यु आर लेट यु फुल
आज भेटायचे ठरले होते आपले किनार्यावर
जरा लवकरच आलो
अन् दूर उभा राहिलो
.
मी नसतांनाचा समुद्र आणि
मी तुझ्याबरोबर नसतांनाची तू
दोघांना बघायचे होते म्हणून
.
पण तू माझ्या आधीच पोहचली होतीस
किनार्यावर, समुद्राकडे तोंड करून
.
मनात म्हटले,
यु आर लेट यु फुल!
.
बेभान वाहणारा खारट वारा
तुझ्या कुंतलात अडकून तुला छळत होता
वाटले तुझ्या केसांमधून बोटे फिरवून
त्याला मोकळे करावे
पण इतक्यात तू मानेला
एक मोहक झटका देऊन त्याला झटकलेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
तुझ्या पायाखालची वाळू
तुझ्या कोमल पाऊलांना चिटकत होती
तुला ती हुळहुळ सतावत होती
वाटले पुढे होऊन ती झटकून द्यावी
पण इतक्यात तू येणार्या लाटेत
आपले पाऊल हळूवार वरचेवर घुसलळेस
वाटले...
यु आर लेट यु फुल!
.
समुद्र जरा रागावलेला वाटला, बहुदा माझ्यावरच
तिला वाट पाहायला लावत होतो
म्हणून असेल बहुतेक
नाही,बहुदा तिच्या डोळ्यातला समुद्र जास्त सुंदर होता,
म्हणून कदाचित
माहित नाही नक्की काय ते
पण त्याच्या लाटा अजूनच
उग्रपणे किनार्यावर आदळत होत्या
.
कुठल्याशा अनावर ओढीने मी तुझ्याकडे सरसावलो
तुझा हात धरून तुला मागे ओढले
मला पाहताच तू लटक्या रागाने
ओठांचा लोभस चंबू करत म्हणालीस
.
यु आर लेट यु फुल!!
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
टिपः हि कविता मी ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, तिथुन उचलुन चेपुवरच्या 'पुण्याला पुणेच म्हणा' नावाच्या ग्रुप ने ती माझे नाव वगळून, मला न विचारता एक पेज बनवून त्यांच्या ग्रुप मध्ये प्रसिद्ध केली होती. त्यामुळे तुम्ही ती आधीच वाचलेली असण्याची शक्यता आहे. तिथे काही हजार लाइक्स आले होते, मला कळल्यावर, मी ती कविता त्या ग्रुपशी भांडून तिथुन काढायला लावली.
(आमच्या शब्दांची ठिगळं नकोत)+१०० !