Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अहेर

स
सुबोध खरे
Wed, 02/26/2014 - 08:58
🗣 74 प्रतिसाद
http://www.misalpav.com/node/6840#new या धाग्यावर मी काही विचार लिहिले होते पण धाग्याचा कात्रज होऊ नये यासाठी हा वेगळा धागा काढीत आहे. वेगवेगळ्या लोकांचे विचार ऐकायला मला आवडेल . परवा मी माझ्या बायकोला एक वेगळा विचार बोलून दाखविला. तिने या विचाराला पूर्ण पाठींबा दर्शविला आहे.( मुलांचा पाठींबा हळू हळू तयार करण्यात येत आहे )आपल्या मुलांच्या लग्नात (याला अजून चार ते पाच वर्षे आहेत) तीन समाजसेवी संस्थांचे स्वयंसेवक पावतीपुस्तक घेऊन तेथे बसवायचे. या तीन संस्था म्हणजे १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय. सर्व आमन्त्रीताना त्यांच्या इच्छा आणि क्रयशक्तीप्रमाणे त्यांच्या आवडीच्या संस्थेला. तिथल्या तिथे देणगी देण्याचे आवाहन करायचे. हि गोष्ट आमंत्रण पत्रिकात सुद्धा लिहून आवाहन करायचे कि अहेर किंवा पुष्प गुच्छ आणण्या ऐवजी तेच पैसे या संस्थाना देणगी म्हणून द्यावेत. जेवढी देणगी लोकांकडून येईल तितकीच देणगी माझ्या खिशातून. जेवण अतिशय साधे आणि फक्त सायंकाळी. उगाच लोकांना रजा घ्यायला लावून मनुष्य तास फुकट आणि लोकांची मनातून नाराजी. लोकांना आगाऊ सूचना किंवा आवाहन आमंत्रण पत्रिकेतून केले (आहेर/ भेटवस्तू ऐवजी आपण रोख व चेक घेऊन यावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे वरील संस्थाना दान द्यावे आणि वधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत) तर लोकांची मानसिक तयारी राहते शिवाय वरील संस्थांची सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रत्यक्ष कार्य लोकांना माहित असल्याने त्याबद्दल शंका राहत नाही. आपण बहुसंख्य लोक सामाजिक कार्याला मदत करायची आहे अशा मनोवृत्तीचे असतो पण आळशी पणामुळे( यात मी स्वतः येतोच) प्रत्यक्ष काम होत नाही म्हणून हा सुचवलेला एक पर्याय आहे. यात जाता जाता काही समाजकार्य होईल असा विचार आहे. मुळ हे सर्व का आले याची काही कारणे. माझे लग्न १९९२ साली झाले त्या सुमारास माझ्या मित्राचे लग्न झाले तेंव्हा त्याच्या लग्नात आहेर म्हणून १२ भिंतीवरची घड्याळे आली . त्याकाळात शंभर रुपयात येणारे आणि मोठा अहेर दिसेल अशी ती एक वस्तु होती. आम्ही काही जवळच्या नातेवाईकाच्या लग्नात अहेर म्हणून रेमंडचा शर्ट आणि पैन्ट पीस दिला (साल १९८५) तोच आम्हाला परत आहेर म्हणून(नजरचुकीने) आला. यात परत अहेर देताना त्याच माणसाला त्यानेच दिलेला अहेर परत करू नये हि साधी गोष्ट कार्यबाहुल्यामुळे त्यांना लक्षात आली नसावी. पण हा एक आमच्यासाठी डोळे उघडणारा अनुभव ठरला. यानंतर आमच्या आईवडिलांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला कि कोणाच्या हि लग्नात अहेर म्हणून फक्त रोख पैसे द्यायचे आणि आपल्या मुलांच्या लग्नात अहेर देणे घेणे काहीही नाही. यानंतर अनेक लग्नांमध्ये मी एक गोष्ट प्रकर्षाने पाहिली कि बायका एकमेकीना साड्या घेतात. त्या त्यांच्या स्वतःच्या पसंतीच्या असतात नेसणार्या बाई च्या पसंतीच्या नव्हे. आता जवळच्या नातेवाईकाने साडी दिली तर ती आवडली नाही तरी ती कोणालाही देत येत नाही आणि आवडली नाही म्हणून नेसता येत नाही. म्हणजे परत एक असून अडचण आणि नसून खोळंबा. ( बर्याच वेळेला स्वतः च्या आईने घेतलेली साडी सुद्धा स्त्रियांना आवडत नाही पण तिचे मन दुखवू नये म्हणून ती एक दोनदा तिच्या समाधानासाठी साडी नेसून मग तो कपाटाच्या कोपर्यात जाऊन पडून राहते. हीच गोष्ट जवळच्या नातेवाइकान्च्या बाबतीत हि घडते अशा अनेक साड्या माझ्या बायकोला आमचे लग्न झाल्यावर आल्या ( आमचा साखरपुडा, लग्न नंतर तिच्या भावाचा साखरपुडा लग्न नंतर दोन्हीकडे डोहाळे जेवण बारसे इ इ.