Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

ग — गंगाधर मुटे, Sun, 04/13/2014 - 01:51
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये

वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये
गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये

एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ येथे गरिबी
की महान परंपरेला त्यांच्या, तडा जाऊ नये

कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल
हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये

जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी?
की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?

कुणी आणली असेल अशी वेळ, या सारस्वतांवर
की उंदीरही ज्ञानपीठाचे, पीठ खाऊ नये?

तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही
आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये

बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये

                                         - गंगाधर मुटे 'अभय'
==^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0==


प्रतिक्रिया द्या
33866 वाचन

💬 प्रतिसाद (83)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/13/2014 - 06:47 नवीन
पुलेशु. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 04/13/2014 - 07:15 नवीन
कविवर्य काहीतरी सांगू पहात आहेत एवढ लक्षात आलं, पण नेमक काय ते नीटस उमगल नाही. ==या प्रतिसादासाठी सही== (-स्वतःस काय माहित नाही ते माहित असलेला माहितगार)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 04/13/2014 - 07:23 नवीन
कवी अवकाळी पावसावर नाराज आहे, वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये असे कवीला म्हणायचे असावे. गरीबी इथे जोपासली जाते म्हणन्यापेक्षा इथे लोक गरीब राहावेत अशीच व्यवस्था सरकार राबवते,आणि ती एक महान परंपरा म्हणजे व्यवस्थेचे प्रमुखांची ती तक्रार असावी. एकूण तक्रारीची ही रचना आहे. पण मला आवडल्या होत्या त्या खाली लिहिलेल्या ओळी पण यातली दुसरी ओळ अपेक्षापूर्ण करु शकली नाही असे वाटले. काही तरी अजून खास लिहिता आलं असतं असं वाटलं. अर्थात कवीच्या आणि सरकारच्या मनात केव्हा काय असेल सांगता येत नाही. :) तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही आसमंतामध्ये आज माझे, श्वास मावू नये -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रसाद गोडबोले Sun, 04/13/2014 - 10:32 नवीन
वरुणदेवाने केव्हाही पाऊस पाडू नये, त्याने त्याच्यावर फालतू जातीवर येऊ नये
इथे फालतु हा शब्द नकक्की कोणाला उद्देशुन वापरलाय हे नीटसे उमगले नाही . वरुणाला उद्देशुन वापरला असेल तर एक वेळ ठीक आहे ....पण जातीला फालतु हा शब्द वापरला असेल तर अ‍ॅट्रॉसिटी खाली हा गुन्हा ठरेल ना ? बाकी कविता सो सो . असो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न
नगरीनिरंजन Sun, 04/13/2014 - 11:13 नवीन
जात हा शब्द इथे वृत्ती या अर्थाने घ्यावा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sun, 04/13/2014 - 14:19 नवीन
वॉव ! जात हा शब्द काही ठिकाणी वृत्ती ह्या अर्थाने घ्यावा ! व्हॉट अ‍ॅन आयडीया सरजी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 04/14/2014 - 13:41 नवीन
आणि तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल. आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही. देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात हे सगळ्यांना माहित असेल अशी आशा. (वरुणदेव म्हणजे वरुण नाव आणि देव आडनाव असलेला माणूस नव्हे हेही इथे स्पष्ट करुन ठेवलेले बरे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ध
धन्या Mon, 04/14/2014 - 14:20 नवीन
तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/14/2014 - 19:03 नवीन
तुम्ही त्यांच्या कवी म्हणून असलेल्या "पोएटीक लिबर्टी"च्या हक्कावरच घाला घालत आहात.
"पोएटीक लिबर्टी" लय भारी शब्द .... ह्यावरुन काही महिन्यांन पुर्वी बाबासाहेबांचे घटना निर्मितीच्या काळातील व्यंग चित्र आणि "आर्टिस्टिक लिबर्टी" ह्यावुन निर्माण झालेला वाद आठवला ! ती लिबर्टी खपवुन घेतली गेली नव्हती ...लय राडा झाला होता ! (बायदवे , धन्या ,केवळ आपल्यात गैरसमज नको म्हणुन ....... माझा मुद्दा इतकाच होता की इथे आपण जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत तेव्हा कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही , आता उद्या कोणी जर बळीराजाने त्याची जात दाखवु नये असे कडवे टाकले तरीही मी त्याचा निषेध्दच करेन !! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ग
गंगाधर मुटे Mon, 04/14/2014 - 21:26 नवीन
@प्रसाद गोडबोले,
जातिनिर्मुलनाच्या दिशेने प्रयत्न करीत आहोत
तुम्हाला बहुधा मनुष्यजातीतील अंतर्गत जातीव्यवस्थेविषयी बोलायचे असावे. तसे असेल तर ठीक अन्यथा - मनुष्यजात आणि जनावरांची जात यातील जातीचे निर्मूलन करायचे म्हटले तर माणूस आणि जनावर यांना एकाच वर्गवारीत आणावे लागेल. - देव आणि दानव यांनाही एकाच पारड्यात मोजावे लागेल. - जर्शी ही त्या गाईची जात असूनही सारेच तिला "जर्सी गाय" असेच म्हणतात. जास्त दूध देते म्हणून जात काढण्याची मुभा असते की काय?
