Welcome to misalpav.com
लेखक: डॉन व्हिटो कॉर्लिऑन | प्रसिद्ध:
पाउस, ती आणि मी- भाग १ कानफटात खायची तयारी ठेउन मी गडाच्या ट्रेकला सुरुवात केली. आज माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पावसानीही हजेरी लावली. तिच्या आवडत्या पावसामधे तिला मागणी घालायचा प्लान बहुतेक पुर्ण होणारचं होता. ----> मुलींचा सिक्स्थ सेन्स पक्का असतो का मी त्यादिवशी विचित्रासारखा वागत होतो हा प्रश्ण मला कधीचं सोडवता आलेला नाही. कारण जसजसा किल्ल्याच्या वरच्या जिन्याकडे सरकत होतो आम्ही तसतसं ती मला बोलता करायचा प्रयत्न करत होती. माझं हलकट मित्रमंडळ बाउन्सर वर बाउन्सर टाकत होतं. बाकीची वेळ असती तर कदाचित मी त्यांच्यामधे सामिल होउन मस्ती केली असती, पण आज एवढा ताण आला होता की मी बोलायसाठी तोंड उघडलं असतं तर कोणालातरी नकळत दुखाउन बसलो असतो. त्यापेक्षा शांतपणे जे होइल त्याला सामोरं जायची मानसिक तयारी मी सुरु केली होती. ज्यानी माझ्यासाठी बुके आणि बाकी जामानिमा आणला होता तो कोणाच्याही लक्षात नं येता पुढे निघुन गेला आणि ठरवलेल्या ठिकाणी जाउन त्यानी बुके आणि बाकी जामानिमा लपवला. पावसाचा जोर भयानक वाढला होता. त्यामुळे आम्ही तिकोण्याच्या उभ्या जिन्याच्या आधी एक छोटासा दरवाज्यासारखा आडोसा आहे तिथे थांबलो. मी एकीकडे आणि ती बरोबर दुसर्‍या बाजुला. जवळ-जवळ २० मिनिटं आम्हाला तिथंचं उभं रहावं लागलं. ब्रम्हदेवाची २० मिनिटं वाटली मला तेवढ्या वेळात. माझी एक त्यातल्या त्यात समजुतदार मैत्रिण माझ्या जवळ उभी होती. मी तिला म्हणलो, "प्लान कॅन्सल. माझ्याच्यानी नाही होणार हे. उगीचं एक चांगली मैत्रिण दुरावायची ह्या लफड्यामधे." तिनी काहीही नं बोलता माझ्या कानाच्या पाळीला जोरदार टीचकी मारली. डोक्यात पार झिणझिण्या गेल्या. हिच्याशी बोलुन काही उपयोग नाही एवढा संदेश मात्र मेंदुपर्यंत गेला. बाकी दुसर्‍या मित्रांशी बोलण्यामधे काही अर्थ नव्हता. त्यांनी त्याच गुंफा कम दरवाज्यामधे माझं स्मृतीस्थळ उभारलं असतं. पावसाचा जोर कमी झाला तसा आम्ही तो सरळ जिना पार करुन गडाच्या माथ्यावर पोचलो. बरोबरचे मित्रमैत्रिणी तिला कळणार नाही अश्या बेतानी हळुहळु मागे पडायला लागले. बुकेवाला मित्र अलगद त्यांना सामिल झाला. लांबुनचं अंगठा उंचावुन त्यानी खुण केली. झालं. तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का की तुम्ही एकाचं वेळी खुप आनंदामधे आणि ताणामधे आहात? तुमच्या हृदयाची धडधड तुम्हाला स्वतःलाचं जाणवतीये. ही स्थिती अनुभवायची माझी पहिलीचं वेळ. ७०-८० पावलं चालल्यावर आमचं खुणेचं ठिकाण आलं. तिकोण्याचा हाय पॉईंट. इथल्या मंदिराच्या मागे माझा खजिना असणार होता. ती जागा आली. मी तिच्याकडे एकदा बघितलं. तिचं मात्र लक्ष वरती बागडणार्‍या माकडांकडे होतं आणि तोंडावर होतं निखळ हास्य. काय करतोय मी? तिला आत्ता विचारलं आणि तिला नाही पसंत पडलं तर आपल्याला हे हास्य परत पहायला मिळेल? आपली मैत्री पुर्वीसारखी निखळ राहिल? त्या एका क्षणामधे केवढे प्रश्ण डोक्यात येउन गेले. मागे वळुन मित्रमंडळाकडे नजर टाकली तर सगळे एकटक आमच्याकडे बघत उभे होते. हे एक वाढीव टेन्शन. शेवटी अंगात असेल नसेल तेवढं धैर्य एकवटुन मी तिला म्हणालो, "जरा ह्या बाजुला येतेस?". मी बर्‍याचं वेळानी तिच्याशी बोलल्यानी असेल म्हणा किंवा तिची लागलेली तंद्री एकदम भंगल्यानी असेल म्हणा ती जराशी दचकलीचं. पण काही न बोलता माझ्या बरोबरीनी थोडीशी बाजुला आली. मी, "जरा डोळे मिटतेस?" ती, "का?" मी, "मिट ना गं." ती, "नाही, तु गेल्या वेळसारखं अंगावर सुतळी टाकुन साप साप ओरडलास किंवा झुरळाची ट्रिक केलीस तर काय." मी, "प्लीज डोळे मिट गं. सिर्यसली सांगतोय". ह्यावर काही नं बोलता तिनी डोळे मिटले. मी लपवलेला बुके काढला, तिच्या अगदी जवळ गेलो आणि तिच्या हातामधे बुके दिला. तिनी हळुचं डोळे उघडले. तिला काहीही बोलायची संधी नं देता मी माझ्या ओठांवर तर्जनी ठेवुन. शु:. काही बोलु नकोस ची खुण केली. तिचे दोन्ही हात त्या बुकेसकट हातात घेतले. तिचे हात थरथरत होते. कदाचित आता काय होणार ह्याची उजळणी त्या एका क्षणात तिच्या मेंदुन झाली असावी. ह्याचं क्षणी मी तिला म्हणालो, "***, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्नं करशील?". एवढं बोलुन होतयं नं होतयं तोपर्यंत माझं एकवटलेलं धैर्य संपलं होतं. गेले काही दिवस काय बोलायचं, कसं बोलायचं ह्याची केलेली तयारी त्या पडणार्‍या पावसात धुवुन गेलेली होती. एवढा वेळ तिच्याकडे बघणारा मी एकदम जमिनीकडे पहायला लागलो होतो. तिच्याकडे नं बघताही तिच्या डोळ्यांमधे काय भाव असतिल हे मला समजलेलं होतं. आता वाट पहायची होती ती तिच्या उत्तराची. ते काही निशःब्द क्षण मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत विसरु शकणार नाही ह्याची मला खात्री आहे. माझ्या हाताला तिनी बारिक चिमटा काढला. मी धैर्य एकवटुन तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहेर्‍यावरचे भाव पाहुन मी तिच्या चौपट प्रेमात पडलो कि जागेवर. आधीचं पाउस, त्यामधे खाली बघुन लाजणारी ती आणि गोंधळलेला मी. I am ready to sell my soul to Satan just to live that moment again. आम्ही दोघंही तिथल्या एका दगडावर बसलो. ५ मिनीटं तिही काही बोलायला तयार नाही आणि मला काय बोलायचं हे सुचायला तयार नाही अश्या विचित्र अवस्थेमधे गेली. शेवटी मीचं धीर एकवटुन तिला विचारलं, "चिडलीयेस का?" ह्यावरही काही उत्तर नाही. परत एकदा तिच्या खांद्यांना गदागदा हलवुन हा प्रश्ण विचारला. त्यावेळेला मात्र तिला जरा कंठ फुटला. ती, "मी असा तडकाफडकी निर्णय घेउ शकत नाही. मला वेळ हवाय काही दिवसांचा." मी, "तुला हवा तेवढा वेळ घे गं" (मनातल्या मनात मात्र आत्ता सांग ना गं असं) ती, "दोन महिने थांबशील? मला आईबाबांनाही सांभाळायचयं" मी, "काहीही हरकत नाही." माझी काहीचं हरकत नव्हती. मनातलं बोलुन दाखवल्याचा आणि नकार पदरात नं पडल्याचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. फटाककन चॉकलेट्स काढली लपवलेली. बॅगेत ठेवुन त्यांचा पार लगदा झालेला. जोरात शिट्टी वाजवुन मित्रमंडळाला बोलवुन घेतलं. बातमी आनंदाची नसली तरी दुख्खाची नाही हे कळल्यावर त्यांनाही हुश्श्: झालं. मगाशी कानपिचकी मारलेली मैत्रिण मला येउन म्हणते कशी.," सोप्पं तर होतं, उगीचं घाबरलेलास." असं म्हणुन हसायला लागली. तिच्या हसण्यामधे माझ्या तिच्यासकट सगळे सामिल झाले. चायला, गेले चोवीस तास मला पार उर्ध्व लागलेला त्याच्याशी ह्या लोकांना काडीचही घेणंदेणं नव्हतं. माझी ती मात्र एका मैत्रिणीच्या कुशीत तोंड लपवुन बसलेली. ती मैत्रिण पण अगदी, "आता मला नाही मिठी मारायची" वगैरे म्हणुन आधीचं लागलेल्या वाटेमधे खड्डे खणायचं जोरदार कार्य करत होती. अशीचं दंगामस्ती करत तो दिवस आणि ट्रेक संपला. दिवसाअखेरपर्यंत असलेले ताणतणावही संपले. परत गप्पा मारायला सुरुवात केली. ------- मी आपला दोन महिने कधी एकदा सरतायत ह्याची वाट पहात होतो. दरम्यानच्या काळामधे मी सुद्धा नव्या कंपनीमधे जॉईन झालो. थोड्याचं दिवसात कामामधे व्यस्त झाल्यानी वेळ कसा जायला लागला हे समजायचचं नाही. मागणी घालुन महिना दिड महिना उलटला होता. ती एम.बी.ए. एंट्र्न्स साठीची तयारी जोरात करत होती. आमच्यामधे ह्या विषयावर ती उत्तर देईपर्यंत परत बोलायचं नाही असा अलिखित करार झालेला होता. त्या आठवड्यामधे ती आणि तिची मामे-मावस भावंड वगैरे साउथ इंडियन ट्रिपला जाणार होती. त्याप्रमाणे गेलीही. तिकडचे फोटो फेसबुकवर अपलोड करणं, ऑर्कुटवर टाकणं वगैरे कार्यक्रम जोरात चालु होते. बुधवारची संध्याकाळ झाली, उद्या गुरुवारी मला सुट्टी असल्यानी मीही निवांतपणे पी.एस.३ वर असासिन्स क्रीड खेळत बसलो होतो. तेवढ्यात माझा फोन खणखणला. तिचाच फोन होता. झडप घालुन मी उचलला. पलीकडुन अनोळखी व्यक्ती बोलतं होती. कोणीतरी इन्स्पेक्टर किंवा हवालदार असावा. लास्ट डायल्ड नंबरवरती त्यानी फोन केला होता. मि.****? धिस कॉल इज रिगार्डिंग इन्फॉर्मिंग यु अबाउट सिव्हिअर कार अ‍ॅक्सिडेंट टु मिस. ***. शी इज क्रिटिकल. वन अनआयडेंटिफाईड को-पॅसेंजर इज डेड ऑन द स्पॉट. विल यु प्रोव्हाईड अस विथ डिटेल्स ऑफ इमेजिएट फॅमिली काँटॅक्ट्स. त्यच्या शी इज क्रिटीकल ह्या वाक्यानंतरचं एकही वाक्य माझ्या डोक्यात शिरायला तयार नव्हतं. मी फक्तं हं हं म्हणुन मटकन खाली बसलो. काही मिनिटं डोकं ताळ्यावर यायला लागली. आधी आमच्या जवळच्या मित्राला फोन केला. तो लगेचं घरी आला. दोघं मिळुन तिच्या घरी गेलो. तोपर्यंत तिकडेही बातमी समजलेली होती. तिकडे रडारड चाललेली होती. आम्ही पहिल्यांदा फ्लाईटची चार तिकिट्स काढली, आणि दोन तासामधे तिकडे जायला निघालो. तिकडे पोचुन हॉस्पिटलमधे पोचलो. तिकडे आधी पोलिसी सोपस्कारांना तोंड देता देता तोंडाला फेस आला. त्यामधुन भाषेची अडचण. माझ्या मित्रानी माझी सुटका केली आणि मी हॉस्पिटलमधे गेलो. आय.सी.