मुळे तिला इतक्या भारीपैकी साड्या आल्या कि पुढच्या दहा वर्षात माझ्या बायकोला आपल्या पसंतीची साडी घेता आली नाही. अगोदरच्या डझनावारी साड्या ब्लाउज शिवायचा राहिल्यामुळे कपाटात पडून होत्या आणि हि गोष्ट मी आमच्या आई वडिलांना सांगितली तेंव्हा त्यांना ती पटली आणि ते जेंव्हा आमच्या घरात समारंभासाठी साडी घेण्याची वेळ येते तेंव्हा आपले बजेट सांगतात( किंवा तेवढे पैसे सरळ पाकिटात घालून देतात) आपल्याला त्या बजेट मध्ये साडी आली तर ठीक अन्यथा वर काही पैसे भर घालून त्या व्यक्तीला आपल्या पसंतीची साडी घेणे शक्य होते. हें असे करायचे असते किंवा हि काय पद्धत झाली का किंवा लोकांना कसे दिसेल या विचाराने बहुसंख्य लोक गतानुगतीकाप्रमाणे चालत असतात. बर्याच वेळेला असे काही करायचे धैर्य नाही म्हणूनही लोक धोपट मार्गाने चालत राहतात. आज साधारण मध्यम वर्गीय स्त्रीच्या कपाटात पन्धरा ते पन्नास ( काही वेळा अजून खूप जास्त) न आवडणाऱ्या साड्या पडून असतात. किंवा फार तर वर्षात किंवा दोन वर्षात एकदा नेसली जाते. हा एक अनुत्पादक खर्च आहे त्यामुळे याला कुठे तरी काट बसावी असेही वाटते. मी यात फार मोठा सामाजिक बदल घडावा अशी अपेक्षा करतो आहे असे नाही पण जर दहा कुटुंबांनी जरी साड्या न्बद्दल असा विचार केला तर पंचवीस पन्नास हजार रुपये सामाजिक कार्याला उपलब्ध होतील. शिवाय त्या स्त्री ला आपल्या आवडीची साडी विकत घेत येईल. या सर्व गोष्टींचा विचार करताना मला वर उल्लेखलेली गोष्ट जाणवली कि लग्नात महागडा शो पीस आहेर म्हणून दिला जातो जो त्या जोडप्याच्या आवडीचा असतोच असे नाही. मग तो देताही येत नाही आणि ठेवताही येत नाही. देणार्याच्या भावना अनमोल असतात पण खर्च वायफळच होतो. हीच गोष्ट पुष्पगुच्छाची. कोणत्याही लग्नाला डझनावारी पुष्पगुच्छ येतात ज्यांची किंमत आजमितीला प्रत्येकी दोनशे ते एक हजार पर्यंत आहे. हे कुठे ठेवावे हा प्रश्न असतो. टाकताही येत नाही आणि ठेवायला जागा नाही. मग हा पण खर्च वायफळच आहे. असे अनेक खर्च आहेत जे आपण सत्कार्याला खर्च करू शकतो. असे खर्च करण्यापेक्षा तेच पैसे आपण आवाहन करून लोकांना सामाजिक कार्यासाठी दान देण्याबद्दल विनवू शकतो. हि माझी कल्पना आहे यावर मला लोकांची मते जणू घेणे आवडेल. यात मी काही नवीन जगावेगळी कल्पना मांडतो आहे असा माझा मुळीच दावा नाही. अशी कल्पना इतर अनेक लोकाना सुचली असेलच किंवा यावर काथ्याकुट झाला असेलही जर तसे असेल तर त्याचा दुवा येथे मांडावा अशी विनंती आहे लग्नात किती लोकांना बोलवायचे, सजावटीवर किती खर्च करायचा आणि जेवणावर किती खर्च करायचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी काही बोलू इच्छित नाही.

प्रतिक्रिया द्या
21551 वाचन

💬 प्रतिसाद (74)
द
दिव्यश्री Wed, 02/26/2014 - 09:13 नवीन
डॉक्टर तुमचे विचार पटले . मी सुद्धा अशा रीतीने वागण्याचा नक्की प्रयत्न करेन . आमच्या ही लग्नात असाच बराच अहेर आला आहे त्यातील काही वस्तू तर अजूनही तशाच आहेत. तुमचे लेख नेहमीच वाचते. छान असतात . आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आपले आयुष्य आपल्याला अवघड वाटते , आपल्या समस्या ह्याच जगातील सगळ्यात मोठ्या समस्या आहेत ई. समज दूर झाले . तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत आहोत आणि शिकतही आहोत. :)
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 02/26/2014 - 09:23 नवीन
+१०० उत्क्रुष्ट कल्पना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
म
मुक्त विहारि Wed, 02/26/2014 - 09:25 नवीन
आहेर घेवू पण नये...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 02/26/2014 - 09:43 नवीन
+1 टु मुवी . 5 वर्षापासुन हिच भुमिका घेतली आहे . पुढही राहिल .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
