Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:
उर्फ पु.ल. वरील शिर्षकातले नाव त्यांनीच "अपूर्वाई" ह्या त्यांच्या प्रवासवर्णनामध्ये फ्रांसच्या भेटीवर असताना घेतले होते. पु.ल. म्हंटल्यावर काही लांबलचक लिहून त्यांची ओळख वगैरे मी करून द्यावी ह्याची गरज नाही. पण मराठीतल्या विनोदाची उंची....सॉरी शुद्ध,निर्मळ,निर्भेळ विनोदाची त्यांनी गाठलेली उंची आजचे काही लेखक (त्याच्या पायथ्यापर्यंतही पोहचू शकत नसताना)गाठण्याचा प्रयत्न करताना पहिले की मला रावसाहेब आठवतात ते म्हणतात "बदला की वो चाऽऽऽल, ते दिनानाथ नाही का बदलले पण त्यांचा अधिकार होता म्हणतोय मी...." थोडक्यात आजचे लेखक "कोटीच्या" नावाखाली जे करतात त्याने खूप त्रास होतो. पु.लनच्याच असामी असामी मध्ये एक वाक्य आहे "टॅकसी ड्रायव्हर सरदारजी असल्याने केव्हा फेट्यात राख घालून निघून जाईल हि भीती होती" किंवा मुबैकर पुणेकर की नागपूरकर मध्ये घरातली बोली आणि व्यासपीठावरील बोली हा फरक दाखवणारा उतारा. मी गडबडा लोळून हसलोय ह्या सर्वांवर...आपण सगळेच हसलोय मनमुराद...अशी अनेक वाक्ये जी वाचून किंवा पु.लंच्याच तोंडून प्रत्यक्ष ऐकून लक्षात राहिलेली आहेत. तुम्हालाही नक्कीच आठवत असतील. माझी एक विनंती आहे तुम्हाला पु.लची जी वाक्य आवडली आहेत ती प्रतिसादरूपाने इथे मांडा. कुणी कधीही केव्हाही हा धागा वाचला तर त्याला एक निर्भेळ, निर्मळ आनंद, समाधान मिळावे आणि धागा अजरामर सुरूच राहावा. धन्यवाद
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काही म्हणा पण आम्ही सातारा कोल्हापूर साईड चे असल्यामुळे म्हणा कि काजून काही मला तरी पु लं चे विनोद कधी आवडले नहित. काही लेख , काही गोष्टी नक्कीच आवडल्यात पण सगळ्या नहि. त्या मानाने मिरासदार , शंकर पाटील, अत्रे ह्यांचे विनोदी पुस्तके जास्त आवडली आहेत, पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात . सहज घडणारे विनोद नाही वाटत . ओढून ताणून केलेले विनोद वाटतात

आपल्या मताचा आदर आहेच. पण मी स्वतः मिरजेचा आहे ('जीवनाची' पहिली १७-१८ वर्षे मिरजेस काढलेली आहेत) अन पुणेमुंबैला उच्चासनावर ठेवून रेस्टॉफ म्हाराष्ट्रावर पुलंनी हिणकस विनोद केलेत असं कधीच त्यांच्या शैलीतून जाणवलं नाही. असो.

ब्याट्याशी सहमत, सातारा + कोल्हापूरचा याच्याशी काहीही संबंध नसावा. दोन्ही शहरात पुरेसा काळ राहीलो आहे. इथले बरेच मित्र पुलंचे चाहते आहेत. मी पण अर्थातच आहे. बाकी वैयक्तीक मत ठेवायचा अधीकार तुम्हाला आहेच.

ब्याट्याशी सहमत. सातारा मिरज कोल्हापूर सांगली कराड या बहुतेक गावात रहिलोय. पुलंचे विनोद कधी पुण्यामुम्बईला उच्चासनावर ठेवून लिहीलेत आसे वाटले नाही. य उलट पुलांची भाषेवर फार उत्तम कमांड होती. त्यानी " ती फुलराणी" आनि " वार्‍यावरची वरात" यात सातारी मराठीचा उत्तम वापर केलेला आहे

शंकर पाटील मिरासदार या बातीत बोलायचे तर ते दोघी ही सीमा भागात राहिलेले. ग्रामीण मराठी वातावरणाचा त्यांचा जवळचा संबन्ध आलेला. पुलं चे बहुतेक आयुष्य मुम्बैत पुण्यात गेलेले. अपवाद बेळगावच्या कॉलेजात केलेली नोकरी., त्यांच्या लेखनात पुण्या मुम्बैचे संदर्भ जास्त न येतील तरच नवल.

१) ह्यांचे नाव प्रथम जेव्हा त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी त्यांच्या नावात एकही काना मात्रा वेलांटी उकार नाही फार सरळ नाव आहे...हा त्यांनी त्यांच्या नावातला "ओढूनताणून" दाखवलेला कमीपणा मला खूप भावला होता. २)आमचे घर अगदीच "आलिशान" नसले तरी "गेलीशान " हि नाही ह्याच्यात कुठेच सहजता नाही हे कुणाही ऐर्या गैर्याला सुचू शकतेच की ३) म्हणजे मी हमाली करून काही "चलनी पौंड " कमवावेत आणि "वजनी पौंड " घटवावेत असा सल्ला हिने मला दिला ह्यात विनोद करताना खूपच ओढाताण जाणवते. ४)राम कदम ह्यांना मुल झाल्यावर "कदम, कदम बढाये जा" हि तर...काय बोलू... असे किती तरी किस्से आणि विनोद आहेत जे करताना पुलंना प्रचंड धाप लागली असेल.

पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात .
तरीही ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व होते बाकी तुम्हालाही विनोद जमतोय असे दिसते.

@म्हैस, >>>>पु ला मला नेहमी दुसर्याच्या कमी पणावर विनोद करणारे वाटतात . विनोद हा मराठी भाषेतला अलंकार आहे. त्यात अतिशयोक्ती, उपरोध, विरोधाभास वगैरे मार्गांनी व्यक्तीच्या, समाजाच्या वैगुण्यावर नेमके बोट ठेवून विनोदाच्या मार्गाने हसत-खेळत, संबंधीत व्यक्तीला, समाजाला न दुखावता, ते वैगुण्य दाखविणे हा विनोदकर्त्याचा उद्देश आणि कर्तव्य असते. जसे म्हैस कथेत, ' अहों एंवढ्याशां पाण्यांने कांय होतंय? असे म्हणून तेंव्हढेंसें पाणी स्वतः पिउन टाकले आणि तुंमचा थर्मास बाकी फर्मास हों. अमेरिकन दिसतोंय. अशी मखलाशीही केली.' ह्यात त्या, सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या, व्यक्तीच्या स्वार्थावर नेमके बोट ठेवले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्याला तुम्ही कमीपणा म्हणता आहात त्यालाच 'वैगुण्य' म्हणतात. असे वैगुण्य हसत हसवत दाखवून दिल्यास त्या व्यक्तीलाही कमीपणा/अपमान वाटत नाही आणि त्यास आपल्या स्वभावात इष्ट बदल करण्यास प्रवृत्त केले जाते. पुलंची प्रवासवर्णनं (अपूर्वाई, पूर्वरंग), व्यक्तीचित्रणं (रावसाहेब, अंतू बर्वा, हरीतात्या, नारायण) बालपणीच्या आठवणी (बिगरी ते मॅट्रीक) ह्या सर्व साहित्यात कुणाच्या कमीपणावर बोट ठेवले आहे असे मला तरी वाटत नाही. खुप वेळा माणूस तोंडाने एक बोलतो आणि कृती अगदी त्या विरुद्ध करत असतो. हा फरक, हे वैगुण्य हसत हसत दाखवून देण्याचे काम 'विनोद' करीत असते. असे विनोद समाज स्वास्थ्य सुदृढ करण्यास हातभार लावतात असे माझे मत आहे.

बाकी एक बाई दुसर्‍या बाईकडे जेवढी निरखून बघते तेवढे पुण्यातले पेन्शनरपण नाही हो पाहात !

धमाल धागा झालाय! काही प्रमाणात म्हैस आणि वल्ली यांच्याशी सहमत. कधी कधी रत्नांग्री आणि मधल्या आळीवर जरा जास्तच विनोद केल्यासारखं वाटतं. मात्र त्याचबरोबर त्यांचे स्वतःवर केलेल विनोदही बर्‍याच प्रमाणात आहेत हे कबूल करावं लागेल.

फारसा सहमत नाही. गणगोतमधील रामूभैय्या दाते आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखांमधले पुण्याचे उल्लेख वाचले तर पुणेकर याच भावना व्यक्त करतील.

मला पु. ल. आणि शंकर पाटील दोघेही आवडतात. दोघांचे विनोद सुंदर असतात. पु. ल. यांचे विनोद भाषेवर आधारित असतात. तर शंकर पाटीलांचे विनोद परिस्थीतिजन्य असतात. तसेच व्यंकटेश माडगुलकर, द. मा. मिरजडार पण आवडतात. एवढेच कशाला आज कालचे अजित कोष्ठी पण आवडतात. व. पु. यांच्या बद्दल तर प्रचंड आदर आहे. त्यांच्या ईतक्या भाषेवर प्रभुत्व असणार्‍या माणसास ज्ञानपीठ पुरस्कार मिळू नये ह्याचे शेवट पर्यंत वाईट वाटत राहील. पण सांगणे हेच की ही सगळीच मंडळी अदरणिय आहेत.

"प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू असतो असं कुडचेडकरांनी म्हटलं आहेच." "कोण म्हटलं हे?" "स.त. कुडचेडकर- केतकी पिवळी पडली चे लेखक-ख्यातनाम." "अस्सं!" वास्तविक पाहता कुडचेडकर नावाचा कुणी लेखक या जगात आहे याचा मला पत्तासुद्धा नव्हता आणि या गटण्याला त्याच्या " केतकी पिवळी पडली" या पुस्तकातली-आता हे काव्य होते की नाटक की अजून काही काय माहिती-वाक्येच्या वाक्ये पाठ होती. या गटण्याची केस अगदी हाताबाहेर गेली होती.

काही सहित्यिक भोग- पु ल देशपांडे स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ. मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज. मी उपाख्य गाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे? मी. काही कल्पना नाही बुवा. गा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.) मी. हो. गा.ग.जो. किती वर्षे? मी. बरीच. गा.ग.जो. व्यवसाय? मी. पुस्तकं वगैरे लिहितो. गा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही. मी. आपण कुठल्या गावचे? गा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार. मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून. गा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही. मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली? गा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनवरवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल. मी. तुम्हाल तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती? गा.ग.जो. हो आहे मग. मी. मग कशाला विचारताय? गा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला. मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध? गा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पसून उभा अहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे. मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता. गा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त पुत्त्यापुरता. एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठी आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका. मी. खरं आहे. गा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर! मी. (देवावर भार घालून) मानतो तर! गा.ग.जो. मग जाता का? मी. दशभुजाला नाही जात. गा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता? मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही. गा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय. मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.) गा.ग.जो. सरळ हो सांगा ना. मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची? गा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो. मी. (मुकाट्याने) हो. गा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे? मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता. गा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो. मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच) गा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट! मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला) गा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय! मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल. गा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात. मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम. गा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता? मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल... गा.ग.जो. ती कुठेशी आली? मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून. गा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम. मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो. गा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय. मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील. गा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये. मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे. गा.ग.जो. ती कशी येणार? मी. म्हणजे? गा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय. मी. काय म्हणता. गा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल. मी. मग मघापसून का नाही सांगितलंत. गा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं? मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते. गा.ग.जो. आजच हे नाव ऎकतोय. मी. मी पण! (गा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.) =)) ================================ =)) पु.लं.च्या "पुरचुंडी" किंवा "उरलं-सुरलं" या २ पैकी एका पुस्तकातल्या लेखातला हा भाग आहे. =)) त्यांचे अश्या तर्‍हेचे संवादंही प्रत्यक्ष दृष्य उभं करून जाम हसवतात! =))

साहेब आज ह्या धाग्याचे सार्थक केलेत ("केलेत" म्हटले कारण तुमचे लिखाणाचे श्रम मला जाणवतात म्हणून आणि झालेत म्हंटले तर सारे श्रेय नशिबाला जाते हो...तसे होऊ नये ना म्हणून.) मजा आणलनीत हो धाग्यात

पु.लं. चा एक किस्सा .... चाळीतला दादर चाळीमधल्या दोन तरुण मुली समोरासमोर आल्या आणि संवाद सुरु झाला ... "इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला -" "इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!" "पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा." "तीन दमडीचा ब्लाउज!" "म्हणजे तुला महागच!" "पन्नास ब्लाउज आणून देइन -" "शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?" "का म्हणून -" "त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!" "अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं" "हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणिच्या मागे जायला " "तुला पाहतांना फुटले होते वाटतं?" "कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?" "असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !" "हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?" "आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!" "तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!" "चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!" "आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत " "हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली " "आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?" "हॉ हॉ हॉ ~!" "वेडावतेस काय माकडासारखी " "तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता." "ही ही ही ही! गणपती उत्सवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे कावय नको." "चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!" "बाबांच नको हं नाव घेऊ!" "मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन." "माडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!" "मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?" "तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टिक? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला" "खरे दात आहेत - कवळी नाही तुझ्या आई सारखी!" "चप्पल मारीन, सांगते!" "आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस - रोज नवी चप्पल!" "बघायचिय का?" "बघू - माझीच असेल!" "ही बघ .. फाट! "

@"तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!" "चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!" "आईला जरा आवाज हलका करायला सांगा - आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत ">>> =)) =)) =))

हा किस्सा नसून, "काही बेताल-चित्रे" ह्या लेखातले एक बेतालचित्र आहे, असे वाटते..

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना काही कारणास्तव हिंदुजा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. ते ऐकताच पु. ल. उद्गारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिंदुजा में है' असं लिहायला हरकत नाही.' --------------------------------------------------------------------------------- साहित्य संघात कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु. लं. ना आवर्जून बोलावले होते. नाटकाचा पहिला अंक चालू असतांनाच पडद्यामागे धडाम्‌कन्‌ काहीतरी पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु. लं. ना म्हणाला, 'काय पडलं हो?''नाटऽऽक दुसरं काय?' पु. लं. उत्तरले. ----------------------------------------------------------------------------- नवीन शुद्ध लेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुद्धलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडळात घाटत होतं. त्यावर पु. लं. नी खालील छेद दिला,'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुद्धलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो, लिवा. क्याऽऽऽ ळंऽऽ!'

अंतूशेट बर्व्यांपर्यंत माझी कीर्ती पोहोचल्याचे ऐकून झालेला आनंद बापूशेट हेगिष्ट्याच्या प्रश्नाने मावळला. मला नीट न्याहाळीत बापूशेट म्हणाले, "काय करतात ?" "करतात काय म्हंजे ? खुळे की काय तुम्ही हेगिष्टे ? ती रद्दी काढा. दहा ठिकाणी फोटोखाली नाव छापलेलं आढळेल तुम्हाला त्या रद्दित...

माताय , पुलं च काहीही वाचले तरी मूड एकदम फ्रेश होतो.. अय्या .. चपला कुठे ठेवायच्या ? ओळ्खा पाहू हे वाक्य कशातलं आहे ?

राघूनानांची कन्येस पत्रे: 'आईस म्हणावे, तीने दिलेला स्वेटर डोक्यातून जात नाही. पण स्वेटरपेक्षा टोपीसारखा घातल्याने थंडी जाते. आल्यावर ती टाके ढीले करेलच'. मी आणि माझा शत्रूपक्षः "घर तुझं आहे लेका. ते कधीतरी बघायला जावं लागेल म्हणून आम्ही सदैव अर्ध्या चड्ड्या घालूनच गावातनं हिंडायचं का रे?" "आणि हा पाहिलास का? हा आमच्या नोकरांचा संडास!"

हल्ली पूर्वीसारखे माझा चेहरा टवटवीत दाखवणारे आरसे मिळेनासे झाले आहेत !

...सध्या मलादेखील “काय चाललंय तुमचं सध्या” असे कुणी विचारले, तर ‘श्वासोच्छ्वास’ याहून अधिक समर्पक उत्तरच सुचत नाही. ( एक शून्य मी’ मधून)

हिंसेचा निषेध म्हणून चार ऐवजी दोनच पेढे खाऊन स्वल्प उपोषण केले. १० वाजता मोसंबीचा रस घेऊन सोडले! बटाट्याची चाळ. अनरिअलिस्टिक म्हणताना बाईंचे पुढचे दोन दात निसटल्यासारखे वाटले ते चपळाईने पुन्हा बसवून बाईंनी आपले भाषण चालू ठेवले.

मलेशियात राहून चाळीस वर्षांनी हा मनुष्य असखलीत कारवारीत बोलत होता. नाहीतर आपले देशी लोक सहा महिन्यांसाठी इंग्लड अमेरिकेला जाऊन येतात आणि आल्यावर त्यांना मराठी वर्ड रिमेम्बर करायला डिफिकल्ट जातं.