Welcome to misalpav.com
लेखक: बिपिन कार्यकर्ते | प्रसिद्ध:
शनिवार भारतातील आपल्या क्षेत्रात एक मोठे ब्रॅंडनेम असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या लंचरूममध्ये हा जेवायला बसलाय. टेबलवर समोरच्या खुर्चीत त्या कंपनीचा एक उच्चपदस्थ बसलाय. गप्पा चालू आहेत. उशिर झालाय. दोघेच उरलेत. त्याची सुबत्ता याच्या सुबत्तेपेक्षा कमीत कमी दसपट तरी असेल. जास्तच पण कमी नाही. माणुस तसा भला. पण सतत काळजीच्या छटा घेऊन वावरत असतो. ओळख होऊन दहा एक दिवस झालेत. त्यामुळे आता हळू हळू गाडी व्यक्तिगत आयुष्य, आवडीनिवडी वगैरेंवर येत आहे. गप्पा चालू आहेतच. गाडी डाएट, फ़िटनेस, हार्ट वगैरे रूळांवर धावतीये आता. एकंदरीतच धावपळीचं आयुष्य, करिअरचे ताणतणाव, आधुनिक आयुष्यातले ताणतणाव असं संभाषण चालू आहे. एकाएकी त्याला काय झालं काय माहित... "सरजी, आज मेरे पास सब कुछ है. बिवीबच्चों के लिये बहुत कुछ बनाके रखा है. लेकिन पता नही, बहुत चिंतित रहता हूं. किस बात की चिंता है ये भी समझ मे नही आता. असल मे ना, मै रोना चाहता हूं. बहुत रोना चाहता हूं. कभी लभी लगता है की किसी के कांधे पर सर रख कर जी भर रो लूं! पर किस के कांधे पर सर रखूं? कोई नही है ऐसा!" तो एवढं बोलून गप्प बसला. प्लेटमधलं अन्न शांतपणे खात राहिला. हा मात्र अवाक झाला. काय बोलावं, कसा प्रतिसाद द्यावा हे कळेना याला म्हणून मग हा ही शांतपणे समोरचं अन्न पोटात ढकलत राहिला. तो क्षण इतका भारलेला होता की आपण काही अजून बोललो तर हा आपल्याच खांद्यावर डोकं ठेवून रडेल की काय असं याला वाटून गेलं. हा अजूनच आक्रसला. *** रविवार याला दिवसभर काहीच काम नव्हतं. सोबतीच्या सहकार्‍यांसोबत भटकायचा बेत ठरला मग याचा. जवळच एक तिर्थक्षेत्र आहे. सगळ्यांचा आग्रह म्हणून हा ही गेला. देवळं, तलाव, गर्दी, ऊन, धूळमाती सोडून माणसं बघत बसला. या गावातली सरोवरं पुण्यदायक म्हणून प्रसिद्ध. सुंदर घाट बांधलेले. पाणीसुद्धा त्या मानाने बरंच बरं होतं. सगळीकडे भाविकांची गर्दी. एका सरोवराच्या काठावर प्रचंड गर्दी. तिथे पूर्वजांच्या नावाने विधी वगैरे होतात. त्याच बाजूला बायकांचे काही वेगवेगळे घोळके मोठमोठ्याने रडत होते. अगदी हमसून हमसून रडत होत्या. नंतर कळलं की काही श्राध्द वगैरे चालू होतं. आणि बहुधा आपल्या मृत आप्तांच्या नावाने तिथे रडायची पद्धत आहे म्हणे. हा लक्ष देऊन बघत होता. बायका खरंच रडत होत्या. खोटं नव्हतं वाटत काही. बघत असताना एकदम विचार आला याच्या मनात... ’खरंच फक्त मेलेल्या माणसाकरता रडताहेत, का अजून काही असेल? बायकांच्या वाट्याला येणारी घुसमट तर नसेल अशी बाहेर पडत? हा मोकळं व्हायचा तर मार्ग नव्हे? मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’ हा परत अवाक! *** सोमवार रोजच्या जॉगिंगच्या वेळी कानात गाणी ऐकणे चालू असते याचे. आज कानात शेवंतीचे बन होते. त्यात एका गाण्यात ओळ आली ... लेकीचा गं जलम, घातला कुण्या येड्याने, माझे सखे मैनाबाई, बैल राबती भाड्याने! क्षणभर चमकला खरा, पण मग हा शांतपणे चालत राहिला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मोजक्याच शब्दात लिहीलेला. आवडला आहे. रडण्याच्या अनेक तर्‍हा, अनेक घुसमटलेली कारणे. कधी उगाच कातरवेळेची हुरहूर म्हणूनही रडू येते ('ये नीर कहाँसे बरसे, ये बदरी कहॉंसे आयी है?'). चिनी माणसे आत्यंतिक रागानेही रडतांना पाहिलीत. आपल्याप्रमाणे आपल्या भावनांना सहजमुक्त खुला वाव देणे त्यांच्यात नाही. तेव्हा एरवीच घुसमट खूप. त्यातून कुणी आपला अपमान केला, टाकून काही बोलले, अथवा काही आगळिक केली, आणि त्याबद्दल आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत, अशा अगतिकतेच्या क्षणी ही माणसे मूकपणे रडतात. डोळ्यातून अश्रू येतात, हुंदका येत नाही, आवाज नाही. सर्व शांत, पण एका घुसमटीने धुमसणारे!

धन्यवाद प्रदीपदा!
रडण्याच्या अनेक तर्‍हा, अनेक घुसमटलेली कारणे. कधी उगाच कातरवेळेची हुरहूर म्हणूनही रडू येते ('ये नीर कहाँसे बरसे, ये बदरी कहॉंसे आयी है?').
+१
चिनी माणसे आत्यंतिक रागानेही रडतांना पाहिलीत. आपल्याप्रमाणे आपल्या भावनांना सहजमुक्त खुला वाव देणे त्यांच्यात नाही. तेव्हा एरवीच घुसमट खूप. त्यातून कुणी आपला अपमान केला, टाकून काही बोलले, अथवा काही आगळिक केली, आणि त्याबद्दल आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत, अशा अगतिकतेच्या क्षणी ही माणसे मूकपणे रडतात. डोळ्यातून अश्रू येतात, हुंदका येत नाही, आवाज नाही. सर्व शांत, पण एका घुसमटीने धुमसणारे!
_/\_