यु. मधे सोडत नव्हते. तिच्या आईबाबांना कसंबसं आतमधे सोडलं आणि लगेचं बाहेर काढलं. तिचे बाबा बाहेर आल्या आल्या माझ्या खांद्यावर कोसळले. आई शुन्यामधे नजर लावुन बसलेली. मला कधी एकदा तिला पहातोय असं झालेलं. तरीसुद्धा सालं पोलिसी सोपस्कार काही पाठ सोडत नव्हते. दुसर्‍या दिवशीची दुपार उजाडेपर्यंत तिचे बाकीचे नातेवाईकही पोचले. तिच्या गेलेल्या मावस किंवा मामेभावाच्या फॉरमॅलिटिज पुर्ण करायला लागले. तिच्यावर तिकडे उपचार होउ शकणार नव्हते हे तर निश्चित होतं. तिला मुंबईला हलवायचं ठरवलं. अजुन एक दिवसानी तिला विमानानी मुंबईला हलवलं. ह्या ४८ तासामधे तिला फक्त अँब्युलन्स मधे हलवताना ओझरती दिसली. माझं डोकं पार फुटायची वेळ आली होती. सगळे मुंबईला गेले. पुढच्या दोन दिवसांमधे कधीतरी एकदा मला तिच्याकडे दोन मिनिटांसाठी जायची संधी दिली गेली. आत गेल्यावर औषधांच्या प्रभावाखाली असलेल्या तिला पाहुन मी मुळासकट हादरलोय. तिचा बँडेज नसलेला डावा हात मी हातामधे घेतला तो एक क्षणभरचं. तेवढ्यात तिथल्या ड्युटीवरची नर्स अंगावर अक्षरशः धावुन आली. पेशंटको टच नही करनेका असं ओरडत. तिची काय चुक म्हणा. आज तिचा एक आवाज ऐकायसाठी मी काहीही करायला तयार होतो. दोन मिनिटांमधे मला बाहेर काढण्यात आलं. तिला जिवंत पाहण्याची ही माझी शेवटची वेळ. पुढचे तीन दिवस झगडुन शेवटी ती गेली. मला एकट्याला सोडुन, कुठल्याही प्रश्णाचं उत्तर नं देता गेली. दोन महिन्यांचं प्रॉमिस मोडुन गेली. मला नेहेमी आनंद देणारा पावसातला ट्रेक आज माझ्यासाठी एक भळभळती जखम बनलाय. गेल्या पाच वर्षात किल्ला, डोंगरदर्‍या आणि तिथला पाउस कसा असतो हे मी पाहिलेलं नाही. ती आणि मी जिकडे जिकडे एकत्र फिरलोय त्या जागा आज नकोश्या झाल्यात. कॉलेज अ‍ॅल्युमनी ला औपचारिकता म्हणुनही हल्ली जाववतं नाही. पण ह्यातुन मी बाहेर नक्की येणार ह्या पावसाळ्यामधे. ह्या पावसाळ्यात तिकोण्यावर नक्की जाणार. त्या ठिकाणी परत जाणार. तिचं अस्तित्व कदाचित तिथे जाणवेल मला. अनुत्तरीत प्रश्णांची उत्तर कदाचित मिळतील मला. नाही मिळाली तर आहेचं भुतासारखं उरलेलं आयुष्य. फक्त आईवडलांसाठी यंत्रवत जगणं. मित्रांच्यामधे खोटा आनंदी मुखवटा घालुन मिसळणं. मला खात्री आहे, हे ज्या दिवशी संपेल त्या दिवशी ती भेटेल. परत एकदा खळखळुन हसेल आणि म्हणेल," देर आये दुरुस्त आये/ चल आता कॉफी घेउ." तिथेही कदाचित असाचं धुंद पाउस असेल पण त्या पावसामधे मी एकटा नसेन. -समाप्त-
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कथा सत्य असेल असे वाटते. व्याकुळता अगदी वरीजनल उतरली आहे. प्रेम म्हटलं की मिलना बिछड़ना. पण तुमची सखी अशी सोडून जावी हे दुर्दैवंच. कथेतलं पात्र तुम्ही असाल तर सावरण तसं कठीण, पण काळ हेच त्यावर औषध, सतत तुमच्या भोवती आठवणीचा पिंगा असेल, अशा प्रसंगातुन बाहेर पडणं तसं मुश्किल असतं, सालं सल्ला तरी अशा वेळी काय द्यावा ? मी आज माझ्या मैत्रीणीला म्हणनार आहे - तुम नफरतो के धरने पर क़यामत तक बैठो मै अपने प्यार से कभी इस्तीफा न दुंगा... :) -दिलीप बिरुटे

पहिला भाग खुप सुरेख ... अगदी माझ्या आयुष्यात घडलेलाच भाग येथे वाचतोय काय असे झाले.. दूसर्या भागात मात्र हृद्याच्या ठिकर्या झाल्या... खुप वाईट वाटले... त्या पेक्षा तिचे दूसर्याशी (आमची कथा :)) लग्न झाले असते तरी चालले असते.. निदान दूर .. कोठे तरी ती अजुनही तशीच आहे असे माहिती तरी असते असे वाटले...