द
दिव्यश्री Wed, 02/26/2014 - 11:13 नवीन
आहेर घेवू पण नये... >>>अहो काका माझ्यापेक्षा वयाने ,मानाने मोठे लोक ,जवळचे नातलग आज्जीबातच ऐकत नाहीत जितके नाही म्हणू तितका त्यांना अजूनच चेव चढतो आणि मग नाईलाजास्तव भारी आहेर घ्यावाच लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सुबोध खरे Wed, 02/26/2014 - 14:11 नवीन
मुवी साहेब माझ्या आणी माझ्या भावाच्या लग्नात आम्ही अहेर दिला नाही कि घेतला नाही. आमचे मोठे काका हे घरच्या आहेरा बद्दल फार आग्रही आहेत. पण म्हणून आम्ही फक्त घरचा आहेर घेतला तोसुद्धा आमच्या तीन काकांनी मिळून आम्हाला तीन हजार रुपये दिले ज्याचा आम्ही १९९२ मध्ये फूड प्रोसेसर घेतला.( तेंव्हा माझा पगार ६००० होता) यात कोणताही समारंभ किंवा दिखाऊपणा नव्हता. काही वेळा पत्रिकेत असे लिहिलेले असते कि आहेर आणू नये म्हणून आपण हात हलवीत जातो आणी तेथे ते आहेर घेत असतात मग आपल्याला कुठेतरी पाकीट शोधून खिशातील "चांगल्या" नोटा भरून ते द्यावे लागते. या पेक्षा पत्रिकेत स्पष्ट लिहिलेले असले कि आपणास आहेर करण्याची इच्छा असेल तर खालील पैकी तीन संस्थेपैकी कोणत्याही संस्थेला आपल्या इच्छेप्रमाणे दान द्यावे कि अशी सुद्धा अवघड स्थिती होणार नाही. अगदीच काही नाही तरी दहा वीस हजार तरी रुपये त्या संस्थाना प्रत्येकी मिळतील. हेही नसे थोडके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यसवायजी Wed, 02/26/2014 - 18:52 नवीन
आवडले. तुमची कल्पना खूप चांगली आहे. या आधीच्या यशस्वी प्रयोगाबद्दल अभिनंदन. - असं करता येईल का? खाली दिलेल्या लिंक पत्रिकेत छापा. १)श्री बाबा आमटे यांचे आनंदवन २) वनवासी कल्याण आश्रम ३) टाटा कर्करोग रुग्णालय. - इथे कुणीही (म्हणजे बिन-बुलाया मेहमान सुद्धा ;) )ऑनलाईन देणगी देउ शकतो. -आता,
या पेक्षा पत्रिकेत स्पष्ट लिहिलेले असले कि आपणास आहेर करण्याची इच्छा असेल तर खालील पैकी तीन संस्थेपैकी कोणत्याही संस्थेला आपल्या इच्छेप्रमाणे दान द्यावे कि अशी सुद्धा अवघड स्थिती होणार नाही
लग्नात लोक महागडे आहेर का देत असतील? वधु-वरांच्याबद्दलची आपुलकी दर्शवण्यासाठी? स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी? एक चालत आलेली पद्दत म्हणुन? परतफेड? अजुनही काही शक्यता असतील. पण तुम्ही जर पत्रिकेतच जसे लिहीलेत त्याप्रमाणे एकीकडे तुम्हाला आहेर देण्याची इच्छा तर आहे, पण दान करवत नाही किंवा दान-धर्म करण्याएवढी ऐपत अजुन नाही, अशी परिस्थीती असणार्‍यांची गोची होईल. (वरचे कुठलेच उद्देश सफल होणार नाहीत ना.) बरं, पै-पाहुण्यांपैकी कुणी आपल्या समोरचा डोनेट करु लागला आणी एखाद्याला जमत नाही बाबा, तर मग? त्यापेक्षा आहेर देणे घेणे नको आणी अशा ठिकाणी हे डोनेशन पण नको असं वाटतंय.. -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पिलीयन रायडर Wed, 02/26/2014 - 09:30 नवीन
मी असे एक लग्न पाहिले आहे ज्यात सगळा आहेर फक्त रोख घेतला होता (पत्रिकेतच तसं लिहीलं होतं) आणि एका समाजसेवी संस्थेला दान केला (जेवढा आहेर तेवढीच रक्कम यजमानांनी घातली होती..) तुम्ही म्हणता ती कल्पना उत्तमच आहे. शो-पीस, पुष्पगुच्छ वगैरे तर अर्थहीन भेटवस्तु आहेत. माझ्या लग्नात मला किमान १५ काचेच्या बाउल्स चे सेट आले होते.. अजुनही आमच्या जुन्या घराचा माळा बर्‍याच टाईमपास गिफ्ट्स्नी भरुन गेलेला आहे. मुळात शेकडो माणसं बोलावुन लग्न करायची कल्पनाच चुकीची आहे.. जवळची मोजकी माणसे असावीत आणि सर्वांच लक्ष लग्नाकडे असावं..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 02/26/2014 - 09:47 नवीन
मुळात शेकडो माणसं बोलावुन लग्न करायची कल्पनाच चुकीची आहे.. जवळची मोजकी माणसे असावीत आणि सर्वांच लक्ष लग्नाकडे असावं..
प्रचंड सहमत. आपल्याकडे लग्न हे नातेबंधनापेक्षा प्रदर्शन म्हणून शोभते. त्यातऊन अहेर हे तर थोरच प्रकर्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मारकुटे Wed, 02/26/2014 - 09:56 नवीन
आपल्याकडे काय अन कुठेही काय लग्न अथवा तत्सम कार्य हे असलेल्या/नसलेल्या/कर्जाऊ संपत्तीचे प्रदर्शन करायलाच केले जात असते. एकीकडे वा मित्तलने काय लग्न सोहोळा केला की वा ! गडकरीच्या घरचे लग्न कसे थाटात केले की यंव रे यंव ! आमच्या व्याह्यांनी अगदी थाटात लग्न लावून दिले हो...काही कमी पडू दिले नाही... असं म्हणायचं अन दुसरीकडे लग्न असे असायला हवे तसे नको असे म्हणायचे हे चुकीचे आहे. लग्न समारंभ, सण हे आथिक उलाढालीच प्रमुख आधार स्तंभ आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अनुप ढेरे Wed, 02/26/2014 - 10:13 नवीन
लग्न समारंभ, सण हे आथिक उलाढालीच प्रमुख आधार स्तंभ आहेत.
सहमत आहे. गणपती, दिवाळी, दहीहंडी अनेक गोष्टींची उदाहरणं देता येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Wed, 02/26/2014 - 10:14 नवीन
ईद, ख्रिसमस हे सुद्धा येतात त्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Wed, 02/26/2014 - 10:20 नवीन
हनुका पण येत असावं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Wed, 02/26/2014 - 10:24 नवीन
सगळंच येतं हो.. माणसाला खर्च करुन त्याचं प्रदर्शन करायला आवडतं. त्यासाठी हे सण समारंभ इत्यादी. अगदीच बघा ना एका अर्थाने दान देणे म्हणजे खर्चच ना... केलेल्या दानाची माहिती देणं म्हणजे प्रदर्शनच ना !! :) शेवटी काय.. होउ दे खर्च...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मारकुटे Wed, 02/26/2014 - 09:35 नवीन
आम्ही ज्या संस्कृतीत लहानपणापासुन वावरलो त्यामधे केल्या जाणार्‍या दानाचा उल्लेख करणे प्रशस्त मानत नाहीत. अहेर ही वधुवरांना दिली जाणारी प्रेमाची भेट असते. अहेर दिला घेतला जाऊ नये म्हणणारे शाळा कॉलेजात मिळणारी बक्षिसे, सरकार कडून अथवा संस्थेकडून मिळणारी पारितोषिके नाकारतात का हा मला प्रश्न पडला आहे. एकंदरीत समोरच्या माझ्या आवडीनिवडीनुसार देऊ शकत नाही म्हणून मी घेत नाही अशीच भुमिका दिसतेय...एकंदर असो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/26/2014 - 09:41 नवीन
ह्या नविन माहिती बद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
म
मारकुटे Wed, 02/26/2014 - 09:44 नवीन
बक्षिस काय अन अहेर काय काहितरी दिलेच जात असते ना प्रोत्साहन म्हणून, शाळेत पहिला नंबर आला.. शाब्बास असाच पूढे अभ्यास कर लग्न केले शाब्बास. ... आता बायकोला/ नवर्याला संभाळ.. प्रोत्साहनच आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आत्मशून्य Wed, 02/26/2014 - 09:41 नवीन
छानच उपक्रम आहे. वैयक्तीक खर्च कीती करायचा ज्याचे त्याने ठरवावे पण जे भेट म्हणून येणार आहे ते रोखीच्या स्वरुपात आपण उल्लेखीलेल्या संस्थेला देणे हे अशा प्रसंगी आपला आनंद वाटणे/द्विगुणीत करणे कशाला म्हणावे याचे सडेतोड उत्तर आहे.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 02/26/2014 - 10:06 नवीन
नक्कीच चांगला उपक्रम होईल. पण तरीही फार कमी लोकांपुरता मर्यादित राहिल, असा अंदाज आहे. हल्ली लग्नकार्यात आहेर घेत नाहीत, आधीच ग्रहमखाला घरी बोलवून घेतात/ देतात! ;) माझ्या मामेबहिणीच्या लग्ना १२ वर्षापूर्वी त्यांनी असच केले होतं. आलेला अहेर अजून बरीच रक्कम घालून एका अंधशाळेला दिला होता. पण ते बर्‍याचजणांना रुचलं नव्हतं. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अहेर कमी जमला! :D
  • Log in or register to post comments
द
दिव्यश्री Wed, 02/26/2014 - 11:22 नवीन
हल्ली लग्नकार्यात आहेर घेत नाहीत, आधीच ग्रहमखाला घरी बोलवून घेतात/ देतात! Wink>>> ++ १ :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ख
खटपट्या Wed, 02/26/2014 - 19:14 नवीन
ग्रहमख म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Wed, 02/26/2014 - 19:51 नवीन
म्हणजे लग्नाआधी केला जाणारा यज्ञ आणि केली जाणारी पूजा . याला ग्रहयज्ञ ,ग्रहमख, देवब्राह्मण ई. नावे आहेत. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोन्ही कडे घरी हा कार्यक्रम केला जातो . मुंज / व्रतबंध या आधीही केला जातो . या मध्ये हळद कुटणे , लग्न घरातील लोकांना तेल लावून साग्रसंगीत अंघोळ घालणे , घाणा भरणे , बांगड्या भरणे ई. समावेश होतो. अजून कोणाला काही माहिती असेल तर इथे द्यावी मलाही कळेल . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या गुरुवार, 02/27/2014 - 17:36 नवीन
असं आहे होय, झालं असेल माझ्या लग्नात पण असं काही. मला आठवत नाही. आणि आधीच या सर्व गोष्टींचा मला कंटाळा येतो. (कधी कधी अतिशय निरर्थक वाटतात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री
द
दिव्यश्री Fri, 02/28/2014 - 13:47 नवीन
लग्नाचा अल्बम ,सीडी ई. तुमच्या जोडीदाराबरोबर बघा एकदा मस्त वाटेल कदाचित . :) निरर्थक असे काही नसते असे मला वाटते. जो पर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचा चांगला / वाईट अनुभव येत नाही तो पर्यंत निरर्थक वाटू शकते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अनुप ढेरे Wed, 02/26/2014 - 10:11 नवीन
दानधर्म करायचा तर सुमडीत करावा. लग्नाला बोलवून पाहुण्यांकडून कशाला करवून घ्यायचा. यापेक्षा रजिस्टर लग्न करावं आणि गपचिप जिथं देणग्या द्यायच्या तिथं द्याव्या. उगाच हवा कशाला?
