इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २)
पहिल्या भागात दिलेल्या भरभरुन प्रतिसादांसाठी, सुचवलेल्या दुरुस्त्यांसाठी सर्व वाचकांचे आभार.
पहिला भाग.:- http://www.misalpav.com/node/17293 .
मालिकेच्या नावातही ह्या भागापासुन दुरुस्ती करतोय.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २) जेणेकरुन शीर्षकावरुन मुख्य उद्देश जाहिर होइल. इथे संस्कृतींचा काळ दिलेला नाही. तो संपूर्ण इसवीसन पूर्व काळातला(इ स पूर्व २० ते २५ शतके इतकाही जुना) आहे. मुख्य उद्देश ह्या संस्कृती बायबलमधील घटनांत,कथांत डोकावत राहतील, त्यासाठी फक्त त्यांचं भौगोलिक माहात्म्य व कौशल्य सांगणे हा आहे.
३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
३. १प्राचीन इजिप्शियनः- बऱ्याचदा आपण अतिभव्य, अफाट अमानवीय वाटणाऱ्या पिरॅमिडबद्दल, तिथल्या स्फिंक्स बद्दल वाचतो, बघतो. आजच्या इतकं तंत्रज्ञान प्रगत नसतानाही शेकडो टन वजनाची एक शिळा, अशा शेकडो हजारो शिळांपासून अफाट बांधकाम करणारे प्राचीन लोक म्हणजे प्राचीन इजिप्शियन. नाइल नदीच्या काठावर ह्यांची वस्ती. काठावर हिरवीगार शेतं आणि काठापासून थोडसचं दूर लगेच अफाट, लांबच लांब वाळवंट, अशी वैशिष्ट्य पूर्ण नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेला हा भूभाग. ह्याचा बहुतांश भाग उत्तर आफ्रिकेत आणि थोडासा भाग आशियात येतो. (आशिया-आफ्रिका ह्यांच्या सीमेवर हा आहे. ) हे लोक मूर्तिपूजक. अगदी प्राचीन संस्कृतीपैकी एक. नागर, कृषी संस्कृती. सोन्याचा बराच वापर केलेला दिसतो. सोन्याचा देवही बनवत. बळी देण्याचीही प्रथा होती. सर्वात जुना लिखित इतिहास हा इजिप्तचाच आहे. हे लोक स्वतःला "हेत कोपता" असं काहिसं म्हणवून घ्यायचे. त्याचाच ग्रीक अपभ्रंश "हेगिप्तस" आणि त्याचाच पुढे "इजिप्त " बनला. ह्यांचे शासक फेरो/सम्राट स्वतःला देवाचा अवतार कीम्वा देवच मानायचे.
इब्राहिमी धर्मातले प्रमुख पंथ मात्र "कुठलाही मनुष्य स्वतः देव किंवा देवाचा अवतार असूच शकत नाही, परमेश्वर हा सर्व सृष्टीचा मालक/पालक असला तरी ह्यापैकी कुठल्याच एका घटकात बंदिस्त नाही" असं मानतात. त्यामुळं साहजिकच हे फेरो खलनायक किंवा वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून त्यांच्या ग्रंथात दाखवलेत. खोदकाम, बांधकाम, कृषी ह्यातलं प्रावीण्य आणि भक्कम, स्थिर समाजरचना म्हणजे तत्कालीन इजिप्त. ह्यांनी आदिम काळातच नकाशा, फिनिशियनांकडून कल्पना उचलून अॅबॅकसमध्ये सुधारणा केल्या होत्या. गणन यंत्रणेतही हे काळाच्या फारच पुढे होते. हे वंशानं आफ्रिकन नसावेत. आशियायी असावेत.
ह्यांचे तीन प्रमुख देव. त्यांची आपसात नाती होती :- नवरा बायको आणि पुत्र. शरद उपाध्ये ह्यांनी एका लेखात ही कल्पना शिव-पार्वती आणि श्री गणेश ह्याच्या अगदी जवळ जाणारे आहे असं म्हटलय.
३. २ हिटाईटस /हित्ती :- तुर्कस्थानच्या भूमध्य समुद्राच्या(Mediterranean) काठावर हा मानव समूह होता.
वेगवान रथ बनवण्यात ह्यांचा हातखंडा होता. ब्राँझ ताम्र पाषाण काळातून बाहेर येऊन लोखंडाचा वापर करण्याऱ्या प्रथम समूहांपैकी एक. वेगवान रथ वापरून ह्यांनी तत्कालीन प्रगत इजिप्शियन सम्राट रॅम्सिस (का रामसेस? ) ह्याच्याही नाकी नऊ आणले होते. तोवर, इजिप्शियनांना उघड युद्धात इतकं प्रखर उत्तर कुणीच दिलं नव्हत. इतर बहुतांश समूह तेव्हा संघटित आणि civilized झाले नसावेत. ज्यूंच्या इतिहासात ह्यांचा उल्लेख आहे. मात्र ख्रिश्चन आणि इस्लामच्या इतिहासात तितकासा नाही. कालौघात हे नष्ट झालेत किंवा इतर समाजात मिसळून, विरघळून गेलेत म्हणण्यास वाव आहे.
ह्यांच्या अनेकविध देवता होत्या. ह्या देवताही एकमेकांच्या नातेवाईक होत्या. मूर्तीपूजक.
३. ३ फिनिशियन:- "३०० " नावाचा दे- दणादण हॉलीवूडपट पाहिलात? त्यात इराणचा राजा झर्क्सिस ग्रीसवर (अथेन्स व स्पार्टावर) जहाजांचा अफाट ताफा घेऊन, समुद्र ओलांडून हल्ला करतो असं काहीसं दाखवलंय.
अशी जहाजं बनवण्यात तेव्हा पर्शियन राज्य प्रगत नव्हतं. त्यांनी ती विद्या शिकली, जहाजं बनवून घेतली फिनिशियनांकडून.
फिनिशियन हे उत्तम खलाशी होते. लेबनॉन, सिरिया आणि इसराइल हे देश भूमध्य समुद्राच्या काठावर एका पट्टीत, एका ओळीने आहेत. ह्या तीनही देशांच्या किनारपट्टीवर विरळ लोकसंख्येने राहणारे लोक फिनिशियन. दूर दूर पर्यंत समुद्री प्रवास, समुद्र ओलांडून प्रवास करणारे हे पहिलेच. (त्यापूर्वी, समुद्री किनाऱ्यावरील कोळी समुद्रात जाऊन समुद्री जीव घेऊन परत येत. समुद्र ओलांडून जाण्याची आणि मग तिथून परत येण्याची नेहमीची सवय फिनिशियनांचीच. ) ह्यांनी आपल्या स्थानावरून निघून ग्रीसपर्यंत प्रवास केला. तिथून पुन्हा ते तुर्कांकडेही जाऊ शकत. ह्यांनीच पुढे जाऊन कार्थेज वसवल असा एक अंदाज आहे. हो. तेच कार्थेज ज्यांनी पुढील काळात महाबलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी हन्निबल ह्याच्या नेतृत्वात दोन हात केले. इतका मोठा दणका रोमनांना तेव्हा आख्ख्या युरोपात किंवा मध्यपूर्वेत कुणीच दिला नसेल.
इ स पूर्वे १००० काळात चित्रलिपी सोडून स्वतंत्र अक्षर चिन्हे Byblos इथे बनवणारे हे पहिलेच लोक असावेत.
इथूनच ग्रीक biblia शब्द बनला असावा. ह्यांची छाप Aramaic व Greek मुळाक्षरांवर पडली.
हे सुद्धा बहुदेवता वादी. याव्हे-मोलोक हे पती पत्नी ह्यांच्या देवता.
३. ४मेसापोटेमियनः- आजच्या इराक मधील तैग्रिस आणि युफ्रेटिस ह्या नद्यांमधला सुपीक दुआब म्हणजेच मेसापोटेमिया.
इथेच पुढे अब्राहमाचा जन्म झाला. ते नंतर. नगर रचना शास्त्र, ज्योतिष गणित, चांद्र पंचांग ह्याच्यात हे खूप पुढे होते. १२ महिने असलेले क्यालेंडार, २४ तासाचा दिवस, ह्यांच्याकडे त्याही काळात वापरात होतं. नांगर सुधारणा, कुंभारकाम, कालव्यांचे जाळे खणणे ह्यात त्यांनी बरीच प्रगती केली. मेसापोटेमिया ह्या भागात आधी असीरियन मग सुमेरियन आणि शेवटी बाबिलोनिअन लोकांनी राज्य केलं. वेळोवेळी अब्राहमाच्या देवाचा प्रकोप ह्यांना अनैतिकते मुळे झेलावा लागला असं बायबलच्या जुन्या करारात दिलय.
३. ५ इतिहास प्रसिद्ध पर्शियन/इराणी साम्राज्य- "३००" हा दे-मार पट हॉलीवूड शिनेमा पाहिलात ना? त्यातली व्हिलनची बाजू म्हणजे सम्राट झर्क्सिसची बाजू म्हणजे पर्शियन साम्राज्य.
ह्याचा नुसता बायोडेटा देणं म्हणजे लिहिणाऱ्यानं हात दुखवून घेणं आणि वाचणाऱ्यानं थकून जाण्याइतकं आहे. इस पूर्वे पंधराएक शतकांपासून मध्य पूर्वेतीलच नव्हे तर जगातील एक महत्वाची, अवाढव्य लष्करी शक्ती, सुस्थित संस्कृती म्हणजे पर्शिया. हे लोक अग्निपूजक. झरतुष्ट्र ह्या प्रेषितानं त्या तत्त्वज्ञानाची अधिक मजबूत बांधणी केली. ह्यांचा विस्तार सांगतो:-
हे ग्रीसशी लढायचे म्हणजे भूमध्य समुद्र उतरून लढायला जायचे म्हणजे तितका भूभाग ह्यांच्या ताब्यात होता. आ़जचा इराक, इराण, पूर्व-दक्षिण तुर्कस्थान हा तर राज्याच मुख भाग होता. पूर्वेला ऐन भरात राज्य असताना(at its Zenith) आख्खा अफगाणिस्तान आणि भारताच्या सिंध-बलुच प्रांतातील बराचसा भाग ह्यांच्या ताब्यात होता. शिवाय मध्य आशियात
तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान (U S S R मधील) ह्यांचा दक्षिण पट्टा हातात. क्षत्रप नेमण्याची पद्धत ह्यांच्या कडून ग्रीकांनी आणि ग्रीकांकडून आख्ख्या जगाने उचलली म्हणतात. पर्शियनांना (राजा दारियस) हरवल्यावरच आपण खरोखर शक्तिशाली आहोत, जग जिंकू शकतो असं सम्राट सि़कंदराला वाटायला लागलं. जागतिक व्यापारातला हे एक महत्वाचं केंद्र होतं. ह्यांच्या बऱ्याचशा कल्पना प्राचीन वेदकल्पनांशी खूपच साधर्म्य दाखवतात.
हे सगळं मी का सांगितलं? कारण ह्या सर्व संस्कृतींचा उल्लेख ज्यू-ख्रिश्चन-इस्लामिक साहित्यात पुन्हा पुन्हा येत राहील.
कधी शत्रू म्हणून, कधी आश्रयदाते म्हणून तर कधी अनुयायी आणि दोस्त म्हणून. त्यावेळेस ही नावं ओळखीची असली, तर मस्त गोष्टी वाचल्याचा फील येईल.
४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
:-ज्यूंचा बायबल. बायबला जुना करार.
ख्रिश्चन बायबल चा जुना करार, नवा करार दोन्हीला मानतात.
बायबल हे गीतेसारखं एकटाकी, एकाच व्यक्तीनं लिहिलेलं किंवा सांगितलेलं पुस्तक नाही. ते अनेकानेक भविष्यवेत्त्यांनी, प्रेषितांनी आणि द्रष्ट्यांनी लिहिलंय. जुन्या करारात विश्वोत्पत्ती(जेनेसिस, अॅडम-ईव्ह कथा) आहे, मोझेसचा पराक्रम आणि वेळोवेळी भटकलेल्या ज्यू समाजाला इश्वरमार्गावर आणण्यासाठी परमेश्वरानं योजलेल्या घटना, उपदेश आहेत.
नवा करार म्हणजे येशूच्या चार अनुयायांनी येशूच्या चमत्काराचं आणि शिकवणुकीचं केलेलं वर्णन.
कुर-आन :- देवदूत जिब्राइल (गॅब्रियल ) ह्यानं इश्वर साक्षात्काराच्या दरम्यान प्रेषित महंमदाला उपदेश केला.
महंमदांनी प्रवचनातून आपल्या एकनिष्ठ आणि अगदी सुरुवातीच्या अनुयायांना (हे अनुयायी म्हणजे " साहाब" ज्यांनी महंमदाच्या हस्ते इस्लामची शिकवणी घेतली आणि शिष्यत्व पत्करलं. तुम्ही बघाल पुढे महंमदानंतर ज्या ज्या लढायात साहाबा लढले, तिथे सर्वत्र त्यांचा विजय झाला. ) हे सांगितलं. हे उपदेश महंमदानंतर काही वर्षातच ग्रंथीभूत करण्यात आले, ते म्हणजे कुर-आन. तोवर ते मौखिक परंपरेनं चालत होते.
हादिस/हादिथः- प्रेषित महंमद ह्यांच्या जीवनातील घटना/गोष्टी ह्यांचा संग्रह.
इस्लाममधील वेगवेगळे पंथातील हदिसमधलं प्रमुख घटनांचं वर्णन एकच असलं तरी काही पंथांच्या काही गोष्टी वेगवेगळे संदेश देतात. शिया आणि सुन्नी ह्यांच्या स्वतःच्या हदिसमधील बहुतांश घटना एक सारख्या आहेत, काही थोड्या मात्र वेगळ्या आहेत. ज्या गोष्टीबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही, त्याबद्दल हदीसला शरियत कायद्यात प्रमाण मानण्यात येतं.
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
बस्स. येव्हढं एक माफ करा. हे पुढच्या भागात टंकतो. आता त्राण उरले नाहित.
आपलाच
मनोबा.
प्रतिक्रिया