हमखास हिट - दाल बाटी!
Primary tabs
कधी कधी माणसाला साधी सोपी पोळी-भाजी सोडून सुखाचा जीव भयानक कटकटीच्या गोष्टीत गुंतवायची हुक्की येते. आज तसाच एक दिवस होता.. दाल बाटीचा!
तर त्याचं असं झालंय की माझ्या आईच्या वडीलांकडुन, अण्णांकडुन, माझ्याकडे असंख्य गुण आलेत. त्यातला एक म्हणजे दाल बाटीची आवड! जगात अॅक्चुअली दालबाटी एका पद्धतीने करतात, माझी आई दुसर्या पद्धतीने करते, सासुबाई तिसर्या पद्धतीने करतात आणि मी... अंदाजपंचे करते!
लोक निखार्यात वगैरे भाजुन कसल्या कसल्या जीवघेण्या बाट्या करतात. आपल्याला तसलं काही येत नाही. कारण आपल्याला एका लेकराला सांभाळून स्वयंपाक करायचा असेतो किनई.. मग असले टाईमपास परवडत नसतेत!
तर अंदाजपंचे थोडी कणिक, मक्याच पीठ आणि रवा घ्या. त्यात चवीपुरतं मीठ टाका आणि घ्या तिंबुन. तिंबलेल्या पीठाचे गोळे करुन घ्या. एका गोळ्याला तेल लावुन त्याची लंबुळक्या आकाराची पोळी लाटा. ह्या पोळीला तेल लावुन तिचा रोल करुन घ्या. रोलची दोन टोके एकत्र आणुन त्याची घडी घाला. ही झाली बाटी! (पहा फोटो!) ही बाटी करण्याची आमच्या माहेरची पद्धत. सासरी डायरेक्ट गोळाच बाटी म्हणुन घेतात. काही ठिकाणी बहुदा त्याला बाफले म्हणतात.
आता इथुन पुढे तुमच्याकडे दोन पर्याय आहेतः- हेल्दी किंवा सेक्सी...!
हेल्दी रेसेपी आमच्या मातोश्रींची आहे. ह्यात बाट्यांना कुकरमध्ये उकडुन घ्या. आणि मग तुपात परतुन घ्या. कमी तेला/तुपात केलेली सात्विक डाएट बाटी!
सेक्सी रेसेपी आमच्या सासुबाईंची आहे. ह्यात काय करायचं की बाट्या डायरेक्ट उकळत्या पाण्यात टाकायच्या. नीट शिजल्या आहेत हे कसं कळणार? तर त्यात सुरी खुपसुन उचलुन पहायची. बाटी त्यावरुन निसटून खाली पडली आणि सुरीवरही बाटी लागलेली दिसली नाही तर शिजली म्हणायची. पण हा त्याचा सेक्सीनेस कोशंट नाहीये!!

ह्या बाट्यांना चांगलं निथळुन घ्यायचं. मग थंड करुन त्यांचे तुकडे करुन घ्यायचे. आणि हे तुकडे कुरकुरीत "तळुन" घ्यायचे. ही झाली सेक्सी बाटी!

हा सगळा उद्योग चालु असताना बाजुला चिंच गुळाचं आंबट वरण करुन घ्यायचं. (आणि तळलेल्या बाट्या खायला आलेल्यांना हाकलुन लावायचं!)
ह्या बाट्या वडा सांबार सारख्या वरणात डुंबत टाकुन खायला मजा येते! माहेरी साध्या वरणासोबत खातात. किंवा गुळ तुपात कुस्करुनही खातात.

कशाही खा, बाट्या कधीच चुकत नाहीत हे माझ्यासाठी महत्वाचं! ;)
दाल-बाटीचं आणि आमचं कनेक्शन कधीच जुळलं नाही. गव्हा-ज्वारी-बाजरी-नाचणीच्या पोळी-भाकरीबरोबर शक्यतो भाज्या-कालवण इ. पदार्थ आणि डाळीबरोबर तांदळासारखे पिष्टमय पदार्थ असावेत असा माझा दंडक.
पाकृ छान आहे. आनंदी गोपाळ यांचीही पाकृ छान.
पिराने हामरिकेत सेक्सी का काय ती दालबाटी केली बुवा! अजून अशाच पाकृंच्या प्रतीक्षेत ;)
मला फोटू दिसत नाहीये :(, बाकी उत्तम पाकृ, करुन बघेन.
