Welcome to misalpav.com
लेखक: नूतन सावंत | प्रसिद्ध:
पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याने पार्टीचे आयोजन केले होते,एरवी आम्ही दोघातच साजरा करीत असू.नातेवाईक,मित्र मैत्रिणीफोनवरून ; आई ,पपा, भावंडे कधी भेटून कधी फोनवरून शुभेच्छा देत असत.तेव्हा आम्ही बांदऱ्याला रहात असू.कोरम फुल होता.मजा चालली होती.जावा, नणंद,वहिन्यांनी ओवाळले.केक कापला.पार्टी सुरु झाली. अचानक माझ्या मनात विचार आला.”पन्नास! पन्नास वर्षं झाली.आता आपल्या हातात किती वर्षं राहिली अजून?जास्तीत जास्त तीस.त्यातही अॅक्टीव किती वर्षं असतील?अजून किती गोष्टी करायच्या,शिकायच्या राहिल्यात बरं?येती दहा वर्षं फक्त स्वत:साठी द्यायची.जे हवं तेच करायचं.अगदीच अपवादात्मक परिस्थिती सोडली तर स्वत:ला प्रथमस्थानी ठेवून स्वत:ला काय हवय त्याचा विचार अगोदर करायचा. मी आढावा घ्यायला सुरुवात केली.स्वयंपाक,गरजेपुरतं शिवण,विणकाम, भरतकाम,ड्रायव्हिंग इ.गोष्टीयेत्या.वाचन, संगीताची आवड मी पुरी करवून घेतच होते.पण........................................... अतिशय असोशीने शिकायची एक गोष्ट राहूनच गेली होती. ‘पोहणे’. सध्या तरी एकच गोष्ट आठवत होती.बाकीच्या असतीलही पण त्यांचे नंतर पाहू. असा विचार करून मी नवऱ्याला सागितलंकी’,येती दहा वर्षं मी माझ्या आवडीच जे जे काय करायचं राहिलंय ते करणार आहे. कशालाही नाही म्हणायचंनाही.तुझी परवानगी मागतेय असं नाही पण ननाचा पाढा नकोय.’ शिवाजी पार्कला माझं माझं माहेर.जागतिक दर्जाचा म्हणजे ऑलिम्पिकच्या निकषांवर उतरेल असा तरणतलाव ढेंगभर अंतरावर.आणि आम्हाला पोहायला शिकवलं नाही.कारण काय तर तेव्हा टूपीस बिकिनी घातल्याशिवाय पाण्यात उरायचं नाही हा नियम.माझ्या आईचे वडील त्या भागातले मोठे जमीनदार.मग काय विचारात?नो बिकिनी नो पोहणे. या तलावाचे प्रवेशद्वार वीर सावरकर रोडवर आणि मागच्या भिंतीला लागून दादर चौपाटी. तलावाची सुरुवात चार फूट खोलीने होत असे तर शेवट तीस फूट खोलीने होत असे.तीनमजली डायव्हिंग बोर्डही होता.,पण १९७५-७६च्य कळत एक पंजाबी तरुण कोणाचा तरी पाहुणा म्हणून आला होता.त्याल पोहता येत नव्हते.तो फिरत फिरत त्या तिसऱ्या मजल्यावरच्या बोर्डवर गेला आणि समुद्रावरून संध्याकाळी येणाऱ्या भन्नाट वाऱ्यामुळे थरथरणाऱ्या बोर्डवरून तीस फूट खोल पाण्यात कोसळला.तिथल्या तिथेच गेला बिचारा.हे सगळे अमिताकडून कळलेले.तेव्हापासून तिसऱ्या मजल्यावरून डाइव्ह मारण्यासाठी विशेष परवानगी लागत असे. आम जानतेसाठी तर बंदच झाला. या तरणतलावावर मीनाकुमारी,मधुबाला ,नादिरा,सायराबानो,साधना,नूतन, नंदा ,तनुजा पोहायला शिकल्या होत्या तर राज,शशी,शम्मीआणि इतर अनेक अनेक चित्रपट तारे तारका इथेच पोहायला येत.सेलेब्रीटी स्टेट्स असलेला हा तरणतलाव. इतकेच नाही तर बऱ्याच चित्रपटातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्रण इथे झालेले.