तो...
जगं जिंकायची इच्छा मनात होती तेंव्हा कधी स्वतःला गमावायची वेळ येउ शकते याची पुसटशी शंकाही त्यावेळी आली न्हवती. तो उन्मादच वेगळा होता. मनात येइल ते करु जाण्याचा. याच आत्मविश्वासापोटी तर त्याने अख्खे जग जिंकायचा अघोरी प्रयत्न सुरु केला होता. त्याच्या व्यक्तीमत्वावर, शौर्यावर, हुशारीवर, महत्वाकांक्षेवर भाळुन अनेकांनी त्याला नुसती साथच न्हवे तर त्याच्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुतीही दिली होती. अजुनही कित्येक तयार होते त्याच्या एका शब्दावर सर्वस्व पणाला लावायला. स्वतःपेक्षा तत्व मोठे हा धडा तर त्यानेच सर्वांना शिकवला होता. त्याआधारेच आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झालेली होती. प्रत्येक मोहीम फत्ते झाली होती.
पण तो दिवस वेगळा होता. एका पराभुत राज्यातला एक फालतु वाटणारा माणूस त्याला आव्हान देउन गेला होता. आव्हान कसले ? खरे तर तो फक्त त्याच्या मनाचाच खेळ असावा पण त्या इसमाच्या डोळ्यातली चमक त्याला अस्वस्थ करुन गेली होती. कदाचीत त्याला त्यात स्वतःच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबींब दिसले होते ? नाही त्याहुन काहीतरी प्रबळ शक्तीवान असं काही त्या इसमाकडे आहे असेच त्या इसमाचे डोळे सांगत होते. त्याने जग जिंकले होते, पाहिले होते. माणसाची पारख करण्यात त्याच्याकडून चुक झालीच नसती. हा इसम विषेश होता खरे. काय विषेश हे तो ही सांगु शकत न्हवता. पण त्या इसमाची त्याला भुरळ पडली होती. त्या इसमाची त्याला भिती वाटली होती. एक अतिसामान्य, निश्चल इसम इतका ताकतवान कसा भासु शकतो या विचाराने तो काहीसा अस्वस्थ झाला होता ? पण ती वेळ अस्वस्थ होण्याची न्हवती. अजुन बरेच काही शिल्लक होते जे त्याला जिंकायचे होते. त्याची स्पर्धा फक्त स्वतःशीच तर सुरु होती. मनातील विचार बाजुला सारत त्याने त्या इसमाला बंदीवान बनवायचा आदेश देउन तो इतर महत्वाच्या कामामधे व्यग्र होउन गेला.
त्याला जग जिंकायचे होते, तो कलेचा भोक्ता होता. असे सर्वकाही जे उच्च, अभिरुचीपुर्ण, रोचक, साहसी, सुंदर, व विद्वत्तापुर्ण आहे ते आपल्याकडे असावे ही त्याची मनिषा असे. म्हणूनच पराभुत राज्यातीलही असे अनेक हुन्नरी बंदीवान लोक त्याच्याकडून सन्मानाने मिळालेला राजाश्रय आनंदाने स्विकारत असत. तो इसमही लवकरच बंदीवासातुन मुक्त झाला होता. पण तो कोणाशी विषेश बोलत नसे. सदैव स्वतःच्याच नादात दिसत असे. तो बहुतेक वेडा असावा अशी शंकाही इतरांना येउ लागली होती. पण राजाज्ञा मोडायची हिम्मत नसल्याने कोणी उघड बोलुन दाखवत न्हवते. अगदीच कोणी बोलते करायचा प्रयत्न केला तर माझ्याकडे बोलण्यासारखे काहीही नाही इतकेच बोलुन तो तासन तास शांत बसुन राही.
दिवसामागुन दिवस जात होते... अन एक दिवस काळाचे फासे उलटे पडले. लांब सोंड असणार्या धिप्पाड संथ पण उंच व अतिशय शक्तीमान भासणार्या प्राण्यांवर बसलेल्या लोकांसोबत जंगलात युध्द करायचा हा पहिलाच प्रसंग होता. अचानक काही कळायच्या आत एक बाण सुंssss करत आला आणी त्याच्या कमरेत घुसला. वेदनेची कळ दाबत अतिशय कौशल्याने त्याने आपल्या घोड्याला नियंत्रीत केले. घाव वर्मी बसला न्हवता म्हणून त्याही अवस्थेत त्याने जोरदार प्रतिहल्ला चढवला. त्याचा अवतार बघुन त्यांच्या सैंन्यास प्रचंड स्फुरण चढले होते पण अचानक वातावरण बदलले व सोसाट्याच्या वार्यासोबत जोरदार पाउस कोसळु लागला. अशा हवामानाची सवय नसल्याने अर्थातच त्याच्या सैंन्यात थोडा गोंधळ निर्माण झाला व त्याला विजयाची शक्यता निर्माण झाली असताना माघारी यावे लागले.
पावसाळा अनोळखी प्रदेशात कसा काढावा याची चिंता असतानाच त्याच्या सैन्यास ती बातमी समजली... बाण वर्मी बसला न्हवता तरी विषारी होता व त्याने आपले काम चोख बजावले होते. आता तो काही दिवसांचाच सोबती होता. आता परत फिरण्यापेक्षा अन्य कोणताही योग्य पर्याय समोर उरला न्हवता. दिवसामागुन दिवस जात होते. त्याचे आरोग्य दिवसागणीक खालावत होते, आपली जन्मभुमी तो परत बघु शकेल ही आशाच सर्वांनी सोडली होती. पण त्याहुनही वाइट म्हणजे ढासळणार्या प्रकृतीसोबत तो आपले मानसिक स्वास्थ्यही कणाकणाने गमावत होता. होय... तो क्षणाक्षणाने जवळ येणार्या मृत्युला अतिशय घाबरला होता. त्याला चुकवायचा तो अटोकाट प्रयत्न करत होता. त्याची धडपड त्याला अजुन केवीलवाणे बनवत होती. त्याच्या अवस्थेचा इतरांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होउ लागला. शेवटी शेवटी त्याला अंथरुणावरच बांधुन ठेवावे असा निर्णय नाइलाजानी घेतला गेला. प्रत्येकाला त्याच्याबद्दल आत्मीयता होती, प्रेम होते. त्याचा शेवट शांत व सुखाने व्हावा अशीच त्यांची इछ्चा होती. तो त्याचा हक्क आहे अशीच भावना होती पण सर्वांच्या डॉळ्या देखत तो आता केवीलवाणा बनला होता, भित्रा बनला होता. मृत्यु हि गोष्टच तशी विचीत्र आहे.
आता तो काही तासांचाच सोबती आहे असे निदान वैद्यांनी केले असल्याने त्याची शेवटची काही इछ्चा आहे का याची विचारणा केली गेली ग्लानीतच तो मला भिती वाटते. मला मरायचे नाही. मला म्रुत्युला जवळ करायचे नाही असे बडबडत होता. एका जेष्ठ व्यक्तीने त्याच्या राजाश्रयाला असणार्या अनेक तत्ववेत्यांना त्याची समजुत काढली जावी यासाठी पाचारण केले गेले. कोणी मृत्यु सुरेख आहे म्हणून समजुत काढु लागला. कोणी स्वर्गाचे वर्णन करु लागला. कोणी हे एक अटळ व शाश्वत सत्य आहे म्हणू लागला. कोणी इश्वराला शरण जायचा सल्ला दिला. पण प्रत्येक क्षणासोबत त्याची अस्वस्थता वाढत होती. सर्वांनीच हार मानली त्याच्या समोर व मृत्युसमोरही. आपल्या लाडक्या नेत्याची अशी अवस्था बघुन जो तो शोकाकुल झाला. कोणाला काहीही सुचेनासे झाले. एक भिती अन गोंधळाचे वातावरण निर्माण होउ लागले. तितक्यात तो इतरांना वेडसर वाटणारा शांत इसम धिटपणे समोर आला आणी त्याने त्याचा हात त्याच्या हातात घेतला. व त्याच्या डोळ्यात नजर रोखुन तो प्रथमच काही बोलला. त्याने शांत पण धिरगंभीरपणे विचारले ? काय झालय मित्रा ? ही भिती अस्वस्थता कशाबद्दल ? त्या इसमाने प्रथमच साधलेला संवाद बघुन तो म्रुत्युशैयेवरही काही क्षण अचंबीत झाला पण तो काही उत्तर देणार तेव्हड्यात त्या इसमाने आपले बोलणे चालुच ठेवले...
...मित्रा म्रुत्यु हा कोणालाच चुकणार नाही हे तर वास्तव आहेच पण तुझ्या लक्षात येत नाही काय ? जसा आज तु मरणार आहेस तसेच आज मी सुधा मरणार नाही काय ? अरे मीच न्हवे तर आम्ही सर्वजण तुझ्यासाठी आणी तु आमच्यासाठी आज मृत्यु पावणार आहेत हेच तर सत्य आहे. कोण म्हणतं तु एकटा आहेस ? हा मृत्यु तुझ्या एकट्याचा नाही आपल्या सर्वांचा आहे. आणी माझे तुला इतकेच सांगणे आहे की जसे याक्षणी मी माझा मृत्यु स्विकारत आहे तसेच तु सुधा तुझ्या व माझ्या मृत्युचा आज स्विकार कर. चल, आपण सोबतच आपल्याकडे येत असलेल्या आपल्या मृत्युला धिराने सामोरे जाउया...
(जे. कृष्णमुर्तीच्या एका ऐकलेल्या विधानावर आधारीत)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
Alexander ?
आवडली
छान कथा आहे. अजून लिहित रहा.
कथावाचकांचे आभार. फार विचार
९९% तेच करतात हो . कुठे तरी
अप्रतीम !
सुंदर लिहिलंय. आवडली कथा.
'आज' ज़रा जास्तच भावली.
छान लिहिलय. :)
छान लेखन.मृत्यू जाणार्याला