@आनन्दी गोपाळ ,
याला एम्पीत बाफ्ले म्हणतात. तिकडे विशेषतः मालवा प्रान्तात याची प्रचण्ड क्रेझ आहे. भण्डारा , सुन्दरकाण्ड पूजा , लग्न समारंभ ई. प्रत्येक ठिकाणी दाल बाफ्ले मस्ट.
उज्जैनला बसस्टॅण्डजवळ फ्क्त दाल बाफल्याचे २५-३० हॉटेल आहेत.
हाँ जी. इंदौर की याद आ गयी भिया. पिरा बाटी बढीया है.मांडू मे दाल पानिये मिलते है जी.ते पण हळदीच्या पानात गुंडाळून शिजवतात.
मस्तं!!!
चामायला कुठे मिळेल हा प्रकार, आत्ताचच्या आत्ता पपायजेल, गोपाळराव जितके खवट बोलतात तितक्याच कडक पाक्रु करतात
पुण्यात हवा असेल तर रामदेवबाबा का ढाबा आहे निगडी ला.. मस्त आहे.. चुरमा तर जबरदस्त असतो..
https://www.zomato.com/pune/baba-ramdev-dhaba-nigdi
http://www.misalpav.com/node/17628 नीलकांत कधीकाळी मिपावर लिहीत होता याची आठवण.
आता राजस्थानी लाल मास वर पण एक पाकृ येउद्या .. बाकी डाल बाटी विवियाना ठाणे मध्ये राजधानी ला चांगला मिळतो
सप्टेबरात अहमदाबादेत जाणार अहे. तिथे मिळतात
आमच्या इथे एक राजस्थानी हॉटेल आहे. प्रत्येक संडेला दालबाटी असा बोर्ड करुन दिलेला त्याला. नाव काय आवडले नाही पदार्थ्याच्चे. पण भलताच देसी दिसतोय. आता खाउन बघणे आले.
एनीवे हे राजस्थानी दालबाटी आणि खान्देशी/वैदर्भीय दालबाटी एकच ना? नैतर तिथे परत बल्ल्या.
खान्देशी माहिती नाही पण वैदर्भी वेगळ्या असतात खूप, आमच्याकडे बाटी म्हणजे बाफलेच असतात राजस्थानी असतात तसेच फक्त आकाराने मोठे, कोंड्यासाहित पीठ इत्यादी वरीअशन असतात
आता असंय की वरणफळ किंवा चिकुल्या / चिकोल्या - कणिक तिंबुन तिच्या मोठ्या पोळ्या लाटुन घ्यायच्या. त्याचे शंकरपाळ्या सारखे तुकडे करुन ते उकळत्या फोडणीच्या वरणात (आम्ही कांदा इ काही घालत नाही, नुसते आंबट वरण) सोडायच्या.
बाफले - सरळ गोळे घेतले बाटीचे आणि उकडले की बाफले. एका बंगाल्याकडेही असेच पाहिले होते.
बाटी - आनंदीगोपाळरावांचीच मला जाम भीती होती, वाटलंच होतं की ह्यांनी १००% निखार्यांवर केली असणार. आता इथे कुठुन निखारे आणायचे हो! जीव गेला इथेच तुमचे फोटो बघुन!
ह्यांनी केलेली ही खरी बाटी.. मी निखारे नसले की घरात कशी करता येते हे सांगितलय.
रोडगा - मी सुद्धा ह्याच भारुडात हा शब्द ऐकलाय. कधीतरी त्याचे वर्णनही वाचले होते. पण ती बाटी नव्हे हे नक्की.
लिट्टी - गोपाळरावांनी जशी केली आहे तशीच पण आतमध्ये सत्तुच्या पिठाचे तिखट सारण असते. हा पदार्थ बिहारकडे जास्त बनवतात आणि चोखा नावाच्या वांग्याच्या भाजी सोबत खातात. मी फक्त लिट्टीच खाल्ली आहे, जी उच्च असते!
दाल-ढोकली - नाव ऐकलंय, कधी खाल्ली नाही.
