Welcome to misalpav.com
लेखक: चित्रगुप्त | प्रसिद्ध:
... 'गाय' चं एक चित्र मुंबईतल्या एका लिलावात सुमारे चोवीस कोटी रुपयात विकलं गेलंय म्हणे. 'गाय' हा थोर आधुनिक भारतीय चित्रकार. त्यामुळे समस्त थोर्थोर आधुनिक भारतीय चित्रकारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे. त्यातून 'गाय' हा मराठी माणूस. मुंबईकर. त्यामुळे तमाम मराठी मुंबईकरांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे. 'गाय' थंडीत मफलर गुंडाळून हिंडायचा. त्यामुळे समस्त थंडीत मफलर गुंडाळून हिंडणार्‍यांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे. 'गाय' बूट घालत नसे, सँडिलं वापरायचा. त्यामुळे तमाम बूट न घालता सँडिलं वापरणारांचा ऊर अभिमानानं दाटून आलाय, आणि त्यांची आशा पल्लवित झालीय म्हणे.... *** 'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्‍या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम. आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल.... हे नरपुंगवांनो, 'गाय' जेंव्हा हयात होता, तेंव्हा तुम्ही हेच चित्र खुद्द त्याच्याकडून चोवीस लाखात, किंवा चोवीस हजारात जरी घेता, तर तो औषध-पाणी करता, स्वतःचे घर बांधता, आरामात राहता.... .... पण पाण्यासाठी रानावनात वणवण फिरणारी एकादी गाय हेरून, उंच आकाशात घिरट्या घालत तिच्यावर नजर ठेवणारांची तुमची जमात. ती गाय शेवटी कोसळली, की मग झडप घालून तुम्ही तिचे लचके तोडणार. आमचा 'गाय' विझत चालल्यावर तुम्ही त्याच्यावर एक फिल्म बनवून घेतलीत, आणि जगभरात दाखवलीत म्हणे. त्यात 'गाय' च्या स्टुडियोत सर्वत्र ठाण मांडून बसलेली धूळ, जळमटं, आणि त्या सर्वात अगदी अविचल, निर्विकार, पुतळ्यासारखा बसलेला, निर्लिप्त 'गाय' दाखवलाय म्हणे. गाय कोसळत चालल्याची बातमी पसरवण्याचा हा इशारा तर नव्हता? आता 'गाय' च्या चित्रांची किंमत सदैव आणखी आणखी वाढत रहावी, म्हणून देश-विदेशात मोठमोठी प्रदर्शने भरवली जातील. थोर-थोर समिक्षकांना हाताशी धरून त्यांच्याकडून 'गाय' वर अखंड स्तुतिसुमने उधळली जात रहातील.... *** गाय, चोवीस कोटींची ही बातमी वाचून मला जुने दिवस आठवले... तेंव्हा तुम्ही साठीत, तर मी तिशीत असेन. तुम्ही माझे आदर्श होता. मी तुम्हाला भेटायला यायचो, तेंव्हा तुम्ही आपुलकीनं चवकशी करायचात, मी करत असलेल्या धडपडीचं, माझ्या चित्रांचं तुम्हाला कौतुक वाटायचं... पण तुम्ही स्वतःविषयी, तुमच्या चित्रांविषयी मात्र कधीच काही बोलला नाहीत. पुढे पुढे तुम्ही खूप अलिप्त होऊ लागलात. तुमच्या स्टुडियोत सर्वत्र धुळीची पुटं, कोळीष्टकं जमू लागली. मी फार व्यथित व्हायचो हे सर्व बघून. एकदोनदा "रविवारी मी येऊन सगळं स्वच्छ करून देतो" असं मी म्हटलं, त्यावर तुम्ही फक्त 'असू दे तसंच' म्हणालात... काही काळानंतर तुम्ही गेल्याचीच बातमी आली. गाय, अलिकडे तीन-चार वर्षांपूर्वी दिल्लीतला एक कला-व्यापारी माझ्याकडे हळहळ व्यक्त करता झाला. त्यानं तुमच्याकडून पुष्कळ वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर-शंभर रुपयात चार चित्रे खरेदी केली होती. आणि काही वर्षांनी ती सव्वा-सव्वा लाखात विकली होती. अर्थात त्या पाच लाखातून तुम्हाला काही देण्याचा विचार त्याच्या मनात येण्याचा प्रश्नच नव्हता. तर त्यानं माझ्याकडे व्यक्त केलेली हळहळ अशी: " अरे यार, मै और कुछ साल रुकता, तो आज एकेक पेंटिंग सत्तर-अस्सी लाखमे बेचता" ... आता चोवीस कोटींची बातमी ऐकून त्याची हळहळ किती वाढली असेल ? *** हे लिलावकर्तेहो, तुम्ही केवळ महान. गीतेत सांगितलंय, 'समत्वं योग उच्यते' तर तुम्ही महान योगीच. परब्रम्हाचे उपासक. आप-पर भेद तुम्हासि नाही. तुमच्या लेखी सर्व सारखे. कुणाचे चित्र, तर कुणाचा पंचा, कुणाची तलवार, तर कुणाचा चष्मा. कुणाची कवळी तर कुणाचे टमरेल. सर्व सारखे. सर्व लिलाव करण्याच्या वस्तु. तुम्हाला कोटि कोटि प्रणिपात. *** आता लवकरच बातमी येईल, साबरमतीच्या संतानं वापरलेलं टमरेल अमूक इतक्या कोटीत लिलावातून विकलं गेलं... ... हे ऐकून बोहरा गल्लीतल्या सर्व टमरेलं विकणार्‍यांचा ऊर अभिमानानं दाटून येईल आणि त्यांची आशा पल्लवित होईल... ... 'साबरमती के संत तुने कर दिया कमाल, रघुपति राघव, राजाराम' या गाण्याची सिडी विकणार्‍यांचाही ऊर अभिमानानं दाटून येईल, आणि त्यांची आशा पल्लवित होईल... जय महाराष्ट्र. भारतमाताकी जय. जय हो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चित्र अव्वाच्यासव्वा भावात विकले जाणे, आर्ट डीलर्स मतलबी असणे, कलाकारांस वाईट दिवस पहायला लागणे सगळे समजले पण शेवटी ते शेवटी गांधीजींच्या पंच्याला का हात घातला गेला त्यामागचे लॉजिक अन कार्यकारणभाव काही समजला नाही, चित्रासोबत तो ही समजवता आला तर आपले आभारी राहु.

