Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... तुम्ही असा... आस्तिक?... नास्तिक? ...???

ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 07/29/2014 - 21:12
🗣 220 प्रतिसाद
"देव आहे की नाही ?" या प्रश्नाचे उत्तर शोधण्या-देण्यात जगभरच्या लोकांत अनंत काळापासून रणकंदन चालू आहे. शतकामागून शतके लोटली तरीपण या प्रश्नाचे नक्की उत्तर मिळण्याचे लक्षण दृष्टिपथात नाही. हे जग "देव आहे" असे म्हणणारे आस्तिक आणि "देव नाही" असे म्हणणारे नास्तिक असा दोन गटांत विभागलेले आहे असा सर्वसाधारण समज आहे. पण तो समज खरा आहे का ? कोणाला खरे ज्ञान आहे ? आणि मुख्य म्हणजे तुम्ही नक्की कोण आहात आस्तिक की नास्तिक ? चला पाहूया सापडतात का उत्तरे... जरा खोलवर विचार केला तर आस्तिक-नास्तिक हा प्रकार इतका सरळ-सोपा नाही हेच दिसून येते. हे दोन सरळसोट स्पष्ट गट नसून काळा आणि पांढरा या रंगांच्यामध्ये असलेल्या असंख्य करड्या रंगाच्या वर्णपटाप्रमाणेच आस्तिक-नास्तिकतेचा वर्णपट (स्पेक्ट्रम) समाजात असतो असेच दिसते. खरे किंवा प्रामाणिक आस्तिक आणि खरे किंवा प्रामाणिक नास्तिक ही त्या वर्णपटाची केवळ दोन टोके आहेत. चला तर मग ही टोके आणि त्यांमधील वर्णपटाचे केलेले ढोबळ गट पाहूया...

प्रामाणिक आस्तिक

१. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "प्रामाणिक" "विश्वास" असतो. २. त्यांचा हा विश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी नसतो अथवा असाहाय्यतेने किंवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा विश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेल्या कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या विश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा विश्वास आहे (I believe)" असे म्हणून डोळे मिटून धर्माने सांगितलेले आचरण करतात आणि / किंवा (आ) परम ज्ञानाच्या उपासनेच्या मार्गाने ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (इ) पूजाअर्चा, नामस्मरण, कर्मकांडे इ मार्गांनी देव शोधण्याचा प्रयत्न करतात आणि / किंवा (ई) धर्माच्या मार्गाने ज्ञानी झालो की मुक्ती मिळून परमात्म्यात विलीन होणार असा विश्वास ठेवतात. म्हणजे एकूण या जगात असेपर्यंत आपण अज्ञानीच राहणार हेच एका अर्थाने कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास आहे अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि त्या देवावर बेतलेल्या धर्माला "विश्वास (belief)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव म्हणजे नक्की काय?" हे माहीत नाही असेच कबूल करतात. ६. शास्त्रात एक फार महत्त्वाचा दंडक आहे, तो म्हणजे : "एकाच गोष्टीला सिद्ध करण्यासाठी अनेक मान्य (सर्वमान्य नव्हे) सिद्धांत असणे हे ती गोष्ट नक्की कोणालाच माहीत नसल्याचे निदर्शक असते." म्हणजेच त्याबाबतीत आपल्याला कामचलाऊ ज्ञान असले तरी खर्‍या दृष्टीने आपण अज्ञानीच असतो. देव आणि धर्म ह्या दोन्हीहीबद्दलचे वैविध्यपूर्ण सिद्धांत या नियमात चपखल बसतात आणि मानव जात "देव" या संकल्पनेबद्दल अजूनही अज्ञानी आहे हेच सिद्ध करतात. ७. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक आस्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात.