बाट्या करण्याची ही पद्धत नक्की मला कशी माहिती हे आता आठवत नाही. पण नुसते गोळे कच्चे रहातात म्हणुन ही अशी गुंडाळत न्यायची. कारण मग त्याला पदर सुटतात आणि जास्त नीट शिजते असा माझा अनुभव.
माझ्या डोक्यात बाटी आणि आजुबाजुच्या पदार्थांविषयी ही आणि अशीच माहिती फीड आहे. तसं बघितलं तर शेवटी वरणात कणीक टाकुनच खायची हो! पण प्रत्येक गोष्टीची चव वेगवेगळी असते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. :)
हाय हाय! काय आठवण! रच्याकने चोखा हा बटाट्याच्या भाजीचा असतो.वांगं मी तरी खाल्लं नाहीये त्यात. झारखंडमध्ये प्रत्येक गोष्टीत बटाटे घालतातच. कदाचित वरती बिहारमध्ये वांगी पण घालत असतील. बाकी डालबाटीचू्रमा खायचा तर जोधपूरला किंवा अहमदाबादच्या जवळ हिंमतनगरला हायवेवर. अप्रतिम असतो. तूप तर असं ओततात की नुसत्या त्या वासानेच भूक लागते.
आग्यावेताळ नांव पडलंय की काय माझं? ;)
निखारे नसलेत तर स्पेशल बाटी कुकर मिळतो, किंवा ओव्हनमधेही करता येतील की! पण त्या डायरेक्ट निखार्यात भाजल्याची मजा इतर कशात येत नाही हेच खरे.
वरण-बट्टीचा बेत स्पेशली वनभोजनाला जाऊन केला जाई. लहानपणी गावाबाहेरच्या देवळात "ट्रिप" जायची. तिथे जाऊन वरणबट्टी बनवली जायची. बट्ट्यांसाठी आम्ही मुलांनी आजूबाजूच्या गायरानातून गोळा केलेल्या रानशेण्या. त्याचा पेटवायचा विस्तव. त्यात बट्ट्या भाजणे, अन त्याच निखार्यावर तीन दगडांची चूल करून त्यावर वरण, भाजी शिजवणे. हे सगळे होत असताना त्या निखार्यात भाजलेले कांदे-बटाटे खायची मजा अजून वेगळी असायची.
मस्त आठवण..
रोडगा नीलकांतांच्या लेखात आहे तोच. साधारणतः ५-६ लोकांसाठी पोळ्यांची कणीक भिजवता ना? तितक्या साईजचा एकच गोळा भाजला की तो रोडगा. याला विस्तव अत्यंत मंद व भाजायचा वेळ भरपूर असतो. घरी रूटीनली करण्यासारखा उद्योग नाही. पारंगत आचारी काही कार्यक्रमाच्या मेजवानीनिमित्त करतील तेव्हा खायला मिळणार. ती वेगळीच मजा.
गतःप्राण पिरा!
आनंदी गोपाळ आपणही खान्देशी का????
तुम्ही बी खान्देशी शेतस का?
आत्ता गूगलत होतो, खांदेशी बाटी चांगली दिसते, म्हणजे चकोल्याल्या बाटी म्हणावं असा प्रकार दिसत नाही. जरा तपशीलवार खांदेशी डालबट्टी येऊ देत.....
-दिलीप बिरुटे
मी बी खान्देशनी.
मी बी खान्देशनी.
काय म्हणतात त्याला? बाटी कुकर असंच नाव आहे का? दुकानात गेल्यावर काय मागायचं?
हा असावा.
येक्दम बरोबर. दुकानात "बाटी कुकर"च मागायचा.
१++
ज्ञानकण
चकोल्याचा गुजराती भाउ .. डाल ढोकली
झक्कास रेसिपी
आज हवेत मस्त गारवा आहे. पाकृ वाचून तोंपासु.
मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.
मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.
मस्त दिसतिये दालबाटी!मी ओव्हनमध्ये करते आणि तुपात भिजवते.तशिहि छान लागते.तूप हव तस (झेपेल तस)घेता येत.
भन्नाट प्रकार दिसतोय !
फोटोही मस्तंच.
पिरा, झकास ग.
पिरा मस्त लिहिले आहेस... लवकरच धागा शतक गाठो ;) मग त्याचे सेलिब्रेशन म्हणुन तु परत हीच अशीच दाल बाटी करावी :)
आतापत्तुर अंदाज आला आसन की... जरा आजून गोजिरी करत्याल. चालनार न्हाय काय???