काय योगायोग! मिपाकर रामदास यांच्याकडून परवाच आणलेले गायतोंडे यांच्यावरील पुस्तक वाचायला घेतले आणि हा एक ५ वर्षांपूर्वीचा लेख वर आला.

'गाय', चित्र कोटी व टमरेल या सगळ्यांच्या निमित्ताने बहुमूल्य चर्चा वाचायला मिळाली जिची किंमत ठरवता येणार नाही. हे म्हणजे एखादी गाण्याची रंगलेली मैफिल ऐकून बाहेर पडताना श्रीमंत झाल्यासारखे वाटते असं काहीतरी. घाईघाईने देवळांत जाऊन देवावर मेहरबानी करून यावी, असा एकदा बालाजीच्या देवळात गेलो होतो. थंडीतल्या संध्याकाळी सातचा सुमार असावा. घंटा आणि नादस्वरम् वाजवत दोन माणसं काहीतरी झटापट करत होते. चपला घालून सटकतच होतो पण पाय निघत नव्हता. अर्धा तास तसाच उभा राहून ऐकत राहिलो. उर्वरीत दुनिया एकडून तिकडून होत होती. मी, ते दोघे आणि बालाजी काळात वितळून गेलो होतो. ती जादू थांबली. त्यांच्याजवळ गेलो विचारलं " क्या बजा रहा थे?" दोघे हसले , हात व मान नकारार्थी हलवून हिंदी येत नाही असं कळवलं. बोऱ्याबिस्तर घेऊन निघून गेले. माझ्याकरता ते संगीत '२४ कोटी'चं होतं. त्यांनाही ते माहीत नसावं. पूर्वीच्या राजांपैकी असतो तर गळ्यातले दागिने/ मुद्रिका बिद्रिका काढून दिल्या असत्या. चक्रवर्ती राजा सत्कार करतो म्हणजे ते दोघं पण महान होणारच. ते वाजवतील ते उत्कृष्ट असणारच, हाच न्याय ना? कोणालातरी आवडावं आणि आवडलेली व्यक्ती कोण, ह्यावर पुढील निकष/ व्यवहार अवलंबून असतात. रसिक जेवढे श्रीमंत तेवढी लोकप्रियता अधिक. रेणू मंडल बघा ना, रेल्वे स्टेशनवर भीक मागत गाता गाता लाखो लोक ऐकून, पैसे देऊन गेले असतील. एकानेच व्हिडिओ बनवला व तो हिमेश ला आवडला, मग साठा उत्तराची वगैरे वगैरे. आता तिच्या ताना आपल्या कानावर येऊन येऊन तिला आपण गायिका करून पण टाकू. सापेक्षता नेहमीच चकवते. बाकी ज्याच्याकडे २४ कोटी आहेत तो कशाला वाद घालतोय म्हणा. त्याची मर्जी. मोठी माणसं कोणालाही मोठं करू शकतात निदान प्रयत्न तरी नक्की करतात. बहुधा प्रत्येकाची रसिकतेची व ती पूर्ण करण्याची ऐपत वेगळी असावी. राहिलं टमरेल, फुटलेलं,गंजलेलं का असेना संतांचं म्हणून घरात बाथटब व इतर सुखसोईंनी सज्ज बाथरूम असलेली माणसंसुद्धा ते घेतीलच. मूळात संत पैश्यावर छापलेले आहेतच तर ते विकत घ्यायला पण संतच लागतील. मूळ धाग्यापेक्षा त्याचा प्रतिसाद 'दोरखंड' झाला, त्याबद्दल क्षमस्व. मनमोकळा लेख व त्याहून खुल्लमखुल्ला चर्चा खरंच आवडली, म्हणून एवढी हिम्मत केली. इति अलम्। __/\__

मिपाकर संदीप चांदणे यांनी आज सकाळ मध्ये श्री वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला ४०,००,००,००० रुपये (अक्षरी रुपये चाळीस कोटी फक्त) मिळाल्याची बातमी असल्याचे सांगितले. इपेपर मध्ये बातमी आहे, पण esakal.com वर बातमी सापडली नाही. एक बातमी टीव्ही9 ची सापडली. चित्रगुप्त साहेबांचे शब्द सात वर्षांनी खरे ठरले!
*** 'गाय'चं एक चित्र चोवीस कोटींना विकत घेणार्‍या नरपुंगवा, नरशार्दुला, तुला कोटि कोटि प्रणाम. आता लवकरच तू ते चित्र चाळीस कोटीत विकशील, मग तो चाळीस कोटीवाला पुढे ते साठ कोटीत विकेल....

अतिशय रोचक माहिती ! डेवीड हॉकनी यांचे हेच ते पेंटींग : Pool with Two Figures पुल वुईथ २ फिगरः किंमत रू 646 कोटी आणि ही दोन अडीच वर्षांपुर्वीची बातमी आहे. HNBDqwsec2ert4

आहेत? गायतोंडे यांची चित्र अनेकांना एवढी विलक्षण का वाटतात, हे त्या चित्रांचे फोटो पाहून लक्षात येणार नाही. कारण फोटोंमधून चित्राचा आकार, रंगाचे थर, त्यातला प्रवाहीपणा समजून घेता येत नाही. त्यासाठी ती चित्रं प्रत्यक्ष पाहावी लागतात. अशा चित्रांचा अर्थ लावायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव कधी मनाला शांत करतो, कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी समृद्ध करून जातो. 2019 साली कलाप्रेमींना असा अनुभव घेता आला. त्यावेळी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात गायतोंडे यांच्या चित्रांचं प्रदर्शन लागलं होतं. त्यानंतर चित्रकार-गायक सुनील विनायक बोरगांवकर यांनी आपले अनुभव शब्दांत मांडले. ते लिहितात, " गायतोंडे सरांचं चित्र बघताना, आधी 'संपूर्ण चित्र' दिसतं. 'साक्षात्कारी दर्शन' ! हे दर्शन इतकं गुंतवून टाकतं की आपण नकळत चित्राच्या जवळ, जवळ, अजून जवळ कधी गेलो, चित्रानंच हळूहळू जवळ कसं खेचून घेतलं, खिळवून ठेवलं, हे लक्षात येत नाही. "अपरिमित शांतता. या साक्षात्कारी अनुभवानंतर भानावर आल्यावर साहजिकपणे मनात सुरु होणारी चल-बिचल. त्यांनी हे कसं केलं असेल, त्यांना हे कसं साधलं असेल, हे सगळं कसं काय जमलं असेल, असं वाटत राहतं आणि पुन्हा ते वाटणंही गळून पडतं

गायतोंडे यांची चित्र अनेकांना एवढी विलक्षण का वाटतात, हे त्या चित्रांचे फोटो पाहून लक्षात येणार नाही. कारण फोटोंमधून चित्राचा आकार, रंगाचे थर, त्यातला प्रवाहीपणा समजून घेता येत नाही. त्यासाठी ती चित्रं प्रत्यक्ष पाहावी लागतात. अशा चित्रांचा अर्थ लावायचा नसतो, तर अनुभव घ्यायचा असतो. तो अनुभव कधी मनाला शांत करतो, कधी आत खोलवर हादरवून टाकतो, पण काही झालं तरी समृद्ध करून जातो.
... एकदम बरोबर.