प्रामाणिक नास्तिक

या गटातिल लोकांचे गुणधर्म खालिलप्रमाणे असतातः १. या लोकांचा देव आहे या "संकल्पनेवर" दृढ आणि "खरोखरच प्रामाणिक" "अविश्वास" असतो. २. त्यांचा हा अविश्वास लहानमोठ्या स्वार्थासाठी अथवा असाहाय्यतेने अथवा सोयीचा म्हणून घेतलेला पवित्रा नसतो. ३. त्यांचा हा अविश्वास त्यांच्यावर वाढत्या वयात झालेला कौटुंबिक अथवा सामाजिक परिस्थितीचा परिणाम असू शकतो. चालू असलेल्या संशोधनांत या अविश्वासामागे त्या व्यक्तींच्या मेंदूची जडणघडण कारणीभूत असल्याचे शास्त्रीय पुरावे मिळत आहेत. ४. हे लोक: (अ) "माझा अविश्वास आहे (I do not believe)" असे म्हणत आस्तिक लोकांच्या म्हणण्याचे खंडन करत असतात. (आ) "देव आहे याचा शास्त्रीय पुरावा नाही" इतकेच त्यांना आपले म्हणणे खरे आहे हे म्हणण्यासाठी पुरेसे वाटते. त्यांचे म्हणणे शास्त्रीय आहे असे म्हणत असतानाच ते म्हणणे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध करायला "देव नाही याचा शास्त्रीय पुरावा" सुद्धा जरूर आहे हा शास्त्रीय नियम ते सहजपणे विसरतात. आस्तिकांनी देवाच्या नावाने दिलेल्या आणि शास्त्रीय पद्धतीने उकल न होऊ शकणार्‍या सर्व गोष्टींना ते "अंधश्रद्धा" किंवा "याची भविष्यात शास्त्रीय कारणे मिळतील" असे म्हणून झटकून टाकतात. म्हणजे एकूण आपण देवाच्या बाबतीत पूर्णणे ज्ञानी नसल्याचे (पर्यायाने अज्ञानी असल्याचे) कबूल करतात. ५. हे लोक देव ही "पुराव्याने सिद्ध न झालेली गोष्ट" नसून "ज्यावर विश्वास नाही अशी गोष्ट" आहे असे कबूल करून आणि ते स्वत:ला "विश्वास नसणारे (non-believers)" असे संबोधून अवधानाने किंवा अनवधानाने "देव नाही हे नक्की माहीत नाही" असेच कबूल करतात. ६. प्रामाणिक आस्तिक लोकांची संख्या किती हे सांगणं कठीण आहे... पण खूप कमी असते हे नक्की. थोडक्यात : प्रामाणिक नास्तिक लोक "अल्पसंख्य", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आतापर्यंत आपण पाहिलेला वर्णपट आणि त्याची दोन टोके खालच्या आकृतीत दाखवली आहेत...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०१

एकंदरीत वरची दोन्ही टोके एकूण समाजाचा फार फार लहान भाग असतात. तर मग "ह्या वर्णपटात बसणारे इतर लोकगट कोणते?" असा प्रश्न मनात येणे साहजिक आहे. चला तर एक एक करत सगळा वर्णपट उलगडून पाहूया...

धूर्त आस्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान आस्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा पाठपुरावा करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाची भलावण हे केवळ एक साधन असते. ३. या लोकांमध्ये, देव ही संकल्पना (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना 'देव', 'धर्म' आणि 'त्या देवा-धर्माची तत्त्वे' यांना चलाखीने हरताळ फासणे आणि वर त्या कृतीचे चलाखीने समर्थन करणे या गोष्टी हे लोक मोठ्या चलाखिने करतात... शिवाय तसे करताना भल्याबुर्‍या मार्गांचा अवलंब करून लोकमताचा पाठिंबा मिळविण्याचे कसब या लोकांत असते. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... उदा. हल्लीच्या काळात शिवमंदिर बांधण्या ऐवजी साईबाबा मंदिर अथवा बालाजी मंदिर बांधणे हा जास्त फायदेशीर व्यवहार आहे हे त्यांना बरोबर कळते. ५. त्यांच्या वर नमूद केलेल्या गुणधर्मांमुळे, अर्थातच, हे लोक आर्थिक सुस्थितीत आणि सामाजिक व राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक आस्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त आस्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात.

धूर्त नास्तिक

या लोकांचे वर्णपटातले स्थान नास्तिक लोकांच्या टोकाजवळ असते. त्यांचे मूळ गुणधर्म असे: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. परंतू देव या संकल्पनेचा विरोध करण्याशी या लोकांचे महत्त्वाचे हितसंबद्ध जोडलेले असतात. तसे करण्यामुळे त्यांना होणारा फायदा खालील एक किंवा अनेक प्रकारचा असू शकतो: (अ) चरितार्थ चालणे (आ) आर्थिक फायदा (इ) सामाजिक फायदा (ई) राजकीय फायदा, (उ) देव-धर्माचा बदला घेतल्याचे वैयक्तिक समाधान इ. आणि हे हितसंबद्ध त्यांच्यासाठी सर्वोच्च असतात, देवाचा विरोध हे केवळ एक साधन असते. यातल्या शेवटच्या प्रकारात; देवाची खूप विनवणी करूनही झालेल्या प्रेमभंगामुळे आलेला देवाचा तिटकारा, प्रेम असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न न होऊ शकल्याने आलेला त्या व्यक्तीच्या देवा-धर्माचा तिटकारा, इ अनेक उपप्रकार असू शकतात... यातल्या काही केसेस तात्कालीक असतात व बसलेल्या धक्क्यातून सावरल्यावर काही कालाने सुधारतात तर इतर काही कायम स्वरूपी असू शकतात. ३. या लोकांमध्ये, देव या संकल्पनेला विरोध करणे हे (अगदी देवा-धर्माशी संबंध नसलेलाही) स्वार्थ साधण्याचे फार प्रभावी साधन म्हणून वापरण्याची विलक्षण हातोटी असते. मग तसे करताना असंबद्ध / अतार्किक / उपहासपूर्ण वाद घालणे यात यांचा हातखंडा असतो. मुद्दा उलटवल्यावर तो भरकटवून भलतीकडे नेण्यात यांचा हात धरणे कठीण असते. कारण आपला मुद्दा जिंकणे हाच त्यांच्या लेखी मुख्य मुद्दा असतो... सत्य, सारासारविवेक वगैरे इतर सर्व गोष्टी त्यापुढे दुय्यम असतात. ४. धर्मा-धर्मातल्या फरकांचाच नव्हे तर हिंदू धर्मासारख्या एकाच धर्मातल्या विविधतेचा फायदा हे लोक मोठ्या चलाखीने घेताना दिसतात... एखाद्या धर्मातील उणीव (सर्व धर्मात असे काही ना काही असतेच) हेरून त्याचा फायदा घेण्यात हे लोक पटाईत असतात. मात्र असे करताना सोईस्कर नसणार्‍या वस्तुस्थितीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात यांचा हातखंडा असतो. ५. अर्थातच, हे लोक सामाजिक आणि राजकीय सत्ताकेंद्रात अथवा सत्ताकेंद्राजवळ असल्यास आश्चर्य नाही... किंबहुना आर्थिक फायदा, पदभार, मानसन्मान यांची खैरात करत अश्या प्रकारच्या तथाकथित विचारवंतांची फौज पदरी बाळगणे ही सत्ताकेंद्रांची एक महत्त्वपूर्ण गरज असते. ६. यांची लोकसंख्या प्रामाणिक नास्तिकांपेक्षा जास्त असली तरी ती तितकीशी मोठीही असू शकत नाही... कारण त्यांचे इतके सगळे गुणधर्म एका व्यक्तित असणे तितकेसे सामान्य नसते ! थोडक्यात : धूर्त नास्तिक लोक "अल्पसंख्य नसलेले पण बहुसंख्यही नसलेले", "धूर्त " आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपण पाहिलेले गट सामील करून तयार झालेला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०२

आतापर्यंत आपण पाहिलेले सर्व लोकगट अल्पसंख्य आहेत. मग उरलेल्या मोठ्या समूहाचे काय?

धोका प्रबंधक

उरलेल्या बहुसंख्य लोकसमूहातील बहुतेक लोक "धोका प्रबंधक" या वर्गवारीत मोडतात. हे का ? याचे उत्तर त्यांच्या खालील गुणधर्मात सापडेल. १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना ठाऊक असते किंवा कमीत कमी देव या संकल्पनेबद्दल त्यांच्या मनात खात्री नसते. २. परंतू त्याचबरोबर हे सत्य उघडपणे मानणे सामाजिक अथवा राजकीय दृष्टीने फायद्याचे / सोयीचे नाही हे त्यांना पुरेपूर ठाऊक असते. त्याशिवाय आपले मत उघडपणे व्यक्त करण्यामुळे होणारे दुष्परिणाम भोगण्याची त्यांची तयारी नसते. ३. वरच्या १ व २ मधील वस्तुस्थितीमुळे हे लोक "त्यांच्या आजूबाजूच्या सर्वसाधारण सामाजिक-राजकीय प्रवाहाबरोबर वाहणे" हा कमीत कमी धोकादायक पर्याय स्वीकारतात. असे लोक कडक कम्युनिस्ट राजवटीत निधर्मी असल्यासारखे तर कडक धार्मिक राजवटीत कर्मठ धार्मिक असल्यासारखे "वागतात". ४. अर्थातच हे लोक सत्ताकेंद्रातले नसून त्यांच्या धार्मिक-सामाजिक-राजकीय सत्ताकेंद्राने ठरवलेल्या नियमांचे पालन करणारी आणि आपले नेहमीचे जीवन शक्य तेवढे निर्धोक ठेवण्याच्या प्रयत्नात असलेली सामान्य जनता असते. ५. जर देव खरोखरच असला तर आपलाही दंडवत त्याच्या नावे असावा, झाला तर फायदाच होईल असाही एक व्यावहारीक धार्मिक विचार यांच्या मनात असतो... हे सुद्धा त्यांचे एक प्रकारचे धोका प्रबंधनच असते ! ६. वरच्या सर्व वस्तुस्थितीमुळे आपले मत अथवा चेहरा नसलेल्या या बहुसंख्य अगतिक गटाला "धोका प्रबंधक" हेच नाव योग्य आहे. थोडक्यात : धोका प्रबंधक लोक "बहुसंख्य", "परिस्थितीशी जुळवून घेण्यात चलाख" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात. आतापर्यंत आपला वर्णपट खालच्या आकृतीत दाखवला आहे तसा झाला आहे...

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ३

पण आतापर्यंत पाहिलेल्या सर्व गटांनी जरी बहुतेक सर्व लोकसंख्येचे वर्गीकरण झाले असले तरी एक छोटा पण फार महत्त्वाचा गट शिल्लक आहे.

अज्ञेयवादी

आपल्या या वर्णपटात बरोबर मध्यभागी बसणार्‍या या गटाचे गुणधर्म खालीलप्रमाणे असतात: १. देव या संकल्पनेबद्दल आपण अज्ञानी आहोत हे या लोकांना पक्के ठाऊक असते. २. आपले हे अज्ञान उघडपणे व्यक्त करायला या लोकांना भिती अथवा लाज वाटत नाही आणि त्यामुळे होऊ शकणार्‍या धोक्याला सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ३. "देव आहे" आणि "देव नाही" या दोन्ही दाव्यांबद्दलचे आपले अज्ञान उघडपणे मान्य करण्याबरोबरच आस्तिक आणि नास्तिक या दोन्हीं गटांचे दावे शास्त्रिय कसोटीवर जोखून त्यातले योग्य ते सत्य / अर्धसत्य "आहे तसे" स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्याचबरोबर भविष्यात मिळणारे नवीन सबळ पुरावे स्वीकारून आपले मत त्याप्रमाणे बदलत राहणे त्यांना गैरसोयीचे अथवा मानहानीचे वाटत नाही. ४. सत्य आणि शास्त्र यांच्यावर श्रद्धा असणारे हे लोक शात्रज्ञ म्हणून यशस्वी होत असले तरी त्याच कारणामुळे राजकारणाशी त्यांचे जमणे कठीण असते. त्यामुळे कर्मठ नास्तिक (उदा. कम्युनिस्ट), धूर्त आस्तिक, धूर्त नास्तिक, मिथ्या-धर्मनिरपेक्ष किंवा कर्मठ धार्मिक प्रकारच्या राजसत्तांशी त्यांचा संघर्ष होऊ शकतो. ५. "देव या संकल्पनेबद्दल मला सत्य माहीत नाही... मी अज्ञानी आहे" हे सत्य उघडपणे मानत असल्याने यांना अज्ञेयवादी (agnostic) म्हटले जाते. ६. अर्थातच अश्या गुणधर्मांचे लोक समाजात फारच थोड्या संख्येने असणे आश्चर्यकारक नाही. थोडक्यात : अज्ञेयवादी लोक "अल्पसंख्य", "आपल्या मतांसाठी परिस्थितीशी टक्कर देण्यासाठी तयार असणारे", "प्रामाणिक" आणि "अज्ञानी" असतात. आपण अज्ञानी असल्याचे ते जाणतात आणि तसे उघडपणे कबूल करतात. या गटाबरोबरच आपला वर्णपट पुरा होतो. पूर्ण वर्णपट खालच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतो:

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : ०४

सारांश

हे वरचे विश्लेषण खालील तक्त्यात सारांशाने दाखवले आहे.

 आस्तिक-नास्तिक वर्णपट : गुणधर्म सारांश

तुम्ही कोण म्हणून काय पुसता ?... आता, तुम्हीच ठरवा तुम्ही कोण ते !

प्रतिक्रिया द्या
67667 वाचन

💬 प्रतिसाद (220)
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 05:53 नवीन
परवा रात्री भीमाशंकर परीसरात माळीण नावाचा अख्खा गाव दरड कोसळून मातीच्या ढीगार्‍याखाली गाडला गेला. तीनशेच्या आसपास लोक दरडीने आपल्या पोटात घेतले. ही घटना काय किंवा गेल्या वर्षीची उत्त्राचलची ढगफूटीमुळे झालेली प्रलयाची घटना काय, जगाचे नियंत्रण करणारी शक्ती वेळ जात नाही म्हणून टाईमपास म्हणून घडवते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 07:11 नवीन
पण मी तर असे पण ऐकले होते की विज्ञानवाद्यांचा असा विश्वास आहे की "Nature maintains its own balance".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 09:32 नवीन
हा "survival of the fittest" सारखाच अर्धवट माहितीच्या आधारे केलेल्या चूकीच्या विश्लेशणाने झालेला गैरसमज आहे... जर असा "मेनटेंड बॅलन्स" असता तर जग बदलत राहिले नसते... कोट्यावधी वर्षांपूर्वी होते तसेच राहिले असते नाही का? या विश्वात अनियमित आणि अनबॅलन्स्ड बदल सतत घडत असतात. निसर्ग / विश्व ही काही एक सारासार विवेक बाळगून काम करणारी व्यवस्था नाही त्यामुळे निसर्गात जे घडते (बदल होतात) ते घडते.. निसर्गात निर्माण होणार्‍या अस्थिरतेच्या (निसर्गबदलांच्या) परिणामांमुळे सजीव-निर्जीवांमध्ये प्रतिक्रिया होतात... त्यातील काही (निर्जीवांच्या सर्व आणि सजीवांच्या काही) प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत भौतिक (फिजिकल-केमिकल) गुणधर्मांमुळे होतात तर काही सजीवांच्या प्रतिक्रिया त्यांच्या अंगीभूत असलेल्या बुद्धीमत्तेचा वापर करून केल्या जातात. याचा सगळ्याचा मिळून झालेला परिणाम जर सजीवाला मारक ठरला तर तो नष्ट होतो आणि जर उपयोगी ठरला तर सजीव तगून राहतो आणि शक्य झाल्यास नविन परिस्थितीत अधिकाधिक विकसित होतो. याच प्रकारे डायनासोर्ससारख्या एकेकाळच्या प्रबळ प्रजाती नष्ट झाल्या आणि माणूस प्रबळ प्रजात म्हणून उत्क्रांत झाला आहे. या क्रिया-प्रतिक्रियेच्या सतत बदलत्या परिस्थितीमुळेच उत्क्रांती-क्रांती असे होत होत जग आत्ताच्या अवस्थेपर्यंत पोचले आहे... आणि भविष्यातही तसेच बदलत राहणार आहे. "Nature maintains its own balance" हे जे वाक्य आहे त्याचा खरा अर्थ असा आहे: आतापर्यंत निसर्गात (विश्वात) क्रिया-प्रतिक्रियाचे परिणाम अश्या तर्‍हेने होत आले आहेत की त्यामुळे निर्माण झालेल्या अवस्थांत पृथ्वीवरचे जीवन आजपर्यंत तरी शाबूत राहिले आहे (नष्ट झालेले नाही). याचा अर्थ ते बदलले नाही असा नाही (static आहे असा नाही) किंवा भविष्यात ते तसेच शाबूत राहील याची खात्रीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 09:36 नवीन
विज्ञानवादी काहीही म्हणू दयात. अशी एखादी नैसर्गिक आपत्ती घडते तेव्हा ही "विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती" सुट्टीवर गेलेली असते का? का तीच हे सारं घडवत असते, "तूच घडविशी तूच फोडीशी" या गीतात म्हटल्याप्रमाणे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 10:09 नवीन
कदाचित ती शक्तीही तो बॅलॅन्स साधण्यासाठीच असे करत असेल. देव म्हटल्यावर प्रत्येक वेळेस पाप - पुण्य, स्वर्ग - नरक अश्या संकल्पनाच का आवळल्यास पाहिजेत? या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 07/31/2014 - 10:16 नवीन
या व्यतिरिक्त काही विचार करणारी देव नावाची शक्ती असु शकत नाही का? हे नक्की काय आहे हे समजावून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 10:50 नवीन
अशी कुणी बॅलन्स साधणारी शक्ती असे माणसांचे जीव घेऊन बॅलन्स साधत असेल तर त्या शक्तीला माणसाशी काही देणं-घेणं नाही हाच त्याचा अर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 20:11 नवीन
हा अर्थ काढण्यापुर्वी देव आहे हे तुला मान्य करायला लागेल धन्या. ते मान्य करतोस का आधी? मग पुढच्या मुद्द्यावर चर्चा. तेच जर मान्य नसेल तर मग पुढचा अर्थ काढण्याचा अधिकारच नाही तुला. जाताजाता तुझ्या या विधानामुळे एक विनोद आठवला: सोव्हियेत राज्यात जेव्हा कम्युनिझम आंधळ्या भक्तीच्या पातळीवर गेला होता त्या काळातली गोष्ट. समाजवादाच्या फसलेल्या प्रयोगामुळे आणी जागतिक बाजारपेठेची कवाडे बंद असल्याने रशियात जनता अन्नास मोताद झाली होती. पण कम्युनिस्ट नेतेमंडळी मात्र संपन्नतेचे आणि सुबत्तेचे देखावे रचण्यात आणि कम्युनिझमच्या यशाचे गोडवे गाण्यात मग्न होती. त्या सुमारास एका कॉम्रेडने दूरदेशीच्या गावातल्या एका दूरध्वनी असलेल्या शेतकर्‍याला फोन केला तेव्हाचा हा संवादः कॉम्रेडः स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. शेतकरी: स्टॅलिनचा विजय असो. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडचा विजय असो. कॉम्रेडः साम्यवादी कारकीर्दीत सगळीकडे खुशहाली असेल आणि तु आनंदात असशील अशी आशा करतो शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. कॉम्रेडः यावर्षी पीकपाणी कसे? धनधान्य भरपुर आहे ना? शेतकरी: अर्थातच कॉम्रेड. साम्यवादाचा विजय असो. धनधान्याचे अमाप पीक आले आहे. गव्हाच्या राशी तर स्वर्गाच्या दारात देवाच्या पायाशी लोळण घेत आहेत. कॉम्रेडः काय मुर्खपणा आहे हा? जगात देव कुठे आहे. शेतकरी: अगदी बरोबर कॉम्रेड (मग धान्याच्या राशी तरी कुठे आहेत) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या गुरुवार, 07/31/2014 - 20:22 नवीन
तुझी जी काय मते आहेत त्या मतांशी तू निरागसतेने प्रामाणिक आहेस. त्यामुळे आपण इथेच थांबू या. रच्याकने, बरेच दिवसात भेटलो नाही आपण. एकदा ये वल्ल्यासोबत पेठेत वेळ काढून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 08/01/2014 - 06:27 नवीन
वोक्के. फुलस्टॉप. भेटतो का आज दुपारी? मेहता मध्ये जाइन म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ध
धन्या Fri, 08/01/2014 - 06:30 नवीन
आज? नाग पंचमीची सुट्टी नाही रे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
य
यशोधरा Sun, 08/03/2014 - 09:10 नवीन
काय घेतलेस मेहतामध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 07/31/2014 - 20:01 नवीन
देव नावाची जी काय शक्ती आहे त्याला प्रत्येक माणसाच्या पाप पुण्याचा हिशोब ठेवण्यापेक्षा जास्त महत्वाची कामे अर्थातच असतील. या जगाच्या पसार्‍याचा समतोल साधण्यासाठी देखील त्याला बरेच श्रम पडत असतील. मग एखाद्याने मुंगील मारले टाक त्याच्या खात्यावर रौरव नरक, एखाद्याने गरीबाला दान दिले टाक त्याच्या खात्यावर स्वर्गाची १० वर्षे यापेक्षा जास्त महत्वाचे काम ती शक्ती करत असावी. देव ही संकल्पना मायक्रो नसुन मॅक्रो आहे असा माझा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पैसा Wed, 07/30/2014 - 08:48 नवीन
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. शीर्षकाच्या प्रथमदर्शनी एक्का साहेबांनी ५०० प्रतिसादाशिवाय थांबायचं नाही असं ठरवून लेख लिहिलाय का असं मनात आलं. मात्र वाचायला सुरुवात केली आणि नेहमीच्या मारामार्‍यांपलिकडचे काही आहे हे लक्षात आले. मस्त विश्लेषण. काही जणांचे काही वर्गवारीबाबत मतभेद होतील, मात्र मुख्य वर्गीकरण सगळ्यांना मान्य व्हावे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 11:23 नवीन
मुख्य कॅटेगरीज शिवाय अधले मधले बरेच प्रकार असतात शिवाय चंचल मते असणारे काही असतात. म्हणून तर वर्णपटाची गरज भासते... त्यातले बिंदू / गट केवळ ढोबळ स्थलनिदर्शक (प्लेसहोल्डर्स) असतात... जनता सर्व वर्णपटभर पसरलेली असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कवितानागेश Wed, 07/30/2014 - 09:02 नवीन
सगळेच लोक 'अज्ञानी' आहेत होय? असो! :) --(ज्ञानेश्वरांच्या पायाशी घुटमळणारी) माउ
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 07/30/2014 - 09:06 नवीन
कोणी ज्ञानी असता तर तोच ज्ञानेश्वर नसता का झाला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 11:30 नवीन
असं बघा, धार्मिक म्हणतात : सर्वज्ञान / ब्रम्हज्ञान झाले कि या जगाच्या फेर्‍यातून लगेच मुक्ती मिळते... तर मग या पृथ्वीवर कोण कसा ब्रम्हज्ञानी असू शकेल ? आधुनिक शात्रज्ञ म्हणतात : शास्त्रिय शोधाने एक उत्तर मिळाले की ते त्याच्याबरोबर १०० नवे प्रश्न घेऊन येते. तर आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ? (खरंच खूप अज्ञानी असलेला) इए
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/30/2014 - 11:47 नवीन
आता सांगा कोण ज्ञानी आहे या पृथ्वीतलावर ?
>>> उत्तर खुपच सोप्पय .... संक्षी ! :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 11:48 नवीन
ठ्ठो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड Wed, 07/30/2014 - 11:50 नवीन
>>उत्तर खुपच सोप्पय .... संक्षी +७८६*१००८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 12:12 नवीन
हु च्च!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/30/2014 - 09:50 नवीन
देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास अ‍ॅक्झिओमॅटीक अ‍ॅप्रोच स्विकारावा ! म्हणजे आधी देव म्हणजे काय ? माणुस म्हणजे काय ? असणे म्हणजे काय आणि नसणे म्हणजे काय ? वगैरें विषयी अ‍ॅक्झियम्स बनवावीत , मग एकेका अ‍ॅक्झियम्स वरुन थेअरी बिल्ड करावी की ज्या योगे कन्क्लुझिव्ह प्रूफ मिळेल !! सरते शेवटी देव आहे की नाही ? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय रहाणार नाही :) ! अनुभवाचे बोल ! अंतर्स्थितीचिये खुणा | अन्तर्निष्ठचि जाणती|| दांभिक मोड ऑन हे सर्व करण्यासाठी आधी समष्टी व्हायला पाहिजे ... त्यासाठी साधना आली कष्ट आले( जे करायची तयारी बर्‍याच जणांची नसते )समर्थांनी म्हणलेच आहे की ग्रंथी जे जे बोलिले तैसेचि स्वये पाहिजे झाले येथे क्रियेच्या माथा आले निश्चितार्थे || किंव्वा भोळी भक्ती भोळा भाव | कैचा पाविजे देवाधिदेव || किंव्वा माऊलींनीही म्हणले आहे "संत सज्जनांनी घेतली प्रचिती | आळशी मंदमती केवी तरे ||" नोट : तुकाराम किंव्वा नामदेव ह्यांच्या अभंगाचा रेफरन्स न देवुन जातीयवादी वाद काढण्यास वाव ठेवला आहे . तेवछेच सेन्चुरीला कॉन्ट्रीब्युशन :ड दांभिक मोड ऑफ बाकी चर्चा भेटीअंती !!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 11:59 नवीन
एक गंभीर प्रश्न. (मलाच हसू येतंय ;) ) हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं? (धागालेखकः टीआरपी वाढीसाठी पुढचं सगळं लिहीत आहे. कृपया नोंद घ्यावी.) बाकी चर्चा नेहमीप्रमाणंच सामान्यत्वाकडून विशेषत्वाकडं (जनरलायझेशनकडून पर्सनलायझेशनकडं) निघालेली पाहून मौज वाटत आहे. त्या बरोबरच जे नाहीच असा ज्याचा ठाम विश्वास त्याच्या पूजा घालून त्याचे पैसे घेणारे लोक दुसर्‍या व्यक्तीला बिनधास्त दांभिक वगैरे बोलतात तेव्हा तर अतिशयच हसू येतं. आता त्या कामाचं हे लोक समर्थन कसं करतात ते पाहणं आलं. (काडी) एखादी व्यक्ती जेव्हा शिकवते अथवा सांगते तेव्हा त्या सांगितलेल्या गोष्टीची १००% माहिती त्याला असतेच असं नसतं. पण प्रमाण असं असं आहे असंच सांगितलेलं असतं. त्या प्रमाणाबद्दल समोरच्याला बोलण्याचा पूरेपूर अधिकार असतो, असायला हवा. बॅटमॅन म्हणतो तसं डीलिव्हरी करुन देण्यासाठी गायनॅक नं स्वतः प्रेग्नंट असावं का असा प्रश्न आहे. अर्थात माहिती आणि ज्ञान यातला फरक जेव्हा एखाद्याला समजेल तेव्हा तो बडबड कमी नि कृती जास्त करेल. देव आहे ह्याबद्दल काही ठोकताळे धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. ते समजून घेताना देव म्हणजे नेमकं काय ह्याबाबतचा गोंधळ, ज्या घरात, समाजात व्यक्ती मोठी झाली तो समाज, स्वतःची आवड नि कल, तसंच स्वतःचं परसेप्शन हे सगळं नि ह्याहून पुढचे देखील काही घटक ठोकताळ्यांना खरं किंवा खोटं ठरवतात. त्या ठोकताळ्यांचा मागोवा घेणारा आस्तिक नि न घेणारा नास्तिक असं साधं सोपं समीकरण मांडता येतं. आस्तिक चा खरा अर्थ वेद नि वेदप्रामाण्य ह्यांना मानणारा तर ह्यांना न मानणारा नास्तिक असा आहे. रुढार्थानं देव मानणं न मानणं हेही बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/30/2014 - 12:43 नवीन
हीच ती हीच ती व्यामिश्रता ! :ड
हे समष्टी होणं म्हणजे नेमकं काय होणं?
खरेतर ह्या विषयावर आम्ही "समष्टीची व्यामिश्रता " असा एक अत्यंत अभ्यासपुर्ण लेख लिहिणार होतो पण आमच्याच एका मिपाकर मित्रांनी आमचे "मटीरियल" ढापल्याने धागा काढण्यात राम राहिला नाही :(
वेद नि वेदप्रामाण्य
ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड Wed, 07/30/2014 - 13:37 नवीन
>>ह्या विषयावर नुकतीच कबड्डी खेळुन झाल्याने यंदा / सध्या पास देत आहे ! आता लेझीम खेळूया, काय म्हणता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 14:22 नवीन
लेझीमच. एक पाऊल पुढं. पुन्हा एक पाऊल मागं. हातात लेझीम खणखण करणारी. जरा ठेका चुकला की बोट सापडलंच. एक दोन तीन चार एक. आला परत जागेवर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Wed, 07/30/2014 - 11:14 नवीन
अरे देवा !! :D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 07/30/2014 - 11:22 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/30/2014 - 11:54 नवीन
ठार नास्तिकांना कंच्या क्याट्यागरीत टाकायच?
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 07/30/2014 - 11:56 नवीन
यग्दम उजव्या टॉकाला. दयावा हाव कुटं? लय दिवस दिसलंव नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Wed, 07/30/2014 - 11:59 नवीन
समदी कड उलि उलि!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 12:25 नवीन
बाकी अनऑफिशियली बेंचवरच्या लोकांनी ऑफिशियल बेंचवरच्या लोकांसाठी काढलेला धागा असं म्हणायला काही हरकत नाही ना एक्का सर???? ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 12:28 नवीन
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ??? लोकांना बुद्धीला आव्हान देणार्‍या कसदार धाग्यात राम वाटेनासा झाला की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 12:29 नवीन
"काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया ???" हे "काही सिरियस लिहावे, आणि त्यावर अशी खोचक प्रतिक्रिया ??? असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
