Welcome to misalpav.com
लेखक: धन्या | प्रसिद्ध:
डिनायल (denial) या इंग्रजी शब्दाचा शब्दकोषातील अर्थ आहे काहितरी नाकारण्याची कृती. या शब्दाच्या अर्थाच्या जवळपास जाणारा मराठी शब्दप्रयोग आहे "कानावर हात ठेवणे". आपल्यावरील प्रतिहल्ला परतवून लावणे ही कुठल्याही प्राण्याची उपजत प्रेरणा असते. त्यामुळे जेव्हा हल्ला करणार्‍याचा आपण सामना करु शकतो अशी खात्री त्या प्राण्याला पटली की तो पलटवाराला तयार होतो. किंवा आपण हल्ला करण्याचा सामना करु शकत नाही असं जर त्या प्राण्याला वाटलं तर तो हल्ला करणार्‍यापासून दूर पळून जातो. या वस्तूस्थितीला मानसशास्त्र "लढा किंवा पळा" (फाईट ऑर फ्लाईट) म्हणून ओळखते. लिहिताना मी हे जरी दोन वाक्यात लिहू शकलो तरी प्रत्यक्षात ही त्या क्षणी शरीरांतर्गत होणारी खुपच गुंतागुंतीची प्रक्रिया असते. यातील अजून गंमतीचा भाग असा की प्रत्येक वेळी त्या प्राण्यावर प्रत्यक्षात असा हल्ला झालेला असतोच असे नाही. काही वेळा त्या प्राण्याचा विविध कारणांमुळे हल्ला झालेला नसूनही हल्ला झाला आहे असा समज होतो. आणि मग हा प्राणी या न झालेल्या हल्ल्याविरोधात सावध होतो. आणि याला मनुष्यप्राणीही अपवाद नाही असो. हे सारं झालं शारीरीक हल्ल्याच्या बाबतीत. हा हल्ला शाब्दिक असेल तर? हल्ल्याचं जाऊ दया. कुणी आपल्याला न रुचणारं, न आवडणारं काही ऐकवण्याचा प्रयत्न करत असेल तर? अशा वेळी काही माणसं ते ऐकवले जाणारे विचार बरेच वेळा वस्तूस्थिती असूनही माणसं ते विचार क्लेशदायक आहेत म्हणून त्यांना सामोरं जात नाहीत. ती वस्तूस्थिती नाकारतात. कानावर हात ठेवतात, ऐकून न ऐकल्यासारखं करतात. हा जणू काही त्यांच्यावरील विचारांचा हल्ला असतो आणि ते विचार नाकारणे हा एक प्रकारचा बचावात्मक पवित्रा (defence mechanisms) असतो. काही वेळेला एखादं सुर्यप्रकाशाईतकं स्वच्छ वास्तव दिसत असताना एखादया व्यक्तीची त्या वास्तवाला सामोरं जायची तयारी नसते. आणि हे सारं अंतर्मानाच्या पातळीवर होत असतं. त्या व्यक्तीला आपण एखादं ढळढळीत सत्य नाकारत आहोत याची जाणिवही नसते. तो त्या व्यक्तीच्या मनाने घेतलेला बचावात्मक पवित्रा असतो जेणेकरुन त्या विचारांचा, वास्तवाचा त्या व्यक्तीला त्रास होणार नाही. हा नकारात्मक पवित्रा व्यक्तीगणिक बदलतो. काही व्यक्ती सत्य ढळढळीतपणे नाकारतात. काही व्यक्ती अंशतः वस्तूस्थिती स्विकारतात. काही वस्तूस्थितीचा स्विकार जरी पुर्णपणे करतात मात्र त्या वस्तूस्थितीला ते तितकेसे गांभिर्याने घेत नाहीत. काही त्याची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. याची उदाहरणे जागोजागी आपल्या पाहण्यात येतात. एखाद्या घरातील कर्ता मुलगा दारुच्या व्यसनात ठार बुडून जातो. बायको-मुलांचे हाल होतात. म्हातारे आई-वडील हाय खातात. कुणी हे सारं त्या व्यसनी व्यक्तीस समजावण्याचा प्रयत्न केला तर तो कानावर हात तर ठेवतोच, अधिक "त्यांना काय झाले आहे, ते सारे मजेत आहेत. उलट त्यांच्यामुळेच तर मी दारुच्या नादी लागलो" असे समजावणार्‍यालाच सुनावतो. एखादा अहंमन्य, आत्मकेंद्री माणूस आयुष्यभर आपल्याच धूंदीत जगतो. आपल्यामागे इतरांची फरफट होतेय हे त्याच्या गावीही नसते. कुणी समजवायला गेले तर समजावणार्‍यालाच वेडयात काढतो. आता प्रश्न हा आहे की अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असल्यास काय करायचे? उत्तर सोपं नाही. समोरच्या व्यक्तीला काही समस्या असेल आणि ती व्यक्ती समस्या नाकारत असेल तर त्या व्यक्तीपर्यंत पोहचणे अवघड असते. वास्तव स्विकारण्याईतपत मनाची तयारी नसल्यामुळे एक अभेद्य भींत त्या व्यक्तीने आपल्यासमोर उभी केलेली असते. अशावेळी मानसोपचार क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे, त्या व्यक्तीस *समुपदेशकाकडे घेऊन जाणे हा प्रभावी उपाय ठरतो. * समस्याग्रस्त व्यक्तीस समुपदेशकाकडे घेऊन जाणे हे मुळ समस्येपेक्षा अधिक तापदायक प्रकार होऊ शकतो. निदान भारतात तरी. त्यावर पुन्हा कधी तरी. :)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

डिनायल मोड आणि दुटप्पीपणा यांचा संबंध आहे का ? डिनायल मोड मधल्या व्यक्तींच्या वर्तनात दुटप्पीपणा असतो का ?

दुटप्पीपणा हे तसे जेनेरिक बिहेवियर आहे डिनायल मोड आणि इतर अनेक बाबतीतही याची व्याप्ती असते. त्यामुळे हा मुद्दा घेतला तर डिनायलच्या ४०पट लेखा एव्हडा प्रतिसाद लिहावा लागेल. तरीही दोन शब्दात होय हे ठामपणे म्हणता येइल. :)

माझ्या माहितीच्या एका महिलेला ३ वर्षांपूर्वी टीबी झाल्याचे निदान डॉक्टर्सनी केले आणि ट्रीटमेंट चालू केली. त्याचा उपयोग होतो आहे असे दिसले पण हिचे जेवणखाण यथातथाच होते. आणि मला कसा टीबी होईल? डॉक्टर चुकले असतील असं म्हणत तिने शेवट ट्रीटमेंट पूर्ण केली नाही. मुंबईत रहाणार्‍या बर्‍याच जणांना बर्‍याच कारणांनी टीबी होऊ शकतो. पण तिने ती वस्तुस्थिती पूर्ण नाकारली. दुर्दैवाने तिच्या जवळच्या कोणीच तिच्यावर दबाव आणून ट्रीटमेंट पुरी करायला लावली नाही. गेली ३ वर्षे अक्षरशः झिजत जाऊन तिचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. घरच्यांनी वेळीच हालचाल केली असती तर ती सहज बरी झाली असती. आता विचार करता तिचा डिनायल घालवण्यासाठी तिच्या नवर्‍याने काहीच केलं नाही, म्हणजे तिच्या मृत्यूला तोही अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे असं वाटतंय.

तिचा डिनायल घालवण्यासाठी तिच्या नवर्‍याने काहीच केलं नाही,>> तूमचा मुद्दा चांगला आहे. एकतर जवळची व्यक्ती स्वतः डिनायल मध्ये असून नये लागते. आजूबाजूच्या भावनिक परिघातील व्यक्ती डिनायल मध्ये असू नये लागतात. आणि समजा स्वतः डिनायल मध्ये नसतील तरीही डिनायल घालवण प्रत्येकवेळी प्रत्येकाच्या हातचा मळ असू शकतो का असा एक प्रश्न उद्भवतो. डिनायल मधील व्यक्ती भावनेच्या खूपच आहारी गेलेल्या असतील तर त्यातून बाहेर काढण जवळच्यांनाही शक्य होतच अस नाही. अगदी तुम्ही मानसशास्त्राचे चांगले अभ्यासक असला; तर्कशास्त्रावर तुमची कमांड असली ऑब्जेक्शन हँडलींग तुम्हाला उपज असून वर त्याचे ट्रेनिंगही आहे तरीही डिनायल घालवण सोप जात का हा प्रश्न शिल्लक राह्तोच. फ्रँकलि चर्चा वृद्धींगत व्हावी म्हणून सध्या मी उत्तर देत नाही आहे प्रश्न किंवा उलट प्रश्न विचारतो आहे किंवा जस्ट वाचतो आहे.

मला पर्सनली असे वाटते की डिनायल घालवणे हे तेव्हढे सोपे नाही. कारण माझ्या माहितीनुसार डिनायल म्हणजे अंतर्मनाने वास्तव स्वीकारायला दिलेला नकार. उदा.. जेव्हा माझी आई गेली, तेव्हा माझ्या अंतर्मनाने ते स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे मला आई गेल्याचे काहीच दु:ख झाले नाही. उलट मी जवळजवळ १ वर्ष, "आई कुठेतरी जवळच गेली आहे, आणि कधीतरी अचानक परत येइल" म्हणून वाट बघत बसलो. आता हे एक प्रकारचे डिनायलच आहे, पण या समजूतीमुळे मी आई गेल्याचे दु:ख हळू हळू पचवू शकलो. त्यामुळे डिनायलवर उपचार करताना त्या व्यक्तीने ते सत्य "लॉजिकल" पातळीवर किती स्वीकारले आहे हे पाहणे देखील महत्वाचे ठरावे. तसेच आत्यंतिक नकारत्मक भूमिकेत गेलेल्या व्यक्ती/ नैराश्याच्या आहारी गेलेल्या व्यक्ती या देखील डिनायल असतात का? मूलतः डिनायल जाण्यासाठी त्या व्यक्तीने लॉजिकल स्तरावर वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते, अंतर्मन हळूहळू सनजून घेईलच.

डिनायल मधून बाहेर काढणे एवढे कठीण आहे का? मी वर दिलेल्या उदाहरणातील महिलेच्या नवर्‍याने तिला समुपदेशकाकडे नेणे, निसर्गोपचार केंद्रात पाठवणे इ. काही केले नाही. कधीही बोलणे झाले तर "ती ऐकत नाही, मी काय करू?" असं म्हणायचा. खरं सांगायचं तर हा माणूस ऑफिसमधून पिऊन घरी यायचा आणि मग संवाद अशक्यच. सकाळी उठून परत ऑफिसात. अशा वेळी तिला कोण मदत करू शकणार होते? की हा नवराच स्वतः डिनायल मोडमधे गेला होता? स्वतः डिनायल मोडमधे असलेला माणूस तर काही करण्याच्या पलिकडे असतो, त्याच्यासोबत रहाणारे जर हे समजत नसतील तर ती परिस्थिती जास्त घातक म्हणावी लागेल.

>>'डिनायल घालवणे हे तेव्हढे सोपे नाही.' अस सरसकट विधान करत असेन तर मी स्वतः डिनायल मध्ये असू शकतो. >>डिनायल मधून बाहेर काढणे एवढे कठीण आहे का? हे वाक्य 'डिनायल मधून बाहेर काढणे अजिबात कठीण नाही' असे असेल तर आपणही डिनायल मध्ये असू शकता. हे एवढही सहज असतं तर आपल्या सहीत Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho हे आल असत का या बद्दल मी साशंक आहे? मानवी सहसंबंध आणि संवाद १+१ = २ असे गणिती असतील आणि अभियांत्रीकी पद्धतीने त्यांची सोडवणूक शक्य आहे का या बद्दल मी जरासा साशंक आहे.

मला वाटते मी वरच त्याचे उत्तर दिले आहे.
डिनायल जाण्यासाठी त्या व्यक्तीने लॉजिकल स्तरावर वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे
एकदा बौद्धिक स्तरावर ते स्वीकारले की मग ते आतपर्यन्त हळू हळू झिरपत जातेच. मग ते वास्तव कोणतेही असेल, अगदी
मी डिनायल मध्ये
आहे असे देखील.

सहमत. सध्या इतरत्रही व्यस्त असल्याने प्रतिसाद देण्यात विलंब होत आहेत त्या बद्दल क्षमस्व. आणि प्रतिसादाकरीता धन्यवाद.

मी वर दिलेल्या उदाहरणातील महिलेच्या नवर्‍याने तिला समुपदेशकाकडे नेणे, निसर्गोपचार केंद्रात पाठवणे इ. काही केले नाही. ........ खरं सांगायचं तर हा माणूस ऑफिसमधून पिऊन घरी यायचा आणि मग संवाद अशक्यच. सकाळी उठून परत ऑफिसात.
एक काळ समस्या निवारणाकरता मांत्रिक तांत्रिक गुरु ते अगदी देवी अंगात येण्यावर आवलंबून होतो ते अपेक्षीत समुपदेशन दर्जाची खात्री नसली तरी व्यावसायिक समुपदेशन तज्ञ उपलब्ध होऊ लागले आहेत ह्या प्रगतीची सकारात्मक नोंद घेण्यास हरकत नाही. सक्षम व्यावसायिक समुपदेशका कडे पोहोचवे पर्यंत किंवा न पोहोचवताही समुपदेशनाचे काम संबंधीत व्यक्तीच्या भावविश्वातील जिवलगांना अथवा आसपासच्या मंडळींना करण्याची वेळ केव्हाही येऊ शकते. भावना असतात म्हणूनच आपण भावविश्वात असतो; हे खरे असले तरी समुपदेशनाचे कार्य करताना संवेदनशीलता कायम ठेवतानाच; भावना योग्यवेळी डिटॅच नाही केल्या तर; आपले स्वतःचे बायस आपल्या स्वतःला डिनायल मध्ये नेऊ शकते. ज्या व्यक्तींशी संवाद साधण्याची गरज आहे त्यांच्यावर संवाद साधण्यापुर्वीच आपल्या बायसने लेबलींग होत नाही आहे ना ? people only hear what they want to hear या मध्ये माझा सुद्धा अंतर्भाव असून; मी समोरच्या व्यक्तीशी संवाद साधू पाहीन तर संवाद कितपत साधला जाईल? कितपत अपेक्षीत परीणाम मिळेल? या बाबत साशंकता वाटते. मला काय हवे ते मिळवण्याच्या यशाकरता; 'तुम्हाला काय हवे ?' या प्रश्नाच्या शिडीने चढणे सोपे आणि व्यावहारीक जाते; असे मला वाटते. मराठी माणसाकडे याचे आजीबात कौशल्य नाही असे नाही; पण सांस्कृतीक दृष्ट्या आपण (सर्व मराठी) ते वापरण्यास 'लष्कराची भाकरी ह्या हाफहर्टेडनेसने' कमी पडत नाही ना ? म्हणून 'मला काय हवे?' ते सांगण्याची घाईत; प्रत्येक मराठी माणूस जुंपलेलातर नाही ना? असे बर्‍याचदा वाटते. मराठी संस्कृतीने श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती (यू अ‍ॅटीट्यूड) बानवण्याकरता अधिक प्रयास करण्यास जागा आहे का? हे अभ्यासावयास हवे असे वाटते.

प्रतिसाद भाग १ आणि भाग २ अधिक जनरल होते पण त्या पायर्‍या न करता आपल्या मुख्य उदाहरणावर येणे कदाचित विषयाला न्याय देणारे नसते म्हणून तो प्रपंच. जवळच्या माणसांना समजणे कठीण असते; माहित नसलेल्या उदाहरणावर भाष्य करणे अतीशयोक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु या विषयाची चर्चा होणे महत्वाचे आहे त्यामुळे मला जमेल तेवढा यथाशक्ती प्रयत्न करतो. १) प्रथम दर्शनी टिबी झालाच नाही अशा भ्रमातलेच डिनायल होते का याची खात्री करण्याची गरज होती असे वाटते. आपण दिलेल्या उदाहरणात पती पत्नीचे कौटुंबिक संबंध आर्थीक स्थिती इत्यादी माहितीचा अभाव आहे. व्यक्तीगत तणावांनी अथवा आर्थीक समतोल साधण्यातील अपयशाने आलेली दीर्घ कालीन निराशेच रुपांतरण आता राहून तरी काय करायच या डिनायल मध्ये झाल आहे का ? (डिनायलची इतरही कारण असू शकतात आयूष्य भर शुश्रुषा करणार्‍या एका नर्सने (मराठीच) आयूष्याच्या शेवटच्या काळात कोणतेही औषधपाणी इंजेक्शन घेण्यास नकार दिला तेही डिनायल होत पण वेगळ्या कारणानीं आलेल असाव) २) नवरा डिनायल मधून बाहेर येतो की नाही हे बघण्या पेक्षा सर्वात जवळचा व्यावहारीक मार्ग अशावेळी जवळच्या दुसर्‍या व्यक्तींनी/च्या त्यांच्या घरी जा/नेऊन शुश्रूशेची जबाबदारी उचलणे हा झाला. पण भावविश्वात एवढ्या जवळची व्यक्तीच नसणे स्वतःला भार म्हणून बघण्याच्या डिनायल असू शकत तस आपलीच अंगचोरणारी मडळी असू शकतात; संबंधीत व्यक्तीने स्वतः पुर्वी अंगचोरपणा केला अशी कारण असू शकतात ते सर्वच नाते वाई़क मुंबईत असतील तर त्यांच्याकडे जागेचा अभावही असू शकतो. ३) या प्रकरणात सिरीयस अल्कोह्लीझम करता आधी नवर्‍याला अल्कोहोलीक अ‍ॅनॉनिमस सारख्या सेल्फहेल्प ग्रूप मध्ये कदाचित पाठवण्याची गरज असूही शकते ते नाकारता येत नाही. हेही शक्य नाही झाल तर (सिरीयस अल्कोह्लीझम खाली असलेया व्यक्तीस फंडे द्यायचेच झालेतर नियंत्रीतपणे घेऊ शकणार्‍या व्यक्तीनी सोबत बसून कमी पिलेल्या अवस्थेत द्यावेत असा ही एक प्रवाद ऐकुन आहे.) आणि त्याही पेक्षा केवळ दारू पितो म्हणून वाईटपणाचा भल्याबुर्‍याचा शिक्का मारून कुटूंबीयही एका ऑदरवाईज चांगल्या व्यक्तीला नाकारत असू शकतात. जी व्यक्ती स्वतःच नाकारली जाती आहे ती सहकार्य करण्यास उत्साही असण्याची शक्यता कमी असू शकते. असे असेलच असे नाही पण प्रत्येक शक्यता तपासून पहावी लागते. ३) यात अजून एक महत्वाचा मार्ग यु अ‍ॅटीट्यूडचा तुम्हाला काय हव आहे हे विचारा? बिनधास्त व्यवहारी रहा ? गरज भासलीचतर हातात एक विदेशी रंगीत पाण्याची बाटली गिफ्ट म्हणून ठेऊन बोलण्यास सुरू करा काय केल्याने तुम्हाला हवीती कृती करून मिळेल हे स्पष्ट विचारणे. नवरा बायकोत तणाव असेलतर आधी झालेल्या चांगल्या प्रसंगांचा आणि भावी चांगल्या शक्यतांचा वास्ता देणे. अर्थात व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. जुन्या हिंदी चित्रपटात एक बावर्ची नावाचा चित्रपट होता त्यात एका समस्याग्रस्त कुटूंबात एक नवा आचारी नौकरीस येतो आपल्या स्वभावाने सर्वांची मनेही जिंकतो आणि छूमंतर म्हणावे तसे सगळे कुटूंब एकत्र येते. अशी हॅपी एंडींग स्टोरी प्रत्यक्षात सगळी कडे होत नाही.

एका तिर्‍हाईत परिचिताच्या दृष्टीकोनातून त्या नवरा बायकोचे संबंध वरकरणी सर्वसामान्य दिसत होते. आतून काही जास्तीचे तणाव असल्यास माहित नाही. आर्थिक स्थिती उत्तमच म्हणावी लागेल. मात्र कौटुंबिक परिस्थिती तिला कोणी मदत करण्यासारखी नव्हती. एक भाऊ स्वतःही मानसोपचार घेत आहे. बहीण यथातथा आर्थिक परिस्थितीत आणि आईवडील स्वतःच अतिशय वृद्ध. नवर्‍याकडच्या मंडळीना तिने खूपच मदत केली होती पण शेवट त्यापैकी कोणीच मदतीला आले नाहीत. मला वाटतं की नवरा मुलंबाळं हे कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या सर्वात जवळचं. त्यानंतर भाऊ-बहिणी, आईवडील दुसर्‍या वर्तुळात. परिचित आणि अन्य नातेवाईक तिसर्‍या वर्तुळात आणि संबंध नसलेला समाज त्या परिघाबाहेर. मदत करण्याची/करू शकण्याची शक्यता जसे केंद्रापासून दूर जावे तशी कमी होत जाते. शिवाय मला काय त्याचे अशी अ‍ॅटिट्यूड नसेल तरी परिचित माणूस मधे पडणे सहसा टाळतोच, कारण काही कौटुंबिक वाद असतील तर शेवट जरा दूरचा असा माणूस खापर फोडण्यासाठी उत्तम टार्गेट ठरतो.

@पैसा सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक धाग्यावर Response Options हा दुवा दिलेला या कडे आपल कदाचित लक्ष गेल असाव. वाचल्यावर प्रतिसाद/मत द्यावे विनंती

मी एक उदाहरण दिलं आणि त्याबद्दल माझी मतं दिली. मला कोणाचेही गिनीपिग व्हायची इच्छा नाही आणि तेवढा वेळही नाही. माझे सर्व प्रतिसाद तुम्ही रद्द समजू शकता.

>>मला कोणाचेही गिनीपिग व्हायची इच्छा नाही>> नाही हो कोणालाही गिनीपिग करता यावे अथवा परीक्षा घ्यावी दुखवावे अशी आम्हाला कवडी मात्र इच्छा नाही. आम्हाला स्वतःला माहित/ज्ञान नाही किंवा आमच्या पेक्षा अधिक व्यवस्थीत सांगतात अशा इतरत्रच्या दुव्यावर दिसलेले माहिती/ज्ञान ते शेअर करावे या विषयाच्या इतर वाचकांसही शेअर होते आपला अभिप्राय मिळाल्यास आमच्याही माहितीत भर पडते पलिकडे हेतु नाही. तरीही आपली तशी इच्छा नसेल तर राहीले. अनवधान होऊन दुखावले असल्यास क्षमस्व.

माझा प्रतिसाद तुम्हाला कदाचित नी-जर्क प्रकारचा वाटला असेल तर क्षमस्व. पण मला काहीही प्रॉब्लेम आला तर मी नक्कीच डॉक्टरकडे जाणे पसंत करीन. अशी ऑनलाईन माहिती, सर्व्हे यातून फार काही साध्य होतं असं वाटत नाही. जालावर सर्व्हे घेणारे स्वतः कोण असतात, त्यांचे क्वालिफिकेशन काय किंवा इतर गोष्टी, अगदी माहितीचा लेख असेल तरी १००% विश्वासार्ह असेल असं वाटत नाही. प्रश्नावलीची उत्तरेही अनेकदा होय/नाही अशा कॅटेगरीत देणे अवघडच असते. त्यामुळे अशा ऑनलाईन माहिती/सर्व्हे यापासून मी तरी लांबच रहाते.

आपले म्हणणे बरोबर आहे याच विषयावर मी लावलेल्या धाग्यात डिस्क्लेमर लावण्याची काळजी घेतली आणि तुम्ही म्हणता तसे " खासकरून मानसशास्त्रीय; वैद्यकीय आणि विधीक्षेत्रातील माहिती चूकीची आणि शिळी माहिती असू शकते. कोणत्याही प्रकारचा सल्ला घेण्यासाठी आम्ही आपणास मान्यताप्राप्त व्यावसायिक तज्ञांचाच सल्ला घेण्यास सूचवतो." असे विशेष करून नोंदवण्याची काळजी घेतली आहे.

हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन.. दिलाला बळंच ऑल इज वेल सांगत राहणे.. आजुबाजूला अनवेल काही चालू आहे हे स्वत:शीही अमान्य करणे.. झटकणे. सर्वात common उदाहरणांपैकी एक अल्कोहोल किंवा अन्य व्यसनांची ठराविक स्टेज. शारिरीक,मानसिक,सोशल , व्यावसायिक असे सर्व दुष्परिणाम सुरु व्हायला लागलेले दिसत असूनही.. व्यसनाचे वाढलेले प्रमाण दिसत असूनही (स्वत: अन जवळच्याना).. आपला कंट्रोल उरलेला नाही हे जाणून घ्यायचे ठरवले तर ढळढळीत दिसत असतानाही... आपल्याला अल्कोहोलिझम हा प्रकार अजिबात झालेला नसून आपण फुल्ल कंट्रोलमधे आहोत आणि कुटुंब / मित्र/ हितचिंतकाना ते पटत नसून ते उगीच त्रास करुन घेतात अशी स्वत:ची ठाम समजूत.. हे वेल डिफाईंड डिनायल आहे आणि तो सर्व व्यसनी.च्या सुटकेत सर्वोच्च मोठ्या आकाराचा धोंडा असतो. डिनायल सुटले तर बाकीचे सर्व तुलनेत ..तुलनेतच..खूप सोपे.

ऑल इज वेल - हा स्वतःला संदेश देणं एका विशिष्ट पातळीपर्यंत फायदेशीर असतं. दारूसारखंच, अगदी मर्यादित प्रमाणात घेतलं तर फायदेच असतात. मात्र ती रेषा कधी ओलांडली जाते हे ठरवणं कठीण असतं. अल्कोहोलिझमच्या बाबतीत हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे.

दारूसारखंच, अगदी मर्यादित प्रमाणात घेतलं तर फायदेच असतात.
हे सगळ्या दारवांबद्दल ('दारू'च अनेकवचन) खरं असतं का? मला वाटायचं की फक्तं वाईन चांगली असते.

हो गई है पीर पर्वत / दुष्यंत कुमार
हो गई है पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए आज यह दीवार, परदों की तरह हिलने लगी शर्त थी लेकिन कि ये बुनियाद हिलनी चाहिए हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गाँव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए

तु ठीक आहेस पण मी ठीक नाही तु ठीक आहेस आणी मी पण ठीक आहे तु ठीक नाहीस पण मी ठीक आहे तु ठीक नाहीस आणी मी पण ठीक नाही.

आपणा सर्वांची खात्री आहे, आपण काहीच 'डिनाय' करत नाही याच्याबद्दल ...?