सगळ्यात सुंदर रीतीने हा तरणतलाव चित्रीत झालेला चित्रपट म्हणजे म्हणजे मि. अँड मिसेस 55 हा चित्रपट. यातील “ठंडी हवा,, काली घटा, आई गई झूमके”या गीतामध्ये याचे अतिशय सुंदर चित्रीकरण आहे. याशिवाय अतिशय सुरेख चित्रीकरण ‘’इम्तिहान’’ या चित्रपटातही आहे. बिंदू आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेल्या काही प्रसंगात हा तरणतलावही एक महत्वाचे पात्र बनुन भाव खाऊन गेला आहे. माझी अकरावीपासूनची मैत्रीण अमिता राणे हिचे वडील या तरणतलावचे व्यवस्थापन पाहत असत आणि अमिता तेथे शिकवतही असे.आतापर्यंत वन पीस बिकिनी चालू लागल्या होत्या.पण त्यालाही आमच्या घरात बंदी होती. इम्तीहानच्या चित्रीकरणाच्या वेळी मात्र तिथे आम्हा मैत्रिणींची वट होती.अतिशय जवळून ते चित्रीकरण पाहायला मिळाले होते.अकरावीच्या वयात विनोद खन्ना म्हणजे आहा ऽऽऽ!(असो.) तेव्हाही शिकणे राहून गेले.नंतर या तरणतलावाशी संबंध आला तो भवाच मुलगा पोहायला शिकला तेव्हा.तेव्हा नोकरी असल्याने आणि त्या कळत शिवाजीपार्क पसून दूर रहात असल्याने शिकण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता मात्र काहीही झाले तरी मला बिकिनी घालण्यापासून कोणीही रोखू शकनार नव्हते.माझ्या एका मामेभावाची बायको,जाई,पोहायला शिकलेली होती.तिच्याकडे मनीच हेतु उघड करून, बिकीनीच्या शॉपिंगला चल,अशी विनंती केली.तिलाही उत्साह भरला म्हणाली,”मलापण मुलांना शिकवायचं आहे पोहायला.चला आम्हीपण य्रतो.” ते शिवापार्कलाच रहातातत.तिची एक मैत्रिण शीतल कुबलही तिच्या दोन मुलांना शिकवायचं म्हणून तयार झाली. सुरुवात तर चांगली होती. बिकीनीची खरेदी झाली. एव्हाना फ्रॉकटाईप बिकिनी चालायला लागली होती.नाव घालून झालं.नाताळच्या सुट्टीत सुरु करायचे ठरले..एकदम वर्षाची फी भरली.आलाच कन्टाळा तर फी फुकट जाऊ नये म्हणून तरी चालू राहिल असा यामागचा उद्देश. दुपारी साडेतीनची बॅच.तीनची 87 दारात पकडली की,मी तीन वाजून वीस मिनिटांत तरण तलाव गठीत असे.सुट्टीमुळे गर्दी भरपूर.पण जाई आणि शीतल आधीच श्रिया अजिंक्य,वैष्णवी आणि इंद्र्जीतला घेऊन आलेल्या असत त्यामुळे माझा नंबर लागलेला असे.फ्लोटघेऊन, आत जाऊन,कपडे बदलून, शॉवर घेऊन पाच मिनिटांत आम्ही पाण्यात उतरत असू. गीता मयेकर नावाची आमची शिक्षिका माझ्यापेक्षा वयाने लहान होती पण आकारमानाने गोलगरगरीत. हिच्या वडिलांनी म्हणजे भरत मयेकरानीच मीनाकुमारीपासून सगळया सेलेब्रेटींना शिकवले होते.आमच्या फीमध्ये 300 रुपय फी शिकण्यासाठी होती.तिने आम्हाला बारला धरून पाय कसे मारायचे ते सांगितले. शंभरवेळा असे पाय मारा सांगून ती दुसऱ्या उमेदवारांकडे वळली.शिकवणी सुरु झाली.जाई होतीच लक्ष ठेवायला. फ्लोटमुळे तरंगणे सोपे वाटायचे. सव्व्पाचला बाहेर निघण्याची बेल झाली.पाण्याबाहेर पडावे असे काही वाटत नव्हते.पण सहाला पुरुषांची बॅच असे.पाण्याबाहेर निघणे अपरिहार्य. दुसऱ्या दिवशीही हाच कार्यक्रम.असे सात दिवस झाल्यावर हात कसे मारायचे ते शिकवले.अन् असं लक्षात येऊ लागलं होते की,काही जणांकडे विशेष लक्ष पुरवले जात आहे.चौकशी केल्यावर समजले की ती फक्त बेसिक शिकवणार आणि नंतर प्रत्येक स्ट्रोक शिकवायला ६००रुपये घेणार.माझ्या डोक्यात घंटा वाजू लागली. त्यादिवशी घरी जाताना ऑफिस गाठलं आणि चौकशी केली.तिथे समजलं,की सर्व स्ट्रोक शिकवण्यासाठी तीनशे रुपये घेतले आहेत.मी म्हटलं,’चला आधी पहिला स्ट्रोक तर शिकुयात.मग घेऊ पंगा’.पण मी ऑफिसमध्ये चौकशी केल्याचे तिला समजले.दुसऱ्या दिवशी पहिला फतवा आला.”सावंत,आजपासून तू फ्लोट घ्ययचा नाही.तसेच हातपाय मार.”मी पाण्यात उतरून हातपाय मरायला सुरुवात केली. “अरे देवा,!”आत्ता खरी पोहण्याची मज्जा समजायला लागली.पाय वर आले की डोके बुडतेय आणि आणि डोके वर काढले की पाय खाली आपटतायेत.बर ही बाई कुठेतरी खोल पाण्यात निघून गेलेली.शेवटी जाई मदतीलाआली.तिचे खांदे धरून मी पाय मारायचे आणि तिने चालायचे अशा रीतीने पोहोण्याचा सराव सुरु केला.दोन-चार फेऱ्या झाल्यावर जाईने भिंतीजवळ उभे राहून भिंतीला पाय लावून रेटा द्यायला शिकवले.आणि मी तरंगायला लागले एकदाची.पण साधारण दहा फूट म्हणजेअर्धं अंतर जेमतेम होतंय तोवर पाय खाली जाऊ लागत.यावर उपाय म्हणून जाई आर्ध्या अंतरावर थांबे आणि मी तिचे खांदे पकडून उरलेलं अंतर पार करायची. दुसऱ्या दिवशी मी फ्लोट घेतला तसा परत फतवा”,सावंत तू प्लॉट घ्ययचा नाही.”आमच्यातल्या बाकी कोणालाही ती हे सांगायची नाही हे माझ्याच काय पण इतरांच्याही लक्षात आलं होतं.जाई हळूच म्हणाली,”बहुतेक चौकशी केल्याचे कळलेले दिसतेय.”ओ.क. पंगा घ्यायची आताच आलेली वेळ आलेली दिसतेय. “ठीक आहे नाही घेत.पण तू इथे थांब.कारण काल जाई नसती तर मी मरतच होते.”या माझ्या बोलण्यावर गीता टीचर हसली.”हँहँहँ, अग एवढयाशापाण्यात कोण बुडणार?”मी चिडले आणि म्हणाले,”काही कळतंय का तुला?हे उभे राहिल्यावारचे चार फुट पाणी मी आडवे झाल्यावर एक फूटाच्याच मापाचे होते.तेव्हढे खूप झाले मरायला.आणि यू इथे थांणार नसशील तर मी फ्लोट घेणार.”’काय हवे ते कर मी तुझ्या चांगल्याचे सांगतेय.”असे फणफणत ती निघून गेली. एव्हाना शीतलने तिला सहाशे रुपये देऊन शिकायला सुरुवात केली होती.मी शीतलला सांगितलं, ‘मी कशी आहे ते तिला सांग.,शीतलने पण तिखट मीठ लावून माझे उपद्रव मूल्य तिला सांगितले बहुतेक.दुसऱ्या दिवशी गीताचा अवतार बदललेला.आल्या आल्या म्हणाली,”तुम्ही रागावलात का काल?मला म्हणायचं होत ते अर्धवटच राहिलं.काय आहे न?एकदा फ्लोटची सवय लागली न मग कठीण होत जाते सगळे.” “मी कुठे रागावले?तूच तणतणत गेलीस.आणि आज एकदम अहो जाहो? मी विद्यार्थिनी आहे तुझी.” मी हसत हसत टोलवले.मग तिने माझ्याशी शिस्तशीरपणे बोलायला वागायला सुरुवात केली. एव्हाना तीन आठवडे झाले होते शिकायला लागून,एक दिवस मी काठावर बसून विश्रांती घेत असताना पाण्ययातून जवळ आली.काहीतरी विनोद केला आणि टाळी मागितली.टाळी देताच हात पकडून पाण्यात खेचले.नाकातोंडात पाणी गेले पण मी वर आले.तिने पुन्हा हात दिला.”नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय पोहोता येत नाही.धडा दुसरा.”दुसऱ्यावेळे श्वास कसा धरायचा सांगून पाण्यात ओढले.त्यादिवशी काठावर बसून उडी मारायला शिकले.तिथे १२ फूट पाणी असायचं. गीता जाडी होती हे वर सांगितलेच आहे.जेव्हा ती पाण्यात उडी घ्यायची तेव्हा पंधरावीस बादल्या तरी पाणी बाहेर उडायचे,निम्मे अतर पाण्याखालूनच पोहून वर येत असे.ते पाहणेसुद्धा आनंददायक असायचे. नंतर खूप गटटीझाली आमची.तिने दोन/तीनदिवसांनी काही इतर जणींबरोबर मला बोलावलं.”चला आता एकेकीने उभे राहून उडी मारा.”गुरूचा आदेश कसा टाळणार? माझा नंबरआल्यावर मी पुन्हा रांगेच्या शेवटी पळून गेले.मला हलत्या पृष्ट्भागाची अतिशय भीती वाटते.माझा पायच उचलला जात नसे त्यावेळी.प्रय त्नपूर्वक ही सवय मी मोडून काढली. सरकते जिनेही माझे दुश्मन असायचे.मॉलमध्ये वगैरे गेले की तो एक विनोदी कार्यक्रमच असायचा.चढताना उतरताना माझ्य्बारोबारचे सगळे इच्छित स्थळीम्हणजे अर्थातच वर किंवा खाली पोचले तरी मी एका पायावर उभी आणि माझ्यामागे मोठी रंग.त्यातले काही माझी बाजूने चढत किंवा उतरत. जाताना माझ्याकडे पाहून हसत.अर्थातच माझे लक्ष नसे.माझी धाकटया भावाची मुलगी, वेदांगी फक्त मला प्रोत्साहन देत असे किंवा माझा हात पकडून सांगे,”आत्या, तू डोळे मीट.मी सांगितलं की पाय टाक.”तिने सांगितल्याप्रमाणे मी करत असे आणि यशस्वी होत असे.तीही पट्टीची होह्णारी. तीही तिथे असायची(.असो,विषयांतर झाले.) दुसऱ्या वेळी माझा नंबर येताच मी पाण्याकडे पाहत राहिले.आता मागे वळणार इतक्यात गीताने मागच्यांना इशारा केला आणि काही कळायच्या आत,धडाम करून मी पाण्यात.पुन्हा आरामात वर आले.गीताने पुन्हा रांगेत उभे केले,”कमीतकमी तीन उडया मारल्याच पाहिजेत.”तिने फतवा काढला. पण पाण्य्पाशी आल्यावर माझी तीच परिस्थिती.आता मात्र गीता रागावली.,”परत धक्का खायचाय का?”माझं उत्तर तिला अनपेक्षित होतं.”चालेल.” ऐकून ती हसू लागली. मी स्पष्टीकरण दिलं.”अग,मला पाण्याची भीती वाटत नाही उडी मारायला माझे पाय तयार नसतात.”मग काय?मला धक्का मरायला रांग लागू लागली. घरी जाताना गीता म्हणाली,नेहमी पाण्यात उभ्याने उडी मारून उतरावे.पाणी तुम्हाला झेलते.आणि शरीर हलके होऊन तरंगते.हा शेवटचा धडा.” पण मला काही उभे राहून उडी मारणे शक्य नसायचे.पण मला ढकलायला भरपूर भिडू असायचे. आणि काही कालावधी गेला.’खतरोंके खिलाडी,सीझन –वन”सुरु झाला.एका दिवसाचे ध्येय होते हेलिकॉप्टरमधून खाली नदीत एका लाकडी काठ्यानी केलेल्या आकृतीच्य मध्ये अचूक उडी मारायची होती.बऱ्याच उमेदवारांनी उडया मारल्या.त्यांना पोहायला येत होते.पण जिने अचूक उडी मारली ती उमेदवार पोहू शकत नव्हती.हा क्षण होता आत्मज्ञानाचा’.अरे,पोहता येत नसतानाही जर इतक्या उंचीवरून हलत्या वाहनातून ही इतकी अचूक उडी मारू शकते,तर आपल्यला स्थिर जमीनीवरूनच उडी मारायची आहे.शिवाय आपल्याला पोहताही येतंय.’ दुसऱ्या दिवशी मी उभे राहून उडी मारली.सगळ्या मुलांची मजा मात्र संपली होती.आता तीस फूट खोल पाण्यातही उडी मारता येत होती.पण अजून डायव्हिंग बोर्डवर जाणे शक्य होत नव्हते.एक दिवस पाण्यातून काठावर येऊन विश्रांती घेत होते.इतक्यात एका मुलगी पोहत आली. एका हाताने बार धरून मला म्हणाली.”आत्या,जरा कॅप बांध ना.”मी तिची कॅप बांधली. आणि ती परत गेली. कोणीतरी येऊन गप्पा मारू लागली. डायव्हिंग बोर्डवर लक्ष गेले आणि मी पाहतेय की,आताच माझ्याकडून कॅप बांधून घेऊन गेलेली मुलगी तिथे आहे.ती मला आधी अर्धीच दिसली छातीपर्यंत, हळूहळू कमरेपर्यंत.ती दोन्ही हात दोनही बाजूच्या बारवर ठेऊन उडया मारत पुढे पुढे येत होती.आता ती मांड्यांपार्यंत दिसत होती.आता तिच्याकडे बऱ्याच जणांचे लक्ष वेधले गेले होते.ती दम घेण्यासाठी थांबली होती.सगळ्याजणी टाळ्या वाजवू लागल्या होत्या.पाण्याच्या पातळीच्या वीस फूट उंचावर ती होती.पाण्याच्या पातळीपासून तीस फूट खोल पाण्यात ती उडी मारणार होती. ती हसतच पुढे आली आणि पाहते तर काय?गुढग्याच्या वर चार बोटे डावा पायच नव्हता.सगळ्या सुन्न होऊन पाहत होत्या.टाळ्यांच आवाज थांबला होता.तिच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासाचे स्मित वाढले होते.ती काय करणार होती ते तिला नीटपणे कळलेले होते.ती अजून एक उडी मारून बोर्डाच्या काठावर आली. ”एक,दोन, तीन.जम्प.”अचानक गीताचा आवाज आला.ती कधी खाली पाण्यात येऊन थांबली हे समजलेच नव्हते.;जम्प’चा प विरतो न विरतो,उडी सुरु झाली होती.इतकी सुरेख पाण्यात घेतलेली उडी मी प्रथमच पाहत होते,त्याक्षणी तिचा पाय तिच्याकडे आहेच असा भास झाला.लोण्यात सुरी शिरावी तशी ती पाण्यात शिरली. बारला धरून गीता पाण्यात केव्हाही शिरायच्या तयारीने उभी होती.पुढच्या एका मिनिटांत ती मुलगी पाण्य्बाहेर आली होती.डबडबलेल्या डोळ्यांना समजलंच नाही की,केव्हा मेंदूने हाताना जवळ येण्याची आज्ञा दिली आणि त्यांनी केव्हा टाळ्या वाजवायला सुरुवात केली ते. सगळा तलावपरिसर टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेला होता.आणि गीताने तिला कवटाळले होते.त्या दोघींच्याच नाही तर प्रत्येक जाणत्या स्त्रिया आणि मुलींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. नंतर कळले ती राज्यपातळीवरची स्विमर होती.एका अपघातात तिचा पाय गेला होता.अपघातातून बरी होऊन आज ती पहिल्यांदाच पोहायला आली होती.दैवाला तिचा पाय मिळाला होता खरा, पण देवाने तिची जिद्द, तिचा आत्मविश्वास, हरवू दिला नव्हता. हा आत्मभानाचा क्षण होता. दुसऱ्या दिवशी गीताला सांगितले.आजपासून मीही डायव्हिंग बोर्डवरून उडी मारणार.मलापण शिकव.त्यावेळी गीताने मारलेली मिठीत काही और मजा होती.तीन महिने लागले दुसऱ्या मजल्यावरून उडी मारायला. ज्यादिवशी पहिल्यांदा तशी उडी मारली तेव्हा तिच्याच हस्ते गीताने मला एक गुलाब देऊन माझे कौतुक केले होते. इत्यलम्//
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छान आठवणी आणि लेख!मीही लग्न झाल्यानंतर पोहायला शिकले.अजुनही उडी मारायला मात्र घाबरते!तुम्ही डायव्हिंग बोर्डवरुन पन्नासाव्या वर्षी उडी मारताय_/\_ग्रेट!!

तायडे खरच मला या लेखाचा उपयोग होईल. माझा प्रॉब्लेम हाच झालाय की बोर्ड सुटत नाहीय माझ्याकडून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सोसायटी स्विमिंग पूल साठी ज्या मुलाला अपॉईंट केले त्याला सांगण्यात आले की लेडिज बॅच च्या वेळेस तू पूलजवळ थांबायचे नाही. त्यामुळे पूल मध्ये उतरायच्या आधी तो ज्या सूचना देतो त्यानुसार आम्ही प्रयत्न करतो. पण अजून 1-2 मैत्रिणी ज्यांना पोहायला येते त्या मदत करतात. पण आता या पूलवर बेसिक शिकून झाल्यामुळे नेक्स्ट मंथ पासून दुसरीकडे क्लास लावणार आहे.

सुरेख लिहिलेस सुरंगी ताई.त्या अपंग मुलीची जिद्द आणि धडपड प्रेरणादायी आहे आणि ५० व्या वर्षी पोहायला शिकणारी आमची सुरंगी तै पण ग्रेट आहे.

अस्संच म्हणते! तुमचा संकल्प पूर्ण होवो ही शुभेच्छा! माझी दोन्ही मुलं उत्तम पोहतात, तेही कोणीही न शिकवता, मुळात त्यांना पाण्याची भीती नाही (मला प्रचंड भीती वाटते पाण्याची).

मस्तच लिहिलंय.. तू जिद्दीने पोहायला शिकलीस हे किती छान ! :) मी पोहायला शिकताना कोच डच आणि मी शुद्ध मराठीत बोलत असू..अर्थातच भितीमुळे मी त्याला न मी भितेय म्हणून तो मला शिव्या द्यायचा. दोघात फरक एवढाच की मला डच कळायचं पण त्याला मराठी नाही! त्यामुळे मी पोहायला शिकले न भाषा न कळाल्यामुळे त्यानेही नेटाने शिकवलं :))

तुमची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. इतरांना नक्कीच प्रेरणा देऊन जाते. मी देखील वयाच्या तिसाव्या वर्षी पोहायला शिकलो ते देखील मुलाला पोहायला शिकवताना. म्हणजे मी व तीन वर्षाचा माझा मुलगा एकत्रच शिकलो. मुंबईत असताना स्विमिंग पुलावरची ती अचाट गर्दी बघता, इच्छा असताना देखील शिकू शकलो नव्हतो, पण बडोद्यात नोकरीनिमित्ते होतो त्यावेळी शिकलो. तुमची जिद्द बघता आता एखादी नवी कला शिकण्याचा प्रयत्न करणार आहे. मस्त लेख. एकदम आवडला.

हे अनुभवकथन खूपच आवडलं. हे लेखन माझ्यासकट अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. मी वयाच्या पंचविशीनंतर एकदा स्विमिंगचा क्लास लावला होता. फ्लोटिंगपर्यंत शिकल्यावर काही कारणामुले पुढचे राहून गेले. नंतर काही वर्षांनी मी लावलेल्या जिममध्ये स्विमिंग पूल असल्याने स्वतः (ट्रेनरशिवाय) पुढचे शिकण्याचा प्रयत्न केला जो सफल होऊ शकला नाही. आता पुन्हा प्रयत्न करीन.

तुमचे कौतुक आहे. सुदैवाने घरात आईला उत्तम पोहोता येत असल्याने मी आणि माझी बहीण लहानपणीच पोहायला शिकलो. माझे पोहोण्याचे अनुभव मी इथे शब्दबद्ध केलेत! :)

प्रेरणादायी अनुभवकथन चांगले सविस्तर लिहिलंय. मला पोहण्याचे अजिबातच आकर्षण नव्हते त्यामुळे शिकण्याचा प्रश्नच आला नाही. कधी पाण्यात पडलो तर शेवटचेच असे पक्के ठरवून टाकलेले. परंतू आमच्या कंपनीनेच तरणतलाव तासभर बुक केल्यावर सर्वाँनी तलावावर जायलाच लावले. पोहणाऱ्यांसाठीच तास असल्याने प्रशिक्षक थांबत नसत. माझे पोहायला शिकणे एक थट्टेचा विषय होता. एकदा मात्र चौधरी नावाच्या माणसाने सांगितले "तुम्ही जे हातपाय झाडताय याचा काही उपयोग नाहीयै. पाण्यात उतरलात की कसलाही आधार न घेता तास दोन तास पाण्यात न थकता तरंगत राहता आले पाहिजे. धबाधबा हातपाय हालवलेत की पाणी तितक्याच जोराने उलट प्रहार करते आणि थकायलाही होते पाण्याला कमीतकमी विरोध करा."

क्या बात हे सुरंगी ताई. तुझं वाचुन मला पण पुन्हा स्फुरण चढलं आहे. अजुन मी पण फ्लोट ला धरुन धरुन च पोहते. पोहते कसली? पाण्यात नुसतं डुंबायलाच फार आवडतं. तुझी जिद्द खरंच कौतुकास्पद आहे. तू ५० व्या वर्षी शिकलीस तर मी थोडी भीती घालवायलाच हवी. सही एकदम अजुन लिही.

वॉव !! मस्त वाटले वाचून ...पाण्यात तरंगाने हा खरच सुखद अनुभव असतो. प्रत्येकाने तो जरूर अनुभवावा. खाली निळेशार पाणी आणि वर पाण्याला माचिंग असल्यासारखे आभाळ… आणि मध्ये आपण रंगीबेरंगी माणसे… परत एकदा तरणतलावात पोहणे कम बागडण्याचा कार्यक्रम करावा असे मनात आले.वाचता मला क्लोरीन च्या पाण्याचा वाससुद्धा यायला लागलाय….

वा!! वा!! वा!! लिहीलय सुद्धा सुरेख आणि तुमची जिद्द तर त्याहुन भारी!! खुप आवडला लेख. आता पोहायला शिकायचं मनावर घ्यायला हवंच!

मी लहान असताना वडिलांनी माझ्या रडण्या-ओरडण्याला न जुमानता पोहायला शिकवलं. पोहायला शिकणं आणि शिकवणं हा खूप मजेदार अनुभव असतो आणि एकदा जमलं की नुसतं तरंगत राहणं स्वर्गीय :) आत्ताच्या आत्ता मी पोहायला जाणार आहे :)

शिकले मस्त अनुभव! आमच्या इथेही एक बाई उपचार म्हणून पोहायला शिकली अन ह्यावर्षी ती कॅनडाला जेष्ठ गटात स्पर्धेसाठी गेली होती.

पाण्यात डुंबायला अतिशय आवडतं, एखाद्या म्हशीपेक्षाही जास्त. पण पोहणे काही शिकलो नाही. हा लेख बघून पुन्हा हुरूप आला, धन्यवाद.

उशीरा प्रतिसाद देतेय..आज वाचला लेख तुमचा..अभिनंदन !!! मी पण शिवाजी पार्क एरियातच राह्ते..त्या स्विमिंग पूल चा इतिहास रोचक वाटला :)

तुमच्या 'भरल्या भेंडी'च्या धाग्याला धरून इथे पोहोचलो, बरं झालं जाणीवपूर्वक शोध घेतला तुमच्या आधीच्या लिखाणाचा, हे रत्न सापडलं :-)

बहुगुणी,धन्यवाद. सूड,हा लेख एका पोहणे शिकणाऱ्या मुलीला प्रोत्साहन द्यायला लिहिला होता,अजून एकजण जरी यामुळे पोहण्याततला आनंद मिळवू शकला तर या लेखाचे सार्थक झाले म्हणायचे.

उत्तम लेख! नुसते पोहण्यासारखा व्यायाम तिथवर पोचायला सुद्धा स्त्रीला काय काय दिव्य लागत असे ते पहायला मिळाले!, मी थोडासा ग्रामीण भागातला अन जन्म विदर्भातला त्यामुळे पोहणे शिकायला इंफ्रास्ट्रक्चर असे नव्हतेच, दगडाच्या खाणीत पावसाचे पाणी जमले की त्यात शिकणे, पण त्यात एकदा एक मित्र जीवनिशी गेला तेव्हापासुन ते बंद झाले , पोहणे शिकायची परत सुरुवात झाली ती आजोळी गेल्यावर, आमचे आजोळ सांगली जिल्ह्यातले आहे, घरापासुन ३ किमी वरुन कृष्णामाई वाहते, पण पोहायची सुरुवात झाली ती गावच्या पाटलांच्या विहिरीत, आमचे थोरले मामा त्यांना आम्ही अण्णा म्हणत असु ते जवळपास २५-३० पोरे काढत पोहायला, विहिरीत कॅन बांधून उड्या मारीत असु आम्ही, एक दिवस कॅन सोडुन अंग पुसत उभे असता अण्णा मागून आले व सरळ उचलून विहिरीत फेकुन दिले बिना कॅन चा गटांगळया खात असता त्यांचा आवाज आला "शिकवले तसा हात मार नाही तर बुडून मर मी सांगतो ताई ला काय सांगायचे ते" तेव्हा हळू हळू शिकलो पुढे प्रमोशन झाले ! मनात येईल तेव्हा जाऊन स्वतःला कृष्णेत झोकून देत असू आम्ही तासंतास त्या गार पाण्यात पहुडत असू! तिथेच गठ्ठा मारणे सुर मारणे सगळे शिकल,पाण्यावर उताणे पडून फ्लोट करत राहणे हा आवडता शौक. तुमचे लेखन वाचुन आठवणी परत ताज्या झाल्या! धन्यवाद

सग्ळे सायकलिंग वर बोलायलेत, म्हटलं जरा स्विमिंग वर काढावं. बाय द वे ह्या धाग्यावरुन इंस्पायर होऊन सुरु केलेल्या स्विमिंगचा ब्रेस्ट स्ट्रोक चा अध्याय सुफळ संपूर्ण होऊन आता फ्रीस्टाईलला सुरुवात झाली आहे.