तर नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता ऑफिस गाठण्यासाठी प्रचंड गडबडीत तयारी चालू होती. एक तर थंडीच्या दिवसात आरामात जाड ब्ल्यांकेट पांघरून मस्त झोपायचं असतं, आणि आम्ही ७ च्या ऑफिससाठी धडपडत असतो.
कसं बसं ६:५५ ला सगळं आवरून निघणार तेवढ्यात बॉस चा मेसेज आला. "Lets take a day off today.. it seems we have a national holiday and a dry day too... so don't go off to find a bar now... have fun".
"आयचा घो... आज कसली सुट्टी आता? किती मुश्किलीनं काल ल्याब सेट करत आणली होती. आता मधेच सुट्टी कसली? आणि सुट्टी तर सुट्टी हे काल नाही का सांगता येत? च्यामैला रविवारी सुट्टी नाही देत कधी. आता हे काय?"
हे असं पुटपुटत होतो तेवढ्यात आज्जी बाहेर आली. आज जरा जास्तीच उत्साही दिसत होती... ती काही तरी बोलायच्या आधी सुटू म्हणत गाडी चालू केली. ऑफिसला सुट्टी आहे हे फक्त मला माहिती होतं. आता घरी का थांबू? एवढ्या पहाटे उठून आवरलंय! ती मेहनत अशी वाया नाही जाऊ देणार मी.. आणि आज्जी बोललीच..
आज्जी :- थांब रे. कुठे चाललास?
मी :- ऑफिस ला चाललोय. का ग? कुठे सोडायचंय का तुला? कि काही आणायचंय?
आज्जी :- तू मला कुठे सोडतोस बाबा. आपल्यात पात्रता नाही तेवढी. उगाच बोलू नये माणसाने. आता देवच सोडवेल मला ह्या सगळ्यातून .
(च्यामारी . एक तर नीट बोला आणि काहीही कारण नसताना स्वतःची काढून घ्या.)
मी :- अगं आज्जे.. गाडीवरून देवळात सोडायची पात्रता आहेच कि. तेवढ्यासाठी कशाला उगाच देवाला त्रास? त्याची तरी झोप होउदे पूर्ण..
(हे म्हणजे मी झोपलेला राक्षस जागं करण्यासारखं होतं. बसलाच पाठीवर दणका. ८३ वर्षाची असली तरी भलतीच "फिट्ट" आहे आमची आज्जी )
आज्जी :- ७ वाजलेत नालायका. सूर्य डोक्यावर आग ओकतोय. आणि तरी यांना झोपायची पडलीये. ब्राम्हणाची पोरं रे तुम्ही. सूर्योदयाच्या आधी सगळं आवरून संध्या करून मग बाकी सगळं केलं पाहिजे.. ते नाहीच. साधं गणपती स्तोत्र येत नाही कार्ट्याला. आणि म्हणे मला सोडतोय. चल. गांधी स्मारकात सोड मला. आज २ ऑक्टोबर आहे.
(ती आज्जी असली तरी शेवटी ती बाइच. कुठलाही विषय कुठे नेउन टेकवेल काही सांगता यायचं नाही.)
मी :- हे राम..
(काही का असेना. आज्जीला चिडवायला खूप मज्जा येते. चिडली कि बोलते भारी. आणि मग जाऊन गाल ओढले की असली भारी लाजते. मी मी म्हणणाऱ्या मुली पण फिक्या पडतील.)
आज्जी :- करा चेष्टा फक्त तुम्ही लोक. तुम्हा मुलांना ना किंमतच नाही कोणाची. अरे देव माणूस तो.....
पुढची १५ एक मिनिटं ती बोलत होती. तिला सोडलं चौकात आणि मी गेलो हॉटेलात. मस्त २-३ चहा आणि डोसा खाऊ. आणि मग जाऊ मित्राकडे. असा प्ल्यान होता.
तेवढ्यात. ऑफिस च्या "फ्रंट डेस्क" वालीचा फोन आला. "सर, आज सुट्टी आहे? दुपारच्या क्लासच्या मुलांनी ट्रीप ठरवली आहे. येणार तुम्ही? बाइक नि जायचय."
म्हटलं ठीक आहे. येतो .
तसाही दिवसभर मित्राकडे बसू शकलो नसतोच. आणि फ्रंट डेस्कवालीच्या समोर दिवसभर डेस्क टाकून बसायची आमची तयारी असतेच. आणि आता तर.. हि हा हा हा हा .
ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी जाऊन थांबलो. कोणाचाच पत्ता नवता.
८ वाजता भेटायचं ठरलं होतं. साडे आठ झाले. तरी अजून कोणीच नाही.
लावला तीला ला फोन.. ती म्हणे. सर कोणीच येणार नाहीये. एकाच्या घरी नको म्हणाले. कुठे तरी मोर्च्याला जायचंय म्हणून. त्यामुळे बाकीचेही येणार नहियेत.
मी :- आयचा घो मग आता मी लोकांना डोसे करून देत बसू का? तुला काल विचारता नाही आलं का सरांना? आरामात झोपलो तरी असतो कमीत कमी.."
ती :- ए अद्या, बास हा तुझी बॉसगिरी. ते फक्त ऑफिस मध्ये. बाहेर नाही. मोठी आहे मी तुझ्यापेक्षा समजलं? पूर्ण दोन महिन्यांनी? किती? दो न. किती?
मी :- दो न
ती :- हा. आता गप्प थांब तिथे. ५ मिनिटात पोचते मी. आणि खायला काय आणू सांग. तू डबा तर आणला नसशीलच. आळशी लेकाचा
मी :- ए पैलवान. ये आता लवकर. आण काहीही. काही आणलं नाहीस तरी चालेल. रस्त्यात घेऊ काही तरी.
फोन कट.
तर . हि मुलगी आणि मी एकाच वयाचे आहोत . एकाच कॉलेज मध्ये गेलो . ओळख होती . पण जास्ती बोललो नवतो कधी . आणि आता . मी कॉलेज सोडून बाकी गोष्टी शिकत गेल्यामुळे . माझ्याच इन्स्टीट्युट मध्ये माझी CCNA साठी विद्यार्थिनी .
आणि आता "फ्रंट डेस्क" . (असा कसा चान्स सोडेन मी :P )
आली ५-१० मिनिटात .
मी : कुठे जायचं? गाडीवर बसता बसता विचारलं मी .
ती :- तूच ठरव . वेळ काढायचाय कसाही दुपार पर्यंत . तुला वाटेल तिथे?
मी :- मला वाटेल तिथे? बघ हा? नंतर ओरडायचं नाही .
ती:- नालायका . चल कि गप . शिव्या खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही का?
मी :- काय दिवस आलेत . विद्यार्थी शिव्या द्यायला लागलेत आता . कलयुग . घोर कलयुग .
ती :- किती नाटकं करशील रे राजा . चल ना गप्प .
ऑफिस मधल्या ज्युनियर इम्प्लोयी च्या रोल मधून मैत्रिणीच्या रोल मध्ये आली होती ती . आणि असं मध्ये मध्ये राजा म्हणायची सवय होती तिला . .
अहाहा . गुदगुल्याच नुसत्या मनाला .
गाडी यळ्ळूर गडाच्या दिशेने सुसाट सोडली होती .
गड तसा मोठा नाहीये . महाराजांची पावलं कधी लागली नाहीत गडाला . पण मराठ्यांच्या ताब्यात होता काही काळ. पाउण एक किलोमीटर चा परिसर . सगळे मिळून ७-८ बुरुज . एक खूप मोठी पायऱ्यांची विहीर . आणि एक ईश्वराचं देऊळ .
पण सुट्टीच्या दिवशी जायला ठिकाण मस्त आहे . छान थंड वारा असतो दिवस भर . गावातले लोक रोज दुपारी देवाला काही तरी नैवद्य दाखवतात बहुतेकदा हुग्गी (गव्हाची खीर ) तिखट जाळ आमटी आणि भात . असा साधा सोप्पा पण पोट आणि जीभ तृप्त करणारा मेनू असतो . आणि गडावर जेवढे लोक असतील त्या सगळ्यांची पंगत बसते .
आम्हीही तीच वेळ साधावी . पण त्याआधी थोडावेळ आरामात गप्पा मारत बसता यावं . म्हणून साधारण १० च्या सुमारास पोचलो तिथे .
पाहिलं काम . देवाला नमस्कार करून . एका बुरुजावर चढून बोलत बसलो होतो .
छान थंड हवा . बाजूला या बाईसाहेब . दोघांच्या एकमेकावर शाब्दिक कुरघोड्या .
मधेच माझा फ्लर्ट करण्याच्या प्रयत्न . त्यावर कधी तिचा राग कधी लाजणं .
वाह . दीड तास कसा गेला तेच समजलं नाही .
सोबत कितीही चांगली असो. एका जागेला एवढा वेळ मी बसणं शक्यच नवतं . म्हटलं चक्कर मारू जरा गडावर .
असंच फिरता फिरता . २-३ बुरुज सोडून . समोरून एक पोलिस दिसला . तिथे त्याने एका मुलाला आणि मुलीला पकडलं होतं . गडावर काही तरी चाळे करताना . कॉलेज चुकवून आले होते ते . चांगली चार पाचशे रुपयाची कमाई झाली होती त्याची .
आता आम्ही जरी कॉलेज ला जात नसलो . आणि आम्ही जरी फक्त मित्र असलो .तरी ते त्या पोलिस वाल्याला कोण सांगणार . . पण आता काही करू शकत नवतो . त्याने आम्हाला बघितलं होतं .
पळून जाऊन संकट वाढवण्या पेक्षा . आहोत तिथे थांबून . जे होईल ते बघू . असं ठरलं .
तिथेच मग गप्पा मारत थांबलो . पोलिस येत होता आमच्याकडेच .
पण मुद्दाम लक्ष नाही दिलं त्याच्याकडे . तरी तो येणारच होता . कशाला त्याला उगाच महत्व द्या .
आला तो . मला बाजूला बोलावलं . प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली कन्नड मध्ये . आधी घाबरलो थोडा . ओठ घसा वाळले पूर्ण . शब्द सुचेनात . आणि तो काय बोलत होता ते हि नीट कळत नवतं .
पण . मग त्याने हिंदी , मराठीत बोलायला सुरुवात केली .
तो :- कोन रे तू . हिक्डी काय करतोस . ती लडकी कोन?
मी:- माझी कलीग आहे ऑफिस मधली . आज सुट्टी होती . म्हणून मंदिरात आलो . आज प्रसाद असतो ना .
तो :- मग मुलीला का घेऊन आला? मजा मारायला ?
मी:- मी . नाय हो . मजा कसली . देवाला आलो . सांगितलं ना . तुम्ही घेतलं का दर्शन ?
तो :- ए जास्ती बोलू नको . बोलाव तिला हिते .
तिला बोलावलं .
परत तो :- हा कोण तुझा? का आलीस इथे?
आता हि मुलगी काय उत्तर देईल यावर सगळं होतं . वेगळं काही सांगितली तर पकडलो गेलो असतो .
ती :- ऑफिस मध्ये आहे आम्ही एकत्र . देवाला आलो .
हे सांगताना एवढा निरागस चेहरा केला होता पोरीनं कि . .
पण नाही . साला तो पोलिस होता .
परत म्हणाला . चला . लगीन लाऊन देतो .
च्यायला आता हे काय नवीन ? नाही म्हणजे . मला तसा काही प्रोब्लेम नवता . पण . ते चेहऱ्यावर का दाखवा .
म्हणालो . का हो . एकटा सुखी आहे बघवत नाहीये का?
तो :- नाही नाही . इथे . असं मुला-मुलीना बघितलं कि लग्न लाऊन देतात . चला तुम्ही ठाण्यात . लग्न लाऊया .
असं म्हणून तो निघाला चालत . आणि मागोमाग हि मुलगी पण .
जवळपास ओरडलोच . ए मुली . थांब इथेच .
तो पुढे गेला होता . त्याला गाठलं . म्हणालो . ओ मामा . कशाला तिथपर्यंत जातंय . बघा इथेच काही सेटिंग होते का? संपवा विषय .
तो :- इथे? च्यायला एवढी गडबड हाय का लग्नाची ? साला बामन दिसतो तू . भड्जीला पण बोलावणार नहिस. स्वतःच मंत्र म्हणून मोकळा होशील .
मी :- ओ लग्नाचं नाही . सोडा आम्हाला . किती द्यायचे सांगा .
तो :- मी तसला नाही . साल्या मला पैसे दाखवतो का बे . टायर मध्ये घालून फोडला ना . कि येशील वाटेवर . आणि ते जाऊदे . राम सेना वाले आले ना . साल्या दोघांना इथेच सोलून काढतील .
मी :- राम सेना? इथे कोण येणार . चेतन?? चांगला ओळखतो मी त्याला . एका वर्गात होतो . माझा मित्र आहे . तुम्ही ज्यांची भीती दाखवताय "ते" मीच आहे . मीच कित्येकांना मारलंय . आता बोल .
तो :- ५०० .
मी:- ए हाड . . १०० पेक्षा जास्ती नाही .
तो :- ४००
मी :- १००
तो :- ३००
मी :- १००
तो:- २०० . भाजीपाला घेतोय का बे? पैसे काढ किंवा चौकीत चल . काढतो तुझी सगळी गर्मि.
मी:- ओ दादा . कशाला तेवढ ओढताय . जाऊद्या ना . मिटवा २००त .
असं म्हणत मी खिशात हात घातला . च्यामायला , वोलेट घरीच होतं . . आता मात्र तंतरली माझी . घाम फुटला. काय करू काहीच सुचेना .
आणि एकदम मेसेज आला मोबाइलवर . .
"काय झालं रे? "
विसरलोच होतो जवळपास . हि मागे होती ते .
पोलिसाला म्हटलं थांबा २ मिनिट . आलो .
तिच्याकडे गेलो. "२०० रुपये आहेत का ग तुझ्याकडे? मी पैसे विसरून विसरून आलोय . पैसे नाही दिले घेऊन जाइल तो आपल्याला . आणि लग्न लावेन म्हणतोय. "
ती विचार करत असल्याचा आविर्भावात म्हणाली . "लग्न !! हम्म . "
मी :- हसू आवरत म्हणालो. बाई. आहेत पैसे का सांग. नाही तर काही तरी व्यवस्था करावी लागेल. मित्रांना बोलावतो. विचार नंतर कर तू आरामात यातून सुटलो कि. "
ती:- हो रे. आहेत. हे घे.
पैसे घेतले आणि परत पोलिसाकडे आलो .
मी :- हे घ्या.
तो :- गुड. आता निघा इथून. अजिबात थांबायचं नाही इथे. खुश होऊन म्हणाला तो.
मी:- आता एवढा वेळ थांबलोय तर प्रसाद घेऊनच जातो कि. कसं म्हणता?
तो:- आता कशाला आणि परत? मोठे साहेब आले राउंडसाठी कि पुन्हा अडकशील .
मी:- ते बघा ना दादा तुम्ही. तुम्हाला प्रसाद आधीच मिळालाय. आता आम्हाला पण घेऊ द्या कि. प्रसाद झाला कि लग्गेच निघतो.
तो :- तुमच्या आईचा भो.. ऐकत नाय तू फोकलीच्या. जा. नंतर साहेब राउंड मारेल. तवा सांगू नको मला पैका दिलं ते. मी तुला सांभाळतो. पण जास्त वेळ नको थांबू. संध्याकाळी सापडला तर काही खरं नाही .
मी :- हो हो .
असं म्हणत म्हणत ती थांबली होती तिथे आलो.
तिला म्हणालो,"चल प्रसाद घेऊनच जाऊ.."
वर जाउन बुरुजावर चढून बसलो .
तिने येताना मस्त ढोकळा आणि सामोसे आणले होते. ताक पण आणलं होतं
ते सगळं काढलं. आणि झालेल्या प्रकाराबद्दल हसत दंगा करत बसलो तिथेच..
तेवढ्यात खाली लक्ष गेलं. तो पोलिस अजुनी फेऱ्या मारत होता. अजून कोणी बकरा सापडतो का बघायला.
उगाच आवाज दिला.. "राम राम "
राम राम.. वर न बघतच म्हणाला.
थोडा पुढे गेल्यावर थांबला. वर बघितलं. खिश्यावर हात ठेवला.
आणि म्हणाला.
"जय गांधी बाबा"
धागा संपादित केला आहे
------------------
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
गु द गु ल्या झाल्या ना??
हाण तेजायला, मज्जाच की हो.
रोमॅन्टीक एकदम .. मस्त.
हाहाहा!
मस्त लिहीलय...
छान किस्सा ..
हीहीही . मस्त किस्सा
एक फूट अंतर ठेवून...!!! :-))
लैच भारी !
मोटा मानुस रावसाहेब!!
मस्त लेख
एकदम भारी!! धन्यवाद..!!
मस्त लिवलय. लव्ह ष्टोर्या लय
झालं नाय अजून काय !
तुमाला काय म्हाईत? आआँ?
त्येच म्हंतो. तुमाल कसं
अच्च कश्शं?
मस्त लेख
लग्न करायचं तेव्हा करूच कि .
लै भारी किस्सा!!
माताय!! सरळ लग्नाच्या काय
असते तर . .
बेटा मन में लड्डु फुटे
Jay Gandhi Baba