कोणाचीही जात काढणे काही योग्य नाही
या विधानाने मला अजिर्ण झाल्यासारखे वाटत आहे. पचणे फारच कठीण चाललेय. अहो गोडबोले साहेब, सोईचे असेल तर जातीचे समर्थन आणि जेथे गैरसोय होते तेथे निर्मुलनाची भाषा हा विचित्र पण नवा प्रघातच पडला आहे आता आपल्या देशात. जात (Caste) या विषयावर काही अपवाद वगळता प्रत्येक मनुष्य दुतोंडी झाला आहे. हे विधान मी खात्रीने आणि पुराव्यानिशी करू शकतो. --------------------- जाता जाता पुन्हा एक जात काढून जातो. महेंद्रकपूर - माझ्या पासून दूर नको जाऊ गंगूबाई तुझ्याविना मला करमत नाय उषा मंगेशकर - नेऊ नका आडोशाला येणार मी नाय पुरुषांच्या जातीचा भर्‍होसा काय? ---------------------- प्रसादराव, मला असे वाटते की पुरुषांची जात काढली म्हणून महिलांवर 'अ‍ॅट्रासिटी' लावण्यापेक्षा पुरुषांच्या जातीवर भरवसा ठेवण्याइतपत त्यांच्यात विश्वासाहार्य बदल घडवून आणायला हवेत. नाहीतर महिला पुरुषांची 'जात' काढतच राहतील. कारण ..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/14/2014 - 18:54 नवीन
तुम्ही लावलेला अर्थ घेतला तरी अ‍ॅट्रॉसिटीची तक्रार करायची की नाही ते वरुणदेव बघून घेईल.
हो ना . आंबेडकर जयंतीला आपण अजुनही एखाद्याची जात काढण्याचे समर्थन करत आहात हे पाहुन आनंद वाटला !!
आजच्या जगात वरुणदेवाची (किंवा कोणत्याही देवाची) आणि आपली जात एकच आहे असा भ्रम होऊ शकण्याइतका भ्रमिष्ट कोणत्याही जातीत असेल असे वाटत नाही.
नेहमीचा गोंधळ ... मायथॉलॉजी एक तर संपुर्ण स्विकारा किंव्वा पुर्ण नाकारा .... म्हणजे जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना , आणि मानत नसाल तर मग कोणत्याही का जातीचा असेना , त्याची जात काढु नका .... जातिनिर्मुलनाच्या साठी प्रयत्न करा !
देव ही एक कल्पना आहे आणी तिच्याशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध असल्याचा समज असणारे लोक वास्तवापासून भरकटलेले असतात
हे तुमचे वैयक्तिक मत आहे . त्यामुळे त्या बद्दल पास . खुष राव्हा !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ग
गंगाधर मुटे Mon, 04/14/2014 - 22:19 नवीन
जर वरुणदेव मानत असाल तर त्याला जात होती हेही माना
माझ्यासारख्याला वरुणदेवाचे देव म्हणून किंवा व्यक्ती म्हणून अस्तित्व मानायचे किंवा नाकारायचे, या दोनपैकी कोणताच प्रश्न कधीच न पडल्याने त्याविशयी कधी सखोल विचार केलाच नाही. पुरातन ग्रंथात त्याची caste काय लिहिली आहे, हे माहीत करून घ्यायची तर आजही गरज वाटत नाही. पण मला असे वाटते की वरुणदेवाच्या नामकरणाच्या पुरातन ग्रंथांच्या तत्कालीन जमान्यात जातीव्यवस्था अस्तित्वात नसेल. तेव्हा वर्णव्यवस्था अस्तित्वात असावी. कुणी याविषयी लिहिले तर वाचायला आवडेल आणि माझ्या ज्ञानात भरसुद्धा पडेल. शिवाय प्रुथ्वीची निर्मीती झाली तेव्हापासून वरुणदेवाचे (देव म्हणून नव्हे तर पाऊस पाडणारी शक्ती/यंत्रणा) अस्तित्व आहे. पुरातन ग्रंथ कितीही पुरातन असले तरी पृथ्वीच्या निर्मितीच्या काळाचा हिशेब करता सर्व पुरातन ग्रंथ हे काही वर्षातलेच ठरतात. त्यामुळे त्याला जात होतीच हेही मानने माझ्यासारख्या आवश्यक अथवा अनावश्यक वाटत नाही कारण आता प्रयोजन उरलेले नाही. --------------------------------- मी काव्यात वापरलेल्या जात या शब्दाचे caste या अर्थाशी काहीही देणे घेणे नाही. केवळ "वृती" असाच अर्थ घ्यावा. वाक्यरचना आणि आशय लक्षात घेतला तर तोच अर्थ निघतो. casteवाचक अर्थ कोणत्याही अंगाने निघत नाही. आशय व्यक्त करतांना अत्यंत परफेक्ट अर्थ वाचकांपर्यत पोचवायला नेमके शब्द वापरावेच लागतात. उदा. मला ज्योतीबा फुले, डॉ. आंबेडकर आणि शरद जोशी हे एकाच जातीचे वाटतात. संघर्षाच्या बाबतीत तर या तिघांचीही जातकुळी निसंशय एकच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विवेकपटाईत Fri, 04/18/2014 - 18:01 नवीन
वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती. देवांची कुठलीही जाती नव्हती. जेंव्हा मनुष्य स्थिरावला अर्थात शेती, व्यापार इत्यादी करू लागला आणि त्या साठी स्वत:ची वेगळी ओळख असणे गरजेचे भासू लागले अशाप्रकारे हळू हळू जात व्यवस्था समाजात पसरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 04/14/2014 - 09:13 नवीन
जात वृत्ती या अर्थानेच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
आ
आत्मशून्य Sun, 04/13/2014 - 12:52 नवीन
साक्षात देवाच्या जातीला फालतु म्हणने अ‍ॅट्रॉसिटी खाली गुन्हा नसावा असा संशय आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ग