यशोधरा Wed, 07/30/2014 - 12:31 नवीन
काही सिरियस लिहावे, आणि खोचक त्यावर अशी प्रतिक्रिया - हे उलट अगदी काव्यात्मक वाटते आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्यारे१ Wed, 07/30/2014 - 12:31 नवीन
>>> राम प्रतिसाद फाऊल धरण्यात आलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एस Wed, 07/30/2014 - 12:25 नवीन
१०० झाले... पहिला टप्पा पार पडला. मंत्रजपाला मागे टाकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments
श
शिद Wed, 07/30/2014 - 12:28 नवीन
लक्ष असू द्या आदूबाळ धाग्यावर लक्ष असू द्या...
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 07/30/2014 - 12:31 नवीन
मंत्रजपावर माझा एक पण प्रतिसाद नव्हता. :( इथे एखादा तरी असावा म्हणून हा एक.
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 07/30/2014 - 12:34 नवीन
हो हो, मानाच्या गणपतीत वर्दी लागावी. याहून मागणं लई न्हाई. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
ह
हाडक्या Wed, 07/30/2014 - 12:37 नवीन
अगदी अगदी.. या साठीच आमची पन फूल नाही तरी फुलाची पाकळी.. शंभरीनंतरचा कितवा तरी प्रतिसाद .. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
य
यशोधरा Wed, 07/30/2014 - 12:40 नवीन
मी पण तेवढ्यासाठीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 07/30/2014 - 12:48 नवीन
:ड गणपतीत नसलो तरी मिरवणूकीत तरी असलो पाहीजे ना. :ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ह
हाडक्या Wed, 07/30/2014 - 15:21 नवीन
स्मायला मेल्या आहेत राव.. 'पूर्वपरिक्षण' पहात जावा की जरा.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
अ
अजया Wed, 07/30/2014 - 12:37 नवीन
आजूबाजूच्या बर्याच जणांना कोणती कॅटेगरी लागू पडते पाहाणे हे पण मौज वाटे भारी !!आम्ही अल्पसंख्य अज्ञेयवादी तर!! कोणत्याही कॅटेगरीतील दांभिक नाही म्हणजे!
  • Log in or register to post comments
अ
अधिराज Wed, 07/30/2014 - 17:11 नवीन
ज्यांना देव असण्याची गरज आहे त्यांच्यासाठी त्याचे अस्तिव आहे व ज्यांना देव असण्याची गरज नाही त्यांच्यासाठी त्याचे अस्तित्व नाही. माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Wed, 07/30/2014 - 17:18 नवीन
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे.
तुमच्या मते जगाचे नियंत्रण करणारी जी शक्ती आहे ती जगाचे नियंत्रण करते म्हणजे नेमकं काय करते? आणि जग म्हणजे फक्त आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व? माझा प्रश्न तुमच्या या मताईतकाच प्रामाणिक आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
श
शिद Wed, 07/30/2014 - 17:31 नवीन
अवांतरः आपली पृथ्वी की आपली पृथ्वी ज्याचा एक अतिशय छोटा भाग आहे ते विराट विश्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/30/2014 - 18:14 नवीन
माझ्यामते एक सर्वोच्च शक्ती आहे कि जिचे ह्या जगावर नियंत्रण आहे. हे नेहमी ऐकायला मिळते. त्यावेळेला माझ्या अल्पमतीला काही प्रश्न पडतात : जर, कोण्या एका सर्वोच्च शक्तीने हे सर्व जग निर्माण केले आहे, तिचे आपल्यावर संपुर्ण नियंत्रण आहे, तिच्या इच्छेशिवाय पृथ्वीवरच्या झाडाचे पानही हलू शकत नाही, ती सर्व जीवांना त्यांच्या कुकर्माचे फळ म्हणून शिक्षा देते; तर मगः १. सर्व बरे-वाईट सर्वोच्च शक्तीने निर्माण केले आणि त्या गोष्टी सर्वोच्च शक्तीच्या मनाविरुद्ध काहीही करू शकत नाहीत, असे असताना वाईटपणाचा दोष आणि त्याबद्दलची शिक्षा तोच निर्माता वस्तूंना का देतो? असे करणे म्हणजे एखादी वस्तू दोषपूर्ण (defective product) बनविली गेली तर ती वस्तू तयार करणार्‍या कंपनीला (manufacturer) दोष देण्याऐवजी त्या वस्तूलाच शिक्षा देणे होत नाही का? आपला मोबाईल बिघडला तर आपण तो मोबाईल बनवणार्‍या कंपनीला दोष देतो, मोबाईलला शिक्षा देत नाही... किंबहुना मोबाईलवर राग काढून त्याची आदळआपट करण्याला असंगत, तर्कविरुद्ध, न्यायविरुद्ध कृती म्हणतो, नाही का ? २. वाईटपणाची सर्वोच्च शक्तीला चीड आहे आणि त्यांबद्दल ती शक्ती शिक्षाही देते. मग अश्या सर्वोच्च शक्तीने जगात दुष्ट प्रवृत्ती, दुष्ट माणसे, वाईटपणा हे सर्व का निर्माण केले ? फक्त आपल्याला आवडणार्‍या सुष्ट प्रवृत्ती, चांगली माणसे, चांगल्या गोष्टी निर्माण करणे सर्वोच्च शक्तीला सहज शक्य असायला हवे होते. मग तसे का केले नाही ? माझे वरचे प्रश्न केवळ प्रतिवाद म्हणून केलेले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक आहेत आणि मी त्यांची उत्तरे शोधत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा