटेक करणारे कारवाले उजवीकडून ओव्हरटेक करून मग डावीकडे जाणारे कारवाले कोणताही रिक्षावाला $*&#$%$#@

कसं आहे; आयुष्याचं बघा. मिळेल त्या लेन मधे माणसाला अ‍ॅडजस्ट व्हावंच लागतं. संधी मिळेल तिथे कमी अधिक वाव असतानाही पुढे जावंच लागतं. नाहीतर आयुष्यात मोठं होता येत नाही; प्रगती साधता येत नाही. रस्त्यावरही अडमुठेपणा कामी येत नाही. मी राईट लेन मधूनच जाणार; तिथेच जागा दिली पाहिजे असा हेकेखोर पणा आपण करतो आपण मूर्ख. ही लोकं बघा; किती अ‍ॅडजस्ट करणारी आहेत, जुळवून घेणारी आहेत. मिळेल त्या लेन मधे जातात मिळेल तितक्या जागेत सुखेनैव गाडी हाकतात. यांच्याकडून शिकायला हवं ! LOL

सगळ्यात चीड आणणारे म्हणजे सिग्नल न देता वळणारे. वाहन बनवणार्‍यांनी सुवीधा दीलेली आहे ना? मग वापराना. पण हे वापराणार नाहीत, आपले वळण आले की लगेच वळवुन मोकळे.बर आपण हॉर्न वाजवुन निषेध व्यक्त केला की आपल्याच कडे रागाने बघणार

त्याही पेक्षा विनोदी महाभाग असतात. उजवीकडाचा सिग्नल देऊन झोकात डावीकडी वळणारे. आणि मागून हॉर्न वाजलाच तर "येडा आहे कां रे तू?" असे बघतात.

काय हे कलियुग!! मित्राच्या जीवाला जीव देण्याऐवजी, उलट त्याच्यावर लेख पाडुन राह्यला तुम्ही? मित्रांनी कुणाच्या तोंडाकडे पहावे अश्यावेळी?

मस्त लिखाण, विनोदी पद्धतीने खराब व्यवस्थेचे अतिशय परखड विश्लेषण.खरच पूर्ण व्यवस्था खराब झाली आहे, आता पहाना महेश झगडे साहेबांना सुद्धा उचलले. कधी कधी वाटते बेशिस्त आणि लबाडी आपल्या रक्तात आहे. खरच कधी कधी खूप कंटाळा येतो, जाऊदे

सिग्नलवर ३०-४० सेकंद थांबण्याचा धीर नसणारे लिफ्टला लागणारा तेवढाच वेळ सहन होत नसल्यास ज्या मजल्यावर असतात तिथून डायरेक्ट खाली उडी मारतात का? त्यांना असे करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे.

लै कळकळीनं लिहिलं आहे. मी सर्व नियम पाळतो. सर्व नियम पाळून ही मज्जा करता येते. १. सिग्नलवर थांबून सिग्नल हिरवा झाला रे झाला की गाडी सुसाट सोडून बाकिच्या सर्व गाड्यांना सोडण्यात जी मजा येते त्याला खरच तोड नाही. मनून सिग्नल पाळलाच पाहिजे. २. हेल्मेट ही दुधारी तलवार आहे. आपले रक्षण तर करतेच प्रसंगी दुसर्याच्या डो़क्यात घालून त्याच्या डोक्यावर टेंगू आणण्यास लै उपयुक्त. मनून हेलमेट जरून वापरा. 3. कट मारणे बेकायदेशीर आहे असे वाचनात नाही. त्यामुळे त्यावर वाद टाळण्यात येत आहे.

कट मारणे हे तांत्रिकदृष्ट्या बेकायदेशिर नसेल पण ते प्रसंगी बेजबाबदार असू शकते. बरेचदा कौशल्यवान कट मारणारा तर सटकून जातो पण सरळपणे गाडी चालवणारा अपघातग्रस्त होतो. मागे सिंहगड रस्त्यावर रस्त्याच्या कोपर्‍यातून एक आजोबा आपल्या नातवासोबत अ‍ॅक्टिव्हाने शिस्तीत चालले होते. मागून एक पल्सरवाला वेगात आला अगदी कमी जागेत अन कट मारून अचानक पुढे निघून गेला. त्याचा हलकाच धक्का आजोबांच्या गाडीला लागला अन ते डाव्याबाजूला पडले. नातू व आजोबा दोघेही चांगले जखमी (गंभीर नसले तरी) झाले. पल्सरच्या आगमनानंतर दुचाकीस्वारांची याप्रकारची बेशिस्त खूपच वाढली असे माझे निरिक्षण पुन्हा एकदा मिपावर मांडतो.

असाच एक माझा अनुभव, एका यामाहा चालवणार्या आजोबांनी कट मारून मला पाडले होते आणि नंतर स्वतःच थरथर कापत उभे होते. पडलो मी होतो पण त्यांची अवस्था पाहून मीच त्यांना आजोबा ठिक आहात ना म्हणून धीर द्यायची वेळ आली होती. दुसर्याला धक्का न मारता कट मारणे हे स्किल तसं अवघड आहे. पण बेंगलोरात हे स्किल न वापवरल्यास प्रवास वेळ दिड पटीन वाढू शकतो. एकंदर मोठ्या शहरांंमध्ये दुचाकी चालवणं फार अवघड काम होऊन बसलं आहे. ट्राफीक मध्ये अडकून धुर, धुरळा, ऊन ह्याचा सर्वात जास्त त्रास दुचाकीवाल्यांना होतो. मग संयम सुटणे हे साहजिक आहे. त्यांमुळे बेजबाबदार गाडी चालवण्याचं प्रमाण वाढलं आहे. दुचाकीवाल्यांच्या कुठल्याही बेजबाबदार वर्तनाचं समर्थन मला करायचं नाही, पण त्यांना कायदे तोडण्यासाठी प्रोत्साहन कसे मिळते ह्याचा विचार व्हायला हवे असे माझे मत आहे.

शनिवारवाड्याशेजारून शिवाजी रस्त्याने ट्रॅफिक असल्यामुळे मी युनिकॉर्नवरून २० ~ २५ वगैरेच्या स्पीडने चाललो होतो (अर्थात सरळच). एक मध्यमवयीन गृहस्थ हिरो होंडा सिडी १०० वर (मागिल सीटवर मध्यमवयीन महिला) उजव्या बाजुने माझ्या कदाचित दुप्पट वेगात आले. मला कट मारून लगेच शनिवारवाड्याच्या मागच्या गल्लीत उजवीकडे वळाले. आयुष्यात प्रथमच मी दुचाकी गाडी चालवताना पडलो. गुडघा पुढचे तीन चार दिवस दुखला. नशिब ट्रॅफिक बरेच असल्याने मागून येणारे हळू येत होते. त्यांना ब्रेक मारून थांबायला संधी मिळाली. आजवर दुचाकी चालवताना मला झालेला एकमेव अपघात आहे हा. माझ्यामुळे इतरांचा अपघात झाल्याचेही कधी घडले नाही.

हेल्मेट चालवून गाडी चालवतोस त्यामुळे तुझं आजूबाजूला लक्ष ठेवणं कठीण जातं असं इथल्याच एका महान विभूतिंनी मला सांगितलं होतं. पंधरा दिवस त्या हेल्मेटशिवाय गाडी चालव, बघ कसा कॉन्फिडन्स येतो. ही आणिक भर होती त्यात. आता अगदी वार्‍याशी पैज लावणारी नसली तरी पोटापुरती बाईक चालवता येते आणि हेल्मेट वापरल्यामुळे त्यात शष्प काही फरक पडला नाही.

'तुम्ही परदेशातले डरपोक लोक, खरं म्हणजे तिथल्या दंडाला घाबरुन नियम पाळता... ईकडे बघा आम्ही शुरवीर शष्प घाबरत नाही...' असं मलाही ईथल्याच महान विभूतींनी सांगीतलं होतं..

कणकवलीच्या बाजारात माझ्या नवर्‍याने वॅगन आर अगदी स्लो ठेवली होती. समोरून येणारे आडवे तिडवे ट्रॅफिक आपल्याला धडकू नये म्हणून डाव्या बाजूची लाईन पकडून गाडी हळू पुढे सरकत असताना अचानक डाव्या बाजूच्या मातीतून एकजण मोटारसायकल वरून आमच्या गाडीला ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत होता. बहुधा मातीत तो घसरला आणि आमच्या गाडीला हँडलने २/३ ओरखडे काढून गाडीच्यापुढे रस्त्यावर येऊन थांबला आणि अरेरावी सुरू केली. मोठी गाडी घेऊन फिरता म्हणजे स्वतःला कोण समजता? गाडी अशी आणून मारायची ही काय पद्धत झाली? हे वाक्य ऐकून मला खरं तर मरणाचं हसू यायला लागलं. आता काय ट्रक आणून मारू का म्हणून विचारणार होते. तेवढ्यात अजून दोन बघे येऊन उभे राहिले. तेव्हा आपण नारबाच्या वाडीत आहोत हे लक्षात घेऊन नवर्‍याने त्याला नमस्कार घातला. माझं साफ चुकलं. तुम्हाला लागलं नाही ना, आता जाऊ का म्हणून आम्ही पुढे निघालो. मी म्हटले की तू चूक नसताना कशाला कबूल केलेस? आपली गाडी बरोबर असायला पाहिजे तिथे होती. हा दीडशहाणा डाव्या बाजूने ओव्हरटेक करून दमदाटी करतो म्हणजे काय? पोलिसाला बोलाव म्हणून सांगायला हवं होतं. नवरा म्हणाला, एकतर आपण सिंधुदुर्गात आहोत. गोव्यात नव्हे. इथे कायद्याचं राज्य नाही. आणि स्थानिक पब्लिक चूक कोणाची पद्धत वगैरे न बघता गाडीवाल्यांना मारायला सुरुवात करतात. हे ऐकून माझी बोलती बंद.

हेचं हो. हे असले नियम पाळणारे सुटुन जातात. कालचं एच.ए. आणि पिंपरी चौकाच्या दरम्यान एका फॉर्च्युनरचा अ‍ॅक्सीडेंट पाहिला (होताना नव्हे होउन गेल्यावर). फॉर्च्युनर सारख्या रणगाड्याची झालेली दुरावस्था बघुन तो किती वेगात असावा ह्याची फक्त कल्पना करु शकतो.