गंगाधर मुटे Sun, 04/13/2014 - 15:53 नवीन
धन्यवाद बिरुटे सर. जे लिहिले त्याचा तंतोतंत अर्थ काव्यातून पोचत असेल तर त्याचा आनंद आणि समाधान काही औरच असते. __________________ तू कोसळ एकदाची डोळ्यात, अथवा कशातही ही ओळ तुम्हाला आवडली त्याबद्दल धन्यवाद. मात्र दुसरी ओळ अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तेवढ्याने बरे झाले. नाही तर गझलेचा त्या एकाच शेराने नूर पालटला असता आणि अन्य शेरातून जे पोचवायचे आहे (ज्यासाठी ही गझल लिहिली गेली आहे) ते बाजूला पडून मूख्य आशयाकडेच वाचकाचे दुर्लक्ष झाले असते. मग लेखकाने/कवीने तेवढी काळजी घ्यायला नको का? आपल्याला जे लिहायचे असते, ते लिहून झाल्यानंतर ते किती हलके वा जड आहे, हे लक्षात येऊनच जाते. वाचकांची पसंती/नापसंती हा वेगळा भाग आहे. त्यामूळे नाईलाजाने पहिल्या ओळीचा समारोप करतांना दुसर्‍या ओळीत मीठ वापरायचे टाळले व फोडणी बिघडू दिली. क्षमस्व. ------ कधी तरी त्या ओळीला साजेशी दुसरी ओळ लिहून मी नक्कीच स्वतंत्र गझल लिहेन. ये वादा रहा! दोस्ती के खातीर इतना तो करही सकता हू| :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गंगाधर मुटे Sun, 04/13/2014 - 15:58 नवीन
@ नगरीनिरंजनजी धन्यवाद| @ प्रसाद गोडबोले, वरूणदेवाला पण 'जात' असते? मला वाटते की बहुतेक नसावीच. आणि असलीच तर माझी आणि माझ्या देवाची 'जात' वेगवेगळी कशी असणार?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Mon, 04/14/2014 - 07:56 नवीन
जातीयवादी कविता. लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे. :-)
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 04/14/2014 - 11:32 नवीन
<<< लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.>>> हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ग
गंगाधर मुटे Mon, 04/14/2014 - 11:38 नवीन
वरिल प्रतिसाद खालीलप्रमाणे वाचावा. मला संपादनाची सोय नसल्याने संपादन करता आले नाही.
लेखकाला काही जाती चांगल्या आणि काही वाईट असे सुचवायचे आहे. खरे तर लेखकाचे तसे च गृहीतक आहे.
हे खरे आहे हो. कापसामध्ये L.R.A 5166 ही जात फारच रोगट आहे. रसशोषणार्‍या किडीला बळी पडत असल्याने उत्पादन पण कमी देते. त्यापेक्षा L.R.A-516 ही जात बरी आहे पण खुजी आहे. Ak-84635 या दोन्ही जातीपेक्षा चांगली जात आहे. खुजी नाही आणि रोगटपण नाही पण उत्पादन कमी देते. या जातींपेक्षा अमेरिकन नर आणि भारतीय मादी यांचा संकर घडवून आणला तर त्यातून चांगले वाण तयार होतात आणि उत्पादनदेखील चौपट देतात. उदा एच-४, एनएचएच-४४ वगैरे. निदान कापसामध्ये तरी मूळ जातीपेक्षा संकरित वाण अधिक जोमदार असतात हे सिद्ध झालेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/14/2014 - 11:49 नवीन
=)) मुटेजी वरील दोन्ही प्रतिसाद आवडले ! आपल्या खिलाडु जातीला (येथे वृत्ती ह्या अर्थाने :D) सलाम !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
सूड Tue, 04/15/2014 - 13:41 नवीन
मस्त प्रतिसाद गिर्जाकाका !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अनुप ढेरे Mon, 04/14/2014 - 14:22 नवीन
=)) मस्तं प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
मृणालकेदार Mon, 04/14/2014 - 12:09 नवीन
"बाकी सर्व विसर 'अभय' पण एक, लक्षात ठेव तू गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" आवडेश....
  • Log in or register to post comments
D
drsunilahirrao Tue, 04/15/2014 - 10:59 नवीन
'फालतू' शब्द 'विनाकारण' अशा अर्थाने वापरला असावा, असे वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 04/16/2014 - 08:34 नवीन
शेराचा विचार करता 'विनाकारण' या शब्दापेक्षा 'फालतू' हा शब्दच जास्त संयुक्तिक आणि अर्थप्रवाही ठरायला हवा. कारण नसताना केलेले कृत्य - विनाकारण गरज संपल्यानंतर/भागल्यानंतर सुद्धा वरकड/गरजेपेक्षा जास्तीचे "वरकड" कृत्य करत राहणे म्हणजे 'फालतू' असा अर्थ वाचकांनी घ्यावा, असे अभिप्रेत आहे. जेव्हा गरजेपेक्षा जास्त पाऊस होतो तेव्हा "ओला दुष्काळ" आणि जेव्हा पावसाची अजिबात गरज नसते तेव्हा पाऊस आला तर आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: drsunilahirrao
म
मदनबाण Tue, 04/15/2014 - 11:11 नवीन
कविता/गझल आवडली !
  • Log in or register to post comments
म
मृगनयनी Fri, 04/18/2014 - 14:46 नवीन
जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये?
शेती करणारे असाल... तर कर्माने नक्कीच तुम्ही "शूद्र" नसाल!!.. आणि जन्माने असाल.. तर मग.. "संत- चोखामेळा" यांचा आदर्श का नाही डोळ्यासमोर ठेवत? तत्कालीन उच्चवर्णीयांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून त्यांनी कातडी देव्हार्‍यामध्ये विठ्ठल-रुक्मिणीची स्थापना केली होती. आपल्याकडे खरा- म्हणजे चोखामेळ्यासारखा भक्तिभाव असेल.. तर वरूणदेवच काय.. सगळेच देव पावतील तुम्हाला!!!!! फक्त त्यासाठी देवाची करूणा भाकली पाहिजे.. देवापुढे नम्र झाले पाहिजे. कविता ही कवीच्या मनाचे प्रतिबिम्ब असते.. असे म्हणतात..... तुमच्या कवितेतून वरूणदेव आणि ओव्हरऑल सगळ्याच देवांबद्दलचा द्वेष जाणवतोये. "देव" ही संकल्पना खरोखर अस्तित्वात आहे.. असे जर मानत असाल.. तर देवाला शिव्या देणं थांबवा.. आणि केवळ कवितेपुरतं "देवा"ला मध्ये आणायचं असेल.. तर बाकीच्या देव मानणार्‍यांच्या धार्मिक भावनांचा अपमान होऊ नये.. याची काळजी घ्या......... :) पाऊस पडावा, असे वाटत असेल तर "पर्जन्यसूक्ता"चे पठण करून यज्ञ करावा.. पूर्वीच्या काळी पर्जन्यदेवतेला आवाहन करण्यासाठी महान ऋषी-मुनी हीच पद्धत अवलंबत असत.... :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गंगाधर मुटे Fri, 04/18/2014 - 16:46 नवीन
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच. मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या. वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? :) मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Fri, 04/18/2014 - 19:35 नवीन
मी देव मानतो की नाही, हा माझा खाजगी प्रश्न आहे. त्याचे सार्वजनीक प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नसतेच.
गंगाधर मुटे, ऑलरेडी तुम्ही त्याचे सार्वजनिक प्रकटीकरण केलेले आहे.- तुमच्या या ओळींमधून वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये जन्माने असेल की कर्माने, कशाने शूद्र मी? की; माझ्या नांगराला एक पण, देव पावू नये? कुत्रा चावो, विंचू चावो वा, सापही चालेल हे परमेशा! या मेंदूस मात्र, अहं चावू नये या सगळ्या ओळींमध्ये आपण देवाचे नाव तीनदा घेऊन त्याचे सार्वजनिकीकरण केलेलेच आहे की!!!!
मी माझ्या देवाशी कसे वागावे, हा सुद्धा माझा स्वतःचा प्रश्न आहे. देव जर कुणाची खाजगी मालमत्ता नसेल तर देवाला दोन खडे बोल सुनावल्याने कुणाच्या भावना दुखण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
इथे तुम्ही म्हणताय, की तुमच्या देवाशी कसे वागावे.. हा डेफिनेटली हा तुमचा प्रश्न आहे. पण सार्वजनिक साईटवरती आपण देवाची नसलेली जात काढून त्याला "जातीच्या चौकटीत" बसवण्याचा प्रयत्न करत आहात!!! आणि देव सगळ्यांचा आहे. आणि कुणाचीही खाजगी मालमत्ता नाहीच्चे!!.. अहो.. जी मालमत्ता सगळ्यांना प्राप्त होत असते.. ती देवाच्याच कृपेने की!!! आणि देवाला खडे बोल सुनावणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि इथले किमान ५० % मिपाकर आणि बाकीचे मिपावाचन करणारे पाहुणे यांपैकी अनेक जणांच्या मनात देवाची प्रतिमा अत्यंत उच्चस्थानी आहे. देव हे आमचे श्रद्धास्थान आहे. तुमच्या लेखी नक्की देवाचे काय स्थान आहे.. हे मला माहित नाही. पण एकंदर तुमच्या भाषेवरून आणि त्राग्यावरून देव म्हणजे तुमचा नोकर आहे आणि त्याने काम नीट केले नाही म्हणून तुम्ही त्याला शिव्या देत त्याची जात काढत आहात.. असे वाटते. अर्थात हे सगळं.. आमच्या दृष्टीने खूप निरर्थक आणि आक्षेपार्ह आहे. पण तरीही तुमची भडास काढायला तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असतील.. त्या तुमच्या प्रायव्हेट ब्लॉगवर देऊ शकता.. जो की तुमच्या मालकीचा असेल.. तिथे तुमच्याच विचारसरणीची माणसे येत असतील.. अर्थात जिथे आमच्यासारख्या लोकांना यायची इच्छाही नसेल...
याउपरही कुणाला देवाचे वकीलपत्र घ्यायचेच असेल तर पहिल्यांदा आमचे नुकसान होईल असे त्याने वागू नये, याची खबरदारी घ्या.
इथे तुमच्या या वक्तव्यावर हसावे, की रडावे.. ह्च कळत नाही. देवाचे वकीलपत्र!!!.. ओह माय गॉड॥!!.. तुमची केस खरंच हाताबाहेरची आहे.. असं वाटतंय!!!.. विश्वाचा अफाट पसारा चालवणारी जी एक दिव्य आणि दैवी शक्ती आहे.. तिला परमात्मा, परमेश किंवा सोप्या भाशेत- "देव" असे म्हणतात.... संपूर्ण विश्वाचे पालनपोषण करणार्‍या देवाचे वकीलपत्र घेणे.. ही कल्पनासुद्धा खूप हास्यास्पद आहे. संत एकनाथांच्या घरी देवाने "श्रीखंड्या"च्या रूपाने पाणी भरले. संत सखूबाईंना पंढरपुरास पाठवुन स्वतः तिच्या सासूचा छळ सहन केला, सन्त ज्ञानेश्वरांसाठी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, सन्त तुकारामांच्या गाथा १३ दिवसांनंतर जश्याच्या तश्या पाण्यातून वर आणल्या... या सगळ्या कथा ऐकून कदाचित तुम्हाला वाटले असेल.. की देव सहज उपलद्ब्ध असतो...हो खरं आहे.. देव सहज उपलद्ब्ध असतो..सगुण रुपातही आणि निर्गुण रुपातही!!!.... पण तो त्याच्या भोळ्या भक्तांसाठी..!!!.. त्याच्या ठिकाणी नम्र होऊन त्याची करूणा भाकणार्‍यांसाठी!!!!... उठसूट देवाला आपल्या मनाला येइल त्या चौकटीत किन्वा जातीत स्वार्थीपणाने बसवून त्याला उद्धटपणे जाब विचारणार्‍यांसाठी नाही!!!
वरुणदेवाने तर गारपीठ वगैरे पाडून शेत नेस्तनाबूत करण्याचे सारे प्रयोग त्याच्या चाहत्यांच्या अथवा भक्तांच्या शेतातच करावे. इतरांच्या कशाला? Smile
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) अहो भक्तांना कश्यासाठी तो अशी दु;खे देइल?..उलट आणि अगदी एखाद्या भक्ताच्या पूर्वकर्मानुसार भक्तांना पीडाच भोगायचे नशिबात असेल.. तर देव कोहळ्याएवढा भोग आवळ्याएवढा करू शकेल!!!... ज्यांना देव म्हणजे काय आहे, कोण आहे.. त्याची शक्ती किती व्यापक आहे.. हेच्च कळले नाही.. जे लोक मनमानी वागून करंट्या सरकारच्या चुका, शेतकर्‍याच्या व्यथा यांचे खापर देवाच्या माथी फोडतात.. त्यांना देव का मदत करेल??? कुणी देव मानो अथवा न मानो.. किन्वा त्याची खिल्ली उडवो.. निसर्गाच्या नियमांनुसार घटना घडत असतात... फक्त देव त्याच्या खर्‍या भक्तांच्या पाठी मात्र मजबूतपणे उभा असतो आणि असतोच्च!!!! गारपीट खर्‍या भक्ताच्याही शेतात पडते.... पण तुलनेने त्याचे नुक्सान कमी होते. किन्वा अनाहुतपणे त्याला कुणाची तरी मदत मिळते.. किन्वा सरकारी मदत तरी मिळते. काही मिपाकरांचेही असे काही चांगले अनुभव आहेतच की!!!
मृगनयनी, तुम्ही तरी वरुणदेवाच्या या कृत्याचे कशाला समर्थन करत आहात? Smile
मी वरूणदेवाचे समर्थन बिल्कूल करत नाही. गारपीटीने शेतकर्‍यांचे, शेतीचे किती भयानक नुक्सान झाले.. हे मी पाहिलेय. खरोखर त्या बद्दल अत्यंत दु:खही होत आहे. परन्तु वरुणदेवाला जातीच्या चौकटीत का बसवायचे? आणि शिव्या घालायच्या?.. तुम्हाला जात काढायचीच असेल.. तर ज्यांच्या मुळे ही परिस्थिती ओढवलीये.. त्यांची काढा ना!.. सरकारची जात काढा.. कृषीमंत्र्यांची काढा... वेळीअवेळी पावसाला- गारपीटीला कारणीभूत ठरलेल्या लाकूड-तोडीला- वृक्षतोडीला संमती देणार्‍यांची काढा ना..... वरूण-देवता ही निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे. त्याला शिव्या दिल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही.. पण देवावर श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या असंख्य लोकांच्या मात्र भावना दुखावू शकतात. आणि तसेही मिसळपाव'च्या नियमानुसार इथे "जातीयवादी" कोणतेच लिखाण अलाऊड नाहीये. हे तुम्हाला माहित असेलच.. मग उगीच कोणत्या देवाची नसलेली जात काढून त्याला जातीच्या चौकटीत बसवून जातीय तेढ निर्माण करण्यात काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 08:27 नवीन
"जात" या शब्दाला सर्वसामान्य माणूस एवढा विटलेला आहे, की जीवशास्त्रीय वर्गीकरणांना केवळ जीवशास्त्रीय वर्गीकरण म्हणावे. जाती, प्रजाती हे शब्द जीवशास्त्रातही वापरू नयेत एवढा 'जात' हा शब्द आताशा डोळ्या (किमान मलातरी) खूपु लागला आहे. ( 'अमुक तमुकची जात काढणे आणि अमुकतमुकच्या जातीवर येणे' हेही वृत्ती या शब्दाचे नकारात्मक भाव दाखवतात किंवा कसे? आणि म्हणून 'जात' हा वृत्ती या अर्थानेही नकोसा होतो. -खासकरून प्रा. बिरूटे सरांनी आमची ही भावना लक्षात घ्यावी असे वाटते). कदाचित मानवी इतिहासाची ज्ञानकोशीय दखल घेताना ज्ञानकोशात 'जात' हा शब्द इतिहास होऊन राहणे एवढे ठिक. या पुढील साहित्यात 'जात' हा शब्द 'जातीयतेचा निषेध करण्यापुरताच येईल हे संवेदनशील साहित्यिक आणि कवींनी पाहील्यास आमचा त्यांच्या साहित्याप्रती आदर निश्चीत दुणावेल अर्थात मी (भक्त अथवा भक्तेतर) माझ्या (आपल्या अभिप्रेत) प्रीय/अप्रीय देवावरही कोपू शकतो हे स्वातंत्र्य सर्वसाधारण भारतीय साहित्यातच नव्हे तर विवीध धार्मिक आणि संत साहित्यात सुद्धा आहे. देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 14:03 नवीन
देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही.
माहितगार... मुळात आपल्या "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपू नये असा दळभद्रीपणा भारता बाहेरून आलेल्या काही संस्कृतीत आहे. आपन त्यांच्या चुकीच्या धर्मांधतेची नक्कल करून साहित्यिकाचे आपल्या देवाप्रती सात्विक कोपण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ इच्छित असलेल्या मृतैंच्या मतांशी मी सहमत नाही." या वाक्याचा काहीही संदर्भ लागत नाही... :) "देवावर सार्वजनिक ठिकाणी कोपणे".. म्हणजे नक्की काय ?.. आणि ती संकल्पना भारताबाहेरून कशी आली..याचे विश्लेषण कृपया देऊ शकता का? .. माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे. "वरूणदेवाने फालतू त्याची जात दाखवू नये" या वाक्याला आहे. बाकी त्यांचे त्यांच्या देवावर रागावणे वगैरे.. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त वापरलेली भाषा आणि शब्द चुकीचे आहेत. ते स्वतः कवी आहेत.. म्हणून त्यांना आवडतील.. ते चुकीचे शब्द चुकीच्या ठिकाणी वापरणे.. हे चुकीचे आहे. माझ्या वरच्या प्रतिसादात नमूद केल्याप्रमाणे.. त्यांना पाहिजे ते देवावरचे रागावणे, कोपणे.. वगैरे गोष्टी ते आपल्या स्वतःच्या ब्लॉगवर करू शकता. इथे मिसळपाववर "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या कविता कृपया टंकू नये. उपरोक्त कवीतेत कवीने जात हा शब्द वापरणे तो वृत्ती अर्थाने येऊनही, मलाही खटकले कारण अताशा जात हा शब्दच खटकू लागला आहे पण एरवी कवीची भाषा उद्धट अथवा शिव्या देणारी वगैरे असलेले मृतैंचे आक्षेप चुकीचेच नसून संबंधीत आक्षेपच आक्षेपार्ह वाटतो किंवा कसे ? बहुतेक तुम्हाला स्वतःलाच नक्की कश्याबद्दल आक्षेप आहे... याबद्दल तुम्ही स्वतःच साशंक आहात!!!.... जाऊ देत.. वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!! :) :) =)) .. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 15:17 नवीन
वेळ मिळाला, की माझा वरचा प्रतिसाद नीट कळेपर्यंत वाचत रहा... माझा आक्षेप नक्की कशाला आहे...हे नक्की कळेल!!!
मी जेवढ्यांदा वाचण्याचे आपण स्वप्न पहात आहात त्याला गुणीले ५६ वेळा, "तुमच्या आक्षेपालाच आक्षेप आहे" हे नीट कळून सवरून लिहिले आहे हे पुन्हा पुन्हा कळे पर्यंत वाचत रहावे (ह.घ्या). जात हा शब्द वृत्ती या अर्थाने आजही मराठीत येतो (आणि वर एका प्राध्यापकांनी त्यास सर्टीफाय पण केले आहे) त्यावर कोनतीही बंदी नाही आणि वृत्ती/प्रवृत्ती "वरूणदेवाने फालतू त्याची प्रवृत्ती दाखवू नये" यात एक वरूणदेवाला नव्हे तर वरूणदेवाच्या दुर्दैवी विघ्नकर्त्या प्रवृत्तीला फालतू हा अनावश्यक या अर्थाने शब्द आला आहे. आणि तो पंचमहाभूता पैकी एका महाभूत असलेल्या वरूणराजाने आणलेल्या अवकाळी संकटे आणण्याच्या प्रवृत्तीस उद्देशून वापरलेला दिसतो आहे. पंचमहाभूते कितीही ग्रेट असली तरी भूते ती भूतेच उद्या तुम्ही पंचमहाभूत या शब्दात महाभूत हा शब्द वापरला आमच्या भावना दुखावल्या म्हणाल ! या कवितेत "जातीयवादी", लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे काहिही नाही. उलट संकटाने ग्रस्त शेतकर्‍याची वेदना मांडणार्‍या कवितेचे सुयोग्य संवेदनशील रसग्रहण करण्याचा अभावग्रस्तता आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या दृष्टीकोणात दिसते. आपल्या आक्षेपात इतर लोक भावना दुखावल्या म्हणतात तसे आम्हीही म्हणून पाहतो या वृत्ती पलिकडे तथ्य नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कवी महोदयांनी या पुर्वीच्या धाग्यातून भक्तीरसपूर्ण काव्य रचले आहे आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसाद (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद. @ गंगाधर मुटेंजी सगळ्यात चांगली गोष्ट कोणती ते आपण शेवटी सांगीतलेच आहे. आपल्या कवितेतील मतितार्थ हळू हळू उलगडतात. आपल्या आवडीचे लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 15:21 नवीन
आणि या उलट यापुर्वीच्या एका धागा प्रतिसादात सदस्य मृगनयनी यांना (http://www.misalpav.com/comment/572691#comment-572691 येथे) इतरांच्या जात, रंग, भाषा यावरून अहंकार आणि असंवेदनशीलपणे लोकांना दुखावताना पाहिले आहे. अशा प्रवृत्तीचा मी प्रांजळपणे निषेध नोंदवतो. एनी वे प्रतिसादासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 15:41 नवीन
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही.. किंवा ज्यांना "स्कोअर सेटल" करावयाचा होता....त्यांनी आपापल्या मतीनुसार तेथे प्रतिक्रिया देऊन माझे आणि संबंधित व्यक्तींचेही मनो'रंजन केले आहे. त्यामुळे आपल्याला जो काही निषेध दर्शवायचा असेल.. तो त्या पर्टीक्युलर धाग्यावर नोन्दवला गेला तर बरे होईल. इथे या धाग्याशी आणि प्रतिक्रियांशी संबंधित डेटा जर आपल्याकडचा संपला असेल.. तर कृपया मिपावरच्या इतर चर्चांचा आनन्द घेऊ शकता... :) असो..... इथे या धाग्यावर आपला जो काही देवाच्या आणि जातीच्या सन्दर्भातला संभ्रम आहे.. तो दूर झाला का? अर्थात दूर झाला असेल किंवा नसेल.. तरी मला "प्रांजळ" आनन्दच आहे... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 16:09 नवीन
माझा "तो" प्रतिसाद हा खूप वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि तो योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोचलाही गेलेला आहे. किम्बहुना तो त्या भाषेत आणि शब्दांमध्ये मुद्दाम लिहिला गेलेला आहे. ज्यांना कुणाला त्याचा अर्थ आणि मागचा हेतू समजला नाही..
मृ. तै तुमच्या त्या प्रतिसादावर इतरांनी स्कोअर सेटलींग केलं नाही केलं त्याची कल्पना नाही, पण आपला हा प्रतिसादच आपण स्वतः आपला 'तो' प्रतिसाद स्कोअर सेटलींग करता होता याची अप्रत्यक्ष कबूली देतो आहे. म्हणजे तुम्ही तुमची व्यक्तीगत स्कोअर सेटलींग करताना सार्वजनिक व्यासपीठ वापरून फक्त ज्याच्याशी स्कोअर सेटल करतोय त्या पलिकडे जाऊन आसपासच्या समाजाच्या भावना दुखावणार लेखन आपल्या हातून घडल होत याचं भान अद्यापही आपणास दिसत नाही. ज्यांनी आपणास भानावर आणण्यासाठी प्रतिसाद देण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वरच स्कोअर सेटलिंगचे आरोप लावणे हास्यास्पद वाटते. किमानपक्षी माझा तर आपल्याशी कोणता पूर्व परिचय नसताना मी आपल्याशी स्कोअर सेटल करण्याचा प्रश्न येत नाही. तेव्हा एक त्रयस्थ म्हणून पुन्हा एकदा नमूद करतो की आपला तो प्रतिसाद (विचार प्रणाली) सार्वजनिक व्यासपिठावर कळत नकळत आपली स्वतःचीच नकारात्मक प्रतिमा उभी करत आहे. 'संवेदना' नावाच्या गोष्टीचा आपला परिचय संपला नसेल तर आपल्या 'त्या विचारप्रणाली' आपण पुन्हा एकदा अभ्यासाव्यात अथवा सार्वजनिक व्यासपिठावर तसे लिहिण्याचे टाळावे असे वाटते. आपल्या त्या प्रतिसादाचा संबंध या धाग्यात तर आता अधिक लागतो आहे हे ही आपण लक्षात घेतले असे दिसत नाही. सार्वजनिक व्यासपिठावर माझ्यामुळे (आपल्यामुळे असे वाचावे) आसपासचे दुसरे दुखावले गेले तर चालतात, आणि मी (इथे आपण असे वाचावे) मात्र ज्यात नाही त्याचे अर्थ काढून दुसर्‍यांना सार्वजनिक व्यासपिठ वापरण्याबद्दल हकनाक आक्षेप घेतो, हे माझे (आपले असे वाचावे) वागणे दुटप्पी आणि विरोधाभासाचे नाही किंवा कसे याचा मीच माझा (येथे आपणच आपला असे वाचावे) विचार केला पाहीजे. (आपल्या विचारधारांमुळे हे स्पष्ट करू इच्छितो की गंगाधर मुटेंची बाजू घेण्यास ते माझे कोणी लागत नाहीत) गंगाधर मुटे यांच्या शब्द योजने बद्दल मलाही सुरवातीस साशंकता वाटली म्हणून या कवितेच्या एकदम सुरवातीच्या प्रतिसादात माझा प्रतिसाद आहे. पण कविता पुन्हा पुन्हा अभ्यासली ती एक शेतकर्‍यांच्या दुख्खाबद्दलची निखळ संवेदनशील कविता आहे. कविते वर अनभिज्ञतेतून अथवा गंमतीतून आलेले आक्षेपांनी शेतकर्‍यांच्या वेदना जी कवी मांडू पाहतो आहे ती दुर्लक्षीत होते आहे म्हणून मी कवीने या कवीतेत मांडलेल्या वेदनांची मी अभ्यासपूर्ण आणि संवेदनशीलपणे बाजू घेतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ग
गंगाधर मुटे Sun, 04/20/2014 - 16:46 नवीन
माझा विरोध "मुटे" यांच्या देवावर रागावण्याला नसून देवाची अत्यंत अरेरावी भाषेत वल्गना करून त्यास "जाती"च्या चौकटीत बसवण्याला आहे.
मी वरूणदेवाला जातीच्या चौकटीत कसा काय बसवू शकेल ब्वॉ? एखाद्या जातीच्या चौकटीत एखाद्याला बसवायचे असेल तर समान गुणधर्मिय जातीचे अनेक असायला हवेत ना? माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पाडण्याचा गुणधर्म फक्त आणि एकमेव वरुणदेवातच आहे. आणखी कोणाकोणाला व्यक्तिगत अथवा सामुहिक/सामुदायीकरित्या पाऊस पाडता येतो, हेच मला माहित नसल्याने मी वरुणदेवाला जातीच्या चौकटीत बसवायला असमर्थ आहे. मात्र या पृथ्वितलावर "पाऊस पाडण्याची शक्ती" असलेली जात कुणी माझ्या निदर्शनास आणून दिली तर, त्या जातीच्या चौकटीत वरुणदेवाला बसवायचा विचार करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
प
प्रसाद गोडबोले Sun, 04/20/2014 - 19:21 नवीन
मागे काही वर्षांपुर्वी बारामतीकरांनी प्रायोगिक तत्त्वावर सिल्वर आयोडिन का काय ते त्याचा फवारा करुन कृत्रिम पाऊस पाडला होता म्हणे ... त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गंगाधर मुटे Mon, 04/21/2014 - 04:42 नवीन
त्यामुळे वरुणदेवाला बारामतीकरांच्या जातीत बसवता येईल
वरुणदेव आकाशातून पाऊस पाडतो........ बारामतीचा बारामतीकर थेट शेतकर्‍यांच्या डोळ्यातूनच पाऊस पाडतो....... धरणामध्ये पाऊस पाडण्यासाठी बारामतीकरांकडे खास बनावटीचे औजार आहे म्हणे....... एकाच श्रेणीत नाही आणता येणार यांना. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 08:31 नवीन
भारतीय संस्कृतीत देवावर कोपलेला भक्त अगदी आपल्या प्रीय देवतेला पाण्यात वगैरे सुद्धा बुडवून ठेवत असे. (हे पुर्वीच्या आज्जी आजोबा पुर्व पिढीत बरेच होते नवीन पिढ्यांना ठाऊक नाही एवढेच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
ध
धन्या Sat, 04/19/2014 - 08:35 नवीन
"देव पाण्यात बुडवून बसण्याचा" संदर्भ असा आहे तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
व
विश्वनाथ मेहेंदळे Sat, 04/19/2014 - 21:24 नवीन
अरे ते निव्वळ ब्लॅकमेक्लिंग असे. माझी मागणी मान्य कर, तोवर पाण्यातून काढणार नाही असे… नवस म्हणजे देवाला दिलेली लाच, तशी ही देवाकडे केलेली दादागिरी !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
म
माहितगार Sat, 04/19/2014 - 09:30 नवीन
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मृगनयनी Sat, 04/19/2014 - 14:06 नवीन
कवी गंगाधर मुटे यांच्या मागच्या कविता शोधल्यातर, त्यांनी लिहिलेल्या चक्क गणेशाच्या दोन आरत्या सापडल्या श्री गणराया आणि गणपतीची आरती कवी गंगाधर मुटेकृत आरत्या मिळाल्यानंतर, मृ. तैंचा देव ही संकल्पना केवळ मृ. तैंनाच माहिती आहे असा भासवणारा प्रतिसाद मनो'रंजक' वाटला.
तु'मची ही क'मेंट दे'खील म'ला तित'कीच मनो'रंजक वाट'ली.... असो...अर्थ कळेपर्यंत प्रतिसाद वाचत रहा..... =)) .. =)) ... अजून काय!!!??!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
प्रसाद गोडबोले Sat, 04/19/2014 - 15:09 नवीन
वरील लिन्क्स दिल्याबद्दल माहीतगार ह्यांचे आभार ! आता , मुटेजींनी वरील कवितेत वापरलेला 'जात' हा शब्द बीग्रेडी मनोजातीतुन (जात येथेही वृत्ती ह्याच अर्थाने) आला नसल्याची खात्री झाली आहे ! पुनश्च एकवार आभार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गंगाधर मुटे Sun, 04/20/2014 - 04:31 नवीन
माहितगार - धन्यवाद. तुमच्यासाठी आणखी काही लिंक्स. - जा रे कान्हा नटखट - चोरटा मुरारी - चेंडू मारियेला - वेणी सोडुनिया आणि मृगनयनी यांच्यासाठी काही खास लिंक : - पंढरीचा राया : अभंग-१ - शुभहस्ते पुजा : अभंग-२ - आत्महत्या बळीच्या तू रोख वामना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sun, 04/20/2014 - 05:26 नवीन
सर्वच कविता वाचल्या आणि आवडल्या, धन्यवाद आणि पु.ले.शु. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
प
प्रसाद गोडबोले Sun, 04/20/2014 - 09:14 नवीन
शेवटची सोडुन सर्व कविता आवडल्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
प
पोटे Fri, 04/18/2014 - 05:36 नवीन
गाढवाच्या मागे, एडक्याच्या पुढे धावू नये" वाक्य खूप आवडले. मुटेसाहेब, गोडबोलेंच्या मागे तुम्ही जे प्रतिसाद देत धावता आहात, तेही आवडले.
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Fri, 04/18/2014 - 17:23 नवीन
पार्डी ताड: संसारामध्ये जिवन जगत असताना जिवाला सुख पाहीजे असेल तर देव आपलासा करुन घ्यावा असे प्रतिपादन हभप किशोरीताई सांगुले यांनी हरिकिर्तनात यांनी म्हटले. येथे हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम व o्रीमद भागवत साप्ताहातील हरिकिर्तनामध्ये संबोधन करताना किशोरीताई म्हणाल्या की, भागवत कथा ही o्रवण करावी त्यामुळे माणव जिवणाचा उद्धार होतो भागवत कथा ही सुखकारी व दुखहारी आहे प्रत्येक जिवाला मरणाचे भेव आहे आज मात्र मानव सुख मिळण्यासाठी रात्रदिवस कामकरतो मात्र त्याच्या जिवणात पदरी सुख मिळत नाही पैसा म्हणजे सर्व काही सुख नाही o्रीमंत लोक सर्वात दुखी असतात पैसा काहीही सुख देत नाही. पैशाने अन्न विकत घेता येते पण भुक मात्र विकत मिळत नाही .संसारामध्ये सुख मिळविण्याकरिता देवाला आपलस करावे लागते ‘माया’ ही संसारातील सुख लपविते संसारात काही सेाबत येत नाही.परमार्थ केल्याने सर्वकाही सोबत येते.असे प्रतिपादन किशोरीताई यांनी केले या कार्यक्रमाला साथसंगत मुदंगाचार्य हभप रामेश्‍वर महाराज गायणाचार्य हभप भारत महाराज बोरकर साप्रदाईक भजनी मंडळ माळशेलू यांची होती. देव आपलासा करून घ्यावा- किशोरीताई सांगुले
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा