Welcome to misalpav.com
लेखक: जातवेद | प्रसिद्ध:
वांग्याच्या लेखावरून वाडीचा उल्लेख आला आणि आमचा पौर्णिमाक्रम आठवला. बरेच लोक वाडीला नरसोबाची वाडी म्हणतात पण इकडे सगळे नुस्त वाडीच म्हणतात. म्हैसूर डोसाला म्हैसूर मधे नुस्ताच डोसा म्हणतात त्यातला प्रकार. दर पौर्णिमेला वाडीला जाउन यायचे हा बर्‍याच जणांचा क्रम. मीही वडिलांच्या बरोबर म्हणून बर्‍याचदा जात असे. अगदी लहानपणीची वाडी आठवते ती म्हणजे खेळणी, ताजे पेढे आणि कवठाच्या बर्फी साठी. बरेच धार्मिक कार्यक्रम वाडीलाच व्हायचे, मग वाडीच्या पुजार्‍यांची मोठी मोठी थोड्या जुन्या प्रकाराची घरे, त्यांच्याकडच्या त्या तृप्त जेवणावळी आणि कृष्णेत मनसोक्त मारलेल्या डुबक्या. ऐन पावसाळ्यात गेलात तर देव वरती एखाद्या पुजर्‍याकडे ठेवलेले असतात. कॄष्णेच्या महापुराच्या वेळी मी जेव्हा गेलो होतो, आख्खी वाडी पाण्यात गेलेली. शिरोळ जवळून जाताना एखाद्या समुद्रातुन रस्ता काढलाय काय असे वाटत होते. असो. तर वाडीला जायचे म्हणजे दिवसातला सगळा क्रम एक्दम पक्का, झोपेतून जागे केले तरी सांगता येईल असा. दुपारचे उन टाळण्यासाठी सकाळी ८ वाजता गाडीला किक, अर्ध्या पाऊण तासात वाडी. मग नेहमीच्या ठिकाणी गाडी लाउन जायचे सुखदेव कडे. प्रत्येकाचा पेढेवाला ठरलेला, तसे आमचे सुखदेव. तर मग तिकडं आधिच्याच ढिगार्‍यात चपला काढून (ठेवा इथच कुठ जात नईत) त्याच्याकडून नारळ, पावशेर ताजे पेढे (वाडीत दुकान सांभाळणे म्हणजे दुकानात पेढे करत बसणे), खडीसाखर, उदबत्ती आणि मोठा कापूर घ्यायचा आणि मंदिराकडं चालायला लागयचं. उनातून येउन मंदीरातल्या गार गार फरशांवर पाय ठेवले कि जे काही वाटत त्याची सर दुसर्‍या कशाला नाही. सरळ खाली घाटाच्या पायर्‍या उतरून नदीकडं जायचं आणि हात पाय मनसोक्त धुऊन दर्शनाला न जाता जायचं उदबत्त्या आणि धुप जाळायला मुख्य मंदिराच्या अगदी समोर टोकाकडच्या जागी. इथुन अशी काही नदि दिसते कि अगदी जलतरण तलावात उंचावरून उडी मारयला केलेल्या फळीवरच उभारल्यासारखं वाटतं. पुढे मुख्य मंदिराच्या मागपर्यंत आलेल्या रांगेत उभ रहायचे. मग पादुका जवळ आल्या कि पहिला शेंदरी रंगात रंगवलेला गणपती, इकडे थोडे पैशे पेटीत टाकयचे आणि पादुकांसमोर यायचे. हातातले सगळे उरलेले पुजारर्‍याकडे देउन पादुकांसमोरच्या पायरीवर नतमस्तक व्ह्यायचं. पुजारी थोडी खडीसाखर काढुन घेईल नारळावर पुजेतली काही फुलं ठेवेल, परत करेल; बाई असेल तर ओटीत देईल. मग प्रदक्षीणा चालू करयची. सगळ्यात पहिला दक्षिण द्वारासमोर येउन नमस्कार. मग मागच्या बाजुला नरसिह सरस्वतींच्या फोटो च्या इथलं तिर्थ घ्यायचे; कोणि तिर्थासाठी बाटली दिली असेल तर ती भरून घ्यायची. मग तिकडच्या ओळीत असणर्‍या देवांच्या पाया पडयचे, पुढे अन्नपुर्णा; प्रदक्षिणा पुर्ण. अशा आपल्याला पाहिजेत तितक्या प्रदक्षिणा घालायच्या. गुरूचरित्रात सांगितले आहे म्हणे कि एखादी गरोदर बाई जसे चालते तशा प्रदक्षिणा घालाव्यात, काही लोक त्या बाईचे मुल आता धाउ लागले आहे आनि त्यामागून आपण पळतोय (मुलाच्या) असं चालतात. असो. मग भल्या मोठ्या अंगार्‍याच्या पेटीतून अंगार्‍याच्या पुड्या बांधून घ्यायच्या आणि देवासमोरच्या मोकळ्या जागेत येउन स्वस्थ बसायचं. हातातल्या पिशवीतले एक दोन पेढे तोंडात टाकायचे; एखादा बाजुने फिरण्यार्‍या कुत्र्यांना टाकायचा आणि देवाला साष्टांग नमस्कार करून उठायचे. मग पायर्‍या चढुन पुन्हा वर यायचे आणि मारूती, पुढे रामचंद्र स्वामी समाधी, नारयण स्वामी, गोपाळ स्वामी करून टेंबे स्वामींच्या मंदिरात. ईथे टेंबे स्वामी, गुळवणी महाराज आणि रंगावधूत महराज. इकडे बसून घरी देण्याएवढे पेढे ठेउन बाकी संपवून टाकायचे. मग मंदिराबाहेर येउन हळद कुंकू विकत घेउन सुखदेव कडे हिशेब करयला (आणि चपला घ्यायला). मग तिकडून म्हादबा पाटिल महाराजंच्या समाधी मंदिरात. इकडे बसुन परत वाटले तर पेढे. आता यापुढे वाडीच्या बाजारात वांगी वगैरे घ्यायला (अवांतर: तशी कराडला पण फार चांगली मिळतात). हरभर्‍याचा सिझन असेल तर गाडिच्या मागे बसून खायला सोलाणा. मग त्या स्टंड बाहेरच्या हॉटेल मधे चहा, भूक लागली असेल तर मिसळ नाहितर वडा पाव. परत गाडिला किक मारून घरी जेवायला.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ब्येस्टच. खिद्रापूर खूपच निवांतपणे पाहण्यासारखं आहे. मागचं जैन मंदिर पाहिलंत का?

तोड्फोडीतून वाचलेले खिद्रापूरचे मंदीर अजूनही अप्रतीम सुंदरच. पण खिद्रापूर हे एक पर्यटन स्थळच ( site seeing )किंवा वास्तुशिल्प कला अभ्यास करण्याचे स्थळ म्हणून बघितले जाते. ( किंवा जायचे आता तिथेही यात्रा वगैरे भारत असली तर माहिती नाही) . नृसिंह वाडीला जाणारे भक्त/ भाविक असतात त्यांचा उद्देश वेगळा असतो असे मला वाटते. लहानपणी सुटीत खिद्रापूर, कोल्हापूर ज्योतिबा, पन्हाळा हि असताना ग्रुपने सायकल सहलीची ठिकाणे होती. वाडी मात्र कधीही कधी मित्रांबरोबर काही एकटा. अजूनही सांगलीला गेलो कि नृसिंह वाडी, तुंगाचा मारुती क्वचित कोल्हापूरची महालक्ष्मी हि भेटीची ठिकाणे. खिद्रापुरला जाने झाले नाही खूप वर्षात. चांगली आठवण करून दिलीत. पुढच्यावेळी सहकुटुंब खिद्रापुरला भेट नक्की. अवांतर : औदुंबर पासून हरिपूर पर्यंत सध्या मगरींचा सुळ्सुळत झालाय. भेटी देणार्यांनी खात्री केल्याशिवाय पोहायला उतरू नये. तसेच वाडीला घाटावर बर्याचदा शेवाळे असते. पाय घसरून अनेक अपघात होतात. तसेच देवळासमोर कृष्णेचा मोठा "डोह" आहे. उत्तम पोहता येत असल्याशिवाय फार आत जाणे धोकादायक. बाकी भेट देणार्यांनी बासुंदी, पेढे, मळीची ( कृष्ण काठच्या सुपीक मातीतली) देशी वांगी ( आता मिळत असली तर) नक्की आस्वाद घ्यावा. पण बासुंदीची क्वालिटी ( दाटपणा) पूर्वीप्रमाणे राहिली नाहीये असे मला वाटते. पूर्वी अगदी रबडी सारखी दाट मिळायची.

दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले १] . येथे मिळ्णारे मानसीक समाधान वेगळेच पेढे,बासुंदी नारळ्,हार वाले कधि घ्या घ्या म्हनुन माघे लागणार नाहीत २] . ३] . ४] . ५] . ६] .

"दोन वर्षा पुर्वि गेलो होतो क्रुष्णा माइने दर्शन घेवु दिले नाहि पण काल्च्या गुरुवरी छान दर्शन झाले" खरं आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय विश्वास बसणे शक्य नाही पण कृष्णेला पूर आला कि पाण्याची पातळी पहिल्या फोटोत दिसणाऱ्या गोलाकृती छतापर्यंत किंवा त्याही पेक्षा जास्ती वाढते. पाण्याची पालटली वाढू लागली आणि पाणी पादुकांवरून वाहू लागले कि दक्षिणद्वार सोहळा होतो. त्याही पेक्षा पाणी वाढू लागले कि देव वर गावात नेले जातात. पूर ओसरला कि मग विधीवत वेगवेगळ्या औषधी काढ्यांचा अभिषेक केला जातो. मस्त जुन्या आठवणी. धन्यवाद.

अजित कडकडे यांचे 'दत्त अवधूता , दिनाच्या नाथा , दूर अजून का रे तू सद्गुरु नाथा ' मस्त गाणं आहे . तू नळीवर एक से एक दत्त भक्तीपर गाणी आहेत . माझी सगळ्यात आवडती गाणी - 'सुखद सुमंगल शुभद सुकोमल वाजली पाऊले , दारी दत्त गुरु आले ' आणि 'राजा दत्तगुरू हृदयीचा ' @कंजूस श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत . नरसिंह सरस्वती स्वामी महारष्ट्र आणि गुलबर्गामध्ये झाल्यामुळे कर्नाटक मध्ये दत्त संप्रदाय मोठा आहे . टेंबे स्वामी आणि रंगावधूत महाराजांमुळे गुजरात मध्ये दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणावर आहे .नाथ संप्रदाय संपूर्ण देशामध्ये फैलावला आहे . आणि नाथ पंथ जाणनाऱ्या प्रत्येकाला दत्त माहित असतात . त्यामुळे दक्षिणेत दत्त माहित नाहीत हा तुमचा गैरसमज आहे . त्याचा प्रसार कदाचित कमी असेल तिकडे . कारण दत्त , अनुसया आश्रम महाराष्ट्रात माहूर मध्ये झालेत . आणि काही नको ते मार्केटिंग बिर्केतिंग आपलं शांत आहे तसंच असुदे .
देव की गुरू.... नक्की काय?
दोन्हीही . तीच तर खासियत आहे

श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म आणि कार्य आंध्र मध्ये झालं असल्यामुळे संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये ते माहित आहेत .
आंध्रात कुठल्या गावी?

बाकी,माझ्या गावापासून वाडी फक्त 22 किमी. मानसिक समाधान देणारे ठिकाण(पौर्णिमा सोडून)

आंध्रात कुठल्या गावी?
पिठापुरम मध्ये त्यांचा जन्म झाला होता . पण तिथल्या मूर्ख ब्राह्मणांनी धर्माचा जो चुकीचा अर्थ पसरवला होता त्याने त्यांची खूप निराशा झाली . अनेक वर्षे त्यांनी लोकांना खरा धर्म ,अध्यात्म समजावला . कोणाला समजून , कोणाला रागवून , कोणाला शिक्षा करून अनेक गैरसमज दूर केले. आणि धर्मस्थापना केली . त्यानंतर त्यांनी कुरवपुर हे त्यांचं कार्यक्षेत्र निवडलं .पिठपुरमच्या ब्राह्मणांना डावलून त्यांनी कुरवपुरच्या ताडी विकणाऱ्या लोकांना अध्यात्म दीक्षा दिली . त्यांच्या आईवडिलांनी स्वतः त्यांच्या घरात त्यांच्या पादुकांची स्थापना केली आहे आज त्याचं पिठापूर संस्थान झालं आहे . वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी कुरवपुरला समाधी घेतली .
मानसिक समाधान देणारे ठिकाण(पौर्णिमा सोडून)
का हो ? पौर्णिमेत असं काय आहे ?