+ १
हमखास हिट् दालबाटी मिळण्याची ठिकाणं हवीतच.
दालबाटी तसा अवघड एटम नाही, कोणाही माणसाला सहज जमनारा हा प्रकार, त्यामुळे जवळ जवळ कोणत्याही आचा-यला सांगितलं तर दाल बट्टी करून देत असावा, पण प्रत्येक वेळी ती बट्टी टेष्टीच होईल याची खात्री नसते म्हणून अशी प्रसिद्ध नावँ नसावीत असे वाटते. पण अशी नावं असतील तर वाचायला आवड़तील.
-दिलीप बिरुटे
काका, मी असं ऐकलय की निगडीत - ट्रान्सपोर्ट नगर मध्ये रामदेव बाबाका धाबा इथे चांगली मिळते. पण कधी खाल्लेली नाही.
फार पुर्वी आकुर्डी स्टेशन समोर एक बालाजी नावाचं लहानंस हॉटेल होतं. तिथेही चांगली मिळायची. आताच माहित नाही.
मी एकदा माऊंट अबुलाही खाल्लेली आहे. पण त्यानंतर आमच्या घरातले सगळे दणकुन आजारी पडले!
बाकी आमच्याकडे मक्याचं पीठ घालुन कुरकुरीत तळलेलीच बाटी "हमखास हिट" आहे :)
काका, मी असं ऐकलय की निगडीत - ट्रान्सपोर्ट नगर मध्ये रामदेव बाबाका धाबा इथे चांगली मिळते. पण कधी खाल्लेली नाही.
फार पुर्वी आकुर्डी स्टेशन समोर एक बालाजी नावाचं लहानंस हॉटेल होतं. तिथेही चांगली मिळायची. आताच माहित नाही.
मी एकदा माऊंट अबुलाही खाल्लेली आहे. पण त्यानंतर आमच्या घरातले सगळे दणकुन आजारी पडले!
बाकी आमच्याकडे मक्याचं पीठ घालुन कुरकुरीत तळलेलीच बाटी "हमखास हिट" आहे :)
काय राम नै त्या रामदेव बाबात.नका जावू. त्यापेक्षा माझ्याकडे या खान्देशी बट्टी खायला.
चिंचवड गावात आदित्य बिर्लासमोरच्या रस्त्याला एक रस्ता समांतर जातो त्या रस्त्यावर रंगोली म्हणून एक ठिकाण आहे. तेथे राजवाडी बाटी खाऊन बघ.
अर्र.. तू तर डॉलरच्या देशात आहेस.. मी एखाद्या वीकांताला जावून खातो आणि तुला फोटो पाठवतो. ;)
१००
धन्यवाद!
वीकांताला टाकलेली साधीशी पाकृ कोणत्याही हाणामार्या न होता सुद्धा १०० गाठेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
बाटी ह्या विषयावर एवढी रोमहर्षक चर्चा केल्या बद्दल, अस्सल निखार्यात भाजलेल्या आणि तुपात मुरवलेल्या बाटीचे फोटो टाकल्या बद्दल, बाट्यांना वरण आणि कणिक ह्या समान घटकांमुळे पार चिकोल्या (अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र...) म्हणल्याबद्दल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, पाकृ "सेक्सी" आहे की नाही.. आणि मग मुळातच सेक्सी म्हणजे काय ह्याबद्दल एवढा तळमळीने विचार केल्याबद्दल सर्व प्रतिसादकांचे त्या त्या कॅटेगरीत आभार!
कुणी कधी करुन खाल्लीत ह्या पद्धतीने तर कळवा. परत एकदा धन्यवाद!
फाष्ट १०० साठी धाग्यावर हजेरी लावणाऱ्या सर्व काका, मामा, आत्याबाईंचा सत्कार हेल्दी वरणफळे देऊन करण्यात येत आहे.
छ्यॅ! वरणफळे नकोत, ती गोपाळरावांची खानदेशी दालबाटी देत असाल तर बोला.
मला आपले पथ्याचे खाणे बरे वाटते रे! आता वयानुसार ते सेक्सी बिक्सी पचायला अंमळ जड की रे! खाऊन नंतर त्रिफळा चूर्ण घ्यायची वेळ यायची! कसें?
