Welcome to misalpav.com
लेखक: सुबोध खरे | प्रसिद्ध:
गोव्याला असताना १९९९ - २००० जीवंती रुग्णालयात( वास्को येथील) तिथला एम टी(mechanized transport) अधिकारी म्हणून डॉक्टरी शिवाय अतिरिक्त काम माझ्या गळ्यात आले होते. यात रुग्णवाहिका त्यांचे चालक, त्यांचे तेलपाणी डागडुजी इ. सर्व कारभार पाहावा लागतो. सर्वात कटकटीचे काम म्हणजे रुग्णवाहिकेचे चालक(हे सिव्हिलियन असतात). माणूस एकदा चालक म्हणून सरकारी नोकरीत लागला कि त्याला आयुष्यभर बढती नाही. सरकारी नोकरी असल्याने कामावरून काढता येत नाही. त्यामुळे हे लोक बर्याच वेळेस माजोरी असतात. त्यातून लष्करी अधिकारी हे कायम बदली होत असल्याने फार तर एखादे वर्ष तेथे असतात.एखाद्या सरकारी नोकराला कामावरून कमी करायचे तर भक्कम पुरावे गोळा करावे लागतात फायली भराव्या लागतात त्यानंतर तेथे युनियनबाजी वशिले इ इ सर्व येते. हे सर्व करेपर्यंत तुम्ही तेथून बदलीवर जाता त्यामुळे हे लोक तुम्हाला मुळीच भिक घालत नाहीत. हे आपले काय वाकडे करणार हा एक माज असतो. अशाच परिस्थितीत मी तिथला एम टी अधिकारी म्हणून काम पाहायला सुरुवात केली. तेथे तीन रुग्ण वाहिका होत्या आणी आठ चालक होते. दिवस आणी रात्र पाळी धरून. यात एक डिसुझा म्हणून चालक होता. अत्यंत बेजबाबदार आणी दारूच्या नादी लागलेला. कामावर कधीही वेळेवर येत नसे. मग तो आल्याशिवाय अगोदरच्या चालकाला घरी सोडणे कठीण जात असे. याच्यामुळे इतर चालकांना तास दीड तास उशीर होणे नित्याचे झाले होते. आणि प्रत्येक वेळेस त्यांना ओव्हर टाईम देणे पण शक्य होत नसे. म्हणजे शेवटी अधिकारीच वाईट. कारण सरकारचे पैसे असून देत नाहीत. (मुळात किती ओव्हर टाईमचे पैसे देत येतात यावर सरकारचे नियंत्रण असते). तो केंव्हाही दांडी मारणे कामावर असताना दारू पिऊन पडून राहणे अशा गोष्टी सर्रास करीत असे.कुठे तातडीची रुग्णवाहिका पाठवायची तर हा तेथे वेळेत पोहोचेल याची शाश्वती नसे. त्यामुळे त्याला लांब पाठवले जात नसे आणि हि गोष्ट इतर चालकांना खटकत असे. सुदैवाने बाकी चालक चांगले होते पण त्यांचा हि नाईलाज होता. आम्ही आमच्या नौदलाच्या अत्यवस्थ रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठवत असू. एकदा याने सहा किमी वर असलेल्या जासिंतो बेटाशेजारी रुग्ण वाहिका उभी केली आणी गायब झाला.रुग्णवाहिकेत एक अपस्माराचा(फिट्स) झटका आलेला रुग्ण(सैनिकाचे मुल) मेंदूविकार तज्ञाला दाखवण्यासाठी मेडिकल कॉलेज ला जात होता. अर्धा तास वाट पाहून रुग्णाच्या बापाने (नौ सैनिकाने) मला फोन केला. मला एक दुसरी रुग्णवाहिका तिचा चालक आणी अजून एक चालक (डिसुझाची रुग्णवाहिका परत आणण्यासाठी) असे तेथे पाठवावे लागले. हा रुग्ण दुसर्या रुग्णवाहिकेतून पुढे गेला आणी आमची रुग्णवाहिका परत आली. तीन तासांनी डिसुझा दारू च्या नशेत रुग्णालयात आरडा ओरडा करीत आला. तो तेथे आलेल्या जवळच्या बार मध्ये दारू प्यायला रुग्ण वाहिका मध्येच थांबवून गायब झाला होता. परत आला तो रुग्णवाहिका गायब म्हणून याचा पारा चढला होता कारण त्याला बसने परत यावे लागले. मी थंड डोक्याने त्याला घरी पाठवले आणी त्याची रजा मांडली. दुसर्या दिवशीहि त्याला काहीही बोललो नाही.पण त्याअगोदर मी बाकीच्या सातही चालकांना समजावून सांगितले कि डिसुझामुळे मला मनात नसतानाही तुम्हाला अतिरिक्त कामावर बोलवावे लागते. तीन दिवसांनी याने परत दांडी मारली तेंव्हा एका कामेरकर म्हणून चालकाला मला परत कामावर बोलवावे लागले तो आपली ड्युटी करून घरी गेला होता दुसर्या दिवशी त्याच्या पुतणीचे लग्न होते तरीही त्याला रात्र पाळी वर बोलवावे लागले. त्याला मी गोड शब्दात समजावले कि डिसुझा मुळे तुम्हाला हे असे बोलवावे लागते. डिसुझाच्या प्रत्येक कारभाराबद्दल मी त्या चालकांना सांगत असे कि त्याच्या मुळे तुम्हाला त्रास होतो आहे. असे काही दिवस झाले त्यानंतर पुढे कधीही ओव्हर टाईम ला कुणालाही बोलावले तर त्यांना त्याचे पैसे देत असे डिसुझाला मात्र रजा ( COMPENSATORY OFF) देत असे. आणी त्याने न सांगता रजा घेतली तर मात्र त्याचे पैसे कापत असे. एकंदर तुम्ही ओव्हर टाईम किती देऊ शकता यावर बंधन असते तरीही माझ्या अखत्यारीत असलेल्या पैश्यापैकी मी जास्तीत जास्त ओव्हरटाइमचे पैसे इतर चालकांना देऊ केले.त्यांना सरकारी नियमावली दाखवून दिली कि यापेक्षा जास्त पैसे देत येणे कोणालाही शक्य नाही. डिसुझाचा माजोरीपणा चालूच होता. असे दोन महीने गेले. पगार सर्व जणांना एकत्रच वाटला जात असे. त्या दोन महिन्यात डिसुझाला जाणवले कि त्याला पगार तीन ते चार हजाराच्या मध्ये मिळतो( गैरहजेरीची पगार कपात). त्यांचा पगार तेंव्हा साधारण ५ हजारचं आसपास होता. आणी बाकी चालकांना सात ते आठ हजार( ओव्हर टाईम मिळून). हे मात्र त्याला कुठेतरी टोचायला लागले. त्याने इतर चालकांना फूस लावायचा प्रयत्न केला.युनियन बाजी करण्याचाहि प्रयत्न केला परंतु इतर चालकांनी त्याला मुळीच पाठींबा दिला नाही. कारण त्यांना हि आता डिसुझामुळे त्रास होतो हे पटले होते शिवाय ओव्हर टाईमचे पैसे हि दिसत होते. तिसर्या महिन्यात परत कमी पगार घेतल्यावर डिसुझा माझ्याकडे आला. सर माझ्याशी काय दुष्मनी आहे तुमची? मी म्हणालो तुझ्याशी दुष्मनी असायचे काय कारण? नाही सर तुम्ही मला पगार कमी देता आणी इतरांना जास्त. मी त्याला सांगितले कि तुझ्या जितक्या दांड्या होतात तितके पैसे कापले जातात. कारण मी ज्याला ओव्हर टाईम देतो तेथे मला डिसुझा गैरहजर हे लिहावे लागते. मग तुझा पगार कापला जातो. त्याला मी काय करणार. तो परत म्हणाला पण मी जेंव्हा अतिरिक्त(EXTRA) काम करतो त्यावेळेस तुम्ही मला रजा देता आणी बाकीच्याना मात्र पैसे देता. मी त्याला म्हणालो तू दारू पिऊन गाडी चालवतोस. त्यापेक्षा तुला सुटी दिलेली बरी. कुणाला गाडी ठोकलीस तर फुकटची लफडी कोण करणार? त्याल काही बोलता येईना. तो परत गेला यावर त्याने आपल्या धर्माचा आधार घ्यायचा प्रयत्न केला. वास्कोतल्या चर्चमधील कोणा अधिकार्याचा मला फोन आला कि तो ख्रिश्चन आहे म्हणून तूम्ही त्याचा पगार कापता. मी त्या सदगृहस्था ना सर्व कहाणी सुनावली नि हेही विचारले कि डिसुझाने तुमच्या नातेवाईकाला असे भर रस्त्यात सोडून दिले तर तुम्ही काय केले असते. शिवाय हेही सांगितले कि माझ्याकडे एक पीटर म्हणून चालक आहे त्याला तुम्ही विचारुंन पहा कि ख्रिश्चन म्हणून त्याला काय त्रास झाला आहे? लष्करात जात धर्म असला विचार मला आत्तापर्यंत शिवलेला नव्हता. तुम्ही मला असे विचारून माझा अपमान करीत आहात. त्यावर त्यांनी माझी माफी मागितली आणी फोन बंद केला. पुढे एक वर्ष भर (मी पुण्याला बदलीवर जाई पर्यंत) मला डिसुझाकडून फारसा त्रास झाला नाही. त्याचे दारू पिणे कमी झाले असावे. निदान दांड्या मारणे बरेच कमी झाले होते. पण शेवटपर्यंत मी डिसूझाला काही ओव्हर टाईम चे पैसे दिले नाहीत. रजाच दिली. (कदाचित धर्माचा आधार घ्यायचा प्रयत्न केल्याचा राग माझ्या मनातून गेला नव्हता). एवढेच झाले कि आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही या त्याच्या माजोरीपणा ला थोडा तरी आळा बसला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

_/\_ खूप सुंदररीत्या हाताळलीत परिस्थिती. कुठेही न चिघळता योग्य मार्ग काढणे तेही सरकारी नोकरीत हे खरंच कौतुकास्पद आहे.

खरच काही काही लोक फारच उपद्रवी असतात. त्यांच्याशी कस वागाव हेच कळत नाही. तरी अशी परिस्थीती फार संयमाने हाताळल्याबद्दल आपलं कौतुक.

डॉक्टर साहेब, पूर्ण शंभर मार्क तुम्हाला. अशी माणसे हाताळणे सोपे नसते, इथे धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला काही ठिकाणी जातीची,स्त्री-पुरुषत्वाची, वयाची, शारीरिक क्षमतेची आणि शक्यच झाले नाही तर पैशाची राजकारणे करण्याचा प्रयत्न होतो. आपण स्वता कितीही बरोबर असलो तरी आपल्या वरिष्ठांना असल्या 'कटकटी' निर्माण करणारे अधिकारी नकोसे असतात. तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून त्या डीसोजाला चांगलाच धडा शिकवलात. त्याच बरोबर ही केस मिपावर पोस्ट करून आम्हाला एक मार्गही दाखवलात. खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

साहेब सरकारी नोकरी करीत असताना तुमच्या हातात फार कमी अधिकार असतात. जे अधिकार असतात ते फक्त सर्व सामान्य जनतेला नाडण्य़ाचे. ( या अधिकारावर तर तुम्हाला मिळणारा वरकड पैसा अवलंबून असतो). पण एखाद्या काम न करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्याला सरळ करण्यासाठी तुमच्या हातात काहीही नसते. शिवाय अशी माणसे नागवी असतात. तुम्ही त्यांच्या पातळीवर येऊन त्यांच्याशी वागू शकत नाही. त्याने दांडी मारली तर तुम्ही जीवाला लावून घ्यायचे नाही. हि माणसे तुम्हाला शिव्याही देऊ शकतात आणी वेळ पडली तर तुमचे पायही चाटायला तयार असतात. तेंव्हा त्यांच्या नादाला न लागता कायद्याच्या कक्षेत राहूनच काम करावे लागते. अठरा वर्षे प्रथम दर्जाचा राजपत्रित अधिकारी( निवृत्त झालो तेंव्हा माझा दर्जा सह आयुक्त (JOINT COMMISSIONER)असा होता. असे असून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो कि जर या कर्मचार्यांच्या बदलीचे अधिकार तुमच्या हातात नसतील तर ते तुम्हाला मुळीच विचारत नाहीत. कारण अशा लोकांना युनियनचे पूर्ण संरक्षण असते. पण तुम्हाला वरिष्ठांचे नसते. तेंव्हा तुम्ही तुमच्या कार्यकक्षेत राहूनच काम करावे लागते. मुळात यांची मनोवृत्ती ओळखून ते करावे लागते आणी आपला अहं इथे कधीही मध्ये आणायचा नसतो. म्हणून मी लिहिले आहे कि थंड डोक्याने काम करायचे.कुठेही आरडा ओरडा करून किंवा आदळ आपट करून काहीही फायदा होत नाही. येथे मी त्याला युनियनचे संरक्षण मिळणार नाही या दृष्टीने इतर चालक वर्गाला त्याच्या विरुद्ध उभे केले. त्यांचे हत्यार बोथट केले तरच तुम्ही युद्ध जिंकू शकता. अन्यथा सर्व चालक जर संपावर गेले असते तर माझी नाचक्की होऊन ते काम दुसर्याकडे दिले गेले असते आणी जाता येता मला या लोकांनी न बोलता हिणवले असते.

डॉक्टर खरे यांनी त्यांच्या समोर आलेला प्रसंग खूप छान हाताळला आहे. एकदा माझ्यावर सुद्धा असाच प्रसंग आला होता. आमच्या संस्थेच्या निदेशाकानी, व्यवस्थापन कामात मी नसताना, कॅन्टीन मध्ये खूप सुधारणा करायला हवी आहे आणि ते नुकसानीत जात आहे ते थांबवा अशी विनंती केली आणि मला हे काम स्वीकारावे लागले. अगदी सुरवातीलाच एक कॅन्टीन कर्मचारी माझ्या ऑफिस मध्ये धावत आला आणि तेथे काही गडबड झाल्याचे सांगू लागला. मी तसाच उठून कॅन्टीन मध्ये गेलो तर तिथे मला कपबशीचे फुटके तुकडे जमिनीवर विखुरलेले दाखवण्यात आले . हे तुकडे आमच्या कामगारांच्या युनियन नेत्याने ( हा दादा म्हणून ही कुप्रसिद्ध होता ) चहाची कपबशी अस्वछ असल्याने रागाने जमिनीवर फेकल्याने झाले असल्याचे मला सांगण्यात आले. मी ते तुकडे उचलून एका डीश मध्ये कर्मचारी जेथून पदार्थ घेत असत तेथील काऊनटर वर ठेवायला सांगितले . आणि त्या डीश च्या दोन्ही बाजूला स्थानिक भाषेत आणि इंग्लिश मध्ये हे कृत्य कोणी केले हे ठळक अक्षरा मध्ये लिहवले. दोन दिवस असे प्रदर्शन कॅन्टीन च्या मध्ये पदार्थ घेताना संस्थेच्या कर्मचारी वर्गाने बघितले आणि त्या वर चर्चा सुरु झाली. आमच्या निदेशकांच्या कानावर ही खबर गेली आणि त्यांनी मला ह्या माणसाशी संभाळून रहायला सांगितले. तो नेता दोन दिवसांनी माझ्याकडे आला आणि म्हणू लागला- साहब गलती हो गयी वो टूकडोको वहासे हटवायीये- . मी त्याला सांगितले कि मी नवीनच काम बघायला घेतले असल्याने त्यांनी असा स्टन्ट करायच्या ऐवजी माझ्याकडे यायला हवे होते- आणि प्रकरण मिटवले .त्या नंतर मी हे काम बघत होतो तेवढे दिवस त्या नेत्याने काही कुरापत काढली नाही .

उत्तम मार्ग काढलात. धर्माचा आधार घेतला गेला हे भीती वाटण्याजोगेच. पण हे ख्रिश्चन फादर लोक निदान व्यवस्थित बोलले तर ऐकून घेतात आणि त्यांना समजूत असते. सगळ्याच वेळी असे होईल असे नव्हे. त्यातही कोणी धर्माचा आधार घ्यायला गेला तर एकवेळ तोंड देता येईल पण जात मधे आणली तर कर्मकठीण!

या वरुन एक प्रसंग आठवला. माझ्या एका खाजगी नोकरीत असाच एक अगरवाल नावाचा मुलगा माझ्या हाताखाली दिली गेला. महाशयांना कोणी त्यांच्या विभागात कामास घेण्यास तयार नव्हते. मी नवीन असल्यामुळे ही धोंड माझ्या गळ्यात बांधण्यात आली होती. एक नंबरचा उद्धट, कामचुकार आणि मुख्य म्हणजे एम डी चा जवळचा नातेवाईक. त्याने त्रास देण्यास सुरवात केल्यावर काय करावे हे कळेना. शेवटी त्याचे टेबल एका बाजूला काढले आणि त्याला कुठलेही काम द्यायचे बंद केले. कामावर यायचे मस्टरवर सही करायची आणि शांत बसायचे. बस एवढेच काम. त्याचे सगळे काम मी उरात असे त्यामुळे इतरांवर कामाचा बोजा पडला नाही. महाशय एकदम खुष झाले. यायचे व फॅक्टरीमधे भटकायचे व गप्पा हाणायच्या एवढेच काम उरले होते ना !. दहा दिवस झाले, एक महिना झाला, मी काही त्याला काम दिले नाही. शेवटी माझ्या विभागाला तो नसल्यावर काम अडत नाही याची जाणीव झाली. दुसर्‍या महिन्यात हा जेथे गप्पा मारण्यास जात असे त्यांनी याला स्पष्ट सांगण्यास सुरुवात केली की त्याने तेथून फुटावे कारण त्यांचे काम होइना. दुसर्‍या महिन्यात टेबलावर बसून कंटाळला. एकदा ऑफिस संपल्यावर माझ्याकडे आला व चक्क रडला. "काम द्या म्हणाला ! मी म्हटले का रडतोस ? तर म्हणाला, "सर मी नसताना काम होते आहे कळल्यावर मला कोणी नोकरीवर ठेवेल का ?'' शेवटी त्याला माफ करुन परत त्याचे टेबल जागेवर हलविले व चार गोष्टी ऐकवल्या. नंतर बरीच वर्षे त्याचा दिवाळीला फोन येत असे..... :-)

खरे साहेब, थंड डोक्याने घेऊन तुम्ही हा तिढा झकास सोडवला.सरकारी नोकरीत असताना कामचुकार लोकांचे अनुभव बरेच घेतले.जातीचा आधार घेऊन नोकरी टिकवण्याचा प्रयत्न करणारेही खूप भेटले.पण पाठपुरावा करून वरिष्ठाना माझी बाजू पटवून देण्यात नेहमीच यश मिळवले. मनस्तापही भरपूर झाला.

डॉक्टरसाहेबांची खरंच कमाल आहे. मी असतो तर मला काहीही समजलं नसतं काय करावं ते. मानलं बुवा! धैर्य, चातुर्य, संतुलितपणा, न्यायाची चाड असे सगळे गुण एकाच माणसात आढळणे म्हणजे महादुर्मिळ गोष्ट. सलाम!

ननि साहेब काय लाजवता काय ? "धैर्य, चातुर्य, संतुलितपणा, न्यायाची चाड" असे काही नाही हो. सरकारी नोकरी होती. पडेल ते काम करायलाच लागते. आपला पार्श्वभाग सांभाळून नोकरी करायची.( केंव्हा कोण लाथ घालेल समजणार नाही). त्यात एवढे काही मोठे नाही. हत्तीवर बसलात. हत्ती स्वतःच चालतो. तुम्ही फक्त डावे उजवे पाहीले कि झाले.

श्री जयंत कुळकर्णी , मी सुद्धा म रा वीज मंडळात असतांना , अगदी असाच मार्ग अवलंबिला होता. धुळे येथे पंचवटी युनिट मध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर काम करीत असतांना , एक हेल्पर , असाच त्रास देत असे. वरिष्ठांना सांगुन , त्याची बदली अन्यत्र करण्याचे सुचविले , तर त्यांनी , दुसरीकडील , त्रासदायक , हेल्पर चालेल काय ? असे मलाच उलट विचारून " आगीतुन निघुन, फुफाट्यात पडला " अशी अवस्था केली. मग मला आठवले कि सर्वात प्रथम , नंदुरबार येथे , मी ज्या कार्यकारी अभियंत्यांच्या हाताखाली ( श्री कुंटे साहेब ) नोकरीस प्रारम्भ केला होता , त्यांनी एकदा गप्पांच्या ओघात सांगितले होते की , बदली हा काही त्रासदायक कर्मचार्‍याला सुधारण्याचा मार्ग नाही , तर त्याला तेथेच सुधारायचे , पण " थोड्या वेगळ्या मार्गाने " ! ! मी त्या कामगाराला , काम वाटप करतांना , कामच देत नसे. त्याने विचारणा केली तर माझे उत्तर " तु काम करतो ते पगारासाठीच ना ! मग तुझा सगळा पगार काढुन देण्याची जबाबदारी माझी ! तु फक्त मस्टरवर सही फक्त करीत जा , बाकी मी कामाचे पाहून घेईन " एक महीना जेमतेम त्याने " कळ " सोसली आणि माफी मागुन सुतासारखा सरळ झाला. वीज मंडळात पोल "वर" चढण्याची जी "वर कमाई " असते , त्याला तो मुकला होता, हे त्याच्या मागील रहस्य ! ! आता माझेही नाव " जयंत " आहे , हा दैवयोग आहे , असे समजून चालु या