वाट्सअॅप एक डोकेदुखी ?
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल. एका मोठ्या माणसाने असं म्हटलं होतं की ''How You manage your information determines whether you win or lose'' आपण आपल्याकडील माहितीचं व्यवस्थापन कसे करतो त्यावरच आपलं यश अपयश अवलंबून असते. माहिती विचारांची देवाण-घेवाण हा सर्व प्रकारच्या विकासाचा आधार असतो. आणि म्हणून आपल्याला सतत माहितीच्या-संवादाच्या क्षेत्राशी सतत जोडलेलो असले पाहिजे असे वाटायला लागते.
मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.
वाट्सॅप हे स्मार्टफोनवरचं Android वरील लोकप्रिय अॅप्लिकेशन. (नै सर आता टेलीग्राम जोरात चालतंय असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.
मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. वाट्सअॅपवर एकदा आपल्याला संदेश यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही वाट्सॅपवर यायला लागल्या. विविध गृप निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे.
उदाहरण म्हणुन सांगतो. आमचा एक गृप होता विविध राजकारणी, नगरसेवक, व्यापारी,शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य,आमदार, असा गच्च थोरामोठ्यांनी भरलेला गृप होता. सुरुवाती सुरुवातील गुड मॉनिंग पासून 'गोड गोड' असा संवाद व्हायचा. टोन वाजला की काय लिहिलं त्याची प्रचंड उत्सुकता. वाचने लिहिणे सुरु झाले. मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या. एक दिवस अॅडमिनने हा गृप बंद करत आहे असे सांगितले. आणि सुटलो. पण एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार.
वाट्सअॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ संदेश म्युट करा, कोणी म्हणेल सरळ अॅप्लीकेशन भ्रमनध्वनीतून काढून टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना ब्लॉक करा, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच.
विनंती : आमच्याकडे वाट्सअॅप नाही, हलके भारीतले मोबाईल नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे. :)
''अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। श्री संत ज्ञानेश्वर.
एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणारअशीच भांडणं व्हॉटसअॅप, बागेत, कट्ट्यावर किंवा ऑनलाईन फोरम/साईटवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या केसमधे अॅपपेक्षा जास्त प्रॉब्लेम, गॄप युझर्सचा होता असं वाटलं. बरं झालं, बंद केलात तो गॄप.मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा. सदस्यांचे दुरध्वनी क्रमांक आहेत त्याच्या माझ्या पुरता एक ग्रुप बनवला आहे पण अजुन पर्यंत एकाला पण निरोप पाठवलेला नाहीये. मि.पा. चा पण व्हॉट्स अॅप ग्रुप आहे हे माहिती नव्हते. त्या साठी कोणाला व्य.नि. करायचा.