आताच केली ( बायकोने)
मक्याचे पीठ घातले नव्हते. कणिक व रवा.
डीप फ्राय केले.
आवडली बट्टी. भरपेट, दाबून हाना अन एक मस्त ताणुन द्या. सालं सूख, सूख हेच दुसरं काही नाही. आमच्याकड़े चिकन होतं. सालं श्रावण लागला की नॉनव्हेज बंद होऊन जातं. आमचं घरी बंद असतं मित्रांब्रोबर सुरु असतं ;)
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
तो आकार असा टोस्टसारखा का वाटतोय? किंवा मोठ्या राजम्यासारखा.
ते सेक्सी दिसावं म्हणून तसे आकार द्यावे लागतात ;)
-दिलीप बिरुटे
बाटी गोल करुन शिजवली. मग तळताना त्याचे तीन तुकडे करुन मग तळले.
फरक इतकाच, आम्ही बाटीला गोल करुन एका साइडने थोडे दाबून किंचीत कॉन्केव्ह केले होते. त्यामुळे त्याचे तुकडे किंचीत बीन शेप्ड झालेत.
अच्छा ! असं कनेक्शन असतं तर... ओके
-दिलीप बिरुटे
सर, कनेक्ट झालंय.
आता थोडं व्हेरिएशन येऊ द्या की.
अरे वा! छानच दिसतेय. तुमच्या सौं ना सांगा!
कधी मी तुपावर परतुन केली तर त्याचे फोटो टाकेन. कुकर मध्ये वाफवल्याने पटकन होणारा आणि गुळ तुपासोबत खायला जास्त सोपा प्रकार आहे तो.
वा मस्त मस्त रेसेपि :)
चम्पाबाइ हा पुरुशाचा आयडी आहे ??????
ताज्या घडामोडी धाग्यावर बच्चनचे भाषण ऐकतानाचा फोटोही आहे.
हातिमताई पुरुष असु शकतो , मग चंपाबाई का नाही ?
अहमदाबाद
अहमदाबादला बाटीबरोबर डाळ होती ती चनाडाळ होती.
पाककृती आवडली. वरण, आमटी अशा कोणत्याही प्रकारच्या डाळीचा भक्त असल्याने हा प्रकार आणखीच आवडला.
अनेक बुफेंमधे बाट्या / बाटे वितळलेल्या गरम तुपात बुडवूनच ठेवलेले दिसतात. बाट्यांचे दोन्ही व्हेरियंट्स उत्तम.
ह्याला आम्ही दाळबट्टी म्हणतो. दाल बाटी म्हणले कि राजस्थानातली वाटते. आईकडे काल हाच बेत होता.
सेक्सी!!
आता कुणी १)दाल - पकवान (सिंधी ),
२)कुलचा ( पंजाबी )याची पाककृती टाका.
ठाण्यात कोपरी येथे अप्रतिम दाल-पकवान मिळतं...
कोपरीत कुठे ?पुर्वेला?फक्त सकाळीच?
शहाड- गोल मैदान.
होय..
नारायण दाल-पक्वान .. फक्त सकाळीच ..
चेंबूर क्याम्पात डाल पकवान मस्त मिळते.
चांगलंय ! करून बघायला पाहिजे
नंबर १ - राजस्थान ढाबा, भारत पेट्रो. पंपाच्या बाजुला, पुणे-सोलापुर हायवे, मोहोळच्या अलिकडे, इथं चुरमा देखिल जबरदस्त असतो, गरम गरम बाट्यांचा चुरमा करुन देतात, लाकडी दांड्क्याने बाटी तोडुन त्यात गुळ आणि तुप घालुन केलेला हा प्रकार मला लास्ट सपरला चालेल.
इथं तुप देखिल खुप चांगलं मिळतं, आणि मिळाले तर गुलाबजामुन , शुद्ध तुपातले आणि मिनिमम साखरेतले, नुसता तुपाचा वास आणि प्युअर खव्याची चव.
नंबर २ - रामदेव बाबा ढाबा निगडी . गरम मडक्यात तुप घालुन त्यात बाटी देण्याची पद्धत लई भारी.
नंबर ३ परमहंस - वडाचा स्टॉप, कर्वेनगर, दालबाटीची मेस असा प्रकार आहे, दररोज दोन्ही वेळेला दाल बाटी मिळते, तडका दाल हा कुटुंबाचा प्रचंड आवडता प्रकार आहे.
नंबर ३ - क्वालिटि का रंगोली, आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या समोरच्या गल्लीत ( या एरियात पुर्वीचे गिरिजा राहात होते असं ऐकुन आहे)- रामदेव बाबा पर्यंत जाणं लईच लांब वाटत असेल तर... गुलाबजामुन मात्र लई भारी, प्रत्येक वेळी गरम गरम देतात.
नंबर ४ - हॉटेल भोज - दुर्वांकुरच्या समोरच्या बोळात - गुजराथी थाळी - गावातला ऑप्शन, दाळीची चव लई भारी, बहुधा मिक्स दाळीची असते.
अतिशय महाग आहे असे निरीक्षण नोंदवतो.
अजून भर घालतो.
कोथरूड ला चांदणी चौकाच्या अलीकडे बुलेट शोरूम च्या लाईनीत एक खान्देश म्हणून हॉटेल आहे तिथे डाळ बट्टी भारी मिळते.
रच्याकने काढूनि मिरच्यांची भाजी खाल्ली आहे का या सोबत काय जगात भारी चव आहे त्याची.
पाकृ वाचली, पाहिली. चवीला चांगली लागत असणार हे नव्याने सांगायला नको. तळलेली बाटी गुळाबरोबरही खातात ही नवीन माहिती झाली. चुरमा करताना पिठीसाखर घालतात हे माहित होते.
ट्राय करून बघा.
खरे तर कणीक, रवा ह्यात गूळच मस्त लागतो.
अग्गो बाई!!!
जेवण बनवता येतं तर??
सेक्सी!!
पिरातैच्या रेशेपीने काल बाट्या बनवल्या. एकदम आवडल्या. धन्यवाद पिरा !! _/\_
वेळ आणि टेंपरेचर काय वापरले ?
I have used Usha halogen Air Fryer.
I used 250 centigrade, 9 minutes first side up, 9 minutes second side up (18 minutes total).
If your air fryer max temp capacity is 200 centigrade, then I feel 200 C / 15 min each side (total 30 min) should do the job.
धन्यवाद ! :)
मी फक्त राजधानीत खाल्लाय हा प्रकार. चव आवडली, पण त्या लोकांनी तुपाचा आग्रह करकरून वैताग आणला. ते काय ते आयुर्वेदिक डॉक्टर तूप खायला घालून उलट्या करवतात तसा यांचा बेत आहे की काय अशी शंका आली इतका. म्हणून मग परत जायची हिम्मत नाही केली. आता करून बघितला पाहिजे तुझ्या पद्धतीने.
पिरा, मस्त लिहिलं आहेस.
अवांतर- आता माझ्या मारवाडी मैतरीणीकडे दाल बाटी खायला म्हणूनच जाते. फोन करून सांगतेच आता तिला खूप दिवसात दाल बाटी खाल्ली नाहीये..:)
स्वाती
नागपंचमीच्या दिवशी चिकोल्या आणि काल बट्टी पण केली. रोडगे ओव्हन मधे भाजून घेतले असे भारी झाले होते की विचारु नका. वरण आणि बट्टीचं जेवण करतांना इतका जोरात ठसका लागला की नाका डोळ्यातून पाणी आलं, म्हटलं कोणी आठवण केली असेल बरं ? मनात म्हटलं आपण पिराकाकूच्या धाग्यावर प्रतिसाद लिहिले होते, पैकीच कोणी आठवण केली असेल म्हणून प्रतिसादाचा प्रपंच.... ! ;)
कॉलेजमधून घरी गेलो की फोटो टाकतो....
-दिलीप बिरुटे
नागपंचमीला तुमची आठवण आली होती.. चिकोल्यांमुळे हो!! ;) वाटलं होतं की इथे आठवण करुन द्यावी. पण म्हणलं कशाला उगाच हात दाखवुन... असो..
टाका फोटो नक्की. आणि तुमच्या सौंना धन्यवादही द्या.
बाकी जपुन हो.. ठसका वगैरे.. ह्या वयात काळजी घ्यावी!
(बिरुटेंच्या पुतणीच्या वयाची) पिरा! ;)