Welcome to misalpav.com
लेखक: गणेशा | प्रसिद्ध:
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे.. अपेक्षित रिप्लाय येतिल याची खात्री तरी आता नाही.. आता असेच जे वाटेल ते लिहितो आणि सुरुवात करतो .... बघु काय होयील .. काहीही लिहित आहे.. पॅरेग्राफ.. वन लायनर.. कविता .. वाट्टेल ते .. एकदम मनातले... एक विनंती : या धाग्यावर .. रिप्लाय मध्ये थोडे लिखान .. जे वरच्या पॅरेग्राफचे मत आहे त्यानुसार त्या अर्थाने किंवा विरुद्ध अर्थाने आपले मत लिहावे... धाग्याबद्दल.. किंवा इतर रिप्लाय शक्यतो नसावेत.. एक अखंड विचार शृंखला येथे व्हावी ही इच्छा ! एकट्या माझेच रिप्लाय नसावेत ही इच्छा .. सर्वांचे लिखान असावे अशी आशा... तसे नसले तरी दिवसातुन एकदा मीच मला लिहितो येथे मग.. सुरवातीला एक दोन रिप्लाय मीच लिहितो म्हणजे अंदाज येइल
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आज शुक्रवार ... सुट्टीचे दिवस मात्र शनिवार - रविवार असले तरी मनाचा सुट्टीचा दिवस शुक्रवार ... शुक्रवारी मन खुप मुक्त पणे भरकटते... कधी ते असेच सरळ त्या काळसर डोंगरावर चढुन जाते... कड्या-कपारीतुन फिरुन येते... उन्हातान्हातुन .. सावलीतुन हळुच गिरकी घेवुन येते कधी झाडांच्या फांदीवरुन.. पानांवरुन हलकेच परत येते... कधी मिट्ट काळोख्या रात्रीतील त्या अमुर्त स्वप्नाला अलगद मिठी मारुन येते... कधी हलकेच घराच्या खिडकीतुन पहात राहते... खिडकी.. खिडकी ही मनाची अशी जागा.. की त्यातुन दिसणार्‍या इवल्याशा आभाळावर ही मन आपले राज्य प्रस्तापित करु पाहते... तासन तास त्या आभाळाच्या तुकड्यावर प्रेम करत, ताटकळत उभे असते... आपले अस्तित्व त्या आभाळाकडे जणु ते सुपुर्त करुन देते... मनाचे अस्तित्व कोणी मान्य करो वा न करो .. त्या आभाळाने कदाचीत ते मान्य केले असेल . ------- २९/५/२०१५, १४:३२

आज आभाळ भरुन आलंय. मला भरलेलं आभाळ फार आवडतं कारण त्यातूनच बर्‍याच वेळा पाऊस येतो. मागच्या पावसाळ्यात कुठे बाहेर भटकणं झालंच नाही फारसं. याखेपी मात्र भरपूर फिरायचा विचार आहे. मी विचार फारसा करत नाही असे लोक म्हणतात. काही लोक तर तुम्ही निरथक अत्मरंजन करताय असंही म्हणत असतात. निरर्थक अत्मरंजनातूनच माणूस भ्रमवादाचा बळी ठरतो. हल्ली तर आत्मकुंथित भ्रमवादाची मोठी फ्याशन आहे....

आम्ही कामगार वर्गात मोडत असल्यामुळे शुक्रवार हा आमच्या साठी आठवड्याचा पहिला दिवस. कालच्या दिवसभरात बायकोनी हातात टेकवलेल्या यादीमधली कोणकोणती कामे राहीली आणि ती आता कशी करायची, पुढच्या गुरुवारवर काय ढकलायचे, त्याचे हिशेब मांडत, आणि आज दिवसभरात ऑफिसमधे काय करायच ते ठरवत पोचले की समोर दुसरेच काहीतरी (साहेबांच्या मते) अतिमहत्वाचे वाढुन ठेवलेले असते. त्यातच वाया जाणारा शुक्रवार दिसत असतो. आपण आपल्यावरच (आणि साहेबावर) चडफडत काम सुरु करावे तर गणेशा सारख्या कोणत्या तरी मित्राचा फोन येतो "शनिवार रविवारचा काय प्लॅन आहे? येतोस का राजगडावर?" मग आम्ही ओशाळावाणे हसत त्याला सांगतो आम्ही दत्तभक्त आहोत म्हणून. "अरे हो.. तू सांगीतले होतेस मागच्या वेळी. सॉरी विसरलोच. पण च्यायला बर आहे रे तुझे, गुरुवारी सुट्टी असल्या मुळे बाहेरची कामे तरी होतात. आम्हाला बाहेरची कामे कराची तर एक हाफ डे तरी वाया घालवायलाच लागतो." अशी मुक्ताफळे उधळत मित्र फोन ठेवतो. आणि आम्ही परत कामाचा ढिगारा उपसायला लागतो. पैजारबुवा,

अरे बाबा अस्तित्व कोठे कोणास असते .. त्या सुगंधाला ही माहीत नाही .. त्याचे अस्तित्व काय आहे ? .. त्या वार्‍याला ही माहित नाही त्याचे अस्तित्व कोठे आहे .. पण मग हे आकाश काय आहे.. त्याच्या अस्तित्वाची पुसटशी रेघ म्हणुन का क्षितिजापाशी ते खाली वाकलेले आहे... का निसर्ग त्याचे अस्तित्व दाखवत आहे.... अश्या नेक प्रश्नांची शृंखला मनात घर करुन आहे... कधी वाटते.. मनाप्रमाणे वागावे.. वाट्टेलसे.. पण कधी वाटते.. आपण उलट निट वागत आहोत.. समाजातील ह्या चालीरीती.. नियम आपण पाळत आहोत.. मन उगाच भरकटलेले आहे.. कधीही कुठेही कसे ही गेले तर चालेले का ? प्रत्येक प्रश्न .. त्याचे अस्तित्व यांना उत्तर खरेच द्यावे का ? मनाचे अस्तित्व मान्य केले तरी मनाप्रमाणे वागले तर कदाचीत येथे आपण वेडे ही ठरु शकु .. आपण नकी काय विचार करत आहे हेच आता कळत नाही.. मनापासुन आपण आचरणाचे नियम पाळत आहोत .. की आचरण करताना मनापासुनच आपण थोडे लांब चालत आहोत .... --- २९/५/२०१५, १४:४०

प्रश्नांच्या या पानगळीत... उत्तरे दवबिंदुंसम ओली.. हलकाच स्पर्श ओळखीचा... मग उरतात फक्त रिक्त जागा... उडुन गेली अशीच उत्तरे.. त्या प्रकाश किरणांसंगे.. जो दाखवे वाट जगाला.. त्यातच उत्तरे विलीन जाहली.. मग प्रश्न का उरले येथे.. का अस्तित्व ना मिटले काही.. का ओळखीच्या खाणाखुणा शोधतो जणु मी त्यावरी असेच सरली वर्षे .. असेच संपले सारे.. आयुष्याच्या शेवटाला तरी प्रश्न का उरतोच आहे ? ----- २९/५/२०१५, १४:५४

आभाळ भरुन आलं की.. मला गच्च हुंदक्यांची आठवण येते.. का कोणास ठावुन .. तन भिजवणारा पाऊस माझं मन कदाचीत भ्हिजवत नाही.. कोरड्याच मनाने मी पाहतो मग .. भरुन आलेल ते आभाळ.. ते गच्च आभाळ.. कधीतरी मनाची कोरडीच वीज चमकते .. आणि उठतो आगडोंब मनात... हे मानाचे काहुर ... कसे थांबवावे .. काहीच कळत नाही... हलकेच नंतर पाहताना .. आभाळ निवाळलेलं असत मनात मात्र तेच आभाळ पुन्हा पुन्हा भरुन येत राहते .. बस्स असेच पुन्हा पुन्हा भरुन येते...

शनिवारी ..रविवारी सगळी मित्र मंडळी.. अशीच फिरायला जातात... आमच्या गुरुवारच्या सुत्टीमध्ये कामे होतात म्हणुन म्हणे त्यांना कौतुकेच जास्त असतात.. डोंगरावरच्या मैनीची ओढ बाकीच्यांना असते.. काटेरी झुडपात तीची अवस्था मात्र आपल्यासारखीच असेल असे सहज वाटुन गेले... आज मी असाच काम करत होतो ... ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? " मी : का गं ? ती : अरे त्याच्याबरोबर ट्रेकिंगला चालले आहे शनिवार- रविवारी, तुला सुट्टी असते गुरुवारी मला खुप कामे आहेत नेमकी ऑफिसला .. तु करशील का ? मी.. हो .. मी (मनात) : दत्त गुरु हे बरे नव्हे .. हलकेच फुलपाखरु जवळ यावे.. आणि ते पुन्हा दूसर्याच्या कळपात शिरावे... हे फक्त तुमच्या ह्या वारामुळे .... तुम्ही तरी हे मनाचे दु:ख समजुन घेताल का ? --- २९/५/२०१५, १५:०८

ती : " अरे... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
च्या ऐवजी
ती : " दादा... गुरुवारी माझे जरा हे बँकेचे काम करताल का ? "
असे हवे होते का? पैजारबुवा,

प्रश्र्णांची भिजकी पाने पाठीवर माझ्या पडता उरफोडून धावत सुटतो फिरुनी क्षणही न बघता गलितगात्र मग एक पळी मी कोसळता धरणी वरती देवाचा धावा करतो मी मज तारुन नेण्यासाठी, देवावर ठेवून भिस्त मी दबकत दबकत वळतो पाचोळा पाहून मागे मी क्षणभर मलाच हसतो, पैजारबुवा,

@ पाचोळ्या: पाचोळ्या, मी पाहिलं तुला, डोंगरकडेवरुन तु स्वताला झोकुन देत होतास ... पण का ? कश्यासाठी ? मी असाच फिरत होतो ... तुला मी मुक्त वाटतो .. पण मी स्वैर भतकत असतो.. मलाही नाही कुठलीच दिशा... असेच अस्तित्व वेदणेचे मी पंखांवर घेवुन फिरतो डोंगरदरयामध्ये.. झाडातुन.. पानांतुन.. अनी मित्रा तुझ्या सोनेरी पाउलवाटेवरुन ही.. रोज सकाळी तुला वाटते.. कोण बरे ही असंख्य दवरुपी आसवे तुझ्या अंगावर ठेवुन जातो ... तो मीच आहे.. माझ्याच अस्तित्वाच्या त्या विखुरलेल्या खुणा आहेत.. तर हा , तुला पाहिले मी त्या दोंगरमाध्यावरती.. मी अलगद आलो .. तुला झेलण्यासाठी.. तु हळुच वार्‍यासंगे डुलत खाली चालला होता... मी आलो तुझ्यापाशी .. तर तु पुन्हा चिंब ओला झाला होता.... मग हातात हात घेवुनी आपण तेथेच विसावलो त्या तिथल्या झाडाखाली... असंख्य तुझ्या प्रश्नांना मी प्रश्नांचीच उत्तरे देत होतो .. आठवते ना तुला ? -------- २९/५/२०१५, १५:४५

साले आभाळही आता पहिल्या सारखे आपले राहिलेले नाही त्याच्या कडे बघताना आता मन पहिल्या सारखे प्रसन्न होत नाही उलट तिच्या आठवणींनी डोळ्याच्या कडा मात्र ओल्या होतात आणि मग ढगाच्या एखाद्या तुकड्या मधे तिचा चेहरा शोधू लागतात तेवढ्यात सूर्यावर एखादा काळा कुळकुळीत ढग येतो तिच्या सोबतीने भिजलेल्या पहिल्या पावसाची आठवण करुन देतो त्या नंतर जोरदार वार्‍याची आणि कडाडणार्‍या विजेची पाळी असते क्षणभर चमकणार्‍या त्या उजेडामधे मला घट्ट बिलगलेली ती मला दिसते .... क्षणभरच....मग... अंगावरची शाल आणि कानटोपी आणखीनच घट्ट लपेटत मी उठतो आणि दारे खिडक्या बंद करुन डोक्यावरुन पांघरुण ओढून झोपतो नातवंडे म्हणतात म्हातारपण फार वाईट, अजोबांना आजकाल काहीच सहन होत नाही मी मनातच म्हणतो, खरच वाईट कारणजे सहन होत नाही ते कोणाला सांगताही येत नाही. पैजारबुवा,

असा शिल्लक रिप्लाय देणार नव्हतो .. पण ही कविता आता पर्यंतच्या सर्व रिप्लायमधील एक हिरा आहे, अत्यंत उत्कट .. निस्सिम ... याला उत्तर लिहिणे अवघड आहे.. सहज आठवले आधीचे सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी

त्या दुरच्या डोंगरातून, शांतता पसरत खाली येते आणि मी माझ्याच चौकटीला टेकून उभा आहे, वेध घेत कशाचा ? त्या दुरवरच्या डोंगरावर आपटून येणारे माझे विचार भविष्यात ( ?) तर परावर्तित होत नसतील ना ?

तुझ आभाळ मला दे .. माझ आभाळ तुला .. झाकोळल ज्या हाताने सूर्याला तो जख्मी झालेला सुर्य ही मावळताना मला सोनेरी किनार परिधान करतो.. असंख्य तांबडे पिवळे रंग माझ्यावरती टाकतो ... बघ तु जेंव्हा माझ्याकडे पाहतो , तेंव्हा मी तुला अशीच दिसते का रे ... तांबडे कुकू कपाळावर ल्यालेली .. सोनेरी किनारेची साडी नेसलेली .. सांग ना .. अगद्दी तसीच का रे आहे मी अजुन तुझ्या डोळ्यात .. अन मग बरसतो पाऊस तुझ्या माझ्या डोळ्यात ... अंधुक होतात काळाचे पडते ... अन .. ते काळे क्षणही... फक्त क्षणभर ... मग ... तू पुन्हा सकाळी उठलेला असतो .. सूर्याच्या जखमा कधी कोणास दिसल्यात का ? बस्स .. माझे रुप पाहण्यासाठी तो मात्र त्याचे रक्त त्या जखमांमधुन संध्याकाळी असेच सांडवत असेल ... तुझ्यासारखेच ------ तुझी ती २९/५/२०१५, १६:०७

निखारा नेहमी दुसर्‍याच्या तळहातावरच तेजस्वी भासतो मग आपण अशा पुरुषाची देव म्हणुन भक्ती करु लागतो खरेतर नियती प्रत्येकालाच समान संधी देत असते पण त्यावेळी बहुतेकांना वाळूत तोंड खुपसायला आवडते पैजारबुवा,

धन्यवाद... आता निघतो आहे, सोमवार-मंगळवारी पण सुट्टी टाकली आहे, तरी नेट गावाला चालल्यास येतो अधुन मधुन ... उद्या असेल शक्यतो थोडावेळ... पुन्हा लिहितो आल्यावर.. तो पर्यंत आनखिन रिप्लाय येवुद्या ... छान आहे सर्व .. पैजारबुवा खुप आभारी आहे तुमच्याशिवाय ही शृंखला जमलीच नसती असे वाटते.. तुमच्या आभाळ हे मनातील उत्कट भावनांचे चित्रण हे आजचे फलित ... सर्वांचे आभार ... आनखिन रिप्लाय येवोत ही इच्छा !

हे कसले तुकड्यातुकड्याचे आभाळ...मन रमत नाही यात...त्या खळाळणार्या रेवेत दिसणारं ओथंबलेलं आभाळ परत कधी दिसणार म्हणुन वाहणारे डोळे नक्की कशाची चाहुल देत होते...तुझ्या गमनाची वार्ता होती त्या आकाशाला....म्हणुनच नुसते भरुन आले होते ते....पुर्ण प्रवासात नर्मदेपेक्षा रेवाच जवळची वाटली रे....तीचेच प्रतीरूप.तरीही वेगळे अस्तीत्व दाखवणारे...आपलेही असेच नाही का?तुला माझ्यातुन वगळले तर बाकी काय उरेल...पण उरलेय अजून..तुझ्याशिवायचे सगळे ऋतु अनुभवत...फक्त आता तीचा राैरव नाही..अन् तुझी गाजही..पण आभाळ गाभूळतंच रे त्याच्या काळात...फक्त अनुभवायला तु नसतोस सोबत....असतो एक तुकडा आभाळाचा...मी आपला समज करुन घेते की बघतोयस तु..त्या आभाळाच्या झरोक्यातून..

नर्मदा किंवा रेवा सतत प्रवाही असतात, कुणासाठी थांबत नाहीत कारण माहित आहे?.... वहात रहाणे महत्वाचे हे त्यांना माहीत आहे... सतत वहात रहाणे... जगात केवळ एकच गोष्ट शाश्वत आहे आणि ती म्हणजे बदल...... काही कोटी वर्षांपूर्वी जेव्हा हा सूर्यही अस्तित्वात नव्हता तेव्हाही मी होतोच.... आजूबाजुला कितीही काहिही बदलले तरी..... कालही मी होतोच आजही मी आजही आहे आणि उद्याही असणारच आहे....निरंतर रहाणार आहे.... नर्मदाही मी आणि रेवाही मी, आभाळही मी आणि चारही़ ऋतू म्हणजेही मी, सूर्यही मी आणि काळही मीच. मी केवळ स्वतः कडे निरनिराळ्या कोनांमधून पहात राहिलो आणि हा खेळ बघता बघता वाढतच गेला..... कधी कधी मीच माझ्या या खेळात गुरफटून जातो...... आणि स्वतःच स्वतःला शोधत रहातो.... फार मजा येते असा स्वतःचा शोध घेताना..... पैजारबुवा,

मस्त रे गणेशा! या प्रकारच्या लेखनाचा हा विचारच भारी आहे. उस्फुर्त म्हणजे एकदम उस्फ़ुर्तच ! त्यासाराखे दुसरे भारी काहीही नाही. कारण त्याला कसलेही बंधन नाही. ना विषयाचे, ना वेळेचे, ना कोणाला आवडेल/नावडेल का? असल्या विचारांचे! मनात आले ते उतरवून गेलो. पुसले जाइल की राहील याची तमा न बाळगता! कोणाला आवडो नावडो ,स्वच्छंदि लिहिन मी कुणी जवळ थांबतय की नाही याची अर्थातच..तमा न बाळगता! एक ओळ होवो,वा एक पान भरो वाचलं गेलं तरी लिहिन , न गेलं तरीही!.. अगदी कुणी उघडून पाहिलं की नाही? याचीही तमा न बाळगता मग उस्फ़ूर्ततेचे उद्यान होइल, स्वच्छंदि बागडणाय्रा फ़ुलपाखरांसाठीचे! तिथे फ़ुलं असतील? ,नुसतीच पानं? ,की काटेहि??? .. निश्चितच! याचीही तमा न बाळगता!

@ पैजार बुवा...@ भाग्यश्री प्रवाह .... आहे ना ... गती आहेच.. पण हे वर्तुळ ...त्याचा परिघ... मला ओलांडताच येत नाहिये.. त्या गाभुळलेल्या आठवणी अजुनही पिंगा घालतात सभोवताली... त्या प्रत्येक क्षणांचे ओरखडे .. हो ओरखडेच आणि ते अजुनही काळाच्या पडद्याआड लपुन हळुच माझ्याकडे पाहुन खुदकन हसतात ... माझ्या मनाच्या झरोक्यातुन पुन्हा ते काळाला छेदुन जुन्या दिवसात जातात.. आणि माझे मन असे असंख्य ओरखडे घेवुन पुन्हा खालमानेने गपचुप निघुन येते... परिघ ओलांडण्याची किंमत माझ्या मनाला माहितेय... मी मात्र अजुनही त्या परिघावरील एक बिंदु बनुन राहिले आहे.. जगासाठी मी त्याच वर्तुळावर रोजचेच प्रवाही आयुष्य जगते आहे... आणि तुझ्यासाठी... हा तुझ्यासाठी मी अजुनही तेथेच आहे... त्या जागीच... त्या परिघावरच तुझी अजुनही वाट पहाते आहे...

काल रात्री पुन्हा पाऊस आला होता.. मी गच्चीत झोपलो होतो... त्याच्या त्या येण्याने झोप मोडली ... पण मग असे वाटले बरेच झाले... भरलेल्या आभाळाची ती मजा रात्रीत तरी मला निटशी घेता आली नसली तरी भटकण्याची एक चाहुल तेथे ही होती.. आजकाल असच होते... मनाच्या कप्प्यात असंख्य वादळे दाटलेली असतात.. आणि मग त्या करुन कहाण्यात आपण कधी ओढलो जातो ते कळतच नाही... पण त्या कप्प्यांमध्ये आत्ताचा स्पर्ष ही न झालेले कोवळे आभाळ ही बसु शकेल ना..? हा एक नविन कप्पा मला आता केलाच पाहिजे.. अगदी मनसोक्त भटकायच.. पाउस असाच झेलत पुढे चालत रहायचे.. निसर्ग..त्याचे विहंगम चित्रे पुन्हा पुन्हा या नव्या कप्प्यात साठवायचे... काय माहीत पुन्हा केंव्हा तरी हा कप्पा हळुच उघडला की एक निसर्गाचा देखावा कायम पहाता येइल .. पण या कप्प्यात फक्त मी आणि निसर्ग नकोय ... तु पण असशील का ग सोबत... मी.. तू आणि निसर्ग ....

आज १ जुन, वडिलांचा वाढदिवस .... बारामतीला आलोय ... पाउस पडलाय आज... वातावरण शांत ... बर्याच गोष्टी आठवुन जातात... वाढदिवस तसा आम्ही कोणाचाच साजरा करत नसु.. पण घरात गोड - धोड केले जाई.. आज ही असाच बेत आहे... प्रत्येक वाढदिवशीच सारे काही आधीचे आठवते असे काही नाही...पण या दिवशी त्या आठवणींना थोडा भावनेचा स्पर्श जास्त असतो .. संस्काराची शिदोरी अशीच .. त्या पिढीकडुन आपल्याकडे आली... प्रामाणिक पणा, चिकाटी... सतत कार्यरत राहणे या गोष्टी त्यांच्याकडे पाहुनच आपण शिकत आलो... नाही असे नाही.. बर्याच गोष्टीत वेगळे विचार-- हेतु आहेच .. पण सारासार विचार करता ते जास्त बरोबर ... सुख हे पैश्याच्या श्रीमंतीवर नाही.. तर मनाच्या समाधानावर अवलंबुन असते... समाधान आणि सुख ह्या खरे तर वेगळ्या गोष्टी... आपल्या कडे जास्त चैनीच्या गोष्टी म्हणुन आपण सुखी.. पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान जास्त ... दूसर्‍यांप्रति असणारा आदरयुक्त भाव... स्वता हालाअपेष्टा सोसुन घरातील प्रत्येकाला स्व-कर्तुत्ववान बनवण्याची धडफड .. निरपेक्ष प्रेम... स्वता पेक्षा इतरांच्या सुखा साठी आयुष्यामधील अनेक क्षण वेचले असल्याने ते जास्त समाधानी... बर्याच दा मनात येते .. माणसाने समाधानी असावे... सुख त्या समाधानाकडे आपोआप खेचले जातेच ... आपण उलटे करतो .. समाधाना पेक्षा सुखाकडे आपला कल जास्त असतो.. त्यामुळे कधीच आपले समाधान होत नाही.. आणि सुखाची एक एक पायरी आपण वाढवत जात राहतो ... नक्की आपण कुठल्या पायर्‍या चढतो आहे हे जेंव्हा जाणवते .. तेंव्हा समाधानाच्या सिमेरेषेपासुन आपण बरेच पुढे आलेलो असतो ... मग आपल्याला कळते आपला रस्ता चुकीचा आहे.. हे कळणे ही कदाचीत महत्वाचे..

पळत्याच्या पाठी | लागू नये कधी| हाती लागे अंती| काही नाही|| शेजार्‍याच्या चार | अलिशान कार| आपली स्कूटर | खरी असे || शेजार्‍याची भार्या| दिसते ऐश्र्वर्या| तुझे रुप आर्या|अभिषेक नाही|| सुख समाधान |असती समान जेव्हा तुझे मन| स्थिर असे|| अंतरीचे ध्यान | पहावे करुन खरे समाधान| चित्ती वसे|| बुवा म्हणे राम| नामाचे भजन दुर करी भ्रम| अंतरीचा||

Pavasala पाउस.....आठवणी...भावना...समाधान....सुख....रस्ता चुकणे..सह्यगिरीप्रति आदरयुक्त भाव sahyadri

पाऊस मला वाटते नेहमी तरुणच असावा... त्याला पाहिले की त्या सर्व मोहक आठवणी जाग्या होतात... त्या आठवणींप्रमाणे पावसालाही चिरतारुण्याचे वरदान मिळालेले असेल असेच वाटते.... वर्षातला पहिला पाउस मला पहिल्या प्रेमाप्रमाणेच भासतो...उत्कट ..निर्मळ..अतिव...हवाहवासा... त्या चिरतरुण आठवणींचे मेघ हा असाच दरवर्षी माझ्यावर बरसवत असतो... मग मला जयश्री आठवते... माझं पहिले प्रेम... निर्मळ ...निरागस... तासनतास मारलेल्या गप्पा....ती स्वप्ने ... त्या अनाभाका.... कॉलेजला एकत्र केलेला अभ्यास... तो हवाहवासा स्पर्श ... ते हळुच लाजणे... हवाहवासा वाटणारा हा चिरतरुण आठवणींचा काळ आणि पहिला पाऊस यांचे नातेच एकदम घट्ट... पहिल्या पावसानंतर पावसाच्या आणि आठवणींच्या अनेक सरी बरसतच असतात ... बेलगाम... स्वैर.. मुक्त... बेभान... या तारुण्याच्या कित्येक छटा या पावसात मला आठवतात.. तारुण्याच्या या स्वैर..मुक्त..बेभान आठवणी समोरुन झरकण पुढे सरकतात.. गच्च हिरव्या रानातुन जसे पाण्याचे असंख्य झरे वाहत असतात.. तसेच मनाच्या कड्यांवरुन अनेक विचार... अनेक गोष्टी अश्याच उड्या टाकत होत्या हे आठवते ... असंख्य झरे.. असंख्य ओल्या वाटा... गर्द धुक्यात फक्त आपण ..मुक्त.. स्वच्छ... शेवटी वळवाचा पाऊस येतो...अफाट...अचाट...असह्य..अचानक आलेला... तारुण्यातील या गर्द धुक्यातुन .. असंख्य वाटातुन आपला रस्ता आपल्याला त्यात शोधावाच लागतो ... नाहीतर एकदा हरवलो की आपलाच थांग लागणे कठीण... वळवाच्या पावसाचे ही असेच ... अचानक..अफाट... वळवाचा पाऊस असाच जीवनाचा हमरस्ता शोधुन देण्याचे काम करतो... गच्च हिरव्या रानातील असंख्य आपल्याशा वाटणार्या वाटा असह्य पणे आपल्याला सोडुन द्याव्या लागतात.. कधी कधी अचानक समोर काहीच दिसत नाही... तरीही घट्टपणे मनाशी आपली वाट पक्की करुन आपण चालत रहायचे बस्स...

आज पाउस यावा असं वाटतंय! मरगळलेल्या मनाला त्यानं स्वच्छ धुऊन जावं, मुळूमुळू रडत येण्यापेक्षा आज गर्जना करीत यावं, सभ्यपणाची शाल आज त्यान घरीच ठेवून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! मळभाची काळी चादर आज त्यान फाडून यावं, प्रेमाची भीक देण्यापेक्षा, मुक्त हस्ताने उधळीत यावं, माझ्या उधारीचा हिशोब आज तरी विसरून यावं! आज पाउस यावा असं वाटतंय! तहानलेल्या सृष्टीला आज त्यान मिठीत घ्यावं, चिंब चिंब भिजवून तिला तृप्त तृप्त करावं, त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आज त्यानच मिटवीत जावं!

वारामागुन वार येतो अन तसाच निघुन जातो. हल्ली कशाचं काहीच वाटत नाही जे सोमवारचं ते च रवीवारचं. पाऊस येतो पडुन जातो, फुले फुलतात सायंकाळी कधीतरी मग नंतर माना मुरगाळुन तशीच पडुन राहतात. मी मात्र तसाच बसुन असतो. धुंदीत जगत असल्या सारखा. टेकडी वरून दीसनारा सुर्यास्त पाहुन किती दिवस झाले हे तर आठवत सुद्धा नाही. कधीतरी लहर येते पावसात भिजायची, मोठ्याने आरोळी ठोकायची. वाटतं वेडं वाकडं धावावं, पाण्यामधे डुंबावं. पन ही इच्छा सुद्धा मनात कुठेतरी जिरून जाते. कुठेतरी विटी दांडु अन लगोरी- गोट्या असले काहीतरी चालुच असते, मी मात्र मान ताठ करून निघुन येतो. पडनारा पाऊस तुषार, वर्षाव, शिडकावा,श्रावण धारा असलं काही का असेना मी त्याला चिकचीकच म्हणतो. खिडकीवर आलेलं पाखरू सुद्धा आताशा किलबील करने सोडुन कलकलाट करू लागलय तरी बरं मला अजुन माझाच त्रास होत नाही.

विहिरीच्या काठावर उभा राहून आजकाल मी विहिरीत नूसते डोकावून बघतो पाण्यात पाय घालायला सुध्दा नको वाटते, काही वर्षांपूर्वी मी सहज विहीरीच्या तळाशी टाकलेले नाणे घेउन येत असे, माझा मुलगा मात्र बिनधास्त उडी मारुन विहिरीतून नाणे काढून आणतो, तो वर येई पर्यंत मी विहिरीचा काठ घट्ट धरुन, पाणी कधी हलतय त्याची वाट बघत पाण्याकडे एकटक पहात उभा असतो, अगदी माझे बाबा उभे असायचे तसाच, मी त्या वेळी बाबांना हसत असे, आणि आज माझा मुलगा आणि माझे बाबा दोघे मला हसतात, आजकाल माझे हे असे का होते? काही वर्षांपूर्वी अमर्यादीत थाळी देणार्‍या हॉटेल मधेच आवर्जून जाणारा मी, आजकाल अर्धा वडापाव टाकून देतो, जात नाही म्हणून, "टाकु नका मी खातो" असे म्हणताना माझा मुलगा दात दाखवत मला हसत असतो, आणि माझे बाबा कवळी सांभळत त्याला साथ देत असतात, आजकाल माझे हे असे का होते? रात्री उशीरा पर्यंत झोप येत नाही, डोक्यात सतत काहीतरी विचार येत असतात, त्या वेळी माझा मुलगा एकाग्रपणे अभ्यास करत बसलेला असतो, आणि बाबा मनलावून कोणता तरी जाडजुड ग्रंथ वाचत असतात, मी मात्र तळमळत इकडून तिकडे फेर्‍या मारत असतो, ते दोघे डोळे मिचकावून एकमेकांकडे बघत, मला हसत असतात, आजकाल माझे हे असे का होते? पैजारबुवा,

आजकाल माझे हे असे का होते? मनाच्या गाभार्‍यातुन उमटणारे गुढ प्रश्न आत आत दाबून टाकावेत मनमुक्त होऊन उधळून झुगारावेत असचं वाटत असतांना पायात एक अनामिक बेडी जाणवत राहते असं कां? --- साधी कागदी होडी बादलीतल्या पाण्यावर तरंगतांना बघून लेकीच्या डोळ्यात आलेली लकाकी बघून मन हरखुन जाते पुढच्या क्षणी तिच्या स्वप्नांची होडी तिराला लागेल की नाही या विचाराने जीव कासाविस होतो.. असं कां? ----- अल्याड मी असतो पल्याड स्वप्न असतात मध्ये भला मोठ्ठा जलाशय कधी मन उचल खातं म्हणतं चल मार उडी.. परत तेच मन हात धरुन मागे ओढत राहतं असं कां? -------------------------------------------- काय लिहीलय मी माहीत नाही.. सहज सुचल. बाकी धाग्यावर नजर ठेवून आहेचं. येईन परत.

रोजचा आला दिवस सरताना मागे काही ठसा ठेऊन जातो.कधी ठळक कधी पुसट..काही बोचलेले शब्द काही रेंगाळणारी गुपिते.तर कुठे मनाच्या कोपर्यात जपलेला हिरवा गारवा.काहीही मागे ठेवायचे नाही म्हणताना लेकीची गळामिठी प्रेमाचा ठसा ठेऊन जाते.आणि मी मात्र लांब दिसणारं धुसर चित्र जणू हातात आल्यासारखी नादावते...परत उगवणारा उद्या पायातल्या मणामणाच्या बेड्या संभाळत कोलु पिसु लागतो.अखंड चालणारा हा अविरत घाणा.सुखाचे वंगण अन दुःखाची धार लावुन पळत राहतो.दिसामाजी कापलेले अंतर बघु गेलो तर मागे उरतो माझ्याच पायानी बनलेल्या वतृळाचा ठसा....

प्रवास सुरू झाला तेव्हा कुठे जायचंय हे माहीत नव्हतं, किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. अर्धा रस्ता संपला तरी अजून कुठे जायचं हे माहीत नाही अन किती चालायचं हेही माहीत नाही. पावलं तीच, मीही तीच, रस्ताही तोच. सुरुवात झाली तेव्हा लहानशी पायवाट होती. बाजूंनी फुलं होती सगळी. आणि डोक्यावर गर्द सावली. हळूहळू झाडी विरळ झाली. फुलं सुकली आणि डोक्यावर ऊन भाजू लागलं. तरी वाट सरता सरेना. कधीतरी वार्‍याची झुळूक ह़ळूच येऊन गालावर रेंगाळून जाते. माथ्यावर ढग दुरून जराशी सावली देतो अन कधीतरी एखादी पावसाची सरही. आताशा सावलीही पायातळी आली आहे. सुरुवात कशी होती तेही आज धूसर चित्रासारखं आठवतं आहे. शेवट कसा असेल माहीत नाही. आज, आता इथे आहे एवढंच खरं. पण एकच माहीत आहे की मला चालायचं आहे. बाकी सगळे निघून गेले तिथे जाण्यासाठी. पाय साथ देतील तोपर्यंत.

ती ज्वारीची शेते .... पाणांवर दवबिंदू ल्यालेली शहारलेली कोवळी पाने... गावाचा तो शेतावरला बांध... काळीकुट्ट जमीन.. आणि त्या काळ्याश्या ठिसुळ ढेकळाला हळुवार पणे भिजवत पुढे चाललेले पाणी.... ती दगडी भिंतीची ओबढ शाळा.... सुंदर झाडलेले आणि सभोवताली अशोकाची उंचच उंच झाडे असलेले पटांगण ... ती पळसाकडील विहीर... तासनतास मारलेल्या गप्पा.. एकत्र केलेला अभ्यास.... ती अनामिक हुरहुर .... सुगंधाचे क्षण.. फुलांचे सांजेला मोहक लाजणे... तो चंद्र .... तो अनामिक दूरावा... ते सैल झालेले मायेचे पाश... त्या ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा.... ते ओठांआड थांबलेले शब्द .. ते हिरव्या बांगड्यांचे लेणे घेतलेले पण त्या क्षणी अतिव ओढीने थरथरणारे हात.... तो अंगणातील पारिजात... रात्री पडलेला फुलांचा सुगंधीत सडा... ती पहिल्यांदाच न उजाडू वाटणारी सुरेख ..गुलाबी सकाळ... ते इवलेसे टोपडे... इवलेसे स्वेटर... मऊ मनाला आनंदित करणारा स्पर्श... जीवनाचा सर्वोच्च आनंदी क्षण.... ती सकाळची गडबड ... ते कुतुहल.. दप्तराच्या ओझ्यांची चिंता... बंद केलेला टीव्ही ... ती काळजीळतली परिक्षा... हे अर्धे आयुष्य सरले आहे आता.. आयुष्याच्या ह्या एक एका फ्रेम ने मन अगदी काठोकाठ भरुन गेले आहे... पुढच्या प्रवासाची एक अनाम ओढ ... इवल्याशा काळजाच्या तुकड्यात गुंतलेला श्वास... आणि श्वासागणिक वाहिलेले वाहिलेले हे आयुष्य ..पुन्हा तो अंगणातला पारिजात...........

@मिका.. कागदी होडी वरुन आठवले... गावाकडे अंगणात... पावसात.. पाणीच पाणी साठायचे... अश्या वेळेस क्रिकेट खेळता येत नव्हते म्हणुन मन नाराज होत असे... आणि मग आम्ही मोर्चा वळवत असु कागदी होड्या बनवण्याकडे... आम्ही म्हणजे मी आणि तायडी(ताई) ... तायडी या एकाच शब्दात कीती माया साठवलेली असते ना... या शब्दाच्या उच्चाराने पण मन प्रसन्न झाले... हा..तर या होड्या बनवायचो मी.. तीला पण मीच बनवुन द्यायचो .. तीला बनवायला येत नसत.. मग तासन तास त्या पाण्यात आम्ही खेळत असु..कोणाची होडी लांब जाते त्यावर पैजा लावत असु.. कसलीच चिंता नसायची तेंव्हा... कपडे खराब होण्याची.. अभ्यासाची... भविष्याची.. कसलीच नाही.. कीती मस्त दिवस होते ते.... आणि आता त्या पावसाची आपण वाट पाहत आहे.. पण त्या कागदी होड्यांप्रमाणे त्या बालपणीच्या आठवणींचे आपण काहीच करणार नाही का ? मला वाटते.. लेकीच्या रुपाने ते दिवस पुन्हा आपल्याकडे येवु पाहत आहेत.. तर मग तीच्या सोबत पुन्हा तेच दिवस जगायला आपण सुरुवात केली पाहिजे असे वाटते... कसलीच चिंता न करता.. म्हणुन मी पण आता पावसाची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहे... सहज मला आवडणारे गाणे आठवले यावरुन... एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्‍या लयाला व्यथा भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी हरवेन मी, हरपेन मी तरीही मला लाभेन मी