Welcome to misalpav.com
लेखक: रातराणी | प्रसिद्ध:
डबा बाट्लीये… अशाच एका उन्हाळ्याच्या दुपारी भंगार वालीची हाक आली आणि काम आवरून नुकतच पडलेली आई निशुला म्हणाली, "निशू बेटा जरा सांग ग त्यांना थांबायला." लोळत पडलेली निशू जराशी कुरकुरतच उठली आणि तिने खिडकीतून त्या भंगारवालीला बोलावलं, "ओ आईने बोलावलंय तुम्हाला." "अग निशू मागच्या दारीच आण ग त्यांना, खूप साठवलेत म्हणाव त्यांना डबे , इकडेच आल्या तर त्यांना सोप पडेल वजन करून भरायला.उन तापलय चांगलच." तोपर्यंत त्या बाई घराजवळ आल्या होत्या, निशूने गेट उघडून त्यांना आत घेतलं आणि मागच्या दारी घेऊन आली. तोपर्यंत आईने साठवलेले पत्र्याचे डबे आणि बरच काय काय बाहेर काढल. बाईना बसायला सांगून आई म्हणाली, "का हो आल्या नाही बरेच दिवस, मी साठवून ठेवले बघा तुमच्यासाठी डबे, तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला देत नाही मी!" आई उत्साहाने म्हणाली त्यांना. आईच खूप आश्चर्य वाटत निशुला कधी कधी. वास्तविक ती आत्ताच घरातल आवरून जरा वेळ पडली होती. इतका उकाडा आहे सध्या, दुपारच छान झोपायचं सोडून अशी कुणाला तरी बोलावते आणि गप्पा मारत बसते. "काय सांगू बाई आता आमच जगणच आस बगा. नवरा लय आजारी होता २ महिने, त्याच मुडद्याच करत होते बगा. मायंदळ पैका गेला" बाईनी पातळाचा पदर ओठावरून फिरवला. तशी आई म्हणाली, "निशू बेटा पाणी दे त्यांना आणि तू आत जाऊन बस." खरतर आता निशुला पण त्यांच्या गप्पांमध्ये इंटरेस्ट आला होता पण आईसमोर काही चालणार नाही हे समजून तिने पाण्याचा ग्लास बाईंच्या हातात दिला. "गुणाची ग बाय ती" त्या बाई म्हणाल्या "कितविला हायस" "नववीला जाणार आता" निशू म्हणाली. "मोठी हो बाय शिकुंशान, बाईच्या जातीला सगळा गाडा स्वताच ओडाय लागतोय" त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ नाही लागला तशी निशू नुसतच हो म्हणाली आणि आत पळाली. बेडवर लोळत तिने मगाशी वाचत असलेल पुस्तक हातात घेतलं खर पण आता सगळ लक्ष त्या दोघींच्या गप्पांमधेच होत. "अजाण हाये वो पोर, देव करो आन तिला दुख न दिसो बाय" त्या बाई म्हणाल्या, तशी आई म्हणाली "होय ओ अजून नाही एवढी समज तिला, पण हुशार आहे अभ्यासात, पहिला नंबर चुकत नाही. तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद करतील तिला मोठ" वा! इथ मी मरमर अभ्यास करायचा आणि श्रेय कुणाला तर त्या भंगार वालीला, आई पण न! "आता कशी आहे तब्येत दादांची" आईने विचारलं. तशा त्या बाई रागातच म्हणाल्या, "त्याला काय धाड भरतिये, आता उठून जरा कुठ हिंडा फिराय लाग लावत तवर काल रातच्याला जाऊन आल बगा पिउन, माझच मेलीचं नशीब खोट आन कुनाला सांगून अन रडून काय उपेग" "अस म्हणू नका बाई, कसा जरी असला तरी तुम्हाला आधार आहे. अशा सवयी सुटण फार कठिण. पण धीर सोडू नका तुम्ही. आमच्या ह्यांच्या ओळखीचे डॉक्टर आहेत एक. चांगला गुण येतो त्यांच्याकडे गेल्यावर. आपण घेऊन जाऊ एक दिवस तिथे. होतील बरे. आपल्या नशिबाची परीक्षा बाई अन दुसर काय!" निशुच्या मनात तेव्हा आल आई म्हणजे पुतळा आहे सज्जनतेचा, सोड त्या दळभद्री नवर्याला सांगायचं सोडून डॉक्टर काय सांगतिये! "लय उपकार होतील बंगा तुमचे" "बोलायच्या नादात पाणी पिलाच नाही तुम्ही. काही खाल्लाय का?" "व्हय सकाळच्याला दोन भाकरी बडवल्या बगा. त्याला बी म्हणल गिळ आणि म्या बी अर्धी कोर खाउन आले." "बर केलत. अशक्तपणा यायचा नाहीतर. उन्हाताणाच्या तुम्ही अशा फिरणार. काय झाल तर कुठे बसता." निशुला आठवलं एक दिवस आईचा पाय खूपच दुखत होता. उठ्ताही येत न्हवत. आई पप्पांना म्हणाली आजच्या दिवस कॅन्टीन मध्ये जेवा आज अगदीच उठवत नाही. पप्पा हो म्हणून गेले पण कामावर. आईला आणि निशुला न विचारता कि तुम्ही काय खाणार, काही आणून देऊ का तुम्हाला. निशू एवढी चिडली होती पण आई शांतच होती. निशुनी चिडचिड केली तशी आई म्हणाली, "अग निशू सकाळी घाईत लक्षात नसेल ग आल त्यांच्या.असू दे. खूप काम असत ग त्यांना. तू अस कर वरण भाताचा कुकर लाव. मी साधा वरणभातच खाइन आज, आणि तू डब्यात आज ब्रेड जाम नेतेस का." "हो लावते" म्हणून निशूनी कुकर लावला आणि शाळेत गेली. परत येवून बघते तो कुकर तसाच, "आई आई" निशू ओरडतच बाहेर आली "अग ओरडायला काय झाल एवढ" "तू खाल्ला नाहीस न भात, मला म्हणाली मी खाईन म्हणून आणि तशीच उपाशी बसलीस न" तशी आई हसत हसत च म्हणाली, "नाही ग वेडाबाई, शेजारच्या वहीनी बाहेर बागेत पाणी घालत होत्या, मला बघून म्हणाल्या जेवल्या का, मी म्हणल नाही अजून जेवेन आता जरा. आज जरा उशीरच झाला, अग तर त्या म्हणाल्या मी पण जेवायचीच आहे आहे अजून तर जेवू आपण एकत्रच. एकटीला खूप कंटाळा येतो" तर अग त्या त्याचं सगळ जेवण इकडेच घेऊन आल्या. छान जेवलो बघ दोघी. मला म्हणल्या तुम्ही आता पाय बरा होईपर्यंत त्यांना कॅन्टीन मधेच सांगा जेवायला. आपण रोजच सहभोजन करू" अस म्हणून आई खळखळून हसली. निशुला मात्र आश्चर्यच वाटल त्या वहिनी थोड्याशा खडूस टाइपच वाटायच्या तिला. पण ती काही बोलली नाही, आपली आई कुणालाही विरघळू शकते ह्यावर विश्वास होता तिचा. संध्याकाळी पप्पा आले आणि मग बाहेरच नेल जेवायला. परत येताना आई म्हणाली होती आज फार इचछा होतेय नदीकिनारी जायची जाऊया का. पप्पा काही आढेवेढे न घेता हो म्हणाले होते. कितीतरी वेळ बसले होते तिघजन संगमावर. निशूला त्यावेळी एवढच जाणवलं प्रेमाने कुणालाही जिंकता येत आणि रागाने काहीच नाही. तिला वाटल आई पप्पा काहीच बोलत नसले तरी खूप बोलतायत. आपल्या आईच काय कौतुक वाटल होत तिला. आताही अशीच ती शांतपणे त्या गरीब बाईच ऐकून घेत होती, तिला खायला प्यायला देत होती आणि मुख्य म्हणजे शांत राहा सांगत होती. आपली आई साध्वीच असेल मागच्या जन्मी म्हणून अस राहाण जमत असाव तिला. एव्हाना आई त्यांना आग्रहाने जेवू घालत होती. थकला भागलेला तो जीव समाधानी होऊन जेवत होता. आईला आशीर्वाद देत होता. "बाई तुमचे लय उपकार हाएत ओ. या जन्मी तरी नाही फिटायचे ते". "अहो उपकार कसले त्यात, तुम्ही पण माणूसच आहात माझ्यासारख्या. माणूसच माणसाला विचारेना झाला तर हे जंगलच होईल कि" पदराने डोळे पुसत बाई म्हणाल्या "व्हय बाई तुझ्यासारखी मानस अजून हेत म्हून आमि जगलोय नाहीतर आमची जिंदगी आणि मरण एकच आसतंय. ज्यान चोच दिली तो दाना बी देतो पर कधी कधी तो दाना तुमच्या सारख्यांच्या घरातून देतोय" "तेच म्हणते मी, मी कोण तुम्हाला मदत करणारी. करता करविता तोच आहे. आता बघा, तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाला बोलावाव नाही वाटत माझ्या मनाला. तुम्ही आला नाही कि काळजी लागून राहते कशा असतील म्हणून. काहीतरी ऋनानुबंध हे आपले पूर्वीचे. त्याशिवाय का अशी ओढ लागते. अनेक वर्ष जवळ राहून प्रत्येक वेळेला मनातल कळेलच अस नाही. शेवटी आपली दुखः सारखीच" निशुच्या काळजात चर्र झाल. आपली आई जी एवढी हसून खेळून वागते तिला दुख आहेच. पण पुढच्याच क्षणी तिच्या कानावर शब्द आले, "आपली मुलच आपली बँक. आता बघा बघता बघता नववित गेली पोर. खूप शिकवणार आहे मी तिला. ती तिच्या पायावर उभी राहिली कि मगच लग्न करणार" त्या बाई म्हनाल्या "व्हय बाई, पोराकड बगून पाणी ढकलायचं बघा. उद्या मोठी झाली कि हे दिवस नाहीत बाई आठवायचे आपल्याला" दोघीही हसल्या. तशी आई म्हणाली "बर वाटल तुमच्याशी बोलून, येत जा मधून मधून आणि हो एका डब्यात थोडा खाऊ देते मी तुमच्या छोट्याला. द्या त्याला." "कशाला ग एवढा त्रास करतीस." "असू द्या त्रास कसला त्यात. तयारच आहे. तुम्ही तोवर त्या डब्यांच वजर करून घ्या". मग त्यांचा हिशोब झाला. परत या, काळजी घ्या, काही लागल सवरल तर सांगा वगैरे वगैरे बोलून झाल्यावर आईने त्यांना एकदाचा निरोप दिला. निशुही उठली, फ्रीज मधून पाणी पिल. संध्याकाळ होतच आली होती. निशू आईला म्हणाली, "आई नदीवर जाऊन बसुया का ग" आईला आवडतच संगमावर जायला. आई होच म्हणणार अशी खात्री होती निशुला. पण आई म्हणाली "अग पप्पा येतील आता तुझे. चहा नको का द्यायला त्यांना" तशी निशू म्हणाली "असू दे आज मला पप्पांच्या हातचा चहा प्यायची तल्लफ झालीये." अस म्हणून तिने आईला डोळा मारला आणि फ्रिजवर नोट लावून ठेवली "At the Sangam, Bring २ tea" "चल आता पटकन" थोड्या वेळाने संगमावर पप्पा चहा घेऊन आले आणि सोबत आईचा आवडता गजरा सुद्धा! त्या क्षणी निशुला फार फार कौतुक वाटल तिच्या पप्पांच. बराच वेळ बसून होते तिघजन संगमावर. काहीहि न बोलता.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

साध ..सरळ.. तितकेच सुरेख.. त्यामुळे आपल्या सारख्यांचीच एक कथा वाटते... माझी आई पण अशीच भिकारी लोकांशी पण गप्पा मारायची गावाला .. मला पण असेच वाटायचे...

लेखन जितकं साधं तितकं भिडणारं असतं, त्याचा आणखी एक अनुभव.

ससध,सरळ तितकेच मनाला भिडणारे लेखन.मीही माझ्या आईकडूनच शिकले असा लोकांशी बोलायला.लहानपणी कुठे निघालं की आईला वाटेत भेणारे लोक, आपले काम उठून हाक मारणाऱ्या भाजीवाल्या, फेरीवाले,यांच्याशी बोलत आर्ध्या तासाला एक तास सहज लागत असे.तेव्हा खूप रागही यायचा.पण त्यातले ऋणानुबंध जपणारे लोक मी ती गेली तेव्हा पहिले.जवळजवळ आठ वर्ष ती गावाला होती.पण ती गेली तेव्हा तिच्या इच्छेनुसार आम्ही तिला इथे आणलं तेव्हा तिच्यासाठी जमलेले दीड-दोन हजार लोक; त्यात सोमवार असल्याने दुकाने बंद असली तरी आम्ही येण्याची वाट पाहणारे१५/२० दुकानदारही आलेले पाहिल्यावर मला तिची श्रीमंती कळली.

श्रीमंती तेव्हांच कळते. साध लिखाण अगदी आतून असते म्हणून मुक्त रांगोळीसारखे झरझर आणी सुबक !

मस्त लिखाण.. साध लिखाण अगदी आतून असते म्हणून मुक्त रांगोळीसारखे झरझर आणी सुबक ! +१

मुलीच्या नजरेतून लिहील्यामुळे लेखात एक innocence आलाय तो आवडला