पाककृती

कोथिंबिर वडी

Primary tabs

बाजारात कोथिंबिरीचे ढीग जागोजागी दिसू लागले की कोथिंबिर वड्यांचा बेत हमखास होतो. जपानमध्ये ती दृष्टीसही पडायची नाही. तर जर्मनीत कधीमधी मिळायची, पण हल्ली आमच्या गावात भारतीय, तुर्की, श्रीलंकन दुकानातून चांगली कोथिंबिर मिळते. त्यामुळे हवी तेव्हा कोथिंबिरवडी करता येते. ह्या दिवाळीला खूप वर्षांनी भाऊ भेटणार होता आणि त्याच्या गावात फार कोथिंबिर मिळत नसल्याने त्याच्यासाठी ह्या वड्या केल्या.
तर ह्याकरता लागणारे साहित्य- १ जुडी कोथिंबिर,
१ टे. स्पून तिखट,(तिखटाचे प्रमाण कोथिबिरीच्या प्रमाणानुसार आणि स्वत:च्या जिभेच्या तिखटपणानुसार कमीजास्त करता येईल.)
१ टेबलस्पून जिरेपूड, चवीनुसार मीठ.
३-४ चमचे डाळीचे पीठ, १ चमचा तांदळाची पीठी,
थोडे तेल, खायचा सोडा २ चिमूट.
कृती- कोथिंबिर निवडून, धुवून, चिरून घ्या. त्यात तिखट, जिरेपूड घाला. चमचाभर तेल (गरम न करता) घाला.
३-४ चमचे डाळीचे पीठ (बेसन) घाला. चमचाभर तांदळाचे पीठ घाला चवीनुसार मीठ घाला. पाणी घालून सरसरीत भिजवा. २ चिमूट सोडा घाला व चांगले ढवळा.
कुकरच्या भांड्याला तेल लावून घ्या, त्यात हे मिश्रण घाला आणि शिटी न लावता १५-२० मिनिटे वाफवा.
पूर्ण गार झाले की वड्या पाडा आणि तळा, शॅलो फ्राय करा किवा एअर फ्राय करा.
एअर फ्राय करताना- १८० अंश से वर ५ मिनिटे प्रिहिट करा.
वड्यांवर तेलाचा ब्रश फिरवा आणि ६ मिनिटे १८० अंशावर ठेवा. मग उघडून वड्या पलटून परत ३-४ मिनिटे ठेवा.उघडून पहा, वाटल्यास अजून एखादा मिनिट ठेवा.
खमंग आणि कुरकुरीत कोथिंबिर वड्यांचा आस्वाद घ्या.

.

मांत्रिक

क्लासच ताई कोथिंबीरवड्या!!! अगदी आवडत्या आहेत!!!
ह्यात चिंच व गूळ घाला थोडासा!!! झकास लागतात!!!

किती ते अत्याचार करशील स्वातीताई. थंडी वाढतेय दिवसेंदिवस आणि तू हे असे गरम खमंग चटपटीत पदार्थ केल्याचे सांगतेस. फोटो पण मस्तच.
या कोथिंबीर वड्या आवडतातच, पण अजूनही कोथिंबीर वडी म्हणजे मला नागपुरी पुडाच्या वड्याच पहिले आठवतात. पण त्या वेळखाऊ आहेत फार. त्यामुळे आता या लवकरच करायलाच हव्यात.

मांत्रिक

पुडाच्या वड्या प. महाराष्ट्रात पण फेमस आहेत. जमले तर कृति टाकायचा प्रयत्न करतो.

कपिलमुनी

कोल्हापूरच्या पुडाच्या वड्या प्रसिद्ध आहे.
गृहिणी आणि वहिनी नावाची दुकानात छान मिळतात

रेवती

काय मस्त दिसतायत. पाकृही थोडी वेगळी आहे. तुझ्याकडे एयर फ्रा. आल्यापासून आमच्या डोळ्यांना मेजवानी मिळतिये.
आणि हो, कोंथिंबीर मिळू लागल्याबद्दल अभिनंदन.

छान दिसत आहेत वड्या. माझी पाकृ वेगळी आहे, मी भिजवलेली हरभरा डाळ वाटून लावते व मिश्रण मिळून येण्यापुरते डाळीचे पीठ साधारण चमचा दोन चमचे घालते, छान खमंग, चुरचुरीत होतात.

मी ही एअरफारयमध्ये केल्या होत्या वड्या, छान झाल्या होत्या अगदी :)

अकोला अमरावती यवतमाळ वाशीम बुलडाणा म्हणजे वर्हाडात सांबार वडी करतात कोथिंबीरीची जमल्यास रेसिपी टाकेन

सविता००१

स्वातीताई, मी पण अगदी तुझ्याच कृतीप्रमाणे करते. झक्कास होतात.
आता आज त्या करणं मस्ट आहे. :)

अनन्न्या

अजून केल्या नाहीत कधी... आता करून पाहते या कृतीने! मस्त आलाय फोटो.

चतुरंग

खल्लास! ज ह ब ह र्‍या हा फोटू आलाय! :)

(कोथिंबीरप्रेमी)रंगा

सस्नेह

खमंग पदार्थ !
मी थोडा ओवा आणि जिरेपूड ऐवजी गोडा मसाला घालते.

नूतन सावंत

सं.मं.ला विनंती आहे ,त्यांनी स्वातीच्या पाककृतींचा नवा धागा टाकावा.
कोथिंबीरवड्या क्लासच.मी मूगडाळ भिजवून वाटून,स्वदापुरते बेसन घालून करते.

कोथिंबिर वड्यांची पाकृ मस्तच आहे. मीही अशाच करतो. मांत्रिक ह्यांच्या सुचनेनुसार चिंच-गुळ वापरून पाहावा म्हणतो. शिवाय, ऐनवेळी वरुन चाट मसाला भुरभुरल्यास चमचमीत होतात.

प्रियाजी

तोंडाला पाणी सुटले वड्या पाहून. आता करणे आलेच.