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 02/26/2014 - 10:21 नवीन
>>दानधर्म करायचा तर सुमडीत करावा. लग्नाला बोलवून पाहुण्यांकडून कशाला करवून घ्यायचा. यापेक्षा रजिस्टर लग्न करावं आणि गपचिप जिथं देणग्या द्यायच्या तिथं द्याव्या. उगाच हवा कशाला? हे पटलं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मूकवाचक Wed, 02/26/2014 - 16:43 नवीन
यज्ञदानतपःकर्म न त्याज्यं कार्यमेव तत्‌। यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्‌ ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सुबोध खरे Wed, 02/26/2014 - 14:25 नवीन
ढेरे साहेब, पाहुण्यांकडून दानधर्म करण्याचा हेतू नसून अपव्यय टाळणे हा हेतू अहे. शिवाय मी म्हटले आहे तसे बर्याच लोकांना सत्पात्री दान करायचे असते पण आळशीपणा मुळे ते जमत नाही ( यात मी सुद्धा येतोच). यासाठी काढलेला हा पर्याय आहे. रजिस्टर लग्न करावे अशा मताचा मी सुद्धा होतो. पण प्रत्यक्ष वडील जेंव्हा रजिस्त्रारला भेटायला गेले तेंव्हा त्यांनी वरकड पैशाची अपेक्षा दाखविली. मग त्याला पैसे खायला घातल्यापेक्षा एका वेद्संपन्न ब्राम्हणाला दक्षिणा देऊन आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केले. यात ग्रहमख, सीमांत पूजन, वरमाईचे पाय धुणे इ रूढीना फाटा मारून फक्त लग्नाचे शास्त्रोक्त विधी केले गेले. माशे लग्न दुपारी दोन वाजता सुरु होऊन चार बावीस च्या मुहूर्तावर लागले पाच वाजता माझी बायको ब्युटी पार्लर मध्ये गेली आणि सहा ते नौ असा स्वागत समारंभ होऊन दहा वाजता आम्ही रिक्षात बसून घरी आलो. वरात, बैंड, बाजा काही नाही. लग्नाला फक्त अगदी जवळचे नातेवाईक (दोन्ही घरचे मिळून ५०) आणि स्वागत समारंभाला दोन्ही कडची मिळून ३०० माणसे. हे माझे स्वतःचे लग्न होते आणि माझ्या आई वडिलांचा पूर्ण पाठींबा होता म्हणून शक्य झाले. किती जणांना ते रुचेल आणि पटेल आणि त्यात किती जण पटले तरी करण्याची तयारी दाखवतात. रुढीतून समाज बाहेर येण्यास काळ लागणारच. शिवाय समाजाची विचार सरणी काय आहे हे समजून घेण्यासाठीच मी हा धागा काढला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ट
टवाळ कार्टा Wed, 02/26/2014 - 14:44 नवीन
पाच वाजता माझी बायको ब्युटी पार्लर मध्ये गेली आणि सहा ते नौ असा स्वागत समारंभ होऊन दहा वाजता आम्ही रिक्षात बसून घरी आलो.
म्हंजे स्वागत समारंभ बायको शिवाय...आणि घरी जाताना बायको मेकपने नटलेली??? १ तासात बायकांचा मेकप आटपतो??? आणि तेही लग्नाच्या दिवशी??? =)) त.टी. - तुम्हाला "ह.घे." लिहावे लागणार नाही याची खात्री आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
रेवती Wed, 02/26/2014 - 15:41 नवीन
हो, मेक अप १ तासात असेच नव्हे तर १५ मिंटातही आटोपतो. तो कोणत्याप्रकारचा करायचाय यावर अवलंबून असते. उदा, मला हे कोणतेच प्रकार चालत नाहीत. अ‍ॅलर्जी आहे तसेच काही जणींना आवडही कमी असते त्यांचे नटणे थोडक्यात होऊन जाते. आता जगातला सगळा नट्टापट्टा आपणच करायचा ठरवला तर वेळ लागतो पण जे काय करायचे ते फार कमी किंवा अतोनात करायचे नाही असे ठरवले की जमते. आणि स्वागत समारंभ बायकोशिवाय कसा करतील ते? चेष्टा जरा जपून करा की राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 02/26/2014 - 16:24 नवीन
आता जगातला सगळा नट्टापट्टा आपणच करायचा ठरवला तर वेळ लागतो
लग्नाच्या दिवशी असेच असते ना :)
चेष्टा जरा जपून करा की राव!
म्हणुनच त.टी. आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
म
माझीही शॅम्पेन Fri, 02/28/2014 - 04:19 नवीन
ह्याच मुळे लग्नात वधुने कुठल्याही प्रकारचा मेक-अप केश-संभरावर पैसे न उधळता ते समाजसेवी संस्थांना द्यावेत असा प्रस्ताव मांडतो :) .... !!! (पळा आता)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
इ
इरसाल Fri, 02/28/2014 - 05:51 नवीन
म्हणा ना की लग्न झाल्यावर तुम्हाला लग्न मोडायची इच्छा/तपस्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
अ
अनुप ढेरे Wed, 02/26/2014 - 18:47 नवीन
थाटामाटात लग्न करणं ही अनिष्ट रुढी आहे आणि लोकांना त्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पाहीजेत असं मला नाही वाटत. माझ्या दृष्टीने कोणीतरी कोणाचेतरी पाय धुणे, सगळा खर्च वधूपक्षाकडून करून घेणे या अनिष्ट प्रथा आहेत. आता peer pressure मध्ये येऊन कोणी ऋण काढून सण साजरे करत असेल तर तो त्या माणसाचा गाढवपणा. आणि, ३०० लोकांचा स्वागत समारंभ हा साधेपणा तुमच्या दृष्टीने असेल पण अजून कोणाला तरी हा थाटमाट वाटतच असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मधुरा देशपांडे Wed, 02/26/2014 - 23:15 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रणित Wed, 08/27/2014 - 17:29 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
र
राहुल०८ Wed, 02/26/2014 - 10:17 नवीन
१. पाकिटे देण्यासाठी (वेळ + पाकीट + चिल्लर + पेन ) यांची शोधाशोध करावी लागते . जर प्रत्येक "मंगल कार्यालयाने " ATM Card Swipe Machine उपलब्ध करून दिले तर, पैसे direct account मध्ये जमा होतील. २. समारंभांमध्ये येणाऱ्या वस्तू अनाथालय, मतीमंद मुलांच्या शाळा, वृद्धाश्रम येथे देऊ शकतो. ३. सर्व साधारणपणे नातेवाईक जेवणाला नाव-बोट ठेवताततच, आशीर्वाद देणे राहिले दुरच. आपण जर तयार अन्न जवळच्या अनाथालय, मतीमंद मुलांच्या शाळा, वृद्धाश्रम येथे पाठवण्याची व्यवस्था केली तर त्या लहान मुलांना अद्वितीय आनंद होतो . फक्त Catering Service ला additional 80-100 कळवावे लागते.
  • Log in or register to post comments
न
नितीन पाठक Wed, 02/26/2014 - 10:30 नवीन
डॉक्टरसाहेबांचा आजचा विषय खरे तर खूपच नाजूक आहे. कोणी किती अहेर करावयाचा याला काही मर्यादा नाही. परंतु आजच्या युगातला अनुभव असा आहे की, अहेरा वरून तुमची पत, प्रतिष्ठा, वजन, ऐपत आणि खर्च करावयाची क्षमता दिसते. त्यामुळे समाजात असलेली आपली पत कमी दिसावयास नको म्हणून वेळप्रसंगी कर्ज काढून अहेर दिले जातात आणि घेतले जातात. या अहेराचा खरा उपयोग किती होतो हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. मागच्या आठवड्यात मी ग्रामीण भागामध्ये लग्नाला गेलो होतो. तिथे मुलीला द्यायचा अहेर बघून माझे डोळे विस्फारले. मोठा २३० लिटर चा फ्रिज, वॉशिंग मशीन, डबल बेड दिवान, एलसीडी टिव्ही, डिश, मिक्सर, वार्ड रोब, गादी, सर्व प्रकारची स्वयंपाकाची भांडी, (यादी अजून खूप मोठी आहे) इत्यादी इत्यादी. मी हळूच विचारले मुलाचे घर किती मोठे आहे ? उत्तर मिळाले फक्त २ खोल्याचे, ते सुध्दा ग्रामीण भागात !! लोड शेडिंग १२ तासाचे, पाणी लांबून विहीरीवरून डोक्यावरून आणावे लागते. मग फ्रिज, वॉशिंग मशीन, एलसीडी टिव्ही, डिश, मिक्सर यांचा वापर कसा काय करणार ? उत्तर मिळाले की आमच्या कडे असेच असते, द्यावे लागते. या महाग वस्तू अडगळीला पडून रहातात. खर्च होतो आणि वाया जातो. हे केवळ प्रतिष्ठेसाठी आणि कोणी आपल्याला नावे ठेवू नये म्हणून. खरे तर आता सर्वानी ठरविले पाहिजे की " अहेर दिला जाणार नाही आणि अहेर घेतला जाणार नाही "
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/26/2014 - 14:27 नवीन
पाठक साहेब तुम्ही एका महत्त्वाच्या प्रश्नाला हात घातला आहे. जेंव्हा माणूस आपल्या प्रतिष्ठेसाठी खर्च करतो तर त्याच (खोट्या) प्रतिष्ठेसाठी जर तो दानधर्मासाठी हात सैल सोडणार असेल तर वाईट काय? हा माझा अंतस्थ हेतू आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीन पाठक
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/26/2014 - 10:42 नवीन
कल्पना उत्तम आहे हे या धाग्यात सुरुवातीला उल्लेखलेल्या धाग्याच्या प्रतिसादात अगोदरच लिहीले आहे. ती प्रत्यक्षात आणताना या घाग्यावरच्या काही प्रतिक्रियांमधून कही उपयोगी माहिती मिळेल असे वाटते. कोणतीही नविन गोष्ट प्रथम अवघड वाटते (कदाचित् कोणाला विचित्र वाटण्याचीही शक्यता आहे). पण दर नविन प्रयोगात हा अनुभव नेहमिचाच आहे. एखादी नवीन गोष्ट कितीही चांगली असली तरी मानवी मनातली "बदल-विरोधी" (रेझिस्टन्स टू चेंज) सहज भावना तिचे काम करतेच. या एका भावनेवर "बदल-व्यवस्थापनशास्त्राच्या" (चेंज मॅनेजमेंटच्या) अब्जावधी डॉलरच्या व्यवसायाचा डोलारा निर्माण झाला आहे ! एकदा त्या प्रयोगाची उपयुक्तता पटली की मग तो सगळ्यांच्या अंगवळणी पडतो... तोपर्यंत काहींना "अ‍ॅकला चालो रे" करावे लागतेच !!
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/26/2014 - 11:02 नवीन
तथाकथित अनावश्यक , तथाकथित दिखाऊ , तथाकथित अतिरिक्त असे खर्च करुन केलेले लग्न, आहेर, बुकेज, रोषणाई, मेजवान्या या सर्व गोष्टी या "दान" स्वरुपाच्या अन-सस्टेनेबल सिस्टीमपेक्षा जास्त आवश्यक अन सर्वार्थाने सर्वाना उपयोगी अशी प्रचंड इकोनोमी चालवतात.. अनावश्यक खर्चच अत्यावश्यक आहेत. ते टाळले तर अधिक गरीब मरतील. ती कोट्यावधींची लग्ने अन त्या अनावश्यक पडून असलेल्या पन्नास साड्या अन ते दोन दिवसात सुकलेले बुकेज अन एका दिवसात मलरुप झालेल्या मेजवान्यांवर झालेल्या खर्चाने एकूण जितकी घरे चालली त्याच्या दशांश घरेही ते खर्च वाचवून देणगी दिल्याने चालणार नाहीत. खर्च टाळल्याने मनुष्य फार थोडा नवीन रोजगार पैदा करेल अन जास्त याचकच बनून राहतील. मतभेदाबद्दल खेद.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 02/26/2014 - 11:19 नवीन
इकॉनीमी विरुद्ध गरज. इकॉनॉमी चालवण्याचा अजून कुठला उत्तम मार्ग नाही काय? या लग्नांवरील इ. खर्चाचा किती वाटा इकॉनॉमीत असतो? हेही पाहिले पाहिजे असे वाटते. नपेक्षा, पैसे साठवणे हेच कसे पाप इ. जस्टिफिकेशनेही येऊ लागतील. वैयक्तिक घेऊ नका पण तुमचे स्पष्टीकरण थोडेसे ताणले तर भयाण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/26/2014 - 11:29 नवीन
इकोनोमी "चालते" ती चालविण्याचे प्रयत्न कसे करणार ? लग्नाने वीस लाख सर्क्युलेट होतात. तसे त्या ऐवजी केलेल्या दानाने होत नाही.. क्वालिटी क्वांटिटी बोथ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 02/26/2014 - 11:34 नवीन
क्वांटिटी हे एकमेव अर्ग्युमेंट तुमच्या बाजूने असलेच तर असेल. पण मूळ शंका वेगळीच आहे. लग्नात खर्चबिर्च करून जी अर्थव्यवस्था चालवण्याबद्दल चर्चा चाललीये त्या अर्थव्यवस्थेत अशा खर्चाचा नक्की किती वाटा असतो? तो वाटाच जर इनसिग्निफिकंट असला तर या चर्चेत काहीच अर्थ नाही. तो वाटा सिग्निफिकंट असेल तर पुढे बोलू. शिवाय, जगभर अशा स्पेंडिंगचा वाटा किती असतो हेही पाहिले पाहिजे जेणेकरून अशा स्पेंडिंगची अपरिहार्यता खरी आहे की आभासी ते लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/26/2014 - 11:50 नवीन
ब्याम्याशेठ..इथे खर्चिक लग्नांचा वट्ट इकोनोमीतला हिस्सा बघायचा नसून मूळ हौसेचा (खर्च करण्याइतकी अंगभूत आकर्षकता असलेला) option = खर्च आणि तो वाचवून दिली जाणारी थेट मदत यांची क्वांटिटी तसेच सिस्टीमच्या द्रुष्टीने व्यापकता याची तुलना करायचीय. लग्न या विषयाने तुला असं वाटत असेल तर lodge ऐवजी ताज मधे राहणे.. बिझनेस क्लास प्रवास, रेनोल्डऐवजी पार्कर पेन अथवा मारुतीऐवजी मर्सिडिज असे सर्व झगमगणे त्यात ॲडव. मग हिस्सा बघू टोटल इकोनोमीतला. एकाचे जगणे दुसर्याच्या झगमगण्यातूनच येते.. हे हंटर गॅदरर काळातले जंगल नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Wed, 02/26/2014 - 14:02 नवीन
मुद्दा इतकाच आहे की बाकीची हौसमौज वैयक्तिकरीत्या करून अर्थव्यवस्थेस चालना इ. देतच असतो. हे एक विकतचे दुखणे घेतले नाही तर तेवढ्याने फरक पडणार नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/26/2014 - 16:21 नवीन
लग्न या विषयाने तुला असं वाटत असेल तर lodge ऐवजी ताज मधे राहणे.. बिझनेस क्लास प्रवास, रेनोल्डऐवजी पार्कर पेन अथवा मारुतीऐवजी मर्सिडिज असे सर्व झगमगणे त्यात ॲडव. मग हिस्सा बघू टोटल इकोनोमीतला. हे सगळं खिशात असलेल्या / खात्रीने येणार्‍या पैशातून होत असेल तर तो ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पण जर ते केवळ इकॉनॉमीला वर नेते या समजूतीने त्याकडे दुर्लक्ष केले तर (१) ऋण काढून सण साजरा करू नये या आपल्या जुन्या म्हणी मागील शहाणपण उमजले नाही आणि (२) अमेरिकेच्या डेट-बेस्ड (खरं तर डेट-हूक्ड) प्रयोगांनी इकॉनॉमी वर नेण्याच्या अनुभवाच्या गेल्या दोनतीन दशकांच्या प्रवासावरून आणि त्याच्या सर्व जगाच्या अर्थव्यवस्थेला बसलेल्या प्रचंड फटक्यावरून काहीच बोध घेतला गेला नाही, असेच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/26/2014 - 16:28 नवीन
खर्चिक लग्ने म्हणताना कर्ज काढून सण काढणारा वर्ग इथे अभिप्रेत नसून हाय प्रोफाईल उधळपट्टीची लग्ने अपेक्षित आहेत. काळागोरा पैसा खिशातून बाहेर निघून अभिसरण होण्याचा मोठा मार्ग. हो.. कर्जाबाबत मुद्दा वेगळा आणि काही प्रमाणात योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आत्मशून्य Wed, 02/26/2014 - 11:23 नवीन
पिपल शुड कम फॉर्वर्ड अँड मस हॅव करेज टु टेक ओफ द शर्ट, अँड से इट आउट लाउड... असो, "मतभेदाबद्दल खेद" सोडले तर इतर सर्व योग्यच वाटले/वाटते. तरीही मला आहेराचा मुद्दा वैयक्तिक स्तरावर मनापासुन पटला. विषेशतः हा दानधर्म वधुवर स्वेच्छेने करत असतील तर अतिशय चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुबोध खरे Wed, 02/26/2014 - 14:42 नवीन
लग्नात झालेला अन्नाचा अपव्यय/ नासाडी यात प्रत्यक्ष किती पैसे ते तयार करणाऱ्या आचारी आणि वाढपी या वर्गाला जातात आणि किती प्रत्यक्ष कंत्राटदाराला जातात याचे गुणोत्तर पाहिल्यास किंवा फुलांचे हार तुरे गुच्छ याला लागलेला पैसा किती प्रमाणात शेतकऱ्याला जातो आणि किती प्रमाणात दलालाला/ मध्यस्थाला जातो हे गुणोत्तर पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येईल कि वरील संस्थाना दिलेला पैसा हा जास्त मोठ्या प्रमाणावर गरजुना जाताना दिसेल. शिवाय केवळ उपचार म्हणून मी पुष्प गुच्छ देणार असेन. माझ्या सहाय्यकाचे लग्न आहे मग बॉस म्हणून मी एक फुल दिले तर कसे दिसेल म्हणून जंगी गुच्छ देणे यात त्या भावनेचा उपमर्द आहे असे मला वाटते. किंवा माझ्या नातेवाईकाच्या मुलीचे लग्न आहे. तो अत्यंत नालायक माणूस आहे असे माझे वैयक्तिक मत आहे पण माझ्या इभ्रतीला शोभेल अशी भेटवस्तू देणे आवश्यक आहे हि स्थितिअसेल तरीही त्या भेत्वस्तुच आणि ती दिले जाने या भावनेचा उपमर्दच आहे असे वाटते. मग केवळ 'लोक काय म्हणतील" यासाठी मी ते करणार असेन तर त्या खर्चापेक्षा सत्पात्री दान दिले तर मला टोचणीही लागणार नाही. नाहीतरी श्री. व. पु. काळे लिहून गेले आहेतच 'लोक काय म्हणतील" या तीन ब्रम्ह राक्षसांनी माणसाचे अर्धे आयुष्य गिळून टाकले आहे . हा प्रश्न इतका साधा सोपा नाही हि मला कल्पना आहेच म्हणूनच आपली मते विस्तृत प्रमाणात जाणून घेणे आवडेल. कदाचित या प्रश्नाचे मला न समजलेले अनेक पैलू यातून पुढे येतील. आपण खेद व्यक्त करण्याचे कारण नाही असे परत एकदा आवर्जून सांगावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा