Welcome to misalpav.com
लेखक: चलत मुसाफिर | प्रसिद्ध:
मनुष्यास्वभावाला औषध नाही हे सर्वविदीत आहे. जगाकडे पहाण्याचा दॄष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असतो. तसेच आयुष्याकडून कुणाला काय अपेक्षा असतील हे सांगणे कठीण आहे. कोणत्याही दोन व्यक्ती घ्या, वर नमूद केलेल्या बाबतीत फरक हा आढळणारच. कुणाच्या खांद्यावर काय ओझे असेल याचा अंदाज येत नाही. वरवर सामान्य वाटणारे हे स्वभावविशेष किती टोकाचा परिणाम घडवून आणू शकतात, हे दाखवून देणारा हा एक माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला अप्रिय प्रसंग आहे. जे झाले ते आनंददायक मुळीच नव्हते. तो कटु प्रकार संपूर्णपणे टाळता येण्याजोगा होता. जवळची माणसे त्यात गुंतली असल्यामुळे जास्त वेदना झाल्या. पण या सार्‍यापलिकडे जाऊन मानवी तर्कशक्तीची अपरिहार्य अपूर्णता त्यातून प्रतीत झाली. असो. अधिक पाणी न वाढवता मुद्द्याकडे येतो. *** मी उदरनिर्वाहार्थ उत्तर भारताचा निवासी आहे. पत्नी व षड्वर्षीय कन्या दक्षिणेत असतात. (ही दक्षिण महाराष्ट्राची दक्षिण नव्हे याची नोंद घावी. याइथून सत्तर टक्के भारत हा दक्षिण दिशेलाच पडतो!) उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त त्या दोघी महिन्याभराकरिता इथे आलेल्या होत्या. याचवेळी योग साधून मी श्वशुरदंपती, जवळचा नातलग 'अ', त्याची पत्नी, आणि मुलगा (माझ्या मुलीच्याच वयाचा) या सर्वानाही एका आठवड्यासाठी निमंत्रित केले. सोबत पत्नीची मावशीही होती. लोहमार्गाचा अत्यंत लांबचा (२४ तास) प्रवास करून हे सर्व सहाजण येऊन पोचले. फक्त दोन सोडून इतर सर्व तिकिटे प्रतीक्षायादीत राहिल्यामुळे प्रवास तसा गैरसोयीचा झाला. अर्थात घरून निघताना या गोष्टीची कल्पना आलेली होतीच. त्यामुळे 'निघावे की नको?' असा विचार प्रवासीगणाच्या मनात बळ धरू लागला होता. संबंधितांची वये आणि पराकोटीचे उष्ण हवामान या बाबी ध्यानात घेता मीही त्याच मताचा झालो होतो. पण केवळ 'सर्वानी आलेच पाहिजे' असा कट्टर आग्रह 'अ' याने धरल्यामुळे कां-कूं करत का होईना, सारे तयार झाले. (नंतर गप्पा मारताना, 'अ'चे हे श्रेय आम्ही उघडपणे मान्य केले). पोचल्यानंतर एक दिवस सर्वांनाच पूर्ण विश्रांती घ्यावी लागली. पण सगळे धडधाकट आहेत हे पाहून हायसे वाटले. 'अ' हा माझा समवयस्क असून बहुराष्ट्रीय कंपनीत वरच्या हुद्द्यावर आहे. (त्याची पत्नीही नोकरी करते). वर्षाकाठी एक-दोन दिवस आमच्या गाठीभेटी - बहुतकरून मुंबईत - होत असतात. या प्रसंगी उत्तररात्रीपर्यंत मद्यपान करणे आणि दिशाहीन गप्पा हाकणे हा एकमेव मध्यवर्ती कार्यक्रम असे. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर आमची परस्परांशी अत्यंत जवळीक असल्याचा एक आभास निर्माण झालेला होता. *** पुढे लिहिण्याआधी एका गोष्टीची कबुली देऊ इच्छितो. मी स्वभावाने मितभाषी आणि आत्मकेंद्रित आहे. दहाजणांच्या टोळक्यात बसून अहोरात्र हाहाहूहू दंगा करणे किंवा कुरापती काढणे याचा मला मनस्वी कंटाळा आहे. मी अशा घोळक्यात बसू शकतो, बसतोही. पण माझी भूमिका अधिककरून श्रोत्याची असते. (सध्या मी पक्षितीर्थाचाही परित्याग केलेला आहे ही झाली वेगळी गोष्ट!). मुद्दाम निवेदिण्यासारखे असे माझ्या जर मनात काही नसेल, तर मी बहुतांशी मौनच रहातो. जे मला ओळखतात, त्यांना याचे काही विशेष वाटत नाही. पण याविपरीत वॄती असलेले लोक 'याचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय' असा विनाकारण ग्रह करून घेतात. 'अ' हा या वर्गात मोडेल असा होता. तसेच पत्नीशीही माझी नियमितपणे (आणि त्याच त्याच, नेहमीच्या यशस्वी मुद्द्यांवरून!!) खडाष्टके होत असतात. त्रयस्थांसमोर माझ्यापरीने मी वाद टाळण्याचा प्रयत्न करतो. पण प्रसंगी प्रत्युत्तर देण्याचा मोह अनावर होतो. हे घरोघरी होत असावे असा माझा अंदाज आहे. अर्थात ही माझी भूमिका आहे. इतर कुणाच्या नजरेतून मी खलनायक दिसत नसेन असे नाही. सर्वाच्या साक्षीने पत्नीशी हुज्जत घालण्याचे काही प्रसंग या चार-पाच दिवसात आले आणि गेले. *** मोजके दिवस हातात असल्यामुळे आसपासची प्रेक्षणीय स्थळे शक्य तितकी पाहून घ्यावीत असे ठरले. त्याप्रमाणे एक दिवस काढून आम्ही सर्वांनी गाडीरस्त्याने जाता येईल अशा जागा पाहिल्या. 'अ' आणि त्याची पत्नी यांना श्री वैष्णोमाता भवन (कटरा) पाहण्याची इच्छा होती. कामानिमित्त केलेल्या दिल्लीच्या हवाई वार्‍या वगळता उत्तरेत इतरत्र भ्रमण करण्याची त्या दोघांची ही पहिलीच वेळ होती. सर्वप्रथम हेलिकॉप्टरचा तपास करण्यात आला. त्याची तिकिटे उपलब्ध नव्हती. हे कळताच पत्नीचे आईवडील आणि मावशी यांनी अंग काढून घेतले. त्यानंतर लहान मुलांनाही न्यायचे नाही असे मत पडले आणि अखेर आम्ही चारजण उरलो. 'अ'चा उत्साह इतर बाबतींप्रमाणे इथेही उतू चालला होता. मी वैष्णोदेवी यात्रा ही अनेकवेळा केलेली असल्यामुळे मला शारीरिकदॄष्ट्या त्यात किती परिश्रम आहेत याची पूर्ण कल्पना होती. 'अ' आणि त्याची पत्नी हे सदरचा प्रवास (सुमारे २५ किमी / १६ मैल) पायी करू शकतील का, याबद्दल मी साशंक होतो. पण त्याचबरोबर, केवळ इच्छाशक्ती आणि श्रद्धेच्या जोरावर वॄद्ध, अपंग लोकही ही यात्रा करतात हे समजवण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रखर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ही यात्रा रात्री करणे अपरिहार्य होते. मला रजा नव्हती. पण 'अ'चा उत्साह पाहून मीही निघायचे ठरवले. सर्वात जास्त खडतर प्रवास हा माझाच होणार होता. कारण मला आदल्यादिवशी अर्धा दिवस ऑफिस करून निघायचे होते, रात्रभर भवनपर्यंत चढून, दर्शन घेऊन, खाली उतरायचे होते आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा ऑफिसात हजर रहायचे होते. शिवाय स्वनिर्मित दंडकानुसार मी दर्शन होईपर्यंत पाणी सोडून इतर काहीही सेवन करणार नव्हतो. *** योजनेप्रमाणे आम्ही सर्वजण भाड्याच्या गाडीने निघालो आणि सायंकाळी सुमारे साडेसात वाजता कटरा येथे पोहचलो. चौघांच्या प्रवेशिका तयार करून घेतल्या आणि लगेच पायी चालायला प्रारंभ केला. सुरुवातीचे साडेचार किमी ही संपूर्ण चढण आहे. 'अ' ची पत्नी ही पहिल्या मैलभरातच पार थकून गेल्यासारखी दिसू लागली. त्यामुळे तिला प्रोत्साहित करून चालत ठेवणे हा एकसूत्री कार्यक्रम चालू झाला. (माझ्या पत्नीला शारीरिक व्यायामाची थोडीफार सवय असल्यामुळे ती इतक्या लवकर दमणार नव्हती). उन्हाळी सुटीचे दिवस असल्यामुळे मार्गावर भाविकांची तोबा गर्दी होती. ओझीवाहू खेचरांची ये-जा निरंतर चालू असल्यामुळे मार्गावर खेचाखेचीही होत होती. मार्गावर जागोजाग पडलेले खेचरांचे शेण व त्या प्राण्याच्या अंगाचा एक नैसर्गिक उग्र वास यामुळे वातावरण अर्थात जरा जडच होते. 'अ'ला याचा बराच वैताग आला आणि त्याने तो लगेच व्यक्त केला. सोबत खेचराच्या शेणातील कार्बन डायॉक्साईड हा कसा घातक असतो हेही मला सांगितले. असे करत आम्ही साधारणपणे तीन किमी चढून आलो. अद्याप 'अ' दमल्यासारखा दिसत नव्हता. वाटचाल करताना त्याचे खाणेपिणेही सुरळीत चालू होते. त्याने 'बघा, मी अजिबात व्यायाम करत नसूनही किती फिट आहे' अशा धर्तीचे विधानही केले. मी तिकडे दुर्लक्ष करत 'सगळे तुझ्यासारखे लकी नसतात' इ. घॄतलेपन करत पावले उचलणे पसंत केले. अधकुवारीच्या जरा अलिकडे भवनला जाणारा नवा रस्ता (हिमकोटी मार्गे, भवन सुमारे ८ किमी) फुटतो. या रस्त्याने गेल्यास सांझी छतची संपूर्ण चढाई वाचते आणि तुलनेने सपाट अशा रस्त्यावर चालता येते. (अंतरात मात्र फार फरक पडत नाही. कारण हा रस्ता संपूर्ण पर्वताला वळसा मारत, मधल्या घळी ओलांडत जातो). या रस्त्याला भवन कमिटीने मैलाचे दगड लावलेले आहेत. हे दगड पादचार्‍यांसाठी असल्यामुळे प्रत्येकी २५० मीटरवर लावण्यात आले आहेत. दगड लावताना अर्थात काही चुकाही झालेल्या आहेत, ज्या मोठ्या महामार्गांवरही होत असतात. उदा. 'नाशिक ४० किमी' या फलकानंतर थोडे पुढे जाताच 'नाशिक ४२ किमी' असा फलक दिसणे. याचे कारण म्हणजे हे फलक वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लावले गेलेले असतात. माफक विनोदनिर्मितीची साधने यापलिकडे आपण या फलकांना जास्त महत्व देत नाही. मात्र 'अ'ने या चुकीच्या आकड्यांची प्रमाणाबाहेर नोंद घ्यायला सुरुवात केली. भवन कमिटीचा उद्धार सुरू केला. 'काय वाटेल ते लिहिलंय. साधं अंतर मोजता येत नाही या गाढवांना! पेंटरच्या मनात येईल ते लिहिलंय लेकानं. केवढं उत्पन्न आहे, सोयी मात्र काडीच्या नाहीत' इ. इ. चा पट्टा सोडला. लांब अंतरे चालण्याची सवय नसल्यामुळे आणि ते उघडपणे मान्य करण्याची तयारी नसल्यामुळे हे होत आहे असा मला दाट संशय आला. पण तसे बोलणे प्रशस्त दिसले नसते. शिवाय नवख्या व्यक्तीला ही यात्रा कठीण वाटणार हेही जाणून होतो. त्यामुळे या मुद्द्याला बगल देत 'अरे, आपल्याकडे दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे मैलाच्या दगडांवर विश्वास ठेवणे. दुसरं म्हणजे टेप घेऊन स्वत: मोजत जाणे' वगैरे विनोद करण्याचा प्रयत्न केला. आमचा वेग एकूणच मंदावलेला असल्यामुळे आम्ही साडेपाच तासांच्या मार्गक्रमणानंतर भवनला साधारणतः मध्यरात्री (साडेबाराच्या सुमाराला) पोचलो. सुदैवाने खुद्द भवनपाशी गर्दी अपेक्षेपेक्षा कमी होती. यात्रेकरूंना थोड्याथोड्या वेळाने समूहात सोडले जात होते. आम्हीही रांगेत उभे राहिलो आणि आत जाणार, इतक्यात तिथे तैनात पोलिसाने 'प्रवेशिकेवर आधी शिक्का मारून आणा' असे सांगितले. शिक्का मारण्यासाठीची खिडकी अर्धा किमी मागे राहिली होती. गर्दी नसेल, तर या शिक्क्याचा इतका आग्रह धरला जात नाही. यापूर्वी मी कधी शालेय सुटीच्या (पर्यायाने गर्दीच्या) काळात भवनला आलेलो नव्हतो. पण एका अर्थाने चूक आमचीच होती. मी जास्त लावून न धरता आमच्या श्रमविदीर्ण यात्रीगणांस एका जागी बसायला सांगितले आणि शिक्के प्राप्त करण्यासाठी परत मागे गेलो. जाता जाता कानावर आलेले 'अरे त्या पोलिसाला काय कळतंय? जरा दम भरू त्याला म्हणजे सोडेल आत' वगैरे (मराठी!) शेरे ऐकून न ऐकल्यासारखे केले. *** आमचा भवनात प्रवेश झाला. मी माझ्या पद्धतीनुसार ऐहलौकिक विचार शक्य तेवढे मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत हात जोडून गुफेच्या दिशेने निघालो. गुफा ही तशी लहान आहे. एका वेळी फारतर चार-पाच लोकांनाच दर्शन घेता येते. गर्दीच्या मोसमात पुजारी आणि सुरक्षारक्षक हे भक्तगणांच्या गर्दीला लवकर लवकर पुढे सरकवत असतात. आजही असेच असणर अशी खूणगाठ मी बांधलेली होती. शक्य तितक्या भक्तिभावाने पण त्वरित दर्शन घेत मी आणि पत्नी पुढे झालो. 'अ' आमच्या मागे होता. त्याने बाहेर नारळाची थाळी वगैरे घेतलेली होती आणि निवांतपणे दर्शन घेण्याचा त्याचा उद्देश होता. पण पुजारीसाहेबांनी त्याची प्रसादाची पिशवी, नारळाचे टोकन इ. लगबगीने देवीला दाखवत त्याच्या पत्नीला परत दिले, आणि त्यालाही साधारण मिनिटभरात पुढे सरकवले. मीही थोडासा पुढे झालो होतोच. योगयोगाने मला दिसले की आमच्यामागे कुणीच नव्हते. पुढचा जथा अजून यायचा होता. मी परत वळून 'अ'ला म्हटले 'मागे कुणी नाही. परत दर्शन घ्यायचं असेल तर घे.' परंतु 'अ'चा संयम सुटलेला दिसत होता. भवन कमिटीची आता खैर नव्हती. एक मामुली पुजारी आणि पोलीस शिपाई आपल्याला घाई करायला सांगतात हे पाहून त्याच्या संतापाचा कढ उतू जाण्याच्या बेतात होता. भवनमधून बाहेर येता येता त्याने पुन्हा स्वतःशी पुटपुटत विश्वस्तमंडळाचा उद्धार सुरू केला. बाहेर नारळ परत घेण्याची खिडकी आहे. 'अ'ने आपले टोकन पुढे केले. खिडकीतल्या कर्मचार्‍याने त्याला एक नारळ दिला. दुर्दैवाने तो नारळ आकाराने छोटा होता. तो पाहताच 'अ'चा उद्रेक झाला आणि त्याने त्या माणसाशी भांडण सुरू केले. मी थोडा दूर उभा असल्यामुळे नक्की काय शब्द वापरले गेले, याचा अंदाज आला नाही. खिडकीतल्या माणसाने शांतपणे तो नारळ परत घेतला आणि 'अ' ला एक त्याहून छोटा नारळ दिला! *** क्रोधाने थरथर कापत 'अ'ने तो भिरकावून दिला आणि ताड्ताड चालायला सुरुवात केली. मी अवाक झालो होतो, पण भानावर येऊन झपझप पावले उचलत त्याला गाठले. इथे प्रसंगाला कलाटणी मिळाली. (कदाचित ती मिळणारच होती आणि मला त्याची कल्पना नव्हती). 'अ'ची वैष्णोमाता भवनला येऊन संपूर्ण निराशा झालेली दिसत होती. त्याला ठायी ठायी केवळ भक्तीचा बाजार दिसू लागला होता. भवनचा प्रत्येक कर्मचारी हा त्याला पैसे उकळायला बसलेला लोभी व्यापारी वाटत होता. 'साल्यांना भरचौकात शूट केलं पाहिजे' पर्यंत तो येऊन पोचला. ही मुक्ताफळे ऐकताच मी जरासा त्रासल्यासारखा झालो. याची कारणे खालीलप्रमाणे: १. वीसएक वर्षांपासून भवनला नियमित भेटी देत असल्यामुळे तेथे घडून आलेल्या सुधारणा मी पहात आलो होतो. अजून काय सुधारणा आवश्यक आहेत हेही जाणून होतो. २. दोनपाच वर्षांतून कधीतरी एकदा भवनला येणे आणि फुटकळ गोष्टींवर राग काढून मंदिर कमिटीचे मुडदे पाडण्याची भाषा करणे हे मला संमत नव्हते. ३. मैलाच्या दगडापासून प्रत्येक गोष्टीवर तोंडसुख घेत असलेल्या 'अ'ला मुळात येथील देवतेवर विश्वास नसावा अशी माझी धारणा होऊ लागलेली होती. हातचे काही राखून न ठेवता मी हे सर्व मुद्दे सभ्य भाषेत 'अ'समोर मांडले. बोलण्यातल्या आवेशामुळे (आणि अर्थात उतार असल्यामुळे!) आमचा चालण्याचा वेग वाढला आणि आमची कुटुंबे बरीच मागे राहिली. 'अ'च्या पत्नीला या 'चर्चे'चा त्रास होत होता हे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे कदाचित ती मुद्दामहूनही मागे राहिली असेल. एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. मी या सर्व प्रकाराकडे 'मंदिर कमिटीच्या कार्यपद्धतीबद्दल चाललेला निखळ वाद' याच दॄष्टीने पहात मुद्द्यावर मुद्दे सर करण्याचा प्रयत्न करीत होतो. आमच्यातील मांस-मद्याधारित आभासी जवळिकीमुळे हा हक्क आपल्याला आहेच असे मी गृहीत धरले होते. पण 'अ' हा माझी आक्रमक विधाने अगदी वैयक्तिक पातळीवर लावून घेत होता याची मला सुतराम कल्पना आलेली नव्हती. कदाचित या अज्ञानामुळे असेल, पण मी 'अ' च्या विरोधात अजून एक मुद्दा मांडला, ज्याने पुढचा सर्व भडका उडवून दिला (असावा). एव्हाना भवनचे विश्वस्तमंडळ वगैरे मुद्दे मागे पडले होते. आस्था, कर्मकांडे, समाज, राजकारण असे टप्पे ओलांडत आम्ही 'राजकारण्यांचा भ्रष्टाचार' या हुकुमाच्या एक्क्यावर येऊन पोचलो होतो. कदाचित मी इथे माघार घेऊन त्याचे म्हणणे सपशेल मान्य केले असते, तर पुढचा प्रकार टळला असता. पण इथे मी केलेला वार बहुधा त्याच्या वर्मी लागला (अशी आपली माझी समजूत झाली आहे. खरेखोटे देव जाणे). 'अ'ने सगळे कसे भ्रष्ट आहेत वगैरे आम-आदमीछाप व्याख्यान सुरू केल्यावर मला राहवले नाही. त्याने दोन दिवसापूर्वी मोठ्या फुशारकीने सांगितलेल्या कथेची मी जरा टेचातच त्याला आठवण करून दिली. झाले काय, की, येताना तिकिटे प्रतीक्षायादीत राहून गेल्यामुळे सर्वांना गाडीत शयनासने मिळाली नव्हती. केवळ दोन शयनासनांवर बसून सहाजणांनी २४ तासाचा प्रवास करणे हे दिव्यच होते. त्यामुळे 'अ'ने तिकीट निरीक्षकाशी संधान साधून, त्याला बक्षीस देऊन अतिरिक्त शयनासने मिळवली होती. पोचल्यावर त्याने मोठ्या आनंदाने हा प्रकार मला सांगितला होता. आपण असे वागलो तर आपल्याला भ्रष्टाचारावर ताशेरे ओढण्याचा अधिकार रहात नाही, हे माझे विजयी विधान 'अ'ला जिव्हारी लागले. तिथून सकाळपर्यंतची वाटचाल बरीचशी संवादहीन स्थितीत झाली. अर्ध्या वाटेत आमच्या दोहोंच्या कुटुंबानी पायांचे म्हणणे ऐकत खेचरे मागवली आणि त्यावर आरूढ होऊन दोघी गमन करत्या झाल्या. मी आणि 'अ' बरेचसे नि:शब्द चालत राहिलो. खाली उतरून, गाडीत बसून आम्ही मुक्कामी येऊन पोचलो. यात्री समयविपर्यास न करता निद्राधीन झाले आणि मी ऑफिसला निघून आलो. झाला प्रकार काय होता हे अजूनही माझ्या लक्षात आले नव्हते. अचानक पत्नीचा फोन आला. तिने सांगितले की 'अ'ने आपल्या कंपनीच्या प्रवास विभागातर्फे आपली एकट्याची, त्याच दिवसाची, परतीची विमानाची तिकिटे काढवून घेतली होती आणि तो दुपारी निघणार होता. मूळ बेतानुसार सर्वांनी मिळून आणखी दोन दिवसांनी परत जायचे होते (परतीची सर्व तिकिटेही आरक्षित होती!) मी तातडीने श्वशुरांशी बोललो. ही बातमी कळताच तेही खट्टू झालेले होते हे उघड दिसत होते. 'अ'ला समजावण्याचा मी प्रयत्न केला नाही, कारण त्याच्या पत्नीने 'तसे काही करू नकोस' असे मला बजावले. मात्र तो निघाला, तेव्हा मी मुद्दाम वेळ काढून निरोप द्यायला गेलो. यजमान म्हणून ते माझे कर्तव्य होते असे मला वाटले. त्यानेही आपल्यापरीने साजरे केले, हात मिळवला. पण गाडीत बसताच नजर समोर केली आणि परत वळून पाहिले नाही. *** नंतर आम्ही बोलत बसलो असता खालील मुद्दे समोर आले. १. माझ्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे, मी सर्वांसमोर तिच्याशी भांडत होतो हे 'अ'ला अगोदरच खटकले होते. त्या सर्वांच्या माझ्याकडे रहायला येण्यामुळे मी नाखूष आहे असा काहीसा समज त्याने करून घेतलेला होता. (मीच सर्वांना आमंत्रण दिले होते हा मुद्दा इथे बाजूला पडला!) २. 'अ'च्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याला कोणीही विरोध दर्शवलेला खपत नाही. (मला अर्थातच याची कल्पना नव्हती. आणि असती तरीही मी त्याचे अवास्तव मुद्दे खोडून काढले असतेच) ३. माझी समजूत येणेप्रमाणे: 'अ'ला आधी वाटले होते तितकी भवनची चढाई सोपी नव्हती. त्याला हे प्रांजळपणे मान्यही करता आले असते. त्यात काही विशेष होते असे मुळीच नाही. पण स्वाभिमान कुठेतरी आड आला असावा. तो अंतर्गत प्रतिरोध असा कुठेतरी उफाळून आला असावा. हा अर्थातच माझा दृष्टिकोण झाला. 'अ'ला विचारल्यास कदाचित चित्र पूर्ण विरोधीही दिसू शकेल. एकंदरीत विनाकारण बरीच कटुता निर्माण झाली. मागे वळून पाहता माझ्याकडून काही उणेअधिक झाले आहे असे मला अजूनही वाटत नाही. पण झालेगेले विसरून सारे पूर्ववत व्हावे अशी इच्छा मात्र आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हं वाइट वाटणे सहाजिक आहे पण काळ हे सर्वांवर प्रभावी औषध असते. सर्वांचेच डोके, मन शांत झाले की सर्व पुन्हा सुरळीत होते हा माझा अनुभव. तुम्हालाही असाच अनुभव येवो अशी मनःपूर्वक इच्छा!

तुमच्या मनःस्थितीची पूर्ण कल्पना आली. आपली काहीही चूक नसतांना आणि अगदी निखळ चांगला उद्देश मनांत असतांनाही केवळ गैरसमजुती आणि समोरच्याच्या इगो सारख्या विकारांमुळे अपेक्षित परिणामां ऐवजी भलतेच घडत गेले. मात्र हे सगळे सुसंगतपणे लिहून व्यक्त केल्यामुळे त्या सगळ्या ताणाचा निचरा झाला असेल अशी आशा करतो. काही काळानंतर हे सगळे वाचाल तेव्हा तुमचे तुम्हालाच जाणवेल, की ह्याला किती महत्व द्यायला हवे होते . शुभेच्छा..

तुम्ही हे इथे लिहून प्रकाशित केले हे खरंच खूप चांगले केले. वाचकांपैकी अनेकांचे अशा प्रकारचे अनुभव असतील. माझेही आहेतच. सार्वजनिक उपक्रमांत काम करताना तर अनेकदा असे प्रसंग येतात. ज्या गोष्टी आपण विरंगुळ्यासाठी करतो त्यात त्रास वाटू लागलाच की सोडून देणे हा उपाय अवलंबिला पाहिजे. कदाचित तुमच्यापेक्षाही तुमच्या मित्राची मनस्थिती अधिक अवघड असेल. या धाग्यावर येणारे प्रतिसाद तुम्हाला या मनस्थितीतून बाहेर पडायला मदत करतील हा विश्वास वाटतो.

असल्यांना फाट्यावर मारायचे असते. जास्त विचार करू नका.

असल्यांना फाट्यावर मारायचे असते. जास्त विचार करू नका.
माझ्या अंदाजानं 'अ' हा लेखकाचा 'साला' असावा. आणि तसं असेल तर ही गोष्ट तितकीशी सोपी नाही.

'अ'ला आलेला राग हा वड्याचे तेल वांग्यावर असा काहीसा प्रकार वाटला. तुम्ही काहीही चिंता करू नका, 'अ' ला स्व:ताची चूक कळली तर उत्तमच नाहीतर दुर्लक्ष करणे हाच एक मार्ग. हो फक्त 'अ'हा तुमचा नक्की कोण, फक्त मित्र की नातेवाईक, ह्यावर पुढचे संबंध अवलंबून असतील.

यात जे काही झाले त्यात तुमचे वागणे काहीच चुकले नसले तरी एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते.. माझ्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे, मी सर्वांसमोर तिच्याशी भांडत होतो हे 'अ'ला अगोदरच खटकले होते. त्या सर्वांच्या माझ्याकडे रहायला येण्यामुळे मी नाखूष आहे असा काहीसा समज त्याने करून घेतलेला होता. (मीच सर्वांना आमंत्रण दिले होते हा मुद्दा इथे बाजूला पडला!) पत्नीचे नातेवाईक आले आणि आपला थोडा जरी आवाज चढला तर त्या मंडळीचे गैरसमज होण्याची शक्यता असते.माझ्या बाबतीत ही थोडेफार असेच घडले होते. एकदा तर मला भूक नव्हती आणि मी कमी जेवण घेतले तर माझ्या सासरच्या मंडळींना ते आले म्हणून मी रागात कमी जेवलो असे वाटले. ज्याचा त्याचा स्वभाव असतो. शक्यतो पत्नीशी वाद घालू नयेत..जरी जवळची माणसे घरी आली तरी... बाकी चुकलामाकला ह्यांनी सांगीतल्याप्रमाणे काळ हे सर्वांवर प्रभावी औषध असते. सर्वांचेच डोके, मन शांत झाले की सर्व पुन्हा सुरळीत होईल. अ आहे का मिसळपाव वर? किंवा त्याने हा धागा वाचला तर त्याची काय प्रतिक्रिया असेल?

=)) =)) =)) चालत देव देव करत फिरताय ना ? मग तोंड बंदच ठेवायला शिका. लोकांची डोकी आधीच सटकलेली असतात. अन त्यांना सोप्या सोप्या गोष्टीही विरोधी बोललेल्या झोंबु शकतात.