दोन दिवसांपुर्वीची गोष्ट, ऑफिसमधुन भिजत घरी आलेलो. घरी कोणी बॉसिंग करायला नसल्याने मस्तं पैकी कपडे बदलुन बीन बॅगवर आडवा तिडवा वेडा वाकडा पसरलेलो होतो. समोरच्या खिडकीमधुन मस्तं पाउस दिसत होता. कानावर हेडफोन आणि हातामधे कॉफीचा मग. विनअँप ला शफल ला टाकुन डोळे बंद करुन कॉफीचे सिप घेत होतो. थोड्या गाण्यांनंतर हे गाणं चालु झालं आणि नकळत अनेक खपल्या काढल्या गेल्या. ह्या आठवणी विसरवायचा शोध लागला असता तर किती छान झालं असतं?
"पुन्हा ढग दाटुन येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारे पावसाळे, माझ्या मनात भिजुन जातात
........................
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब पुन्हा पावसाला मागतो मी (सौजन्य-कवी सौमित्र गारवा)
पाच-सहा वर्षांपुर्वीचा असाच एक पावसाळा, नुकतचं इंजिनिअरिंग पुर्ण करुन बाहेर आलेलो. नव्या कंपनीमधे जॉईन व्हायला महिन्याभराचा अवकाश असल्यानी टवाळक्या करणं, मित्र-मैत्रिणींच्या गृपबरोबर ट्रेकला जाणं, चित्रपट बघणं आणि पहाटे ९ वाजेपर्यंत पार्श्वभाग वर करुन पडणं असा अत्यंत प्रोडक्टिव दिनक्रम चालु होता. मित्रमंडळापैकी काहीजणांना लगेचं त्यांच्या कुंपणामधे बंद व्हायचं असल्यानी तसं ट्रेक बिक ला येणारे लोक्स कमी झालेले होते. जेमतेम ५-६ जणं सद्ध्या रिकामटेकडे होते त्यातलीच ती एक.
कॉलेजमधे द्वितीय वर्षामधेचं तिच्याशी ओळख झाली होती. डिप्लोमानंतर थेट द्वितीय वर्षामधली अॅडमिशन झालेली असल्यानी फारशी ओळखीची लोकं नव्हतीचं कॉलेजमधे. तसं तिच्याशी मैत्री व्हायचं किंवा जवळीक वाढायचं फारसं काही कारणं नव्हतचं. She was in different league altogether. ती एकदम साधी, शांत आणि सुंदर होती. तिला आणि मला शेजारी शेजारी उभं केलं असतं तर ब्युटी अँड द बीस्ट ची आठवण व्हावी ही परिस्थिती :). तिची माझी प्रॅक्टिकलची बॅच एक होती हे ओळखं व्हायचं कारण. उशिरा अॅडमिशन झाल्यामुळे आधीची प्रॅक्टिकल "छापायला" लागणार होती. दुसर्याच आठवड्यामधे आमच्या गुरुवर्यांनी प्रॅक्टिकल चालु असताना तिला बोलाउन घेतलं आणी. "हिची फाईल घेउन पुर्ण कर प्रॅक्टीकल्स आणि असाईनमेंट्स." अशी ओळख करुन दिली. फाईल्स घेतल्या तिच्याकडुन. घरी जाउन जेव्हा खरडकाम सुरु करायसाठी तिची फाईल उघडली तेव्हा खुप मस्तं वाटलेलं. अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि नेटकेपणानी लिहिलेलं होतं तिनी. शाळेमधे असल्यापासुन मला स्वतःला नोट्स आणि असाईनमेंट्स नीटनेटक्या पुर्ण करायची सवय होती. त्यामुळे तिची फाईल उघडल्या उघडल्या अतिशय प्रसन्न वाटलं. मग आठवडाभर जागरणं करुन आधीचा उकिरडा आणि त्या आठवड्याची हमाली पुर्ण करुन तिच्या फाईल्स तिला परत दिल्या. तिला फाईल परत करताना, "Thanks mate. You have one of the nicest handwriting I've ever seen" असं म्हणल्यावर चक्क लाजली गोडपणे. जागेवर कोसळलेलो तिला लाजलेलं बघुन. आजही कधीतरी मला स्वप्नात दिसते ती लाजताना आणि अगदी खळखळुन हसताना.
डिप्लोमानंतर आल्याने जवळ जवळ सगळेचं विषय सखोलपणे आधीचं अभ्यासुन झालेले होते. त्यामुळे नंतरच्या असाईनमेंटस साठी वगैरे कोणाचीच मदत लागायची नाही. शिवाय आता हळु हळु इकडेही नवे मित्र बनायला सुरुवात झाल्यानी देवाणघेवाणीसाठीसुद्धा तिच्याशी जास्तं संबंध यायचा नाही. काय प्रॅक्टीकल्स मधे थोडफार बोलणं होतं असेल तेवढचं. परिक्षा जशी जवळ यायला लागली तसे हळु हळु स्टडी गृप्स बनायला लागले. सो कॉल्ड सब्जेक्ट एक्स्पर्ट्सकडुन तो विषय समजुन घ्यायसाठी छोटे कंपु बनायला लागले. एके दिवशी पी.एल. (प्रीपेरेशन लिव्ह) च्या आधी तीन चार दिवस तिला सबमिशन मधे इंजिनिअरिंग ग्राफिक्सच्या सरांकडुन बोलणी खाताना ऐकलं आणि नंतर चेहेरा पाडुन बसलेलं पाहिलं. ती चिंताक्रांत दिसणं म्हणजे पळसाचं चौथं पान सापडण्याएवढं दुर्मिळ असल्यानी मी तिच्याकडे गेलो. तिचं इंजिनिअरिंग ग्राफिक्स तेवढं चांगलं नसल्याचं समजलं. परिक्षेमधे आता कसं होणार म्हणुन ती चेहेरा पाडुन बसलेली. ग्राफिक्स माझा स्ट्राँगपॉईंट असल्यानी मी तिला मदत करायचं कबुल केलं. त्याबदल्यात तिनी माझी एम थ्री नामक अतिभयंकर क्रुर गनिमाच्या गोटामधुन सुखरुप सुटका करायचं आश्वासन दिलं (ते माझ्या मुर्खपणामुळे पुढची दोन वर्ष ते पाळलं गेलं नाही ही गोष्ट वेगळी). मग पी.एल. मधे कॉलेजच्या "लॅबररी" मधे बसुन आम्ही एक्स्चेंज ऑफरचं काम सुरु केलं. खर्या अर्थानी मैत्रीची सुरुवात झाली ती इथे. (संकटामधे साथ देतो तोचं खरा मित्रं हे ह्या काळामधेचं नीट समजलं). हा हा म्हणता तोंडी आणि लेखी परि़क्षा होउनसुद्धा गेल्या. शेवटच्या पेपरनंतर मग एकमेकांना भेटुन पेपरविषयी चर्चा वगैरे झाली. तिचे पाचपैकी पाच पेपर अतिशय उत्तम गेलेले होते. माझे पाच पैकी चार पेपर उत्तम गेलेले होते. एम-३ ला दांडी गुल होणार हे निश्चित होतं. परि़क्षेनंतर पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली.
त्या दिवशी असचं गप्पा मारता मारता सुट्टीचे प्लान ठरायला लागले. मी माझ्या जिवलग मित्रमैत्रिणींच्या ग्रुपबरोबर ट्रेक ला जाणारे असं समजल्यानंतर मग तिनी ती आली तर चालेल का असं विचारलं. माझी काही हरकत नव्हतीचं. कारण मला नवे मित्र माझ्या ट्रेक ग्रुपमधे आलेले नेहेमीचं आवडायचे. ट्रेक साधाचं होता तिकोण्याचा. अतिशय मेमोरेबल झाला तो तिच्यामुळे. आख्खा दिवस नकळतपणे मी तिच्याशीचं जास्तं बोलत होतो. त्याच दिवशी आम्हाला एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी जवळपास सारख्या असल्याचं समजलं. ट्रेकिंग, बाईकवर भटकंती, पाउस, कॉफी, फालतु पिक्चर्स आणि पुस्तकं, ह्या समान व्यसनांमुळे आमची मैत्री घट्ट व्हायला लागली. ट्रेकहुन परत निघताना माझ्या चलकटह मैत्रिणींनी तिला माझ्या गाडीवर भाग पाडलं आणि स्वतः तिची गाडी चालवायला घेतली. माझ्या कपाळावरच्या आठ्या बघुन नंतर तिच्यासमोर ग्रुपच्या सांकेतिक भाषेमधे चिडवाचिडवी चालु झाली. खोटं का बोलु, खुलेआम चिडचिड करत असताना मनामधे कुठेतरी गुदगुल्याही होतं होत्या. कदाचित ह्याचं क्षणाला माझ्या मनानी, "She's the One" चा निर्णय कुठेतरी घेतला असावा. ह्या ट्रेकनंतर हळुहळु ती माझ्या ग्रुपमधे साखरेसारखी मिसळुन गेली. आधी दुसर्याशी ओळखं करुन देताना ही माझी कॉलेजमधली मैत्रिण अशी ओळखं करुत देत असे. त्याऐवजी ही माझी जिवलग मैत्रिण अशी ओळख कधी करुन देउ लागलो हे माझं मलाही समजलं नाही आणि तिलाही.
तिसर्या सेमिस्टरचा निकालही असाचं महिन्याभरानी कधीतरी लागला. अपे़क्षेप्रमाणे तिला ५/५ विषयांमधे उत्तम मार्क्स पडलेले होते आणि मला ४/५ मधे छान मार्क्स होते. एम-३ च्या बॉलनी मात्र अगदी एकाच वेळेला बॅटची कड लागुन, त्रिफळा उडवुन परत विकेट किपरच्या हातात अलगद झेल द्यावा इतकी ट्रिपल विकेट शुन्यावर काढलेली होती. कुठल्यातरी विषयात नापास व्हायची पहिलीचं वेळ ही. त्यामुळे कितीही निर्लज्जपणाचा आव आणला तरीही कुठेतरी दुखावलो गेलेलोचं होतो. समदुख्खी मित्रांबरोबर हे शेअर करायची सोय नव्हती कारण प्रत्येकी किमान २ च्या दरानी त्यांचे विषय राहिलेले त्यामुळे वासरात लंगडी गाय शहाणी अशी माझी परिस्थिती. एकाशी बोलायला गेलो तर, "भो****, तुझा एक राहिलाय माझे ३ राहिलेत म्हणुन माझी सप्रेम बोळवण करण्यात आली. त्यामुळे कँटीनच्या जवळ एक छान वडाचं झाडं होतं. त्याच्या पारावर जाउन झाडाला पाठ टेकवुन डोळे मिटुन बसलो. थोड्या वेळानी डोक्यामधे हलकीचं टप्पल बसली आणि चिडुन मी डोळे उघडले. समोर ती आणि तिची आय.टी.वाली मैत्रिण उभ्या. तोंडामधे आलेल्या शिव्या कश्याबश्या गिळल्या आणि कसानुसा हसलो. "आर्यभट्टा, तु म्हणे एम-३ मधे शुन्याचा शोधं लावलास परत", इति ती. चायला दुखत्या नसेवर कसं नाचायचं हे मुलींकडुन शिकावं. सगळा राग आणि ताण गिळुन मी हसायला लागलो. "चला, आर्यभट्टमहाराज, कॉफीची ९० एम.एल. लाउ आपण कँटिनला म्हणजे बरं वाटेलं तुला" असं म्हणुन तिनी मला उठवलं. पुढचा एक तास एवढा वेड्यासारखा हसलोय की आपला एम-३ उडालाय हे विसरायला झालेलं मला.
असाचं वेळ जात राहिला, भटकंती, पावसात यथेच्च भटकणं, ट्रेक्स, गप्पा आणि अपरिमित खादाडी चालुचं राहिली. दिवसभर एकत्र असतो हे कमी पडतय का म्हणुन रात्रीही उशिरापर्यंत गप्पा चालु झाल्या. इंजिनिअरिंगच्या तिसर्या वर्षाला असतानाचं मला, माझं तिच्यावर प्रेम आहे ह्याची जाणीव झालेली. इंजिनिअरिंगची चौथ्या वर्षाची परि़क्षा झाली की तिला मागणी घालायची असा निर्णय मी मनाशी पक्का केलेला होता.
एक वर्ष एम-३ मुळे वाया जाउन शेवटी इंजिनिअरिंगही डिस्टिंक्शन्मधे पुर्ण झालं. ती माझ्या आधी इंजिनिअर झाली. पुढचे दहा महिने मिळालेल्या कंपनीमधे नोकरीसुद्धा केली. आणि एम.बी.ए. एंटरन्स च्या तयारीसाठी तिनी नोकरी सोडली. पुढच्याच वर्षी मीही इंजिनिअर झालो. हातामधे उत्तम नोकरीही होतीचं त्यामुळे वाय.डी. मुळे पुढे गेलेला तिला मागणी घालायचा निर्णय आता अंमलात आणायची वेळ आलेली होती. वाट बघत होतो ती एका मस्तं पावसाळी ट्रेकची. ऑगस्ट महिना उजाडला. मी मस्तं सुट्टी टाकली दोन दिवसाची आणि छान ट्रिप प्लान केली. मित्रमंडळाला पुर्वकल्पना देउन ठेवली. तिकोण्यावर (जिथे मी आणि ती पहिल्यांदा एकत्र ट्रिपला गेलो) तिला मागणी घालायची माझी कल्पना होती. तिथे बुके, चॉकलेट्स आणि कॉफी पोचवायची जबाबदारी माझ्या कंपुनी घेतली. मागणी घालायच्या आदल्या रात्री मी एवढा अस्वस्थ झालो होतो की जवळ जवळ तो निर्णय रद्द करायच्या बेतात आलेलो होतो. सकाळी गाडीवर बसताना सुद्धा माझे हातपाय थरथर कापत होते. कसाबसा तिला पिकअप करायसाठी तिच्या घरी पोचलो.
जगातली कुठली मुलगी वेळेत तयार होते? ह्या जगप्रसिद्ध वाक्याला जागुन मॅडम २० मिनिट वाट बघायला लावुन शेवटी बाहेर आल्या. तिच्या आई-बाबांशी गप्पा मारतानासुद्धा त्यादिवशी मला त त प प होतं होतं. तिचे बाबा एक वयाचा फरक नसता तर अगदी जवळचे मित्र झाले असते एवढे छान फ्रेंडली आहेत. त्यादिवशी त्यांनी मला विचारलं सुद्धा, "का रे बाबा, आज तुझी तब्बेत खराब दिसतीये. आज काहितरी बिनसलं आहे तुझं". शेवटी एकदाची ती तयार होउन आली. वर्थ वेटिंग ह्या शब्दाचा अर्थ कळला त्या दिवशी. घरातुन बाहेर पडुन गाडीवर बसलो तेव्हा हातापायातलं त्राण गेल्याची जाणिव दुप्पट झालेली. ती मागे बसली आणि खांद्यावर एक हात ठेवलान तेव्हा पोटात चक्क काहितरी उलटसुलट फिरलं असावं एवढं विचित्र वाटलं. गाडी फर्स्ट गिअरमधुन काढताना चार वेळा बंद पाडली मी त्या दिवशी. विचित्रचं सगळं. एरवी मी अगदी झोपेत गाडी चालवली असती तरी बंद पाडली नसती. गाडी काढुन लोणावळ्याच्या दिशेनी निघालो. तळेगावला मित्र मैत्रिणी भेटणार होते तिथे पोचलो. एवढ्या आख्ख्या प्रवासात दोन वाक्य जेमतेम बोलली असतील तिच्याशी.
तळेगावशी मित्रमंडळ भेटलं. इशार्यांनीचं सबकुछ अॅज पर प्लान असल्याचं समजलं आणि मी थोडासा निश्चिंत झालो. तिकोण्याच्या पायथ्याशी आलो. अजुन एक किंवा दिड तासामधे मी माझ्या आयुष्याचा तोपर्यंतचा सगळ्यात मोठा निर्णय मी घेणार होतो. आयुष्यामधली एक अनिश्चितता संपवणार होतो. कानफटात खायची तयारी ठेउन मी गडाच्या ट्रेकला सुरुवात केली. आज माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पावसानीही हजेरी लावली. तिच्या आवडत्या पावसामधे तिला मागणी घालायचा प्लान बहुतेक पुर्ण होणारचं होता.
(क्रमश:)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त!
आणि हो, मी पयला!!!
हम्म हम्म, चला बघुया, पुढे
मस्त सुरुवात
छान काढा भो खपल्या तुम्ही. :(
प्रा डॉ, (काल्पनिक!) प्रतिसाद लई भारी!
पुभाप्र.
क्रमशः असल्याबे...
सुंदर.. :) पुभाप्र..
सुरेख सुरूवात
जबराट, लिहा लवकर